शब्दांचा अचपळ पारा

Submitted by अनन्त्_यात्री on 30 December, 2024 - 00:12

कवितेच्या वाटेवरती
कधी झुलतो मोरपिसारा
मोहवितो पांथस्थांच्या
पाणवल्या, दिपल्या नजरा

कवितेच्या वाटेवरती
कधी विफल, विरागी राख
दडलेले त्यात कधीचे
धुमसते निखारे कैक

कवितेच्या वाटेवरती
अर्थाचा वर्ख निखळतो
शब्दांचा अचपळ पारा
वाटेवर विखरुनी जातो

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे.
ब-याचदा भावनेला/अनुभवाला तरल शब्दात मांडता येत नाही मला.