सर्वांचे एक निरीक्षण आहे की, कोविडनंतर लोकांची माणुसकी, सहनशक्ती आणि एकाग्रता कमी झाली आहे. ट्रॅफिकमध्ये किरकोळ कारणावरून हमरीतुमरीवर येण्याचे प्रमाण वाढले आहे. जसे की, इतक्या वेळा हॉर्न का वाजवला? किंवा मी हॉर्न वाजवला आणि तू बाजूला का झाला नाही? थोड्याशा शाब्दिक चकमकीचे रूपांतर शिव्या आणि हाणामारीमध्ये सहजतेने व्हायला लागले आहे. ग्राहक आणि विक्रेता (किंवा सेवा पुरवठादार) यांच्यातही पूर्वीसारखे हेल्दी रिलेशन राहिले नाहीत. त्यांच्यातही किरकोळ कारणावरून हाणामारी होऊ लागली आहे. सहनशक्ती संपली की राग अनावर होतो आणि त्याचे रूपांतर कशात होईल ते सांगता येत नाही.
हॉलिवूडची नक्कल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा मग हिंसाचार विकला जातो अशी विविध कारणे देऊन, सध्या भारतीय चित्रपट, टिव्हीवरच्या मालिका आणि वेब सिरीज मध्ये वास्तववादी वाटणारा हिंसाचार आणि सर्वात घाण शिव्या दाखवण्याचे प्रमाण गेल्या चार वर्षात इतके वाढले आहे की, सतत तेच तेच बघून लोकांच्या मनावर (समाजावर) वाईट परिणाम होतो आहे आणि हिंसाचार हाच शिष्टाचार आहे असे लोकांना वाटायला लागले आहे. इकडे मात्र विविध दिग्दर्शकांमध्ये आपल्या चित्रपटात अधिकाधिक हिंसाचार दाखवण्याची स्पर्धा चाललेली आहे. पूर्वी बटबटीत हिंसाचार फक्त दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटात होता परंतु आता मराठी चित्रपटात सुद्धा बटबटीत हिंसाचार दाखवण्यात येत आहे. या चित्रपटांचे निर्माते म्हणतात, "असेच चित्रपट लोकांना आवडतात तर आम्ही तरी काय करू?" कोणता सुजाण प्रेक्षक जाऊन असे सांगतो यांना? मला तर असे वाटत नाही. उलट "तुम्हीच लोकांना सतत हिंसाचार दाखवून त्याची सवय लावली" असे म्हणायला वाव आहे.
पूर्वीसुद्धा चित्रपटात हिंसाचार दाखवत होते, परंतु ते दाखवण्याची पद्धत वेगळी होती. ज्याला आपण नाव ठेवत होतो तेच खोटे खोटे "ढिशुम ढिशुम" आता चांगले होते असे वाटायला लागले आहे. आता तर हाडे मोडणे, आतडी बाहेर काढणे, भरमसाठ रक्त दाखवणे, शस्त्र खुपसणे, माणसांना चिरडणे, शिर तोडणे असे काहीही दाखवत आहेत. अर्थात मी असले हिंसक चित्रपट जाणीवपूर्वक बघितले नाहीत. परंतु त्यांचें ट्रेलर्स आणि एकंदरीत त्या संदर्भातील बातम्या वाचून हे मला माहिती आहे.
ही झाली चित्रपटांचे पण, आपल्या आजूबाजूला घडणऱ्या घटना आपल्याला काय सांगतात? किरकोळ कारणावरून राग आला की, लोक ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींना बिनधास्त मारून टाकत आहेत, जणू काही कायदा अस्तित्वातच नाही. भूक लागली की आपण जितक्या सहजतेने जेवण करतो तितक्या सहजतेने समोरचा माणूस नडला की त्याला मारून टाकायचे असे झाले आहे. अशा गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन जास्त आहेत. अलीकडेच एका मुलाने दुसऱ्याला केवळ या कारणाने चाकूचे सपासप वार करून मारुन टाकले की, दुसरा मुलगा पहिल्याच्या आवडीच्या मुलीशी बोलत होता, हे एक उदाहरण पुरेसे नाही का? आणखी किती उदाहरणे द्यावी लागतील? उदाहरणे भरपूर आहेत. तुम्ही रोज वर्तमानपत्रांमध्ये वाचत असता.
शिव्या देणे हा सुध्दा एक प्रकारचा शाब्दिक हिंसाचार असून कुणीही व्यक्ती त्याला दिलेली शिवी कधीच विसरत नाही आणि वेळ आली की शिवी देणाऱ्या व्यक्तीचा बदला हिंसाचाराने घेतला जातोच!
त्यात भर म्हणून, गुन्हेगारी विषयक बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल्स समाजातील हिंसाचाराच्या बातम्या सांगताना सीसीटिव्ही कॅमेरातील टिपलेली हिंसेची खरी दृश्ये दिवसभर पुन्हा पुन्हा दाखवतात. कुणी आत्महत्या कशी केली त्याची दृश्ये, तसेच कुणी अपघातात कसे गाडीच्या चाकाखाली आले हे सगळे ते मुद्दाम परत परत दाखवत राहतात. सर्व न्यूज चॅनल्स समाजात घडणाऱ्या अनेक चांगल्या घटना दाखवतच नाहीत. त्यांची सुद्धा संवेदनशीलता संपल्यासारखी दिसते आहे.
फार पूर्वी लोक संवेदनशील होते असे म्हणतात आणि हिंसा घडतांना डोळ्यांनी बघवले जात नाही म्हणून ते डोळे तरी बंद करत किंवा तिथून निघून जात किंवा ते बघून बेशुद्ध तरी पडत! एखाद दुसरा हिम्मतवान व्यक्ती हिंसा थांबवण्याचा प्रयत्न करत असे. पण आता हिंसा घडत असताना लोक मोबाईलवर त्याचा व्हिडिओ बनवतात आणि इतरांना फॉरवर्ड करतात आणि इतर लोक आवडीने एखादी क्रिकेट मॅच किंवा पाककृती बघावी तसा हा खराखुरा हिंसाचार आवडीने बघतात, इतकी संवेदनशीलता आज नष्ट झाली आहे. आजकाल तर भांडण सोडवायला येणाऱ्या व्यक्तीचाच आधी खून होतो.
प्रत्येक बऱ्यावाईट घटनेचे वर्तमानपत्रातील सखोल विश्लेषण वाचून मग आपले मत बनवायला लोकांकडे इच्छाशक्ती आणि वेळ दोन्ही नाही. कारण विद्यार्थी असो, नोकरदार व्यक्ती असो की व्यावसायिक असो, त्यांचे रोजचे जगणे पूर्वीपेक्षा खूपच जास्त संघर्षमय झाले आहे. लोकसंख्या आणि बेरोजगारी दोन्ही वाढले आहेत. लोकांकडे वेळ नाही आणि कायद्याचा धाक (किंवा कायद्यावर विश्वास) राहिला नाही? मग तिथल्या तिथे जागेवरच स्वतःच इन्साफ किंवा फैसला करायची प्रवृत्ती वाढली आहे. आपल्यापेक्षा वेगळे विचार असणाऱ्या व्यक्तींना विचारांनीच उत्तर देण्यापेक्षा त्या व्यक्तीलाच संपवून टाकण्याचे प्रकार होत आहेत.
अट्टल गुन्हेगारांचे सोडा पण अल्पवयीन शालेय मुलांनासुद्धा विविध शस्त्रे आणि अमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. प्रत्येक जण थोड्याशा कारणावरून कायदा हातात घेतो आहे. तसेच अनेक प्रकारच्या टोळ्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत.
लहान मुलांच्या मनाचा विचार करून बनवलेली पुस्तके, कथा, चित्रपट जवळपास बंद झाले आहेत. आजकाल सर्वच चित्रपट, मालिका आणि वेब सिरीज हे 18 वर्षे वयाच्या वर असलेल्या लोकांसाठीच फक्त बनत आहेत आणि ते मात्र लहान मुले सर्रास बघत आहेत. यात भर म्हणून लहान मुले ही मोबाईल आणि रिल्सच्या आहारी गेले आहेत. वाचनाचे आणि एकूणच सखोल विचार करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. गुगल कमी होते की काय म्हणून आता तर एआय (चॅट जीपीटी वगैरे) आपल्याला गुगलवर माहिती शोधण्याचे आणि त्यावर थोडा विचार करण्याचे कष्टसुद्धा करू देत नाही. अगदी आयते उत्तर देतो!
ही परिस्थिती आणखी भयावह होण्याआधी सर्व संवेदनशील सामान्य नागरिकांनी ही परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने थोडे थोडे का होईना काहीतरी सकारात्मक पाऊल टाकलेच पाहिजे. पोलिस तर त्यांचे कर्तव्य निभावत आहेतच!
उदाहरणार्थ:
• प्रचंड हिंसाचार, रक्तपात असलेले आणि गुन्हेगारांना हिरो म्हणून दाखवणारे चित्रपट महागडे तिकीट काढून न बघणे आणि फुकटात घरीसुद्धा न बघणे;
• लोकांचा चांगुलपणा आणि माणुसकीवरचा विश्वास उडणार नाही अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी बाहेरच्या जगात वावरतांना आपण आपल्या वागण्या बोलण्यातून करणे आणि आपल्या मुलांनाही तसेच शिकवणे;
• बाहेरच्या जगात आपल्या संपर्कात अगदी थोडा वेळसुद्धा येणाऱ्या अनोळखी व्यक्तींना आदराने वागवणे, "तू, तुझे" अशा एकेरी पेक्षा "तुम्ही, आप" असे संबोधणे
• रोज एका तरी अनोळखी व्यक्तीची त्याच्या चांगल्या पण योग्य गुणाची किंवा कृत्याची तारीफ करणे (खुशामद नव्हे)
• आपल्या घरातील मुलांना हिंसेचे दुष्परिणाम समजावून सांगणे, पुस्तक वाचनाची आवड लावणे, मोबाईलचा अती वापर करण्यापासून रोखणे वगैरे;
• बाहेरच्या जगात वावरताना वाद झाल्यास आपण एक पाऊल माघार घेतली तर समोरचा अर्धा पाऊल माघार घेतोच हे लक्षात ठेवा. ही मात्रा सगळीकडेच सगळया व्यक्तींसोबत लागू होणार नाही पण जिथे शक्य आहे तिथे लागू करायला हरकत नाही;
• शक्य असेल तर वाईट प्रवृत्ती विरुद्ध लिखाण करणे;
• बातम्या देणाऱ्या चॅनेल्सला सर्वांनी ईमेल लिहून, सीसीटीव्ही मधली हिंसेची, आत्महत्येची दृश्य चॅनलवर सतत न दाखवण्याची विनंती करणे. सीसीटिव्ही मधला खून बघून पोलीस खुनी व्यक्तीचा शोध लावतील, तुम्ही मात्र ते सर्व जनतेला का दिवसभर दाखवता? बातम्या सर्वच जण बघतात, अगदी लहान मुले सुद्धा बातम्या बघतात. लहान मुले तसेच अनेक संवेदनशील मनाचे लोक अशी हिंसेची दृश्य बघू शकत नाहीत.
• न्यूज चॅनल्सचे सोशल मीडिया अकाऊंट पण तेच तेच अपलोड करत राहतात. त्यांना हे करण्यापासून रोखले पाहिजे.
अशा अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. त्याचा एका व्यक्तीवर जरी चांगला प्रभाव पडला तरी पुरेसा आहे. अन्यथा येत्या पाच सहा वर्षात हिंसाचाराची परिस्थिती फार भयानक असेल आणि एक प्रकारचे नागरी युद्ध भडकेल.
बरोबर आहे.
बरोबर आहे.
छान लेख . बऱ्याच मुद्द्यांशी
छान लेख . बऱ्याच मुद्द्यांशी सहमत .
अगदी मनातले लिहिलेत. सहमत आहे
अगदी मनातले लिहिलेत. सहमत आहे.
+७८६
+७८६
अगदी पटलं. छान लिहिलं आहे.
अगदी पटलं. छान लिहिलं आहे.
लेखाशी सहमत...
लेखाशी सहमत...
१६-१७ वर्षांची मुल पण अगदी ठरवून खून करतात त्या बातम्या वाचून अगदी वाईट वाटतं.
अगदी बरोबर.
अगदी बरोबर.
न्युज चॅनल & टीआरपी वाल्यांबद्दल तर न बोललेले बरे. शॉर्ट्स मधून पण आदळत असतात. जमेल तिfunction at() { [native code] }के टाळायचे..
लहान मुलांच्या मनाचा विचार
लहान मुलांच्या मनाचा विचार करून बनवलेली पुस्तके, कथा, चित्रपट बंद झाले आहेत
+ 1
Violence is just the outer expression; byproduct of an unhappy mind. That’s one serious issue.
चांगला लेख, अनेक मुद्द्यांशी
चांगला लेख, अनेक मुद्द्यांशी सहमत.
अगदी सहमत
अगदी सहमत