पानगळीचा रंगोत्सव

Submitted by चामुंडराय on 30 November, 2024 - 17:22

Pangal.jpg
इस रंग बदलती दुनिया मे ...

२१ जून रोजी मध्यान्ही सूर्य कर्कवृत्तावर (Tropic of Cancer) बरोबर डोक्यावर येतो (June / Summer Solstice). कर्कवृत्त हे सूर्य डोक्यावर येणारे सर्वात उत्तरेकडील अक्षवृत्त आहे. सूर्याचे विषुववृत्तापासून उत्तर दिशेने मार्गोत्क्रमन होत असते तेव्हा उत्तर गोलार्धात उन्हाळा चालू असतो आणि दिवस हा रात्रीपेक्षा मोठा असतो. २१ जून नंतर मात्र सूर्याचा दक्षिण दिशेकडे प्रवास सुरु होतो. दिवस हळूहळू लहान व्हायला लागतो. परंतु उत्तर गोलार्धातील जमीन आणि पाणी तापल्यामुळे तापमानात वाढ होऊन कर्कवृत्ताच्या वरती उत्तरेकडे खऱ्या अर्थाने उन्हाळा २१ जून नंतर जाणवायला लागतो, ह्याला Seasonal lag असे म्हणतात.

दक्षिण दिशेला प्रवास करत असताना २३ सप्टेंबरला सूर्य शरद संपात (autumn / fall equinox) बिंदूपाशी येऊन पोहोचतो. त्या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात (खरंतर अवकाशातील पोकळीतून पृथ्वीवरील वातावरणात प्रवेश करताना सूर्यकिरणांचे अपवर्तन (refraction) होते त्यामुळे सूर्योदय लवकर आणि सूर्यास्त उशिरा होताना दिसतो त्यामुळे दिवस आणि रात्र ह्यांचा कालावधी सारखा असतो असे म्हणावे का हि शंका आहे परंतु तो वेगळा विषय आहे). त्या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या बरोबर डोक्यावर येतो आणि सूर्य खऱ्या अर्थाने पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो (ती खरी पूर्व आणि पश्चिम दिशा असते). इथून पुढे उत्तर गोलार्धात दिवस लहान आणि रात्र मोठी व्हायला लागून हिवाळ्याची, थंडीची चाहूल लागते. निसर्गाची थंडीच्या स्वागताची आणि जेथे बर्फ पडतो तेथे "बर्फाळा" ऋतूच्या आगमनाची तयारी सुरू होते. पक्षी दक्षिणेकडील उबदार जागी स्थलांतर करतात. झाडे, वनस्पती आणि प्राणी हिवाळ्यातील दीर्घ मुदतीच्या झोपेची - शीतनिद्रा (winter hibernation) तजवीज करायला लागतात.

टीप : हा लेख लिहिताना उत्तर गोलार्धाच्या परिप्रेक्ष्यातून लिहिला आहे मात्र उन्हाळा किंवा हिवाळा हे ऋतू गोलार्ध सापेक्ष असल्याने सर्वसामावेशतेसाठी आजकाल २ solstices (जून आणि डिसेम्बर) व २ equinoxes (मार्च आणि सप्टेंबर) असे म्हणतात.

निसर्गामध्ये वनस्पती पानातील हरीतद्रव्याच्या सहाय्याने सूर्य प्रकाश, पाणी आणि कर्ब-द्वि-प्राणिल वायू वापरून प्रकाशसंश्लेषण प्रक्रिये द्वारे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात (autotroph). ह्या प्रक्रियेने शर्करा (glucose) आणि प्राणवायूची निर्मिती होते. जेव्हा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उबदार वातावरण असते तेव्हा अन्न तयार करण्यासाठी वनस्पती जोमाने हरितद्रव्य तयार करत असतात आणि त्यामुळे सगळी सृष्टी हिरवा रंग लेवून उभी असते मात्र जसजशी सूर्यप्रकाशाची उपलब्धता कमी होते आणि तापमान कमी व्हायला लागते तसतसे हरितद्रव्य कमी होऊन पानातील इतर रंगद्रव्ये दिसायला लागतात आणि निसर्गात लाल, सोनेरी पिवळा, जांभळा, तपकिरी,सोनेरी कांस्य रंगांची उधळण होते. झाडांच्या आजूबाजूला, रस्त्यांवर लाल, पिवळ्या पानांची पखरण होते. शीतल वारा वाहत असताना अशा रंगीबेरंगी झाडांच्या वूडेड एरियातील ट्रेल वरून चालताना अमृतानुभव येतो. रस्त्यांवर, फुटपाथवर वेगवेगळ्या रंगांच्या पानांचा खच पडलेला असतो आणि विविधरंगी कोलाज तयार होते. वारा वाहत असेल तर पाने वाऱ्यावरती घेत लकेरी इतस्तह उडत पानन्यास करत असतात त्यामुळे क्षणोक्षणी रंग बदलणारे कोलाज दिसत असते. हा रंगोत्सव, हि निसर्गाची रंगपंचमी बघण्यासाठी थोड्याश्या उंचीवरून जेथून फॉल कलर्स छान दिसतील अशा आजूबाजूला असलेल्या जागांना लोकं आवर्जून भेट देतात.

fall3.jpg

ही रंगीत पाने हळूहळू गळून पडतात आणि वृक्ष ओकेबोके दिसायला लागतात. निसर्ग निष्ठुर आहे. पानांची गरज संपली की ऊर्जा नियमन आणि अतिशीत तापमानाचा पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी झाड एक क्षण देखील पानाला सांभाळत, पोसत नाही. तात्काळ त्याग करते. वंश सातत्य ही निसर्गाची आदिम प्रेरणा आहे. त्या दृष्टिकोनातून गरज संपली की निसर्गाचे स्वारस्य कमी होते आणि एक दिवस 'पिकले पान' गळून पडते.
fall5.jpg
कबीर म्हणतो -

जैसे पात गिरे तरुवर पे,
मिलना बहुत दुहेला,
ना जानूं किधर गिरेगा,
गगन पवन का रेला,
उड़ जायेगा उड़ जायेगा,
उड़ जायेगा हंस अकेला

एकाच डहाळी वर शेजारी असलेल्या दोन पानांचा जेव्हा झाड त्याग करते तेव्हा वाऱ्यावर स्वार होऊन ती दोन पाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडतात आणि त्यांची पुनर्भेट होणे मुश्किल असते

गदिमांचे शब्द बदलून -

दोन पानांची होते, झाडावर भेट 
एक झुळूक तोडी त्यांना, पुन्हा नाही गाठ !

परंतु जिथून पान झाडापासून तुटते, अलग होते तेथे एक कोंब सुप्तावस्थेत सोडून जाते. ह्या कोंबामध्ये अन्न साठवून ठेवलेले असते. जेव्हा अनुकूल परिस्थिती पुन्हा येते तेव्हा तेथून नवी पालवी फुटते. ह्या साठवलेल्या अन्नाचा नवीन येणाऱ्या पानांच्या वाढीसाठी वापर होतो. वसंत ऋतूचे आगमन झाले की अक्षरशः दोन आठवड्यात सगळा पर्णसंभार परत येतो आणि सृष्टी जणूकाही एखाद्या नवोढे सारखी हिरवा शालू नेसून समोर येते.

fall7.jpg
हे पानफुटी आणि पानगळीचे चक्र गेले हजारो, लाखो वर्षें अव्याहतपणे चालू आहे. त्यासाठी किती ऊर्जा खर्च होत असेल कोण जाणे आणि ह्या प्रक्रियेचे प्रयोजन काय न कळे कारण सदाहरित सुचिपर्णी वृक्ष अतिशीत तापमानाला तोंड देत, बर्फवृष्टी अंगावर झेलत ताठ मानेने आणि इतर निष्पर्ण वृक्षांच्या व बर्फाच्या शुभ्र पार्श्वभूमीवर हिरवा रंग अंगावर लेवून दिमाखात उभे असतात. हिमवादळ (ice storm) होते तेव्हा निष्पर्ण वृक्षांच्या फांद्यांवर आईसचे एकावर एक थर बसतात आणि त्याच्या भाराने फांद्या वाकायला लागतात, कित्येकदा धनुष्याकृती होऊन अक्षरशः जमिनीला टेकतात व भार सहन न होऊन मोडून पडतात तेव्हा सुचिपर्ण वृक्ष त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शंकू आकारामुळे हिमवादळाला समर्थपणे तोंड देताना दिसतात. आहे त्या प्राप्त परिस्थितीत तगून राहण्यासाठी उत्क्रांत होताना निसर्गाने जीवसृष्टीला किती विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत हे पहिले की थक्क व्हायला होते.

Fall4.jpg
काळ्या ढगाला ज्या प्रमाणे सोनेरी किनार असते तद्वत पानगळीचा रंगोत्सव म्हणजे जणू पुढच्या डार्क अँड ग्लूमी हिवाळ्याची सोनेरी किनारच. A picture is worth a thousand words असे म्हणतात (त्याच प्रमाणे आजकालच्या रिल्स च्या नव्या जमान्यात A video is worth a thousand pictures असे म्हणता येईल काय? असो, विषयांतर नको). ह्या रंगोत्सवाची काही प्रकाशचित्रे (आंतरजालावरून साभार) बघिल्यावर निसर्गाची महती कळते. केवळ "त्या" ला ("त" इन कॅपिटल लेटर) अनुभूती घेता यावी म्हणून तर ह्या सगळ्या पसाऱ्याचे प्रयोजन नसेल?

निसर्गो रक्षती रक्षक: I
fall9.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
रंगचित्रे जास्त सुंदर की शब्दचित्रे असे झाले Happy

छान माहिती..
फोटो खूपच सुंदर..!

अतीव सुंदर फोटो
एकदम स्वप्नात आहे असे भासवणारे.
छान लेख

आहाहा....
एक नितांतसुंदर लेख आणि सुंदर, नेत्रसुखद फोटो.
या फॉल कलर्सच्या मी प्रेमात आहे. पण अजून प्रत्यक्षात हे बघणे झाले नाही.
भारतात आपल्याकडे रंगीबेरंगी फुलांचा बहर असतो पण पानांचा असा फॉल कलर कुसुंबच्या कोवळ्या पालवीला असतो.

आपल्या प्रसंशात्मक प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

फॉल कलर्सच्या रंगांचे स्थित्यंतर दर्शवणारे एक प्रकाशचित्र.

Fall color changes.png