एक मिशन असेही.-२

Submitted by केशवकूल on 12 December, 2024 - 09:54

पृथ्वीची विविध रूपे. त्याला कल्पना होती कि आपण थोड्याच कालावधीनंतर परत येणार आहोत. आता हे वादळ! राबर्टोने आयुष्यात काय कमी वादळे बघितली होती? पण आजच्या वादाळाची सर त्याना येणार नव्हती. तो अनिमिष नेत्रांनी त्या वादळाकडे बघत राहिला. प्लॅनेट पृथ्वी! पृथ्वीवरचे आवाज, निसर्गाची विविध रूपे, रौद्र, सौम्य आणि मनभावन! ते डोंगर, त्या नद्या...
“राबर्टो, कम ऑन थिंक ऑफ टास्क्स अहेड.”
“सेंटीमेंटल होण्यासाठी आयुष्य पडले आहे.”
कोणीतरी त्याला रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते.
एका क्षणात राबर्टो “शुद्धी”वर आला.
त्याने सिम्युलेटरवर प्रॅक्टिस केलेल्या उड्डाण प्रक्रियेची उजळणी करायला सुरवात केली.
उड्डाण करायला अडीच तासांचा अवधी होता. केबिन मध्ये आपापल्या जागांवर स्थानापन्न झाल्यावर अवकाशयात्रींच्या सहयोगाने लॉंचटीमला अनेक सिस्टीमची प्राथमिक चाचणी करायची असते.
वादळाची पूर्वसूचना असतानाही(आणि बहुतेक वादळ उड्डाणाच्या नेमक्या क्षणीच येणार असतानाही) वरिष्ठांनी उड्डाणाला “गो अहेड” दिला होता. कारण ISS वर जायचे असेल तर नेमकी वेळ साधायची असते आणि ही टाईम स्लॉट –विंडो- केवळ पाच मिनिटे किंवा त्याहूनही कमी वेळ उघडी असते. पृथ्वी भोवती फिरणाऱ्या ISS किंवा चंद्र आणि पृथ्वीवर उभे असलेले यान ह्यांच्या जागा जेव्हा एका विविक्षित ठिकाणी येतात त्याच वेळी यानाने अवकाशात झेप घ्यायची असते. इतकी तयारी केल्यावर उड्डाण पुढे ढकलावे लागू नये ही सगळ्यांचीच इच्छा असते.
आता केबिनमध्ये प्रवेश करायची वेळ आली होती. प्रवेश ठराविक क्रमानेच करायचा असतो. प्रथम डाव्या बाजूला बसणारा/री म्हणजे शर्ली, नंतर उजव्या बाजूला बसणारा राबर्टो आणि शेवटी कमांडर केके. ह्या क्रमाने त्यांनी यानात प्रवेश केला.
उड्डाणाच्या वेळी अवकाशयात्री पृथ्वीवर परतताना जे यान वापरले जाते त्यात म्हणजे रीएन्ट्री मॉड्युलमध्ये बसतात. यानात निरनिराळी साधने इतक्या दाटी दाटीने बसवलेली असतात कि थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी यानातील उपकरणांचे नुकसान होण्याची भीति! थोडे सव्यापसव्य केल्यावर अखेर मंडळी आपापल्या जागेवर पोहोचली.
राबर्टोच्या पायाखाली काही हालचाल होत होती त्याची जाणीव त्याला झाली. अतिशीत द्रवरूप ३०० टन ऑक्सिजन आणि केरोसीन इंधन सारखे उकळत होते. यानाच्या हृदयाची जणू धडकन् जणू!
त्याला क्षणभर वाटले कि यान जिवंत झाले आहे. आपल्या प्रमाणे तेही उड्डाणासाठी उत्सुक होते.
पुन्हा सेंटीमेंटल!
कधी कधी त्याला वाटायचे कि आपण खरं तर लेखक व्हायला पाहिजे होतं. हे काय आपण इथे यानात बसून वाट बघत आहोत?
त्याने पुन्हा स्वतःला सावरले.
स्थानापन्न झाल्यावर सर्वात आधी अंतराळ पोशाकाशी(Space Suit) दोन विजेच्या तारांची आणि नळ्यांची जोडणी करावी लागते. विजेची एक केबल संभाषणासाठी हेडसेटशी जोडलेली असते. तर दुसरी वैद्यकीय उपकरणाशी जोडलेली असते. हृदयाचे ठोके आणि श्वास-उत्श्वास यांच्या मोजमापासाठी. दूर कंट्रोल सेंटर मध्ये डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवत असतात.
दोन नळ्यापैकी एक थंड हवेसाठी होती तर दुसरी शंभर टक्के शुद्ध प्राणवायूसाठी.
अजून एक! उड्डाणाच्या आधी प्रत्येक विश्वयात्रीला (कॉस्मोनॉट!)ला त्याच्या आवडीची, त्याने निवडलेली तीन गाणी ऐकवण्याची प्रथा आहे.
राबर्टोने कुठली गाणी निवडली असावीत? सर्वात आधी त्याने ‘Don’t Stop Me Now’ आणि ‘Beautiful Day’ही गाणी निवडली होती. ती लावली गेली. त्याच्या मनात राहून राहून हेच विचार येत होते.
I don't care, go on and tear me apart
I don't care if you do, ooh-ooh, ooh
'Cause in a sky, 'cause in a sky full of stars
I think I see you
I think I see you
शेवटी
कौमुदी आणि प्रियाने गाइलेली पसायदान ही प्रार्थना त्याने घरी रेकॉर्ड केली होती, ती त्याला ऐकवली गेली. दुर्दैवाने राबर्टोला मराठी समजत नव्हते. पण एव्हढे मात्र खरं होते कि पसायदान ऐकल्यावर (कौमुदीने त्याला त्याचा अर्थ समजून सांगितला होता.) त्याच्या चित्तवृत्ति शांत झाल्या.
(स्पेस सेंटर मधून निघून अवकाश यानात बसण्या पर्यंत अनेक गमतीदार रूढी पाळल्या जातात. त्या इथे लिहिल्यातर ह्या कथेला विनोदाची झालर लावली जाईल, तसे काही होऊ नये म्हणून मी त्या इथे लिहिणार नाहीये.)
आता परायाची वेळ जवळ येत होती.
प्रयाणाच्या काही सेकंद आधी केके लाईनवर आला. “T-झिरो साठी तयार रहा.”
“येस सर,” राबर्टो आणि शर्ली एक मुखाने बोलले.
T-६ सेकंद्स! main engines ignited.
एखादी गगनचुंबी इमारत भूकंपात हादरते, थरथरते, हेलकावे खाते त्याप्रमाणे संपूर्ण यान हादरत होते.
T-झिरो बूस्टर्स फायर झाले आणि यान पृथ्वीवरून आकाशात झेपावले. त्या लिफ्टऑफ क्षणी राबर्टोला वाटले कुणी जणू पेकाटात प्रचंड लाथ मारली आहे.
बाय बाय गुड अर्थ!
पुन्हा भेटूच!
यानाने पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रवेगाच्या(g) अडीच पट प्रवेगाने अंतर कापायला सुरवात केली. यान काही क्षण 4g पर्यंतही जाते, पण साधारणपणे 3g च्या आसपास रहाते. यानाच्या सुरक्षितते साठी.
ह्या प्रवेगाने राबर्टोला आपले वजन 250 Kg झाले आहे असे वाटले. श्वास घेणे पण अवघड झाले होते. हात हलवणे तर बाजूला राहिले. छातीवर मणामणाचे दोन गोरीले बसले असावेत अशी फीलिंग आली. राबर्टोला ह्याची जाणीव होती कि अपोलो, मर्क्युरी, जेमिनी मध्ये त्याच्या आधीच्या अवकाश यात्रींनी 7g पर्यंत प्रवेगाचा अनुभव घेतला होता. ह्यावर काही इलाज नव्हता. सहन करण्याशिवाय. एकच आशेचा किरण होता कि काही सेकंदांनंतर गोष्टी पुन्हा नेहमी प्रमाणे होणार आहेत.
दोन मिनिटांनंतर कानठळ्या बसणारा आवाज झाला आणि पहिली स्टेज यानापासून अलग झाली. राबर्टोचे रॉकेट हे तीन स्टेजचे होते. पहिल्या स्टेजचे इंधन वापरून झाले कि यानाचे वजन कमी करण्यासाठी ती स्टेज अलग करण्यात येते. यावेळी प्रवेग एकदम कमी होतो. राबर्टो पुढे फेकला गेला. पोटाचे स्नायू आक्रसले गेले. हृदयाचे ठोके 130 पर्यंत वाढले. श्वासोच्छ्वासाची नवी पद्धत त्यांना ट्रेनिंग मध्ये शिकवली गेली होती. त्याचा उपयोग करण्याची हीच वेळ होती. दुसरी स्टेज जेव्हा फायर झाली तसा पुन्हा एकदा 3gचा झटका बसला.
असा प्रकार पुन्हा एकदा होणार होता.
दुसऱ्या स्टेजला जेव्हा gचा फोर्स 1.5g होता तेव्हा केकेने कॅमेरा स्विचऑन केला. 1.5g असल्याने केके हात हलवून कॅमेरा स्विचऑन करू शकला.
आता पृथ्वीवर कंट्रोल सेंटरला सर्व यात्रींचे प्रत्यक्ष दर्शन होऊ लागले.कोणी कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. राबर्टोला वाटले शर्लीची विचारपूस करावी. पण ते शक्य नव्हते.
आता रॉकेट जवळ जवळ हॉरीझॉंटल झाले होते. तिसऱ्या स्टेजचाही त्याग करण्यात आला होता. यान आता पृथ्वीच्या कक्षेत पोहोचले होते. एकाएकी वस्तू हवेत तरंगायला लागल्या होत्या!
हेडफोनवर केकेचा आश्वासित करणारा आवाज आला.
"अभिनंदन! आपण अवकाशात प्रवेश केला आहे. आणि विशेष न्यूज ही आहे कि आपण जिवंत आहोत."

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेक्निकल लिहिण्याजोगे बरेच आहे. पण त्याचा कथेच्या गाभ्याशी तसा काही संबंध नसल्याने आता शेवटच्या भागात कथा गुंडाळून टाकेन.