एके दोवाशी गावात नवल वर्तले. बाबू शेळकेच्या शेतात एक भोक उगवले.
हा बाबू म्हणजे तद्दन रड्या माणूस. पृथ्वी वरचे सर्व मानव रडेच.
जगी ह्या खास रड्यांचा पसारा माजला सारा. बाबूची देवाकडे एकच कम्प्लेन, “बाकी सगळे श्रीमंतीत लोळताहेत मी मात्र गरीब का.
तर त्या रात्री हायपर स्पेस मधून प्रवास करणाऱ्या कुणा यक्स एलिएनने बाबू चे रुदन ऐकले आणि तो स्वतःशीच हसला.
याक्सीन बाजूच्या सीटवर बसली होती.
“काय रे, आज लई हसतो आहेस.”
यक्सने आपला हेड फोन तिला दिला, “तूच ऐक.”
“मुझको भी तो लिफ्ट करा दे.”
अब सुनिये बाबू रडवेल्याने गाया एक रडगान,
"जो भी चाहूं वो मैं पाऊं ज़िंदगी में जीत जाऊं
चाँद तारे तोड़ लाऊं सारी दुनिया पे मैं छाऊं
बस इतना सा ख्वाब है
बस इतना सा ख्वाब है ...”
“ऐकलेस ना. आता मी ह्यांची गम्मत करतो.”
दुसऱ्या दिवशी रडेला बाबू जेव्हा शेतावर गेला तेव्हा त्याला ते एक इंची व्यासाचे बीळ दिसले.
“च्यायला, ह्यांच्या मायाला, ह्या घुशींनी नुसता उच्छाद मांडलाय. आता त्या गोळ्याच टाकतो मग ना राहेगा घूस ना रहेगा बीळ.”
बाबू असे निश्चय रोज करतो पण अजून पर्यंत एकदाही त्याने एकही निषय कृतीत उतरवलेला नाहीये.
दिवसभराच्या रगाड्यात बाबु ते बीळ विसरून गेला.
दुसऱ्या दिवशी ते बीळ दोन इंची झाले.
बाबू जेव्हा खडबडून जागा झाला तेव्हा ते बीळ चक्क दोन फूट व्यासाचे झाले होते.
आता ते बीळ राहिले नव्हते तर विवर झाले होते.
आता मात्र बाबू जाम टरकला.
“हे हे म्हणजे...”
त्याने आपल्या गड्याला बोलावले. फावडे आणि घमेले घेतले, धोतराचा काचा मारला आणि माती आणि दगड विवरात सारायला लागला. किती वेळ हा प्रकार चालला होता देव जाणे. एकदम बाबूच्या लक्षात आले वढायला माती शिल्लक राहिली नव्हती.
त्याने एक विवराच्या नावाने शिवी हासडली. त्याबरोबर चमत्कार झाला. विवराचा व्यास एकदम वाढला. बाबू जरा लांब उभा होता म्हणून वाचला नाहीतर त्या विवराने त्याला गिळलेच असते. जणू शिवी दिली त्याचा विवराला राग आला असावा.
विवर आता सहा फुटाचे झाले होते.
“बापरे!”
बाबू जो पळत सुटला तो थेट चावडी समोर येऊन छाती पिटून बोंबलायला लागला.
“अरे बाब्या चूप. तालुक्याहून साहेबलोक आल्ती. काय म्हणतील काय?
बाबू वरमून म्हणाला, “सरपंचानू, माझ्या शेतात आकरीत झालाय. त्याला थांबवा नाहीतर सगळा गाव घशात घेईल.”
सरपंचाला आधी वाटलं कि बाबूला लागीर झालं. आधी वाटलं साळींदरचे धावरे असेल नाही तर कोल्या कुत्र्यांनी केलेले विवर असेल.
पण त्याने सांगितलेले ऐकल्यावर ते म्हणाले कुछ तो है.
मग सगळे लटांबर निघाले बाबूच्या शेताकडे.
ते छिद्र भोक बीळ विवर बघून सरपंचपण हादरले.
“बाप्पा हे काय नवीन? आधी काय कमी लफडी हायेत गावात? त्यात ही भर.”
त्यांनी ताबडतोब पाच सहा गडी बोलावले आणि कामाला सुरुवात केली.
सरपंच तसे हुशार!(म्हणून तर सरपंच झालेत्नी.) त्याना समजायला वेळ लागला नाही. दगड माती गोटे खाऊन विवर अजूनच गबरु होत चालले होते. हा काही इलाज नाही.
रात्री चावडी वर सर्वै पंचांची मीटिंग झाली. ही एक मीटिंग अशी झाली की सगळ्यांचे एकमत झाले. गावाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झाले होते. हे विवराचे प्रकरण म्हणजे त्याला पावरबाज देवऋषीच पाहिजे असे एक मताने ठरले.
मग पल्याड गावच्या देवऋषीला बोलावणे गेलं.
येताना तो सगळी सामग्री घेऊनच आला. विवराच्या समोर त्याने आपला दरबार थाटला. एक कवटी आणि दोन हडकं मांडली होती. कवटीच्या कपाळाला कुंकवाचा मळवट भरला होता. कवटी दात विचकून खदखदा हसत होती असा भास होत होता.
त्याने एका पायावर उभ्या उभ्या मंत्र तंत्र जप सुरु केला.
“बावन वीर छत्तीस जंजीर आग्या वेताळ मसण्या वीर...”
“ॐ नमोआदेश। गुरुजीको आदेश। ॐ अरे अरे अंजनी कुमारा। मार मार , जाल जाल, कोट कोट, बंद बंद, पूर्व बंद, पश्चिम बंद, उत्तर बंद, आकाश बंद, पाताल बंद, तिन्हो तालेके देव बंद, गुरुकी शक्ती मेरी भक्ती | खुले मंत्र ईश्वरी वाचा॥
ॐ नमो आदेश। गुरुकी शिवायै चार चक्र हनुमंत वीर बारा चक्र नारसिंह वीर दोन चक्र अगीयाबेताल मुख बंगले हिंगलात पीठ पाछे क्षत्र क्षत्रपाल मस्तकी चंद्र सूर्य सारथी जो कोई हमे मारमार करता सो हमारे डावे पाव पडता, भूत, पतित, दृष्ट, मूठ, बंध, ताप, तीजारी, टोनाटाना, चेटा, चेटी जो कोई हमे करे उसकी उसपर पडे उलट थी पलट काया गोरख कहे इस पिण्डका रक्षपालवीर हनुमंत राखे, मेरी भगत गुरुकी सगत, फुरो मंत्र ईश्वरी वाचा॥“
असे अनेक मंत्र म्हटले गेले.
शेवटी एक कोंबडी कापून आत टाकली गेली. अर्ध्या तासाने विवरातून ढेकर ऐकू आला/आली.
शेवटी सर्व गावकऱ्यांनी गाऱ्हाणे म्हटले.
“हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा.....
होय महाराजा...
आज जी तुमची पूजा सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे महाराजा....
होय महाराजा.....
कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊं दे रे महाराजा......
होय महाराजा.....
कोणाक पोर होत नसात तर त्याक पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वानका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या क्रुपेन जमानदे एकाचे दोन दोनाचे चार होऊनदे रे महाराजा......
होय महाराजा........
ह्या बघा देवक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गराणा घातलाय. चला आता सगळ्यांनी पाय पडा
अशा प्रकारे सर्व विधी यथासांग पार पडले
गावात भूतांची काय कमी नव्हती. आधीच पंचक्रोशीत सतरा भूतांची नोंद होती.
वेताळ ब्रम्हराक्षस समंध देवचार मुंजा खवीस गि-हा चेटकीन झोटिंग वीर वायंग्या
म्हसोबा जखिन लावसट हडळ डाकीण चकवा.
आणि आता १८ नंबरवर विवरित नावाचे भूत आले. हे म्हणे पाताळात वास करते आणि रागावले कि जामीन फाडून बाहेर येते. विहीर खणायच्या आधी किवा बोअर घ्यायच्या आधी ह्याला शांत करायला पाहिजे नाहीतर ...
एनीवे सगळ्याना पटले कि हे विवर एक जागृत देवस्थान आहे.
त्या अनुषंगाने रूढी परंपरा विधी उपचार उपास तापास व्रते वैकल्ये सुरु झाले. बाबू आता विवराचा गुरव झाला. त्याला म्हणे विवराने प्रथम दर्शन साक्षात्कार शनिवारी झाला म्हणून शनिवार विवराचा वार ठरला. शनिवारी गावात छबिना फिरू लागला. विवर देवाचा एक रुपेरी मुखवटा तयार झाला. श्रावणातल्या अमावास्येला जत्रा भरू लागली. धत्तुरा हे विवराचे आवडीचे झुडूप ठरले. लोक त्याची पाने फुले बोंडू आणून विवराला अर्पण करू लागले. विवराच्या आधाराने भोवती एक इकोसिस्टीमने जन्म घेतला आणि फोफावू लागली.
त्यात अजून एक भर म्हणजे अशी टूम निघाली कि विवर नवसाला पावते. लोक आपापल्या इच्छा कागदावर लिहून त्या चिठ्ठ्या विवरात सोडून द्यायला लागले. विवर त्या इच्छा पूर्ण करते असा दृढ विश्वास होता. ह्याचा उगम कसा झाला?
गावात रखमाबाई मर्द बाबल्या कुसाळे ही धुणी भांडी करणारी बाई होती. तिचा कारभारी
पदरात एक पोर टाकून परागंदा झाला होता. काही अता नाही पता नाही. तिच्या तिसरीतल्या मुलाने बापास एक पत्र लिहून विवरात सोडले. आणि काय आश्चर्य बाबल्या कुसाळे गावात हजर झाला. पंचांसमक्ष त्याने स्वतःच्या थोबाडीत मारून घेतल्या दंडवत घातले आणि माफी मागितली. ही बातमी वणव्यागत चौफेर झाली. मग काय जो तो उठसूट विवरात इच्छापत्रे टाकू लागले.
अजून एक.
विवराच्या परिसरात दगडावर कोरलेले एक सतीचे शिल्प दिसेल. जसे गावाच्या बाहेर वीरगळ असतात तसेच ही सतीशीळा!
ही शिळा गण्या आणि सुशी ह्या जोडप्या संबंधात त्यांच्या स्मरणार्थ अर्पित केली गेली आहे.
गण्या आणि सुशी ह्यांचे प्रेमसंबंध होते. त्याना एकमेकांशी लग्न करायचे होते. पण ह्या लग्नाला दोनी कुटुंबांचा विरोध होता. कारण? कारण तेच. नेहमीचे. जात आडवी आली. बिचारे दोघेही एकमेकांसाठी झुरू लागले. ह्या पोथीत प्रेम प्रकरणावर चर्चा करणे योग्य नाही, म्हणून जास्त लिहिणार नाही.
फक्त एव्हढेच लिहितो.
अखेर एके दिवशी त्यांनी एकत्र येऊन जोडीने विवराची मनोभावे प्रार्थना केली. प्रदक्षिणा घातली आणि एकमेकांचा हात धरून, जय देवा विवरदेवा आता तूच आम्हासी तार असे म्हणून विवरात उडी खाल्ली.
विवराने एक उसासा टाकला.
सगळीकडे आरडा झाला पण त्यांना वाचवायचे तर वाचवणार कोण आणि कसे. गावात ह्यावर बरीच वादावादी झाली. नवतरुणांची मते तीव्र होती. त्या प्रक्षुब्ध तरुणांनी एकत्र येऊन “जात पात तोड” मंडळाची स्थापना केली.
नंतर सर्वै हा प्रसंग नेहमी प्रमाणे विसरून गेले.
विवराने ह्या बाबतीत काय करावे? काय केले ? सांगतो.
एके दिवशी सरपंच तालुक्याला बी बियाणे आणि खतासाठी BDO ला भेटायला गेले असता अचानक गण्या आणि सुशी त्यांच्या दृष्टीस पडले. तसेच क्षणार्धात नाहीसे पण झाले. आता हा भ्रम होता कि खरेच होते हे एका विवरालाच माहित. पण जेव्हा सरपंचांनी गावात येऊन पंचायतीत कथा कथन केले त्यावेळी सर्वानीच त्यावर विश्वास ठेवला.
आखिर विवर है तो मुमकिन है.
त्यानंतरही तालुक्याला जा ये करणाऱ्या बऱ्याच लोकाना त्यांचे दर्शन घडले, पण नेमका ठावठिकाणा कुणालाही लागलेला नाही. हल्ली हल्ली त्यांचे दर्शन घडण्याचे भाग्य लाभलेले लोक सांगतात कि ते आता वृद्धत्वाकडे झुकायला लागले आहेत. असो.
(ही कथा “गाथा विवराती” च्या पोथीमध्ये समग्र वाचा. हा संपूर्ण लेख विवर देवस्थानाचे पीठाधीश स्वामी महाराज आहेत त्यांच्या आज्ञेने आणि कृपेने लिहिला गेला आहे तो केवळ ह्याज करीता कि ह्या देवस्थानाची महती सामान्य जनापर्यंत पोहोचावी. त्या पोथीच्या आधारे लिहिला गेला आहे. ही पोथी केवळ सात आण्यात पुण्यात हेर्लेकर बुक डेपो येथे मिळेल. पोस्टाने मागवता येईल. टपाल हंशील अलाहिदा पडेल.)
विवरार्पणमास्तु.
अध्याय पहिला इथे संपतो.
......................................................................
दुसरा अध्याय पूर्णपाने वैद्न्यानिक आहे. त्यामुळे लिहायला वेळ लागणार आहे.
दुसरा अध्याय पूर्णपाने
दुसरा अध्याय पूर्णपाने वैद्न्यानिक आहे. त्यामुळे लिहायला वेळ लागणार आहे.
>>>
तो लिहून झाल्यावर मगच हा पहिला भाग टाकायला हवा होतात.
कारण सुरुवात भारी आहे, पण दुसरा भाग येईपर्यंत वाचकांच्या बाजूने यातलं fizz निघून जाईल.
('वेळ लागणार आहे' - याचा अर्थ किमान महिना-पंधरा दिवस - असा मी घेतलाय.)
fizz? धार्मिक पोथीत fizz
fizz? धार्मिक पोथीत fizz कुठून येणार?
बघू जसे जमेल तसं.
येणे केशव कृपेने विवर वर्तमान
येणे केशव कृपेने विवर वर्तमान वर्णिले
वाचोन हर्षोन्मादाने ऊर भरोनीया आले
ओहो दसा. थॅन्Q!
ओहो दसा. थॅन्Q!