ओढ (भाग पहिला)

Submitted by Abuva on 9 December, 2024 - 01:18
MS Designer generated image of a crowd at a bus-stop

कार्यक्रम छानच झाला हो! सगळेच असं म्हणत होते. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळालं. आम्ही सगळेच हौशी. कुणी बासरी वाजवतो, कुणी माऊथ ऑर्गन, तर कुणी गातं. कोविडच्या काळात ऑनलाईन एकत्र आलो होतो. पण इतक्या दिवसांनी हा पहिलाच पब्लिक असा परफॉर्मन्स सादर केला होता. प्रेक्षकांत आमचेच सगेसोयरे, चाहते बहुसंख्येने होते. त्यामुळे भरभरून दाद मिळाली होती! व्हायोलिन हा प्रत्येक गाण्याचा अविभाज्य भाग असल्याने माझ्यावर बरीच जबाबदारी होती. त्यामुळे सगळं उत्तम पार पडल्यानं अगदी हायसं वाटलं होतं बघा! मी व्हायोलिनची केस उचलली आणि सगळ्या कलाकारांबरोबरच बाहेर पडले. या ग्रुपमध्ये प्राधिकरणातून आलेली मी एकटीच होते. आता तिकडून इथे पद्मावतीला कोण येणार माझ्या कार्यक्रमासाठी? पण गावातली मावशी, तिची मुलगी आणि नात मात्र आवर्जून आल्या होत्या, त्या भेटून गेल्या. मनोजच्या बॅंकेत ऑडिट चालू होतं. त्यामुळे त्याला सुट्टी घेता आली नव्हती. तो घ्यायला येणार होता. कधी नव्हे ते गावात आल्यानं, बादशाहीला रात्री जेवण्याचा इरादा होता! पण त्याला यायला अजून एक तासभर होता.
एक एक करून सगळे इतर कलाकार निघून गेले. नाट्यगृह शांत झालं. मी समोर पायऱ्यांवर बसले. सातारा रोड गर्दीनं भरून वाहात होता. उन्हाळा होता, पण संध्याकाळ झाल्यानं उन्हं कमी झाली होती. नुकत्याच संपलेल्या कार्यक्रमाचं संगीत अजूनही मनात गुंजत, लहरत होतं. थेटरच्या कर्मचाऱ्यांपैकी एकानं मला खुर्ची आणून दिली! म्हणाला, "बसा इथे. किती वेळ असं अवघडून बसणार पायऱ्यांवर? चहा आणू?" त्यानं समोरच्या चहाच्या हातगाडीकडे बोट दाखवलं. विचार केला, तास काढायचाय. त्याला म्हटलं, "चालेल. अं, पाण्याची बाटली मिळेल तिथे?" मी त्या चहाच्या हातगाडी कडे बघत होते. नेहमीचं दृष्य. बाजूच्या पानटपरीवाल्याकडे बिडी-सिग्रेट घ्यायची आणि मग एक कटिंग. तो कर्मचारी चहाचे ग्लास घेऊन वळला, तेवढ्यात उजवीकडून एक जण त्या हातगाडीपाशी आला. चालताना तो एक पाय ओढत, घासत होता, त्यामुळे खरं तर माझं लक्ष एक क्षणभर अधिक खिळलं. व्यक्ती पाठमोरी झाली. पण काही तरी ओळखीचं जाणवलं. मी अस्वस्थ झाले. विचार केला, एका फाटक्या, भिकाऱ्यात काय ओळखीचं वाटतंय? विचार झटकला. पण अस्वस्थता वाढलीच.
तेवढ्यात मला त्या कर्मचाऱ्याने आणलेला चहा दिला, पाण्याची बाटली दिली. मी पैसे दिले. इतरांचाही चहा होता, तो घेऊन आत गेला. पाणी प्यायले. चहाचे घुटके घेता घेता माझं लक्ष पुन्हा एकदा त्या हातगाडीकडे आणि त्या इसमाकडे गेलं. चहाचा ग्लास हातात घेऊन तो इसम वळला होता. खुरटी दाढी, उजळ वर्ण, चष्मा आणि चंद्रकोरी टक्कल. गबाळा वेष. सुभाषकाका!

त्या धक्क्यानं माझ्या हातातला ग्लास डचमळला, चहा हिंदकळला. पायाला टेकवून ठेवलेली व्हायोलिनची केस घसरून खाली पडली. गडबडीने मी ग्लास शेजारच्या कट्ट्यावर ठेवला. खाली वाकून केस उचलून पुन्हा उभी करून ठेवली. पुन्हा समोर लक्ष गेलं तेव्हा तो इसम वळून मुख्य सातारा रस्त्याकडे चालू लागला होता.
काका? हा? इथे? असा? सुभाषकाकाच आहे ना तो?
आता त्याच्या चेहेऱ्यावर मावळतीकडून येणारा उजेड होता. तोच तो. शंकाच नाही. किती थकलाय. वाळलाय आणि डावी बाजू ओढतोय म्हणजे..
काय वाटलं काय माहित, मी लगबगीनं चहा एका घोटात संपवला. बाटली पर्समधे कोंबली, केस उचलली आणि पायऱ्या उतरायला लागले. काका कुठे चाललाय ते बघत जवळजवळ धावतच मी नाट्यगृहाच्या बाहेर पडले. तो त्याच्या चालीनं हळूहळू चालला होता. पुढे बसस्टॉप होता. तिकडे जात असावा का? मी कोपऱ्यावर आले आणि ब्रेक लावल्यासारखी थांबले.

'मी का धावते आहे सुभाषकाका पाठीमागे?’
'आहे तरी का तो सुभाषकाका?’
'आहे.’
'असेल. तुला काय करायचंय त्याच्याशी?’
'अगं पण..’
'अजूनही? इतकं सगळं झालं तरी? गेल्या तीस वर्षांत कधी संबंध आला नाही अन्....’
'साठीचा असेल नसेल पण कसा झालाय!’

रस्त्याच्या कॉर्नरवर दिङ्मूढ उभी राहून मी त्या पाठमोऱ्या आकृतीला हळूहळू चालत जाताना बघत होते. मन तीस, नाही पस्तीस, वर्षं मागे गेलं. अशाच संध्याकाळच्या उतरत्या उन्हांत मी काकाला जाताना पाहिलं होतं, शेवटचं. सामानाच्या ट्रक मागे त्याच्या स्कूटरवरून जाताना...

---

दिवस कठीण होता म्हणून मी माहेरी आले होते. आई-बाबांसाठी आले होते. व्हरांड्यात उभी राहून जाळीतून बाहेरचा गोंधळ बघत होते. शानू आत-बाहेर करत होता. मी बधीर झाले होते, शानू अस्वस्थ होता. बाबा त्यांच्या व्हरांड्यातल्या नेहमीच्या खुर्चीत, पण तोंड फिरवून बसले होते. एक मासिक तोंडासमोर धरून, दाखवण्यापुरतं वाचण्याचं नाटक करत. आई तर आज बाहेर फिरकलीच नव्हती. पण सगळ्यात गोंधळलेला होता तो आमचा टिप्या. नेहमी उड्या मारणारा, परक्या माणसांवर भुंकून कहर करणारा टिप्या आज अगदी मुरगाळून पडला होता. पुढच्या दोन पायांवर तोंड टाकून पडला होता. कठीण दिवस होता.
दिवसभर शेजारून सामानाच्या ओढाओढीचे, वस्तू पडण्याचे, भिंत ठोकण्याचे, भांड्यांच्या खणखणाटाचे, मजुरांच्या बोलण्याचे, सुभाषकाकाच्या ऑर्डरींचे आवाज येत होते. शेवटी, सगळं सामान चढवून झालं. मजूर ट्रकात चढले. विनीताकाकू मग अजयला हात धरून ओढत घेऊन गेली. तो इकडे बघत होता. पण काकूनं त्याला संधीच दिली नाही. तरातरा फरफटवत घेऊन गेली. सगळ्यात शेवटी काका बाहेर आला. दरवाजा ओढून त्यानं कुलूप लावलं. दोन पायऱ्या उतरून अंगणात आला. क्षणभर वाटलं तो आता वळणार आणि येतो म्हणून सांगणार. पण नाही. तोही पाठ फिरवून चालू लागला. अंगणाचं गेट लावताना एक क्षणभरच त्याची माझी नजरानजर झाली खरी, पण तो झटकन पलटला. स्कूटरला किक मारून तो ट्रकवाल्याला म्हणाला, "चला, जाऊ द्या.”
सरत्या उन्हात फरफरत्या ट्रकच्यामागे स्कूटरवरून पाठमोरा जाणारा काका..
फक्त तो दिवस नाही, तर काळच कठीण आला होता. पण तो कठीण म्हणजे किती कठीण होता, याचा आम्हाला काहीच अंदाज नव्हता.

---

सुभाषकाका बस स्टॉपवर थांबला. जागा बघून उभा राहिला. मी घड्याळात पाहिलं. मनोजला अजून पाऊण एक तास होता यायला. काय करावं? कुठल्या बसमध्ये बसतो काका ते तर पहावं...
जुन्या आठवणींचा कल्लोळ उठला होता मनात. अगदी अगदी अस्वस्थ झाले होते. हा जर्मनीला गेला होता ना? मग आता हा अशा अवस्थेत इथे काय करतोय?
मी खरं तर याच भागात वाढले होते. आमचा बंगला इथून दोन मिनिटं चालण्याच्या अंतरावर होता. आमचा बंगला? हं.. हो आमचाच होता तो.. आज तिकडे, त्या दिशेला, त्या गल्लीत जायचीही इच्छा होत नाही. पण एके काळी...

---

माझे बाबा आणि सुभाषकाका सावत्र भाऊ. त्यांच्यात अठरा वर्षांचं अंतर. बाबांची आई बाळंतपणातच वारली. आजोबांनी दुसरं लग्न केलं. पण त्यांना मूल खूपच उशीरा झालं. तोच हा सुभाषकाका. काका दोन तीन वर्षांचा असताना आजोबा अचानकच गेले. पण आमचे आजोबा फार धोरणी असावेत. कोर्टात कारकुनी करताना त्यांनी ही जागा घेऊन घर बांधलं होतं. तेंव्हा हा सगळा भाग गावाबाहेर होता. त्यांनी ठरवूनच ट्विन टाईप बंगला बांधला होता. अर्धा भाग आपण रहाण्यासाठी, आणि अर्धा भाड्याने द्यायला! पण त्यांना हे सुख फार काळ लाभलं नाही. बाबा एकोणीस-वीस वर्षांचे असतानाच ते गेले. मग ते वर्ष संपायच्या आत बाबांचं लग्न करून द्यावं लागलं. लग्न झालं तेंव्हा आई कशीबशी अठरा वर्षांची होती. त्या लग्नानं तिचं कॉलेज शिक्षण मात्र अर्धवट राहिलं.
तर सांगत काय होते, की बाबांच्यात आणि काकात अठरा-एक वर्षांचं अंतर. बाबांना सावत्रपणाचा त्रास नाही म्हटलं तरी झाला होताच. एक तर, आईला खाऊन जन्मलेलं मूल हा शिक्का. आणि दुसऱ्या आईला मूल होत नाही या दुःखाने तिनं केलेलं हिडीसफिडीस. पण, पण जेंव्हा त्या आईला संधिवात झाला, जबरदस्त संधिवात झाला, तेंव्हा माझ्या आईबाबांनी तिचं सगळं, सगळं केलं. उशीरा झालेलं मूल तिलाही लाभलं नाही. सुभाषकाकाच्या जन्मानंतर वर्षाभरातच ती संधिवातानं तिला ग्रासलं असं म्हणतात. बाबांच्या लग्नानंतर गेलीच ती दोन वर्षांत. त्यामुळे खऱ्या अर्थानं सुभाषकाकाचं आईपण माझ्या आईनंच केलं. बाबांची तर अपार माया होती काकावर. आईवेगळं मूल हे दुःख त्यांनी अनुभवलं होतं. त्यामुळे त्यांनी कधी काकाला काही कमी‌ पडू दिलं नाही. कोण होते माझे बाबा? एका वाहनं बनवणाऱ्या कंपनीत साधे ड्राफ्ट्समन. पण त्यांनी आम्हा मुलांवर, त्यात काका आलाच हं, खूप प्रेम केलं, खूप माया लावली. आईही तशीच. तिचं शिक्षण पूर्ण झालं नसेल. पण तिच्या वाचनाच्या प्रेमाचं रूपांतर तिनं एक लायब्ररी चालवण्यात केलं होतं. या भागातलं पहिलं वाचनालय! त्याच्यामुळे तिचा लोकसंपर्क इतका विलक्षण होता..

---

असंच अवघडून कोपऱ्यावर किती वेळ उभं रहायचं तरी? जाणारे येणारे जरा विचित्र नजरेनेच बघत होते. कार्यक्रमासाठी नटून सजून आले होते. ठेवणीतली साडी, मोजके दागिने, हलकासा मेकप होता. त्या रहदारीच्या रस्त्यावर मी अगदीच विसंगत दिसत होते खरं! मागे जावं का पुढे या दुग्ध्यात असतानाच मागून एक ट्रक आला, कोपरा धरून थांबला. आता हलणं भागच होतं. चटचट चालत मी स्टॉप पर्यंत गेले. माझ्याकडे काकाचं लक्ष गेलं असं वाटलं मला. पण त्यानं काही ओळखलं नसावं. बरोबरच आहे म्हणा. तेंव्हा मी कॉलेजच्या वयाची मुलगी होते. आज माझी मुलगी लग्न करून परदेशी नांदतेय! कदाचित माझ्या हातातलं व्हायोलिन बघून त्याच्या आठवणी चाळवल्या तर...
मी तो घोळका ओलांडून न दिसेलशी पलिकडे जाऊन उभी राहिले. बशी येत होत्या, जात होत्या.

---

माझ्यात अन् सुभाषकाकामध्ये सहा वर्षांचं अंतर. भावासारखा म्हणावं तर अंतर जास्त, काका म्हणावं तर फारच कमी! शानू, म्हणजे श्रीनिवास, माझा धाकटा भाऊ माझ्याहून पाच वर्षांनी लहान. बरं, मी ललिता, मला घरी राणी म्हणायचे.
काका हुशार होता. माझा तर सगळा अभ्यास तोच घ्यायचा. आईला लायब्ररीतून वेळ कुठे मिळायचा! पण शानूचा अभ्यास घ्यायची वेळ येईपर्यंत तो मोठा झाला होता. तर सांगतेय काय की माझं आणि काकाचं अगदी छान जमायचं. त्यानंच पहिल्यांदा व्हायोलिन शिकायचा प्रयत्न केला होता. पण संगीत म्हणा, कला म्हणा, नसतं एकेकाच्या नशिबात. मग त्यानं माझ्या मागे लागून मला व्हायोलिन शिकायला भाग पाडलं होतं. असंच त्यानं शानूला ईलेक्ट्रिकच्या वस्तूंच्या तोडमोडीची आणि जोडीची चटक लावली होती! तोच शानूचा पुढे पोटापाण्याचा व्यवसाय झाला. टिप्या ही त्याचीच हौस. पण आम्हा सगळ्यांना त्याचा इतका लळा लागला.. काकाच्या एकेका आवडीभोवती घर बनत गेलं, आम्ही घडत गेलो.
नशीब... हं.. सहज इंजिनिअर झाला तो, पहिल्या क्रमांकाने! लगेच एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. आणि पहिल्याच वर्षी तो जर्मनीला गेला. आम्हाला कोण अभिमान वाटायचा त्याचा! नव्या सुटाबुटांत राजबिंड्या काकाला बघून माझ्या बाबांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहिलं होतं. त्यांच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं तेवढं एकदाच, फक्त एकदाच! पुढे डोळे पाणावायचे अनेक प्रसंग आले. पण तिथे त्यांचा कणा ताठ तो ताठच राहिला अन् डोळे कोरडे ठाक.

---

एका डेपोला जाणाऱ्या बसमध्ये सुभाषकाकानं चढण्याचा प्रयत्न केला. येतानाच भरून आली होती ती बस. आणि इथे घोळकाच्या घोळका चढला. त्यात लंगडणाऱ्या काकाची काय डाळ शिजणार होती? पण गर्दी थोडी कमी झाली हे खरं. केवढी ही गर्दी अन् केवढी रहदारी... आम्ही रहायचो तेंव्हा ह्या पद्मावतीला शेती होती, जंगल होतं. आता एवढा बलाढ्य रस्ता आहे. तेंव्हा साधा दोन पदरी रस्ता होता. आणि दोन्ही बाजूला मोठी मोठी सावली देणारी झाडं. आत्ता जितकी मंडळी बससाठी उभी आहेत ना, तेवढी मंडळी दिवसभरात दिसायची नाहीत!

'पुढच्या बसमध्ये काका चढला तर? मी पण चढू का? जाऊ त्याच्या मागेमागे?’
'कशाला? काय करायचंय? बोलणारेस तू त्याच्याशी? काय बोलणार?’

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults