अन्नपूर्णा सर्किट ट्रेक (भाग ६)

Submitted by प्र on 8 November, 2024 - 22:54

२५ एप्रिल २०२४

पाच वाजता जाग आलीच. पण पडून राहिलो. ६ च्या सुमारास डायनिंग हॉलमध्ये हालचाल जाणवली तेव्हा उठलो. चुळ भरायला गेलो तर वॉश बेसिनचा नळ गोठला होता. आतल्या दुसऱ्या नळाला पाणी येत होतं पण अति थंड. शेवटी गरम पाणी मागून घेतलं (म्हणजे विकत घेतलं) तोंड धुवायला. तपमान शून्याखाली होतं पण तरी काल रात्रीइतकी थंडी वाटत नव्हती. झोप होऊन शरीर ताजंतवानं झाल्यामुळे असेल बहुतेक.

नेहेमीप्रमाणे नाश्ता करून मी ७। वाजता बाहेर पडलो. बाकी ट्रेकर्स अजून आवरत होते, त्यांना बाय बाय केला.
मी राहिलो होतो ते हॉटेल याक खरका गावाच्या सुरुवातीलाच होतं. तिथून पुढे थोडा उतार आणि मग आणखी काही हॉटेल्स होती. त्यानंतर चढ सुरु झाला. आता मात्र विरळ हवेचा परिणाम चांगलाच जाणवला. चालण्याचा वेग एकदम कमी झाला. काही हरकत नाही. आज तसंही फक्त ७-८ किमी चाल होती. तेव्हा हळूहळू चालत राहिलो. लवकरच लेदारला पोचलो. इथे ३-४ हॉटेल्स आहेत. पण निघून जेमतेम एक तास झाला होता. तेव्हा इतक्यात कशाला ब्रेक घ्यायचा म्हणून मी थांबलो नाही तिथे.

आजचा रस्ता कालच्याइतकाच सुंदर होता. फक्त चालताना श्रम जाणवत होते. आणि चालण्याचा वेग कमी झाला होता. शिवाय काल मला ४ तासांच्या प्रवासात अगदी तुरळक ट्रेकर्स भेटले होते. आज मात्र बरेच जास्त होते. अर्थात भारतीय मात्र कुणीच नाही. राज-संगीता मनांग सोडल्यानंतर पुन्हा भेटले नव्हते. आज या वाटेवर चालणारे पुढे आणि मागे बरेच लोक दिसत होते. अचानक लक्षात आलं की डावीकडे थोड्या खालच्या बाजूला आणखी एक वाट आहे आणि त्या वाटेने पण बरेच ट्रेकर्स जाताहेत. म्हणजे मी वाट चुकलो की काय? थांबून पुढे मागे बघत होतो. मागून एक गोरा येत होता. त्याने जणू माझ्या मनातला प्रश्न ओळखला. स्वतःच म्हणाला की दोन्ही वाटा थोरोंग फेडीलाच जातात. डावीकडची (खालची) वाट म्हणजे जुनी वाट. त्या वाटेत दरड कोसळण्याचा मोठा धोका आहे. म्हणून ही नवी वाट तयार केली आहे. या वाटेवर दरड कोसळण्याचा धोका नाही किंवा कमी आहे. पण ही वाट थोडी लांबून जाते आणि बरीच उंच चढून मग थोरोंग फेडीला खाली उतरते. मग मी निश्चिन्त होऊन मार्गक्रमण चालू ठेवलं. दमछाक मात्र होत होती. नंतर नकाशा बघितल्यावर कळलं की इथे एक फाटा होता:
https://maps.app.goo.gl/HyKPRKXVRzsrg3PM7
पण तंद्रीत चालताना मला तो लक्षात आला नव्हता! मी चुकून उजवा रस्ता घेतला होता पण सुदैवानी तोच बरा होता डाव्यापेक्षा.

सकाळी याक खरकामध्ये १ लिटर गरम पाणी भरून घेतलं होतं. मध्ये मध्ये थांबून ते पीत होतो. खायला मात्र काही नव्हतं. एनर्जी हळू हळू कमी होऊ लागली. चहा मिळाला तर बरं होईल असं वाटायला लागलं. दूर अंतरावर एक घर दिसत होतं आणि तिथे काही ट्रेकर्स थांबले आहेत असंही दिसत होतं. तेव्हा तिथे टी हाऊस असणार असं वाटून जरा बरं वाटलं. पण तिथे पोचल्यावर कळलं की टी हाऊस बंद आहे. निराशा झाली. माझ्यासारखेच निराश झालेले ट्रेकर्स कट्ट्यावर बसून नुसतंच पाणी पीत होते. मीही तेच केलं. आता तर माझं पाणी पण संपत आलं. पुन्हा पायपीट करण्यावाचुन पर्याय नव्हता.

थोड्या वेळानी दिसलं की डावीकडचा मार्ग आता नदी ओलांडून पलीकडे गेला आहे. आणि तिथे २-३ ठिकाणी खरोखर दरड कोसळण्याच्या खुणा दिसत होत्या. ते दृश्य इतकं भीतीदायक होतं की मी (चुकून का होईना) उजवा रस्ता घेतला त्याबद्दल स्वतःची पाठ थोपटली.

Darad.jpeg

थोड्याच वेळात बरंच दूर आणि बरंच खाली थोरोंग फेडी दिसायला लागलं. चला, आता निदान उद्दिष्ट नजरेच्या टप्प्यात आलं. उत्साह वाढला. पण एव्हाना पाणी मात्र संपलं. तसाच जात राहिलो. सुदैवानी लवकरच उतार सुरु झाला. खरं तर तीव्र उतार. जवळ जवळ १५० मी उतरून नदीवरील पुलापाशी पोचलो. पूल ओलांडून थोरोंग फेडी!
https://maps.app.goo.gl/8LxKgRTa3GeuPW7G9

इथे माझ्या आधी पुष्कळ लोक येऊन पोचले होते. मी १२।। वाजता पोचलो. चांगलाच दमलो होतो. खोलीत जाऊन अर्धा तास पडलो तेव्हा जरा बरं वाटलं. मग पुन्हा रेस्टॉरंटमध्ये आलो. इथे एकदम छान वातावरण होतो. नाना देशीचे नाना लोक आपापल्या भाषेत बोलत होते. संगीत (अर्थात पाश्चात्य) सुरु होते. वायफाय इंटरनेट नेहेमीप्रमाणे फक्त रेस्टॉरंटमधेच चालतं.
एक वाजला होता. सकाळी ७ नंतर फक्त पाणीच पोटात गेलं होतं. पण तरी जेवायची इच्छापण होत नव्हती. काही तरी खायला हवं म्हणून मी मॅश्ड पोटॅटोज विथ चीझ मागवलं. रोज दाल भात खात होतो, म्हणलं आज जरा चैन करावी. मीठ , मिरपूड घालून छान लागेल. छानच लागत होतं पण का कुणास ठाऊक २ घासांपुढे मला खाववेना. शेवटी मी थांबलो. चहा मागवला. चहा पिऊन किंचित बरं वाटलं. परत खोलीत जाऊन थोडा वेळ आराम केला. आता माझ्या लक्षात आलं की माझं डोकं सूक्ष्म दुखतं आहे.

आज मी जेमतेम ७-८ किमी अंतर चाललो. आणि सुमारे ७०० मी चढून पुन्हा १५० मी खाली उतरून इथे पोचलो. यानीच माझी काय हालत झाली आहे! आणि उद्या तर १३ किमी अंतर, १००० मी चढाई आणि १६०० मी उतार. म्हणजे आजच्या दीडपटपेक्षा जास्त अंतर, दीडपट चढाई आणि दसपट जास्त उतार. आणि ते पण आजच्यापेक्षा आणखी विरळ हवेत. कसं होणार माझं? जसा विचार करत गेलो तसं मला प्रश्नाचं गांभीर्य जाणवलं. डोकं दुखतं आहे म्हणजे मला अल्टीट्यूड सिकनेसचा सौम्य त्रास होतो आहे आत्ताच. उद्या आणखी उंच गेल्यावर तो वाढेल का? मी खिंड ओलांडून जाऊ शकेन की परत माघारी जावं लागेल? की आणखी काही गंभीर होईल?

नेमकं तेव्हाच एक हेलिकॉप्टर भिरभिरत वरती हाय कॅम्पच्या दिशेने गेलेलं दिसलं. म्हणजे तिथे कुणाची तरी अवस्था गंभीर आहे आणि त्याला / तिला उचलून न्यायला हेलिकॉप्टर आलंय. बाप रे! माझ्यावर ही वेळ येईल की काय?

मी काय करू? उद्या वर जाऊ, का परत मागे (म्हणजे खाली) जाऊ? मागं जाणं सेफ होतं. पण तसं केलं तर आयुष्यभर बोच राहील की मी ट्रेक अर्धवट सोडला. मी काय करू??? काही समजेना.

शेवटी पुन्हा रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसलो. पुन्हा चहा. थोडा वेळ करमणूक म्हणून यूट्यूबवर गाणी बघत आणि ऐकत बसलो. यूट्यूब स्वतःहून आपल्याला काही बाही विडिओ बघायला सुचवत असतं. त्यात एक सूचना आली:
https://youtu.be/x0AUAR2eKSY?feature=shared
रेडु या सिनेमातलं गुरु ठाकूर यांचं गाणं. मी हे गाणं कधी ऐकलं नव्हतं. उत्सुकता म्हणून क्लिक केलं. गाण्याचा मुखडा आणि पहिला कोरस ऐकला आणि अचानक ट्यूब पेटली. हे गाणं ऐकून बघा म्हणजे का ते कळेल. एकदम विचार बदलले. अरे तू कशाला काळजी करतो आहे? देवाक काळजी रे!

नकारात्मक भावना जेव्हा मनाचा कब्जा घेतात तेव्हा विचारशक्ती नीट काम करत नाही. उद्या माझं कसं होणार एवढा एकच प्रश्न मनात होता, पण त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणं पण जमत नव्हतं. गाणं ऐकल्यावर नकारात्मक भावना सपशेल गेल्या. मग डोकं चालायला लागलं.

लोकं विचार करतात की मुक्काम थोरोंग फेडीला करावा की हाय कॅम्पला. मीपण हाच विचार केला होता. पण दोन्हीकडे मुक्काम करायला काय हरकत आहे? एक दिवस जादा लागेल इतकंच. मी परतीच्या विमानाचं तिकीट तब्बल २ दिवस मार्जिन ठेवून काढलं होतं. म्हणजे एक दिवस जादा खर्च करणं मला परवडणार होतं! म्हणजे प्रश्न मिटलाच की. उद्या इथून निघून हाय कॅम्पला जायचं. म्हणजे फक्त ३५० मी चढाई. आणि परवा तिथून मुक्तिनाथ गाठायचं. म्हणजे परवा ६०० मी चढाई आणि १६०० मी उतार. उताराला कोण घाबरतंय इथं?

एकदम मन:स्थिती बदलून गेली. पण तरी डोकं दुखणं काही थांबलं नाही. मग अल्टीट्यूड सिकनेस बद्दल माहिती इंटरनेट वर शोधून वाचू लागलो. बरंच काही वाचलं आणि २ गोष्टी पटल्या आणि त्या मी करायचं ठरवलं. एक म्हणजे क्रोसिन घेतल्याने डोकेदुखी कमी होईल म्हणून लगेच घेऊन टाकली. दुसरं असं की दर थोड्या वेळानी दीर्घ श्वसन करावं म्हणजे कार्बन मोनॉक्साईड फुफुसातून बाहेर निघून जातो, ज्यामुळे ऑक्सिजन पातळी सुधारते. लगेच खोलीत गेलो आणि अधून मधून दीर्घ श्वसन करत पडून राहिलो. परिणाम कशाचा झाला माहिती नाही, पण तासाभराने लक्षात आलं की आता डोकं दुखत नाहीये. अरे वा!

संध्याकाळी परत रेस्टॉरंटमध्ये गेलो तर अदोनीस परत भेटला. एकटाच होता. सोफिया अति दमल्यामुळे झोपून गेली होती म्हणे. अदोनीस ठीक होता. मी त्याला सांगितलं की माझं डोकं दुखत होतं पण क्रोसिन घेऊन आता बरंय. आणि माझा बदललेला प्लॅनपण त्याला सांगितला. तो मात्र म्हणाला की आम्ही उद्या थेट मुक्तिनाथ गाठणार.

आज दुपारचं जेवण म्हणजे केवळ २ घास बटाटे खाल्ले होते. तरीही आता संध्याकाळी पण काहीही खायची इच्छा होत नव्हती. पण उद्या सकाळी उठून जायचं आहे तर पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी खाणं आवश्यक होतं. म्हणून मी गरम सूप मागवलं. आणि सिनॅमोन रोल सुद्धा. या रेस्टॉरंट मध्ये चक्क बेकरी आहे आणि छान छान पदार्थ ते तयार करतात. सिनॅमोन रोल होता चांगलाच, पण मी जेमतेम अर्धा खाऊ शकलो. सूप तेवढं संपवलं.

थोरोंग फेडी ते मुक्तिनाथ हा खूप मोठा टप्पा आहे. त्यातही थोरोंग ला या खिंडीत सकाळी लवकर पोचलेलं चांगलं कारण नंतर तिथे जोरदार वारं सुटतं अशी माहिती आधीच वाचलेली होती. त्यामुळे बरेच ट्रेकर्स इथनं पहाटे ३ लाच निघतात. त्यामुळे इथे पद्धत अशी आहे की पहाटेच्या नाश्त्याची ऑर्डर रात्रीच द्यायची. आणि पूर्ण बिल रात्रीच देऊन टाकायचं.

अदोनीसही म्हणाला की आम्ही ४ वाजता निघणार. मला मात्र केवळ हाय कॅम्प गाठायचा असल्याने इतक्या पहाटे निघायची काहीच गरज नव्हती. मग त्याला शुभेच्छा देऊन उरलेला सिनॅमोन रोल घेऊन खोलीवर गेलो. आणि शांत झोपलो.

अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग १
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग २
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ३
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ४
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ५
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ६
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ७
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ८
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ९ (माहिती)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

थोडा वेळ करमणूक म्हणून यूट्यूबवर गाणी बघत आणि ऐकत बसलो. यूट्यूब स्वतःहून आपल्याला काही बाही विडिओ बघायला सुचवत असतं. त्यात एक सूचना आली: https://youtu.be/x0AUAR2eKSY?feature=shared देवाक काळजी रे!

नकारात्मक भावना जेव्हा मनाचा कब्जा घेतात तेव्हा विचारशक्ती नीट काम करत नाही. उद्या माझं कसं होणार एवढा एकच प्रश्न मनात होता, पण त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणं पण जमत नव्हतं. गाणं ऐकल्यावर नकारात्मक भावना सपशेल गेल्या. मग डोकं चालायला लागलं. >>>

हे अशा 'आज अचानक गाठ पडे' प्रकारे कधी काय समोर येईल आणि आपल्याला त्यावेळच्या मनस्थितीनुसार आपल्याला कसा हुरुप देऊन जाईल सांगता येत नाही.

मला माझ्या आयर्नमॅन स्पर्धेच्या वेळेस आदल्या दिवशी स्पर्धा वादळामुळे रद्द झाली असे कळल्यानंतर एकटाच निराश होउन यु ट्युब बघत असताना असाच एक व्हिडीयो समोर आला होता. चितळे बंधूंची जाहीरात आहे.
https://www.youtube.com/watch?v=DiJ0MowC3ac
ह्यात रेणुका शहाणे च्या पात्राची एक कविता आहे 'चुकल्या कितीक सुरुवाती पण शेवट गोड झाला '. जाहीरात म्हणून ही खूप भारी आहे अशातला भाग नाही. त्यांच्याच ह्याहून अनेक चांगल्या जाहीराती आहेत. अजीबात लॉजिक लावता येणार नाही पण पण हे बघून मला वाटलेले की स्पर्धा होणार म्हणजे होणार आणि मी ती पुर्ण करणार! आणि तसेच झाले !

तर सांगायचा मुद्दा अगदीच पोचल्या तुमच्या भावना!

वा! ट्रेक भारी सुरू आहे.

ते गाणं केवळ तुमच्यासाठीच लिहीलं गेलं होतं असं वाटावं इतकं चपखल आहे.

मामी - होय ! बुडत्याला काडीचा आधार

मी माझ्या लिखाणाला मथळाही 'चुकल्या किती एक सुरुवाती' असाच दिला होता जो नंतर बदलला.
असो अवांतर गप्पा नको इथे.
पुरे करतो.

प्र - तुम्ही अजूनही असे कुठे कुठे जाऊन आला असाल त्याबद्दल लिहिलेले वाचायला आवडेल.