अन्नपूर्णा सर्किट ट्रेक (भाग ९)

Submitted by प्र on 8 November, 2024 - 23:03

माहिती:

अन्नपूर्णा सर्किट ट्रेकबद्दल भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. पण मला तरी त्यात मराठी काही सापडलं नाही. कारण फारशी मराठी माणसं या ट्रेकला जात नाहीत. एकूण भारतीयच फार कमी जातात. म्हणून स्वानुभवावरून थोडीफार माहिती इथे नोंदवत आहे. इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे (इंग्रजीमध्ये) त्याची पुनरावृत्ती टाळायचा प्रयत्न केला आहे, तरी संदर्भासाठी थोडी पुनरावृत्ती झालेली असू शकते.

१. इथे लिहितो आहे ती माहिती आज ना उद्या कालबाह्य ठरणारच आहे. म्हणून लक्षात घ्या की ही माहिती एप्रिल २०२४ मधील अनुभवावर आधारित आहे.

२. अन्नपूर्णा सर्किट ट्रेकला जाण्यासाठी परवाना, म्हणजेच ACAP (Annapurna Conservation Area Permit) घ्यावा लागतो. तसेच TIMS card (Trekkers Information Management System) सुद्धा घ्यावं लागतं असं नेपाळ सरकार म्हणतं. प्रत्यक्षात २०२० पासून TIMS कुणी मागत नाही. मला पण कुणी TIMS विचारलं नाही, पण परवाना (ACAP) मात्र वेळोवेळी तपासला जातो.

३. ACAP आणि TIMS हे दोन्ही काठमांडूमध्ये सरकारी कचेरीत जाऊन मिळवता येतात. मी मात्र एका माहितीतल्या ट्रेकिंग एजन्सीला आधीच माझ्या पासपोर्टची फोटो कॉपी पाठवली होती आणि त्यांना माझ्यासाठी ACAP आणि TIMS मिळवायला सांगितलं होतं. ते त्यांनी केलं आणि त्यांच्या माणसानी ते मला काठमांडू विमानतळावर आणून दिलं. त्यासाठी अर्थात त्यांनी सेवा शुल्क आकारलं पण त्यामुळे माझा वेळ वाचला. माझं विमान सकाळी १० वाजता काठमांडूला पोचलं आणि त्याच दिवशी मी बसनी बेसीसहरला पोचू शकलो.

४. ट्रेकसाठी बेसीसहरला जाणं अटळ आहे. तिथे जाण्यासाठी काठमांडूहून बस / मायक्रोबस मिळतात. आपण ज्याला मिनीबस म्हणतो त्याला तिकडे मायक्रोबस म्हणतात. ल्होत्से मॉल (https://maps.app.goo.gl/3JyuJpS293xFAqVE8) इथून या मायक्रोबस सुटतात. त्यांचं काही ठराविक वेळापत्रक नसतं. साधारणपणे मायक्रोबस भरली की सुटते. सकाळी ७ पासून या सुटत असतात. मी दुपारी एक वाजताच्या मायक्रोबसने बेसीसहरला गेलो. त्यानंतर आणखी उशीरा मायक्रोबस असतात की नाही हे नक्की माहिती नाही. काठमांडू बेसीसहर प्रवासाला ६ ते ८ तास लागतात. तिकीट ७२० नेपाळी रुपये (नेरु).

५. एके काळी अन्नपूर्णा सर्किट ट्रेक बेसीसहरलाच सुरु व्हायचा, कारण त्यापुढे गाडी रस्ता नव्हता. अजूनही पाहिजे तर तिथेच ट्रेकची सुरुवात करता येते आणि तुरळक लोक तसं करतातही. पण बहुसंख्य लोक जीपनी चामे गावापर्यंत जातात आणि चामेपासून ट्रेक सुरु करतात. मी तेच केलं. बेसीसहर ते मनांग या रस्त्यावर फक्त ४ व्हील ड्राईव्ह असलेल्या गाड्याच जाऊ शकतात. बेसीसहरहुन सकाळपासून या जीप सुटतात आणि प्रवासी आणि सामान घेऊन चामे किंवा मनांगपर्यंत जातात. बेसीसहर ते चामेसाठी माणशी ३५०० नेरु तिकीट घेतात. अंतर फक्त ६६ किमी असलं तरी प्रवासाला ४ तास लागतात. या जीपसाठी एक तथाकथित जीप तिकीट काऊंटर (https://maps.app.goo.gl/et4jP5LiFQ1es46RA) आहे, पण प्रत्यक्षात ते बहुतेक वेळा बंदच असतं. त्याच्या समोर रस्त्याकडेला रांगेनी जीप उभ्या असतात. थेट ड्रायव्हरला गाठून व्यवहार ठरवता येतो. मी चामेला ईगल आय (https://maps.app.goo.gl/VPLsgZWzZHH6LpmWA) नावाच्या हॉटेल मध्ये राहायचं आधीच ठरवलं होतं. त्याच्या मालकाचं नाव टेक. फोन नंबर google map मध्ये दिलेला आहे. मी त्याच्याशी व्हॉट्सअँपवरून संपर्क केला. त्या हॉटेलची जीप जवळ जवळ रोज बेसीसहरहुन चामेला जाते. मी त्याच जीपनी गेलो, ३५०० नेरु देऊन.

६. ट्रेकचा पहिला दिवस (चामे ते पिसांग) आपण गाडीरस्त्यानेच चालतो - काही छोटे पायवाटेचे शॉर्टकट वगळता. पण रस्त्याला वाहतूक अगदी तुरळक आहे आणि नदी, डोंगरांची साथ असल्याने चाल कंटाळवाणी होत नाही.

७. पिसांग ते मनांग वरच्या रस्त्याने गेलो तर पूर्ण डोंगरातील पायवाट आहे. सुंदर आहे, पण खडतर आहे. खालचा रस्ता म्हणजे गाडीरस्ता. त्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा भाग छान आहे, मधला काही भाग थोडा कंटाळवाणा वाटू शकतो.

८. अल्टीट्यूड सिकनेस बद्दल माहिती नीट समजून घेतल्याशिवाय हा ट्रेक कुणीही करू नये! त्याबद्दल भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे, ती वाचा. काही जण अल्टीट्यूड सिकनेस होऊ नये म्हणून diamox ही गोळी घेतात. पण ती ३५०० मी उंची गाठायच्या २-३ दिवस आधीपासून सुरु करावी लागते. विरळ हवेचा त्रास व्हायला लागल्यानंतर त्यावर औषध म्हणून diamox चा उपयोग नाही!

९. अल्टीट्यूड सिकनेसचा धोका कमी करण्यासाठी मनांगला एक दिवस जादा मुक्काम अवश्य करावा. मनांगच्या आजूबाजूला भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. पण पावसामुळे कुठेच जाता आलं नाही तरी हॉटेलमधील मुक्कामही कंटाळवाणा होत नाही.

१०. अल्टीट्यूड सिकनेसचा बाऊ पण करायची गरज नाही. हा त्रास सगळ्यांना होतोच असं नाही. मी diamox किंवा कुठलीच गोळी घेतली नव्हती पण सुदैवानी मला काही त्रास झाला नाही. पण अल्टीट्यूड सिकनेसचा त्रास होत असताना हट्टाने अजून वर वर जाणं मात्र फारच धोक्याचं. त्रास होत असेल तर आहोत तिथेच एक दिवस विश्रांती घेऊन परिस्थिती सुधारली तर पुढे; अन्यथा न लाजता माघार घ्यावी.

११. मनांग सोडल्यानंतर कुठे कुठे मुक्काम करावा हे स्वतःचा फिटनेस जोखून आणि अल्टीट्यूड सिकनेसचा धोका ओळखून प्रत्येकानी आपापला निर्णय घ्यावा. मी निवडलेला मार्ग (म्हणजे ३ मुक्काम: याक खरका, थोरोंग फेडी आणि हाय कॅम्प) हा त्या मानानी सोपा आणि कमी धोक्याचा होता.

१२. मनांगनंतर थेट याक खरका / लेदारला न जाता तिलीचो सरोवराला भेट देऊन जाता येते. पण त्यासाठी ३-४ दिवस जास्त लागतात. शिवाय तिलीचो बेस कॅम्प ते तिलीचो सरोवर ही जवळ जवळ १००० मी ची चढाई करण्यासाठी पुरेसा स्टॅमिना हवा. मी यावेळी तिलीचो सरोवराला गेलो नव्हतो, पण पुढच्या वेळी जाईन म्हणतो!

१३. बहुतेक सर्व टी हाउसेसमध्ये वायफाय इंटरनेट सेवा उपलब्ध असते. हाय कॅम्पचा अपवाद सोडल्यास बाकी सगळीकडे विनामूल्य असते (हाय कॅम्पला वीज नसल्यामुळे फोन चार्ज कारण्यासाठीपण १०० नेरु मोजावे लागतात). नेपाळी सिमकार्ड घ्यायचे असल्यास NTC ची सेवा या ट्रेकमार्गावर चांगली आहे.

१४. खर्च: बहुतेक सर्व टी हाउसेसमध्ये बेड फुकट आणि खाणं पिणं थोडं महाग असतं. चहा, नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण मिळून १५०० ते ३५०० नेरु रोजचा खर्च होऊ शकतो. अर्थात तुम्ही काय खाता आणि काय पिता यावर ते अवलंबून आहे. मनांग येथील हॉटेल तिलीचो मात्र बेड साठी ५०० नेरु आकारतात. तसेच मुक्तिनाथ हे धार्मिक पर्यटन स्थळ असल्याने तिथे बेड फुकट ही कल्पना लागू पडत नाही.

१५. गूगल मॅपमध्ये शोधलत तर ट्रेकमार्गावरील सर्व गावात भरपूर टी हाउसेस आहेत असं दिसेल. बऱ्याच ठिकाणचे फोन नंबरपण दिसतात, पण फोन लागेलच असं नाही. व्हॉट्सअँप संदेश पाठवलात तर त्याला उत्तर थोड्या वेळानी येण्याची शक्यता जास्त. मी या मार्गावर खालील ठिकाणी मुक्काम केला होता:
चामे: ईगल आय हॉटेल (https://maps.app.goo.gl/VPLsgZWzZHH6LpmWA)
अप्पर पिसांग: हॉटेल रॉयल माऊंटन (https://maps.app.goo.gl/KfM935pSq1uGxR2G7)
मनांग: तिलीचो हॉटेल (https://maps.app.goo.gl/sB4qBDPWU9KpSyKu7)
याक खरका: हॉटेल याक (https://maps.app.goo.gl/ebrK6umnTXfAtiJm8)
थोरोंग फेडी: थोरोंग फेडी बेस कॅम्प लॉज (https://maps.app.goo.gl/dUdpC5LLdZZXuxBK7)
हाय कॅम्प: थोरोंग हाय कॅम्प हॉटेल अँड रेस्टॉरंट (https://maps.app.goo.gl/5g249yNLvBkciCGf7)
मुक्तिनाथ: हॉटेल डी पुरांग (https://maps.app.goo.gl/KsP4vDvh3jRMNUw77)
या बहुतेक सर्व ठिकाणी चांगला अनुभव आला:
हॉटेल रॉयल माऊंटन येथे सूर्योदयाला अन्नपूर्णा २ शिखराचं दृश्य उत्कृष्ट.
तिलीचो हॉटेलमधील वातावरण (ambience) खूपच आल्हाददायक.
हॉटेल याक येथून दरी व दरीतील नदीचं दृश्य बघतच रहावे असे.
फक्त थोरोंग फेडी बेस कॅम्प लॉज व थोरोंग हाय कॅम्प हॉटेल अँड रेस्टॉरंट येथील चालक / मालक थोडे उद्धट वाटले. किंबहुना त्यांची गोऱ्या ट्रेकर्सशी वागण्या बोलण्याची तऱ्हा वेगळी होती आणि भारतीय / चिनी लोकांशी वेगळी. बरेच गोरे ट्रेकर्स पेयपानावर पुष्कळ खर्च करत होते, आणि म्हणून कदाचित ते हॉटेल चालकांना जास्त प्रिय वाटत असतील. शिवाय त्या दोन हॉटेल्सची त्या दोन ठिकाणी मोनोपॉली आहे - ट्रेकर्सना मुक्कामाची दुसरी काही सोयच नाहीये. त्यामुळे त्यांना उद्धटपण करणं परवडतं; बाकी इतरत्र सगळे ट्रेकर्सचे प्रेमानी स्वागत करतात.

इच्छुकांना अन्नपूर्णा सर्किट ट्रेक सुरक्षित पूर्ण करता यावा आणि आनंददायी व्हावा ही शुभेच्छा!

चूकभूल देणेघेणे.

(समाप्त)

अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग १
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग २
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ३
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ४
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ५
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ६
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ७
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ८
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ९ (माहिती)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

संपूर्ण लेखमालिका वाचली. अन्नपूर्णा सर्किट ट्रेक बद्दल ऐकलंय पण प्रत्यक्ष अनुभव हा पहिलाच वाचला. जबरदस्त..

संपूर्ण मालिका वाचली. छान लिहिलं आहे. फोटो अजून हवे होते.
अन्नपूर्णा सर्कीटबद्दल एव्हडे डिटेल्स माहीत नव्हते. इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद आणि ट्रेक व्यवस्थित पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन !

अन्नपूर्णा सर्किट ट्रेक विषयी आधी माहिती नव्हती. तुमच्या लेख मालिकेमुळे खूप चांगला परिचय झाला. तुम्ही सविस्तर लिहिलंय आणि लोकेशन दिलेली असल्याने वाचायला मजा आली. त्यासाठी धन्यवाद! फोटो अजून हवे होते. हे लेख वाचून झाल्यावर यूट्यूब वर व्हिडिओ बघितले. फारच सुंदर आहे हा ट्रेक.
आता काही प्रश्न:
1. भारतीय रुपयात एकूण खर्च ( प्रवास खर्च धरून) किती आला?
2. हॉटेल मध्ये आधी बुकिंग करावं लागतं का? म्हणजे आपण गेलो आणि रूम नाही असं झालं तर.
3. नेपाळ मधील विमान प्रवास पूर्णपणे टाळून या ट्रेकला जाऊ शकतो का?

सर्वांना धन्यवाद!

रोजचा खाण्यापिण्याचा आणि मुक्कामाचा खर्च १५०० ते ३५०० नेरु.
काठमांडू ते चामे प्रवास ४२०० नेरु.
मुक्तिनाथ ते काठमांडू प्रवास ३००० नेरु.
काठमांडूला जाण्यायेण्याचा प्रवास खर्च तुम्हाला शोधता येईल. महाराष्ट्रातील लोकांसाठी काठमांडूपर्यंत विमान प्रवास हाच बरा पर्याय आहे असं माझं मत आहे. उ.प्र. किंवा बिहारमधील लोक बसने जाऊ शकतात.
ट्रेकमार्गावरील हॉटेलमध्ये आधी बुकिंग करायची गरज पडत नाही. एप्रिल-मे आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हा तिथला ट्रेकिंगचा हंगाम. त्यातही सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये जास्त लोक जातात. तरी तिथे सहसा कुठे ना कुठे जागा मिळते.
१ भारू = १.६ नेरु.

sagalya bhaganchi link ekatrit dili tar soppe hoil vachayala.

laptop varun aslyane minglish madhye comment.

आता संपूर्ण वाचून काढली लेखमाला.
उत्साही आणि धाडसी आहात की.
पोर्टर गाईड न घेतल्याने तुम्हाला प्लान मध्ये बदल करण्याचे स्वातंत्र्य मिळाले.
अजून जास्त फोटो आवडले असते.

सगळ्या लेखांची लिंक ह्या शेवटच्या भागात देता येईल का?
सोप्पे जाईल सगळ्यांना शोधायला, वाचायला.
माझेही ह्याचे वाचन उशिरा झाले कारण ह्याचे भाग आता मागच्या पानावर गेलेत.
हा प्रतिसाद mobile मधून. त्यामुळे देवनागरी लिहायला सोप्पे.

धन्यवाद झकासराव!
आता सर्व भागांच्या लिंक सर्व भागात दिल्या आहेत.

संपूर्ण मालिका वाचली.
इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
ट्रेक पूर्ण केल्याबद्दल परत एकदा अभिनंदन !

सगळे लेख आज वाचले. सुंदर वर्णन केलं आहे तुम्ही. शैलीही आवडली.
सोलो ट्रेक करायचा का ठरवला, हेही चालणार असेल तर लिहा ना. शिवाय ट्रेक करायच्या आधी काय काय तयारी (व्यायामाच्या दृष्टीने) केली तेही लिहा.

सर्वांना धन्यवाद!

सोलो ट्रेक करायचं का ठरवलं:
एक तर मला एकट्याने भटकायला आवडतं हे आहेच. पण म्हणजे बरोबर कुणी मित्रमंडळी नकोतच असा आग्रह नाही. खरं तर २०१७ साली मित्रांबरोबरच अन्नपूर्णा सर्किट ट्रेकला जाणार होतो. पण ऐनवेळी कौटुंबिक कारणामुळे मला जाणं रद्द करावं लागलं. बाकी मित्र जाऊन आले. तेव्हाच ठरवलं की आपण कधी तरी जायचंच. मधली काही वर्ष नाही जमलं. मग २०२३ साली कुणी ट्रेकिंग कंपन्या अन्नपूर्णा सर्किट ट्रेकचे आयोजन करतात का हे शोधलं. बंगलोरची एक (आणि एकमेव) कंपनी सापडली. त्यांच्याकडे मी रजिस्टर केलं. पण पुरेशी गणसंख्या नसल्याने त्यांनी ट्रेक रद्द केला. म्हणून मग मी चिडून एकट्यानेच जायचं ठरवलं. ते या वर्षी जमलं.

एकट्याने जाण्यासाठी घरच्यांची परवानगी मिळवणं मात्र फार अवघड गेलं.

जाण्यापूर्वी तयारी (फिटनेससाठी) खूप आधीपासून करायचं नाही जमलं. जाण्याच्या ४-५ आठवडे आधीपासून थोडीफार केली. म्हणजे संध्याकाळी ऑफिसपासून घरी चालत जायचो. टेकडीमार्गे. सुमारे ४ किमी. कधीकधी थोड्या लांबच्या रस्त्याने जायचो - म्हणजे ६ किमी.