२७ एप्रिल २०२४
चार वाजता गजर वाजला. चाचपडत हेड टॉर्च चालू केला. डोक्याला लावला. बूट घातले. बाहेर येऊन बघतो तर बरीच चहल पहल होती. माझ्या आधी बरेच जण उठलेले होते. कुणी टॉयलेटच्या दारात थांबून आतला बाहेर येण्याची वाट बघताहेत. कुणी नळाला पाणी कसं येत नाही म्हणून आश्चर्य वाटून घेत होते. कसं येणार? सगळं गोठलेलं होतं. तपमान -९ होतं म्हणे. काही जण रेस्टॉरंटकडे जात होते. काही तर तयार होऊन थोरोंग ला खिंडीकडे निघालेले दिसत होते. म्हणजे माणसं दिसत नव्हती, पण त्यांच्या डोक्यावरचे हेड टॉर्च त्या दिशेने चालत होते. ते पाहून आपण खूप उशीर केला की काय असं वाटून गेलं. पण ६ वाजेपर्यंत निघालो तरी चालेल असं अनुभवी लोकांकडून ऐकलेलं होतं, त्यामुळे म्हटलं ठीक आहे, जाऊ सावकाश.
तसंही टॉयलेटच्या रांगेत अनेक जण असल्याने बऱ्यापैकी वेळ गेलाच. सगळं आटोपून रेस्टॉरंटमध्ये गेलो तर तिथे ही धांदल. अनेक जण एकदम आले आणि सगळ्यांनाच निघायची घाई. त्यामुळे स्वयंपाकी लोकं पटापट पदार्थ तयार करत होते. आणि ट्रेकर्स बरोबरचे पोर्टर ते पदार्थ ट्रेकर्सपर्यंत पोचवत होते.
मला बसायला कशीबशी जागा मिळाली. काल परवाच्या अनुभवावरून मी खायला काहीच मागवलं नव्हतं आणि खायची इच्छा पण अजिबात नव्हती. मी नुसताच चहा सांगितला होता. पण तोही मिळायला वाट बघावी लागली.
आज मोठा पल्ला गाठायचा होता. शिवाय नाश्ता केलेला नव्हता. म्हणून खायला काही तरी बरोबर घेऊन जाणं आवश्यक होतं. एक चॉकलेट आणि छोटा बिस्कीट पुडा घेतला. आणि निघालो खिंडीकडे!
पाच वाजले होते. अंधार होता. पण हेड टॉर्चचा प्रकाश पुरेसा होता. कालच्यासारखंच हळू हळू पावलं टाकत सुरुवात केली. काही पावलांनंतर डावीकडे वळण. वळल्यावर हाय कॅम्प दिसेनासा झाला. अचानक लक्षात आलं वाटेच्या डाव्या बाजूला बर्फ आहे. पण नशीब वाटेवर नव्हता.
थोड्या वेळानी उजवीकडे वळण. पण वळल्यानंतर वाटेच्या कडेला बर्फ नव्हतं.
वाट अशीच नागमोडी होती. प्रत्येक वळणानंतर आलटून पालटून बर्फ असायचं किंवा नसायचं. अरेच्चा! चमत्कारच म्हणायचा. असो. मी आपला हळू हळू पुढे जात होते. माझ्या पुढे चालणाऱ्या ट्रेकर्सचे दिवे दिसत होते.
एका वळणानंतर मात्र वाट पूर्ण बर्फात बुडलेली होती. मग थांबणं भाग होतं. पिशवीतून मायक्रो स्पाईक्स बाहेर काढले. ते वापरायची वेळ आता आली होती. बूट त्यात अडकवण्यासाठी थोडी खटपट करावी लागली. पण जमलं शेवटी. मग बर्फात पाय घातला. सुदैवानी बर्फाचा थर फार जाड नव्हता. पण बर्फामुळे चाल मात्र अजून हळू झाली.
एव्हाना उजेड वाढला होता. दूर अंतरावर छोटा पूल दिसत होता. तिथपर्यंत वाटेवर बर्फच बर्फ. पुलानंतर उजवीकडे वळण. मग बर्फ गायब!
तेव्हा माझी ट्यूब पेटली. उत्तराभिमुख उतारांवर ऊन पडत नाही, त्यामुळे त्यांच्यावरचं बर्फ वितळत नाही. याउलट दक्षिणाभिमुख उतारांवर सतत (म्हणजे दिवसा) ऊन असतं, त्यामुळे त्यांच्यावरचं बर्फ वितळून गेलं होतं. म्हणून प्रत्येक वळणानंतर आलटून पालटून बर्फ असायचं किंवा नसायचं.
या वाटेत कायम डावीकडे डोंगर आणि उजवीकडे उतार / दरी आहे. काही ठिकाणी उजवीकडे दगडं रचून कठडा केलेला होता.
आता सूर्याचा उजेड आल्यामुळे हुरूप वाढला. हेड टॉर्च बंद. पण सूर्य उगवला म्हणून थंडी काही लगेच जात नसते. चांगले हातमोजे घातले होते तरी आत हातांची बोटं गारठली. थांबून जाकिटाच्या खिशात हात खुपसून ठेवले थोडा वेळ. पण असं दर थोड्या वेळानी करावं लागत होतं. शिवाय कोरड्या हवेमुळे घशाला कोरड पडत होती. थांबून घोटभर पाणी प्यायचं आणि पुन्हा चालू लागायचं. अचानक थोड्या अंतरावर टी हाऊस दिसलं. “ते पाहून हुरूप आला आणि चहाच्या आशेनं पावलं झपझप पडायला लागली” असं घडणं अपेक्षित होतं. पण तसं काही झालं नाही. म्हणजे हुरूप आला. पण पावलं झपझप टाकणं मात्र शक्य नव्हतं. ती आपली हळूहळूच जात होती.
सूर्य उगवला असला तरी थंडी कमी व्हायच्या ऐवजी वाढतच होती. कारण मी उंच उंच जात होतो. त्या छोट्याश्या टी हाऊसमध्ये प्रवेश केल्यावर जरा उबदार बरं वाटलं. मस्त गरम चहा प्यायलो. चहाबरोबर बिस्कीट मात्र खावंसं वाटेना. पण चहा पिऊन बरं वाटलं.
तिथे काही पोर्टर होते. आणि काही खेचरे आणि त्यांचा मालक. म्हणजे कुणाबरोबर पोर्टर नसेल आणि ओझं असह्य झालं असेल तर इथे पोर्टर सेवा उपलब्ध होती. किंवा ज्यांना अजिबात चालणंच जमत नसेल त्यांच्यासाठी खेचर स्वारी हा पर्याय उपलब्ध होता. अर्थात या दोन्ही सेवा महाग होत्या. पण अडले नारायण ५००० नेरु मोजून खेचरांच्या पाठीवर बसून जात होते. ५००० रुपयात या टी हाऊसपासून थोरोंग ला खिंडीपर्यंत.
मला अदोनीस-सोफियाची आठवण झाली. काल कदाचित सोफिया खेचरावर बसून गेली असेल का? असो. पुन्हा एकदा देव त्यांचं भलं करो.
माझा काही या सेवांचा लाभ घ्यायचा इरादा नव्हता. चहा पिऊन माझा उत्साह रिचार्ज झाला होता. त्यामुळे मी पुन्हा चालायला लागलो. अमेरिकन मुलगा माझ्यापुढे काही अंतरावर एकटाच चालताना दिसला. तो अस्सल अमेरिकनांसारखा चांगला खात्या पित्या घरचा होता. पण तरी न दमता चालत होता छान. त्याची आई-मावशी (?) मात्र मागे राहिल्या होत्या.
डाव्या बाजूचे डोंगर पूर्णपणे बर्फाच्छादित होते. उन्हामुळे बर्फाचा वरचा थर थोडा थोडा वितळू लागला होता त्यामुळे ते ओले होऊन चकाकत होते. वाटेवरचे बर्फ मात्र एव्हाना गायब झाले होते. नुसती माती. खडक क्वचितच.
कालच्या मानाने आज सौम्य चढ होता.
संपूर्ण वाटेत ठराविक अंतरावर खांब होते. वाट नेमकी कुठे आहे ते कळावे म्हणून. २०१४ साली इथे प्रचंड बर्फवृष्टी होऊन वाट दिसेनाशी झाली होती आणि कित्येक ट्रेकर्स मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर हे खांब उभे केलेले होते. हे मला आधीच वाचून माहिती होते. म्हणूनच तर मी एकट्याने, विना गाईड यायचं धाडस केलं.
चालणं थांबणं असं करत करत पुढे पुढे जात होतो. दूरवर दिसणारा खांब पाहून त्या खांबाशी पोचलो की ब्रेक घ्यायचा असं मी ठरवायचो. असाच एकदा थांबलो असताना २ गाईड भेटले. मला म्हणतात, काका तुम्ही एकटे कसे आलात? बर्फ जास्त असतं तर तुम्हाला वाट नसती सापडली. मग मी त्यांना खांब दाखवले, तेव्हा ते निरुत्तर झाले. मी एकटाच आलो याचं त्यांना कौतुक तर वाटत होतं पण त्याच वेळी मी गाईड नाही घेतला हे त्यांना आवडलं नव्हतं. असो.
पण त्याच गाईडनी मला मायक्रो स्पाईक्स काढून टाकायचा सल्ला दिला. “आता मुक्तिनाथ पर्यंत कुठेही (वाटेवर) बर्फ नाही” अशी माहिती दिली त्यानी. मायक्रो स्पाईक्स काढल्यावर खरंच चाल जरा सुधारली.
मागच्या टी हाऊस जवळ दिसलेला अमेरिकन मुलगा केव्हाच पुढे दिसेनासा झाला होता. त्याच्यापेक्षा माझा वेग बराच कमी होता. अर्थात माझ्यापेक्षाही हळू जाणारे होतेच.
मी आपला खांब-थांब करत हळू हळू जात होतो. वाट वळण वळणांची, त्यामुळे खूप दूरचं दिसत नाही. दूरवर अशाच एका वळणाजवळ दिसणारा खांब मी हेरून ठेवला होता. तिथे जाऊन थोडी विश्रांती घ्यायची.
आज कुठेही फार दमलो असं वाटत नव्हतं, निदान अजूनपर्यंत तरी. पण चालण्याचा वेग मात्र कमी झाला होता आपोआप. हळू हळू चालत त्या हेरलेल्या खांबापाशी पोचलो. तेव्हा वळणापलीकडचे दृश्य दिसले: चक्क थोरोंग ला खिंड दिसत होती! अवघ्या शे-दीडशे मीटरवर! अर्थातच ब्रेक घ्यायचा रद्द करून चालत राहिलो. आणि बघता बघता खिंडीत पोचलो!
हा ट्रेकचा हायलाइट. सर्वोच्च बिंदू. ५४०० मी. चक्क मी पोचलो तिथे!
तिथे तर खूपच उत्साही वातावरण होतं. सगळे जण खिंड गाठल्याचा आनंद साजरा करत होते. आनंदाने चित्कारत होते. फोटो काढत होते. मीपण काढून घेतला एकाकडून.
अमेरिकन मुलगा बहुतेक बराच आधीच पोचला होता. आणि आई-मावशीची वाट बघत बसून होता.
काल हाय कॅम्पमध्ये भेटलेले दोन मोठे ग्रुप - एक ऑस्ट्रेलियन आणि एक इस्रायली - चक्क नाचत होते. इथे शॅम्पेन मिळायची सोय असती तर या लोकांनी नक्की कारंजं उडवलं असतं.
शॅम्पेन नाही पण चहा मात्र मिळतो इथे. ऐन खिंडीत एक छोटंसं टी हाऊस आहे. सर्वोच्च बिंदूला पोचून गरम चहा पिणे म्हणजे सर्वोच्च आनंद. मस्त वाटलं. एकट्याने - तेही विना गाईड, विना पोर्टर - ट्रेक करायचं ठरवलं तेव्हा खूप लोकांनी वेड्यात काढलं. घरच्यांना पण काळजी वाटत होती. मला आत्मविश्वास होता, तरी इतक्या लोकांचं बोलणं ऐकून किंचित शंकापण वाटत होती. जमेल का? जमलं! थँक यू देवा!
मी हाय कॅम्पहुन निघताना एक लिटर गरम पाणी भरून घेतलं होतं, पण ते एव्हाना संपलं होतं . या छोट्या टी हाऊसमध्ये बाटली पुन्हा गरम पाण्यानी भरून घेतली.
मागच्या टी हाऊस पासून ज्यांनी खेचर स्वारी केली होती ते इथे खिंडीत उतरतात. खेचरं (त्यांच्या मालकासकट) इथून माघारी जात होती.
सर्वोच्च बिंदू गाठला म्हणजे ट्रेक पूर्ण झाला असं नाही. इथून मुक्तिनाथपर्यंत अजून ८ किमीची चाल होती. आणि तब्बल १६०० मी उतरायचं होतं. शिवाय इतक्या उंचावर, विरळ हवेत खूप वेळ थांबणं बरं नाही. त्यामुळे साडेनऊला मी निघालो आणि चालायला लागलो. खिंडीच्या पलीकडच्या बाजूला बरंच बर्फ साठलं होतं, त्यामुळे थोडा वळसा घालून मग वाटेला लागलो.
आता उतार. म्हणजे मज्जा. आता वेग वाढेल आणि बघता बघता मी मुक्तिनाथ गाठेन, असं मला वाटत होतं. सुरुवात खरंच तशी झाली. त्यामानाने सौम्य उतार होता आधी. तेव्हा बऱ्यापैकी झपझप चालत होतो. साधारण अर्धा तास चालल्यावर मात्र दमलो. उतार असला तरी विरळ हवेमुळे दमायला होत होतं. तेव्हा थांबलो. थांबत थांबतच जावं लागणार असं लक्षात आलं. त्यानंतर थोडं हळूहळूच चालायला लागलो.
एका छोट्या पठारावर दोन चिनी महिला आणि त्यांचा गाईड भेटले. म्हणजे दिसले. विश्रांती घेत थांबले होते. मी त्यांना रामराम करून पुढे जाताना त्यांचा संवाद ऐकू आला. त्या दोघी थकल्या होत्या. आणि गाईडला म्हणत होत्या की आमच्यासाठी खेचरं घेऊन ये. गाईड मात्र तयार नव्हता. त्याचंही बरोबर होता. कारण खेचरं आणण्यासाठी त्याला पुन्हा वर चढून खिंड गाठून पुन्हा मागच्या टी हाऊस पर्यंत खाली जावं लागलं. त्याचं म्हणणं होतं की आता तर उतारच आहे, मग कशाला खेचर पाहिजे तुम्हाला? माझ्याकडे बोट दाखवून म्हणतो - तो बघा कसा चाललाय पटापट. खरं तर मी हळूहळूच चालत होतो पण त्यानी मला पटापट सर्टिफिकेट देऊन टाकलं. असो.
हळू हळू उताराची तीव्रता वाढते आहे असं लक्षात आलं. एका ठिकाणी वाटेला Y फाटा आहे असं वाटलं दुरून. पण जवळ गेल्यावर कळलं की उजवीकडे रस्ताच नाहीये, डावीकडे वळणं भाग आहे. वळलो. पण त्यापुढे खूपच तीव्र उतार होता. पायाच्या बोटांवर खूप दबाव येऊन ती दुखायला लागली. तेव्हा आठवलं की मी एकावर एक दोन पायमोजे घातले आहेत. थांबून एक मोजा काढून टाकला. शिवाय बूट थोडा सैलच बांधला. त्यानी थोडी सुधारणा झाली पण तरी उतार तीव्र असल्यानं पायाची बोटं दुखतंच होती.
माझ्याकडे दोन हायकिंग पोल्स होते. म्हणजे काठ्याच खरं तर, पण हलक्या. शिवाय त्यांची लांबी कमी जास्त करता येते. मी जवळ जवळ ट्रेकच्या सुरुवातीपासून त्यांचा वापर करतच होतो. पण इथे उतारावर तर त्यांचा खूपच उपयॊग होत होता. किंवा खरं तर त्या काठ्यांशिवाय हे उतरणं जमलंच नसतं. आता उतार असल्याने मी काठ्यांची लांबी शक्य तितकी वाढवली. पण तरी ती कमीच पडत होती. त्यामुळे मी पुढे झुकून काठ्या टेकवायचो आणि मग पाय उचलून पुढे टाकायचो. अचानक माझा तोल गेला आणि मी अनियंत्रित वेगानी खाली जाऊ लागलो. पडू नये म्हणून पाय आणि काठ्या पटापट टेकवत होतो पण ताबा सुटल्यासारखा वेगानी खाली खाली जात होतो. १५-२० अनियंत्रित पावलांनंतर कसा बसा स्वतःला थांबवू शकलो. हादरलो. केवळ नशीब म्हणून पडलो नाही. नाही तर कोलांट्या उड्या घेत कुठे गेलो असतो कोण जाणे. बाप रे! थांबल्यावर पटकन खाली मातीत बसलो. पाठपिशवी काढून ठेवली. छातीत धडधडत होतं. ५ मिनिटं नुसता बसलो. मग पाणी प्यायलो. तेव्हा जरा शांत झालॊ.
मग मला माझी चूक कळली. पाठीवर जवळ जवळ ९ किलो वजन घेऊन, तीव्र उतारावर मी पुढे झुकून चालत होतो. हा केवढा मूर्खपणा आहे! पण मी तो केला. आणि झटका बसल्यावर आता ते कळतं आहे. छे छे! मला आधीच का नाही कळलं? मी मोठी चूक करत होतो. पण सुदैवानी त्याची मोठी शिक्षा नाही मिळाली.
त्यानंतर मात्र मी सुधारलो. न झुकता, सरळ उभं राहूनच चालायला लागलो. त्यामुळे (आणि काठ्यांची लांबी पुरेशी नसल्याने) पावलं छोटी टाकावी लागत होती. हरकत नाही. पडण्यापेक्षा हळू हळू गेलेलं बरं.
आणखी एक बरं झालं. माझा स्वतःवरचा ताबा सुटला होता तेव्हा पुढे आणि मागे कुणीही दृष्टीक्षेपात नव्हतं. म्हणजे झालेली फजिती कुणी बघितली नव्हती!
आता खरं तर भूक लागली होती. तरी बिस्कीट काही खावंसं वाटेना. एका ठिकाणी थांबून चॉकलेट तेवढं खाल्लं. पाणी प्यायलो. निघालो. पुढे काही अंतरावर वाट लुप्त होतेय असं वाटत होतं. तिथे पोचल्यावर कळलं की वाट थोडी वळून एकदम खाली खाली जातेय, म्हणून पुढची वाट दिसत नव्हती. त्याच ठिकाणी एका मोठ्या खडकावर ॐ लिहिलेलं होतं. तिथून दिसलं की आणखी थोडं खाली गेल्यावर २-३ टी हाऊस आहेत! तिथे जरा ब्रेक घ्यावा असं ठरवून टाकलं.
हळू हळू पोचलो टी हाऊसला. आणि नीट खुर्चीवर बसलो. तेव्हा कळलं की खूप दमलोय आपण!
या ठिकाणाची उंची सुमारे ४२०० मी होती. म्हणजे खिंडीपासून १२०० मी खाली आलो तर.
एक वाजला होता एव्हाना. इथेही थंडीच होती. पण खूप वेळ उन्हात चालत होतो. शिवाय दिवसभर गरम पाणीच पीत होतो. म्हणून मग तिथे गार ऍपल ज्युस प्यायलो. बरं वाटलं. भूक होती पण तरी काही खावं वाटेना.
इथपासून मुक्तिनाथपर्यंत गाडी रस्ता होता. म्हणजे मातीचा खडबडीत रस्ता. जेमतेम मोटर सायकल जाऊ शकेल असा. त्यामुळे इथपासून मुक्तिनाथपर्यंत मोटर सायकल किंवा घोड्यावरून जायची सोय होती. अर्थात महागडी सोय. पण इथून मुक्तिनाथ फक्त एक तासावर आहे. मग आता कशाला पाहिजे मोटर सायकल किंवा घोडा? म्हणून मी थोडा वेळ बसून पुन्हा चालायला लागलो.
विशेष म्हणजे त्यापुढे उताराची तीव्रता पण कमी झाली. त्यामुळे पायाच्या बोटांचं दुःख कमी झालं.
लवकरच एक झुलता पूल ओलांडला आणि खाली मुक्तिनाथ मंदिर दिसायला लागलं! अर्थात तिथे पोचायला १५-२० मिनिटं लागली. शिवाय मंदिर गावाबाहेर आहे. खाली उतरून गावात हॉटेलला पोचलो तेव्हा २ वाजून गेले होते. पहाटे ५ वाजता निघालेलो, दुपारी २ वाजता पोचलो. चांगलाच दमलो होतो. पण आता ट्रेक पूर्ण झाला होता!
चक्क ट्रेक पूर्ण झाला होता! कारण एकच: देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे!
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग १
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग २
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ३
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ४
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ५
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ६
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ७
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ८
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ९ (माहिती)
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
सर्वोच्च बिंदू गाठला म्हणजे ट्रेक पूर्ण झाला असं नाही. >> +१
म्हणजे झालेली फजिती कुणी बघितली नव्हती! हा आनंद काही औरच असतो !
आवडले लिखाण !
कठीण ट्रेक यशस्वीरित्या ते ही
कठीण ट्रेक यशस्वीरित्या ते ही एकट्याने पूर्ण केल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. लिहीण्याची शैली छान आहे आणि प्रामाणिकपणे लिहीलं आहे.
खूप एन्जॉय केला तुमचा ट्रेक.
खूप एन्जॉय केला तुमचा ट्रेक. मस्त लेखनशैली आहे तुमची त्यामुळे आणखी मजा आली वाचताना.