२६ एप्रिल २०२४
पहाटे ३-३।। लाच जाग आली. आजूबाजूच्या खोलीतील लोक उठून जायची गडबड करत होते, त्यांच्या आवाजामुळे. शेवटी ४ वाजता उठून मी पण चहा प्यायला रेस्टॉरंट मध्ये गेलो. अदोनीस आणि सोफिया ४ वाजता निघणार होते पण प्रत्यक्षात मी चहा प्यायला गेलो तेव्हा ते नाश्ता करत बसले होते. मला तर काहीच घाई नव्हती. चहा पीत इतरांची घाई गडबड बघत बसलो. अदोनीस-सोफियाला पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या. परत खोलीवर गेलो पण आता पुन्हा झोपणं काही शक्य नव्हतं.
प्रचंड थंडीत सकाळचे महत्वाचे कार्यक्रम कसेबसे आटोपले. इथे पाणी नसतं. बर्फ असतं. दिवसासुध्दा तपमान शून्याखाली असतं, रात्री किंवा पहाटेचं तर विचारूच नका. तेव्हा टॉयलेट पेपरचा वापर अपरिहार्य.
निघायची घाई नव्हती पण थांबून तरी करायचं काय? भूक अजिबात नव्हती तरी कालचा उरलेला सिनॅमोन रोल खाल्ला. आणि ६ वाजता निघालोच.
थोरोंग फेडी हॉटेलमधून बाहेर पडलो की लगेचच चढ सुरु होतो. तीव्र चढ. संपूर्ण ट्रेक मार्गात इथे सर्वात तीव्र चढ आहे. त्यातच हवा विरळ, त्यामुळे चालण्याचा वेग चांगलाच कमी झाला होता. पण मला आज खूप छोटासा पल्ला गाठायचा होता, आणि घाई तर अजिबात नव्हती. हळू हळू पावलं उचलून पुढे टाकत होतो. चार पावलं गेलो न गेलो तेवढ्यात मागून अदोनीसची hello again Pramod अशी हाक आली.
अरेच्चा! मला वाटलं तुम्ही तर तासाभरापूर्वीच गेला असाल?
तसा अदोनीस सोफियाकडे बघायला लागला. आणि म्हणाला निघे निघेपर्यंत ६ वाजून गेले. सोफियानी उशीर लावला असं तो शब्दात म्हणला नाही, पण त्याची बॉडी लँग्वेज स्पष्ट सांगत होती. घरोघरी मातीच्या चुली!
“काही हरकत नाही” असं मी त्यांना म्हणालो खरं, पण ते दोघं खिंडीत केव्हा पोचतील याचं गणित मी मनातल्या मनात करायला लागलो. जे आज खिंड ओलांडणार होते (म्हणजे मी सोडून बहुतेक सगळे) ते केव्हाच निघून गेले होते. थोरोंग फेडी हॉटेल रिकामं पडलं होतं. आणि हे दोघं आत्ता निघताहेत. पण असो.
त्या दोघांची चालण्याची गती सुरुवातीला माझ्यासारखीच होती त्यामुळे सगळे बरोबर हळूहळू जात राहिलो. पण लवकरच लक्षात आलं की सोफिया फारच लवकर दमते आहे. दर २०-२५ पावलानंतर तिला विश्रांतीसाठी थांबावं लागत होतं. माझा प्रॉब्लेम वेगळा होता. दर वेळी थांबून पुन्हा चालायला सुरुवात केली की माझा वेग आधी अति हळू असायचा. आणि थोड्या वेळानी हळू हळू वाढत वाढत जरा बरा व्हायचा. सोफियासाठी सतत थांबे घेणं मला परवडणार नव्हतं. शेवटी मी त्या दोघांना माझा प्रॉब्लेम समजावून सांगितला आणि मग मी हळू हळू पुढे जात राहिलो.
म्हणजे मी विनाथांबा सलग चढत होत असं नाही. मी पण थांबत थांबत जात होतो, पण त्यांच्यापेक्षा कमी वेळा.
थांबायचं म्हणजे एखादा खडक पाहून बसायचं. पाठीवरचं ओझं उतरवून ठेवायचं. २ घोट गरम पाणी प्यायचं. ५ मिनिटं बसायचं. मग पुन्हा चालू …
थोरोंग फेडी ते हाय कॅम्प अगदी खडी चढण आहे. हाय कॅम्प कुठे दिसत नाही. त्यामुळे अजून किती अंतर बाकी आहे याचा काही अंदाज येत नाही. उलट मागे वळून खाली बघितलं तर आपण थोरोंग फेडीपासून किती उंच आलो ते कळतं. काल ज्या वाटेने मी थोरोंग फेडीला पोचलो ती वाट पण नदीपलीकडच्या डोंगरावर दिसत होती. पण अदोनीस-सोफिया सोडल्यास मनुष्यप्राणी मात्र कोणी नाही. एव्हाना त्यांच्या माझ्यातलं अंतर बरंच वाढलं होतं.
थोड्या वेळानी वाट किंचित उजवीकडे वळली. पुढे एक छोटीशी खिंड होती, तिथे वरती पताकांची माळ लावली होती. ते पाहून मात्र हाय कॅम्प जवळ आला असणार असं वाटायला लागलं. बौद्ध गुंफा, मठ किंवा धार्मिक स्थळाजवळ अशा पताकांच्या माळा नेहेमी असतात असं मी बघितलं होतं. हाय कॅम्प हे तर हॉटेल आहे, धार्मिक स्थळ नव्हे. कदाचित केवळ सुस्वागतम असा अर्थ असेल या माळांचा. हळू हळू चालत त्या छोट्या खिंडीत पोचलो तेव्हा हाय कॅम्पचं दर्शन झालं. मागं वळून अदोनीसला हाक मारून ही सुवार्ता दिली.
हाय कॅम्प समोरच दिसत असला तरी हळू हळू चढत तिथे पोचायला आणखी १० मिनिटं लागली. ७।। वाजले होते. दीड तास लागला इथे पोचायला! थोरोंग फेडी ते हाय कॅम्प हे अंतर जेमतेम दीड किमी आहे, आणि उंचीत फरक ३५० मी. तरी सुद्धा “१ ते २ तास लागतात” असं मी वाचलं होतं. आणि ते मला खरं वाटत नव्हतं. दीड किमीला इतका वेळ कसा लागेल? पण लागतो. हे आत्ता कळलं. कारण एकतर खडी चढण आहे, आणि विरळ हवा.
केवळ दीड तासात माझी आजची चाल पूर्ण झाली होती. मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो होतो. नेहेमी मी ७-७। ला चालायला सुरुवात करत होतो, पण आज तर ७।। वाजता मी मुक्कामी पोचलो होतो!
पोचलो खरा पण हाय कॅम्प हॉटेल मध्ये काही जाग दिसेना. हाय कॅम्पहून लोकं पहाटे ५ च्या आधीच निघून जातात हे माहिती होतं. पण हॉटेल चालक - मालक तरी असायला पाहिजेत?
हाय कॅम्प हॉटेल म्हणजे ५-६ स्वतंत्र बसक्या इमारती. त्यातील एक रेस्टॉरंट. बाकीच्या इमारतीमंध्ये ट्रेकर्ससाठी खोल्या.
कुठेही कुणी मनुष्यप्राणी दिसेना. शेवटी एका कट्ट्यावर बसलो. पाठपिशवी उतरवून पाणी प्यायलो. तेव्हा कुठं हॉटेल मालक रेस्टॉरंटचं दार उघडून बाहेर आला. त्याच्याकडून कळलं की रेस्टॉरंट आणि खोल्यांचीपण स्वच्छता सुरु आहे. तेव्हा लगेच आत जात येणार नाही. किमान अर्धा तास तरी लागेल म्हणे.
लागू द्या की. मला कुठे घाई आहे? मला तर आता पूर्ण दिवस मोकळाच आहे.
तेवढ्यात अदोनीस-सोफिया येऊन पोचले. एव्हाना ८ वाजले होते. सोफियाची अवस्था पाहून मला वाटलं की हे पण आता विचार बदलून इथेच मुक्काम करणार. पण त्यांचा निश्चय पक्का होता: आजच थोरोंग ला खिंड ओलांडून मुक्तिनाथ गाठायचं. सोफियाची अवस्था पाहून “आज इथेच विश्रांती घेऊन उद्या सकाळी जा” असं म्हणावसं मला वाटत होतं. पण मी तो मोह टाळला. उगाच कुणाला अनाहूत सल्ला कशाला द्या? आणि ती दोघं काही लहान मुलं थोडीच आहेत. त्यांना कळतंय ना काय करावं ते.
सोफियाचं डोकं खूप दुखत होतं. माझ्याकडे क्रोसिन आहे हे तिला अदोनीसकडून कळलं होतं. तिनी माझ्याकडून गोळी मागून घेतली. पाच मिनिटं बसून ती दोघं निघालीसुद्धा.
इथून थोरोंग ला खिंड गाठायला तुमच्या फिटनेसनुसार २ ते ५ तास लागतात असंही वाचलेलं होतं. ८ तर वाजून गेले होते आत्ताच. ही दोघं खिंडीत पोचेपर्यंत १२ वाजून जाणार बहुतेक. आणि जसा दिवस वर येईल तसं खिंडीत प्रचंड वेगानी वारं वहायला लागतं म्हणे. दुसरं म्हणजे सर्व ट्रेकर्स केव्हाच पुढे गेले होते, म्हणजे या दोघांना काही मदत लागली तर कुणी भेटण्याची शक्यता नव्हती. खरं तर मला त्यांची थोडी काळजीच वाटत होती. पण इथपासून थोरोंग ला खिंडीपर्यंतच्या अर्ध्या वाटेत एक टी हाऊस आहे आणि शिवाय ऐन खिंडीत पण एक आहे हे माहिती होतं. तशीच वेळ आली तर त्या २ ठिकाणी त्यांना मदत मिळू शकली असती कदाचित. देव त्यांचं भलं करो!
तेवढयात हॉटेल मालकांनी रेस्टॉरंट उघडल्याची शुभवार्ता दिली. काही खोल्यापण स्वच्छ करून झाल्या होत्या, त्यामुळे पाठपिशवी खोलीत टाकून मग रेस्टॉरंटमध्ये येऊन बसलो. गरम चहा पीत. काचेच्या खिडकीतून बाहेरचं सौन्दर्य बघत. स्वर्गसुख!
या ट्रेकमार्गावर आत्तापर्यंत जिथे जिथे मुक्काम केला तिथे WiFi Internet सुविधा फुकट मिळत होती. हाय कॅम्प मात्र त्याला अपवाद. इथे त्यासाठी १०० रु मोजावे लागतात. त्यानंतर घरच्यांशी संवाद होऊ शकला.
आज चालणं कमीच झालं होतं आणि वेळही होता. म्हणून हॉटेल मागे एक उंचवटा आहे तिथे गेलो. म्हणजे हे ठिकाण:
https://maps.app.goo.gl/dthS88v8znPkUHjq6
इथून आजूबाजूचा बराच परिसर छान दिसतो. खालचं थोरोंग फेडी हॉटेलपण दिसतं. पण वारं सुटलं होतं म्हणून जास्त वेळ थांबलो नाही. खाली येऊन पुन्हा रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसलो.
तिलीचो हॉटेलप्रमाणे इथेपण बरीच पुस्तकं होती. मी Lord of the rings घेऊन बसलो. एव्हाना आणखी काही ट्रेकर्स येऊन पोचले होते. खोलीपेक्षा रेस्टॉरंट उबदार असल्याने बहुतेक लोकं इथेच पडीक असतात. नुसतंच गप्पा मारत किंवा पुस्तक वाचत बसायचं. अधून मधून चहा.
दुपारपर्यंत नाना देशाचे ट्रेकर्स इथे येऊन पोचले. एक फ्रेंच जोडपं. एक डच महिला आणि तिचा गाईड. ५-६ ऑस्ट्रेलियन मित्र मैत्रिणी. एक अमेरिकन कुटुंब. म्हणजे एक १२ वर्षांचा मुलगा आणि त्त्याच्याबरोबर त्याची आई आणि मावशी शोभतील अशा २ महिला. त्यांचे नातेसंबंध खरे काय होते कोण जाणे. असे अनेक.
कालचा दिवसभर खाणं खूप कमीच झालं होतं. आज सकाळीपण नाश्ता केलाच नव्हता - थोडासा सिनॅमोन रोल तेवढा खाल्ला होता. आता जरा भूक लागल्यासारखं वाटत होतं. पण तरी दाल भात पूर्ण खाऊ शकेन असं वाटत नव्हतं. काल मॅश्ड पोटॅटोज विथ चीझ जेमतेम दोन चमचे खाऊ शकलो. आज काय घ्यावं? मी पिझ्झा मागवला. गरम पिझ्झा समोर आल्यावर आणखी भूक लागली. पिझ्झा छानच होता. पण जेमतेम एक चतकोर खाल्ला आणि मला पोट भरल्याची भावना झाली. पण अन्न वाया घालवायचं नाही ही लहानपणापासूनची शिकवण. पाऊण पिझ्झा असाच कसा सोडून द्यायचा? म्हणून नेटानी खात राहिलो. आणखी एक चतकोर खाल्ल्यावर मात्र मी शरणागती पत्करली. आणखी जास्त खाणं शक्यच नव्हतं. हा सगळा विरळ हवेचा परिणाम असावा. कारण पिझ्झा तसा लहानच होता. एरवी मी इतका पिझ्झा एकट्याने अगदी आनंदानी खाल्ला असता. आज मात्र अर्धा कसाबसा खाऊ शकलो. शेवटी हॉटेल मालकाला सांगितलं की पिझ्झा खूप चांगला आहे, पण माझं पोट भरलं; मी पूर्ण संपवू शकत नाही. त्यानी काही फारशी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याला बहुतेक सवय असावी अशा प्रसंगांची. पण त्यानी पिझ्झाची ताटली उचलूनही नेली नाही. असो. मी ती नुसती थोडी पुढे ढकलली आणि पुस्तक वाचत बसलो.
शेजारी फ्रेंच बाई नवऱ्याच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपली होती. थोड्या वेळानी ती उठली. तेव्हा फ्रेंच बुवानी त्याचा मोबाइल माझ्या डोळ्यासमोर धरला. त्याने गूगलच्या मदतीने फ्रेंच वाक्य इंग्रजीत भाषांतर केलं होतं: Are you going to save the pizza for later? If not, can I eat it? हा प्रकार मला अनपेक्षित होता. पण मी अर्थातच आनंदानी होकार दिला. नवरा बायकोनी मिळून पिझ्झा संपवला तेव्हा मला अन्न वाया गेलं नाही याचं समाधान वाटलं!
रेस्टॉरंट जरी उबदार असलं तरी तिथे खूप वेळ बसून पाठ दुखायला लागली. कारण तिथे खुर्च्या नाहीत, नुसती बाकं आहेत. पाठ टेकायची सोय नाही. म्हणून मग खोलीत जाऊन थोडा वेळ पडलो. दुपारी झोपायची सवय नसल्यानी झोप काही लागली नाही. पण थंडी मात्र प्रकर्षाने जाणवली. स्वेटर घालून, ब्लँकेट घेऊन पहुडल्यावर बरं वाटत होतं, पण पाय मात्र गारठले होते. इतके दिवस जी वापरायला लागली नव्हती ती थर्मल पॅन्ट आज घालावी लागली. शिवाय पायातही एकावर एक असे २ मोजे घातले तेव्हा थोडं बरं वाटलं.
तास दोन तास आराम करून पुन्हा रेस्टॉरंटमध्ये गेलो तेव्हा तर आणखी अनेक ट्रेकर्स येऊन रेस्टॉरंट जवळ जवळ पूर्ण भरलं होतं. एव्हाना राज-संगीता पण तिथे येऊन पोचले होते. शिवाय इतर अनेक ट्रेकर्स. इस्राएलमधून आलेला एक मोठा समुदाय खूप मोठ्यांनी अगम्य बडबड करत होता. आणि एक चिनी घोळका पण. त्यातच एक ऑस्ट्रेलियन मुलगा गिटार वाजवून गाणी म्हणत होता. असा सगळा उत्साही गलबला होता.
लोकांच्या बोलण्यातले बरेचसे शब्द कळत नव्हते पण हावभावावरून अर्थ अंदाजे कळत होता. अर्थात अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन लोकांचं बोलणं थोडंफार कळत होतं.
अमेरिकन मुलगा गॅसेस झालेत म्हणून तक्रार करत होता. हापण विरळ हवेचाच एक साईड इफेक्ट. तर संगीता त्याला कोणती योगासने केल्याने वायू सुटून जातो हे शिकवत होती. म्हणलं इथं नको रे बाबा, स्वतःच्या खोलीत जाऊन कर.
बरेच जण उद्याच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करत होते. किती वाजता निघायचं? नाश्ता करून जायचं की डबा भरून घेऊन जायचं? दुपारच्या जेवणाचं काय? वाटेत स्नो असेल का? किती वाजेपर्यंत थोरोंग ला खिंड गाठणं आवश्यक / सुरक्षित आहे?
११ वाजायच्या आधी खिंडीत पोचलंच पाहिजे असं सर्वसाधारण मत होतं. कारण नंतर खूप जोरदार वारं सुटतं. बहुतेक लोकांप्रमाणे मीपण ४ वाजता उठून चालू लागायचं असं ठरवलं.
भूक अजिबात नव्हती तरी ऊर्जेसाठी काही तरी खायला हवं. म्हणून मी थुक्पा मागवला. हे तिबेटी पद्धतीचं सूप असतं. मला आवडलं.
हाय कॅम्प आणि कालचं थोरोंग फेडी यांचं सामायिक वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीकडे वीज नाही. रेस्टॉरंटमधील दिवे, वायफाय राउटर वगैरे सगळं सोलरवर चालतं. त्यामुळे खोलीत दिवे नसतात. आपण आपला हेड टॉर्च लावून वावरायचं. कॉमन टॉयलेटमध्ये दिवा असतो पण बॅटरीचा चार्ज कमी झाला की तोही बंद.
त्यामुळे थुक्पा खाऊन हेड टॉर्च लावून खोलीत पोचलो. आता तर अजून जास्त गार झालं होतं. त्यामुळे साडेआठच झाले होते तरी ब्लॅंकेट ओढून बिछान्यात पडलो. केव्हा झोप लागली कोण जाणे.
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग १
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग २
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ३
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ४
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ५
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ६
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ७
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ८
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ९ (माहिती)
छान चाललाय प्रवास
छान चाललाय प्रवास