२१ एप्रिल २०२४
ट्रेकची सुरुवात:
रात्री झोप तुटक तुटकच झाली. सकाळी पाच वाजताच जाग आली. पण उठून करणार तरी काय? म्हणून पडून राहिलो. साडेपाच वाजता बाहेर बराच उजेड दिसला तेव्हा उठून बाहेर आलो. बर्फाच्छादित शिखरं बघून एकदम ताजतवानं वाटलं. आज खरा ट्रेक सुरु करायचा आहे! त्या उत्साहात पटापट आवरून साडेसहा वाजता रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो. आम्लेट आणि चहा घेऊन सव्वासात वाजता निघालो. ट्रेक सुरु!
जो ट्रेक मार्ग मी नकाशात अनेक वेळा बघितला होता त्या मार्गानी आता मी खरोखर निघालो होतो. ठरवून एकटाच. काल चामे गाव फिरून झालंच होतं. लवकरच गावातून बाहेर पडलो. पहिले दोन दिवस बहुतेक गाडी रस्त्यानेच चालायचं होतं. गाडी रस्ता म्हणजे तोच कालचा पुढे चाललेला. क्वचितच एकादी जीप येत जात होती. लांबवर दोन ट्रेकर्स दिसत होते. म्हणजे काहीजण माझ्यापेक्षाही लवकर निघालेत तर! अर्थात मला काही कुणाला गाठायची किंवा सगळ्यांच्या आधी पोचायची घाई अजिबात नव्हती. मी माझा वेग एन्जॉय करत निवांत चाललो होता. अर्ध्यापाऊण तासातच तलेखू गावात पोचलो. हे तर चामेपेक्षाही लहान गाव. तरी तिथेही २ रेस्टॉरंट होती. पण इतक्या लवकर ब्रेक घायची गरज नव्हती म्हणून थांबलो नाही.
संपूर्ण ट्रेक मार्ग म्हणजे सतत चढण असेल असं वाटतं आपल्याला. पण प्रत्यक्षात चढ आणि उतार दोन्हीही आलटून पालटून होतं इथे. उजव्या बाजूला उत्तुंग पर्वत. डावीकडे खळाळती नदी. त्यापलीकडे आणखी उंच पर्वत. त्या बाजूला अन्नपूर्णा २ व ३ शिखरे आहेत असं नकाशात बघितलं होतं. पण ती शिखरं आत्ता दिसत नव्हती. कारण हे डोंगर खूप जवळ आणि उभे होते. अन्नपूर्णा २ व ३ या डोंगरांपेक्षा खूप उंच आहेत पण ते जरा मागे होते, म्हणून दिसत नव्हते. पण नदीच्या किनाऱ्याने रस्ता छानच वाटत होता.
नदीच्या एका सुंदर वळणाजवळ एक तरुण डोंगरांचे आणि नदीचे फोटो काढण्यात मग्न होता. मी जवळ पोचल्यावर म्हणतो माझा एक फोटो काढून देशील का? माझ्यामागे नदीचा उतार दिसला पाहिजे. नतंर चौकशी केल्यावर कळलं कि तोही एकटाच होता. स्पेन मधून आला होता. नंतर काही वेळ आम्ही बरोबर चाललो. पण मग मीच त्याला म्हणलं तुला भरभर जायचं असेल तर तू जा पुढे, मी आपला हळूहळू जाणार. तो खरंच बाय करून गेला आणि बघता बघता दिसेनासा झाला.
दीड तास चालल्यावर दमल्याची जाणीव झाली. एक छोटा ब्रेक घ्यावासा वाटायला लागला. नकाशानुसार भ्रतांग गाव जवळच असायला पाहिजे होतं. तसं खरोखर २-३ मिनिटात गाव दिसायला लागलं. पण तरी तिथे पोचायला १५ मिनिटं लागली. भ्रतांग हे सफरचंदाचं गाव. सगळीकडे सफरचंदाच्या बागा. घरं कुठं दिसलीच नाहीत. नुस्तीच २-३ रेस्टॉरंट्स. उंच त्रिकोणी छप्पर असलेल्या एका रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसलो. पावणेदोन तास चालल्यानंतर टेकायला मिळालं तेव्हा अगदी बरं वाटलं. खरं तर नुसता चहा घ्यायचा मूळ बेत होता. पण म्हणलं सफरचंदाच्या गावात आलोय तर निदान एक ऍपल पाय तरी घ्यावं. मस्त होतं!
खाऊन पिऊन रिफ्रेश होऊन पुढे निघालो. गावातून बाहेर पडल्यावर रस्ता लगेचच उजवीकडे वळत होता. म्हणजे नदीला वळण असल्यामुळे रस्त्याला वळणं भागच होतं. लवकरच तीव्र चढ सुरु झाला. जीपमध्ये असतो तर ड्रायव्हरनी फोर व्हील ड्राईव्ह चा गियर टाकला असता. मीपण दोन पायांना दोन हायकिंग पोल्सची जोड देऊन चार चाकं नाही तरी चार टोकांचा वापर सुरु केला. चढ इतका तीव्र होता की थंड हवेतही घाम निघाला. इथे नदीला तीव्र उतार असल्याने खळाळणारा आवाज वाढला. पुढे काही अंतरावर रस्ता पुलावरून नदीच्या दुसऱ्या बाजूला जातोय असं दिसत होतं. पण त्याआधी एक छोटा झुलता पुलपण होता. पादचाऱ्यांसाठी. यापूर्वी मी कधी झुलता पूल ओलांडला नव्हता, म्हणून बिचकत पाय ठेवला. पण वाटलं होतं तितका काही हा झुलत नव्हता. आणि पुलाच्या मध्यभागी पोचल्यावर नदी काय सुंदर दिसत होती! व्वा!
पूल ओलांडून पलीकडे गेल्यावर लक्षात आलं की पुन्हा मुख्य रस्ता (म्हणजे जीप रस्ता) लगेच मिळणार नाहीये. त्याआधी जंगलातून पायवाट होती.
दगडांवर बाण रंगवून ठेवलेले होते, त्याप्रमाणे जात राहिलो. इथे तर जास्तंच तीव्र चढ होता. १०-१५ मिनिटात एक भग्नावस्थेतील घर दिसलं. तिथे एक पोर्टर विश्रांती घेत बसला होता. मीही बसलो. पाणी प्यायलो. त्याला हवंय का विचारलं. त्यानी नम्रपणे नकार दिला. आपल्याला कुणी पाणी हवंय का असं विचारेल असं त्याला अपेक्षित नव्हतं बहुतेक. माझ्यामागून २-३ मिनिटात आणखी बरेच ट्रेकर्स आले. एक नेपाळी तरुण, त्याच्या ऑस्ट्रेलियन मैत्रिणीबरोबर होता. तो पूर्वी पुण्यात विप्रोमध्ये नोकरी करत होता पण नंतर ऑस्ट्रेलियाला गेला. आणखी इतर अनेक गोरे ट्रेकर्स , पण ते विश्रांती न घेता पुढे निघून गेले. थोड्या वेळानी मीही उठून चालायला लागलो. आता जंगलामुळे डोंगर आणि नदी दोन्ही दिसत नव्हते. हे जंगल अर्थातच आपल्या महाराष्ट्रातील जंगलासारखं नाही. इथे खूप उंच झाडं. बहुतेक पाईन वृक्ष असावेत. थोडा वेळ चालल्यावर चढाची तीव्रता कमी होऊ लागली. जीप रस्ता जवळ आल्याचं लक्षात आलं. अर्धा तास जंगलातून चालल्यावर पुन्हा जीप रस्ता. थोड्याच वेळात गाव दिसू लागलं. बघता बघता पोचलो: धुकुर पोखरी. धुकुर म्हणजे धुरकट किंवा राखाडी रंग. पोखरी म्हणजे तळं. नदीतल्या पाण्याचा रंगही राखाडी आहे असं आधीच लक्षात आलं होतं. तळंही राखाडी. कदाचित जमिनीतल्या विशिष्ट खनिजांमुळे असेल. तर धुकुर पोखरी. ऍपल पाय खाऊन दोन तास होत आले होते. थोडी विश्रांती आणि जेवण दोन्ही आवश्यक होतं. कमला हॉटेलमध्ये दोन्ही साधलं.
कमला हॉटेल, धुकुर पोखरी: https://maps.app.goo.gl/pRNybYRQHLVfJTtr5
इथून मनांगला जायला दोन रस्ते आहेत: वरचा आणि खालचा. साताऱ्यासारखे.
वरचा आणि खालचा रस्ता हे अनुक्रमे अप्पर आणि लोअर पिसांग मार्गे जातात. त्यानुसार आजचा मुक्काम अप्पर किंवा लोअर पिसांगला करायचा होता.
वरचा रस्ता म्हणजे अप्पर पिसांग ते घ्यारू मार्गे मनांग. हा रस्ता पुष्कळ उंच चढून मग पुन्हा खाली उतरून मनांगला पोचतो. हा रस्ता पूर्णपणे नदीच्या उत्तर किनाऱ्याने जातो. हा मार्ग खडतर आहे, कारण अंतर जास्त (जवळ जवळ २० किमी) आणि चढ पण खूप आहे. पण हा लोकप्रिय आहे कारण त्या वाटेने जाताना अन्नपूर्णा २ व ३ चे विहंगम दृश्य दिसते (ढग नसतील तर).
खालचा रस्ता म्हणजे लोअर पिसांग ते हुमदे मार्गे मनांग. हा सोपा. अंतर कमी (१५ किमी). चढ कमी. पण अन्नपूर्णा २ व ३ मात्र दिसत नाहीत. आज मला दिसले नाहीत तसेच. हा मार्ग सुरुवातीला बराचसा नदीच्या दक्षिण किनाऱ्यानी जातो आणि शेवटी नदी ओलांडून मनांग गाठतो.
वरच्या रस्त्यानी जाणं झेपेल की नाही याबद्दल मला खात्री वाटत नव्हती. पण मग अन्नपूर्णा २ व ३ कसे दिसणार? म्हणून मी वेगळाच प्लॅन केला. लोअर आणि अप्पर पिसांग हे नावाप्रमाणे खाली आणि वर आहेत. अनुक्रमे नदीच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्याला आहेत. म्हणजे अप्पर पिसांग गावातून अन्नपूर्णा २ व ३ दिसणार; लोअर मधून नाही. म्हणून मग आजचा मुक्काम अप्पर पिसांगला करायचा. आणि उद्या तिथून खाली लोअर पिसांगला जाऊन मग खालच्या रस्त्यानी मनांग गाठायचं.
तसा अप्पर पिसांगकडे चालायला लागलो. लवकरच फाटा आला. डावा लोअर पिसांग आणि उजवा अप्पर. मी उजवीकडे.
थोडं पुढे गेल्यावर पेटंट राखाडी रंगाचं पाणी असलेलं तळं दिसलं. हेच ते धुकुर पोखरी.
अचानक लक्षात आलं की इथला परिसर एकदम वेगळाच आहे. काही तासांपूर्व पाईन वृक्षांच्या जंगलातून चालत होतो. इथं मात्र झाडं खूप कमी. आणि होती तीपण जरा बुटकी झुडुपं. शिवाय मर्स्याङ्दी नदीचं खोरं इथं बऱ्यापैकी रुंद झालंय. त्यामुळे उजेड पुष्कळ होता. चामे ते धुकुर पोखरीपर्यंत परिसर प्रामुख्याने हिरवा होता. इथे मात्र हिरवा कमी आणि मातीचा राखाडी रंग प्रबळ होता. मला हिरवा रंग आवडत नाही असं नाही, पण हा परिसर मला जास्त आवडला!
थोड्या वेळात छोट्या पुलावरून मर्स्याङ्दी नदी ओलांडून उत्तर किनारा गाठला. पुढची पायवाट नदीपासून हळू हळू दूर जात डोंगरावर चढत होती. एक उंचवट्यानंतर अप्पर पिसांग मधली घरं / टी हाऊसेस दिसायला लागली. हा चढ काही फार तीव्र नव्हता पण एव्हाना दुपार झाल्याने जरा गरम होतं त्यामुळे घामाघूम झालो. पण बघता बघता मुक्कामी पोचलो:
हॉटेल रॉयल माउंटन: https://maps.app.goo.gl/AxCzuFDCmnSytyEx6
आज नाही म्हणलं तरी १५-१६ किमी चालणं झालं होतं. रोज थोडीच आपण इतकं चालतो? त्यामुळे खोलीत जाऊन आरामात पडलो थोडा वेळ. आणि लवकरच गार पडलो! चालताना घाम गळत होता तरी शेवटी थंडी होतीच. तापमान ८-९ डिग्री असावं. थोड्या वेळाने मस्त चहा प्यायल्यावर एकदम फ्रेश वाटलं. इथे बहुतेक रेस्टॉरंट्सना मोठ्या काचेच्या खिडक्या असतात. इथून अन्नपूर्णा २ अगदी समोरच आहे - नदीच्या पलीकडे. पण...सध्या नुसते ढग दिसत होते. हॉटेल मालक म्हणत होता की थोड्या वेळानी आकाश उघडेल. पण तसं काही झालंच नाही. त्यामुळे अप्पर पिसांगला आल्याचा काही फायदा नाही झाला. असो.
संध्याकाळी नेहेमीप्रमाणे दाल भात मिरचीसकट खाऊन लवकर झोपलो. इथे पण झोप तुटक तुटक लागली. खरं तर शांतता होती. मऊ गादी आणि उबदार ब्लॅंकेट होतं. पण तरी नाही. कदाचित अनोळखी जागा आहे म्हणून असेल.
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग १
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग २
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ३
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ४
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ५
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ६
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ७
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ८
अन्नपूर्णा सर्किट ट्रेक भाग ९ (माहिती)
अन्नपूर्णा ट्रेकला जाणारे
अन्नपूर्णा ट्रेकला जाणारे पोखरा विमानतळावर पाहिले होते. तिथूनच जातात का?
प्रवासवर्णन वाचायला मजा येतेय.
छान. वाचतेय.
छान. वाचतेय.
आवडतंय लिखाण !
आवडतंय लिखाण !