डायरीतले एक पानः बोलणारी झाडे
रोज सकाळी, उन्या थंडीत बाहेर पडले की भेटतात झाडे. एखादे माणूस सायकल चालवताना दिसते. नाही असे नाही. पण पुरेसे ऊन नसेल तर पक्षी सुद्धा दिसत नाही. मग मोठी झाडे, छोटी झुडपे किंवा पहाटेच्या दवबिंदूंचे बर्फ पांघरलेले गवत- असे सगळे.
मी त्यांच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करते आहे. एखाद्या क्षणी वाटते की हे झोपेत आहेत किंवा आपण तरी. बहुतांश वेळा ओळख काही पटत नाही. पत्ता कळतो मात्र. कारण काल किंवा परवा ती जिथे उभी होती, आजही तिथेच उभी असतात. जागा बदलत नाहीत. त्यामुळे, “अरे काल मी आले होते, कुठे गेली होती स्वारी?” असे प्रेमळ संवाद घडण्याची सुतराम शक्यता नाही. “काल का बरं आली नाहीस, मी वाट पहात होतो” असे उगीचच मैत्रीच्या पुढे-प्रीतीच्या मागे असे काठावरचे संवाद पण नाहीत. कारण आपल्याला बोलता येत असले तरी त्यांना आपल्या भाषेत बोलता येत नाही. त्यांची त्यांना समजणारी भाषा असावी, असे मला वाटते. असेलच बहुधा. कारण, बहुतेक, पाखरांना ती समजते. पण मला अजून समजत नाही. माझे बोलणे त्यांना समजते की नाही या गोंधळात मी कंठातून ध्वनीनिर्मिती करून बरेच दिवसात त्यांच्याशी बोलले नाही. पूर्वी काही वेळा प्रयत्न केला. पण आई रागवली की आजीबात उत्तर देत नसे, तसे ते झाड नुसतंच माझ्याकडे पहात बसले. रस्त्यावर उभे राहून, जगाचे भान आल्यावर मी ठरवले की हे बंद केले पाहिजे. पक्षी मात्र काही ना काही बोलत असतात. झाडांशी तर नक्कीच. कधी कधी, अगदीच त्यांचा मूड किंवा आपला aura बरा असेल तर भेटायला पण येतात. त्यांच्यबरोबर किंवा प्राण्यांबरोबर बोललं की इतकं खुळ्यासारखं वाटत नाही. पण थंडीच्या दिवसात पहाटे बाहेर पडले की सगळ्या निश्चल चित्रात हालणारा एकमेव जीव, या कल्पनेने मजा येते.
आता यापुढे मी विचार करते (किंवा लिहीते) तेंव्हा बऱ्याचदा ते अध्यात्मिक वगैरे होते. कारण मग काय लिहीणार पुढे? मी विचार करते तेंव्हा मी एकटीच असल्याने असे विचार करते. कारण मला कंटाळा येत नाही. मी स्वतःला बऱ्याच non judgmental अशा environment मध्ये जपते. पण तुम्ही, म्हणजे चुकून माकून कोणी वाचलेच तरं ते मला जपतील याची खात्री नाही. तर ज्यांना नाही वाचायचं त्यांच्यासाठी, की आज इतकेच पुरे.
तर मग पुढे चालता चालता मला वाटते की झाडाला एका जागी उभे राहणे कसे जमते? (उभे- कारण आपल्यासाठी उभे. ते रुजलेले असते. कदाचित मांडी घालून बसले पण असेल किंवा त्यांच्या भाषेत, एखादे मनमौजी झाड केवळ ‘मुळांवर ओझे टाकून वाढलेले’ पण असू शकते.) तशी सगळीच झाडे गुणी असतात. माणसाच्या पिल्लांसारखी आगाऊ, आततायी किंवा रागीट, आळशी असे दुर्गुण त्यांच्यात नसतात. मृदू, ऋजु, संयमी, येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत नेटाने वाढणारी, विपरीत हवामानात फार जमले नाही तरी एक तरी फुल किंवा फळ येईल असे बघणारी, तेही अवघड झाले तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये अर्धे वाळून मग परत बुंध्यातून उगवणारी अशी फार चिवट व persistent असतात. आमच्याकडे एकदा एक शेवग्याची जाड फांदी आणून आम्ही जमिनीत खोवली. महिनाभर सलग ४६ degree C तापमान होते तेंव्हा ती पूर्णतः सुकून गेली. पूर्वी एकदा वाळलेल्या कढीपत्त्याच्या रोपाला रोजचं पाणी मिळत होते तर ते पठ्ठे परत बी मधून उगवलं. त्याने give up केले नाही तर आपण उगीचच आता काही हे यायचे नाही, नको घालूया पाणी असे विचार करुन का give up करायचे? शेवग्यासाठी पण रोजचं थोडं पाणी जात राहीले. आणि जरा हवा बरी झाली तर चारी बाजूंनी, मोराचा पिसारा फुलावा तसे त्या वाळलेल्या फांदीच्या खालच्या भागातून झरझर पालवी फुटली. ते झाडं तर जगलंच, आम्ही पण रोजचं नवं रूप जादू पहावी तसे नुसतं पहातच राहिलो.
असं वाटतं की झाडांना देव हे सगळे गुण देऊनच पाठवतो. आपल्यासारखे नाही. म्हणजे माणसाच्या पिल्लाला स्वातंत्र्य फार. लाड करुन घ्यायचे नशीब पण जोरदार. आत्ता नाही शिकलास तर नंतर शिक. चुकांतूनच माणूस शिकतो वैगेरे तत्त्वज्ञान पण. पण झाडे म्हणजे देवाने लिहीलेले पुस्तक. अपौरुषेय. ज्याला वाचता येईल त्याला समजेल की किती अर्थपूर्ण आहे. आपल्यासाठी लिहीले आहे, असेही आपण वाटून घेऊ शकतो. कारण आपलाच देव आहे. आपल्यासारखाच. जास्त चांगला, परिपूर्ण आहे. आपला बाप तो, आपण त्याची लेकरे. त्यामुळे आपल्यासाठीच लिहीलेले असणार हे पुस्तक. तर एवढे सगळे सद्गुण ल्यायलेले झाड. अचल. अविचल. निष्ठेने जगणारे, परोपकारी, शान्त, आत्मानंदात मग्न. सर्वांसाठी सगळे करुन वर देवासारखेच कधी काही न सांगणारे. म्हणजे त्याला देवाची भाषा कळत असणार. आपल्यालाच ती कळत नाही. तर खरं झाडंच असते परमेश्वराचे लाडके मूल. आपण आपलं, अमेरिकेसारखं स्वतःला लावून घेतले आहे की आपणच जगात भारी. पण ते काय बोलते हे आपल्याला समजत नाही. तरीही देव परत परत हे inaudible पुस्तक लिहीतच राहतो. ते download कसे करायचे या वांद्यामुळे आपण जुनी, न कळणारी चित्रलिपी पहावी तसे पहात राहतो. यालाच अज्ञानी म्हणतात का?
बहुभाषी, बहुश्रुत होण्याच्या नादात ही देवाची पत्रे वाचायची, ऐकायची राहतात. ही दोन वेगळी जगं आहेत असे वाटते. इथून तिथे जाता येते. राहता येते, स्पर्श करता येतो पण संवाद होत नाही. ती बोलतात आपल्याशी पण आपण आपल्यातच मग्न. आपण Teenage मधल्या मुलांप्रमाणे अंतर राखतो. पण, आईच्या मायेने ती आपल्यापासून लांब जात नाहीत. त्यांच्या सान्निध्यात जाऊन जगताचे ताप विसरतोच आपण. जुन्या काळी देव मानून झाडाला पूजत असत. देवरायांतून त्यांना भेटायची सोय होती. परस्परसंबंधातून आलेली आत्मियता व्यवहार जाणत नाही. ही आत्मियता कशी पुनःप्रज्वलित करता येईल? उराउरी भेटून त्यांच्याशी कसा संवाद साधता येईल?
या इथपर्यंत येउन थांबलेय.
-शर्वरी.
Between every two pines is a doorway to a new world.” – John Muir.
आवडलं.
आवडलं.
खूप खूप वर्षांपूर्वी झाडे
खूप खूप वर्षांपूर्वी झाडे बोलत होती, चालतही होती. पहा "Lord of the rings" आता चालत नाहीत पण बोलतात मात्र निश्चित. त्याच्या साठी कान तयार पाहिजेत.
लेख आवडला.
छानच.
छानच.
धन्यवाद रमड, केशवकूल, आर्च!
धन्यवाद रमड, केशवकूल, आर्च!
लेख आवडला.
लेख आवडला.
सुंदर सुसंवाद.
सुंदर सुसंवाद.
आवडले लिखाण., संवाद..
आवडले लिखाण., संवाद..
आवडले.
आवडले.
धन्यवाद स्वाती२, अनिंद्य,
धन्यवाद स्वाती२, अनिंद्य, प्राचीन आणि सामो.
छानच.
छानच.
अप्रतिम आणि जिव्हाळ्याचा
अप्रतिम आणि जिव्हाळ्याचा सुसंवाद.... कल्पनाशक्तीची मोहक भरारी
छान लिहिलं आहे आवडल
छान लिहिलं आहे आवडल
तरल आणि गोड लिहिले आहे.
तरल आणि गोड लिहिले आहे.
माझीही अशी काही जरठ वृक्ष मित्र आहेत नदीकाठी, तेथे गेल्यावर त्यांना हात ठेवून स्पर्श केल्याशिवाय परत येत नाही. शतकानुशतके उभी असतील, किती लोक आलेगेले, स्थितप्रज्ञ आहेत बिचारी. स्पर्शाने तो दुवा साधण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे रिलेट झाले.
छान लेख, आवडला..
छान लेख, आवडला..
झाडांसोबत किंवा एखाद्या झाडासोबत भावनिक नाते जोडले जाते हा अनुभव आहे.. सोबत आपल्या छान आठवणी जोडल्या गेल्या असतील तर जास्त त्रास होतो. एकदा असेच एक झाड वादळात पडले तेव्हा ते जाणवले आहे. या विषयावर माझा रुमाल.. तो अनुभव लिहायला हवा नक्कीच.
धन्यवाद नि.३, रेव्यु, ऋतुराज,
धन्यवाद नि.३, रेव्यु, ऋतुराज, अस्मिता आणि ऋन्मेष.
ऋन्मेष नक्की लिही. वाचायला आवडेल.
अस्मिता, तुमची प्रतिक्रिया आली की मी अधाश्यासारखी वाचून काढते!
सुरेख.
सुरेख.
मला आधी सवय होती बागेतील झाडांशी गप्पा मारायची.
छान लिहिलायं लेख..!
छान लिहिलायं लेख..!
फोटोही मनमोहक...
सुरेख. आवडलं.
सुरेख. आवडलं.