।।७।।
“कुमार? कुमारऽऽ.
कुणी आहे का रे जवळपास? लवकर इकडे या.”
“काय झाले पितामह?”
“अरे हा पांचाल राजपुत्र मला भेटायला आला. आमचे बोलणे चालले होते तेव्हा मध्येच अचानक विकट हसायला लागला आणि हसता हसता मुर्छित झाला. पाणी घेऊन ये आणि आयुर्वेदाचार्यांना पाचारण करायला कुणाला तरी पाठव.”
“आयुर्वेदाचार्यांना पाचारण करण्याची आवश्यकता नाही, आणि मला काहीही नकोय. प्रतिहारी आपण थोडावेळ बाहेर थांबा.
गंगापुत्र, साक्षात पितामह भीष्म यांच्या अतिथीने केलेल्या विनंतीला मान देण्याइतके सौजन्य हस्तिनापुरातल्या सेवकांना कुणी शिकविलेले दिसत नाही.”
“जा तू, बाहेर थांब, आवश्यकता वाटल्यास मी हाक मारेन.”
“जशी आज्ञा, पितामह”
“काय झाले गंगापुत्र? माझे भय वाटते आहे?”
“भय नाही पण विस्मय मात्र वाटतो आहे. तुमच्या हसण्याचा, मुर्छित होण्याचा आणि अचानक तुम्हाला आलेल्या क्रोधाचा.”
“विस्मय वाटणारच तुम्हाला. तुमच्या उन्मत्त, आत्ममग्न स्वभावानुसार ज्यांचे दमन करता त्यांना विस्मृतीत ढकलून देण्याची कला तुम्ही चांगलीच आत्मसात केली आहे. त्यामुळे मी तुमच्या वर क्रुद्ध आहे ह्याचा विस्मय तुम्हाला वाटणारच.”
“आपली ह्या आधी कधी भेट झाली आहे कुमार? पण माझ्या काहीच लक्षात येत नाहीये.”
“गेल्या जन्मात मी काशीची राजकन्या अंबा होते, गंगापुत्र. ती अंबा जिचे आयुष्य तुम्ही उध्वस्त केलेत.”
“ विचित्रवीर्याच्या विवाहासाठी….”
“आता आठवले ना सारे? तीच अंबा, पांचाल राजपुत्राच्या देहाच्या रथातुन तुम्हाला भेटायला आली आहे गंगापुत्र.”
“मला क्षमा करा देवी. तुमच्या वर केलेल्या अन्यायाबद्दल मला खरोखरच पश्चात्ताप होतो आहे. त्यावेळी जी परिस्थिती ….”
“तुमच्यामुळे दुर्दैवाच्या तडाख्यात सापडलेल्या अबलेला उन्मत्तपणे दूर सारून आता तुम्ही परिस्थितीचे लंगडे कारण पुढे करताय, गंगापुत्र? पण मी तुम्हाला स्वतः ची अशी सुटका करून घेऊ देणार नाही. हे युद्ध दुर्योधन आणि त्याच्या कपटी आप्तांना शासन करण्यासाठी आहे असा सगळ्यांचा समज आहे. पण ह्या युद्धाचे प्रयोजन हे आजपर्यंत अज्ञात राहिलेल्या एका अपराध्याला शासन मिळणे हे देखील आहे. गेले दोन जन्म मी तेवढी एकच इच्छा मनात धरून माझे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.”
“खरे आहे तुमचे म्हणणे, देवी. त्या वेळी जे मला समजु शकले नाही ते आज वयाच्या ह्या टप्प्यावर मला लख्ख दिसते आहे. पितृभक्त असलेला देवव्रत, महाराज शंतनु आणि महाराणी सत्यवतीच्या विवाहानंतर भीष्म म्हणुन ओळखला जाऊ लागला. माझ्या प्रतिज्ञेच्या किर्तीने माझ्या अंतरंगात अहंकाराला कधी प्रवेश मिळवुन दिला ते माझे मलाच कळले नाही. चित्रांगदाचा अकाली मृत्यु आणि विचीत्रवीर्याच्या ठायी असलेला कर्तुत्वाचा अभाव ह्यामुळे कुरु सिंहासन हे पुर्णपणे माझ्यावर अवलंबून होते. ‘पराक्रमी आणि निस्वार्थ असा कुरु सिंहासन पालक’ ह्या माझ्या प्रतीमेच्या मोहात मी आकंठ बुडालो होतो.
तुमची इच्छा रास्त होती. तुमच्या विनंतीचा स्वीकार करुन एका स्त्रीचे होऊ घातलेल्या वंचनेपासुन रक्षण करणे हे तुमच्या त्या अवस्थेचा कारक म्हणुन, आणि एक क्षत्रिय म्हणूनही माझे कर्तव्य होते. पण माझ्यातल्या कर्तव्यदक्ष देवव्रतावर माझ्या त्या स्वप्रतिमेच्या प्रेमात असलेल्या अहंकारी भीष्माने विजय मिळवला. तुमचे रक्षण करण्याऐवजी मी जनमानसात असलेल्या माझ्या उदात्त प्रतिमेचे रक्षण केले.
दुर्योधनाच्या उद्दाम वागण्याने आज माझ्या मनात जी असहाय्यतेची भावना येते त्याच्या कितीतरी पट अधिक असहायता माझ्यामुळे तुमच्या वाट्याला त्यावेळी आली. तुमच्या इच्छेची मी उन्मत्तपणे पायमल्ली केली. तो माझ्या पतनाचा क्षण होता, देवी! त्या क्षणापासून मी एक दांभिक पुरुष म्हणून जगलो.
द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी मी दुर्योधन आणि शकुनी ह्यांना का नाही थांबवले हा प्रश्न अनेकांना पडला. पण दुर्योधनाला थांबवण्याचा नैतिक अधिकार भीष्माकडे उरला आहे का? हा प्रश्न त्या वेळी देवव्रताने भीष्माला विचारला आणि मी निरुत्तर झालो. तुमच्या बाबतीत माझ्या हातुन अक्षम्य असा अपराध झाला आहे, देवी. मी तुमच्यावर पराकोटीचा अन्याय केला आहे. तुमची क्षमा तरी मी कुठल्या तोंडाने मागु?”
“मी तुम्हाला क्षमा करु शकत नाही गंगापुत्र. तुम्हाला तुमच्या अपराधाचे शासन व्हायलाच हवे असे माझे मत आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रसंगी तुमची नैतिकता तुमच्या निष्ठेपुढे अगतिक झालेली सगळ्या जगाला दिसली. आता तुमच्या कडे गमावण्यासारखी फक्त तुमची अजेय योद्धा ही किर्ती आहे. ती किर्ती नष्ट होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला जाणीव आहे की जिथे साक्षात परशुरामासारखा पराक्रमी योद्धा तुम्हाला पराभुत करु शकला नाही तिथे मी ते करु शकीन ही शक्यता नगण्य आहे. पण तरीही मी तुमच्याशी युद्ध करणार आहे गंगापुत्र. तुम्हाला शासन व्हायला हवे ही गेल्या जन्मात अपुर्ण राहिलेली माझी इच्छा मला तुमच्या शी युद्ध करताना बळ देईल.”
“मला शासन हे व्हायलाच हवे आणि ते करण्याचा अधिकार केवळ तुम्हालाच आहे देवी. तुमच्याशी युद्ध करण्याचा नैतिक अधिकार मला नाही. ह्या युद्धात ज्या क्षणी तुम्ही माझ्या समोर याल त्या क्षणी मी हातातील शस्त्रे टाकीन आणि अपराध्याच्या भुमिकेत तुमच्या समोर हात बांधुन उभा राहीन. तुम्ही मला जे शासन कराल ते मी आनंदाने स्वीकारीन. त्याने माझ्या मनावरचे ओझे निदान काही अंशी कमी होइल. शक्य असल्यास त्या नंतर मला क्षमा कराल देवी.”
कथा पुढे चालली आहे आता
कथा पुढे चालली आहे आता पुभाप्र...
विषयांतर: जर भीष्मानं त्याच्या प्रतिज्ञेचं पालन केलं नसतं तर कदाचित महाभारत घडलंच नसतं.. असो.
हा भाग नाही आवडला. भिष्मांना
हा भाग नाही आवडला. भिष्मांना दोषी ठरवण्याकरता उगाच एवढे संवाद घातले आहेत असे वाटले. त्यामुळे मूळ कथा भरकटल्यासारखी वाटली. (म्हणजे अंबा आणि शिखंडीचे एका शरीरात राहणे याबद्दल जास्त लिहीले असते तर जास्त सयुक्तीक झाले असते)
विषयांतर १: भीष्मांनी प्रतिज्ञा सत्यवती आणि तिच्या वडलांच्या अटीमुळे घेतली. त्यांनी फक्त त्याग केला. त्यांच्यामुळे महाभारत घडलं असं म्हणणं हास्यास्पद आहे.
विषयांतर २: अंबेने कोणावर राग धरायचा हा तिचा वैयक्तीक प्रश्न होता. पण भिष्म दोषी नव्हते. दोष द्यायचा झाल्यास सत्यवती आणि तिचे वडील (ज्यांच्या अटीमुळे भिष्मप्रतिज्ञा घडली), सत्यवती (एक स्त्री असून जिने दुसर्या स्त्रीचे अपहरण करण्याचा आदेश दिला) आणि शाल्व (ज्याने अंबेचा स्विकार करण्यास नकार दिला) यांना द्यावा लागेल. त्यातही शाल्व खरा दोषी होता.
भाग आवडला.
भाग आवडला.
माधव, अम्बा काशी राजाची मुलगी. तुम्हाला शाल्व म्हणायचे आहे का?
साधना, हो! चूक दाखवून
साधना, हो! चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. बदल केलाय.
माधव, अपहरण झाल्यावर शाल्व
माधव, अपहरण झाल्यावर शाल्व इतर राजांसमवेत भीष्माचा पाठलाग करतो, युद्ध करतो व त्यात जखमी होऊन हरतो. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे जो पळवुन नेतो तो मालक. त्यामुळे शाल्व अंबेला स्विकारत नाही. असमर्थ असलेल्या भावासाठी मुली पळवुन आणणे भीष्माने करायला नको होते. कुरु वंश प्रसिद्ध होता, त्यांना विधीवत मागणी घालुन मुली मिळु शकल्या असत्या. जर विचित्रविर्य असमर्थ आहे हे जगजाहिर असल्यामुळे असे होऊ शकत नसेल तर जबरदस्तीने मुली पळवणे अपराधच ना.. मग भले तो कोणाच्या आज्ञेने केला असेल. आणि एका राजपुत्राला एका वेळी तिन राजकन्या.. एक आणली असती तरी चालले असते की. तिन आणल्या आणि तिघींच्याही आयुष्यांची वाट लावली.
इरावती कर्व्यांच्या युगांत मध्ये भीष्माचे सुरेख विवेचन आहे. त्यातही त्यांनी भीष्माच्याच पदरात दोष घातलाय. भीष्माचे सुरवातीचे वागणे त्याचे महत्व वाढवण्यास मदत करणारे असेच होते. तो गादीवर बसला नाही पण गादीच रिमोट कंट्रोल आपल्या हाती राहिल हे पाहिले हे त्यांचे मत
तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे जो
तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे जो पळवुन नेतो तो मालक >>> तथाकथीत मालकाने मालकी हक्क सोडला होता ना ? भिष्मांना मालकी हक्कच दाखवायचा असता तर त्यांनी अंबेला जाऊच दिले नसते. इन फॅक्ट शाल्वाशी युद्ध व्हायच्या आधी जरी तिने आपले मन उघड केले असते तरी त्यांनी तिला जाऊ दिले असते पण तसे व्हायचे नव्हते. पण शाल्वाला आपल्या पराभवाचे शल्य बोचत होते त्यापायी त्याने अंबेला स्विकारले नाही.
'तेंव्हाची पद्धत' हा कळीचा मुद्दा. त्याच तेंव्हाच्या पद्धतीनुसार मुली पळवून आणून लग्न करणे समाजमान्य होते (राक्षसविवाह म्हणत बहुतेक त्याला). आणि समाजावर तात्कालिक रुढी / प्रथा यांचा पगडा असतोच. त्यात चूक / बरोबर हा विचार होत नाही.
तो कोणाच्या आज्ञेने केला असेल. >>> एक स्त्री म्हणून सत्यवतीला त्यातली चूक जाणवायला हवी होती. पण उलट तिनेच आज्ञा दिली. कारण तेच - तेंव्हा ती प्रथा समाजमान्य होती. त्यात ना सत्यवतीला चूक वाटले ना भिष्मांना.
एक आणली असती तरी चालले असते की. >>> हो हे बरोबर आहे. पण ती 'एक' अंबा असायची शक्यता ३३.३३% होतीच ना.
गादीच रिमोट कंट्रोल आपल्या हाती राहिल हे पाहिले. >>> आता विचित्रविर्य विचित्र निपजला यात भिष्मांचा काय दोष ? वडिलांना दिलेल्या वचनानुसार (ते वचन शंतनूने मागितले होते, आपल्या हाती रिमोट कंट्रोल रहावा म्हणून भिष्मांनी दिले नव्हते) त्याला राज्यकारभार करणे भाग होते. सत्यवतीने पण त्यालाच राज्यकारभार करायला लावला.
धन्यवाद बुवा, माधव आणि साधना.
धन्यवाद बुवा, माधव आणि साधना. @माधव काय नाही आवडलं हे सांगितलंत त्याबद्दल विशेष धन्यवाद. त्या निमित्ताने तुमची आणि साधना ह्यांची जी चर्चा झाली ती वाचताना मस्त वाटलं.
मला ह्या भागात अंबा/शिखंडी ह्या पात्राचा संताप पोहोचवायचा होता. अंबेच्या दुर्दशेला भीष्म जबाबदार आहे की नाही हा चर्चेचा मुद्दा आपल्या साठी आहे. पण अंबेसाठी तो चर्चेचा मुद्दा नाही तर निर्विवाद सत्य आहे. ती एक फार फार तर २० शीची राजकुमारी होती. तिचं स्वयंवर व्हायचं होतं, तिचा नियोजित वर तिने आधीच निवडला होता. भीष्म स्वयंवरात आले, तिच्या इच्छेची पत्रास न बाळगता तिचं अपहरण करुन तिला घेऊन गेले. तिथुनच पुढे तिच्या वाट्याला निव्वळ रिजेक्शन आलं. तिला शाल्व राज्यात आश्रय मिळाला नाही, स्वतः च्या वडिलांकडे आश्रय मिळाला नाही आणि करुंकडेही आश्रय मिळाला नाही. संताप रॅशनल नसतो. तिने तिच्या दुर्दैवाचे विश्लेषण केले नाही. हे सगळे भीष्मांमुळे घडले हे तिचे मत होते. म्हणुन तिने आधी परशुरामाला विनंती केली की त्याने भीष्माला धडा शिकवावा. ते शक्य झाले नाही तेव्हा स्वतः तपश्चर्या केली.
द्रौपदीचा संताप, द्रौपदीचा सुड ह्याबद्दल बरेच बोलले जाते. पण कुणीही डेडिकेटेड पाठीराखा नसताना अंबेने स्वतःवर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्याचा वा सुड घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल फारसे बोलले जात नाही. ते मला सांगावेसे वाटले.
मला नेहमी वाटते की अंबेला 'पोएटिक जस्टिस' देता यावा म्हणून शिखंडी ह्या पात्रांची योजना आहे मुळ कथेत. महाभारतातील संदर्भानुसार भीष्म स्त्री शी लढणार नव्हते. त्यामुळे समोर एखादी स्त्री च उभी करायची तर द्रौपदी ला उभे करुन अर्जुनाने बाण मारणे हे करता आले असते. शिखंडी ह्या पात्राची आवश्यकताच नव्हती. पण तरीही तिथे शिखंडी ला आणले गेले कारण अंबेचा लुप क्लोज करायचा होता.
आवडला हा भाग आणि चर्चा सुद्धा
आवडला हा भाग आणि चर्चा सुद्धा
आता विचित्रविर्य विचित्र
आता विचित्रविर्य विचित्र निपजला यात भिष्मांचा काय दोष ? वडिलांना दिलेल्या वचनानुसार (ते वचन शंतनूने मागितले होते, आपल्या हाती रिमोट कंट्रोल रहावा म्हणून भिष्मांनी दिले नव्हते) त्याला राज्यकारभार करणे भाग होते. सत्यवतीने पण त्यालाच राज्यकारभार करायला लावला>>>>
रिमोट कण्त्रोल हा शब्द प्रयोग माझा असला तरी हे विवेचन इरावतीबाईंचे. त्यांनी लिहिलेय की भीष्माने जरी
राजाचा सेवक ही भुमिका घेतली तरी कायम त्याचे वर्चस्व घराण्यावर राहिले व त्याने तसे ठेवले. सुरवातीच्या आयुष्यात कोणी समर्थ नव्हते म्हणुन आणि नंतर वय व बुद्धीमुळे.
नियोगाच्या प्रसंगी जेव्हा सत्यवती राण्यांना नियोगासाठी तयार रहा हा निरोप पाठवते तेव्हा नियोगासाठी कोण येणार हा प्रश्न राण्यांना पडतो. कुरु वंशातला एखादा तरुण, दरबारातला एखादा तरुण की स्वतः भीष्म? हा असा श्लोक मुळ महाभारतात आहे. पण भीष्म व सत्यवती विचारपुर्वक् व्यासाची योजना करतात. होणार्या मुलाचा, जो पुढे जाऊन राजा होणार, जैविक पिता तिथलाच असला तर तो सतत अवतीभवती राहणार व त्याचा वरचष्मा कुरु वंशावर राहणार ही भीती भीष्माला वाटण्याची शक्यता असावी असे बाईंनी लिहिलेय. म्हणुन राजघराण्याच्या आसपास फिरायचीही शक्यता शुन्य असा व्यास त्याने निवडला व सत्यवतीने अनुमोदन दिले. व्यासासारख्या नुकत्याच घोर तपावरुन परतलेल्या, अव्यवस्थीत ऋषीसोबत राजवाड्यात सुखासिन आयुष्य घालवलेल्या सुकुमार
राण्या कसा संग करतील हा विचार त्यांनी केला नाही आणि त्यामुळे नियोगाचे अपेक्षित फळ त्यांना मिळाले नाही. एक आंधळा, एक रोगी व एक दासीपुत्र त्यांना मिळाले.
शिखंडीनी मुलगी म्हणुन द्रुपद राजाच्या पोटी जन्माला आली. शंकराच्या वरदानामुळे तिला आदल्या जन्माची स्मृती होती. पण मुलीचा जन्म मिळाल्याने ती अस्वस्थ होती. पुढे कुठल्यातरी वनात एका यक्षसोबत ती लिंगबदल करुन घेते व पुरुष होते. नंतर लग्न वगैरे करुन एक पुत्रही होतो. शिखंडी पुरुष म्हणुन
युद्धात भाग घेतो, त्याने दर दिवशी केलेल्या पराक्रमाची वर्णनेही आहेत. तो भीष्मासमोर मात्र येत नाही, भीष्माला अजेय योद्धा हा वर असतो त्यामुळे त्याच्यासमोर जो जाईल तो मरणारच. त्यामुळे तो पांडव सेनेचे खुप नुकसान करतो पण पांडवांना मारत नाही आणि अर्जुनही त्याला मारत नाही. या तिढ्यातुन मार्ग काढायला नवव्या दिवशी कृष्णार्जुन त्याला भेटतात. तेव्हा भीष्म आडमार्गे सुचवतो की तो ज्याच्यावर शस्त्र चालवणार नाही अशी व्यक्ती समोर आली तर तो शस्त्र ठेवेल. कृष्ण पांडवांना शिखंडीच्या आडुन बाण मारा हे सुचवतो हे नैतिकदृष्ट्या पांडवांना अयोग्य वाटते. म्हणुन शिखंडी भीष्मावर आक्रमण करणार व अर्जुन त्याचे रथावर संरक्षण करणार असे ठरते. शिखंडी जरी आता पुरुष असला तरी तो स्त्री म्हणुन जन्मलेला असल्याने त्याला पाहताच हे कारण पुढे करुन भीष्म शस्त्र खाली ठेवतो व अर्जुन बाणांनी त्याला विद्ध करतो. द्रौपदीला अर्थातच इथे उभे करणे कोणालाच रुचले नसते. युद्ध संपल्यानण्तर अश्वत्थामा पांडवपुत्र व इतर यांना मारतो त्यात शिखंडीलाही तो मारतो. शिखंडी मेल्यावर तो यक्ष परत पुरुष होतो.
साधना +१ छान पोस्ट
साधना +१
छान पोस्ट
छान पोस्ट साधनाताई... काही
छान पोस्ट साधनाताई... काही गोष्टी नव्याने कळल्या.
भीष्माला ईच्छामरणाचे वरदान
भीष्माला ईच्छामरणाचे वरदान असते त्यामुळे तसेही तो इतरांच्या ईच्छेने मेला नसताच. म्हणुन अर्जुन त्याला बाणांनी विद्ध करतो. ऊत्तरायणात मृत्यु आला की स्वर्ग प्राप्ती म्हणुन भीष्म ऊत्तरायणाची वाट पाहतो आणि तेव्हा प्राण सोडतो. तो अष्टवसूंपैकी एक असल्याने त्याला स्वर्गप्राप्ती झाली असती.
https://commons.m.wikimedia.org/wiki/File:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0...(Yugant).pdf