Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 17 November, 2024 - 10:21
प्रतिबिंब
डोळ्यांनी अन् ओठांनी केलेला करार आहे
मी अश्रू अन् हास्याला मौनाने जिंकू पाहे
जगणे सोपे असताना मी हिशेब कसला करते
हे श्वास दिले देवाने मी उगा उसासे भरते
ही निर्मळ सृष्टी भवती मी डोळे भरून बघते
कामाच्या काचा मध्ये परि आनंदाला मुकते
सोडले व्यक्त मी होणे हसतेही कामा पुरते
दिसलेच दैन्य जर कोठे मी डोळे मिटून घेते
चेहरा खुशीचा खोटा मी खुशाल धारण करते
खोट्या नश्वर गोष्टींना मी माझे माझे म्हणते
खोटे जगणे मग माझे का हवे हवेसे वाटे?
अंतरी खोल मन माझे का माझे मलाच खाते?
बेगडी अश्या जगण्याचा येतो मलाच मग वीट
आश्वस्त मला मी करते की होइल सारे नीट
आरसा मनीचा जेव्हा प्रतिबिंब दावतो माझे
बिंबातुनी मला दिसते मौनाचे माझ्या ओझे
डोळ्यांनी अन् ओठांनी केलेला करार आहे
मी अश्रू अन् हास्याला मौनाने जिंकू पाहे
डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही कविता डिप्रेशन चे वर्णन
ही कविता डिप्रेशन चे वर्णन करीत आहे.
त्या कोनातून वाचून बघा आणि मला नक्की सांगा.
तुमच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.
चांगली आहे.
चांगली आहे.
जगणे सोपे असताना मी हिशेब
जगणे सोपे असताना मी हिशेब कसला करते
हे श्वास दिले देवाने मी उगा उसासे भरते. >>
कसल्या सुंदर ओळी आहेत.
बेगडी अश्या जगण्याचा येतो मलाच मग वीट
आश्वस्त मला मी करते की होइल सारे नीट>>
मला तर ही कविता डिप्रेशन वर मात केलेल्या व्यक्तीची वाटते.
Sharmila ही मात नाही..
Sharmila ही मात नाही..
इकडून तिकडे झुलणारा झुला आहे.
घटक्यात हे तर घट्क्यात ते. असे विचार आहेत.
स्वतः काही करू शकत नाही ही घुसमट आहे.
आणि स्वतःच स्वतः चे केलेले सांत्वन की वेळ जाऊ दे मग कदाचित होईल सगळे बरे, बरोबर.
पण बरोबर कोणासाठी आणि कोणाच्या दृष्टिकोनातून? हे पण बोचते मध्येच.
ही कविता शब्दबद्ध केल्याचा
ही कविता शब्दबद्ध केल्याचा तुम्हाला निखळ आनंद मिळाला का? मिळाला असेल तर तेवढेच पुरेसे आहे, इतर कोणी काय म्हणते हे तुमच्यासाठी निव्वळ निरर्थक ठरायला हवे. त्या केसमध्ये प्रतिसाद वाचून उत्तरे देत बसू नका.
तुम्हाला स्वतःला आनंद, समाधान, पूर्ततेची भावना, कशातूनतरी मोकळे मोकळे होणे, काहीतरी फार भारी लिहिल्याचा आनंद मिळणे यातील काहीही मिळत नसेल तर मग तर प्रतिसाद वाचूसुद्धा नका
(हा माझा प्रतिसाद चुकून वाचलातच तर तो नेहमी लक्षात ठेवा. लोक तुमच्या कलाकृतीला काय म्हणतात याला आजच्या सोशल मीडियाच्या युगात शून्य महत्व आहे. कलाकृती निर्माण करावी असे वाटणे, ती निर्माण होणे व त्याबाबत आपण स्वतः समाधानी आहोत की असमाधानी, हे प्रामाणिकपणे तपासणे एवढेच महत्वाचे आहे. )
बेफिकीर नक्कीच लक्षात राहील.
बेफिकीर नक्कीच लक्षात राहील. मी स्वांत सुखाय लिहिते.
ही कविता मी ४ वर्षांपूर्वी लिहिली होती आणि फार आनंद वाटला होता. अजूनही माझ्या कविता मी परत वाचल्या की मला आनंद वाटतो. तेव्हा मी कविता माझ्या स्वतःसाठी लिहिल्या होत्या. मला वाटले की मायबोली वर त्या फक्त टाकाव्यात. एव्हढेच बस, बाकी काहीही नाही.
अजून एक तुम्ही सुचवलेले बदल
अजून एक तुम्ही सुचवलेले बदल मला कायम स्वागतार्ह आहेत.
पण मायबोली हा जर विचार मांडण्याचा प्लॅटफॉर्म असेल तर माझ्याच कवितेवर मी विचार मांडू शकते, होय ना! आणि चर्चा सुद्धा करू शकते. कोणी चर्चा करू इच्छित असेल तर त्यात भाग घेऊ शकते.
मी यापुढे एका वेगळ्या विषयावर अभ्यास करून नवीन कविता लिहिण्याच्या विचारांत आहे त्यामुळे अशी चर्चा माझ्यासाठी गरजेची आहे.
बेफिकीर अजून एक
बेफिकीर अजून एक
**लोक तुमच्या कलाकृतीला काय म्हणतात याला आजच्या सोशल मीडियाच्या युगात शून्य महत्व आहे.**
अनुमोदन.. हे विधान कालातीत आहे. सोशल मीडिया येण्यापूर्वी सुद्धा हे लागू पडत होते. मराठीतील एका महान कवीने आपल्या अनेक कविता मित्रांना आवडल्या नाहीत किंवा प्रतिक्रिया दिल्या नाहीत म्हणून फाडून टाकल्या होत्या. त्यांच्या कविता त्यांच्या मृत्यू नंतर प्रकाशित झाल्या.
आपल्या मराठी भाषेचे दुर्दैव असे की त्या कवीने इतर काय म्हणतात ह्याचा विचार केला. आणि आपण सगळे मोठ्या खजिन्याला मुकलो.
असो...
छान
छान