प्रयोजन

Submitted by पर्णीका on 4 November, 2024 - 20:52

।।१।।

"प्रणाम ऋषिवर."

"आयुष्यमान भव पुत्री. मी स्नान करुन नदीवरुन परत येत होतो तेव्हा मला तु मुर्छितावस्थेत आढळलीस. माझ्या शिष्यांच्या सहाय्याने मी तुला इथे माझ्या आश्रमात घेऊन आलो. तुझ्या अंगात ज्वर होता आणि मागचे तीन दिवस तु ग्लानीत होतीस. अजूनही जर ज्वर उतरला नसेल तर आयुर्वेदाचार्यांना पाचारण करायचे असे ठरवून मी तुला बघायला आलो तो तू जागृतावस्थेत दिसलीस. आता कसे वाटते आहे तुला बाळ?"

"ऋषीवर आपण व्यर्थच माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेत. आपण मला इथे घेऊन आला नसता तर कदाचित एव्हाना मी वैतरणी ओलांडून यमलोकीची वाट शोधत असते. असो, मी जिथे मूर्छित पडले होते तिथेच मला परत पाठवण्याची व्यवस्था केलीत तर मी उपकृत होइन. "

" असे म्हणु नकोस बाळ. तु अजुन खुप लहान आहेस. आयुष्यातली तुझी कर्तव्य तुला पुर्ण करायची आहेत. खुप अनुभव घ्यायचे आहेत. "

"नाही ऋषीवर माझ्या हातुन आता कसलेही कार्य पार पडणे शक्य नाही. परमेश्वराचीच तशी योजना आहे असे प्रतीत होते."

"असे का म्हणतेस बाळ? अंगावरील वस्त्रप्रावरणे आणि भाषेवरील संस्कार सुचित करतात की तु राजघराण्यातील स्त्री आहेस. मग एवढ्या निबिड अरण्यात, एकटी तेही प्रकृती स्वस्थ नसताना काय करत होतीस? आणि जग्गनियंत्यावर एवढा क्रोध का? "

"मी काशी नरेश यांची थोरली पुत्री अंबा आहे ऋषीवर. गंगा पुत्र देवव्रत यांनी, त्यांचे कनिष्ठ बंधु विचित्रविर्य ह्यांच्याशी विवाह लावुन देण्यासाठी माझे आणि माझ्या धाकट्या दोन भगिनींचे आमच्या स्वयंवरातुन हरण केले.

हस्तिनापुरी गेल्या नंतर मी धैर्य गोळा करून राजमाता सत्यवती ह्यांना सांगितले की मी मनाने शाल्व नरेश यांना वरले आहे. त्यांनी माझी मनोवस्था जाणुन मला सन्मानपूर्वक शाल्वदेशी पाठवण्याची व्यवस्था केली. परंतु भीष्मांनी केलेला पराभव जीव्हारी लागलेल्या शाल्वनरेशांनी माझा स्वीकार करण्यास नकार दिला.

माझ्या सोबत आलेले कुरु दरबारातील अमात्य मला परत हस्तिनापुरात घेऊन आले. मी राजमाता सत्यवतींना साकडे घातले की ज्या भीष्मां मुळे मला शाल्वनरेशांनी अव्हेरले त्यांनीच आता माझे पाणिग्रहण करुन माझा सन्मान जपावा. पण त्यांनी आपल्या प्रतिज्ञेचे कारण पुढे करून माझ्याशी विवाह करण्यास नकार दिला.

माझा काहीही अपराध नसताना माझ्या पदरी एकामागून एक अधिक्षेप घालणाऱ्या त्या उन्मत्त आणि हृदय शुन्य पुरुषाला धडा शिकविण्याची विनंती मी त्यांचे गुरू ऋषी श्रेष्ठ परशुराम ह्यांना केली. पण त्यांना देखील त्यांच्या ह्या प्रयत्नात यश आले नाही.

त्या क्षणापासून मी माझ्या मृत्युची कामना करते आहे ऋषीवर. माझ्या ह्या अभागी अस्तित्वासकट ह्या भुतलावर रहाण्याची माझी इच्छा नाही. एखाद्या हिंस्त्र श्वापदाचे माझ्या मुळे उदरभरण व्हावे ह्या इच्छेने मी ह्या निबिड अरण्यात इतस्ततः भटकत होते. पण माझी ही इच्छा देखील अपुर्णच राहिली."

" तु स्वतःच्या मृत्युची कामना करणे योग्य नाही बाळ. जसा तुझ्या जन्मावर तुझा अधिकार नव्हता तसाच तुझ्या मृत्यूवरही तुझा अधिकार नाही. राजमहालात जन्म घेऊन सगळ्या ऐहिक सुखांची अनुभूती तुला जग्गनियंत्याच्या इच्छेने मिळाली आणि आता जे काही घडले ते ही त्याच्याच इच्छेने. "

"मला वाटायचे ऋषिवर की मनुष्याची कर्मे त्याचे प्रारब्ध घडवतात. इतके भयंकर दुर्दैव माझ्या वाट्याला यावे असे कुठले कर्म मी केले हा प्रश्न मला पडला होता. तुम्ही सांगता आहात की हे सगळे परमेश्वराच्या इच्छेनुसार घडले. मग त्या उन्मत्त कुरुवंशी भीष्माला ह्या अपराधाची शिक्षा त्याने का दिली नाही? हे मला आता त्यालाच विचारले पाहिजे ना ऋषिवर?"

"अवश्य बाळ. तुला तुझे प्रश्न त्यालाच विचारावे लागतील. पण स्वतःचे अस्तित्व नष्ट करून त्यासंबंधी प्रश्न विचारणे शक्य होईल असे वाटते तुला? तु इहलोक सोडून निघून गेलीस तर ह्या स्मृती बरोबर घेऊन जाऊ शकशील ह्याबद्दल तुला खात्री आहे? मला नाही खात्रीने सांगता येणार ह्याबद्दल ".

माझी ही इच्छा देखील अपुर्णच रहाणार असे प्रतीत होते.माझ्या दुर्दैवाला काही अंतच नाही का ऋषीवर?"

"असे म्हणालो का मी बाळ? तु योग्य दिशेने प्रयत्न केलेस तर तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. तुला जग्गनियंत्यापर्यंत पोहाचायचे आहे ना? त्याच्याकडे जाण्यासाठी वैतरणी ओलांडायची गरज नाही. खरेतर वैतरणीच्या पैलतीरावर नाहीच वसत तो. त्याचा वास तर तुझ्या अंतर्मनाच्या गर्भगृहात आहे. त्याच्यापर्यंत पोहोचायचे असेल तर तुझे लक्ष स्वतःच्या आत केंद्रीत कर."

"तुम्ही मला तपश्चर्या करण्यास सांगता आहात का ऋषीवर?"

होय बाळ आपण सगळे ज्याला तपश्चर्या म्हणतो तो अंतर्मनाच्या अरण्यात घेतलेला त्याचा शोध आहे. ह्या शोधात प्रत्येकाने स्वतःची वाट स्वतः शोधायची. कुणीही कुणाला ह्यासाठी मदत करु शकत नाही, मी ही तुला मदत करु शकणार नाही. खरंतर मी स्वतः त्या वाटेवर किती अंतर कापले आहे, हे देखील मला अजुन कळले नाही. पण मी सुरुवात केली आहे हे निश्चित. त्यामुळे सुरूवात कशी करायची हे मी तुला शिकवु शकतो. त्याची इच्छा असेल तर तुला तुझा मार्ग लवकर सापडेल."

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults