सुंदरा

Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 5 November, 2024 - 09:49

सुंदरा
(मदनतलवार वृत्त)

चालली पुढे सुंदरा धावली त्वरा चढत दादरा उतरली खाली
पोशाख नेटका छान निमुळती मान सावळा वर्ण समोरी आली
रेशमी केस भरदार नजर तलवार काजळी धार कोरली भुवई
खांद्यास ओढणी रुळे त्यावरी फुले जांभळी दले चमकती बाई

सरसावत झुकली पुढे फलाटाकडे बघत आकडे निळ्या रंगाचे
सुंदरा घेतसे वेध दूर वर रेघ नाद आवेग आगगाडीचे
चवड्यास देउनी भार झुकतसे नार तेज तर्रार वेग गाडीचा
किंचित सरकली आत तरी जोमात भेदती हात ओघ गर्दीचा

अंगात जागला जोष पुरा आवेश झेपली खास कास खांबाची
लांघुनी सर्व कल्लोळ साधली वेळ भासली वेल सौदामिनीची
सुटलेत जरासे केस चुरगळे वेष तरी उन्मेष संपला नाही
पटकावून भरकन सीट बैसली नीट सांगती ओठ यशाची ग्वाही

-डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे, आवडली.

सरसावत झुकली पुढे >> इथे वृत्तात थोडी गडबड वाटली.

मस्त

सगळ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल आभार.

@ हरचंद पालव. मला तर काही हलल्या सारखे वाटत नाहीये.
मात्रा लय पण बरोबर बसलीय.

अच्छा. हो, मात्रा जुळत आहेत. मला मघाशी चालीत बसवता येईना, पण तिसऱ्या मात्रेवर सम घ्यायची हे डोक्यात ठेवल्यावर प्रश्न सुटला. क्षमस्व, चूक माझी आहे.