रवा नारळ लाडू

Submitted by मनीमोहोर on 27 October, 2024 - 03:44
Rava ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रवा नारळ लाडू...

दिवाळीत बेसनाच्या लाडवांचा मान वरचा आहे. सर्वांना ते लाडू जास्त आवडतात. पण मला पर्सनली बे ला तुपकट वाटतात . रवा लाडू जास्त आवडतात.

साहित्य
अर्धा किलो बारीक रवा ( चार वाट्या )
दोनशे ग्रॅम तूप ( एक वाटी )
दोन वाट्या नारळाचा चव
तीन वाट्या साखर
दीड वाटी पाणी
वेलची , बेदाणे, पिस्ते

क्रमवार पाककृती: 

रेसिपी

जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून ते थोडं गरम झालं की रवा घालून मंद गॅस वर पंधरा एक मिनिट भाजला. नंतर त्यात नारळाचा चव घालून पुन्हा दहा एक मिनिट बारीक गॅसवर भाजत राहिले.

नंतर साखरेत दीड वाटी पाणी घालून पाक करायला ठेवला. साखर विरघळल्या वर पाच एक मिनटानी पाक चेक करायला लागले . पाक ताटलीत घेऊन ती ताटली उभी केली की पाक खाली ओघळला नाही की झाला (आम्ही त्याला मधा इतपत म्हणतो ) ही माझी खूण. पण तार बघितली तर एक चांगली येते.

पाक झाल्यावर त्यात भाजलेला रवा नारळ घातला, वेलची पूड घातली, ढवळल आणि त्यावर झाकण ठेवलं घट्ट. हे मी पहिल्यांदा च केलं आणि बेस्ट result मिळालाय. मिश्रण गार व्हायला झाकण ठेवल्यामुळे वेळ लागला आणि त्यामुळे रवा पाकात चांगला मुरला. अगदी बारा तासांनी लाडू वळले तरी ही मिश्रण छान moist होत. लाडू ही मऊ आणि तरी ही खुसखुशीत झालेत. लहान मुलं खाणार आहेत म्हणून फोटोत कळत नसलं तरी आकाराने मुद्दामच लहान केले आहेत.

वाढणी/प्रमाण: 
काय सांगू ?
अधिक टिपा: 

रवा बारीक च घ्यावा.
नारळ घातल्याने लाडू मऊ आणि moist व्हायला मदत होते त्यामुळे खोवायचा कंटाळा म्हणून स्किप करू नये.
झाकण नक्की ठेवा दीड एक तास तरी त्याने पाक पटकन सुखत नाही आणि रवा फुलायला मदत होते.
बेदाण्या पेक्षा पिस्ता लावा पांढऱ्या वर हिरवा उठून दिसतो. बेदाणे पाकात घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा वा! परफेक्ट कृती आहे मनीमोहोर! हल्ली मला हे आणि रवा-बेसन लाडू जमतात. झाकण ठेवून मात्र कधी केले नाहीत. आता करते.

वाह.. नुकतेच पोटभर जेवून आलो आणि तरीही स्वीट डिश म्हणून चार पाच लाडू उचलून खावेसे वाटले इतका मस्त फोटो आलाय.. पाकृ मधील फार काही कळत नाही. पण मला आमच्या घरचे रव्याचे लाडू फार आवडतात. रवा आणि बेसन दोन्ही आवडतात पण दोन्ही एकत्र समोर आले की पहिला रव्याचाच उचलतो Happy

अशीच आधीच ईथे हि रेसिपी दिली आहे, तंतोतंत तेच प्रमाण, - https://www.maayboli.com/node/11362?page=5
मागच्या वर्षी तुम्ही तिथे प्रतिसाद देऊन वरील फोटो पण दिलेला दिसत आहे.
मग हे नवीन पाककृती म्हणून द्यायचे काय प्रयोजन?

Sakali phatake Wink

आयटीजी_अनामिका मानलं हो तुम्हाला , कमाल आहे. धन्यवाद.. माबो चा सखोल अभ्यास ह्याला म्हणतात. ( दिवे घ्या. )
माझ्या नव्हत लक्षात मीच लिहिलेलं. हे लक्षात असत तर नसता काढला धागा. किंवा काढायचाच असता तर गेल्या वर्षीच काढला असता..असो. कोणी लाडू केले तर ही झाकण ठेवायची आयडिया उपयोगी पडेल आणि चांगले होतील लाडू म्हणून धागा काढला.

ममोतै, मस्त दिसताहेत लाडू...रेसिपी पण मस्त...
फराळ रेसिपीचे फ्रेश धागे नाही आले तर दिवाळी माहौल कसा जमणार माबोवर...

काही पदार्थ वर्षातून एकदाच होतात... त्यामुळे बारीक सारीक टिप्स विसरायला झाल्या असतात.
त्यामुळे परत ताजा धागा आला तरी चालतो ममो.

ममो, तुमची ताटलीत पाक घेउन बघायची टीप आज वापरली.
पण त्या भानगडीत बहुतेक माझा पाक जरा पुढे गेला असावा. रवा नारळ मिश्रण घातल्यावर झाकुन ठेवलं होतं. पण १/२ तासाने बघितलं तर एकदम कोरडे झाले होते मिश्रण. मग हाताने मोकळं करुन जरा कोमट दुधाचा हात लावुन लाडु नीट झाले. पिस्ता वापरायची आयडीया मस्त. मी केसर पण वापरलं पाक करताना त्यामुळे केसर पिस्ता लाडु झालेत Happy
पाकाची परीक्षा करताना पाकाचं भांडं गॅस वरुन बाजुला करायला हवं असं वाटतंय कारण पाकाच्या स्टेजेस भराभर बदलतात.
अशा रेसिप्या आल्या की दिवाळीचा फील येतो.

@ स्मिता श्रीपाद, पाकाची परीक्षा करताना पाकाचं भांडं गॅस वरुन बाजुला करायला हवं या टीपसह तुम्ही रवानारळाच्या लाडवांची कृती देणारा वेगळा धागा काढा.

मायबोली वर किंवा अन्यत्र आधीच प्रकाशीत झालेले कोण्या दुसर्‍या आयडीचे लेखन/ कविता/पाककृती/ कोणताही साहित्य प्रकार स्वतःचे म्हणून देणे ही साहित्यचोरी झाली.
तुमच्या हातून ते अजाणतेपणे चुकून झाले अशी शंका आधी होती, म्हणून विचारले होते.
पण हे कळून उमजूनही जर तुम्हाला त्यात काहीच वावगे वाटले नसेल तर सखेद आश्यर्य वाटते.
अ‍ॅडमिनना विनंती ही उचललेली पाककृती अप्रकाशित करावी व हा चुकीचा पायंडा पडू देऊ नये.

तुम्ही स्वतः लिहिलेली पाककृती ईथे प्रकाशित करा आणि दिवाळी माहोल जमवा, मला पण ते आवडेल.

रवा-नारळ, रवा-बेसन, बेसन लाडू किंवा तत्सम पारंपरिक पाककृतींमधलं प्रमाण आणि करण्याची पद्धत, हे दोन्ही बऱ्यापैकी ठरलेलं असतं. घराघरांत थोडाफार इकडेतिकडे फरक पडतो इतकंच. दिनेशदांची पाककृती आणि मनीमोहोर यांची पाककृती यांत साम्य असणं यात काहीच वावगं नाही. तेवढ्यावरून ती 'उचललेली' ठरत नाही. दिनेशदांनी दिलेल्या आणि मनीमोहोर यांनी दिलेल्या टिप्स वेगवेगळ्या आहेत. बरं, फोटोही त्यांनी स्वतःचाच (स्वतः केलेल्या लाडवांचा Wink ) वापरलाय.

मनीमोहरताई, लाडू फार छान दिसत आहेत आणि पाककृती पण छान डिटेल दिली आहेत. मला एक वेगळी शंका आहे मी काल रवा बेसनचे लाडू केले. माझा पाक थोडा जास्त घट्ट झाला असावा कारण लाडू फारच कोरडे पडले आहेत, यावर काही करता येईल का? दुधाचा हबका देऊन लाडू वळावे ही टीप माहीत आहे पण तसे केल्यास लाडू जास्त टिकणार नाहीत ना? दोन-तीन घरी द्यायचे आहेत आणि विकेंड शिवाय देणे होणार नाही म्हणून विचारले. धन्यवाद, तुमच्या रेसिपी फार आवडतात.

मनीमोहरताई
रवा खवलेला नारळ आणि साखर वापरून रव्याचे लाडू कोणीही बनवेल..
तुम्ही किनई बेसन आणि गूळ वापरून "रवा नारळ लाडू " बनवण्याची कृति दिली असती तर मग ती ओरिजिनल ठरली असती.
तुम्ही इथे लाडू बनवण्याची कृति दिलेली नाही तर लोकांना बनवण्याची कृति दिली आहे असे मी नम्रपणे सुचवू इच्छितो. Wink

रवा न वापरता रव्याचे लाडू हवं होतं.
हल्ली नाही का no ब्रेड सँडविच बनवतात, बिना ब्रेड चा बर्गर pizza बनवतात.
Gluten free वगैरे कायकाय असतं तसं रवा free रव्याचे लाडू बनवा Light 1
Wink

वावे+ १००.
एखाद्या पदार्थाची कृती मायबोलीवर आधीच असली आणि आपल्या कृतीत त्यापेक्षा किंचित फरक असला, म्हणजे पाक तपासायची पद्धत, झाकण ठेवावं की ठेवू नये,वेलची ऐवजी पिस्ता,इ. आणि एंड रिझल्ट सेम असला तरी वेगळा धागा काढणं उत्तम.
मनी मोहोर यांचा आकाशकंदिलाचा एक धागा आहे. त्यावर माझ्यासकट अनेकांनी आपल्या आकाशकंदिलांचे फोटो आणि कृती देऊन चूक केली आहे. प्रत्येकाने वेगळा धागा उघडायला हवा होता. कंदिलाचं डिझाइन सेम पण कागदाचा रंग किंवा कंदिलांची साइझ वेगळी, चिकटवण्याऐवजी स्टेपल्ड मगरीला, काढा वेगळा धागा. डॉक्युमेऔटेशन नीट होतं आणि सगळीकडे कंदिलच कंदिल बघून दिवाळीची वातावरणनिर्मितीही होते.

पण हे कळून उमजूनही जर तुम्हाला त्यात काहीच वावगे वाटले नसेल तर सखेद आश्यर्य वाटते.>>> बरोबर आहे. ताईना नीट "वाटता" पण येत नाही.

आणि फोटोतले लाडू हे दहा महिन्यापूर्वी बनवलेले आहेत, पण जणू कालच बनवले आहेत असे वाटताहेत ना!

कुचकट प्रतिसाद देणार्यांना कोणतेही धागे वर्ज नाहीत.
एकाच पदार्थाचे दोन धागे आले म्हणून पण आजकाल लोकांच्या भावना दुखावतात आणि चांगल्या धाग्याची वाट लागायला सुरुवात होते.
राहिला विषय साहित्यचोरीचा तर ही रवा लाडूंची पारंपारीक कृती आहे त्यामुळे प्रमाण तेच असणार.
ममोंचं मायबोलीवरचं विपुल लेखन बघितलं तर त्यांना अशा चोर्‍या मार्‍या करायची काही गरज असायचे कारण नाही.
त्यामुळे ही रेसिपी बघुन ज्यांच्या ज्यांचा भावना दुखावल्या किंवा पोटात दुखलं त्या सगळ्यांना Get Well Soon
आणि बाकीच्यांना Happy Diwali Happy

@ स्मिता श्रीपाद, पाकाची परीक्षा करताना पाकाचं भांडं गॅस वरुन बाजुला करायला हवं या टीपसह तुम्ही रवानारळाच्या लाडवांची कृती देणारा वेगळा धागा काढा. >> सल्ल्यासाठी धन्यवाद.
बाकी इथे इतके प्रतिसाद पाडण्यापेक्षा तुमचा राहुन गेलेला आकाशकंदीलाचा धागा का नाही काढत ? माबो प्रशासन नाही ओरडणार तुम्हाला नवीन धागा काढला म्हणून Wink

ज्ञानेश्वर माऊलीन्वरही अशीच टीका झाली होती. त्यांनी जेव्हा श्रीमद् भगवद् गीतेवर नवीन "धागा" काढला तेव्हा माउलीनी दिलेले उत्तर जगप्रसिद्ध आहे.

सुंदर दिसत आहेत लाडू. मी यावर्षी बेसन लाडूच केलेत. पण हि रेसिपी बघून रवा लाडू पण करायची इच्छा झाली

Pages

Back to top