रवा नारळ लाडू

Submitted by मनीमोहोर on 27 October, 2024 - 03:44
Rava ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रवा नारळ लाडू...

दिवाळीत बेसनाच्या लाडवांचा मान वरचा आहे. सर्वांना ते लाडू जास्त आवडतात. पण मला पर्सनली बे ला तुपकट वाटतात . रवा लाडू जास्त आवडतात.

साहित्य
अर्धा किलो बारीक रवा ( चार वाट्या )
दोनशे ग्रॅम तूप ( एक वाटी )
दोन वाट्या नारळाचा चव
तीन वाट्या साखर
दीड वाटी पाणी
वेलची , बेदाणे, पिस्ते

क्रमवार पाककृती: 

रेसिपी

जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून ते थोडं गरम झालं की रवा घालून मंद गॅस वर पंधरा एक मिनिट भाजला. नंतर त्यात नारळाचा चव घालून पुन्हा दहा एक मिनिट बारीक गॅसवर भाजत राहिले.

नंतर साखरेत दीड वाटी पाणी घालून पाक करायला ठेवला. साखर विरघळल्या वर पाच एक मिनटानी पाक चेक करायला लागले . पाक ताटलीत घेऊन ती ताटली उभी केली की पाक खाली ओघळला नाही की झाला (आम्ही त्याला मधा इतपत म्हणतो ) ही माझी खूण. पण तार बघितली तर एक चांगली येते.

पाक झाल्यावर त्यात भाजलेला रवा नारळ घातला, वेलची पूड घातली, ढवळल आणि त्यावर झाकण ठेवलं घट्ट. हे मी पहिल्यांदा च केलं आणि बेस्ट result मिळालाय. मिश्रण गार व्हायला झाकण ठेवल्यामुळे वेळ लागला आणि त्यामुळे रवा पाकात चांगला मुरला. अगदी बारा तासांनी लाडू वळले तरी ही मिश्रण छान moist होत. लाडू ही मऊ आणि तरी ही खुसखुशीत झालेत. लहान मुलं खाणार आहेत म्हणून फोटोत कळत नसलं तरी आकाराने मुद्दामच लहान केले आहेत.

वाढणी/प्रमाण: 
काय सांगू ?
अधिक टिपा: 

रवा बारीक च घ्यावा.
नारळ घातल्याने लाडू मऊ आणि moist व्हायला मदत होते त्यामुळे खोवायचा कंटाळा म्हणून स्किप करू नये.
झाकण नक्की ठेवा दीड एक तास तरी त्याने पाक पटकन सुखत नाही आणि रवा फुलायला मदत होते.
बेदाण्या पेक्षा पिस्ता लावा पांढऱ्या वर हिरवा उठून दिसतो. बेदाणे पाकात घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो सेम याच प्रकाराने लाडू केले. काल संध्याकाळी पाकात ढकलले नी जेवणानंतर लाडू करायच्या ऐवजी नाईट मॅनेजर बिंज वॉच केले. सकाळी आरामात उठून लाडू केलेत तरी सुरेख वळलेत.IMG_7763.jpeg

फोटोतले लाडू जहबरी दिसतायत. हे बघून मलाही रवा लाडू करायची सुरसुरी आल्यासारखी वाटतेय. टिकली तर करेन.

बाकी ममो, शेंगदाणे निवडताना खवट शेंगदाणे कचर्‍यात टाकून द्यावे ही टिप तुला माहित आहेच. Wink

IMG_20241116_080112.jpg

झाकण ठेवायची टीप केल्यामुळे छान मॉईस्ट झाले होते.
माझी आई करंजीच्या राहिलेल्या सारणाचे लाडू करायची सुक्या खोबर्याचे तेही फार आवडतात पण हे ओल्या नारळाचे पहिल्यांदाच केलेत चवीला फार छान झालेत.

मी पण हे लाडू केलेत पण पाकाचा धाक Wink असल्याने बिना पाकाचे केलेत. मस्त मऊ झालेत (वेगळ्या धाग्या वर रेस्पी टाकावी का? Wink
. ममो तुमचे लाडू इतके एकसंघ गोल कसे? Happy

सर्वांचेच लाडू दिसायला सुरेख असल्याने मोह होतोय.
कमी गोडाचे किंवा मधूमेहींसाठी चालणेबल लाडू बनवता का कुणी ?

Pages