तुमचा आवडता सुपरहिरो कोण?

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 October, 2024 - 14:30

माझा अर्थातच,
जीवन !

पण हा नाही,

IMG_20241016_233718.jpg

तर हा Happy

IMG_20241016_232450.jpg

लेकीचा एकेकाळीचा हा... (सध्याचा माहीत नाही)

IMG_20241016_233903.jpg

आणि लेकाचा अनंतकाळचा मीच, जो त्याला त्याच्या आईपासून वाचवतो Happy
(घाबरू नका, माझा फोटो नाही टाकत)

पण आता तुमचा येऊ द्या..
कथा कादंबऱ्या चित्रपटातील,
आवडता सुपर हिरो Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा सर्वात आवडता सुपरहिरो (लहानपणीचा अर्थातच हनुमान, पण हनुमान हे दैवत असल्याने इथे नको).

खूप लहान असताना एका साऊथ इंडीयन डॉक्टरकडे इलस्ट्रेटेड वीकली आणि एक हिंदी मासिक यायचे. दोन्हीमधे कार्टून असायचे. त्या मासिकात कार्टून कोना नावाचे सदर असायचे. त्यातल्या कोनाचा अर्थ कोपरा आहे हे माहिती नव्हते. कार्टून कोना म्हणजे कार्टून शो या अर्थाने आम्ही खूप वर्षे वापरायचो.

या सदरातच जादूगार मँड्रेकची ओळख झाली. मँड्रेकला खूपशा पावर होत्या. पण आवडला तो फँटम. हिंदीत त्याचे नामकरण वेताळ केले होते. चलता फिरता प्रेत म्हणायचे. त्यात फक्त तीन चित्रं असायची. पुढची कथा डॉक्टरकडे गेल्यावरच समजायची. पण त्या तीन तीन चित्रातून एव्हढे समजले कि हा फँटम अन्यायाविरूद्ध लढायचा. त्याला गुन्हेगारांविषयी भलतीच चीड होती. तो आफ्रिकेतला एका बेटावर रहायचा. त्याचे घर म्हणजे कवटीच्या आकाराची एक डोंगरातली गुन्हा होती. त्याला कुठलीही पावर नव्हती. धाडस हीच त्याची पावर. त्याच्या हातात एक अंगठी असायची. तिचा ठोसा मारला कि चित्रात ढिश्युम असं मोठ्या अक्षरात लिहीलेलं असायचं. त्या अंगठीचा ठोसा लागला कि चेहर्‍यावर कवटीचं चित्रं उमटायचं.

त्या काळी समुद्री चाचे खूप असत. या चाच्यांचा कर्दनकाळ फँटम होता. त्याचा एक कुत्राही होता. एक घोडा होता.
फँटमचा मुलगा फँटम होत असे. वृद्ध फँटम मरण पावला कि त्याचा अंत्यविधी जगाला समजत नसे. त्यामुळे सगळीकडे समज होता कि फँटम शेकडो वर्षांपासून आहे. गुन्हेगारात अशी दहशत होती कि फँटम हा कुणी जिवंत मनुष्य नसून ते चलते फिरते प्रेत आहे. त्या वेळी २२ वा फँटम चालू होता.

दहावीला औरंगाबादला मामेभावाकडे गेलो असताना त्याच्याकडे एक कपाट भरून कॉमिक्स मिळाले. तोपर्यंत कॉमिक्स विकत घेतात हेच ठाऊक नव्हते. त्यात फँटमच्या गोष्टी सापडल्या. त्या अधाशासारख्या वाचून काढल्या. यातच पहिला फँटम जखमी अवस्थेत किनार्‍याला लागलेला होता. त्याच्यावर या बुटक्या आफ्रिकन जमातीने उपचार केले कारण त्यांच्या पुराणात लिहीलेले होते कि पाण्यातून वाहत जो कुणी येईल तो यांचा उद्धारकर्ता असेल. फँटमला त्यांनी बरे केले. तो साधारण माणूस होता. पण यांचा अंधविश्वास त्याला तोडावासा वाटला नाही. त्याने मग धाडस करून जा जमातीला ज्यांनी गुलाम केले होते त्या दैत्यासम जमातीशी युद्ध करून यांना स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा रितीने त्यांच्या पुराणातली कथा खरी झाल्याने त्या जमातीने फँटमला आपला देव मानले.

फँटमने मग त्याचा नकाबपोश पोशाख शिवून घेतला आणि नंतर फँटम ही एक दंतकथा बनत गेली.
सध्या युट्यूबच्या कृपेने जुने फँटम बघतोय. दुसर्‍या फँटमचा मुलगा नट बनायला इंग्लंडला गेला. तिथे त्याला शेक्सपीअर भेटला. त्याला फँटम बनायचे नव्हते. इकडे दुसरा फँटम काळजीत पडला कारण मरताना पहिल्या फँटमला त्याने मुलाला पुढचा फँटम बनवीन असे वचन दिलेले होते.

फँटम हा खर्‍या अर्थाने पहिला सुपरहिरो. ग्रीन हॉर्नेट हा कदाचित पहिला असू शकेल. पण तो टिव्ही शो मधे होता, दीर्घकाळ कॉमिक्स मधे चाललेला फँटम हाच सुपरहिरो. ली फॉकने फँटमला १७ फेब्रुवारी १९३६ ला जन्म दिला. तेव्हां एका वर्तमानपत्रातून त्या स्ट्रीप्स येत असत. फँटम अल्पावधीत लोकप्रिय झाला. मग त्याचे कॉमिक्स बुक्स येऊ लागले. किंग कॉमिक्स हे त्याचे सुरूवातीचे पब्लीशर्स.
किंग कॉमिक्सनेच ली ला मँड्रेक बनवायला सांगितले. मँड्रेकच्या यशानंतर मग फँटम आला. फँटम हा पहिला नकाबपोश सुपरहिरो असावा. पुढे त्याच्यावर एक टिव्ही मालिका बनली. एक चित्रपट सुद्धा आला.

१९८८ ला डी सी कॉमिक्सने फँटमचे हक्क घेतले आणि डी सी टॉपला गेले. मेंड्रेक आणि फँटमच्या जोडीने डी सी कॉमिक्सने कॉमिक्सच्या दुनियेत राज्य केले. त्यांचे अन्य सुपरहिरोज
सुपरमॅन , बॅटमॅन, वंडरवूमन, ग्रीन लॅन्टर्न, सायबोर्ग.

१९९९ ला लीचा मृत्यू झाला तोपर्यंत ली ने फँटमच्या कथा लिहील्या, चित्रे काढली.
बॅटमॅन वर अनेक सिनेमे आले. फँटमवर नंतर सिनेमे आले नाहीत. आताही त्याचे कॉमिक्स बुक निघते, पण खप किती आहे कपना नाही.

कदाचित समुद्री चाचे हे खूपच जुनाट व्हिलन्स झालेत. शिवाय फँटम हा मॉडर्न जगापासून दूर राहतो. जंगलात राहतो. हे आताच्या पिढीला अपील होणार नाही असे त्यांना वाटत असेल. २२ वा फँटम रेग्युलर अमेरिकेला येऊन जाऊन असतो. त्याला आता जेम्स बॉण्ड सारखे मिशन पण देता येतील. त्याच्यावर बॅटमॅन प्रमाणे चित्रपट निघावा.

सुपरमॅनमुळे कदाचित तो मागे पडला. स्पायडरमॅन ने सुपरमॅन ला मागे टाकल्यावर बॅटमॅन ला डीसी कॉमिक्सने चित्रपटात आणले. ८८ पासून डीसी आणि मार्वल ही झुंज चालू आहे. ती अनुभवता आली.

अव्हेंजर्स मधे ती गंमत नाही. अगदी पूर्वीचे पुणे राहिले नाही च्या चालीत वाचले तरी चालेल.

पहिला वेताळ
https://www.youtube.com/watch?v=uQonJY9R-SE

दुसरा वेताळ
https://www.youtube.com/watch?v=h-3QqW8S440

हा चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=rGpCCQ8DB28&list=PL8OrnY7qC-c9U59kGLeTmI...

अजून एक सुपरहिरो.
https://www.maayboli.com/user/80263
याला धागा न काढताही आपला विषय मायबोलीवर मांडता येतो. हा ही फँटमप्रमाणेच इंटेलिजन्ट आहे.

तिसरा बाजूच्या कॉलम मधे दिसू लागेल. आवडला तर पहा. नाहीतर मिथुनचा कुठलाही बघा.

अव्हेंजर्स मधे ती गंमत नाही.
+७८६

मला जायंट रोबोट हे प्रकरण फार आवडायचे. खूप लहान असल्याने आठवत नाही फारसे. पण दर भागात एक नवीन पिक्चर बघावा तसे एक नवीन संकट असायचे. त्यांनतर एका पोराने मिस्टर इंडिया सारखे हातात घातलेल्या घड्याळाचे बटन दाबून कम ऑन जायंट रोबोट म्हणताच एक जायंट रोबोट रॉकेट सारखा सुटायचा आणि घटनास्थळी उडत येऊन आपल्या एकेक पॉवर दाखवून लोकांना वाचवायचा.
एकदा एक रोबोट वितळून मरताना दाखवला होता. तेव्हा फार रडायला आले होते.

आचार्य तुम्ही एकदम वेताळाला आणून नॉस्टॅल्जिया जागवला. टाइम्स ग्रुपचे इंद्राजाल कॉमिक्स आमच्या लहानपणी किंवा त्याच्याही आधीपासून यायचे. त्यात वेताळ आणि मँड्रेक ची ओळख झाली. त्याच बरोबरीने त्यांनी दारा, बहादूर, आणि बेला हे देशी सुपरहिरो आणले होते.

मग वेताळ डायमंड कॉमिक्स कडे गेला. त्यांनी बरीच कॉमिक्स छापली. त्यावेळेस चाचा चौधरी आणि साबु हे आवडते हिरो होते. राज कॉमिक्स चे नागराज आणि सुपर कमांडो ध्रुव अजून ही आवडतात. नागराज जरी सुपरमॅन चा देशी अवतार असला तरी त्यांनी त्याला आपल्या इच्छाधारी नागांच्या परंपरेत बसवून मजा आणली होती. त्यांचे वेगवेगळे व्हीलान पण भारी होते. सुपर कमांडो ध्रुव थोडाफार बॅटमॅन वर आधारीत होता. सुपर पॉवर नाही पण बरेच गॅजेट्स आणि करामती करणारा होता तो.

मला जायंट रोबोट हे प्रकरण फार आवडायचे>>> +१११११ काय आठवण काढलीस.. मला ते टॉकींग घड्याळ पण मिळाले होते कम ऑन जायंट रोबोट म्हणणारे. तो एंड ला मरतो तेंव्हा काय रडले होते बापरे.
हिमॅन & तो मसल्स वाला सापळा Lol पण आवडायचे पण फेव्हरेट नव्हते.
१ मिलिंद सोमणची सिरियल पण होती.. कॅप्टन व्योम मस्त होती.
१ चाचा चौधरी बाल मासीक होते, त्यातला साबू हा सुपरहीरो पण जाम च आवडतो. जब साबू को गुस्सा आता है तो कही ज्वालामुखी फटता है Lol Wink

जया अंगी सुपर पॉवर तो सुपरहिरो या निकषावर चमत्कार मधील फारूख शेखला सुपरहिरो म्हटले तर तो देखील फार आवडीचा. रोज बघायचो ते.

हे मी चमत्कार मालिकेबद्दल बोलतोय. शाहरूख नासीरचा चमत्कार पिक्चर वेगळा. त्यात सुपरहिरो नाही भूतप्रेत होते. त्यासाठी तुमच्या आवडीचा भूत कोणता हा धागा काढावा लागेल.

जिव्हाळ्याचा विषय.

मायबोलीवर अज्ञातवासी आधी IRONMAN होता... जाम आवडायचा मला.
Tech savy, flamboyant lifestyle, बेदरकारपणा आणि arrogance देखील जाम भावायचा. पहिला IRONMAN आला तेव्हा मी शाळेत होतो. आवड लागली होती त्या वयातच. भरपूर कॉमिक्स वाचून काढले.
जसजसा मोठा होत गेलो, आयुष्यात नवनवीन गोष्टी येत गेल्या, तसतसा बॅटमॅन आवडायला लागला. एकटा काम करणारा, कायम सिरियस असणारा, दुहेरी आयुष्य जगणारा, अतिशय मजबूत इथिक्स असणारा... सगळ्यात जास्त रीलेट झालं ते त्याचं दुःख, सगळं असून काहीही नसल्याची भावना, गमावलेलं लहानपण... काहीही सुपरपॉवर नसून देखील प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर केलेली अचाट कामे. त्याच्या स्टोरीज मध्ये एक डेप्थ असायची. कित्येक कॉमिक्स वाचलेत, काय काय वाचलेत याची गणना नाही... कधीकधी नकळत इमोशनल होऊन अश्रू देखील आलेत, तर कधीकधी प्राऊड फिल होऊन हुर्रे देखील. अजून देखील असं होतं...
...आणि त्याचा व्हीलन... जोकर...
द डार्क नाईट हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात आवडत्या चित्रपटयांपैकी एक.... कुठल्याही प्रकारे ट्रॅडिशनल सुपरहिरो नसून देखील त्यातली फिलॉसॉफी आणि डेप्थ बरच काही शिकवून जाणारी...
माझ्या कथा अंमली आणि अज्ञातवासी देखील काही अंशी ह्याच फिलॉसॉफी फॉलो करणार होत्या... मोक्ष बॅटमॅन झाला असता, आणि मनिष/मानस जोकर... पण काही कथा अपूर्णच राहतील असं दिसतंय.
असो. छान धागा. जमलंच तर पुन्हा चक्कर टाकेन...

अज्ञातवासी छान पोस्ट

मी काही कॉमिक बुक लवर नव्हतो.
पण ते चाचा चौधरी साबू प्रकरण मलाही आवडायचे.
पण त्यात सुपरहिरो साबू नाहीतर चाचाच वाटायचे.
माणसाची बुद्धी हीच त्याची सगळ्यात मोठी सुपर पावर

ओ यास. आणि त्यात बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज धांय धाय असा येतो. एका चित्रात चाचा चौ एका गाढवाला काठीने मारत असतात तर तो आवाज ढेंच्यु ढेंच्यु असा येतो. या असल्या कारणांसाठी मला हे दोन सुपरहिरो आवडतात.

गाढवाला काठीने मारत असतात तर तो आवाज ढेंच्यु ढेंच्यु असा येतो. या असल्या कारणांसाठी मला हे दोन सुपरहिरो आवडतात.>>> हपा Rofl

धनि , बरोबर.
इंद्रजाल कॉमिक्स. त्यांनी किंवा कुणी तरी अमिताभ बच्चन नावाचे सुप्रहिरो कॅरेक्टर घेउन एक मालिका (कॉमिक बुक्स) बनवली होती.
वर स्नेहा यांनी लोथालची आठवण काढली. मँड्रेक ची जादू जास्त अपील व्हायची नाही. लोथाल वरूनच साबू घेतला असेल बहुतेक.

कॉमिक्स मधे मोटु पतलु और घसीटाराम विशेष आवडायचे. त्यातले डॉ. झटका आणि अन्य कॅरेक्टर्स सुद्धा आवडायचे. लॉरेल हार्डीचे उत्कृष्ट भारतियीकरण होते त्यात.

@ रघु आचार्य, पहिली पोस्ट तंतोतंत. फँटम फार आवडायचा. Worrier against all that’s wrong! त्याने ठोसा मारला की समोरच्याला तो अंगठीचा वळ पडणे फारच आवडायचे Happy

वातावरण निर्मिती पण फारच छान होती त्या कॉमिक्स मधे. ते जंगलातले नगारे वाजवून communication, फँटमचे ट्री हाऊस, त्यात वर जाण्यासाठी बास्केट लिफ़्ट, त्याची डायना, तो रेक्स, जुळी मुले किट - हेलोईस सगळेच ❤️

दुसरी जोनाथन कार्वर आणि एडमिरल ताको ची एक सिरिज होती. त्यात समुद्री चाचे, मोठ्या नौका वगैरे अद्भुत जग होते.

“चाचा चौधरी का दिमाग कंप्यूटर से भी तेज चलता है” हे वाक्य mandatory होते ना ?

कॉमिक्स बुक्स चे सोनेरी दिवस

धाकट्या मामाचं बिर्‍हाड विंचवाचं असल्याने त्याच्याकडे जाणं येणं व्हायचं नाही. अमरावतीला खूपदा बोलावलं होतं, पण तिथला उन्हाळा आणि हिवाळा दोन्हीमुळं आईच्या अंगाला कापरं भरायचं. मग मामाच त्याचं बिर्‍हाड घेऊन दिवाळीला किंवा उन्हाळ्याच्या सुटीत यायचा. मुलांना सोडून तो पुन्हा कामावर हजर व्हायचा. एकदा त्याची औरंगाबादला बदली झाली. मग अवेरूळ, वेरूळ , दौलताबाद बघण्यासाठी त्याने बोलावलं. त्या वेळी आम्ही पहिल्यांदा मामाकडे गेलो. धाकट्या मामेभावाने मग त्याचा खजिना दाखवला. ते हिंदी भाषिक प्रदेशात जास्त काळ असल्याने हा सगळा हिंदी भाषेतला खजिना हाती लागला.

आमच्या वयात जास्त फरक नसल्याने अजिंठा, वेरूळला जाण्यापेक्षा कॉमिक्स वाचण्यात जास्त इंटरेस्ट होता. शाळेच्या सहलीत बघितलेय ना म्हणून तक्रार करून झाली. पण वडील ऐकायलाच तयार नव्हते. मग पाच सहा दिवस त्यातच गेले. आता निघायचं होतं पण आम्ही हट्ट करून राहिलो. त्या वेळी ही कॉमिक्स बुक्स अधासासारखी वाचून काढली. उरलेली मामेभाऊ घेऊन जा म्हणाला. पण मामीने नेऊ दिले नाहीत.

मग पुन्हा नाशिकला गेल्यावर आणखी नव नवे कॉमिक्स बुक्स वाचायला मिळाले. तो पर्यंत हिंदीत इतकं काही लहान मुलांसाठी आहे हे माहितीच नव्हते.

घरी उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना वाचण्यासाठी मराठीत हे भल्या मोठ्या जाड जाड कादंबर्‍या असायच्या. मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवेत, वाचनाची गोडी लागायला पाहीजे म्हणून वडलांनी आमच्यासाठी स्वामी, मृत्युंजय, राधेय, झुंज, झेप, एका भस्मासुराचा उदय आणि अस्त, शहेनशहा अशा कादंबर्‍या आणून दिल्या. मधल्या भावाने त्याला हातही लावला नाही. मी या सगळ्या वाचून काढल्या. पुढे त्याचं व्यवहारज्ञान आणि लोकसंग्रह करण्याची क्षमता माझ्यापेक्षा शंभर पटीने जास्त राहिली. आमच्या सरांनी सांगितलं होतं कि हातात मिळेल ते पुस्तक वाचून काढा. त्यामुळे मंत्र, तंत्र आणि यंत्र हे पुस्तक सुद्धा मी पूर्ण वाचून काढले होते.

बरं जो वाचतो त्याच्याच मागे सगळे.
वडील म्हणायचे नेमके संदर्भ टिपायची सवय लाव. समोर एक कर्‍हाडचं कुटुंब रहायचं. त्यांचा तो स्थानिक टोन मजेशीर वाटायचा. ते दिसायला चित्तंरजन कोल्हटकर सारखे होते. मुलांना त्यांच्या त्या कर्‍हाडी टोन मधे झापलं कि मुलंही त्यांना त्याच टोन मधे झापायची. मग ते आम्हाला विचारायचे "तुम्ही गुरगुरता का रे तुमच्या बाबांवर ?" आम्ही नकारार्थी मान हलवायचो. मग मुलांकडे वळून म्हणायचे " बघा रे बेंबट्या, गुंड्या, ही मुलं वडलांवर गुरगुरत नाहीत" मग आम्हाला सांगायचे "आमची कार्टी सदा न कदा गुरगुरत असतात"

त्यांच्या मुलाने एकदा त्यांना धर्मयुग मासिक नेऊन त्यातलं कार्टून चं कॉमिक बुक आणायचा लकडा लावला. तर त्यांनी त्याच्या धातात धर्मयुग पाहून त्याची धूलाई केली. वडलांना नेहमी भारतभर फिरायला लागायचं, रेल्वेत वेळ जावा म्हणून ते बुक स्टॉल वर सत्यकथा, धर्मयुग असं काही न काही घ्यायचे.

त्यांनी मग मुलांना काही पुस्तकं आणून दिली. त्यात
"खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या" ही कविता होती. ती नंतर आम्हाला शाळेत पण होती.
त्यांचं दार सताड उघडं असायचं. आणि आमचंही. त्यामुळ् दोन्हीकडे काय चाललंय हे दोन्ही घरात ठाऊक असायचं. ते सायकलवर टांग मारताना दम देऊन गेले "संध्याकाळी मला ही कविता पाठ झालेली पाहीजे " त्यांनी पायडल मारला तर मागून आवाज आला " ओ बाबा गप जा "
त्यांनी ब्रेक मारून मागे पाहिलं. पण नंतर हसल्यामुळे त्या कृतीचा परिणाम शून्यच झाला. उलट आम्ही सगळेच हसत सुटलो.

संध्याकाळी आम्ही त्यांच्याच घरी होतो.
त्यांनी विचारलं " बेंबट्या, माधवा, कविता झाली का पाठ ?"
" झाली थोडॉ"
"म्हण बरं "
त्याने सुरू केलं.
"खबरदार जर चाट मारूनि जाल पुढे गधड्या "
बाबांनी त्याचं मुस्काट फोडलं.
"गधड्या "
"बाबा तेच तर म्हणालो ना"
" अरे गधड्या तू आहेस, तिथे चिंधड्या लिहीलेय चिंधड्या"
बेंबट्याने पुन्हा पाहिलं.
" काय रे गुंड्या, इथं चिंधड्याच आहे, तू का सारखा गधड्या वाचत होतास ?"
" अरे मला तसं दिसलं"
इतक्यात बाबा ओरडले " असला फाजील पणा केलात तर मीच तुमच्या चिंधड्या करीन "
" राहू द्या ओ बाबा, ए आई "
त्यावर बाबांचा आवाज खाली आला.
" बरं बरं वाच कविता. मग मी प्रश्न विचारीन. त्यातून तुम्हाला कविता कशी वाचायची ते समजेल "
आमच्याकडे वळून म्हणाले " तुमचे बाबा कविता शिकवत नाहीत का ?"
आम्ही नकारार्थी मान हलवली.
त्यांचा मोठा मुलगा म्हणाला " त्यांचे बाबा चांगले आहेत, मुलांचा छळ करत नाहीत "
"म्हणजे कविता शिकवून मी तुमचा छळ करतो ?"
एव्हढ्यात त्यांच्या आईचा आवाज आला.
"काय कामावरून आल्याबरोबर कटकट लावलीय ? मुलांना जरा म्हणून आनंदात राहू देत नाही हा माणूस "
" घे घे, बोलून घे. त्यांचीच बाजू घे, म्हणजे त्यांच्यावर संस्कार जरा म्हणून होणार नाहीत. दिवसभर तू फिर भजनं करत आणि मुलांना धर्मयुग वाचू दे " मग जीभ चावत म्हणाले " अरे तुमच्या बाबांना सांगू नका रे"
आम्ही पुन्हा नायबा सारखी मान हलवली.

आता खड्या आवाजात मोठ्याने कविता वाचली. बाबा जरा खुशीत आले.
"वाचलीस ? आता प्रश्न "
" ओ बाबा राहू द्या आता . आम्हाला क्रिकेट खेळायला जायचंय "
" अरे काय रे ती भिकारडी लक्षणं. अकरा जण एका चेंडूमागे पळतात. त्यातले दहा तर जागचे हलत नाहीत. ना कसला व्यायाम, ना कौशल्यवृद्धी. एकाने चेंडू फेकायचा एकाने दांडकं उचलून मारायचा"
" ओ बाबा दांडकं काय म्हणता ? बॅट म्हणा "
" तेच ते, अक्कल नको शिकवू . विटी दांडू खेळा म्हटलं तर यांना लाज वाटते"
" बाई ! या माणसाला कुठून कुठे जायची कला साध्य झालीय कुणास ठाऊक, बघतोस ना रे तू ?" हे अर्थात त्यांच्या घरातल्या तिरूपती बालाजीच्या प्रतिमेला उद्देशून असायचं. हा अमराठी देव यांच्याकडे कसा हे मात्र अजून समजले नाही.
बाबांनी आपला हट्ट चालूच ठेवला.
"हं , सांगा रे मुलांनो, स्वार कुठून कुठे चालला होता ?"
" ओ बाबा, त्या कबितेत कुठे लिहीलेय ते ?"
" अरे तेच तर गमक आहे ना कवितेचं"
" बाबा, तुम्हीच सांगा बरं स्वार कुठून कुठे चालला होता ते ?"
" अरे मी तुमची परीक्षा घेतोय, मीच कसा उत्तर देणार ?"
इतक्यात आतून आवाज आला. "अहो , काहीही काय विचारता माझ्या बाळांना ? तुम्हाला तरी माहिती आहे का ?"
आता बाबा सुद्धा आवाज चढवून म्हणाले "म्हणजे काय, माहिती असल्याशिवाय उगीच विचारतो का ?"
" सांगा कि मग "
" तर मुलांनो, हा स्वार कि नाही कर्‍हाड वरून राधानगरीला चालला होता"
" ते कसं काय ?"
" कसं काय म्हणजे, आम्हाला आमच्या गुरूजींनी सांगितलं "
" त्यांना काय माहिती ?"
" अगं गुरूजी कशाला खोटं बोलतील ? आमचे गुरूजी काय शिकवायचे, काय ती रसाळ वाणी. त्यांनी आमची पिढी घडवली "
" ते दिसतंच आहे. पण मी म्हणते तो स्वार कर्‍हाड वरून राधानगरीलाच चालला होता हे कसं समजायचं "
" अगं म्हणजे काय ? आमच्या गुरूजींनीच सांगितलं ना. या कवितेतली वर्णनं त्यांच्या गावातली आहेत. आणि लहानपणी ते ही कविता म्हणत "
" अहो मग पाठकांनी काय त्यांच्याकडून ढापली का ?
" तुम्हा बायकांना ना, जरा सुद्धा ऐकून घ्यायची सवय नसते. अगं या कवितेतला हा शूर वीर मावळा गुरूजींच्या घराण्यातला वीर पुरूष. त्यामुळं ही कविता त्यांच्या घरात तीनशे वर्षांपासून आहे. ती अशीच उडत उडत पाठकांकडे गेली असणार"

.... जरा वेळाने पूर्ण करतो.

स्पायडर-मॅन. विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सबिलीटी.

आणि व्हीलन्स सोबत मारामारी करता करता स्पायडीचे जोक करणे, टोमणे मारणे मजेदार असते.

Pages