आरोग्यदायी पेय.

Submitted by केशवकूल on 4 October, 2024 - 01:52

आरोग्यदायी पेय.
-नजीकच्या DFH मधून जेव्हढी मिळतील तेव्हढी ड्राय फ्रूट्स मिळतील ती घेऊन या. ती एकत्र करून चांगली कुटा. किंवा मिक्सर मधून फिरवून आणा.
-नंतर एक लिटर दूध घ्या. ते पाऊण लिटर होईस्तोवर उकळा.
-आता त्यात कुटलेली ड्राय फ्रूट्स मिसळा. आता ते मिश्रण अर्धा लिटर होईपर्यंत उकळा.
-चवी पुरती भरपूर साखर टाका. हयगय नको.
-हे पेय शीत कपाटात म्हणजे मराठीत ज्याला फ्रीज म्हणतात त्यात गार होण्यासाठी ठेवा.
-नंतर भर उन्हात दोन रिकाम्या बाटल्या आणि किंडल घेऊन चालायला लागा. बाटल्या कशासाठी? समजेल. चालता चालता तुमचे शहर मागे पडेल. आणि मळे दिसायला लागतील तो पर्यंत चालत रहा. आणि घामाघूम व्हा.आता पुढील कसोट्यावर उतरेल असा मळा घ्या.
------मळ्यात विहीर पाहिजे.
------विहिरीवर मोट पाहिजे. इंजिन चालणार नाही.
------“माळ्याच्या मळ्यामधी कोण ग उभी...” असा मळा असावा.
------मळ्यात “हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी...” असे झाड असावे.
------आपण मुक्कामाशी पोचलो आहोत. पुढे व्हा आणि पाटाचे पाणी दोन बाटल्यात भरून घ्या.
------निवांत जाऊन चिंचेच्या झाडाखाली जाऊन पडा.
आणि बाटल्यातील हेच ते “अमृत तुल्य आरोग्यदायी गार पेय” मजेत प्या. हे किंडल बरोबर प्यावे.
आता ही कृति मायबोलीवर फोटो सह स्पर्धे साठी – माझा रेफ न देता -पाठवा.
काही नाही तरी ३.५ क्रमांक मिळेलच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किंडल चिंचेच्या झाडाच्या गारे गार सावलीत कथा वाचण्यासाठी.
सायडिंगला पडलेली मेन लाईनवर आणण्यासाठी आभार.

कुठलेही चालेल. सावली देणारे कुठलेली "झाड" पकडायचे. "एका निष्पर्ण वृक्षाखाली " नको.
"ह्या इथे तरुतळी बाटली रम्य जलाची..." आमीर खान ह्यांच्या "क्या बात है" या काव्य संग्रहातून. किंवा
हे पहा शांता शेळके काय म्हणताहेत,
आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निजसाउली
मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे पायांतळी
आणिक पुढती झरा खळाळत खडकांतुन चालला
साध्या भोळ्या गीतामध्ये अपुल्या नित रंगला
काठीं त्याच्या निळी लव्हाळी डुलती त्यांचे तुरे
तृणांकुरांवर इवलाली ही उडती फुलपाखरे
खडा पहारा करिती भवती निळेभुरे डोंगर
अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर
दुर्मिळ ऐशी देई शांतता सदा मला हे स्थल
ऐकु न येई इथे जगाचा कर्कश कोलाहल
व्याप जगाचा विसराया मी येई इथे सत्वर
अर्ध्या मिटल्या नयनी बघते स्वप्ने अतिसुंदर
शांतविले मी तप्त जिवाला इथे कितीदा तरी
कितीदा यावे तरी येथली अवीट ही माधुरी
xxxxxxxxxx
अश्या परिसरात हे पेय "अमृतातेही पैजा जिंके" असे चवदार लागेल.
सांगायचा मुद्दा असा कि ह्या जगात शुद्ध थंडगार पाण्या इतके आरोग्यदायी पेय दुसरे नाही. सध्या मात्र "जलं शक्रस्य दुर्लभः " असे झाले आहे.
आमचा डॉक्टर सांगतो कि "रोज दोन लिटर प्यायला पाहिजे."

अशा रेसिपी ज्यात भरपूर साखर, ड्रायफ्रूट, आटवलेलं दुध वगैरे आहे ते जिभेला चांगलेच लागेल त्यात पाक कौशल्य कसलं? नुकतेच एक परिक्षण...जगात भारी भारतीय आहार....प्रहसन छान आहे.
शांता शेळकेंच्या कवितेच्या पार्श्वभूमीवर तुमची रेसिपी नंबर एक...नाद नाय करायचा. Happy