प्रायोरीटी

Submitted by SharmilaR on 7 October, 2024 - 02:26

प्रायोरीटी

“अगं, इतकं काय मनाला लावून घेतेस तू? हे असं बारिकसं अपयश इतकं महत्त्वाचं नाहीये आयुष्यात. मुलाच्या एखाद्या छोट्याशा परीक्षेपेक्षा खूप काही प्रायोरीइटीज असतात जगात. आणि अजून तर आकाश किती लहान आहे. अशा खूप परीक्षा येतील अजून.” दोन महिन्यांपूर्वी मैत्रिणींनी समजावायचा प्रयत्न केला होता.

‘असं कसं? मा‍झ्या दृष्टीने माझ्या मुलाची प्रत्येक परीक्षा महत्त्वाची आहे. त्याचं प्रत्येक यश अपयश महत्त्वाचं आहे. पण हे ह्या सगळ्यांना सांगून काय कळणार म्हणा! मी मेहनत घेतेय गेली दहा वर्षे आकाशवर. त्या करता बाकी सगळं सोडलं मी. माझं करिअर, माझं बाहेरचं विश्व, टीव्ही.. सगळं सगळं बंद केलंय मी. ते ह्या सगळ्यांना कसं कळणार? त्यांच्या करता मुलांचा अभ्यास वगैरे म्हणजे आयांचा फावल्या वेळचा उद्योग. माझ्या सारखं झोकून देणं कुठे माहीत आहे त्यांना? आणि आता एवढ्या मेहनती नंतर जर असं अपयश आलं, तर दु:ख्ख होणारच नं? धक्का बसणारच नं? शिवाय आकाशचं असं गणित परीक्षेत स्टेट लेव्हलला नं येणं, हे मुळी पटणारं नाहीच आहे. भर झोपेत सुद्धा त्या परीक्षेच्या पुस्तकातलं कोणतंही गणित तो दोन मिनिटात सोडवू शकतो. पहिल्या लेव्हलला तो शहरात पहिला आला होता. मग हे असं होईलच कसं? हा रिझल्ट खरा असणं शक्यच नाही. कुठे चूक झालीय तेच कळत नाहीय. आणि ते लोकं तर सोडवलेला पेपर दाखवायला पण तयार नाहीत..’ अर्थात, ती हे सगळं मनातल्या मनात बोलली होती.

इतर कुणाशी काहीच बोलण्यात अर्थ नव्हता. कारण तिच्या मनात तिच्या मुलाचं, आकाशचं स्टेट लेव्हलला नं येण्याचं खोलवर रुतलेलं शल्य त्यांना कळणंच अशक्य होतं. तो पाचवीत असला, म्हणून काय झालं? किती महत्वाची गणिताची परीक्षा होती ती! ह्या परीक्षेकरता तर तिने मागच्या वर्षी पासूनच तयारी सुरू केली होती आकाशची.

आता सगळे आपल्याकडे बघून हसताहेत असं वाटत होतं तिला. नेहमी सगळीकडे पहिला येणारा आकाश, ह्यावेळी रॅंक मध्ये पण नाही? बाकी सगळ्या आयांचे विचार तिला खूप वरवरचे वाटायचे नेहमीच. इव्हन घरात सुनीलला, तिच्या नवऱ्यालाही तिचं वाईट वाटणं कळूच शकणार नव्हतं. ‘एवढीशी काय ती परीक्षा! किती बाऊ करतेस सगळ्याचा. आता काही दिवसांनी तू विसरशील पण हे.’ असं सुनीलने म्हणताच तिला आणखीनच वाईट वाटलं. त्याचाही रागच आला होता. ‘अशी कशी विसरेन मी?’ तिची मेहनत, तिचं वाटणं त्याच्यापर्यंत पोहोचतच नव्हतं.

मग तिनं संगळ्यांशी भेटणं, बोलणंच बंद केलं होतं, गेल्या दोन महिन्यात. तिने तिच्या मुलाबरोबर घेतलेल्या एवढ्या मेहनती नंतर आलेलं हे अपयश तिला पेलवतच नव्हतं. आकाश जात होता आपला रोज शाळेत. तो विसरला पटकन त्याचा रिजल्ट. मग तिला त्याचाही राग आला. असं कसं ह्याला काहीच वाटत नाही? म्हणजे आता ह्याला अपयशाची सवय होणार का? अपयश कसं, सतत बोचत रहायला पाहिजे. तरच तो पुढे काही करू शकणार ना? आता त्याला वाईट नाही वाटलं, तर मग पुढे पण असं काही झालं तर, त्याला काहीच नाही वाटणार. मग तो हळूहळू अभ्यास करणं पण बंद करणार.. मग..

आकाशला शाळेत सोडायला, आणि हल्ली तर आणायलाही त्याचा बाबाच जायचा. तिने तिच्या घराची आणि मनाची सुद्धा दारं खिडक्या गेले दोन महीने, तिच्या पुरतं बंद केली होती. अगदी कोंडून घेतलं होतं तिने स्वत:ला.

आणि आज.. आज तिच्या घरात ही एवढी गर्दी जमली होती, तिला भेटायला. तिच्या मैत्रिणी बारीक आवाजात कुजबुजत होत्या. कुणी तरी तिला थोपटत होतं. कुणी तरी जवळ घेत होतं. ती मात्र आत्ता ह्या क्षणी कुठलाही विचार करण्याच्या पलीकडे गेली होती. आजूबाजूला चाललेलं काहीच तिच्या डोक्यात शिरत नव्हत. ती शून्य नजरेनं बसली होती भिंतीला टेकून.

असं होईलच कसं? दोन तासांपूर्वी तर सगळं वेगळं होतं. अचानक असं कसं होईल? आत्ता घड्याळाचे काटे दोन तास मागे करू का? उलटं पालटं झालेलं सगळं जग परत पूर्वी सारखं होईल का?

नेहमीप्रमाणे आजही आकाश बाबा बरोबर शाळेत गेला होता. त्याला शाळेत सोडून पुढे सुनील कारखान्यात जायचा. लहान वयातच स्वत:चा मोठ्ठा बिझनेस उभारला होता सुनीलने. लग्नानंतर सुरवातीला तीही जायची त्याच्या बरोबर. पण आकाशच्या जन्मानंतर तिने ते बंदच केलं. सुनीलने खूपदा सांगून बघितलं की, ‘एवढी इंजिनियर आहेस तर पूर्ण घरी कशाला बसतेस? येत जा थोडा वेळ कारखान्यात.’ पण तिलाच ते मान्य नव्हतं. आधी लहान बाळाचं संगोपन स्वत: करायचं म्हणून, आणि मग त्याची शाळा, अभ्यास हे सगळं सांभाळायचं म्हणून. तिला तिच्या मुलाला स्वत: घडवायचं होतं. त्याला टॉपला ठेवायचं होतं सगळीकडे.

आकाश जेमतेम शाळेत जायला लागल्यावर, म्हणजे तसा अगदीच लहान असतांनाच तिने त्याला बॅडमिंटन च्या क्लासला घातलं. रोज तिथे थांबून ती त्याच्या खेळावर नजर ठेवायला लागली. तो अगदी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये गेल्यापासून, शाळेतून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती घ्यायला लागली. आकाशला त्या सगळ्या परीक्षांना बसवायला लागली. मग त्यात आकाशचा रोजचा शाळेचा अभ्यास करून घेणं, स्पर्धा परीक्षांचा जास्तीचा अभ्यास करून घेणं, त्याच्या टीचर्सना भेटणं वगैरे आलंच. आकाशही ती सांगेल तसा अभ्यास करत होता. चांगले मार्क्स मिळवत होता. सगळीकडे नंबर काढत होता. पण दोन महिन्यांपूर्वी पहिल्यांदाच तो आला नव्हता गणिताच्या स्टेट रॅंक मध्ये.

गेल्या दोन महिन्यात ती घराबाहेर पडलीच नव्हती मग. कुणाला भेटलीही नव्हती. आणि आज सगळे तिला भेटायला येत होते. आज सकाळी आकाश त्याच्या बाबा बरोबर शाळेकरता घराबाहेर पडल्यावर, अर्ध्या तासात एकएक जण तिच्या घरी जमायला लागले होते.

शाळेत जातांना सुनीलच्या कारला अॅक्सिडेंट झाला होता. समोरून येणाऱ्या ट्रकने कारला उजव्या बाजूने जबरदस्त ठोकर दिली होती. अगदी चमत्कार व्हावा तसा आकाश कार बाहेर फेकल्या गेला होता, पण बाकी कारचा अगदी चेंदामेंदा झाला होता. त्या रस्त्याने शाळेत जाणारे, येणारे, ओळखीचे लोकं ताबडतोब मदतीला धावून आले. कुणी तरी त्यांना हॉस्पिटल मध्ये गेलं, कुणी घरी तिला धीर द्यायला येत होतं. आकाश ठीक होता, तरी जबरदस्त शॉक मध्ये होता म्हणे. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली हॉस्पिटल मध्ये ठेवलं होत. पण तिला कुणी हॉस्पिटल मध्ये जाऊ द्यायला तयार नव्हतं.

अॅक्सिडेंट ची बातमी कळली, तेव्हा ती धावत बाहेर निघाली होती, हॉस्पिटल कडे. आकाश, सुनीलकडे. पण, कुणी तरी तिला थांबवून धरलं होतं. सुनीलचे सगळे मित्र तिकडेच गेले म्हणाले.

तिला वाटत होतं, ‘डॉक्टर काहीतरी करत असतील. सुनील स्ट्रॉंग आहे. लढवय्या आहे तो. सगळ्यातून तावून सुलाखून निघत असतो. तसा आत्ताही निघेल. कुणी काही बोलत नसलं तरी.... तो असेल.. असेल... ठीकच असेल. लुळा पांगळा झाला तरी चालेल पण तो जिवंत हवा. गेले काही दिवस मी अगदीच दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि आकाशकडे पण. पण आता नाही करणार. त्यांना सुखरूप घरी येऊ दे.

गाडीचा चेंदामेंदा झाला म्हणे.. होऊ दे. माझा सुनील अश्या दहा गाड्या आणून उभ्या करेल. माझा आकाश मला हवा आहे. जसाच्या तसा.. नाही.. नाही.. जसाच्या तसा नसला तरी चालेल.. हात पाय मोडलेले असले तरी चालतील. पण हवा.. जिवंत हवा. देवा, मला जगातलं कुठलंही दु:ख्ख दे, पण माझं घरं माझी माणसं सुरक्षित ठेव. बस, ह्यापुढे मी दुसरं काहीच मागणार नाही.’

पण.. पण.. सुनील जागच्या जागीच गेला होता. सुनीलची बॉडी पोस्ट मार्टम करता नेली असं कुणी तरी नंतर म्हणालं होतं. ती शून्यात नजर लावून बसली होती. मन अगदी रिकामं रिकामं झालं होतं. डोळ्यातून पाण्याचा थेंबही येत नव्हता.

काल पर्यंत आकाशच्या रिझल्ट च्या नुसत्या विचाराने येणारं डोळ्यातलं पाणी, आज कुठे तरी दडी मारून बसलं होतं.

******************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच वाईट!!!!!
सत्य घटना आधारीत म्हणजे तर निःशब्द झालो

धन्यवाद आशु, मनिम्याऊ, किल्ली, झकासराव.

सत्य घटना आधारीत म्हणजे तर निःशब्द झालो>> ह्या घटनेला जवळपास अठरा-एकोणवीस वर्षे झाली. घडली तेव्हा आम्हा सर्वांची अवस्था अशीच होती.

बापरे
आता सगळे(असलेले) सुखरूप असूदेत, सावरलेले असूदेत.

धन्यवाद स्वाती, अनु.
@स्वाती,
एका क्षणात सगळे कसे बदलून जाते ना!>> हो ना. तेव्हाच कळतं, माणूस किती शुल्लक गोष्टीचा दुःखा चा डोंगर करतो.
@अनु,
आता सगळे(असलेले) सुखरूप असूदेत, सावरलेले असूदेत.>>
आता सगळे ठीक आहेत. आईने पुनरविवाह केला. मुलं परदेशी आहेत. त्यांनाही त्यांचे साथीदार मिळालेत.

जेव्हा असे मोठे दुःख समोर येते,तेव्हा बाकी सगळं गौण वाटायला लागते,जर एखादया व्यक्तीने घरातील जवळची कमी वयातील व्यक्ती मरण पावलेली पाहिलेली असते,त्या व्यक्तीला जवळच्या दुसऱ्या पण वयस्कर व्यक्तीच्या मरणाचे दुःख पण तेव्हढे जाणवत नाही,ही वस्तुस्थिती आहे.मग बाकीच्या गोष्टींचे दुःख तर फार लांबच राहते.मन फार तटस्थ होऊन जाते.

वाईट वाटले कथा वाचून ..
क्षुल्लक गोष्टींसाठी जीव जाळून घ्यायला नको खरंच ...

बापरे! खूपच चटका लावून गेली गोष्ट. सत्यघटनेवर आधारित आहे हे वाचून अजूनच कालवलं. असे काही प्रसंग आपण जन्मभर विसरू शकत नाही. आणि त्यनंतर आयुष्य बदलून जातं हे खरं.