सुटका

Submitted by केशवकूल on 2 October, 2024 - 11:21

सुटका
थाड थाड आवाज करून आचके देत अखेर गाडी बंद पडली. डॉक्टरांना अंदेशा आलाच होता. गाडी म्हणावा तसा वेग पकडत नव्हती.
डॉक्टरांनी घड्याळावर नजर टाकली. रात्रीचे साडेअकरा झाले होते. त्यांनी रस्त्यावर पुढे मागे नजर टाकली. चिटपाखरू पण दिसत नव्हते. हा चिटपाखरू नव्हे पण मधुनच काजव्यांचे थवे लुकलुकताना दिसत होते. मान्सून सुरु होऊन दोन तीन आठवडे झाले असावेत. रस्त्याच्या बाजूला चिखलात बेडूक डराव डराव आवाज करत होते. रातकिडे किर्र करत होते. बस एवढीच कायती हालचाल. ह्या आडरस्त्यावर माणूस भेटायची शक्यता नव्हती, कोण येणार रात्री अपरात्री ह्या रस्त्यावर? डॉक्टर आले होते कारण एक बाप्या गडी सायकल हाणीत त्याना बोलवायला आला होता. त्याच्या गावरान चेहऱ्यावर भीति आणि अजीजीची छाया होती. विनंती होती. त्याची म्हातारी शेवटचे आचके देत होती. काय ओढून ठेवलाय हे त्या रांगड्या गड्याला आधीच समजले असावे. पण जाताना म्हातारीला कमी त्रास व्हावा एवढीच त्याची मनोमन इच्छा असावी. असे तसे म्हातारीला सोडण्याची त्याला इच्छा नव्हती. आपल्या परीने आपण म्हातारीचे केले. निदान एव्हडे तरी समाधान.
चंद्र नुक्ताच कुठे उगवत होता. काळ्या निळ्या आकाशांत तारे चमकत होते. आजूबाजूच्या झाडांवर अनोखी गूढ छाया पसरली होती. झाडांच्या सावलीत अनामिक भीती जंगली श्वापदा सारखी दबा धरून बसली होती. मधेच जंगलात विखुरलेल्या पालापाचोळयावर पावलांचा आवाज येत होता.
“डॉक्टर” कुणीतरी आवाज दिला. डॉक्टर दचकले. निव्वळ आभास होता तो. अश्या रात्रीच्या वेळी जंगलात सगळे काही निराळे भासते. झाडे अक्राळ विक्राळ राक्षसासारखी अंगावर धावून येतात तर घुबडांचे घूत्कार माणसांच्या हाकासारखे ऐकू येतात. मानवाच्या मनात वास करणार्याल प्राचीन भीतीँनी फडा काढला होता. गाडीत झोप येणे मुश्किल होते. त्यापेक्षा त्या समोरच्या पडक्या घराचा आसरा घ्यावा. निदान तिथे भितींचा आधार तरी मिळेल. शिवाय तिथे मिणमिणता दिवा दिसत होता. डॉक्टर गाडीच्या बाहेर पडले. गाडीवर एक लाथ मारून त्यांनी अश्लील शिवी हसडली. मग त्यांचे त्यांनाच वाईट वाटले. परिस्थितीचा राग बिचाऱ्या गाडीवर कशाला? गाडी जायच्या वेळीच कुरकुरत होती . तेव्हाच तिचे ऐकले असते तर ही वेळ आलीच नसती. पण केस खूप अर्जंट होती. गाडीने जाऊन देखील यमाच्या आधी पोहोचू याची खात्री नव्हती, त्यांनी तशीच घाई घाईत गाडी बाहेर काढली. आता भोगा त्याची फळं. आणी एवढी घाई करून फायदा काय झाला? म्हातारी त्यांच्या समोरच गचकली. विजिट फी मागायची पण सोय नाही. पदरचे पेट्रोल गेले त्यातून इथे ह्या आडवाटेवर नेमका गाडीने दगा दिला.
दूरवर माचाणीचा घाट दिसत होता. सहयाद्रीचा काळा पहाड छाती काढून उभा होता. त्याच्या अंगावर मुंग्या प्रमाणे गाड्या ये जा करत होत्या. घाटात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे ठिपक्यासारखे दिवे लुकलुकत होते. डॉक्टरांना अकबर बिरबल ची गोष्ट आठवली आणि त्या परिस्थितीही हसू आले. बुडत्याला काडीचा आधार. त्या दिव्यांच्या आधाराने भीती कुठल्या कुठे पळून गेली. गाडीच्या खिडक्या बंद करून डॉक्टरांनी पायातले बूट मोजे काढले. मागल्या सिटावर ताणून द्यायचा विचार केला. पण झोप येईल तर ना. खिडक्या बंद केल्या तर आत उकाडा सुरू झाला. उघडल्या तर मच्छर आत घुसणार. इथे झोपणे काही खर नाही. नाही नाही ते विचार येऊ लागले. पेपरात वाचलेल्या बातम्या सभोवती फेर धरून नाचायला लागल्या. लहानपणीचे सुभाषित आठवले. हा हंत हंत नलिनीम् गज उज्जहार! कमळाच्या फुलाच्या कळीत अडकलेल्या भुंग्याची गोष्ट आठवली. आपणही तसेच ह्या मोटारीत अडकलो आहोत. सोसाट्याचा वारा आला नि झाडाची वाळकी फांदी वा झाडच मोटारीवर कोसळले तर? अवचित धो धो पावसाने पूर आला आणि गाडीला माझ्यासह स्वाहा करून पाणलोट दरीत कोसळला तर? ही अगदी अलीकडे वाचलेली बातमी होती. गाडीतले तीन लोक हकनाक बळी गेले. काळही आला आणि वेळही आली तर? विद्युल्लतेने गाडीवर झेप घेतली तर? गाडीवर वीज कोसळली तरी आतली माणसे सुरक्षित असतात असे काहीसे वाचल्याचे त्यांना आठवले. पण आज त्याची सत्यता आजमावयाची त्यांना इच्छा नव्हती. नेमके अश्या वेळी नको त्या आठवणी समोर येतात. अगदी सुरवातीच्या उमेदीच्या काळात केलेल्या चुका. एका तरुण स्त्रीच्या प्रसूतीच्या वेळी केलेली घोडचूक.
“डॉक्टर, त्यावेळी तुम्ही माझी सुटका केली नाहीत. पण आज रात्री मी तुमची सुटका करणार आहे. चला मी तुम्हाला न्यायला आले आहे.”
डॉक्टर मरणाचे घाबरले. त्या स्त्रीचा चेहरा समोर आला. तिला जगायचे होते. तिची नजरच सांगत होती. तो चेहरा त्यांची पाठ सोडायला तयार नव्हता. त्यांच्या समोर किती पेशंट गेले. पण असा पाठलाग कुणी केला नव्हता. जे गेले ते जाणारच होते. पण ती स्त्री? तीची केस निराळी होती.
त्यांत एकाची भर ही आजची म्हातारी. ऐशीच्या वरच वय असावे. आयुष्यात जे भोगायचे होते ते भोगून झाले होते.
“डॉक्टर आता काय?”
डॉक्टर काही बोलले नाहीत. त्यांनी आपल्या बॅगमधून पॅड काढले. त्यावर काही खरडले. जुजबी माहिती विचारली. नाव काय वय काय इत्यादि.
“कुणी मागितले तर हे दाखवा.” गड्याने कागदाची काळजीपूर्वक घडी करून कागद खिशात टाकला.
घरातल्या बाईमाणसाने कळकट कप पुढे केला. कळकट कपात कळकट चहा. डॉक्टरांना सवय होती. चहाची अपेक्षा नव्हती. समोर आला, बर वाटलं.
“हे कशाला?”
“डॉक्टर, तुम्हाला चहा प्यायची पण उसंत दिली नाही मी. जे व्हायचे ते झाले. देवाची इछा. म्हातारीचे सोनं झालं. थोडा त्रास झाला पण सुटली बिचारी. चहा घ्या. एकदा लोकं जमली की...” त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. त्याच्या परीने जे करता येण्यासारखे होते ते त्याने केले होते.
अशा वेळी देखील थोडी माणुसकी— थोडी ओली थोडी सुकी --- जागी होती.
गुळाचा चहा पिऊन डॉक्टर उठले आणि बाहेर पडले. फी ची गोष्ट झालीच नाही.
त्या समोरच्या घराकडे जाऊन काही सोय होते का ते बघावे हे उत्तम.
हातात काठी घेतली. खिशात टॉर्च टाकला. (असावा जवळ. कामाला येईल. वेळ सांगून येते काय?) बॅग ऊचलली आणि चालू पडले.
डॉक्टरांनी आजूबाजूच्या भीतीदायक जंगलावरून आपली नजर हटवली. त्यांचे हटवादी मन आणि विचार पुन्हा पुन्हा तिकडे –त्या भीतीकडे आकृष्ट होत होते. जणू त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. देवाचे नाव घेऊन त्यांनी त्या पडक्या वाड्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. हातातली काठी दगडावरून आपटत डॉक्टर निघाले. त्या काठीच्या आवाजाने फुरशी किंवा अजून कोणी पायाखाली जनावर असेल तर बाजूला होते असे म्हणतात.
ते घर नजरेच्या टप्प्यात आले होते.
घरांचे पण काय आहे ना की प्रत्येक घराला व्यक्तिमत्व असते. डॉक्टरांनी धंद्याच्या व्यापांत (माफ करा. डॉक्टरकी हा पण एक धंदाच की) अनेक रोग्यांच्या घराला भेटी दिल्या होत्या. रोगी त्यांच्या व्यथा सांगत. बरोबरीने त्यांची घर त्यांच्या कथा सांगत. काही घरांची बघितल्याक्षणी किळस यायची. तर काही घरं किती प्रसन्न वाटायची. त्यांचे मन तिथेच रेंगाळत रहात असे. हलू नये असे वाटायचे. काही घरं मितभाषी तर काही भीतीने चडीचूप. लाजरी, बुजरी, निरागस केविलवाणी, बिनधास! पण कसेही झाले तरी त्या सर्व घरांना ऊब होती.
हे घर मात्र निर्विकार होतं. निदान वरुन तसे नाटक तरी करत असावे.
डॉक्टर मनात म्हणाले आपल्याला काय त्याचे. आजची एक रात्र आसरा मिळाला की पुरे. सकाळी सकाळी मुक्कामाची एस टी ह्याच रस्त्याने जात असणार. ती पकडून घरी जाऊ. गँरेजववाला नंतर गाडी ओढून आणेल॰ घरात कोणी असेल तरी ठीक, नसेल तरी ठीक! एकदा खात्री करून घ्यावी म्हणजे बरं.
घराला दरवाजा होता. आणि तो आतून बंद होता. म्हणजे आत कुणीतरी होते.
डॉक्टरांनी दरवाजा ठोठावला.
डॉक्टरांनी जेव्हा म्हातारे बाबांना पाहिले तेव्हा त्यांचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. असा पण मानव असू शकतो? किती वर्षांचा असावा हा? शंभर दीडशे दोनशे? म्हातारा भयानक दिसत होता. शरीर सगळे आकसून गेले होते, सुरकुतलेल्या कातडीचे लटांबर हाडांवर लोंबकाळत होते. डोळ्यांतली लकाकी थिजली होती. गालफाडे बसून तोंड चिमणीएवढे झाले होते. जणू जिवंत ममी! पोक काढून, काठीचा आधार घेत घेत हळू हळू स्वतःला ढकलत ढकलत तो पुढे आला. हातातल्या कंदिलाला वर उचलून त्याने डॉक्टरांना न्याहाळून पाहिले. कंदिलाच्या उजेडात म्हाताऱ्याची सावली पायापासून पुढे भिंतीवर चढली होती.
“इतक्या रात्री कोण? भूत-बीत तर नाहीस ना रे?”
डॉक्टरांना मनोमन हसू आले. भुताला सरळ ‘तू भूत आहेस का रे ’ असे विचारायला केव्हडे धैर्य असायला पाहिजे. खर तर डॉक्टरांनीच हा प्रश्न म्हाताऱ्याला विचारायला पाहिजे होता.
“समजा मी भूत असेन तर मला काय दरवाजातूनच हाकलणार? विचारपूस नाही करणार?”
“नाही नाही. दरवाज्यावर आलेलं भूतही देवासमान असते. पण माझ्या घरात आधीच काय कमी भूतं आहेत म्हणून त्यात अजून एकाची भर?”
बाजूला एक खोली होती. दरवाजा बंद. आतून विव्हळण्याचा आवाज आला.
म्हाताऱ्याणे तिकडे दुर्लक्ष केले.
“अश्या अवेळी आणि आडवाटेला घराचा दरवाजा भुताशिवाय कोण ठोठावणार?”
“आता मीच आलो आहे ना? आणि मी भूत नाही.” म्हातारा वळला .त्याच्या पाठी पाठी डॉक्टर आगंतुका सारखे. “मी बाहेर पडवीत चुपचाप गुमान पडून राहीन.”
“तसे नाही रे बाबा. हा इकडे विव्हळणार. भेसूर रडणार. मला सवय झाली आहे.तुला .....”
‘कोण आहे तो?’ डॉक्टरांच्या अगदी ओठांवर आले होते. पण त्यांनी स्वतःला सावरले. नसत्या चवकश्या कशाला? असेल कुणीतरी आजारी.
डॉक्टरांनी आपली कथा आणि व्यथा म्हाताऱ्याला ऐकवली.
“अरेरे, रखमा अखेर गेली.”
“तुमच्या ओळखीची होती?”
“वळख म्हणजे गावात सगळेजण सगळ्याना वळखतात.”
म्हाताऱ्याचे किडूक-मुडूक शब्द रेंगाळत रेंगाळत वातावरणात विरून गेले.
रातकिड्यांनी सूर पकडला होता.
“तेव्हा हे असं आहे. ह्या सगळ्या व्यापांत मी असा फसलो आहे.” डॉक्टरांनी हात जोडले, “मला आजची रात्र इथे काढू द्या. वाटले तर पडवीत झोपेन. म्हाणजे तुम्हाला त्रास नको.. सकाळी मुक्कामाची एसटी परत जाते. ती पकडून मी तालुक्याला चालला जाईन.”
बंद खोलीतून पुन्हा आरडाओरड सुरु झाली. डॉक्टरांना मनोमन वाटले की जो कोण ( तो आवाज पुरुषी होता.) त्या खोलीत आहे त्याला आपले इथे रहाणे पसंत नसावे.
“तो जो कोणी त्या खोलीत आहे त्यांची तब्येत बरी नाहीये का? का विव्हळत आहे मगाधरून? मी त्याला तपासून औषध देऊ का?”
“नको. त्याचा काही इलाज नाही. लई इब्लिस बेणं हाय ते. रडत रडत आले. रडत रडत जाणार. तुम्ही कायी लक्ष देऊ नगा. तुमचे काही खाणे पिणे झाले आहे का? का घेता जेउन एक डाव.” समोरच कढईत पिठलं पडले होते. भाकऱ्या दिसल्या नाहीत. असतील इकडे तिकडे फडक्यात बांधून ठेवलेल्या.
ते बघूनच डॉक्टरांचे मन उडाले. जेवणाची इच्छा मरून गेली. जेवण किती शिळे असेल? काही अंदाज? दोन दिवस? तीन दिवस? का शंभर दोनशे वर्षे?
“आमचे जेवण तुम्हाला पसंद पडलेले दिसत नाही.” म्हातारा गडगडाट करत बोलला. “बर मग चहा तरी?”
शरीरातला कणन कण चहासाठी आसुसलेला होता. एकदम हो म्हणणे डॉक्टरांना प्रशस्त वाटेना. चहाचे रंगरूप कसे असेल हा एक भाग होताच. थोडे आढेवेढे घेऊन हो म्हणून मोकळे झाले.
पुन्हा आतून भेसूर आवाजातले रडे सुरू झाले.
“चूप, पावणे आलेत ते पण कळत नाही.” (म्हाताऱ्याने इथे एक शिवी हसडली.) तो जो कोण आत होता त्याला ती पावली असावी. कारण आवाज बंद झाला. “तुला पण देतो. नाही तर अख्खी रात्र झेपू देणार नाहीस.”
कुठून तरी गार हवेचा झोत डॉक्टरांना शोधत शोधत आला. डॉक्टरांच्या अंगावर सर्कन काटा आला. शरीरातला प्रत्येक स्नायू भयकंपित झाला होता.
“बाबा इकडून फारशी रहदारी नसावी नाही का? कोण येणार ह्या आडवाटेला? मी आपला घाईत होतो, लवकर पोचावे म्हणून हा रस्ता पकडला.”
“सगळे तुमच्या सारखेच येतात आणि फसतात. फसलेले सगळे मग ह्या झोपडीच्या दाराशी! मी ही झोपडी त्यासाठीच तर बांधली नव्ह का?” म्हाताऱ्याच्या बोलण्यात कडवटपणा नव्हता. “अरे, तुमच्यासाठी चहा करायचा आहे ना. विसरलो होतो मी. आमच्या रडतराऊतलापण पाहिजे असणार.” म्हातारा उठला आणि आत गेला. जाताना कंदिल घेऊन गेला. घरात एकच कंदिल असावा बहुतेक.
चहा आला. म्हाताऱ्याने एक कप बंद खोलीत नेऊन दिला.
डॉक्टर त्या बंद खोलीतल्या रहस्याबाबत विचार करत होते.
“बाबा एक विचारू का? रागावणार नसाल तरच हं.”
“राग येण्याचे दिवस मागे पडले. आता कशाचे काहीही वाटत नाही. नाहीतर ह्या रड्याला मी इतके दिवस सांभाळले असते व्हय? तू एक दिवस इथे राहून बघ. चोवीस तासात ठार वेडा होशील. तू काय विचारणार आहेस ते देखील मला माहीत आहे. हेच ना की त्या खोलीत कोण आहे? तो असा रात्रंदिवस का आरडत असतो. येणारे सर्व हेच विचारतात. ऐक, ते माझ्या एकुलत्या एक मुलाचे भूत आहे.”
म्हाताऱ्याच्या आवाजात मार्दव होते. पण त्यांची नजर डॉक्टरांच्या पाठच्या भिंतीवरच्या बिंदूवर होती.
“भूत झाला तरी काय शेवटी माझाच मुलगा आहे ना तो.” म्हातारा त्या बिंदूशी बोलत होता. “मी त्याची काळजी नाही घेणार तर कोण घेणार.”
डॉक्टरांना वाटले की म्हातारा अलंकारिक भाषेत बोलत असणार. मुलगा बहुदा मंदबुद्धीचा असावा. किंवा वेडा. एकेकाच नशीब. धर सोडवत नाही. धरवत नाही. असे लोक काही वेळा हिंसक बनतात. मग त्याना बांधून ठेवावे लागते. बिचारा म्हातारा! डॉक्टरांचे मन उदास झाले. मरेपर्यंत घोर. दोघांपैकी जो मरेल तो सुटला म्हणायचा. तसं तर सगळे सुटणारच आहेत. पण केव्हा? मरणाच्या प्रतिक्षेत दोघेजण. देव पण महान. जो मरणाची आतुरतेने वाट पाहत आहे त्याला ताटकळत ठेवतो आणि.....
डॉक्टरांनी आपल्या मनाचा केर काढला आणि दिला ढकलून अंतर्मनाच्या टोपलीत. तत्वज्ञान करायला आयुष्य पडले आहे. झोपावे झाले. डॉक्टरांनी एक लांबलचक जांभई दिली.
“झोप आली जणू.” म्हातारा बडबडला. त्याने डॉक्टरांना भोकाभोकाची सतरंजी अंथरून दिली. (ती सुद्धा हजारो वर्षापूर्वीची असावी.) डॉक्टरांचे मन करेना. शेवटी अंग टाकले.
“सकाळी सातला एसटी जाते. सहा सव्वा सहाला उठायला पाहिजे एस टी पकडायची असेल तर. चुकली तर एकदम दुसऱ्या दिवशी.” म्हाताऱ्याने वार्निंग दिली.
“बाबा तुम्ही उठलात की मला आवाज द्या.”
म्हातारा केव्हाच डाराडूर झोपी गेला होता. आणि आता तर चक्क घोरायला लागला. त्याच्या घोरण्याच्या संगीतात झोप येणे शक्यच नव्हते. पण हात पाय लांब करता आले तर बऱ्यापैकी विश्रांती मिळेल. तेही नसे थोडके. डॉक्टरांनी म्हाताऱ्याच्या घोरण्यावर मन केंद्रित केले. त्यामुळे फायदा असा की रात किड्यांचा आवाज ऐकण्याचे टळले. म्हातारा स्टाईल मध्ये घोरत होता.. हजारो वर्षांची प्रॅक्टीस असणार.
का कोण जाणे डॉक्टरांना राहून राहून वाटत होते की हा सगळा सेटअप हजारो वर्ष पुरातन असावा. तो म्हातारा, त्याचा वेडा, अपंगमेंदूचा मुलगा(म्हातारा त्याला भूत म्हणत होता.) युगान युगे वाट चुकलेल्या मुशाफिरांना पिठले भाकरी खिलवणारा, किमान चहा पाजणारा तो प्राचीन म्हातारा. येथे पहारा करायला त्याला कोणी सांगितले? कशासाठी ही झकमारी? डॉक्टरांना स्वतःची लाज वाटली. काय हे आपले आयुष्य! .हा म्हातारा आपल्यापेक्षा बरा. त्याच्या जगण्याला काही कारण आहे. अर्थ आहे. निदान हा आड रस्त्यावर फसलेल्यांना रात्रीचा आसरा देतो आहे. ते सुद्धा फी न आकारता. ‘जनतेची सेवा’ वगैरेची निरर्थक शब्दांची कल्हई न लावता.
हे असले विचार मनात आल्यावर डॉक्टरांना स्वतःची भीती वाटू लागली. एखाद्या अदृश्य शक्तीने ताबा घेतल्यासारखे वाटू लागले. ती शक्ती आपल्याला कुठे घेऊन जाईल, आपल्या हातून काय कामे करून घेईल? ती आपल्याला उचलून जंगलात नेऊन श्वापदांना खायला घालेल की.......
डॉक्टरांच्या डोक्यात उलट सुलट विचारांची गर्दी झाली. आपण जागे आहोत की झोपी गेलो आहोत ते पण समजण्याची जाणीव राहिली नाही. डॉक्टरांना स्वप्नामध्ये स्वप्नं पडत होती. हा म्हातारा इब्लिस असावा आणि वाट चुकलेल्या वाटसरूंचे आत्मे गोळा करून विकत असावा. आतल्या खोलीत त्याने असच कुणाला पकडून ठेवले असावे. मुलगा वगैरे सब झूट!
आतून भेसूर रडण्याचे सूर यायला पुन्हा एकदा येऊ लागले. आत कोण आहे हे दिसत नव्हते. पण त्या सुरांचे मणामणाचे ओझे अंगावर येऊ लागले. भसाड्या आवाजात गायलेले गाणे. म्हातारा मात्र डाराडूर झोपला होता. डॉक्टर तिरीमिरीने उठले. हा आपल्याला सुखेनैव झोपू देणार नाही. एक दीड तासांची झोप पण नशिबात नाही.
त्यांच्या बॅगेत झोपेच्या गोळ्यांची बाटली होती. एक गोळी घेऊन झोपावे झाले. पण त्यांत रिस्क होती. आता जवळ जवळ चार वाजले होते. गोळी घेतली तर सकाळी उठण्याची भ्रांत. आत जाऊन त्याला गोळी द्यावी का? बिचारा युगानयुगे झोपला नसावा. एक रात्र झोपला तर म्हाताऱ्याचे उपकार फेडल्यासारखे होईल.
डॉक्टर उठले. बॅग उचलली. त्या बंद खोलीची कडी काढली. हळूच आत पाउल टाकले. आतले विव्हळणे आता बंद झाले होते. पाच मिनिटानंतर डॉक्टर बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. अंथरुणावर पडले आणि ताबडतोब झोपी गेले.
सकाळी सहा साडेसहा वाजता म्हाताऱ्याने डॉक्टरांना हलवून हलवून जागे केले.
“उठा डॉक्टर. घरी जायचे आहे की इथेच रहायचा बेत आहे?” डॉक्टर खडबडून जागे झाले. डोळे चोळत चोळत जागे झाले. “इथे? नाही रे बाबा. आता घरी जायला पाहिजे.”
एसटीचा खडखडात ऐकू येई लागला. डॉक्टरांनी आपली बॅग उचलली. टॉर्च खिशात टाकला. जाण्याची तयारी केली.
“ए म्हाताऱ्या, साल्या, मला इतकी वर्षे डांबून ठेवलेस. एक दिवस बाहेरची ताजी हवा घेऊ दिली नाहीस. हाडे मसणात जायची वेळ आली तुझी. तरी थेरडेगिरी संपली नाही. पोटच्या भुताचं भविष्य बरबाद केलेस. आता मी मोकळा झालो आहे. आत डॉक्टर झोपला आहे. सांभाळ त्याला.”
एवढे बोलून डॉक्टरांनी लांब लांब ढांगा टाकत एसटी पकडली आणि नव्या जगात नवे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी प्रस्थान केले.
बंद खोलीतून दबलेल्या विव्हळण्याचा अगदी अस्पष्ट आवाज येऊ लागला. पण आता येणारा तो आवाज सुसंस्कृत होता. सभ्य सुसंस्कृत माणसे जरी रडली तरी ह्या डोळ्याचे अश्रू त्या डोळ्याला समजू देत नाहीत. मनातल्या मनात रडतात. त्यांच्या जगात रोना मना है.
(पूर्व प्रकाशित)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा जुनीच आहे. पण सगळ्या कथा एका ठिकाणी असाव्यात असे वाटल्याने टाकली आहे. पहा आवडते का. >> तरीच देजा वू वाटले वाचत असताना. चांगली आहे कथा

सगळ्यांचे आभार..
अजूनही चार पाच कथा पडून आहेत. सवडीने त्याही टाकेन.