संपुट

Submitted by ज्येष्ठागौरी on 1 October, 2024 - 23:04

संपुट
Wrapped with love.... कोणीतरी जवळच्या व्यक्तीनी भेट देताना,सुंदर जरीची नक्षी असलेल्या कापडात गुंडाळून दिलेलं रेशमी कापड..दृष्ट लागण्यासारखं.देणारी मैत्रीण प्रचंड व्यक्तिगतता जपणारी असल्यानं त्यामुळे भेट वेष्टणात येणं अगदी स्वाभाविक होतं. डोकावून बघणाऱ्या नजरांपासून दूर, तिच्या सगळ्या आतल्या भावना कळत,उमजत,समजत मी ती भेट स्वीकारली, ते रेशमी कापड वापरुन जुनं झालं तरी ते आणि त्याचं वेष्टण दोन्ही अजून जपून ठेवलं आहे.काय देतो ह्यापेक्षा कसं देतो आणि त्या मागच्या भावना फार फार महत्त्वाच्या हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ती भेट..त्याचं वेष्टण काही विशेष, आतल्या सौंदर्याची जपणूक करणारं,अधिकच सुंदर.. कित्येकदा मिळालेली भेट ही आपल्यासाठी नाही असं जाणवतं आणि कधी आपणही आपल्याला ओळखू शकणार नाही इतकं कोणीतरी आपल्याला ओळखत असतं, अशी भेट मिळते.
पूर्वी कुणाच्या दूरच्या लग्नात जायचं असलं की "पाकिटात पैसे घाल" ही सूचना वडीलधाऱ्यांकडून यायची..त्यात पैसे इथे तिथे पडू नयेत, किती दिलेत हे इतरांना कळू नयेत,"त्यांना हवं ते घेतील"अशा रोखठोक भावना असायच्या.मला वैयक्तिक, पाकिटातून पैसे देणं हे त्यावेळी अमान्य होतं, आता वयानुसार आणि अनुभवानुसार तोच योग्य मार्ग आहे आणि निदान फार जवळच्या नाही अशा नात्यांसाठी, हे उमजलं आहे पण तरी अजूनही जवळच्या व्यक्तींना भेट देताना त्यांना मनापासून आवडेल, रुचेल असं काहीतरी द्यावं असं वाटतं, त्याला आपल्या खास पद्धतीनं नक्षीदार किंवा विशेष कागद,कापड लपेटून त्यासोबत एक छोटी चिठ्ठी द्यावी असं वाटतं आणि तसं घडतंही. माझ्यासाठीही माझी जवळची माणसं प्रेमानं काहीतरी खास देत असतात.A hand written note is a hug you get to keep...
हे कितीदा, कितीदा अनुभवलं आहे..
माझ्या सासूबाईंनी मला दसऱ्याला भेटीबरोबर लिहलेल्या चार ओळी....
"होवो सौख्य साध्य तुमचे
अंबेस ही प्रार्थना
सुवर्णआशीष तुम्हांस देता
आनंद हो मन्मना...
तो छोटा कागद त्यांनी दिलेलं ते दसऱ्याचं सोनं मी जपून ठेवलं आहे.. त्यातल्या ह्या ओळी मला कित्येकदा आठवतात, आनंद देतात,त्यांची सुखद आठवण करुन देतात..
मी शाळेत असताना मराठी शाळांमध्ये वह्या पुस्तकांना कव्हर घालणं काही अनिवार्य नव्हतं पण आदल्या वर्षीची चिवट कागदाची कॅलेंडर त्या कामासाठीच गाद्यांखाली दडपलेली असायची..त्याचं तंत्र फक्त बापूंना यायचं,नंतर नवरा मुलांच्या वह्या पुस्तकांना अतिशय सुंदर कव्हर घालणारा, वळणदार हस्ताक्षरात नावं घालायचं काम माझं..पुढे मुलांच्या शाळेनं ते प्लास्टिक कोटेड कागद नाकारले, पर्यावरणासाठी अशी कव्हर्स नको असं सांगण्यात आलं आणि परत एकदा जाड कॅलेंडरचे कागद कामी आले..त्या कव्हरमुळे पुस्तकं बऱ्यापैकी सुरक्षित राहायची..लेकीची एक मैत्रीण साध्या कागदांची कव्हर्स घालून त्यावर सुंदर सुंदर चित्र काढायची पानाफुलांची.. सगळ्यांत उठून दिसायची तिची वह्या पुस्तकं..
लेकीच्या लग्नात भेट देण्याच्या वस्तूंसाठी सुंदर खणाचे आणि रेशमी कापडाचे बटवे शिवून घेतले.. दिलेल्या भेटवस्तूंना एक वेगळी मिती प्राप्त झाली.....
नुकताच संपुट शब्दाचा अर्थ समजला , कुठल्याही मंत्रोच्चारानंतर काही मंत्र म्हणले जातात ज्यामुळे त्या आधी उच्चारलेल्या मंत्रांची शक्ती वाढते..
मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदसरथ अजिर बिहारी।।
दीन दयाल बिरिदु संभारी। हरहु नाथ मम संकट भारी।।
हे दोन संपुट मंत्र ( चौपाई) सगळ्यांत जास्त लोकप्रिय आहेत.बीजमंत्रांना कवच म्हणजे सुरक्षितता देणारा मंत्र म्हणजे संपुट, वृध्दिंगत करणारा! काही ठिकाणी आधी आणि नंतर दोन्ही वेळेला हे संपुट मंत्र म्हणतात..हे ऐकल्यावर एकदम वेगळं काहीतरी वाटलं.मी काही त्यातली ज्ञानी नाही परंतु ही सकारात्मक संकल्पना मला फार फार भावली.माझ्या सामान्य बुद्धीला आणि मनाला एकदम उजळवून गेली.एकदा संपुटचा अर्थ कळल्यावर इतक्या गोष्टी डोळ्यासमोर यायला लागल्या, मनात फिरायला लागल्या.. काही नाती, काहींची मैत्री हे असे संपुट मंत्र आहेत जे आयुष्यात एक प्रकारची समृद्धी देतात.वरवर बघितलं तर चारचौघांसारखं नातं किंवा मैत्री असते पण त्यात एक वेगळा झरा असतो.ती व्यक्ति भेटली की मनापासून आनंद होतो,सुकून मिळतो.ती व्यक्ति नातेसंबंधात अगदी सहज एक सुरक्षिततेचं वेष्टण घालत असते..एक अर्थगर्भ भर घालत असते.. पांघरुण नाही पण एक उबदार आवरण..काही कवचाचे धागे विणते. अशी नाती कधीच गुदमरवत नाहीत, प्रवाही,तरल असतात.विलक्षण ऊर्जा देऊन जातात.
कोण कुठल्या वेळी, कुठल्या स्वरुपात संपुट मंत्राचं काम करेल सांगता येणं अवघड आहे.कधी कधी तर ती व्यक्ति किंवा गोष्ट काम झालं की अलगद बाजूला होऊन जाते, आपल्यालाही नकळत!
एखाद्या व्यक्तिचे केवळ अस्तित्त्व, आपल्या आजूबाजूला असणं, किंवा जगाच्या पाठीवर कुठंतरी ते असणं,कधी त्यांचे शब्द तर कधी कृती हे सुरक्षितता प्रदान करत असतात..कोणी जेंव्हा काही सकारात्मक धीराचे कौतुकाचे चार शब्द लिहितं, बोलतं, कधी न बोलता कृती करतं एखादी गोष्ट आपल्यासाठी मुद्दाम केलीये हे समजतं तेंव्हा आपली ताकद वाढते हे आपसूक जाणवतं..
आज एक इन्स्टाग्रामवर विडिओ बघितला त्यात ती creator म्हणते की काही लोक तुमच्या आयुष्यात छत्रीसारखी असतात, जन्मानं तुमचं नातं नसतं पण त्यांना तुम्ही निवडलेलं असतं,ती तुमच्या आयुष्यात पावसापुरती येतात.तुम्हाला ते कधीही पावसाची झड लागू देत नाहीत..अशा कित्येक छत्र्या नजरेसमोरुन गेल्या , मोजक्या,निवडक पण अगदी निश्चित आणि आतून निश्चिंत करणाऱ्या!
कठीण काळात तर विशेषच पण एरवीही काही माणसं संपुट मंत्रासारखी असतात. feel good factor बनून राहतात, आनंद पेरत राहतात..
Big panda and little dragon हे एक अगदी गोड पुस्तक आहे,James Norbury ह्या लेखकाचं .अजिबात शारीर साम्य नसलेल्या दोन प्राण्यांमधला आशयघन संवाद असलेलं. एकमेकांबरोबर सर्व ऋतू चालताना ते एकमेकांना सांभाळून कसे जातात ह्याचा अगदी प्रसन्न टवटवीत लेखाजोखा आहे त्यात.
Which is more important,' asked Big Panda, 'the journey or the destination?'
'The company,' said Tiny Dragon.
संपुट मंत्राचं सान्निध्य मग ते कुठल्या स्वरुपात मिळेल सांगता येत नाही...
आयुष्यात माझ्यासाठी आईबापूंच्या भावांच्या कालजयी आठवणी, बापूंनी दिलेला आत्मविश्वास,आईचा तिच्या शांत ,समाधानी आणि सम्यक स्वभावातून आलेला ठेहराव मला इतक्या वेळा मार्गदशक ठरला आहे. तो योग्य वेळी, माझी मात्रा कमी पडत असली की चालना देतो..शक्ति कमी पडत असेल तर बळ देतो. निरपेक्ष प्रेम कुठं कमी पडत असेल ते माझ्या आयुष्यातल्या चार पायांच्या दोस्तांची आठवण आणि स्वच्छ निर्मल मन असणारं त्यांचं अस्तित्व, तो ओलावा सुरक्षित धरुन ठेवतं.. जोडीदाराचा धीरोदात्त हात , मुलांची खट्याळ पण समंजस नजर,भोवती मायेचं कडं केलेल्या मैत्रिणी आणि जीवाभावाची माणसं किती किती संपुट मंत्र माझ्या आजूबाजूला आणि समीप आहेत..
कोणाला त्यांचे गुरु असतील, कोणाला काही पुस्तकं,एखादं दर्शन,कोणाला साधना उपासना,एखादी कला, अभ्यास, कोणाचा जन्म, कोणाला एखादा अनुभवसुद्धा असू शकेल पण आपण संपुट नक्की अनुभवला असेल.. आपल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लिहिलेत तुम्ही.

संपुट = a warm, assuring hug ही संगती perfect लागली आहे.

सुदैवाने मागची आणि पुढची - दोन्ही पिढ्या संपुट ठरत आहेत, त्यामुळे फार रिलेट झाले.

Gift wrapping परिच्छेदाबद्दल - salute from the soul twin Happy

किती सुरेख लिहीलं आहेत. मी तुमचं नाव वाचून उघडला हा लेख.
संपुट ह्या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. अनिंद्यंंची प्रतिक्रिया पण आवडली.
माझी आहे अशी मैत्रिण, या व्याख्येत बसणारी. खूप घट्ट नातं आहे.

कालच हा लेख वाचला.प्रतिक्रिया द्यायची राहून गेली.अतिशय तरल लिहिले आहे.विस्मरणात गेलेले शब्द परत वाचनात अधिक ताकदीने येत आहेत हे पाहून बरे वाटले.
संपुट फक्त औषधामध्ये करतात अशी गैरसमजूत/अल्प ज्ञान होते.

काय कमाल लिहिले आहे.
खूप भावलं मनाला. वाचता वाचता मला स्वतःला लाभलेली संपुटे आठवली.
इतके दिवस मला फक्त आयुर्वेदिक औषधे बनवताना पुटं आणि संपुटं चढवतात तेच माहिते होते. हा लेख फारच छान आहे मी मझ्या जवळच्या माणसांना नक्की दाखवेन.

देवकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद! मला औषधातल्या संपुटबद्दल काही माहिती नाही, मला आवडेल जाणून घ्यायला, गंमत म्हणजे माझ्या नृत्य शिकणाऱ्या भाचीनं संपुट मुद्रा असते असं कळवलं आहे आणि तीसुद्धा protection ह्या अर्थाची आहे..

देवकी प्रतिसादाबद्दल धन्यवाद! मला औषधातल्या संपुटबद्दल काही माहिती नाही, मला आवडेल जाणून घ्यायला, गंमत म्हणजे माझ्या नृत्य शिकणाऱ्या भाचीनं संपुट मुद्रा असते असं कळवलं आहे आणि तीसुद्धा protection ह्या अर्थाची आहे..

आईबापूंच्या भावांच्या कालजयी आठवणी, बापूंनी दिलेला आत्मविश्वास,आईचा तिच्या शांत ,समाधानी आणि सम्यक स्वभावातून आलेला ठेहराव मला इतक्या वेळा मार्गदशक ठरला आहे. तो योग्य वेळी, माझी मात्रा कमी पडत असली की चालना देतो..शक्ति कमी पडत असेल तर बळ देतो. निरपेक्ष प्रेम कुठं कमी पडत असेल ते माझ्या आयुष्यातल्या चार पायांच्या दोस्तांची आठवण आणि स्वच्छ निर्मल मन असणारं त्यांचं अस्तित्व, तो ओलावा सुरक्षित धरुन ठेवतं.. जोडीदाराचा धीरोदात्त हात , मुलांची खट्याळ पण समंजस नजर,भोवती मायेचं कडं केलेल्या मैत्रिणी आणि जीवाभावाची माणसं किती किती संपुट मंत्र माझ्या आजूबाजूला आणि समीप आहेत..>> मग तुमचे तुम्ही जीवनात काय उभे केले आहे. संसार प्रचंड भौतिक व भावनिक प्रिवि लेज मध्ये. आर्थिन्क बाबीत लोअर क्लासेस ची जाणीव कधी मनास स्पर्शून गेली आहे का. पावसाळी रात्री,
काहीही दुसरा आधा र नसताना नातेवाइ काला इमर्जन्सीत अ‍ॅडमिट केल ईण्सू अरन्स ची धा वपळ केली आहे का? पॅलेस्टाइन मध्ये मुले बबीज मरतात दोन नवजात बॅबी ज जन्म दाखले मिळाल्याव्र दुस र्या क्ष्णा ला मेली हे माहित आहे का.

लक्षात घ्या प्रतिसादक व लेखकांनो, मी हे कोणत्याही असुयेतून किंवा हेव्या तून ह्यांचं बरं आहे बाई. अश्या भावनेतून लि हित नाही. त्यांची क्षितिजे थोडी वर्त्मान काळात यावीत असा प्रयत्न आहे. कायम फिरु फिरून भोपळे चौक पद्धतीने आईबबा नवारा कुत्रे मुलं ह्याच चौकटीत बसवलेला नॉस्टाल्जिआ वाचावा लागतो आता पन्नाशी उलटली तर काही स्वतःचे उसूल मी ही अशी आहे अश्या नव्या विचार पद्धाती का दिसत नाहीत ऑनेस्त प्रश्न. पिम्पुट्कर पिम्पळे प्रकरण बरे त्या पेक्षा. इत्स २०२४ डीअर. प्रतिसाद समजलाच नाही तर इग्नोअर.

गौरी काय सुरेख लिहितेस ग...
जगात अनेक वाईट गोष्टी घडत असतात, आपल्या आयुष्यातही. पण तसच अशी काही संपुटंही असतात. जी जपून ठेवायची असतात. काहींना अशी सकारात्मकता दिसते, समजते अन ती सांभाळून, जपून ठेवणंही जमतं. इतकच नाही तर ती इतरांनाही उलगडून दाखवणं जमतं. त्यातली तू एक आहेस! जियो!!
सकारात्मक अनुभव पाहण्या, जपण्यासाठी फार सृजनता लागते. कारण ती सहजी दिसून येत नाही. दु:ख, वाईट, नकारात्मक असं ठक्कन समोर येतं. पण सकारात्मकता सापडावी लागते, शोधावी लागते. ती देणगी तुला लाभलीय. अन हे सगळे अनुभव अतिशय तरलपणे, अलवारपणे तू लिहू शकतेस.
बहिणाबाई म्हणते न,
माझं दुखं, माझं दुखं,
तयघरात कोंडले
माझं सुख, माझं सुख
हंड्या झुंबर टांगले
अगदी तसं करतेयस तू. अन त्या झुंबरात आम्हालाही प्रकाशाची वाट दाखवतेयस. थँक्यु Happy

ज्येष्ठा गौरी, तुमचं सगळं लिखाण मी आवर्जून वाचते. मला तुमचं तरल, समंजस आणि सखोल लिखाण खूप आवडतं. इतक्या ओघवत्या भाषेत आणि डौलदार मराठीतलं लिखाण आता फारसं वाचायला मिळत नाही. सुखं प्रत्येकाची वेगळी पण दु:खाची जातकुळी एक असते. फार वर्णन न करता लिहीलेल्या दु:खाच्या जाणीवा वैयक्तिक अनुभवांमुळे जास्त स्पर्श करतात.
वरचा अवलचा प्रतिसाद आवडला आणि पटला. लिहीत रहा. पुढच्या लेखाची वाट बघते आहे.

सुंदर!
या लेखाच्या निमित्ताने मलाही माझ्या भोवतीच्या संपुटांची पुन्हा एकदा जाणीव झाली आणि मन कृतज्ञतेने भरुन गेले!
अवल किती सुंदर प्रतिसाद!
अनया, तुझा प्रतिसादही आवडला. डौलदार मराठी > किती नेमक्या शब्दात वर्णन केलेस!

किती सुरेख लिहीलं आहेत. मी तुमचं नाव वाचून उघडला हा लेख.
संपुट ह्या शब्दाचा अर्थ माहिती नव्हता. अनिंद्यंंची, अवलची प्रतिक्रिया पण आवडली.+११११
अमा ह्यांचा मुद्दा सुद्धा पटला

जगात अनेक वाईट गोष्टी घडत असतात, आपल्या आयुष्यातही. पण तसच अशी काही संपुटंही असतात. जी जपून ठेवायची असतात. काहींना अशी सकारात्मकता दिसते, समजते अन ती सांभाळून, जपून ठेवणंही जमतं. इतकच नाही तर ती इतरांनाही उलगडून दाखवणं जमतं. त्यातली तू एक आहेस! जियो!!
सकारात्मक अनुभव पाहण्या, जपण्यासाठी फार सृजनता लागते. कारण ती सहजी दिसून येत नाही. दु:ख, वाईट, नकारात्मक असं ठक्कन समोर येतं. पण सकारात्मकता सापडावी लागते, शोधावी लागते. ती देणगी तुला लाभलीय. अन हे सगळे अनुभव अतिशय तरलपणे, अलवारपणे तू लिहू शकतेस.
बहिणाबाई म्हणते न,
माझं दुखं, माझं दुखं,
तयघरात कोंडले
माझं सुख, माझं सुख
हंड्या झुंबर टांगले
अगदी तसं करतेयस तू. अन त्या झुंबरात आम्हालाही प्रकाशाची वाट दाखवते

>>+१

लेख सुरेख

अतिशय खोल आणि सुंदर चिंतन.
असं काही वाचलं की आपल्या द्विमितीच्या जीवनाला अचानक एक अर्थपूर्ण तिसरी मिती प्राप्त होते आणि आपल्याला आपल्याच जीवनातल्या खोलवरचं काहीतरी दिसू लागतं, रंगबिरंगी करून जातं.
असे चिंतन अधून मधून वाचायला मिळते तेव्हा एकदम ताजेतवाने करून जाते.

सुंदर लेख आहे.
संपुट हा नवीन शब्द समजला. त्याचा अर्थ आणि त्या निमित्ताने केलेला विचार फार आवडला Happy

ऋन्मेष प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! मलाही ह्या निमित्तानं संपुट मुद्रा, पुट आणि संपुट अशा नवीन गोष्टी कळल्या..

वर नृत्यातल्या संपुट मुद्रेचा उल्लेख आल्याने मग भरतनाट्यमविन्यास चेकवले. शुकतुंड, पताका, संपुट, सर्पशीर्श, मृगाक्ष …. नृत्यमुद्रांच्या वेगळ्याच दुनियेत फिरुन आलो. आजचा दिवस आनंदी झाला. त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या भाचीचे आभार. जय हो !

नाही नाही ज्येष्ठागौरी.... तुम्ही नाही..
तुमचं लेखन वाचल्यानंतर आपल्याच जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी वाचकाला मिळते , असं म्हणतोय मी.

Pages