महालय, श्राद्ध, म्हाळ, पितृपक्ष वगैरे

Submitted by अनिंद्य on 1 October, 2024 - 05:13

महालय, श्राद्ध, म्हाळ, पितृपक्ष वगैरे :

प्रसंग जुना, स्थळ कोलकात्यातली एक अतिगलिच्छ जुनाट पडकी वस्ती - ओल्ड ट्रक टर्मिनस. उघड्या नाल्या-गटारे, रस्त्यावर ओघळणारे सांडपाणी, घनदाट लोकवस्ती आणि अरुंद गल्ल्यामधून मुंग्यांप्रमाणे भिरभिरत चालणारी शेकडो कळकट्ट माणसे. तिथे क्वान यिन देवीचे रेड चर्च/सी ईप आणि काही अन्य चिनी चर्चेस बघण्याच्या मिषाने केलेलं धाडस हा चुकीचा निर्णय असे किंचाळून सांगणारी एकूण परिस्थिती.

चायनीज चर्च नाव असले तरी देऊळच ते. बाहेरच्या विद्रुप जगापेक्षा वेगळे, शांत. तिथे आत एक समारोह साजरा होत होता, अनेक पदार्थ वाढलेले ताट आणि भोवताली काहीतरी पुटपुटत मनोभावे प्रार्थना करणारे लोक. नक्कीच चिनी लोकांचा काही सण असावा.

IMG_7224_0.jpeg

माझा सारथी बबलू आणि त्यानीच शोधून काढलेला चायनाटाऊन एक्स्पर्ट चीनवंशी गाईड मोंटू दोघे भक्तिभावाने नमस्कार करून बाजूला झाले. मोंटूने सांगितले – ‘सर, मी निघतांना सांगायला विसरलो तुम्हाला. आज आमचा हंग्री घोस्ट फेस्टिवल छिंग मिंग (Quing Ming) ! आमचे ढगात गेलेले पूर्वज आज जेवायला येतात इथं पृथ्वीवर. आता या गटारगंगेत नसते आले तरी ठीकच होते.’ तुटके पिवळे दात दाखवत मोंटू खळखळून हसला. 'जसा आपल्या हिंदू लोकांचा पितृपक्ष सर, इथल्या बंगाल्यांचा महालय' बबलूनी गंभीर चेहऱ्यानी अधिकची माहिती पुरवली.

थोड्याच दिवसात पुन्हा एका कामानिमित्त कोलकात्याला जावे लागले तेंव्हा दुपारच्यावेळी सुस्नात दीर्घकेशा बंगाली स्त्रिया हुगळीच्या पाण्यात उभे राहून ओलेत्यानी तर्पण करीत होत्या, शेकडोंच्या संख्येत. एकही पुरुष तसे करतांना नाही दिसला. एरव्ही दुपारच्या कुणी स्त्रिया नदीपात्रात स्नान करतांना आधी कधी दिसल्या नव्हत्या. बबलूला विचारले तर म्हणाला – ‘सर, आज मोक्ष अमावस्या आहे, मध्यान्हीचा कुतुप मुहूर्त आहे आणि या बंगाली स्त्रिया पितृतर्पण करीत आहेत. बंगाल्यांकडे स्त्रियाच श्राद्ध करतात’. थोडे आश्चर्य वाटले कारण हरिद्वार, गया, पुष्कर, मुंबईतील बाणगंगा, अन्यत्र मी फक्त पुरुषांना असे करतांना बघितले होते. जेष्ठ पुत्र म्हणून दक्षिणावर्ती होऊन दर्भाची अंगठी घालून श्राद्धादि कर्मकांड माझ्याकडूनही करून घेण्यात आले होते, ते माझ्या स्मृतीत होते.

इतक्यातच इकडे मुंबईत मदतनीस ताई एक दिवस सुट्टीवर जाते म्हणाली. "म्हाळाचा वखत, पितर जेवायचे हायेत माझ्याकडे" असे कारण. 'पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक दिवस' ह्या एका समान सूत्रातले वैविध्य दाखवणारे सगळे प्रसंग.

* * *

अनंत चंदुर्दशीला गणपती विसर्जन झाले की एक दिवस सोडून येतो पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पितृपक्ष. पंधरा दिवस संपतांना येते भाद्रपदाची अमावस्या तथा सर्वपितृमोक्ष अमावस्या. महाराष्ट्रात म्हाळ, पितर जेवणे, पितृपंधरवडा तर मिथिला, ओरिसा, बंगालमध्ये महालय अशी नावे प्रचलित आहेत. श्राद्ध म्हणा, महालय, म्हाळ, पितर जेवणे म्हणा की पितृतर्पण, पितर पक्ष-पाख-पाट-पाटा-पाठ. भावना सारखीच. गणपती ते नवरात्राच्या मधला हा पंधरवडा शुभ कामांसाठी, नवीन कामे सुरु करण्याकरता वर्जित असल्याचे देशभरातले सर्वच पंचांगकर्ते सांगतात.

दरवर्षी या पंधरा दिवसात सोडून गेलेल्या पूर्वजांचे आत्मे आपल्या वंशजांना भेटायला परत येतात आणि त्याच्या हातून खाऊन-पिऊन परत जातात अशा विश्वासावर हा प्रकार रचलेला आहे. आश्चर्य म्हणजे ज्या वेदांची साक्ष सर्व धार्मिक कर्मकांडांसाठी काढली जाते त्या वेदांमध्ये श्राद्ध ही कल्पना नाही. उपनिषदांमध्येही श्राद्ध संकल्पना नाही, अर्यमा ह्या वृद्ध मानवाला किंवा मानवस्वरूप देवतेला नमस्कार तेवढा आहे. मनुस्मृती, मार्कंडेय पुराण, आणि अन्य पुराणांमध्ये मात्र श्राद्ध संकल्पना विकसित होत गेली आहे, गरुड पुराणात विस्तृत (आणि आचरट) विस्तार पावलेली आहे. मार्कण्डेय पुराणात रूची नामक ऋषीला त्याच्या पितरांनी स्वप्नात येऊन त्यांचे श्राद्ध करायला सांगितले आणि त्याने वेदांमध्ये असा काही विधी नाही म्हणून मी हा मूर्ख उपचार करणार नाही असे त्यांना सांगितल्याची आणि त्यामुळे रुचीचे कोणतेही अकल्याण झाले नसल्याची कथा आहे. मुळात आत्मा अमर असणे आणि त्याने मानव शरीर त्यागून आपल्या भल्याबुऱ्या कर्माप्रमाणे नवीन जन्म घेणे किंवा मोक्ष, नरक, स्वर्ग वगैरे मिळवणे आणि त्याच आत्म्यांनी परत दरवर्षी आपल्या पूर्वजन्मीच्या मानव वंशजांना भेटायला जाणे हे काही जुळत नाही. पण परंपरा तर्कावर आधारित नसतात, त्यात भावनेचा भाग ठळक असतो. त्यामुळेच की काय हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, प्राचीन चिनी -जपानी बौद्ध आणि ताओ - शिन्तो मते असोत की अन्य आदिम धर्मकल्पना, जगात सर्वत्र पूर्वजांसाठी असे कर्मकांड आढळते.

IMG_7228.jpeg

* * *

ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम तीनही अब्राहमिक धर्मांमध्ये श्राद्धसदृश्य परंपरा आहेत. इस्लामिक गणनेप्रमाणे शाबान महिन्याच्या पंधराव्या रात्री मुस्लिम बांधव 'शब-ए-बारात' (उच्चारी शबेरात) हा सण दिवसभर उपास, रात्रीच्यावेळी स्मशानात पितरांच्या कबरींची स्वच्छता, तिथे फुले वाहून, ऊद जाळून, प्रार्थना करून साजरा करतात. गोडधोड जेवण पूर्वजांना अर्पण करून ते स्वतः खाणे, स्वतः आणि पूर्वजांनी कळत-नकळत केलेल्या अपराधांची क्षमा मागून पितरांना सद्गती देण्यासाठी ईश्वराची करुणा भाकणे असा एकूण कार्यक्रम.

ख्रिश्चन धर्मियांचे लेन्टचा पवित्र महिना, 'All Saints Day " आणि त्यापाठोपाठ येणारा "All Souls Day ' हे दरवर्षी १ आणि २ नोव्हेम्बरला साजरे होणारे सण श्राध्दपक्षासारख्याच परंपरा. लेन्टच्या महिन्यात लग्न, साखरपुडा, नामकरण वगैरे शुभकार्य वर्जित. या महिन्यात पूर्वजांचे आत्मे आपापल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत जेवायला पृथ्वीवर येतात अशी धारणा आहे. महिन्यातल्या खास दिवशी किंवा दररोज तयार जेवण आणि वाईन पितरांसाठी टेबलावर मांडून सर्व कुटुंबीयांनी त्या खोलीतून बाहेर जावे, पूर्वजांचे आत्मे येऊन तिथे जेवतात आणि मग थोड्यावेळाने ते जेवण सर्वांनी जेवावे अशी प्रथा कॅथॉलिक पंथात विशेष आहे.

IMG_7249_0.jpeg

रोमन कॅथेलिक परंपरेत ‘ऑल सोल्स डे’ ला पूर्वजांच्या कबरी स्वच्छ करून, फुले वाहून त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना करणे जास्त महत्वाचे मानतात.

* * *

हिंदुजनांमधे तिथीप्रमाणे ज्या ज्या तिथीला आप्तजन जग सोडून गेले पितृपक्षातल्या त्या त्या तिथीला त्यांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या आवडीचे जेवण तयार करून ते पूर्वजांना अर्पण करावे आणि मग कावळा, कुत्रा, गाय, अतिथी आणि परिवार या क्रमाने सर्वांनी खावे असा ढोबळ शिरस्ता. शुक्ल किंवा वद्य प्रतिपदेला मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे श्राद्ध प्रतिपदेला, द्वितीयेला गेलेल्या व्यक्तीचे द्वितीयेला अशी साधारण परंपरा. संन्यासी, अपत्य असलेल्या विवाहित स्त्रिया, शस्त्राने किंवा क्रूर मृत्यू आलेल्या व्यक्ती असे सर्वांसाठी वेगवेगळे दिवस नियुक्त आहेत. राजे-महाराजे आणि काही महद्जन सोडले तर सर्वसाधारण कुटुंबांमध्ये एक किंवा दोन पिढ्यांपेक्षा जास्त जुन्या पूर्वजांची नावे आणि त्यांची क्षयतिथी म्हणजे त्यांच्या मृत्यूची तिथी माहित असणे दुरापास्त. त्यांच्यासाठी 'ऑल इन वन' असे एकच श्राद्ध शेवटच्या दिवशी अमावस्येला करतात. या सर्व कार्यक्रमात कावळ्याचे महत्व फार. वाढलेल्या अन्नाला-पाण्याला कावळ्याने स्पर्श केला म्हणजे पूर्वजांची तृप्ती झाली असे मानतात.

IMG_7248.jpeg

जेष्ठ पुत्राने पितरांना अन्नोदक द्यावे ही सर्वमान्य प्रथा असली तरी तो नसेल तर इतर पुत्र, नातू, भाऊ, भावाचा मुलगा, मुलीचा मुलगा, जावई, स्वपत्नी, सून, मुलगी अशा क्रमाने श्राद्धाचे कर्तव्य करण्यासाठीची उतरंड आहे. रामायणात वनवासात असतांना सीतेने गया मुक्कामी श्वशुर राजा दशरथाचे श्राद्ध केल्याचा प्रसंग आहे, राजाला चार चार समर्थ जीवित पुत्र असूनही. एकूणच या बाबतीत रूढी परंपरा थोड्या लवचिक आहेत, स्थान - समाजागणिक वेगवेगळ्या आहेत. उदा. नम्बुदरी समुदायाचा अपवाद वगळता मल्याळीजन आई आणि कुटुंबातील मातृतुल्य स्त्रियांचे श्राद्ध करीत नाहीत. आईच्या गर्भात तिच्या रक्तसिंचनावर आणि जन्मानंतर मातृक्षीरावर पोसलेला जीव मृत्युपश्चातही तिचे ऋण फेडू शकत नाही असा विश्वास त्यामागे आहे. बंगालमध्ये स्त्रिया त्यांच्या माहेर आणि सासरच्या सर्व स्त्रीपुरुषांचे श्राद्ध करतात. जननी (आई) आणि अन्नदात्री (पत्नी /पुत्री/सून/नातसून) ह्यांचा कुटुंबातील जेष्ठ-पितृजनांवर अधिकार सर्वोच्च आहे अशी भावना त्यामागे आहे.

श्राद्धाच्या जेवणाचा मेन्यू भारतात प्रांतानुसार वेगवेगळा आहे. ढोबळ मानाने तांदळाची किंवा रव्याची खीर, पुरी, उडदाचे वडे/ दहीवडे, मिश्र डाळीचे वडे, दुधीभोपळा किंवा तत्सम भाजी असे जेवण महाराष्ट्र आणि नर्मदेच्या उत्तर भागात तर भाताचे प्राबल्य असलेल्या पूर्व आणि दक्षिण भारतात दहीभात, तळलेले उडीद वडे, खिचडी वगैरे. गेलेल्या व्यक्तीच्या आवडीचे खाद्यपदार्थ करण्याकडे कल असतो. प्रस्तुत लेखकाने अनेक जागी विड्या, तंबाखूयुक्त विडे, मोहाची किंवा अन्य देशी-विदेशी दारू वगैरे पितरांसाठी ठेवलेली बघितली आहे.

IMG_7238.jpeg

गेलेल्या माणसाला विशेष आवडत असल्यास किंवा कुटुंबाचा तोच प्रमुख आहार असल्यास मत्स्याहार, मांसाहार अनेकांकडे श्राद्धाला असतो. पूर्वाश्रमीच्या गावकुसाबाहेरच्या जमातींमध्ये भाकरी आणि दूध असा साधा 'निवद' ठेवतात तर आदिवासी समूह शिजवलेला हातसडीचा भात, मीठ आणि मोहाची फुले किंवा मोहाची दारू पूर्वजांना अर्पण करतात. विदर्भ- मराठवाडा -तेलंगणच्या काही भागात मोहाच्या पानांच्या पत्रावळींवर श्राद्धाचे जेवण वाढण्याची परंपरा आहे. एरवी केळीच्या पानांवर नेहेमी जेवणारे तमिळ, मल्याळी बंधू श्राद्धाचे जेवण अन्य पानांपासून बनवलेल्या पत्रावळीत वाढताना-खातांना दिसतात. त्यामागे 'आमच्याकडे असेच असते' यापलीकडे काही तर्क दिसत नाही पण अनेक लोक परंपरेने आलेल्या आस्था आणि रूढी पाळतात हे एक निरीक्षण.

* * *

चटावरचे श्राद्ध, हात वर करणे, काखा वर करणे असे काही श्राद्धासंबंधी क्रिया व्यक्त करणारे विशिष्ट वाक्प्रयोग फक्त मराठी भाषेतच आढळतात, त्यामागच्या काही समजुती / लोकस्मृती :

चटावरचे श्राद्ध:
शब्दशः चट म्हणजे दर्भ, एकप्रकारचे गवताचे पाते. पूजा-अर्चा करण्याकरता ऐनवेळी पुरोहित आला नाही तर त्याच्याऐवजी दर्भाची प्रतिमा ठेवतात त्यालाही ‘चट’ म्हणतात.

पार्वण श्राद्ध करतांना व्यक्तीच्या आई आणि वडिलांकडच्या तीन पिढ्या अन्नोदकासाठी एकत्र येतात अशी एक कल्पना आहे. यात एका चटावर दिवंगत पिता, पितामह, प्रपितामह सर्व सपत्निक अर्थात आई, आजी आणि पणजी यांसह येउन अन्न-पाणी-स्वागत स्वीकारतात, दुसऱ्या चटावर मातामह, प्रमातामह, वृद्ध प्रमातामह हे सपत्निक येतात आणि तिसऱ्या चटावर अन्य निकटस्थ, विश्वदेव येतात इत्यादी कल्पना आहेत. एकूण किमान बारा जण एक एक करून येणार, मंत्र श्रवण करणार, खाणार-पिणार, आशीर्वाद वगैरे देणार आणि मग पुढच्या प्रवासाला जाणार. बराच मोठा, निवांत आणि खर्चिक प्रकार. हे सर्व करू न शकणाऱ्या व्यक्तींनी एक चट मांडून त्यावर फक्त पाणी शिंपडले आणि मनोभावे प्रार्थना केली तरी सर्व पितृ समाधानी होतात असे ते 'चटावरचे श्राद्ध' - झटपट, टाईम अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. त्यावरून झटपट काम आटोपणाऱ्या प्रसंगाला 'चटावरचे श्राद्ध उरकणे' असा मराठी वाक्प्रयोग प्रचलित झाला असावा.

पाप्याचं पितर:
अति दुबळा, दुर्बल मरतुकडा. जे पापी लोक असतात ते आपल्या पितरांना कधी अन्नोदक देत नाहीत किंवा त्यांच्या हातचे त्याचे पितर खात नाहीत, त्यामुळे कुपोषित राहिलेला माणूस असा अर्थ.

पितर काढणे / पितर उद्धरणे:
बापावरून, नातलगांवरून शिव्या देणे, अर्वाच्य शिवीगाळ करणे.

काखा / हात वर करणे:
फार गमतीशीर स्टोरी आहे इथे. पूर्वजांसाठी श्राद्ध करणे आणि त्यानिमित्त पुरोहिताला दक्षिणा देणे हा उपचार आहे, खिश्यात पैसेच नसले तर कसले श्राद्ध आणि कसली दक्षिणा? मूळ श्लोकच वाचा, भावार्थासह :

असमर्थोऽन्नदानस्य धान्यमामं स्वशक्तितः ।
प्रदास्यति द्विजाग्र्येभ्यः स्वल्पाल्पां वापि दक्षिणाम् ॥
(अन्नदान शक्य नसले तर थोडे धान्य आणि थोडेसे द्रव्य दक्षिणा म्हणून द्यावे)

तत्राप्यसामर्थ्ययुतः कराग्राग्रस्थितांस्तिलान् ।
प्रणम्य द्विजमुख्याय कस्मैचिद्भूप दास्यति ॥
(तेही शक्य नसेल तर नमस्कार करून मूठभर तीळ तरी द्यावे )

तिलैस्सप्ताष्टभिर्वापि समवेतं जलाञ्जलिम् ।
भक्तिनम्रस्समुद्दिश्य भुव्यस्माकं प्रदास्यति ॥
(मूठभर तीळही नसतील तर विनम्रभावे सात-आठ तीळ घातलेले पाणी जलांजली म्हणून द्यावे)

यतः कुतश्चित्सम्प्राप्य गोभ्यो वापि गवाह्निकम् ।
अभावे प्रीणयन्नस्माञ्च्छ्रद्धायुक्तः प्रदास्यति ॥
( तेही शक्य नसेल तर कुठूनही गाईसाठी थोडा चारा तरी आणून द्यावा)

सर्वाभावे वनं गत्वा कक्षमूलप्रदर्शकः ।
सूर्यादिलोकपालानामिदमुच्चैर्वदिष्यति ॥
(वरीलपैकी सर्वच वस्तूंचा अभाव असेल तर वनात जाऊन सूर्य आणि अन्य दिक्पालांना काखा दाखवत म्हणजेच डोक्यावर हात जोडून उच्च स्वरात खालील याचना करावी )

न मेऽस्ति वित्तं न धनं च नान्य च्छ्राद्धोपयोग्यं स्वपितॄन्नतोऽस्मि ।
तृप्यन्तु भक्त्या पितरो मयैतौ कृतौ भुजौ वर्त्मनि मारुतस्य ॥
(माझ्याकडे श्राद्ध कर्मासाठी वित्त, धन किंवा कोणतीच सामग्री नाही, मी दोन्ही भुजा आकाशाकडे करून पितरांना नमस्कार करतो आहे, त्यांनी माझ्या भक्तीनेच तृप्त व्हावे, माझ्याकडे त्यांना देण्यासारखे अन्य काहीच नाही, मी हतबल आहे)

कोणतीही मदत करायला पूर्णतः हतबल आहे हे सांगण्यासाठी 'काखा वर करणे' हा वाक्प्रयोग असा प्रचलनात आला.

* * *

चीन आणि जपान किंवा एकूणच सुदूर आशियात भारतातून हिंदू आणि बौद्धमताचा प्रचार-प्रसार झाला असल्याने अनेक मिश्र परंपरा आणि चालीरितींचा पगडा आहे. इंडोनेशियातल्या जावा, सुमात्रा, बाली बेटांवर जवळपास भारतीय हिंदूंसारखाच वार्षिक श्राद्धविधी होतो. वर चीनच्या Quing Ming चा उल्लेख आलेला आहेच. चीन मोठा देश आहे त्यामुळे प्रांतांप्रमाणे थोड्या फरकांनी पूर्वजांच्या स्मृतिस्थळी जाऊन स्वच्छता करणे, ताओ मताप्रमाणे सुगंधी कागद पेटवून त्यात पितरांसाठी अन्न पाण्याची आहुती देणे, आदल्या रात्री तयार करून ठेवलेले शिळे जेवण जेवणे (शिळासप्तमीच की) अशा प्रथा आहेत.

IMG_7223.jpeg

उल्लंबन - उराबान (म्हणजेच उलटे लटकणे) हे आर्ष संस्कृत - प्राकृत भाषेतले शब्द जपानी बौद्ध-शिन्तो परंपरेत 'ओबान' सणाचे रूप घेते झाले आहेत. पूर्वजांचे आत्मे या दिवसात आपल्या कुटुंबाला भेटायला पृथ्वीवर येतात हा श्राध्दपक्षाचा सामान धागा तिथे आहे. त्याप्रित्यर्थ नाच-गाणे, भरपूर मदिरापान करत रात्र जागवणे, पितरांना आवडणारे खास पदार्थ करून खाणे - खिलवणे असा उत्सव जपानी मंडळी करतात. या दिवसात जपानी देवळांमध्ये पितरांसाठी 'सेगाकी' नामक विशेष प्रार्थना होते. तीन रात्र हा उत्सव चालतो.

IMG_7252.jpeg

आत्म्यांना घर शोधायला सोपे पडावे म्हणून पूर्वजांची नावे लिहिलेले कागदी कंदील घराबाहेर लावलेले सर्वत्र दिसतात. एक मजेशीर परंपरा अशी की ओबान प्रसंगी तरुण मुली त्यांच्या आईच्या आणि आजी (आईची आई), पणजीच्या (आईकडच्या आजीची आई) किमोनोच्या तुकड्यांपासून तयार केलेला जुना किमोनो घालतात. कुणाकडे किती जास्त जुना, किती पिढ्यांच्या कपड्यांचा किमोनो आहे हा भूषणाचा विषय Happy

IMG_7253.jpeg

थायलंड, म्यांमार, कंबोडिया, व्हियेतनाम इत्यादी पौर्वात्य देशात थोड्याबहुत फरकाने श्राद्धासारखा पितरांचा दिवस आहे आणि तो दरवर्षी उत्साहात साजरा करणारे लोकही. पैकी व्हियेतनामला Thanh Minh श्राद्धात 'शिळासप्तमी' असते Happy

हे सर्व असले तरी श्राद्ध फक्त मृत्यू आणि मृत्यूपश्चात होणारा विधी नसून त्याला उणे आणि अधिक अशी दोन्ही परिमाणं आहेत. जसे गेलेल्या व्यक्तीसाठी एकोद्दिष्ट किंवा पार्वण श्राद्ध असते तसेच कुटुंबात विवाह, अपत्यजन्म अशा निमित्ताने येणाऱ्या व्यक्तींसाठी आनंदप्रसंगीचे नांदी श्राद्ध / वर्धन श्राद्ध सुद्धा असते. भारतात अनेक प्रांतात लग्नप्रसंगीच्या किंवा बारश्याच्या मंगलगीतांमध्ये पूर्वजांना निमंत्रण देणारी गीते आहेत. असेच काहीसे जगातल्या अन्य संस्कृतींमध्येही आहे.

एकूणच मानववंशामध्ये आपल्या पूर्वजांविषयी प्रेम, आदरभाव, कृतज्ञता आणि काही प्रमाणात भीती या भावना जगाच्या पाठीवर सर्वत्र आहेत आणि त्यांनी कुटुंबावर केलेल्या ज्ञात अज्ञात उपकारांबद्दल, मदतीबद्दल आभार व्यक्त करण्याचा 'थँक्यू' म्हणण्याचा परिपाठही.

समाप्त.

• लेखातली काही चित्रे जालावरून साभार.
• प्रस्तुत लेखक स्वतः कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करीत नाही आणि त्याला उत्तेजन देत नाही. श्राद्धादि कर्मकांड, धार्मिक विधी यावर विश्वास असणाऱ्या आणि त्याविरुद्ध मत असलेल्या व्यक्तींबद्दल समान आदर बाळगतो.
• वैविध्यपूर्ण धार्मिक आणि सामाजिक लोकस्मृती आणि परंपरांचे दस्तावेजीकरण इतकाच ह्या लेखनामागचा हेतू आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखातील माहिती आणि विषयाची मांडणी आवडली. कुठेही रेंगाळला नाहीये. बहुतेक सगळ्या समाजात पूर्वजांचे स्मरण, पूजन, भोजन इत्यादी भावना समान आहेत, असं दिसतंय.

लेख शेवटच्या टीपेसहीत आवडला.
काखा वर करणे चा उगम इतका विस्तृत लिहिल्याबद्दल अनेक धन्यवाद. लेखातील भाषा ही सुंदर आहे.

वाचनीय लेख..
संन्यास घेतानाही काखा वर करणे असा विधि असल्याचं ऐकलंय.
त्यामागची भावना अशी की मी काखेमधेही कुठलंही सोनं, नाणं दडवून नेत नाहीये.

किती माहीतीपुर्ण रोचक लेख .

उगाच सहज अवांतर विचारतेय, तुम्ही आता कलकत्यावरुन हैद्राबादला शिफ्ट झालात का. सध्या हैद्राबादी धाग्यावर मस्त जोक्स लिहीत असता. पुर्वी कलकत्याचं वाचलंय. विषय कुठलाही असो, तुमची लिहीण्याची हातोटी आवडते.

छान लेख. मराठी वाक्प्रचाराचा उगम कळाला Happy पाप्याचे पितर म्हणजे पापी माणसाच्या पितरांना अन्न मिळत नाही म्हणून ते दुर्बल (शरिराने) तसा माणूस दिसणे, अशी माझी समजूत होती.

अमितला+११ . अनिंद्य जी ( मी सहसा कोणालाच ' जी' वगैरे लावत नाही, पण तुम्हाला नुसतंच नावाने संबोधणं जरा ऑड वाटलं) , सांगायचं काय तर मला तुमचे सगळेच लेख खूप आवडतात. तुमचे प्रतिसादही.
हा लेख वाचून आठवलं,कोरियन संस्कृतीत सुद्धा गेलेल्या लोकांसाठी बरंच काय काय करतात त्यांच्या स्मृतीदिनी. प्रत्येक केड्रामा मध्ये एक तरी हा प्रसंग असतोच. गेलेल्या माणसाच्या आवडीचा स्वैपाक, त्याची मांडणी पण एका विशिष्ट पद्धतीने असते. मागे कापडावर किंवा कागदावर कोरियन लिपीत बरंच काय काय लिहीलेले असतं. पुढे फोटो, आणि मग अनंत प्रकारचे पदार्थ. मग हे लोक बरेचदा वाकून उठबस करून नमस्कार करतात.

वाचतोय.... तुमच्या लेखात घडणारं संस्कृती दर्शन अगदी ओघवत्या शैलीत असतं ...
>>.नवीन कामे सुरु करण्याकरता वर्जित असल्याचे देशभरातले सर्वच पंचांगकर्ते सांगतात>>>> पितृपक्षात शुभ कार्य टाळण्याची गरज नाही..
दा. कृ. सोमण
https://www.google.com/amp/s/www.loksatta.com/thane/do-not-miss-auspicio...

प्रस्तुत लेखक स्वतः कोणत्याही प्रकारचे कर्मकांड करीत नाही आणि त्याला उत्तेजन देत नाही
>>>>
आणि तरीही इतका इंटरेस्टिंग लेख, कमाल आहे Happy

खूपच रोचक लेख.
जगभरातल्या इतक्या वेगवेगळ्या संस्कृतींमधे हा धागा समान आहे हे वाचून नवल वाटले..
नाहीतर मूर्तीपूजा हो - नाही, नास्तिक आस्तिक, तऱ्हेतऱ्हेचे पंथ, तत्त्वज्ञान, चळवळी...यात गुंतलेल्या समाजाला आपल्या पूर्वाजांबद्दल बद्दल वाटणारे प्रेम आणि जिव्हाळा सेम आहे..हे वाचून मन भरून आले.
उत्क्रांतीची बीजं यात दिसून येतात.......

अप्रतिम गोषवारा.
कर्णाची एक प्रचलित कथा...
श्राद्ध पर्व कर्ण को लेकर एक कथा प्रचलित है। कथा के अनुसार कर्ण की मृत्यु हो जाने के बाद जब उनकी आत्मा स्वर्ग में पहुंची तो उन्हें खाने के लिए बहुत सारा सोना और गहने दिए गए। कर्ण की आत्मा को कुछ समझ नहीं आया। तब उन्होंने देवता इंद्र से पूछा कि उन्हें भोजन की जगह सोना क्यों दिया गया।
कर्ण को वापस भेजा धरती
- देवता इंद्र ने कर्ण को बताया कि तुमने अपने जीवित रहते हुए पूरा जीवन सोना ही दान दिया। कभी अपने पूर्वजों को खाना दान नहीं किया। तब कर्ण ने कहा कि मुझे अपने पूर्वजों के बारे में पता नहीं था इसी वजह से मैं उन्हें कुछ दान नहीं कर पाया।
- इस सबके बाद कर्ण को उनकी गलती सुधारने का मौका दिया गया और 16 दिन के लिए पृथ्वी पर वापस भेजा गया, जहां उन्होंने अपने पूर्वजों को याद करते हुए उनका श्राद्ध कर उन्हें आहार दान किया। तर्पण किया, इन्हीं 16 दिन की अवधि को पितृ पक्ष कहा गया।.
(सौजन्य दैनिक भास्कर)

या ओघात भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांना ऐकले...
शहाजानने नजरकैदेत असताना औरंगजेबाला प्यायच्या पाण्याचा कोटा वाढवून मागितला. त्याने कोटा वाढवून दिला नाही तेव्हा त्याने उर्दू शेर लिहिला ज्याचा मतितार्थ असा होता...
तुझ्यापेक्षा काफिर हिंदू कितीतरी चांगले ते पूर्वजांचं तर्पण करुन त्यांना त्यांच्या आवडीचं खायला देतात.

अतिशय सुंदर लेख.
एक छोटीशी दुरुस्ती सुचवतो,
> त्यांची क्षयतिथी म्हणजे त्यांच्या मृत्यूची तिथी माहित असणे दुरापास्त.
क्षयतिथी या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. एखाद्या महिन्यात एखादी तिथी आलीच नाही तर तिथिक्षय झाला असे म्हणतात.

अवांतर : न तोडलेल्या पूर्ण गवारीची भाजी, फक्त रव्याचे लाडू हे फक्त अशा प्रसंगीच करतात.

माहितीपूर्ण इन्टरेस्टिंग लेख.

(डिस्नेच्या 'कोको' सिनेमामुळे माहीत झालेला) मेक्सिकन 'el Día de los Muertos' (day of the dead) देखील असाच.

हे दिवंगतांचे स्मरण करण्याचे दिवस सहसा त्या-त्या प्रांतातल्या सुगीच्या आसपास असतात असं दिसतं, आणि अधिकच हृद्य वाटतं.

Pages

Back to top