समारोप: मायबोली गणेशोत्सव २०२४

Submitted by संयोजक on 27 September, 2024 - 13:54

समारोप: मायबोली गणेशोत्सव २०२४

गणेशोत्सव म्हणजे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा उत्सव! दरवर्षी आपण बाप्पाची ज्या आतुरतेने वाट पाहतो त्याच उत्साहाने मायबोली गणेशोत्सव उपक्रम आणि स्पर्धा ह्यांची सुद्धा आतुरता असते. ह्या उत्सवी वातावरणात मन प्रसन्न होते आणि सकारात्मक ऊर्जेने आसमंत व्यापून जातो. २०२४ च्या मायबोली गणेशोत्सवाची घोषणा झाली आणि संयोजक समिती सुद्धा स्थापन झाली. मायबोली गणेशोत्सवाचे यावर्षीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने हा गणेशोत्सव जरा वेगळा होता. हातात वेळ कमी असल्यामुळे संयोजक मंडळ लवकर तयारीला लागले. विचार मंथन झाले, मेसेज-कॉल्स झाले, एक्सेल बनवली गेली. कोणत्या स्पर्धा आणि उपक्रम घ्यायचे तसेच सर्व कामांची तारखेनुसार यादी सुद्धा तयार झाली.

गणपती ही मंगलमूर्ती आहेच पण ती संकल्पपूर्ती करणारी देवता सुद्धा आहे. यंदाच्या नवीन वर्षात जे संकल्प केले आणि विरले किंवा त्यांची काही कारणामुळे अंमलबजावणी झाली नाही. तर मग या उत्सवानिमित्त तेच किंवा काही नवीन संकल्प गणेशोत्सवाच्या आधी चालू करून मग ते २१ दिवस सातत्याने पूर्ण करून त्याचा आढावा इथे धाग्यावर देण्याचा एक उपक्रम "सर्वसिद्धीकर प्रभो" या धाग्यात घेतला. धाग्यावर दुसऱ्यांचे अपडेट पाहून एकमेकांना प्रोत्साहन मिळावे ही त्या मागची भावना. त्या धाग्याच्या निमित्ताने अनेकांनी आपले अपुरे राहिलेले संकल्प पूर्ण करायचा निश्चय केला व सगळ्यांच्या संगतीने तो व्यवस्थित पारही पाडला. त्या सर्वांचे सगळे संकल्प असेच तडीस जावोत हीच श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी धागे काढल्यामुळे ऐन गणपतीत ज्यांच्या घरी गौरी गणपती असतात त्यांना तसेच इतरांनाही वेळ मिळत नसल्याने यावर्षी धागे लवकर काढायचे ठरवले. त्यासाठी पाककृती स्पर्धा व काही उपक्रमांचे धागे लवकर प्रकाशित करण्यात आले.

नेहमीच्या उपक्रमामध्ये मायबोली गणेश प्रतिष्ठापनेसाठी गणेश मूर्ती, सजावट याचबरोबर सुप्रिया जोशी यांच्या आवाजात सुश्राव्य श्लोकपठण, धागा उघडताच ऐकायला मिळावा अशी व्यवस्था केली. यासाठी सुप्रिया जोशी व वेमांचे विशेष आभार. सर्वांनी "घरचा बाप्पा" व "बाप्पाचा नैवेद्य" या सदरासाठी आपापल्या घरातील उत्सव मूर्तींचे फोटो व चविष्ट नैवेद्यांचे फोटो देऊन या धाग्यावर अगदी उत्साही वातावरण आणले. यावर्षी हरचंद पालव यांनी "भारतीय संगीतशास्त्राचे जीर्णोद्धारक - पं. विष्णु नारायण भातखंडे" यांच्यावर माहितीपूर्ण असा गणेशोत्सव विशेष लेख लिहून पाठवल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

गेल्या पंचवीस वर्षात अनेक विषय आधीच येऊन गेल्यामुळे शशक व प्रकाश चित्रांचा झब्बू यात थोडे नाविन्य आणणे गरजेचे होते. शेवट देऊन शशक स्पर्धा हा एक अभिनव, भन्नाट, युनिक विचार यावर्षी केला गेला. यावर्षी "माझी कलाकारी" हे सदर लिखाणासाठी न ठेवता माबोकरांचे कलागुण दृकश्राव्य माध्यमातून मांडण्याचा विचार केला. यासाठी कमी प्रवेशिका आल्या आणि ज्या आल्या त्यातील काही तांत्रिक कारणामुळे प्रकाशित होऊ शकल्या नाही. मोठ्यांसाठी ठेवलेल्या "शहाणे करून सोडावे सकल जन" या उपक्रमाला पाहिजे असा प्रतिसाद खरंतर लाभला नाही. पण असो, अश्या कार्यक्रमात असे थोडेफार होणारच. 'माझे स्थित्यंतर' हा विषय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ठेवण्याचा विचार केला. बदल हेच आयुष्यातील एक कायमस्वरूपी शाश्वत सत्य असते, या वचनाला अनुसरून गेल्या २५ वर्षातील आपापल्यातील बदल इथे सर्वांसमोर मांडण्यासाठी काही माबोकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. मोठ्यांसाठी नैसर्गिक संसाधनातून गणेश ही एक अभिनव कल्पना मांडली, त्यालाही आपण सर्वांनी भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद दिला. बालगोपालांनी तर नेहमीप्रमाणेच फार सुंदर चित्रे रंगविली आणि माबो गणेशोत्सवाची शोभा वाढवली. मोठ्यांच्या मायबोलीत छोट्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समस्त मायबोली तर्फे त्यांचे खूप खूप कौतुक. पाककृती स्पर्धेला सुद्धा भरभरून प्रतिसाद देत अगदी नवनवीन, आरोग्यपूर्ण, चटपटीत अशा पाककृती आल्या. गंमत खेळासाठी "कोण कोणास म्हणाले" हे जरा फारच पुस्तकी झाले तर "जुनी कढई नवीन उपमा" वर माबोकरांनी छान छान काव्ये रचली.

सर्वात कहर आणि यावर्षीचा अत्यंत लोकप्रिय ठरलेला गंमत खेळ म्हणजे "मायबोली व मायबोलीकरांवर मीम्स" ज्याला उदंड, भरभरून प्रतिसाद मिळाला. त्या धाग्यावरील एकापेक्षा एक वरचढ मीम्सने सर्वांना खळखळून हसवले, विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागेल असे काहीही घडले नाही. मायबोलीवर केलेल्या मीम्स तर मजेदार होत्याच पण त्याशिवाय अनेक सभासदांच्या मायबोलीवरील वावरावर पण अनेक मीम्स आल्या. त्या सर्वांनी त्या मीम्स खिलाडूवृत्तीने घेतल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार.

पाहता पाहता उत्सवाचे अकरा दिवस झाले आणि या वर्षी आपण २१ दिवस साजरा केलेला हा सोहळा कधी संपला ते कळालेही नाही. मायबोली गणेशोत्सवाचा हा मांडव सतत गजबजता, आनंदी, खेळकर, उत्साही ठेवल्याबद्दल धन्यवाद.

या उत्सवात सामिल झालेल्या सर्वांचेच संयोजक मंडळातर्फे मनःपूर्वक आभार. तुम्हा सर्वांमुळेच या उत्सवाला शोभा आहे. तुमच्या सहभागामुळेच हा उत्सव एवढा सुंदर होऊ शकला.

यावर्षीचा गणेशोत्सव तुम्हाला कसा वाटला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपल्या काही सूचना असतील तर त्या ही नक्की कळवा.

यावर्षीच्या गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा व उपक्रम तुम्हाला https://www.maayboli.com/node/85635 येथे पहायला मिळतील.

शशक व पाककृती स्पर्धांचे निकाल https://www.maayboli.com/node/85783 येथे पहायला मिळतील.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !

चला तर मग यावर्षी आम्ही निरोप घेतो. पुढच्या वर्षी परत भेटू या.

आपला लोभ आहेच तो असाच वृद्धिंगत व्हावा ही सदिच्छा.

गणपती बाप्पा मोरया !!!!

कळावे,

मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळ २०२४

अतरंगी, किल्ली, अमितव, ऋतुराज, स्वरूप

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणेशोत्सव धमाल गेला.
(खरंतर काही वर्षांपूर्वी मला हा गणेशोत्सव म्हणजे रेग्युलर लेखकांचे धागे मागे घालवणारा प्रकार वाटायचा.पण लॉकडाऊन पासून इथल्या छान छान रेसिपी वाचायला लागले, गणेशोत्सव स्पर्धेत जमेल तसा भाग घ्यायला लागले.ज्या 'दृश्यावरून गाणी ओळखा' धाग्यावरून माझ्यावरून मीम बनले त्या धाग्याची मी अतिशय आभारी आहे.काही उदासवाण्या काळांमध्ये या धाग्यावर चक्रम क्लू देत, लोकांना भंजाळवून टाकत, मजा मजा करत वाईट काळ आरामात पार पडला आहे.)

ते जाऊदे.सगळीकडे आपलं पुराण चालू करायला नको.धागे हायजॅक झाल्याचं पाप लागतं.

दर वर्षी स्वतःच्या वेळेची गुंतवणूक, अनेक प्लॅनिंग करण्यात स्वतःच्या इंटरनेट ची,आणि लास्ट बट नॉट लिस्ट, या सर्व प्लॅनिंग मध्ये झोकून देऊन मानसिक गुंतवणूक करणाऱ्या सर्व संयोजक मंडळाचे आभार.आणि यावर्षी अतरंगी, किल्ली, अमितव, ऋतुराज, स्वरूप यांचे आभार.

संयोजक इतक्या सुंदर अनुभवासाठी तुमचे आभार

यंदा काही कारणाने घरी गणपती आणता आला नाही पण इथल्या उत्सवी वातावरणाने मला तो आनंद उपभोगता आला त्याबद्दल मनापासून आभार

चांगला झाला गणेशोत्सव . संयोजक मंडळाची लगबग आणि उत्साह वाखाणन्याजोगा . सगळे चांगले पार पडले : )

अतरंगी, किल्ली, अमितव, ऋतुराज, स्वरूप
अप्रतिम संयोजनाबद्दल आभार आणि हार्दिक अभिनंदन. तुम्ही सर्वांनी हा उत्सव एकदम चांगल्या प्रकारे हटके केलात.

यावेळीचा गणेशोत्सव दणक्यात साजरा झाला. तुम्ही सर्वांनी कल्पक आणि धमाल उपक्रम ठेवले होते. बऱ्याच गोष्टींत सहभाग नोंदवला आणि बऱ्याच उपक्रमांनी मजा आली. तुमचे सगळ्यांचे खूप आभार संयोजक. तुम्ही स्वतः संयोजन सांभाळून उपक्रमांमधे भागही घेतला यानेही मजा आली. कौतुक वाटले.

अतरंगी, किल्ली, स्वरूप, अमित, ऋतुराज तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. Happy

खरंतर काही वर्षांपूर्वी मला हा गणेशोत्सव म्हणजे रेग्युलर लेखकांचे धागे मागे घालवणारा प्रकार वाटायचा.>>>> +१
पण खरोखर ह्या वर्षी गणेशोत्सव आनंदाने साजरा झाल, खूप मजा आली.
माझे स्थित्यंतर वाचून आत्म परिक्षणासारखे वाटले, जिद्द, धडपड महत्वं पटले. मीम धागा तर अधाशासारखा वाचला गेला. पाकृ पण फार अभिनव होत्या. त्यातले काही पदार्थ करून ही पाहिले Happy
अतरंगी, किल्ली, स्वरूप, अमित, ऋतुराज तुम्हा सर्वांचे मनापासून आभार!

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
संयोजक मंडळाचे हार्दिक आभार. चांगले, नावीन्यपूर्ण उपक्रम होते यावेळेस. फार कशात भाग घ्यायला वेळ झाला नाही. सगळ्या एन्ट्रीज वाचूनही झाल्या नाहीत. पण दणक्यात झाला गणेशोत्सव!

अतरंगी, किल्ली, स्वरूप, अमित, ऋतुराज, यंदाचा गणेशोत्सव तुम्ही गाजवलात. इतके एकाहून एक कल्पक उपक्रम करणं, त्यासाठी वेळ देणं, वेळोवेळी समस्यांना तोंड देणं, आणि लोकांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत राहणं हे खायचं काम नाही. त्यात आपले सगळे व्याप सांभाळत तुम्ही हे केलंत. यंदा स्पर्धा आणि उपक्रमात "या वेळी काहीतरी वेगळं आहे बरं का" हे प्रत्येक जण म्हणत होता इथेच तुम्ही निम्मा उत्सव जिंकलात. शशक शेवट माहीत असताना उत्सुकता कशी राहणार या विचाराने कदाचित सुरुवातीला सहभाग कमी होता, पण पुढे एकेक सरस कथा येऊ लागल्या आणि अन्य लेखकांनाही उत्साह आला. कित्येक जुन्या नव्या लोकांना लिहिते केलेत, चित्रकाढते केलेत, पाकृकौशल्यसिद्धकरते केलेत. हा गणेशोत्सव स्मरणात राहील.

सयोजक मडळाचे मनापासुन आभार आणी कौतुक, खुप छान झाला उत्सव्...स्पर्धा उपक्रम गाजले, लोकानी हिरहहिरिने सहभाग घेतला..मी मिमचा धागा खुप एन्जॉय केला.

यंदा मीम्स धागा वगळता इतर कुठल्याही उपक्रमांत भाग घेऊ शकलो नाही आणि ते वाचले सुद्धा नाहीत. उपक्रम नाविन्यपूर्ण होते आणि छान प्रतिसाद मिळून उत्सव दणक्यात साजरा झाल्याचे दिसते आहे. संयोजक मंडळाचे कौतुक व अभिनंदन.

छान झाला या वेळचा गणेशोत्सव. अजून बरेच धागे बघायचे आणि वाचायचे राहिले आहेत. पण सगळेच उपक्रम आवडले यंदाचे. मीम्स चा धागा तर एकदम कमाल होता,
मायबोलीच्या वेगवेगळ्या उपक्रमासाठी काम करणार्‍या सगळ्या संयोजकांचे मला खूप कौतूक वाटते. दरवर्षी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्पर्धा आयोजित करणे आणि त्यात सगळ्या मायबोलीकरांना सामिल करवणे सोप्पं नसते. यावेळच्या संयोजकांना हे करण्यात यश मिळालं आहे. सगल्याच स्पर्धा आणि उपक्रमांना मिळालेल्या प्रतिसादातून ते दिसतं. गणेशोत्सवाच्या काळात मायबोलीवर खूप छान उत्साही वातावरण होतं. या वर्षीचा गणेशोत्सव यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल सगळ्या संयोजकांचे कौतूक आणि अभिनंदन.

काय दणदणीत झाला आहे यावेळचा उत्सव! अभूतपूर्व! संयोजकांचे अभिनंदन! गेली काही वर्षे गणेशोत्सव मस्त होत आहेच, पण यावेळेस त्याच्याही वरताण झाला आहे! तुफान मजा आली. रोज पहिले त्या मीमचा धागा बघणे हा आवडीचा उद्योग झाला होता. तो बाफ आता कायमचा एक आवर्जून पाहण्यासारखा बाफ झाला आहे.

शशक, पाकृ व इतर अनेक लेखांचे बाफ म्हणजे वाचायला मोठा खजिना आहे!

संयोजकांना आपणच एक पार्टी द्यायला हवी. सगळे एका ठिकाणी नाहीत हे माहीत आहे. पण सूर्यमालिकेतील ग्रह जसे कधीतरी एका रेषेत येतात तसे सगळे एका ठिकाणी असले व आपणही असलो, तर मी व इतरही आनंदाने देतील हे नक्की Happy (त्यावर नंतर मीम्स बनवतील पण त्याला संयोजकच जबाबदार आहेत Wink )

संयोजक, खूप कौतुक आणि आभार इतका मस्त समारंभ साजरा केल्याबद्दल.
मला तर सगळेच उपक्रम आणि स्पर्धा खूप आवडल्या. खूपच मज्जा आली.

फार म्हणजे फारच छान झाला या वर्षीचा गणेशोत्सव..
संयोजक मंडळ २०२४-अतरंगी, किल्ली, अमितव, ऋतुराज, स्वरूप... अतिशय योग्य प्रकारे संयोजन केले.. सर्वांचे खूप खूप अभिनंदन... खूप मजा आली यावर्षी

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

यावेळेस मनाजोगता भाग घ्यायला वेळ झाला नाही. सगळ्या प्रवेशिका वाचूनही झाल्या नाहीत. पण उत्सव दणक्यात साजरा झाला. संयोजक मंडळाचे विशेष कौतुक.

मस्तच झाला गणेशोत्सव हया वर्षीचा... खुप मजा आली. मिम चा धागा तुफान हसवत होता. मायबोलीवर वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवलेले अनेक आय डी आहेत. त्यांचं लिखाण वाचायला मिळेल अस वाटत होत शहाणे करून मध्ये पण ते मात्र नाही प्रत्यक्षात आलं. असो.
संयोजकांचे आभार आणि कौतुक...

जबरदस्त झाला गणेशोत्सव
संयोजक
दंडवत आणि आभार
इतके छान उत्सवी वातावरण निर्मिती साठी

फार म्हणजे फारच छान झाला या वर्षीचा गणेशोत्सव..
संयोजक मंडळ २०२४-अतरंगी, किल्ली, अमितव, ऋतुराज, स्वरूप... अतिशय योग्य प्रकारे संयोजन केले.. सर्वांचे खूप खूप अभिनंदन... खूप मजा आली यावर्षी>>>>>>>>

+१९९९९९

फार म्हणजे फारच छान झाला या वर्षीचा गणेशोत्सव..
संयोजक मंडळ २०२४-अतरंगी, किल्ली, अमितव, ऋतुराज, स्वरूप... अतिशय योग्य प्रकारे संयोजन केले.. सर्वांचे खूप खूप अभिनंदन... खूप मजा आली यावर्षी>>>>>>>> कोटी अनुमोदन!

एक प्रेमाची सूचना आहे:
पुढील वर्षीही हे उपक्रम रिपीट करायला काय हरकत आहे?
विशेषत: मिमस् आणि शहाणे करून सोडावे... ( एकाला खूप तुफान रिस्पॉन्स आला म्हणून आणि एकाला कमी मिळाला म्हणून!)
Happy

खूप छान गणेशोत्सव साजरा झाला. रेसिपी स्पर्धेत भाग घ्यायचा होता पण वेळ मिळाला नाही. वेळ मिळायचा तेव्हा मिम्स चा धागा सोडून इतर कुठे जाणं शक्यच न्हवत Happy तरी कितीतरी मिम्स मनातच राहिले . पुढच्या वर्षी परत येऊदे हा धागा.
अजून खूप धागे वाचायचे आहेत. हळूहळू वाचेन .

संयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमी. संयोजक मंडळाचे विशेष अभिनंदन.

नेहमी निरोप घेताना हि वाक्य मनात येतातच

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी........

Pages

Back to top