समारोप: मायबोली गणेशोत्सव २०२४
गणेशोत्सव म्हणजे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा उत्सव! दरवर्षी आपण बाप्पाची ज्या आतुरतेने वाट पाहतो त्याच उत्साहाने मायबोली गणेशोत्सव उपक्रम आणि स्पर्धा ह्यांची सुद्धा आतुरता असते. ह्या उत्सवी वातावरणात मन प्रसन्न होते आणि सकारात्मक ऊर्जेने आसमंत व्यापून जातो. २०२४ च्या मायबोली गणेशोत्सवाची घोषणा झाली आणि संयोजक समिती सुद्धा स्थापन झाली. मायबोली गणेशोत्सवाचे यावर्षीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने हा गणेशोत्सव जरा वेगळा होता. हातात वेळ कमी असल्यामुळे संयोजक मंडळ लवकर तयारीला लागले. विचार मंथन झाले, मेसेज-कॉल्स झाले, एक्सेल बनवली गेली. कोणत्या स्पर्धा आणि उपक्रम घ्यायचे तसेच सर्व कामांची तारखेनुसार यादी सुद्धा तयार झाली.
गणपती ही मंगलमूर्ती आहेच पण ती संकल्पपूर्ती करणारी देवता सुद्धा आहे. यंदाच्या नवीन वर्षात जे संकल्प केले आणि विरले किंवा त्यांची काही कारणामुळे अंमलबजावणी झाली नाही. तर मग या उत्सवानिमित्त तेच किंवा काही नवीन संकल्प गणेशोत्सवाच्या आधी चालू करून मग ते २१ दिवस सातत्याने पूर्ण करून त्याचा आढावा इथे धाग्यावर देण्याचा एक उपक्रम "सर्वसिद्धीकर प्रभो" या धाग्यात घेतला. धाग्यावर दुसऱ्यांचे अपडेट पाहून एकमेकांना प्रोत्साहन मिळावे ही त्या मागची भावना. त्या धाग्याच्या निमित्ताने अनेकांनी आपले अपुरे राहिलेले संकल्प पूर्ण करायचा निश्चय केला व सगळ्यांच्या संगतीने तो व्यवस्थित पारही पाडला. त्या सर्वांचे सगळे संकल्प असेच तडीस जावोत हीच श्रीगणेशाच्या चरणी प्रार्थना.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी धागे काढल्यामुळे ऐन गणपतीत ज्यांच्या घरी गौरी गणपती असतात त्यांना तसेच इतरांनाही वेळ मिळत नसल्याने यावर्षी धागे लवकर काढायचे ठरवले. त्यासाठी पाककृती स्पर्धा व काही उपक्रमांचे धागे लवकर प्रकाशित करण्यात आले.
नेहमीच्या उपक्रमामध्ये मायबोली गणेश प्रतिष्ठापनेसाठी गणेश मूर्ती, सजावट याचबरोबर सुप्रिया जोशी यांच्या आवाजात सुश्राव्य श्लोकपठण, धागा उघडताच ऐकायला मिळावा अशी व्यवस्था केली. यासाठी सुप्रिया जोशी व वेमांचे विशेष आभार. सर्वांनी "घरचा बाप्पा" व "बाप्पाचा नैवेद्य" या सदरासाठी आपापल्या घरातील उत्सव मूर्तींचे फोटो व चविष्ट नैवेद्यांचे फोटो देऊन या धाग्यावर अगदी उत्साही वातावरण आणले. यावर्षी हरचंद पालव यांनी "भारतीय संगीतशास्त्राचे जीर्णोद्धारक - पं. विष्णु नारायण भातखंडे" यांच्यावर माहितीपूर्ण असा गणेशोत्सव विशेष लेख लिहून पाठवल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.
गेल्या पंचवीस वर्षात अनेक विषय आधीच येऊन गेल्यामुळे शशक व प्रकाश चित्रांचा झब्बू यात थोडे नाविन्य आणणे गरजेचे होते. शेवट देऊन शशक स्पर्धा हा एक अभिनव, भन्नाट, युनिक विचार यावर्षी केला गेला. यावर्षी "माझी कलाकारी" हे सदर लिखाणासाठी न ठेवता माबोकरांचे कलागुण दृकश्राव्य माध्यमातून मांडण्याचा विचार केला. यासाठी कमी प्रवेशिका आल्या आणि ज्या आल्या त्यातील काही तांत्रिक कारणामुळे प्रकाशित होऊ शकल्या नाही. मोठ्यांसाठी ठेवलेल्या "शहाणे करून सोडावे सकल जन" या उपक्रमाला पाहिजे असा प्रतिसाद खरंतर लाभला नाही. पण असो, अश्या कार्यक्रमात असे थोडेफार होणारच. 'माझे स्थित्यंतर' हा विषय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ठेवण्याचा विचार केला. बदल हेच आयुष्यातील एक कायमस्वरूपी शाश्वत सत्य असते, या वचनाला अनुसरून गेल्या २५ वर्षातील आपापल्यातील बदल इथे सर्वांसमोर मांडण्यासाठी काही माबोकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला. मोठ्यांसाठी नैसर्गिक संसाधनातून गणेश ही एक अभिनव कल्पना मांडली, त्यालाही आपण सर्वांनी भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद दिला. बालगोपालांनी तर नेहमीप्रमाणेच फार सुंदर चित्रे रंगविली आणि माबो गणेशोत्सवाची शोभा वाढवली. मोठ्यांच्या मायबोलीत छोट्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समस्त मायबोली तर्फे त्यांचे खूप खूप कौतुक. पाककृती स्पर्धेला सुद्धा भरभरून प्रतिसाद देत अगदी नवनवीन, आरोग्यपूर्ण, चटपटीत अशा पाककृती आल्या. गंमत खेळासाठी "कोण कोणास म्हणाले" हे जरा फारच पुस्तकी झाले तर "जुनी कढई नवीन उपमा" वर माबोकरांनी छान छान काव्ये रचली.
सर्वात कहर आणि यावर्षीचा अत्यंत लोकप्रिय ठरलेला गंमत खेळ म्हणजे "मायबोली व मायबोलीकरांवर मीम्स" ज्याला उदंड, भरभरून प्रतिसाद मिळाला. त्या धाग्यावरील एकापेक्षा एक वरचढ मीम्सने सर्वांना खळखळून हसवले, विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागेल असे काहीही घडले नाही. मायबोलीवर केलेल्या मीम्स तर मजेदार होत्याच पण त्याशिवाय अनेक सभासदांच्या मायबोलीवरील वावरावर पण अनेक मीम्स आल्या. त्या सर्वांनी त्या मीम्स खिलाडूवृत्तीने घेतल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार.
पाहता पाहता उत्सवाचे अकरा दिवस झाले आणि या वर्षी आपण २१ दिवस साजरा केलेला हा सोहळा कधी संपला ते कळालेही नाही. मायबोली गणेशोत्सवाचा हा मांडव सतत गजबजता, आनंदी, खेळकर, उत्साही ठेवल्याबद्दल धन्यवाद.
या उत्सवात सामिल झालेल्या सर्वांचेच संयोजक मंडळातर्फे मनःपूर्वक आभार. तुम्हा सर्वांमुळेच या उत्सवाला शोभा आहे. तुमच्या सहभागामुळेच हा उत्सव एवढा सुंदर होऊ शकला.
यावर्षीचा गणेशोत्सव तुम्हाला कसा वाटला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपल्या काही सूचना असतील तर त्या ही नक्की कळवा.
यावर्षीच्या गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा व उपक्रम तुम्हाला https://www.maayboli.com/node/85635 येथे पहायला मिळतील.
शशक व पाककृती स्पर्धांचे निकाल https://www.maayboli.com/node/85783 येथे पहायला मिळतील.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
चला तर मग यावर्षी आम्ही निरोप घेतो. पुढच्या वर्षी परत भेटू या.
आपला लोभ आहेच तो असाच वृद्धिंगत व्हावा ही सदिच्छा.
गणपती बाप्पा मोरया !!!!
कळावे,
मायबोली गणेशोत्सव संयोजक मंडळ २०२४
अतरंगी, किल्ली, अमितव, ऋतुराज, स्वरूप
यशस्वीरित्या आयोजित
यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल सगळ्या संयोजकांचे कौतूक आणि अभिनंदन. कसा वेळ काढलात ह्या सगळ्यासाठी कोणजाणे!
पुढील वर्षीही हे उपक्रम रिपीट
पुढील वर्षीही हे उपक्रम रिपीट करायला काय हरकत आहे? >>> टोटली. निदान मीम्स तरी.
वेळात वेळ काढून अतिशय सुरेख
वेळात वेळ काढून अतिशय सुरेख उपक्रम यशस्वी केल्याबद्दल संयोजकांचे खूप कौतुक आणि आभार!❤️
खूप मजा आली. यावेळेस संयोजन
खूप मजा आली. यावेळेस संयोजन खास शिस्तबद्ध होतं. संयोजकांनी संयोजनाबरोबरच भरपूर सहभागही नोंदवला.
संयोजक मंडळाचे, पडद्यामागील इतर कलाकारांचे आणि स्टेजवर धुमाकूळ घातलेल्या सर्व लहानथोर माबोकरांचे कौतुक आणि अभिनंदन.
गणेशोत्सव दणक्यात झाला -
गणेशोत्सव दणक्यात झाला - अभिनंदन आणि आभार, संयोजक.
विजेत्यांचे अभिनंदन आणि
विजेत्यांचे अभिनंदन आणि संयोजकांचे (+ गणेशोत्सव खेळीमेळीेत साजरा करणाऱ्या सर्वच मायबोलीकरांचे) आभार..
पण.....
.
.
.
.
मतदानासाठी काढलेले माझे डूआयडी approve न करणाऱ्या दुष्ट ॲडमिनचा निषेध.
फार म्हणजे फारच छान झाला या
फार म्हणजे फारच छान झाला या वर्षीचा गणेशोत्सव..
संयोजक मंडळ २०२४-अतरंगी, किल्ली, अमितव, ऋतुराज, स्वरूप... अतिशय योग्य प्रकारे संयोजन केले.. सर्वांचे खूप खूप अभिनंदन... खूप मजा आली यावर्षी..
वरील सर्व प्रतिसादांना मम.
वरील सर्व प्रतिसादांना मम. खरंच अतिशय कल्पक आणि परिश्रमपूर्वक उत्सव आयोजित केलात. आभार, अभिनंदन.. पुनरागमनाय च |
रौप्यमहोत्सवाला साजेसा झाला
रौप्यमहोत्सवाला साजेसा झाला गणेशोत्सव. संयोजकांचं कौतुक आणि अभिनंदन.
यंदा स्पर्धा / उपक्रमांत भाग घेता आला नाही, पण धमाल चाललेली दिसत होती. काही कथाही वाचायच्या राहिल्यात.
छानच झाला ह्या वर्षीचा
छानच झाला ह्या वर्षीचा गणेशोत्सव.
संयोजक अतरंगी, किल्ली, अमितव, ऋतुराज, स्वरूप ह्यांचे खूूप कौतुक आणी आभार. मीम्सची आयडीया तर भारीच होती. मजा आली.
संयोजक आभार आणि अभिनंदन !!+1
संयोजक
आभार आणि अभिनंदन !!+1
मायबोलीचा दिवाळी अंक नाही का?
मायबोलीचा दिवाळी अंक नाही का? यंदा काढायचा काय?
फक्त कथा विशेषांक !!
छान कल्पना आहे.
छान कल्पना आहे.
नवीन धागा काढायला हवा .. होता.. आधीच.. कल्पना देऊन..
लेख कथा पाकृ प्रवासवर्णन कविता गझल आणि बरेच काही ताकदीने लिहू शकणारे आहेत इथे आणि असेही धागा काढून लिहितात तिथे अंकात लिहायला हरकत नसावी.
Pages