हृदयसंवाद (६) : हृदयविकाराचा झटका

Submitted by कुमार१ on 30 October, 2023 - 00:51

भाग ५ : https://www.maayboli.com/node/84289
.. ..... .... .... ...
अंतिम भाग
करोनरी वाहिन्यांमध्ये Atherosclerosisमुळे मेद आणि अन्य घटकांचा पापुद्रा कसा तयार होतो ते आपण मागच्या भागात पाहिले. आता या आजाराचा पुढचा टप्पा पाहू.
आजार वाढत असताना एका स्थितीत हा पापुद्रा फुटतो. त्याचबरोबर रक्तातील बिंबिका पेशी (platelets) सक्रिय होतात. परिणामी रक्तगुठळी तयार होते तसेच रक्तवाहिनीचे आकुंचन होते. या सर्वांमुळे वाहिनीत बऱ्यापैकी अडथळा निर्माण होतो. हा अडथळा किती काळ टिकतो आणि त्याची तीव्रता किती, यानुसार रुग्णाला कुठल्या प्रकारचा त्रास होतो ते ठरते. साधारणपणे दोन प्रकारचे रुग्ण आढळतात :
१. निव्वळ छातीतील वेदना (stable angina)
२. हृदयविकाराचा झटका (myocardial infarction)

१. निव्वळ छातीतील वेदना : या प्रकारात अचानक कधीतरी छातीत दुखू लागते. ही वेदना मध्यम स्वरूपाची असते आणि ती सुमारे पाच ते पंधरा मिनिटे टिकते. बऱ्याचदा अशी वेदना कुठलेतरी श्रम केल्यानंतर होते. छातीत दुखू लागल्यानंतर विश्रांती घेतली किंवा nitroglycerinया औषधाची गोळी घेतली असता ती थांबते. काही जणांच्या बाबतीत स्वस्थ बसले असताना देखील अशी वेदना होऊ शकते आणि काही वेळेस धूम्रपान केल्यानंतर ती उद्भवते.

२. हृदयविकाराचा झटका : जेव्हा करोनरी वाहिन्यांमध्ये अडथळा मोठ्या प्रमाणात होतो तेव्हा हृदयस्नायूंना गरज असणाऱ्या रक्तापेक्षा खूप कमी पुरवठा होऊ लागतो आणि ऑक्सिजन अभावी त्या पेशींवर परिणाम होतो. परिणामी काही पेशींचा समूह मृत होतो (infarction). जेव्हा हृदयस्नायूंचा रक्तपुरवठा कमी होतो तेव्हा तिथे काही रासायनिक घडामोडी होतात आणि त्यातून काही आम्लधर्मी आणि अन्य पदार्थ तयार होतात. या पदार्थांमुळे वेदनेचे चेतातंतू सक्रिय होतात व त्यामुळे रुग्णाला वेदना जाणवते.

हृदयविकाराच्या झटक्याचे काही प्रकार असतात. त्यातील सर्वाधिक आढळणारा प्रकार आधी पाहू.

प्रकार-१चा झटका
रुग्णाला प्रत्यक्ष झटका येण्यापूर्वी एक दोन दिवस आधी छातीत कसेतरी होणे आणि खूप दमल्यासारखे वाटू शकते. परंतु सर्वांच्याच बाबतीत अशी पूर्वलक्षणे येत नाहीत. काहींच्या बाबतीत ध्यानीमनी नसताना अचानक झटका देखील येऊ शकतो.

हृदयविकाराचा जो नमुनेदार झटका असतो त्या प्रसंगी सर्वसाधारणपणे अशा घडामोडी होतात :
• बऱ्याच वेळेस हा झटका पहाटे किंवा सकाळी लवकरच्या वेळात येतो कारण या वेळेस शरीरातील नैसर्गिक स्थिती अशी असते :
१. sympathetic चेतासंस्था उत्तेजित होते. त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
२. हृदय-ठोक्याची गती आणि रक्तदाबात वाढ होते.
३. हृदयस्नायूंचे काम वाढते आणि त्यांचा ऑक्सिजनचा वापरही वाढतो.
४. रक्तातील प्लेटलेट्स एकमेकांना चिकटण्याची प्रक्रिया वाढते.

वेदनेचे वर्णन
१. तीव्र असते; एकदा दुखू लागल्यावर सुमारे अर्धा ते एक तासपर्यंत ती थांबत नाही.
२. ती छातीच्या मधोमध जाणवते. परंतु त्याचबरोबर मान, खांदा, जबडा किंवा डावा हात या भागांमध्येही ती पसरू शकते.
३. वेदनेचा प्रकार : छातीच्या मधोमध कोणीतरी वजन ठेवल्यासारखे वाटणे / किंवा पिळवटले जाणे / नुसतेच दुखणे किंवा जळजळणे.
४. काहींच्या बाबतीत पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता आणि वात अडकल्याची भावना देखील जाणवू शकते.

५. काही जणांत खालील अन्य लक्षणे उद्भवू शकतात :
* शरीरात काहीतरी भयंकर घडणार आहे अशी भावना
चक्कर येणे आणि/ किंवा बेशुद्ध पडणे
* खोकला, मळमळ आणि/ किंवा उलटी
* दरदरून घाम सुटणे
* दम लागणे, नाडीचे ठोके जलद आणि अनियमित होणे
* कोणीतरी आपला गळा घोटते आहे अशी भावना होणे.
* पोट फुगणे

रुग्ण तपासणी :
रुग्णाचे निरीक्षण आणि स्टेथोस्कोपने तपासणी केली असता खालील बदल झालेले दिसतात :
१. नाडीची गती : बऱ्याच वेळा वाढलेली परंतु काही वेळेस कमी झालेली. तालबिघाड असू शकतात.
२. रक्तदाब : बऱ्याच वेळा वाढलेला परंतु काही परिस्थितीत कमी झालेला असतो.

३. श्वसनाची गती वाढलेली असते
४. तापमान : पहिल्या 24 ते 48 तासांमध्ये थोडा ताप येऊ शकतो

५. छातीची तपासणी : हृदयाचे विशिष्ट ध्वनीबदल, खरखर तसेच फुफ्फुसांच्या भागावरही काही बदल ऐकू येऊ शकतात.
६. हात व पाय : यांच्या टोकांना निळसरपणा किंवा पांढरेफटक पडणे किंवा सूज येणे.

महत्त्वाच्या रोगनिदान चाचण्या :
१. इसीजी : यामध्ये हृदयातील विशिष्ट भागांच्या बिघाडानुसार निरनिराळे बदल दिसतात. असे बदल सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये दिसतात. अर्थात वैशिष्ट्यपूर्ण बदल न दिसणे किंवा इसीजी नॉर्मल येणे याही शक्यता असतात.

२. ट्रोपोनिनची पातळी : ही अत्यंत महत्त्वाची चाचणी आहे. या विषयावर स्वतंत्र लेख इथे वाचता येईल : https://www.maayboli.com/node/65025?page=3

troponin.jpeg

जेव्हा हार्ट अटॅकचा संशय येण्यासारखी लक्षणे रुग्णामध्ये दिसत असतात तेव्हा डॉक्टरांनी ताबडतोब रक्तावरील ट्रोपोनिनची चाचणी करायची असते. जर ती पॉझिटिव्ह आली तर रोगनिदान पक्के होते. परंतु जर का ती निगेटिव्ह असेल आणि लक्षणे असतीलच, तर मग ती चाचणी त्यानंतर तीन आणि नंतर सहा तासांनी पुन्हा करायची असते.
म्हणजेच, रुग्णालयात लक्षणे असलेला रुग्ण दाखल होता क्षणीच ती चाचणी करणे महत्त्वाचे- नव्हे अत्यावश्यक- असते.

३. गरजेनुसार काही प्रतिमातंत्र चाचण्या (angiography) करता येतात.

रोगनिदान
MI चे निदान करण्यासाठी त्याची सार्वत्रिक व्याख्या करण्यात आली आहे. त्यानुसार :
MI चे शिक्कामोर्तब करण्यासाठी खालील गोष्टींची पूर्तता व्हायला हवी:
१. रक्तातील पुरेसे वाढलेले ट्रोपोनिन (विशिष्ट कटऑफच्या वर)
आणि
२. खालीलपैकी किमान एक घटना :
अ) करोनरी-विकाराची विशिष्ट लक्षणे रुग्णात दिसणे
आ) इसीजीतील विशिष्ट बदल किंवा
इ) हृदयाच्या ‘इमेजिंग’ तंत्राने मिळालेला पुरावा

* याप्रमाणे खात्रीशीर निदान झाल्यावर विशिष्ट तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते उपचार केले जातात. या लेखमालेत सुरुवातीस स्पष्ट केल्यानुसार हा मुद्दा या लेखमालेच्या कक्षेबाहेर आहे.

लक्षणांची रुग्णभिन्नता
आतापर्यंत वर्णन केलेला आजार नमुनेदार आहे. परंतु काही रुग्णांमध्ये याबाबत भिन्नता आढळते ती अशी :
१. दीर्घकालीन मधुमेही रुग्णांच्या बाबतीत वेदनेशी संबंधित चेतातंतूवर परिणाम झालेला असतो. त्यामुळे त्यांना छातीत वेदना जाणवतेच असे नाही.
२. वृद्धांच्या बाबतीत स्मृतिभ्रंश किंवा बिघडलेले मानसिक संतुलन असल्यास त्यांना संबंधित लक्षणे समजू शकत नाहीत. त्यामुळे ही घटना कुटुंबीयांच्याही लक्षात यायला वेळ लागतो.
३. पुरुषांशी तुलना करता स्त्रियांमध्ये लक्षणविरहित झटका येण्याचे प्रमाण अधिक असल्याने बऱ्याचदा लवकर निदान होत नाही.

झटक्याचे अन्य प्रकार
वरील प्रकार-१ व्यतिरिक्त जे अन्य काही प्रकार असतात त्यातले दोन प्रमुख प्रकार पाहू.

A. प्रकार-२ : यामध्ये हृदयस्नायूंची ऑक्सिजनची मागणी वाढते परंतु त्या प्रमाणात पुरवठा होऊ शकत नाही म्हणून झटका येतो. हा प्रकार होण्यास करोनरी वाहिन्यांचे अचानक आकुंचन, एनिमिया किंवा श्वसन दुर्बलता हे कारणीभूत असतात.

B. प्रकार-३ : झटक्यामुळे आलेला तात्काळ मृत्यू. अशाप्रसंगी मृत्यू इतक्या वेगात येतो की त्यावेळेस रक्तात ट्रोपोनिन वगैरे रसायने सोडली देखील गेलेली नसतात. काही वेळेस असा रोगी रुग्णालयात मृत अवस्थेत आणला जातो किंवा तिथे आणल्या आणल्याच त्याला डॉक्टरने हात लावण्यापूर्वीच त्याचा मृत्यू होतो.

अनिश्चित रोगनिदान
छातीत दुखणे आणि त्याच्या जोडीने वर उल्लेख केलेली काही लक्षणे, हृदय वगळता इतर अनेक आजारांमध्येही दिसू शकतात. रुग्णाची तपासणी आणि चाचण्या केल्यानंतर प्रत्येक वेळेस ‘नमुनेदार चित्र’ दिसतेच असे नाही. अशा प्रसंगी त्याला रुग्णालयात थांबवून ठेवायचे की घरी सोडायचे असा पेचप्रसंग निर्माण होतो. या प्रसंगी खालील प्रकारचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन कामी येते :

संभाव्य लक्षणे >>> रुग्णालयात दाखल >> डॉ. नी तपासल्यानंतर The HEART score असा काढतात :
History
ECG मधले बदल
Age (<45 , >65 )
Risk factors ( 0/1-2/3)
Troponin ( पातळीनुसार)

वरीलपैकी प्रत्येक मुद्द्याला ० ते २ गुण देतात. त्यानुसार HEART score १० पैकी किती हे कळते.
मग निर्णयप्रक्रिया अशी :
0-3: कमी धोका >>> लवकर घरी पाठवता येते.
4-6: मध्यम धोका >>> रुग्णालयात निरीक्षण चालू.
7-10: सर्वाधिक धोका >>> तातडीने योग्य ते उपचार

भविष्यात या संदर्भात मशीन लर्निंगचा वापर करण्यासंबंधी संशोधन प्रगतीपथावर आहे. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याच्या रक्तावरील ट्रॉपोनिन चाचणी एकदाच केली जाईल आणि रुग्णाची इतर सर्व माहिती मशीन लर्निंग यंत्रणेला पुरवली जाईल. त्यातून अचूक निदान केले जावे अशी अपेक्षा आहे.
**************************************************************************
समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चर्चेतून चांगली माहिती मिळाली.
एकदा हार्ट अटॅक आलेल्या माणसाला स्ट्रोक होण्याचा धोका जास्ती असतो का?

हार्ट अटॅक आलेल्या माणसाला स्ट्रोक होण्याचा धोका जास्ती असतो का?
>>> चांगला प्रश्न.
होय, हे खरे आहे. या संदर्भात काही जागतिक अभ्यास झालेले आहेत.

मोठ्या स्वरूपाच्या हृदयविकारानंतर (करोनरी/ हृदयझडपांचे विकार) भविष्यात स्ट्रोकचे प्रमाण इतर जनतेपेक्षा जास्त दिसून आले आहे. ज्या रुग्णांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर atrial fibrillation हा त्रास झालेला असतो त्यांच्यात स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते.
पुरुषांशी तुलना करता स्त्रियांच्या बाबतीत या प्रकारचा धोका अधिक दिसून आला आहे (विशेषतः वयाच्या पन्नाशीच्या आसपास).

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9945299/

दोन दिवसांपूर्वी एक आर्टिकल वाचले.
तरुणांना हार्ट आटॅक का येतो.
त्या आर्टिकल वरून माझे मत.
१) आरोग्य चांगले ठेवणे ह्या साठी कोणताच शॉर्ट कट नाही.
२) त्या मुळे बाजारात असणारी विविध कृत्रिम उत्पादन जे काही दावे करतात त्या वर खूप अभ्यास करून विश्वास ठेवा.
कृत्रिम प्रोटीन, वैगेरे वैगेरे.
३) व्यायाम हा शरीरासाठी चांगलाच असतो पण व्यायाम म्हणजे काही जादू नाही आज महिनाभर जास्त केला म्हणजे निरोगी शरीर निर्माण होईल.
दहा पंधरा वर्ष regular व्यायाम केल्यावर च त्याचे योग्य परिणाम शरीरात दिसून येतात.
४) आज ची पिढी .
शरीराची बिलकुल तयारी नसताना खूप सारा व्यायाम करतात लगेच six पॅक साठी.
मुळात सिक्स pack हे उत्तम आरोग्याची मोज पट्टी च नाही.
फालतू vitamins आणि बाकी आहाराचा अतिरेक करतात.

रोज साधे जेवणार अचानक .
काजू,बदाम,प्रोटीन पावडर, विविध फालतू आरोग्य दायक दावे जाहिराती मध्ये केलेले पदार्थ आहारात घेवु लागले.
.

शरीराची बिलकुल तयारी नसताना ट्रेडमिल ,वजन उचलणे आणि बाकी आधुनिक व्यायाम खूप मोठ्या प्रमाणात करू लागले तर अटॅक १००% येणारच.
शरीर स्वतचं ह्या अचानक बदला मुळे गोंधळून गेलेले असते.
त्या मुळे एक लक्षात ठेवा उत्तम आरोग्य ही तपस्या आहे जी तुमच्या जन्मा पासून सुरू होते.
ह्या मध्ये शॉर्ट कट बिलकुल नाही.
30 वय होई पर्यंत तुम्ही योग्य काळजी घेतली नसेल तर तो काळ तुमच्या हातातून निघून गेला आहे तो तुम्ही कधीच मेकओव्हर करू शकत नाही

बाजारात असणारी विविध कृत्रिम उत्पादन जे काही दावे करतात त्या वर खूप अभ्यास करून विश्वास ठेवा. कृत्रिम प्रोटीन, वैगेरे वैगेरे.
>>> +१११

https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/in-a-first-nagpur-led-tr...

https://www.downtoearth.org.in/blog/health/new-wrist-worn-device-can-qui...

डाॅ. कुमारसाहेब - या नवीन संशोधनाबद्दल काही सांगू शकाल का ??
हार्ट अॅटॅक यायच्या आधीच जर यातून कळत असेल तर फारच उत्तम की.....

शशांक, चांगला विषय.

त्या शोधनिबंधावर नजर टाकली. एक प्राथमिक प्रयोग म्हणून चांगला आहे. तूर्त तो हार्ट अटॅकने रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या लहान गटावर केलेला आहे. अशा मोजणीच्या काही मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे :
१. त्या उपकरणावर पडणारा आजूबाजूचा प्रकाश : यातून संदेशांच्या तीव्रतेत फरक पडतो.
२. आजूबाजूच्या आवाजाचाही परिणाम संदेशांवर होतो.

३. उपकरणाचा संवेदक आणि मनगट यांचा एकमेकांशी सुयोग्य संपर्क आवश्यक आहे तसेच मोजणी दरम्यान हात स्थिर राहिला पाहिजे.
४. मनगटावरील त्वचेची अल्कोहोलने पुरेशी स्वच्छता झाली पाहिजे

५. Trop मोजणी ठराविक अंतराने काही काळ करत राहावी लागते. सुरुवातीला वाढलेले Trop कालांतराने कमी झालेले दिसणे पण निदानासाठी आवश्यक असते.

या सगळ्या गोष्टींचा विचार भविष्यातील प्रयोगांमध्ये करायला हवा आहे. अर्थात रुग्णाला सुई न टोचता आणि रक्त न घेता करता येणारी अशी मोजणी अचूक आल्यास ती एक चांगली प्रगती असेल.

सायकलिंग मधील द्रोणाचार्य मानले जाणारे अनिल कडसुर (वय ४५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी सलग 42 दिवस रोज शंभर किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम केला होता.

त्यांच्या आनुवंशिक आणि व्यक्तिगत आरोग्य इतिहासासंबंधी काही माहिती नसल्यामुळे यावर टिप्पणी करणे अयोग्य.

तूर्त फक्त नोंद आणि आदरांजली !
https://www.lokmat.com/national/famous-cyclist-anil-kadsur-dies-of-heart...

ब्ल्यू कोड - अन्य रंगीत कोड

मागचा पूर्ण महिना रुग्णालयांच्या वारीतच गेला. ऐकेठिकाणी दर्शनी भिंतीवर हा फलक बघितला आणि तुमच्या धाग्याची आठवण झाली.

0061dee3-b2bc-4a7a-8929-579ffaed21c0.jpeg

कितीतरी वैद्यकीय संज्ञा फक्त तुमच्या लिखाणातून मला समजल्या, नाहीतर कधी लक्ष गेले नसते. अनेक आभार डॉ. कुमार !

अनिंद्य,
वरील फलक छान व सर्वांसाठी उपयुक्त आहे.
धन्यवाद व शुभेच्छा !

दोन तीन ठळक रंग असतील तर लक्षात रहातील. एवढे रंग म्हणजे चार्ट जवळ बाळगावा लागेल. ९०० नंबर वाल्यांना अर्थात असतील पाठ. पण या रंगांचा पुढे उपयोग नक्की कसा करतात? म्हणजे समजा चाईल्ड अ‍ॅबडक्शन केस आहे ९०० ला कॉल करुन कळवले कोड पिंक. मग ते पुढे गुलाबी रंगाचा वापर कसा करतात?

मुळात त्या रंगीत कोड्सचा उद्देश रुग्णालयातील स्टाफ आणि रुग्णांचे नातेवाईक यांची जागरूकता वाढवणे हा आहे. एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी संबंधितांकडून शक्य तितक्या तातडीने कृती व्हावी आणि एकमेकांना समजण्यात कोणताही गोंधळ होऊ नये किंवा संदिग्धता राहू नये, असा त्याचा हेतू आहे.
https://www.jcdr.net/articles/PDF/18290/58898_CE[Ra1]_F(SL)_QC(SHK_IS_OM)_PF1(AG_KM)_PFA(AG_KM)_PN(KM).pdf

काही महिन्यांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयात कार्यरत असलेल्या अशा यंत्रणेचा आढावा घेण्यात आला होता. त्या संबंधित हा जुना प्रतिसाद
:

ब्ल्यू कोड
रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णास अचानक हृदयविकाराचा झटका आला किंवा त्याचे हृदय बंद पडले ( arrest ) तर अशा प्रसंगी तातडीने उपचार मिळण्यासाठी ब्ल्यू कोड नावाची यंत्रणा वापरली जाते.

यासाठी एक स्वतंत्र पथक नेमलेले असते. रुग्णालयातील कुठल्याही कक्षात वरील आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असता त्याची माहिती ध्वनीक्षेपकाद्वारे दिली जाते. त्यानुसार 120 सेकंदात संबंधित डॉक्टरांचा चमू संबंधित रुग्णास उपचार देतो.

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये सर्वात प्रथम अशी योजना पुण्यातील ससूनमध्ये सहा महिन्यांपूर्वी चालू करण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत 778 रुग्णांसाठी तिचा यशस्वी वापर केला गेलेला आहे.
( बातमी : छापील मटा, 25 डिसेंबर 2023)
Submitted by कुमार१ on 25 December, 2023 - 13:01

वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
https://www.loksatta.com/explained/loksatta-analysis-importance-of-rest-...

गेल्या वर्षी 35 ते 40 या वयोगटातील दोन भारतीय वैमानिकांना कामावर असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू आला होता. आता यावर गांभीर्याने विचार करून हवाई वाहतूक नियंत्रण मंडळाने वैमानिकांसाठी कामाचे नवे नियम जाहीर केले आहेत. त्यामध्ये त्यांची पुरेशी झोप, कामाचे तास आणि रात्रपाळीची व्याख्या या संदर्भात चांगले बदल केलेले आहेत.

मंडळाला धन्यवाद आणि सर्व वैमानिकांना तब्येतीसाठी शुभेच्छा !

>>>>35 ते 40 या वयोगटातील दोन भारतीय वैमानिकांना कामावर असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू आला
३५-४०??? बाप रे!!!

युकेमधील चाळीस वर्षीय नर्सचा डॉक्टरांच्या निष्काजीपणामुळे मृत्यू झाला. तिचा हृदयविकार डॉक्टरांना दोन वेळा समजून आला नाही. पहिल्या वेळेस तिचा त्रास तिच्या काळजी करण्याने होतो आहे असे सांगण्यात आले, तर दुसऱ्या वेळेस तिला मेंदूरोग विभागात दाखल केले होते.

डॉक्टरांच्या या हलगर्जीपणाबद्दल संबंधित नर्सच्या पतीला दहा लाख पौंडाची नुकसानभरपाई मिळालेली आहे :

https://www.msn.com/en-in/health/health-news/nurse-died-after-bungling-m...

ब्रोकन हार्ट सिंड्रोम
लेखात हृदयविकाराचे काही प्रकार दिलेले आहेत. त्यातील पहिला प्रकार सर्वाधिक आढळतो. परंतु बाकीच्या प्रकारांमध्ये करोनरी रक्तवाहिन्यामध्ये विशेष अडथळा निर्माण झालेला नसतो. अलीकडे या प्रकारच्या घटना समाजात बऱ्यापैकी आढळताना दिसल्याने त्याच्यावरील संशोधन अधिक होत आहे. अशाच प्रकारच्या एका हृदयआजाराला ब्रोकन हार्ट सिंड्रोम असे नाव आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती :

जेव्हा एखाद्या व्यक्तीला अचानक प्रचंड शारीरिक/ मानसिक ताण येतो तेव्हा शरीरातील काही हार्मोन्समध्ये वाढ होऊन हृदयस्नायूना अतिदुर्बलता येते. अशा वेळेस नेहमीच्या (प्रकार१) हार्ट अटॅकमध्ये दिसणारी सर्व लक्षणे दिसतात.

हा सिंड्रोम आशियाई वंशात आणि स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसतो. अधिकतर तो साठीनंतरच्या वयातला आहे. परंतु गेल्या काही वर्षात तो लहान मुले आणि तरुणांमध्येही आढळून आलेला आहे.

अचानक ताण येण्याची प्रामुख्याने खालील कारणे असतात :

  • प्रियजनाचा मृत्यू
  • मोठी आर्थिक आपत्ती
  • कायद्याच्या कटकटी
  • मोठ्या नैसर्गिक आपत्ती
  • वाहनाचे गंभीर अपघात
  • व्यसनी ड्रग्जचा वापर

या प्रकारचे बहुतांश रुग्ण एक ते दोन महिन्यात ठीकठाक होतात. परंतु सुमारे एक ते तीन टक्के रुग्णांमध्ये अशा प्रसंगी मृत्यू होऊ शकतो.

<ब्रोकन हार्ट सिंड्रोम> चांगली माहिती डॉक्टर.
तरुणांचा असा मृत्यू झाला की खूप वाईट वाटते.

आजच्या जागतिक हृदय जागरूकता दिनानिमित्त सर्वांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा !
यंदाची संकल्पना :
WHD.pngध्येय आणि कृती :

  • पुरेसा योग्य व्यायाम
  • ध्यान व मनन
  • शांत झोप
  • हवा प्रदूषण नियंत्रण

पौगंडावस्थेतील क्रीडापटूंच्या बाबतीत मैदानावर खेळत असताना (क्रिकेट, फुटबॉल इत्यादी) कधीकधी चेंडूचा जोरदार तडाखा छातीच्या हृदयावरील भागावर बसतो. त्यातून काही वेळेस तो खेळाडू क्षणार्धात बेशुद्ध पडतो आणि त्याचे श्वसन आणि हृदयक्रिया दोन्ही थांबल्यागत होतात. या प्रकारच्या धक्क्याला वैद्यकशास्त्रात
Commotio Cordis असे म्हटले जाते.

या घटना तशा दुर्मिळ असल्या तरी खेळाडूंच्या दृष्टिकोनातून पाहता त्या प्राणघातक ठरू शकतात.
यासंबंधी काही महत्त्वाची माहिती :

  1. हा प्रकार 10 ते 18 या वयोगटातील मुलग्यांच्या बाबतीत सर्वाधिक आढळतो.
  2. छातीवर जोरदार मार बसल्यानंतर पाच ते सात सेकंदात खेळाडू खाली कोसळून बेशुद्ध पडतो.
  3. अशा तडाख्यामुळे Ventricular fibrillation हा हृदयविकार होतो.
  4. यातून खेळाडूला वाचवायचे असल्यास एक ते तीन मिनिटात अत्याधुनिक CPR, external defibrillation हे उपचार करावे लागतात. ते यशस्वी झाल्यास खेळाडू वाचण्याचे प्रमाण 60 टक्क्यांहून अधिक आहे.

२०२३मध्ये अमेरिकेच्या एका तरुण फुटबॉलपटूवर असा प्रसंग ओढवल्याने या घटनेला बरीच प्रसिद्धी मिळाली होती.
https://www.mlive.com/news/2023/01/photos-from-the-field-after-collapse-...

अशा एकूण एक घटनांच्या नोंदी होत नसल्याने या प्रकाराचे नक्की प्रमाण उपलब्ध नाही परंतु अमेरिकेमध्ये दरवर्षी अशा प्रकारे सरासरी 20 खेळाडू मरण पावतात.

2030 मध्ये ?
हे अजून यायचे असेल ना ?

बाकी माहिती छान

दुर्मिळ जन्मजात करोनरी विकार आणि बाका प्रसंग
चीनमधील एका ३७ वर्षीय पुरुषाच्या बाबतीत ही घटना घडली. त्याला सुमारे दहा वर्षे फक्त चक्कर येण्याचा त्रास होता; बाकी मधुमेह आणि उच्चरक्तदाब वगैरे त्रास नव्हते. परंतु एके दिवशी त्याने लैंगिक संबंधास सुरुवात केल्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला आणि सुमारे वीस सेकंदात आपोआप शुद्धीवर आला.

त्या अल्पकाळात त्याला cardiac arrest झालेला होता आणि त्याचे कारण करोनरी वाहिनीतील जन्मजात बिघाड असल्याचे नंतर केलेल्या अत्याधुनिक तपासणीतून लक्षात आले. या रुग्णाला डॉक्टरांनी योग्य ती शस्त्रक्रिया करण्याचे सुचवलेले आहे परंतु त्याची त्यासाठी तयारी नाही.
सध्या तो एकंदरीत ठीक आहे.

https://www.frontiersin.org/journals/cardiovascular-medicine/articles/10...

Pages