अपराजिता
श्रावण आला की एरवी विस्मरणात गेलेली आघाडा, दुर्वा,फुलं ही त्रयी आपोआप कानात गुंजते..माझ्या मनातला श्रावण फार फार साधा, सत्शील आणि गोड आहे..मंगळागौरीची पूजा,पुरणपोळी, श्रावणी सोमवार, शाळेतून आल्या आल्या जेवणं, खांडवी, काला सगळं आठवतं आणि आठवतो तो श्रावणी सोमवार करणारा माझा चुलतभाऊ, संध्याकाळच्या प्रकाशात आमच्या दत्ताच्या देवळातल्या शंकराच्या पिंडीसमोर व्रतस्थ
बसलेला दिसतो,रात्र होत असताना मागच्या अंगणात बघायला एरवी जी भीति वाटायची ती त्या रात्रीत वाटायची नाही,तो पूजा करत असतानाचा देवळातला तो मंद प्रकाश, गूढ आणि गंभीर तरीही विलोभनीय आणि आश्वासक आणि अजूनही स्पष्ट दिसते ती शंकराच्या पिंडीवर असलेली पांढरी आणि निळी गोकर्ण शोभा.. मधल्या काळात अतीव परिचयाच्या ह्या फुलांना कुठंतरी विसरुन आले होते,अचानक मनासमोर आली म्हणून शोध घेतला आणि अगदी लगेच त्याचं सुंदर रोप मिळालं, गोल बांधलेल्या काठ्यांवरुन भराभर वाढलं, निळी निळीशार फुलं आली, लवकर लवकर शेंगा आल्या त्यातल्या बिया खायला छोटे छोटे पक्षी आले, बियांमधून नवीन रोपं करणं,रोपं थोडी मोठी झाल्यावर त्यांना नवीन घरी देणं, मधून मधून त्या बाळांची चौकशी करणं चालू आहेच..Butterfly pea, Blue pea, Cordofan pea आणि Asian pigeonwings इतकी सगळी नावं असणाऱ्या ह्या झाडाला आपल्या माय मराठीतलं गोकर्ण हे अगदी गोड नाव कायम जास्त भावलं! प्राणीप्रेमी आणि त्यातही गाय,तिचे डोळे, छोटी शिंगं आणि तिचे काहीसे लांब कान सगळं फारचं मनपसंत , त्यामुळे ते नाव जवळचं वाटलं आणि गोकर्ण आणखी आवडायला लागला आणि आता नुकतंच गोकर्णाला संस्कृतमध्ये अपराजिता म्हणतात असं कळलं..बहुतेक औषधात वापरता येणारी आणि हार न मानणारी ती अपराजिता....किती लखलखीत तेजाळ नाव....
नुकतंच धाकटं लेकरु पंखात शिक्षणाचं बळ भरुन परगावी गेलं, लेक आधीच सासरी गेली आहे.. दोघेही तसे टप्प्यात परंतु घरात नाहीत आणि गेली तीस वर्षं ह्या दोन चैतन्यमूर्तींभोवती फिरणारं आमचं घर "सारं कसं शांत शांत " झालं आहे..त्यांचे कपडे, पुस्तकं, फुटबॉल, दागिने, प्रसाधने, बॅगा, बूट चपला ह्यांची वर्दळ,त्या रात्री रात्री कॉफ्या,मॅग्या, त्यांची आणि त्यांच्या मित्रमंडळींची जा ये थंडावली आहे , त्यांच्या कपाटांमध्ये आता रिकामी जागा भरपूर आहे आणि आता आम्ही दोघेही आता सहजीवनाच्या एका वेगळ्याच टप्प्यावर उभे आहोत ह्याची प्रखर जाणीव झाली आहे..ही वाट मुलं व्हायच्या आधी आपण चाललो आहोत पण आता ती पूर्ण पूर्ण धूसर झाली आहे,क्वचित काहीतरी आठवतं त्यातलं,पण ही मधली वाट मात्र खणखणीत कण न कण आठवते आहे..पण आता मात्र लहान भांड्यांमध्ये अंदाजाने स्वयंपाक करताना, चाचपडताना आपली वेगळी वाट नव्यानं सुरु झाली हे मनोमनी कळलं आहे..कमी प्रमाणात स्वयंपाक करायला वेगळं कौशल्य लागतं हेही नव्यानं कळलं.
मुंबईसारख्या महानगरात त्याचं एक छोटं घर मांडायचं म्हणून मी गेले.लग्न होऊन गेलेली लेक तिथेच जवळ.. तिनं आणि लेकासारख्या जावयानी घर स्वतः साफसूफ करुन घ्यायचा चंग बांधला आणि ट्रेनिंगहून येणारा लेक आणि सामान घेऊन येणारी मी एकदम पोहोचलो..
मला आवडणाऱ्या मुंबईत मी माझ्या कॉलेजजीवनात खूप फिरले आहे..माझ्या नाटकातल्या मित्र मैत्रिणींनी मला खूप जवळून दाखवलेली मुंबई,साहित्यातली मुंबई,रिमझिम गिरे सावनमधली मुंबई,सिनेमातली मुंबई,मुंबईच्या मैत्रिणींच्या भावविश्वातली मुंबई, माझ्या मोठ्या भावानी मला अगदी त्याच्या नजरेतून दाखवलेली मुंबई अनोखी निराळी आहे.नंतरही जीवाची मुंबई म्हणू नका, खरेदीची मुंबईसुद्धा अनेकदा करुन झाली आहे अगदी जावईसुद्धा मुंबईचा! पण राहायची आणि वास्तव्य करायची मुंबई माझ्यासाठी फार वेगळा अनुभव देऊन गेली.लेक भरल्या घरात गेली आहे त्यामुळे तिच्या बाबतीत काही प्रश्न नव्हता पण इथं सगळी सुरुवात होती. आयुष्यभर एकाच गावात राहिलेल्या मला हे स्थित्यंतर गंमतशीर वाटलं आणि काहीसं अवघडही आणि आव्हानात्मकसुद्धा.
लेक लगेच नोकरीत रुजू झाला आणि त्याचं घर मी माझ्या परीनं मांडलं..तो रात्री आल्यावर त्याच्या सोयीनं हवे ते बदल करायचे असं ठरवलं..
तिथं सगळंच परकं परकं वाटत होतं,वस्तू सगळ्या आपल्या पण वास्तू आपली नाही असे वेडगळ विचारही मनात नाचायला लागले.. रंगसंगती आपल्याला मानवणारी नाही की काय,हे काही आपलं, आपल्या कुटुंबाचं व्यक्तिमत्व नाही हे सारखं उगाच मनात यायला लागलं. एक गोष्ट मात्र नक्की की घराला एक छान अनुभूति vibe आहे हे जाणवत राहिलं..स्वच्छ उजेड, भरपूर वारा आणि उंच मजल्यावर असल्यानं दिसणारं शहर,
पण आप-पर भाव कमी होईना. रिकाम्या स्वच्छ घरात भराभर सामान मांडायचा चंग बांधला..मुलगा सारखं आई सामान कमी आण असं सांगत होता पण इतकी वर्षं भल्या मोठ्या सामानात वावरलेल्या मला कमीचा सापेक्षपणा समजत नव्हता हे खरं! सुरुवातीला तसंच असतं म्हणा,हळुहळू जमत आणि जमवत वाढत जातो प्रपंच(पसारा म्हणवत नाहीये) पुण्यातून आठवून आठवून यादी करुन वस्तू नेल्या होत्या तरी काही तिथेच घ्यायच्या होत्या,त्या घेऊन झाल्या.. काही जुन्या, अनुभवाच्या काही नवलाईच्या पण बहुतेक सगळ्या फक्त सोयीच्या अगदी कामाच्या होत्या..त्याला सुरुवातीला काही कमी पडू नये म्हणून धडपडणाऱ्या मनाला हे माहिती आहे की पुढची लढाई त्याची त्यानी करायची आहे..
तरीही घराशी जोडून ठेवतील अशा वस्तू त्याला न सांगता नेल्या होत्याच मी,पण त्यानं न सांगता त्याच्या काही खास वस्तू मी मुद्दाम नेल्या होत्या,पण त्याला त्याच्या बालपणाशी, तरुणपणाशी त्याच्या माणसांशी प्राण्यांशी जोडणाऱ्या आणि जवळ असणाऱ्या...लेकाच्या डोळ्यात वेगळी कृतज्ञ भावना दिसली..
आता घर थोडं "आपलं" वाटायला लागलं.
बाहेर तो महाकाय पाऊस,दणदण नाचायला लागणारा, झपझप पावलं टाकणारी लोकं, काळ्या आणि रंगीबेरंगी छत्र्याच छत्र्या,ही एवढी गर्दी,उंच उंच इमारती,फोन केल्याक्षणी मदतीला येणारी माणसं,चटपटीत काम करणाऱ्या मदतनीस, वेगवान जीवन,वास्तवात आणि वर्तमानात जगणारं हे महानगर .. शहराचा तोंडवळा किंबहुना आत्ता माझ्यासाठी सगळं बिनचेहऱ्याचं, सगळं नवीन,सगळं अनोळखी आणि अपरिचित..मनातून बारीक काळजी,चिंता आणि उपरेपणाच्याही कळा यायला लागल्या..खरंतर मुलांचा सहवास आता कमी मिळणार ह्याच्याचं सूक्ष्म छटा होत्या त्या.
दोन्ही मुलांची वाट आता पुढं पुढंच जाणार हे नक्कीच आहे आता..आपला त्यांच्या आयुष्यातला सहभाग कमी कमी कमीच होत जाणार हे प्रखर वास्तव घशातून खाली उतरताना प्रत्येक पायरीची जाणीव करुन देत होतं..एक मन म्हणत होतं की मुलांनी स्वतःच्या पायावर उभं रहावं ह्यासाठी तर धडपड केली तर आता ते झालं तर का भरुन येतंय!मुलांच्या प्रगतीत,यशात त्यांच्या आनंदात, प्रचंड आनंद आणि अभिमान असूनही मला हे जड जात होतं हे अगदी निश्चित.नवऱ्याचा मात्र सर्व गोष्टी बिनशर्त स्वीकार करण्याचा स्वभाव असल्यानं तो बऱ्यापैकी स्थिर आहे हे जाणवत होतं,तितकं आपल्यालाही स्थिर ठेवायला हवं हे वारंवार पटवत राहिले..
मुलं कधी मोठी झाली हे कळलंच नाही असं अजिबात म्हणणार नाही कारण त्यांच्या वाढीचे टप्पे , फुलोऱ्याचे क्षण फार जवळून आणि त्यांच्यासोबत, त्यांच्यातले होऊन जगलो आहोत.त्यांच्या संघर्षाच्या काळात हळुहळू चालणारा काळ त्यांच्या सोप्या कालखंडात पटकन गेला हे मात्र खरं.त्यांच्याबरोबर आम्ही पुन्हा एकदा बाल्य आणि तारुण्य जगलो आहोत, वय मोठं आणि नातं असलं तरी आई वडिल म्हणून कमी न पडायची काळजी घेता घेता त्यांचे हम उमर बनवायचा प्रयत्न काठोकाठ केला आहे.त्यांना काळजीकाट्यानं वाढवणारे,मुलांच्या मागे तर कधी अदृश्य ढाल बनून उभं राहिलेले आम्ही,आणि कधीआमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली आम्हांला समजून घेणारी मुलं, आता आम्हाला आनंदी ठेवायचा प्रयत्न करताना बघून आणि आमची काळजी घेताना बघून डोळे आणि मन वारंवार भरुन येत राह्यलं.आता सदैव पुढे जाणारी त्यांची वाट आणि त्या वाटेवर आपण खंबीर पण
आता जरा मागे उभे, फार फार हळवे..लेक सासरी गेली तेंव्हाची भावावस्था वेगळी आनंदी तरीही विरह होताच पण आता दोघेही बाहेर, बरं सगळ्याच गोष्टी आनंदाच्या होत्या मग का भरुन येतंय उमजेना काही.. पारंपरिक आई म्हणावं तर चांगली नोकरी करणारी दिवसातले कमीतकमी आठ तास बाहेर असणारी, नातेवाईक मैत्रिणींचं भक्कम पाठबळ बाळगून असणारी म्हणजे चोवीस तास शारीरिक त्यांच्या दोघांच्या मागे नव्हतेच पण तरीही सगळं त्यांच्या भोवती होतं.. प्राधान्य त्यांनाच होतं आणि त्यात मला प्रचंड आनंद आहे,कुठलीही दुःखाची काहीतरी गमावल्याची, त्यागाची भावना तर अजिबात नाही ,i have enjoyed every moment,in fact lived every moment..
आणि आता मात्र खूप लहान वयापासून शिक्षण आणि नोकरीसाठी फिरलेला नवरा स्वतःचं मन ताब्यात असूनही कुठे ना कुठे हललेला दिसला , पुरुषजन्माला ती तळमळ व्यक्त करण्याचा अधिकारही मिळत नाही कारण आईपण फार लिंगसापेक्ष बनवलं आहे आपणच! पण आपल्या ह्या प्रामाणिक भावना वैयक्तिक नसून सार्वत्रिक आहेत हे मनोमन उमगलं..आजूबाजूला, मैत्रिणींची लेकरं परगावी, परदेशी गेली आहेत.कोणी ते सहज स्वीकारले आहे ,कोणी नाईलाज म्हणून कोणी अपरिहार्य म्हणून तर कोणी ही आताची पद्धतच आहे म्हणून तर कोणी देशाप्रति कर्तव्य सर्वश्रेष्ठ म्हणून..कोणी पार कोलमडलं आहे तर कोणी शांतपणे बदल स्वीकारला आहे...मी कुठे बसतेय त्याचा विचार एकीकडे चालू आहे..आपली जागा शोधायची आहे..
धाकटं पिल्लू घराबाहेर गेल्यानंतर येणारा empty nest syndrome स्वतःला लावून स्वतःसाठी आणि मुलांसाठी मला बिचारं करायचं नाहीये..empty nest syndrome बद्दल एकीकडे नव्याने काही काही माहिती कळली,आणि दुसरीकडे कोणीतरी असं लिहिलं होतं की i am not empty nester, I am a bird launcher..एक वेगळा विचार आणि Give the ones you love,wings to fly,roots to come back and reasons to stay...दलाई लामांचं वाक्यही वाचलेलं आठवलं..
अजून नोकरी भरपूर शिल्लक आहे, रिकामी नाही मुळीच,तरीही खूप वेळ शिल्लक राहतोय ..काही रितेपण शिल्लक उरलं आहे हे मात्र खरं! आता मला मुलांच्या विश्वाभोवती फिरणाऱ्या माझ्या आयुष्यात बदल करावे लागणार आहेत हे निश्चित, प्रवासाचा हा भाग कठीण आहे पण करावा लागणार आहे..
आता दुपारी परत निघायचं, मन आणखी गढूळ,आणखी आणखी गदगदायला लागलं, दारावर घंटी वाजली, स्टेशनवर सोडायसाठी लेक आली होती,तिच्यासाठी दार उघडलं तर समोरच्या घरातली माऊली तिच्या मदतनीस बाईशी गप्पा मारत उभी ,माझ्याकडे बघून हसली,अगदी मृदू प्रसन्न समजूतदार..आता आणखी कढ आणि डोळ्यातल्या पाण्याला वाट द्यावी म्हणून बाल्कनीत आले आणि समोर ती दिसली... डोळ्यातल्या पाण्याचा एकदम खळकन निचरा झाला.बरेचसे किंतु अगदी धुवून गेले...
नजर आणि मन स्वच्छ झालं मळभ गेलं, निरभ्र वाटलं..
शेजारच्या अगदी चिकटून चिकटून असलेल्या बाल्कनीतून एक गोकर्ण वेल सरळ खुशाल आपले नाजूक पण चिवट हात पसरुन लेकाच्या बाल्कनीत शिरुन घट्ट धरुन उभी, इवल्या इवल्या फांद्या, पानांचा छान तुकतुकीत रंग, मुंबईच्या हवेला, पावसाला,वाऱ्याला समर्थ तोंड देत त्याच वाऱ्यावर झुलत, पावसात भिजत तरीही आनंदानी डोलत खंबीर ,जीव एवढासा पण एक सुरेख निळ्या रंगाचं फूल बाळगत ती उभी!
अगदी निर्भयपणे माझ्या लेकाच्या बाल्कनीला आपलं मानून ती हात पुढे करुन आली होती.दादाच्या पूजेतला तो निळा गोकर्ण ते खाऱ्या वाऱ्यावर निर्घोर डुलणारी अपराजिता. अगदी निर्वेध आणि आश्वस्त...
©ज्येष्ठागौरी
अपराजिता
Submitted by ज्येष्ठागौरी on 19 September, 2024 - 13:03
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप सुंदर लिहिलं आहे!
खूप सुंदर लिहिलं आहे! नेहमीप्रमाणेच!
धन्यवाद वावे!
धन्यवाद वावे!
छान लेख आहे. खास तुमच्या
छान लेख आहे. खास तुमच्या शैलीतला
मनिम्याऊ खूप खूप धन्यवाद!
मनिम्याऊ खूप खूप धन्यवाद!
नेहमीप्रमाणे अतिशय तरलतेने
नेहमीप्रमाणे अतिशय तरलतेने लिहिले आहे. भावना मोकळ्या मनाने तरीही स्थितप्रज्ञता ठेवून अवघड असतं. तुम्हाला ते जमलंय..
अपराजितेच्या बहरासारखं हे लिखाण व लेकाचं जीवनही आनंददायी असो ही शुभेच्छा.
प्राचीन तुमच्या
प्राचीन तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल खूप खूप आभार!
काय सुरेख रिलेटेबल लिहिलय !
काय सुरेख रिलेटेबल लिहिलय ! वाक्य न वाक्य भिडलय ! एंप्टी नेस्टरवरचा कमेंट् आवडला.
बाहेर तुमच्या आयडी सहित शेअर केला तर चालेल का ?
असामी खूप धन्यवाद! जरुर share
असामी खूप धन्यवाद! जरुर share करा..
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
अनु मनापासून धन्यवाद!
अनु मनापासून धन्यवाद!
Pages