वन डिश मिल - राजमा सलाड - { अल्पना}

Submitted by अल्पना on 11 September, 2024 - 01:56

साहित्य -
सलाड साठी -अर्धी वाटी राजमा ( नुसत्या राजमा ऐवजी राजमा+ चवळी पण घेता येईल), अर्धी वाटी वाफवलेले स्वीट कॉर्न, बारीक चिरून लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची ( सगळ्या मिळून एक -दिड वाटी), एक कांदा बारीक चिरून, एक टोमॅटो बारीक चिरून, हवे असल्यास ऑलिव्हज

खाकरा नाचोज साठी -दोन तिन शिळे फुलके, थोडं तेल, मीठ, गरम मसाला /तिखट / पिरी पिरी सिझनिंग

ड्रेसिंग साठी - एक हिरवी मिरची बारीक चिरून, थोडे चिली फ्लेक्स, लाल तिखट, जीरा पावडर, मिऱ्याची पूड, मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, आंबट पणा बॅलन्स करायला थोडी साखर किंवा पंजाबी शक्कर / गुळाची पावडर, एक दोन लसणाच्या पाकळ्या क्रश करून ( आले किसायाच्या छोट्या किसणीने किसून घेतल्या), ३-४ चमचे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:
राजमा ३-४ तास पाण्यात भिजवून, थोडं मीठ घालून कुकरमध्ये व्यवस्थित मऊ शिअजवून घ्यावा. तुमच्या घरी राजमा शिजत नसेल तर राजम्याऐवजी चवळी घ्या. इथला राजमा १५-२० मिनिटांत छान शिजतो.
एक बोल मध्ये शिजवलेला राजमा (त्यातलं पाणी घेवू नका.), वाफवलेले स्वीट कॉर्न आणि बारिक चिरलेल्या सगळ्या भाज्या एकत्र करा.
ड्रेसिंग साठीचे सगळे साहित्य एकत्र करा आणि चमच्याने फेटून घ्या. जास्त प्रमाणात करणार असाल तर ब्लेंडरनी पण फेटता येईल.
काल माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून घातली नाही. पण कोथिंबीर घालाच भरपूर. चवीत खूप फरक पडतो. हे ड्रेसिंग सलाडमध्ये मिक्स करा. वरून हवे असल्यास थोडे पिकल्ड ऑलिव्ह्ज घाला.
खाकरा नाचोज करायला फुलक्यांचे त्रिकोणी तुकडे करून घ्यावेत. एका फुलक्याचे आठ तुकडे होतात. तव्यावर २-३ थेंब तेलात हे तुकडे दाबून दोन्ही बाजूंनी कुरकुरित होईपर्यंत शेकावे. एका प्लेटमध्ये हे तुकडे काढून त्यावर थोडे मीठ, तिखट आणि आवडीचा मसाला भुरभुरावा. मी किचन किंग मसाला भुरभुरला होता.
सर्व्ह करताना बोल मध्ये मध्यभागी सलाड आणि बाजूने हे खाकरा नाचोज असे सर्व्ह करावे.
mexiacan bean salad.jpg
अधिक टिपा:
यात पिकल्ड हालपिनो घातल्या तर छान लागतात. माझ्याकडे नव्हत्या. मी एरवी या सलाड मध्ये लिंबाच्या रसाऐवजी एक दिड चमचा रेड वाइन व्हिनेगर घालते.
तुम्हाला तिखट आवडत असेल तर ड्रेसिंग मध्ये थोडे पिरी पिरी सिझनिंग / पिरी पिरी केचप किंवा हॉट सॉस घातलेला खूप छान लागतो. मी सध्या विकतचे सॉस वापरणं खूप कमी केल्याने घातला नाही.
तेलाऐवजी खाकरा करताना गार्लिक बटर वर किंवा साध्या अमुल बटर वर शेकला तर जास्त चांगला लागतो. फुलक्याचे खाकरा नाचोज न बनवता, बाजारातले नाचोज पण खाता येतिल याच्याबरोबर.
salad_nacho.jpg
हा एक याच सलाड चा जुना फोटो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

झकास !

.. यात पिकल्ड हालपिनो घातल्या तर… अगदी हाच विचार करत होतो स्टेप १ पासून Happy चवळी मात्र स्मेली होईल.

… तुमच्या घरी राजमा शिजत नसेल तर… स्फोटक विषयाला बत्ती लावलीय तुम्ही Lol

मस्त लागत असणार हे पण. करुन बघेन राजमा आणला की. सध्याच संपलाय करुन. राजम्या ऐवजी छोले किंवा असेच इतर कढधान्य मोड आणून किंवा न आणता शिजवून खाल्ली जाणारी पण छान लागतील ना

नक्कीच करुन बघेन (लवकरच)

राजम्या ऐवजी छोले किंवा असेच इतर कढधान्य मोड आणून किंवा न आणता शिजवून खाल्ली जाणारी पण छान लागतील ना>> चवळी घालून बघितली होती. ती चांगली लागली. उकडलेल्या छोल्यांमध्ये कांदा - टॉमॅटो चांगला लागतो. स्वीट कॉर्न आणि बेल पेपर्स नाही घातलं कधी. त्याऐवजी काकडी घालते त्यात. आणि सलाड ड्रेसिंग मध्ये लसूण न घालता हिरवी मिरची, लाल तिखट, लिंबू, मीठ जीरे पुड, अद्रक, कोथिंबीर, पुदिना आणि साखर. आणि वरून हवी असल्यास चिंची गोड चटणी. यात भाजलेले शेंगदाणे चांगले लागतात. वरून थोडी शेव घालता येते.

दिसायला तर छान दिसतेय..
नवीनच नाचो फॅन झालो आहे.. पण सुके नाही तर मायो चीज सॉस वगैरे सोबत.. हे सुद्धा आवडेल.. करून कोण देणार तो प्रश्न वेगळा Happy

करून कोण देणार तो प्रश्न वेगळा>> तुझे तू स्वतः करून घे कि. अगदीच बिगरी ची रेसिपी आहे ही. अंडं उकडणं, मॅगी करणं हे जमत असेल तर जमायला हवी. काहीच स्किल नाहीत यात. राजमा शिजवायचा, स्व्वीट कॉर्न उकळायचे, भाज्या चिरायच्या आणि सगळं सामान एकत्र करायचे. बस्स.
माझी ११ वर्षाची पुतणी पण करते.

भारी दिसतय सलाड. मी राजमा फॅन नाही तरी बघून खायचा मोह झाला. नेहमीच्या राजम्याऐवजी छोटा काश्मिरी राजमा वापरला तर चालेल का? तो एका शिट्टीत गाळ शिजतो.

मी सध्या विकतचे सॉस वापरणं खूप कमी केल्याने घातला नाही. >>> संज्योत कीरच्या रेसिपीने २ मिनीटात परफेक्ट सीझनींग बनते.

नेहमीच्या राजम्याऐवजी छोटा काश्मिरी राजमा वापरला तर चालेल का? तो एका शिट्टीत गाळ शिजतो.>> हो चालेल कि.

मी पण फारशी राजमा फॅन नाही आहे. लेक तर अजिबात राजमा खात नाही. या प्रकारे किंवा इथे मायबोलीवर पूर्वी वाचलेल्या चिली च्या रेसिपीने (रेसिपी कुणाची होती आठवत नाहीये. सोया ग्र्न्युअल्स वापरून करायचे व्हेजितेरियन व्हर्जन होते) चिली बनवलं तरंच खातो.

पिरी पिरी सिजनिंग्च्या लिंक बद्दल धन्यवाद. करून बघेन.

मस्त आहे रेसिपी.. सिझनिंग शिवाय असा प्रकार केलेला, डायेट म्हणुन लेकीने खाळ्ला.. सिझनिंग्+नाचोस असे कॉम्बो केले तर आवडेल. करुन पाहते.

आता उघडून पाहिली ही रेसिपी.'राजमा' वाचून भीतीने टाळत होते.हे असंच हुबेहूब मोड आलेल्या मुगाचं शिजवून करून बघेन.आणि नॉर्मल चण्याचं पण.

रेसिपी आवडल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
आधी एकेक नावं लिहिणार होते, पण मग खूपच मोठी पोस्ट झाली असती नुसत्याच धन्यवादाची. Proud

हे सलाड माझ्या घरी लहान - मोठे सगळ्यांना आवडतं. पण मायबोलीवर शिजवलेला राजमा घातलेली कृती लिहायला जरा वेळ लागला. Proud
राजमा पचायला हलका असतो का ?>>> नाही . राजमा पचायला बराच जड असतो. पचनाचा त्रास असेल, सवय नसेल तर गॅसेस चा त्रास होवू शकेल.