भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्‍हाडे

Submitted by मार्गी on 15 September, 2024 - 05:44

✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास
✪ ओळखीच्या चेहर्‍याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय
✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या
✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं!
✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!”
✪ “तुला मनलं होतं‌ ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या!”
✪ “Soak the pressure and be there!”
✪ पुस्तकं‌ व माणसं वाचणारा अवलिया

संकर्षण कर्‍हाडे! बस नाम ही काफी है! घराघरात पोहचलेला चेहरा! कलाकार, नाटककार, अभिनेता, सूत्र संचालक, लेखक आणि कवी! पण ह्या सगळ्यांच्या पलीकडे असलेला माणूस म्हणून संकर्षण कसा आहे हे ह्या "व्हायफळ" पॉडकास्टमधून उलगडलं! Why फळ, म्हणजे फळाची चिंता कशाला, असं नावच असलेला हा पॉडकास्ट! इथे संकर्षण अगदी मित्रासोबत बोलावा तसा मनातून बोलतो आणि भेटतो. संकर्षण माझ्या परभणीचाच! गाववाला! आणि वयाने थोडा लहान! म्हणून "तो संकर्षण" असा एकेरी उल्लेख करतोय. त्याचं काम सगळ्यांनाच आवडतं. पण माणूस म्हणून संकर्षण कसा आहे हे माहिती नव्हतं. ते ह्या गप्पांमधून उलगडलं! गप्पा अर्थात् संभाषण, बोलणं व संवाद त्या अर्थाने खूप महत्त्वाचं माध्यम आहे. कृष्णाची गीता हेसुद्धा संभाषणच तर आहे.

ह्या गप्पांची सुरूवात होते संकर्षणच्या लहानपणापासून. त्याचं‌ गाव परभणी. जगात जर्मनी, भारतात परभणी हे जगाला सांगणारा संकर्षणच! त्याचं आजोळ अंबेजोगाई. तिथला वाडा, तेव्हाच्या घरातल्या रीती व त्याचं परभणीमधलं लहानपण. लहानपणी त्याने केलेल्या "दलिंदर" खोड्या! सायकल चालवताना शनिवार बाजारजवळ लोकांच्या कानाजवळ जाऊन ओरडणार आणि लांब पळून जाणार! आजोबांच्या मित्राला जवळ जाऊन "ए केशव!" अशी हाक मारणारा संकर्षण! तेच मित्र संध्याकाळी घरी आल्यावर खूप घाबरलेला! पण ते काहीच बोलत नाहीत म्हंटल्यावर "केशव दुसर्‍या कामासाठी आला," असं मनात म्हणणारा संकर्षण! प्रशांत दामलेंचा "संक्या" आणि मकरंद अनासपुरेंचा "संकर्शन कराडे!"

(माझ्या ब्लॉगवर असे इतर लेख वाचता येतील- https://niranjan-vichar.blogspot.com/2024/09/blog-post.html लेखन: निरंजन वेलणकर)

लहानपणापासून अंगी कलागुण असलेला व तसे संस्कार असलेला संकर्षण! बँकेत असलेले कलासक्त वडील! परभणीमध्ये कोणीही कलाकार- अभिनेता- गायक आला तर तो जेवायला त्यांच्या घरी येणार असा शिरस्ता. त्यामुळे लहान वयापासून अशोक सराफ, भीमसेन जोशी अशा दिग्गजांचा सहवास! बाल विद्यामंदिरमध्ये शिकताना अभ्यासाचे सगळेच विषय नावडते. पण मराठी व संस्कृत भाषांची आवड. मराठीच्या जपे मॅडम वर्गासमोर मराठी वाचायला सांगायच्या. बिंदू मॅडम शिकवत असलेल्या संस्कृतमधली स्तोत्रं व सुभाषितं सहजपणे पाठ व्हायची. अनेकांना जे येत नाही, ते मला करता येतं हा आत्मविश्वास मिळाला. शालेय जीवनापासूनच कथाकथन, एकपात्री अभिनय अशा क्षेत्रामध्ये संकर्षणचा प्रवेश झाला. कोवळ्या वयात सुलभाताई देशपांडेंसारख्या दिग्गज मंडळींकडून कौतुकाची थाप मिळाली. आज संकर्षण सांगतो की, आपलं तिशी- चाळीशीनंतरचं करीअर हे ८०% लहान वयातल्या कलांनुसारच ठरतं! अगदी आज आपण जे ध्यान करू बघतो ते ध्यानही "मनाची उधळलेली गाय कृष्णाच्या हाती देणं!" अशा अर्थाच्या श्लोकांच्या काव्यामध्ये होतं असं सांगतो. संकर्षणचा अर्थही आकर्षित करणारा किंवा कृष्ण!

१९८७ मध्ये जन्मलेल्या संकर्षणला लहानपणापासून आई- वडील व आजी- आजोबांचे समृद्ध संस्कार मिळाले. लहान गावामधली मेहनतीची, काटकसरीची व मनसोक्त जगण्याची शिदोरी मिळाली. बारावीनंतर बीएससी कंप्यूटर सायन्सला त्याने प्रवेश घेतला खरा. पण मन कलेकडेच ओढा घेत होतं. त्यामुळे बीएससी तिसर्‍या वर्षात आठ विषयांची ए.टी.के.टी. होती! संकर्षण सांगतो, त्यावेळी त्याच्या वडिलांचे (गिरीश कर्‍हाडे) मित्र असलेल्या रविशंकर झिंगरे सरांनी त्याला जागं केलं आणि रुळावर आणलं! शिक्षणामध्ये फार काही नाहीय, पण ते पूर्ण करून तुला हवं ते कर, हे भान दिलं सरांचं सांगणं ऐकून संकर्षण जागा झाला. त्याने बीएससीमध्ये ८६% तर मिळवलेच, पण त्याबरोबर त्याने राज्य स्तरीय नाट्य स्पर्धेमध्येही पहिला क्रमांक मिळावला! हे ऐकताना मलाही बीएससीमध्ये असलेली ए.टी.के.टी. आणि मला शिकवणारे झिंगरे सरही आठवले!

इथून पुढे संकर्षणची प्रगती नेत्रदीपक अशीच झाली! औरंगाबादच्या अमेय दक्षिणदास सरांच्या मार्गदर्शनामध्ये तो अभिनय व नाट्य क्षेत्रात पुढे येत गेला. नाटक कसं लिहीतात, कसं जगतात हे त्यांनी त्याला शिकवलं. तू "हिरो" होऊ शकतोस, हा आत्मविश्वास त्यांनीच त्याला दिला. "स्टेजवरचा माज जर खाली केलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल," हा कानमंत्र त्यांचाच! आजही संकर्षण त्यांचं मार्गदर्शन घेतो.

पुढे त्याने पुण्यामध्ये एमबीए केलं पण ह्या शिक्षणापेक्षा व्यवहाराचं भान व समाजामध्ये झालेलं शिक्षण जास्त कामी आलं. २०११ मध्ये "आम्ही सारे खवय्ये" मधून त्याला मोठा ब्रेक मिळाला. नंतरच्या टप्प्यामध्ये आणखी कामं मिळाली, मालिका व नाटकं मिळाले. मकरंद अनासपुरेसारख्या स्टारला एके काळी त्याने लांबून आ वासून बघितलं! पुढे "नागपूर अधिवेशन" सारख्या चित्रपटात मकरंद दादासोबत त्याला काम करायची संधी मिळाली! त्याची मेहनत, त्याचं पुस्तक वाचन ह्यामुळे मकरंददादा प्रभावित झाले. "संकर्शन कराडे, तू हे सारखं वाचीत का बसतोस! तू माझ्या घरी ये, तितं मला भेट." संकर्षणला वाटलं की, ही गंमत असेल. पण दोन महिन्यांनी त्यांचा फोन. "संकर्शन कराडे, अशी कुटं गंमत अस्ते का? तुला मनलं होतं‌ ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या! ये घरी." घरी बोलावून स्ट्रगलच्या दिवसांमध्ये त्यांना दिशा दाखवणारी पुस्तकं त्यांनी त्याला भेट दिली! ती वाचून झाली की परत ये, पुढची‌ देतो म्हणाले!

संकर्षण पुढे सांगतो की, २०१५ मध्ये प्रशांत दामले सर त्याच्या जीवनात आले! त्यांच्यासोबत त्याला नाटक करता आलं. किती तरी गोष्टी शिकता आल्या. त्यांनी एक दृष्टी दिली, शिस्त दिली. त्यांच्याकडे बघून संकर्षणला गोष्टी शिकता आल्या. सुरूवातीला चाहते प्रशांत दामलेंसोबत फोटो घ्यायचे, तेव्हा संकर्षण लांब उभा राहायचा. त्याला जाणीव होती की, लोकांना दामलेंसोबत फोटो हवा आहे. तेच त्याला बोलवायचे. आणि मग पुढे लोक त्याचाही फोटो मागायला लागले. नाटक कसं चालवायचं असतं, हा संसार कसा उभा करायचा, कसा निभवायचा हे तो शिकत गेला. कालांतराने संकर्षणने लिहीलेलं नाटक त्यांनी प्रॉड्यूस केलं.

मागच्या वर्षी प्रशांत दामलेंची एक पोस्ट व्हायरल झाली होती. नाटकानंतर जेवण व आवराआवर करून मध्यरात्री निघत असताना त्यांच्या बसच्या ड्रायव्हरची तब्येत बिघडली! तेव्हा संकर्षणनेच बससुद्धा चालवली होती! नाटक, दौरे, प्रवास ह्यामध्ये आरामाचं गणित व्यस्त होतं, पण संकर्षणकडे ही ऊर्जा आहे. कितीही दमलेला असला तरी तो कामाला तयार असतो. सचिनची जशी धावांची प्रचंड भूक होती, तशीच त्याची कामाची व परफॉर्मन्स देण्याची भूक प्रचंड आहे. सचिनकडूनच संकर्षणने "Soak the pressure, just be there" हा मंत्र घेतला आहे! काहीही परिस्थिती असो, काम करत राहा. उभे राहा. रन्स होतीलच.

ह्या सर्व गप्पांमधून संकर्षण एक माणूस म्हणून उलगडत जातो, तसं त्याचं वर्क इथिकही कळत जातं. विक्रम गोखले, शुभांगी गोखले, अरविंद स्वामी अशा दिग्गजांचा तो उल्लेख करतो. "माझी तुझी रेशीमगाठ" मालिकेच्या वेळी श्रेयस तळपदेने किती संभाळून घेतलं ते आवर्जून सांगतो. इतके मोठे कलाकार इतकं प्रेमाने वागवतात, विनम्र असतात हे सांगतो. त्यामुळेच मी कधीच चाहत्यांसोबत किंवा ज्युनिअर्ससोबत अहंकाराने वागू शकत नाही असंही म्हणतो. गप्पांमध्ये त्याने सांगितलेला विक्रम गोखलेंसोबतचा किस्साही ऐकावा असाच आहे. साखर खाल्लेल्या माणूस नाटकाच्या ठाण्यातल्या प्रयोगाच्या वेळचा किस्साही विलक्षण आहे. सकाळी साडेआठला "आम्ही सारे खवय्ये"च्या शूटींगसाठी निघताना संकर्षण परभणीतल्या आई- बाबांना सांगतो की, मला खूप ताप आहे आणि तापातच मी शूटींगला जातोय. तिथूनच संध्याकाळच्या नाटकाच्या प्रयोगाला जाणार आहे. तापामुळे उभंच राहवत नसल्यामुळे "आम्ही सारे खवय्ये" चं शूटींग अर्धंच होतं. तिथून तो नाटकाला जाऊन प्रयोगासाठी सज्ज होतो. रात्री ८.३० ला प्रयोग सुरू होतो. मध्यंतरापर्यंत कसं तरी रेटतो. मध्यंतरामध्ये त्याला चक्क आईच्या हातचं जेवण घेऊन आलेले बाबा दिसतात. ५०० किलोमीटरवरून आलेले! केवळ सकाळाच्या फोनवर त्याचा आवाज ऐकल्यावर परभणीवरून सकाळी ११ च्या तपोवन एक्स्प्रेसने निघून रात्री ९ पर्यंत ठाण्याला आलेले बाबा! हे केवळ आई- बाबाच करू शकतात, हे तो सांगतो. त्याच्या आजोबांच्या त्याने सांगितलेल्या आठवणीही अतिशय हृद्य आहेत. "ऐसी बात कह कोई ना बोले झूठ; ऐसी जगह बैठ कोई ना बोले उठ!" हा मंत्र त्याच्या आजोबांचाच.

असा हा भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा माणूस! कोणत्याही प्रकारे स्वत:ला स्टार वगैरे न समजणारा. आज तो इथे असला तरी "हे पेरणीचे दिवस सुरू आहेत. बॅटींगला असताना जास्तीत जास्त बॅटींग करायची" हा त्याचा निर्धार. स्वत:ला सतत अपडेट ठेवणारा. विविध पुस्तकं, विचार, सुभाषित, श्लोक, मोठ्यांची चरित्र ह्यामधून "लोड" करून ठेवणारा. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कृती भयंकर प्रामाणिकपणे करणारा. कोणतीच संधी हलकी‌ न मानणारा. आपली संधीकडे जायची तयारी‌ असेल तर संधी मिळतेच असा दृढ विश्वास असलेला.

लॉक डाऊनच्या काळात त्याच्यामधला लेखक समोर आला. त्याने नाटकं लिहीली. जेव्हा अशा नाटकांचे प्रयोग होतात व अख्खी बस जेव्हा प्रयोगासाठी निघते, तेव्हा त्याला प्रचंड समाधान मिळतं. लिहीणारा असला तरी तितकाच मोठा तो वाचकही आहे. "काईट रनर" हे त्याचं आवडतं पुस्तक. व्यस्त वेळापत्रकातूनही तो अत्रेंचं "मी कसा घडलो" पुस्तक वाचायला वेळ काढतो.

संकर्षणला कोणताच क्षण निरर्थक वाटत नाही. कधी कधी बोअर होत असलं‌ तरी बोअर होणं हेही इंटरेस्टिंग असतो असंच तो मानतो. कधी लोक वापर करून घेतात असं वाटलं तर समजून घ्यायचं की, मीसुद्धा अनुभवासाठी त्यांना वापरतो आहे, असा दृष्टिकोन असलेला संकर्षण! संकर्षण सांगतो त्याची बायको शलाका त्याच्यापेक्षा खूप धाडसी आहे. संकर्षणला ज्याची भिती वाटते अशा गोष्टी म्हणजे झिपलाईन, रिव्हर राफ्टिंग ती मजेत करते! कोणत्याच स्टेजला न घाबरणारा संकर्षण इथे सपशेल माघार घेतो! सगळीकडे सदैव १००% देणारा संकर्षण घरी मात्र कधी कधी कमी पडतो हे ती समजून घेते. दोन मुलं झाल्यानंतर आता संकर्षण अति वेगाने कार चालवत नाही व ड्रायव्हरला चालवू देत नाही. थकलेला असतानाही मुलांच्या आठवणीने ऊर्जा मिळते, तो सांगतो.

सुयोगजींनी घेतलेली संकर्षणची ही व्हायफळ पॉडकास्टवरची (युट्युब व स्पॉटीफाय इ. वर उपल्ब्ध) मुलाखत इतकी मनमोकळी आहे की जणू आपला घरातला माणूस बोलतोय असं वाटतं. अधून मधून हसण्याच्या शिडकाव्यमुळे ही मुलाखत खूप सुखद होते. "अभ्यास मन लावून करण्याचा मला कधी मोहच झाला नाही!" म्हणणारा संकर्षण आपल्याला भेटतो! अतिशय अर्थपूर्ण व विचार करायला लावणारी "वाढलेलं पान" ही कवितासुद्धा संकर्षण ऐकवतो. ह्या सगळ्या त्याच्या बोलण्यात कुठेच "हे मी करून दाखवलं," असा भाव येत नाही. उलट दोघांच्याही‌ बोलण्यात येतं की, जणू एक स्क्रिप्ट असावं तसं आयुष्य घडतं. ज्या गोष्टी होण्याची १% सुद्धा शक्यता नसते, त्या होतात. लहानपणापासूनची जडण घडण तशी क्षमता व संधी देत जाते. आज एक स्टार असूनही संकर्षण खूप डाऊन टू अर्थ वाटतो. तसे संस्कार देणारे कुटुंबीय व तिशी- चाळीशीपर्यंत मिळालेलं यश शाश्वत समजू नकोस, असं सांगणारे गुरूजन त्याला लाभले आहेत. त्याला मिळालेलं संचित तो पुढच्यांना देईल असे संस्कार त्याला लाभले आहेत.

संकर्षणची वाटचाल आणखी खूप पुढे होणार आहे. कारण तो आधी केलेले रन्स विचारातच घेत नाही. प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस व प्रत्येक संधी नवी मानून बॅटींगला उभा राहतो. आयुष्यभर ही ऊर्जा टिकवायची आहे असा त्याचा निर्धार त्याच्या बोलण्यातून जाणवतो. आज अडचणींसमोर माघार घेणार्‍या त्याच्या लहान भावा- बहिणींना त्याचे हे बोल निश्चित मार्गदर्शक ठरतील. करीअरच्या वाटेवर दिशा चाचपडत असलेल्यांना "Soak the pressure, just be there" हे त्याचं सूत्र नक्की दिशा दाखवेल.

- निरंजन वेलणकर दि. १५ सप्टेंबर २०२४.

(वाचल्याबद्दल धन्यवाद! लेख जवळच्यांसोबत शेअर करू शकता. 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार छान लेख आहे.
हा नेहमीच गुणी कलाकार वाटत आला आहे. त्याबद्दल तसेच चांगले वाचून छान वाटले.

छान लिहिलंय
Podcast पाहिला होता, आवडलाही होता.
.
संकर्षण चं एक वाक्य मनात घर करून बसलं आहे ते म्हणजे, ' ज्या क्षणात आपण आहोत त्याच्याशी प्रामाणिक राहायला हवं '
.
आपण किती भरकटत जातो ह्याची जाणीव झाली, काम करताना काम केलं पाहिजे इतर विचार नकोत, परफॉर्मन्स देताना १००%दिलं पाहिजे..
खूपच पटलं आणि भावलं.
.
दिलखुलास बोलला आहे तो.
आणि मराठवाड्यातला असल्यामुळे अभिमान वाटला त्याचा.
परभणी ला glorification मिळालं Happy

खूप छान लेख !! माझा आवडता माणूस आहे संकर्षण!
त्याचे इकडे आलेले सगळे शोज, नाटकांना मी आवर्जून जाते.
फार डाऊन टू अर्थ आहे.

Back to top