शुभविवाह - उर्फ डेडली आत्या

Submitted by फारएण्ड on 18 July, 2024 - 11:26

सापडली, सापडली! बर्‍याच दिवसांत ऑफिसचे कामकाज दाखवणारी एखादी मराठी सिरीयल सापडली नव्हती. घरगुती नाट्यातील बिनडोकपणा जो काय चालतो तो सगळेच करतात. पण जेव्हा कथानके ऑफिसमधे शिरतात तेव्हा खरी मजा येते. कारण तेथे जे दाखवायचे आहे त्याबद्दल अगदी बेसिक माहिती सुद्धा न घेता आपण मोठा थ्रिलर दाखवत आहोत अशा आविर्भावात सादर केलेले सीन्स. वरकरणी ऑफिसबद्दल वाटणार्‍या पण आगापीछा नसलेल्या बिझिनेस टर्म्स. "चांगल्या होणार्‍या" मिटिंग्ज. मोघम रीतीने उल्लेख केलेली "डील्स".

नाव शुभविवाह असले, तरी सध्या यात याची रेलचेल दिसते.

मला यातील कथानकाची पार्श्वभूमी माहीत नाही. एकदम साधारण ४७५व्या एपिसोडपासून बघत आहे. यातले सीन्स येताजाता आधी दिसले होते पण नक्की काय चालले आहे ते लक्ष देऊन पाहिले नाही. आणि तेव्हा बहुतांश घरगुती ड्रामाच वाटत होता.

३-४ एपिसोड्स मधे मला माहीत झालेले लोक
भूमी - ही सेण्ट्रल कॅरेक्टर दिसते. आशा काळे ते नीलकांती पाटेकर ("आत्मविश्वास" चित्रपटातील) याचे मिश्रण असणार्‍या व दोन तीन ऑलटाइम कारस्थानी स्त्रिया सोडून बाकी सर्वांना ज्यांचे सतत कौतुक असते अशा लीड्स बहुतांश सिरीज मधे असतात. ही तशीच वाटते.
आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.
रागिणी (आत्या) - ही सध्यातरी व्हिलन दिसते. हीच ती डेडली आत्या. सगळे घर हिच्या ताब्यात असताना, आणि त्यांच्या बिझिनेस मधेही तिला बराच रोल ऑलरेडी असताना काहीतरी कारणामुळे तिला व्हिलनगिरी करायची आहे. क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. हिचा नवरा सध्या पोलिस लॉक अप मधे आहे. तिला त्याची काही फिकीर दिसत नाही.
आई - घरातील सर्वात सिनीयर स्त्री. ही नॉर्मल आहे असे वाटते. कारस्थानी वगैरे नाही.
सून क्र १ - ही चेहर्‍यावरून कारस्थानी वाटत नाही. भूमीची बहिण असावी. तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.
सून क्र २ - ही जरा ग्रे एरियामधली आहे. रागिणीची मुलगी असावी नक्की काय करते कळत नाही. पण ४-५ एपिसोड्स मधे फक्त स्वगत म्हणताना दाखवली आहे.
एक तरूण मुलगी - वेधू का काहीतरी नाव आहे. ही कितपत रिकरिंग कॅरेक्टर आहे माहीत नाही. बहुधा आकाशच्या मागे होती/आहे. तिच्या वयानुसार मोबाईल, बाहेर मित्रमंडळींबरोबर हँग आउट करणे वगैरे सोडून असल्या नाट्यात तिला भलताच इंटरेस्ट दिसतो.

काही निर्जिव गोष्टी. यांचा उल्लेख अशासाठी की नाट्यपूर्ण प्रसंगात यांचा रोल असतो.
कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्‍यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्‍यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.
किल्ल्या - प्राचीन काळच्या पिक्चर्स मधे असत तसा १०-१२ दणकट किल्ल्यांचा एक जुडगा आहे. तो रागिणीच्या कमरेला असतो. घराचा ताबा तिच्याकडे असतो म्हणून. सध्याच्या जमान्यात कोणाला अशा किल्ल्या लागतात कल्पना नाही.

पाहायला सुरूवात केल्यावर लौकरच "नवर्‍याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही" असा संवाद ऐकल्यावर सिरीज खूप आधुनिक आहे याची खात्री झाली. तेच मोठे घर (आणि तरीही दारासमोर जेवायला बसणारे लोक), तेच भारदस्त आडनाव व त्याचा वारसा वगैरे - इथे "महाजन". कामाला जाणारे नवरे, सतत किचन मधे वावरणार्‍या व किचन पॉलिटिक्स करणार्‍या बायका, व्हॉट्सअ‍ॅप अंकल्स व काकूंना आवडेल असे कौटुंबिक चित्र उभे करणारे आणि दोन तीन पिढ्या आधीच्या परिस्थितीचे ग्लोरिफिकेशन करणारे सीन्स. लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्‍याचा मोठा फोटो. एकूण सरंजामी मामला.

सर्व चेकमार्क्स चेक्ड.

कोणी पाहात असाल तर लिहा. मी लिहीन जमेल तसे. अमेरिकेत हुलू वर आहे. भारतातले माहीत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूमीला जर हे कळाले तर आपल्या सर्वांचा उलटा काउंटडाऊन सुरू होईल
<<<<<< Lol

त्यात एक सीन दोन वेगळ्या कोनातून चित्रित केला आहे. अशा कॅमकॉर्डरचा शोध अजून सिरीज बाहेरील जगात लागलेला नाही.
<<<<<<
काळाच्या पुढे चालली आहे वाटतं सिरीयल?! Proud

मराठी माणसं मागे पडतात ती अशी….जर्रा म्हणून काही नवीन खपत नाही >>> Happy Happy

आत्याने आता एक शार्पशूटरही नेमला आहे. आणि त्याला आत्याचा नंबर पाठ आहे असे तो म्हंटला म्हणजे ती तो कॉमनली वापरत असावी. त्यातही त्याला काम दिले आहे ते आकाशला गोळी न घालता त्याला वाचवायला आत्या जाईल तेव्हा तिच्या खांद्याला चाटून गोळी गेली पाहिजे. टू डीप. या रेटने "द डे ऑफ द जॅकल" सारखी पुस्तके निघतील तिच्यावर. किंवा तिच्यावर चित्रपट निघून मेरील स्ट्रीप ऑस्करदेखील घेईल.

बाकी ऑव्हरऑल लॉजिक रानोमाळ हरवले आहेच, आता तर त्या रानोमाळ लॉजिकच्या बियांना कोंब येऊन त्यातून उपलॉजिके तयार झाली आहेत. पण मूळ हेतूशी त्यांचा काहीच संबंध नाही. त्यामुळे हिला आकाशला मारायचे आहे की वाचवायचे आहे, भूमी शुद्धीवर येण्याच्या बरोब्बर त्याच वेळेस आकाशला तेथून दूर ठेवून काय साध्य होणार आहे, दहा कोटींच्या डीलकरता एक इंटरनॅशनल मीटिंग "करायला" गेलेला आकाश ती झाल्यावर एखाद्या जुन्या गावाच्या गल्लीत रिक्षा शोधावी तशी त्याची कॅब का शोधत फिरतो, त्या हॉटेलला लॉबी, रिस्पेशन व ते गाडी बोलावणारे दरवान लोक नसतात का? या प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळणार नाहीत.

एका सीन मधे तर "आकाश बरोबर आई आहे" हा आत्याच्या मुलाने मारायचा संवाद आकाशच्याच भावाने म्हंटला. तरीही भूमी घाबरली इमानेइतबारे. त्या एका जोक मधे रोप लावणारा रजेवर असला तरी खड्डा खणणारा व माती परत भरणारा आपले काम करत राहतात तसे. अथर्व हा आकाशचा भाऊ. त्या दोघांचे आई-वडील हयात नाहीत. आकाशबरोबर आत्या आहे. त्यामुळे "आकाश बरोबर आई आहे" हे वाक्य तिचा मुलगा अभिजित याने म्हणणे आवश्यक होते. प्रत्यक्षात सीनमधे अथर्व म्हणतो. दिग्दर्शक व एडिटरला एक लाइक तरी बनतोच. किंवा त्या अथर्वला मागचे अनेक एपिसोड्स फक्त रिअ‍ॅक्शन शॉट्सच देताना पाहिला होता. शेवटी त्याने एक रॅण्डम डॉयलॉग स्वतःच म्हणून टाकलेला दिसतोय.

वाचायचे आहे अजून.

फा, पोस्टीत 'त्या त्या' एपिसोडचा नंबर देत जा म्हणजे यावेळी नेमका कुठला बघायचा नाहीये हे कळेल. Wink

हो Happy ५२९ का काहीतरी आहे पण आज चेक करून एक्झॅक्ट सांगतो. पण जरूर पाहा. तुला नवीन काहीतरी सापडेल. भूमी-आकाश चे रोमॅण्टिक प्रसंग महापकावू असल्याने मी फॉरवर्ड करतो. ते ही कोणीतरी पाहण्याची गरज आहे. अर्धा एपिसोड ते प्रसंग व त्यांचेच फ्लॅशबॅक यांनी भरलेला असतो. उरलेल्या अर्ध्यामधे लोकांचे प्रतिक्रिया देणारे चेहरे. त्यातून मग वाट काढत कथानक थोडेफार पुढे सरकते.

टू डीप. या रेटने "द डे ऑफ द जॅकल" सारखी पुस्तके निघतील तिच्यावर.
>>> या आत्याकडूनच तात्याने इन्स्पिरेशन घेतले बहुतेक. फक्त खांद्याच्या ऐवजी कान…..
चारुशीला गोखलेंनंतर हीच

रानोमाळ लॉजिकच्या बियांना कोंब येऊन त्यातून उपलॉजिके >>> Lol

आकाश बरोबर आई आहे >>> आकाशचा भाऊ क्षणभर विसरला असेल तो नेमका कोणाचा मुलगा आहे ते. किंवा 'हम सायन्स की तरफसे है' सारखं असेल ते Wink

जुन्या गावाच्या गल्लीत रिक्षा शोधावी तशी त्याची कॅब >>> आकाशकडे किमानपक्षी ओला/उबर अ‍ॅप तरी असायला हवं होतं Wink मुळात एवढी महागाईची डील्स करायला जाताना स्वतःची कार नसावी हेच मला पटलं नाहीये. जुने हिंदी पिक्चर दाखवायला घ्या त्याला.

या आत्याकडूनच तात्याने इन्स्पिरेशन घेतले बहुतेक >>> ग्रेमा! माझ्याही हेच मनात आलं अगदी Lol

Akash has no team members list like CFO lawyer Sales and Marketing. For big deal negotiation.

Atharva wife resembles white simian specimen. With equal quantity brains.

Poornima looks like the lady who may have a three bhk flat on Prabhat road Galli kramank chaar. And it is her only qualification.

Aakash kobra brand seducing techniques are pathetic. Why can't all the bahus wear salwar suits? Which serial code is broken!!

Akash has no team members list like CFO lawyer Sales and Marketing. For big deal negotiation. >>. टोटली Happy

Poornima looks like the lady who may have a three bhk flat on Prabhat road Galli kramank chaar. And it is her only qualification. >>> Lol

इंटरनॅशनल मिटिंग आणि इंटरनॅशनल फोरम
भूमी हॉस्पिटलमधे बेशुद्ध असताना आकाशचा एक क्लायंट टीम घेऊन पुण्याला येऊन थडकतो. हे मराठी सिरीज मधले क्लायंट असल्याने कोठे केव्हा जावे याचा त्यांना काही पोच नसतो. कंपनीच्या मालकाची बायको हॉस्पिटलमधे बेशुद्ध असून मृत्यूशी झुंज देत आहे याच्याशी म्हणे इंटरनॅशनल कंपन्यांना काही मतलब नसतो. आकाशने ताबडतोब पुण्याला येऊन डील साइन करावे अशी अट ते घालतात. वरती अमांनी लिहीले तसे यांच्या कंपनीत अधिकारीवर्ग वगैरे नसतो. आकाश, त्याची आत्या, त्याचा आतेभाऊ हीच सगळी मंडळी. ठीक आहे फॅमिली ओन्ड बिझिनेस आहे पण त्यातही हुद्दे असतात, साइनिंग ऑथोरिटी असते, डील साइन करायचे अधिकार असतात. इथे सगळे आकाशच. लागेल तेव्हा तो आजीचा बटवा मोकळा करून पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी देणार. एरव्ही कसलीही सिस्टीम नाही.

सिंगापूरहून आलेले लोक आहेत. आकाश वगैरे सगळे अलिबागला आहेत असे दिसते. कंपनी मालकाची बायको सिरीयस आजारी आहे, तर तेच गाडी करून अलिबागला येऊ शकतात डील साइन करायला, किंवा तसे अधिकार असलेला कंपनीतील माणूस डील करू शकतो. नाहीतर डील पेपर्स अलिबागला पाठवू शकतात. या डीलपुरती सायनिंग ऑथोरिटी/पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी तो अभिजितला द्यायला तयार असतो पण म्हणे "क्लायंट मान्य करत नाही". कारण आकाशने त्यांना प्रॉमिस केलेले असते की तो स्वतः डील साइन करेल. कोणत्या दुनियेत असे क्लायंट असतात कोणास ठाऊक. त्यांना काय पडलीये कोण सही करतोय. सही अधिकृत असली म्हणजे झाले.

अजूनही गमती आहेत. आकाश स्वतः गेला नाही तर त्यांना डील रद्द करावे लागेल (का? ते माहीत नाही), त्यांनी बरेच फायनान्सेस घेतले आहेत त्याचा भुर्दंड पडेल (का? डील करता लोन काढणे म्हणजे आधीच पैशाच्या बॅगा कंपनीत आणून ठेवणे असा काहीतरी समज दिसतो). त्यापेक्षा मजेदार म्हणजे यात कंपनीची बदनामी होईल (मालकाची बायको सिरीयस असल्याने मालक सही करायला आला नाही. क्लायंट अशा वेळेस वापरल्या जाणार्‍या रूढ पर्यायांपैकी कोणताही मानायला तयार नाही - यातून बदनामी "यांच्या कंपनीची होईल" म्हणे). आणि सर्वात कडी म्हणजे तो क्लायंट "इंटरनॅशनल फोरम" मधे यांच्याबद्दल तक्रार करतील. कसली तक्रार? आणि हा कोणता फोरम जो दोन देशांतील दोन खाजगी कंपन्यांच्या मामल्यात तक्रारी नोंदवून घेतो? लीगल केस पण करतील म्हणे. कसली ते यांनाच माहीत.

शेवटी आकाश त्या दहा कोटींचे डील करण्याची "मिटिंग करायला" पुण्याला जातो. स्वयंपाकातले पदार्थ करतात तसे हे लोक मिटिंग "करतात". प्रत्यक्षात त्या दिवशी मिटिंग आरामात चाललेली असते. मालकाची बायको सिरीयस असताना "पहिला राउण्ड" झाल्यावर दोन तासांचा ब्रेक असतो पुढच्या राउण्ड पर्यंत. डील साइन करताना मुळात हे कसले राउण्ड्स? निगोशिएशन व डील सायनिंग मिक्स केलेले दिसते यांनी. म्हणजे अजून निगोशिएशन्स बाकी होती तर तो क्लायंट कसल्या तक्रारी व लीगल केस करणार होता?

ती मिटिंग झाल्यावर एखाद्या सरकारी कार्यालयातून बाहेर येउन रिक्शा शोधावी तसा आकाश त्याची कॅब शोधतो. पण इतका वेळ आत्याचा अनुल्लेख केला असला तरी ती गप्प बसलेली नसते. तिची एक तिसरीच ष्टोरी सुरू असते. तिचा बहुधा एक पगारी शार्पशूटर असतो. त्याला ती वरती लिहीले तशी कामगिरी देते. तो आकाशवर नेम धरून असा बसतो की आकाशने फोनवर बोलता बोलता सहज वर बघितले तर अगदी समोर दिसेल, ते ही मोठ्ठी रायफल त्याच्यावर नेम धरून ठेवलेला. मग तो आत्याच्या खांद्याला गोळी चाटून जाणे वगैरे सीन होतो.

आत्ता ३-४ एपिसोडपूर्वी ही आकाश व भूमी दोघाना मारणार होती. सिरीज लेखकाला शार्पशूटरची आयडिया जरा नंतर सुचलेली दिसते. नाहीतर आत्याचा किलर फॉर हायरचा प्रेफरन्स या चढत्या क्रमाने दिसतो
१. रॅण्डम रोडवरचा रॅण्डम कणीसवाला
२. खोपट्याला आग लावणारा
३. शार्पशूटर.

या सीरिअलच्या लेखक, दिग्दर्शक मंडळींनी कधी पान टपरी तरी चालवलीय का? टपरीवाला पण वेळोवेळी टेम्पररी डेलिगेशन करून जातो. १० कोटीची डील साईन करायला क्लायंट सिंगापूरातून इकडे येतो? त्यांच्याकडे पण भरपूर रिकामटेकडे लोक दिसताहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, डिजिटल सायनिंग, लोकल हेड बुडाले का हिंदी महासागरात?

सिरियल बघत्/दिसत नाही.
पण मजा येतेय वाचायला. सिरियल वाल्यांचे कोर्पोरेट जग आणि ह्यांचे क्लायंट्स ह्यांची फा स्पेशल नियमावली अवेटेड आता Lol
अजूनही गमती>>> हा पॅराच कहर आहे, किती स्ट्रीप केलय, लाजलज्जेखातर एखादे वस्त्रं सोडा की अंगावर Lol

टपरीवाला पण वेळोवेळी टेम्पररी डेलिगेशन करून जातो. १० कोटीची डील साईन करायला क्लायंट सिंगापूरातून इकडे येतो? त्यांच्याकडे पण भरपूर रिकामटेकडे लोक दिसताहेत >>> Lol

इतकं लक्षपूर्वक कसं बघू शकतोस >>> नाही. एरव्ही येताजाता ही सिरीज दिसत असते. पण "मिटिंग" शब्द ऐकला मी सगळे सोडून बघतो Happy असे मनोरंजन इतरत्र सहज मिळत नाही.

लाजलज्जेखातर एखादे वस्त्रं सोडा की अंगावर >>> Happy या सिरीजचे सर्वात मोठे वस्त्रहरण सध्या मायबोलीच करत आहे. इथे हा दहा दहा कोटींची डील्स करत आहे, कंपनीच्या आंतरराष्ट्रीय इमेजची काळजी करत आहे. "इंटरनॅशनल फोरम" वर प्रभाव टाकून आहे. आणि या बाफवर माबो अ‍ॅड कोणती दाखवत आहे, तर "Small business owner?" Rofl

फा Rofl

च्यायला आमच्याच नशीबी इतक्या बोरिंग मीटिंग्ज का का का? आकाशच्या मीटिंग्ज कसल्या भारी असतात - त्या कहाण्यांच्या पुस्तकांमधल्यासारख्या अटीबिटी असतात त्यांच्यात. हा क्लायंट म्हणजे तर अगदीच 'कारल्याच्या मांडवाखालून येणार नाही, तांदळाचं धुणं ओलांडणार नाही' टाईप दिसतोय. Lol

इंटरनॅशनल फोरम >>> याबद्दल उत्सुकता फारच वाढली आहे Proud

फा >> Rofl

आत्याचा किलर फॉर हायरचा प्रेफरन्स चढत्या क्रमाने >> हायला! ही तर तेलुगु व्हॅम्प्सची मोडस ऑपरंडी आहे. सध्या आपल्या व्हॅम्प्सही त्या वाटेने जात आहेत तर.

त्या कहाण्यांच्या पुस्तकांमधल्यासारख्या अटीबिटी असतात त्यांच्यात. हा क्लायंट म्हणजे तर अगदीच 'कारल्याच्या मांडवाखालून येणार नाही, तांदळाचं धुणं ओलांडणार नाही' >>> Lol हे फार परफेक्ट वर्णन आहे. मला लिहीताना चपखल शब्दरचना सुचली नाही.

इतक्या वर्णनात अजून एक राहिलेच. तो शार्पशूटर गोळी घालतो त्याचा तपास पोलिस करत आहेत ही माहिती एक दोन एपिसोडनंतर कळते. ते सांगितले असे आहे की पोलिस तपास करत आहेत कारण "आकाशने कंप्लेण्ट केली". तोपर्यंत कसलाही पोलिस तपास, चौकशी वगैरे नाही. उद्या केसही "आकाश वि. शार्पशूटर" अशी उभी राहणार की काय? भारतात अजून समान नागरी कायदा नसला तरी क्रिमिनल लॉ मराठी सिरीज करता अजूनतरी वेगळी नाही Happy

आकाश वि. शार्पशूटर >>> Lol यारा दिलदारा मधे जॉनीच्या भावाला मरणाच्या दारात नेईल अशी गोळी लागूनही ना कंप्लेंट ना पोलिस. माझ्या माहितीप्रमाणे त्यात शेवटपर्यंत पोलिसांना कळत नाही की जॉनीचा भाऊ मेला. मला वाटतं यारा दिलदारा पाहूनच आकाशने कंप्लेंटचा निर्णय घेतला असावा.

हा क्लायंट म्हणजे तर अगदीच 'कारल्याच्या मांडवाखालून येणार नाही, तांदळाचं धुणं ओलांडणार नाही' टाईप दिसतोय>>> Lol
इन्स्टा वर १ रुसलेला दाजी (जावई) चे रील्स असतात.. खूप च गंमतशिर, तेच आठवलं

हा क्लायंट म्हणजे तर अगदीच 'कारल्याच्या मांडवाखालून येणार नाही, तांदळाचं धुणं ओलांडणार नाही' टाईप दिसतोय>>> Lol Lol

आकाश वि. शार्पशूटर>>>> Lol

पण "मिटिंग" शब्द ऐकला मी सगळे सोडून बघतो. असे मनोरंजन इतरत्र सहज मिळत नाही.

कारल्याच्या मांडवाखालून येणार नाही, तांदळाचं धुणं ओलांडणार नाही

Rofl

अथर्व हा आकाशचा भाऊ. >>>>>>> नाही, फारएण्ड. अथर्व हा आत्याचाच धाकटा मुलगा. पण बहुतेक प्रॉपर्टी बळकावण्याच्या नादात अथर्ववर योग्य ते संस्कार करायचे राहून गेले असतील आत्याकडून. त्यामुळे तो आकाशच्या पार्टीत शोभून दिसतो.

(वाड्यावर लिहीलेली पोस्ट इकडे डकवत आहे Happy )

मला फोमो झाल्यामुळे मी यूट्युबवर या सगळ्यांची तोंडं पाहून आले. आकाश अगदीच मेणमुसका, बुडकुला आणि बोदल्या आहे की! मला उगाच कोणीतरी बरा दिसणारा असेल असं वाटलं होतं Lol हा तो फुलपाखरू वाला हिरो आहे का? त्यात बरा वाटला होता.
भूमी झालेली बया जीवलगा मधे होती बहुतेक.
आत्ता मी काहीतरी २० सेकंदांची क्लिप पाहिली ज्यात आकाश तिला सरप्राईज द्यायला स्विमिंग पूलाजवळ नेतोय. मला आधी वाटलं तिला पाण्यात ढकलून देणारे. पण पाण्यात एका फळकूटावर पाकळ्यांनी आय लव्ह यू लिहीलेलं असतं. मग आकाश म्हणतो 'याचं उत्तर नाही दिलंस?' तर ती म्हणते ते पाण्यात जाऊन देईन. इकडे कोपर्‍यात लपून एक कुरळ्या बघतोय. त्याने पाण्यात वायर्स टाकल्या आहेत. देखते रहिये भूमी और आकाश का इलेक्ट्रिफाईंग मिलन सिर्फ शुभविवाह में Proud

एपि. ५३५ च्या आसपास का? ती हॉस्पिटल मधून परत येते त्यानंतर बहुधा.
>>> हो, मी ५३३ ते ५३५ बघितले. फक्त थेट वर्णन केले तरी ते आपोआपच विनोदी होईल इतके 'पोटन्ट' आहे. प्लॅस्टिकची बंदूक असलेला स्नायपर -शूटर आकाशवर गोळी झाडायला जाताना फक्त विश्वासपात्र होण्यासाठी ह्या मधेच येऊन खांद्यावर गोळी झेलतात व नंतर ट्रंपचा ड्रामाही फिका वाटावा इतकी त्यागाची नाटकं करतात. हे येडं 'आजपासून तू माझी आई' म्हणते. तारतम्य नसल्याने 'आई- आई' जास्तच होते, Hence the पूजा Happy

भूमीची वाचा गेली होती आणि ती 'अब्बा डब्बा चब्बा' करत होती. मनात आले वाचा गेली आहे, डोकं तर आहे नं ? मग ती पेपरवर 'आत्या -आकाश' असे गचाळ अक्षरात लिहिते तर तो पेपर हे येडं आत्याला 'बघ नं, काय लिहिलेय भूमीने' म्हणत दाखवतो. त्यात तिची बहिण - मानसी 'तुला शक्ती वाटायला हवी' म्हणत लहान बाळाच्या खिचडीसारखं काहीतरी गिरगिट बळेच भरवते. हॉस्पिटलच्या रूममधे 'डोके नसलेल्या' डॉक्टरचे फोटो होते. खरंच , फक्त धडाचे फोटो होते. Happy
हा मेडिकल ड्रामा नाही मान्य आहे पण अत्यवस्थ माणसाला एकही वायर/ आयव्ही नसून शेजारी शेल्फवर फक्त मांडले होते. जोडलेले नव्हतेच.

तो पूजेचा फोटो त्या धाग्यावर मुख्यचित्र म्हणून पर्फेक्ट आहे. Lol

अब्बा डब्बा चब्बा - संदर्भ: अनिल कपूरचा जुदाई चित्रपट

अस्मिता कडून- वाड्यावरून इकडे!

एक कुरळ्या बघतोय. त्याने पाण्यात वायर्स टाकल्या आहेत. देखते रहिये भूमी और आकाश का इलेक्ट्रिफाईंग मिलन सिर्फ शुभविवाह में

प्लॅस्टिकची बंदूक असलेला स्नायपर -शूटर

वाचा गेली आहे, डोकं तर आहे नं ?

धडाचे फोटो होते

>>>> Rofl Rofl

अथर्व हा आत्याचाच धाकटा मुलगा. >>> Wow! माऊमैया धन्यवाद! याचा पत्ताच नव्हता. तो कधीच स्वतंत्रपणे आत्याशी बोलताना दाखवला नाहीये मी पाहिलेल्या भागांमधे (खरे तर तो मुळात फार बोलतानाच कधी दाखवलेला नाहीये), इव्हन त्याची बायकोही (जसे अभिजित व त्याची बायको दाखवतात नेहमी). त्यांचे एकूण वागणे व बॉडी लँग्वेज ते आकाशचे सख्खा भाऊ/वहिनी असल्यासारखेच वाटले कायम.

मग या नवीन मिळालेल्या माहितीनुसार तो संवाद बरोबर आहे Happy

एपि ५४० २०.०९
मन्सि आणि मेक्यानिक ला भेटायचा प्लान करत आहे. भुमि आधी पालक तोडुन चिरत आहे. तो फोन ट्राय केला तर तो अस्तित्वात नाही. पौर्निम टपून बसोन मनसी व भूमि चा प्लान बपत आहे. मानसी तिला किचन मध्ये जायला थोपवत आहे.

दुसृया मेकॅनिकचा नंबर लागतो. भु भु त्याला भेटायचा प्लान बनवत आहे. पूला मानसी आजीकडे फेकून देते.

कारंजे शॉट. इथे पू देवाचे दिवा पाणी क रत आहे.

आत्या बोरड मीटिन्ग मध्ये सी ई ओ निवडायचा आहे ते आका ला सांगत आहे आकाचे कौतूक करत आहे व आत्या प्रेम गळत आहे. आक्या तिचेच नाव प्रोपोस करतो कारण आपलेच शेअर्स सर्वात जास्त कोण विरोध करणार. हे तो कौ तिकाने भू ला सांगतो. ही बाहेर पडते. पण गौराईच चा मोठा नैवेद्य आहे. भाजी भाकरीच. आत्या तिला विरोध करते. तिथे टेबलावर लॅपटॉप आहे. आत्या घरची लक्ष्मी टेप लावत आहे.
बिग वाद हॅपनिन्ग. पू उगीच्च खुश. आक्या आत्या तिला भाजी घ्यायला पाठवत नाहीत. भू खुन्नस देत आहे. पू परत किचन मध्ये जाउन ऐकत आहे गॉसिप. डेआ भू कुठे जाते आहे तो विचार कर त आहे. डे आ लगेच नव्या कॉन्स्पिरसी फुलवत आहे.

भू पेटलेली आहे मेक्यानिक ला भेटायला. खिडकीतून उडी मारते म्हणते. हे आक्याला प्रफेक्ट म्याच आहे. लैच बवलट. आचरट. माणसीला एकच
सा डी आहे. आलं ग्यारेज भू सहा वर्शा पुर्वीचे दळण दळ ते व डेआ चा फोटो दा विते. तो नाही म्हणतो. भू लैच काव काव करुन राहिली आहे.
अबोट बिग ब्लास्ट ऑन द सेड बोट. मॅक्या मानतो व आक्या समोर कन्फेस करील म्हणतो. भाग संपला

फारेण्ड , 'शुभविवाह' मालिके तर्फे तुझा मायबोली अ‍ॅंबेसेडर म्हणून सत्कार होणार आहे असे ऐकण्यात आले! Wink

तुझ्या ह्या धाग्यामुळे मालिकेची ह्या धाग्यावर साधकबाधक चर्चा करण्यासाठी ही मालिका बरेच जण पाहू लागल्याने मालिका प्राईम टाईमला शिफ्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे! Wink

Pages