शुभविवाह - उर्फ डेडली आत्या

Submitted by फारएण्ड on 18 July, 2024 - 11:26

सापडली, सापडली! बर्‍याच दिवसांत ऑफिसचे कामकाज दाखवणारी एखादी मराठी सिरीयल सापडली नव्हती. घरगुती नाट्यातील बिनडोकपणा जो काय चालतो तो सगळेच करतात. पण जेव्हा कथानके ऑफिसमधे शिरतात तेव्हा खरी मजा येते. कारण तेथे जे दाखवायचे आहे त्याबद्दल अगदी बेसिक माहिती सुद्धा न घेता आपण मोठा थ्रिलर दाखवत आहोत अशा आविर्भावात सादर केलेले सीन्स. वरकरणी ऑफिसबद्दल वाटणार्‍या पण आगापीछा नसलेल्या बिझिनेस टर्म्स. "चांगल्या होणार्‍या" मिटिंग्ज. मोघम रीतीने उल्लेख केलेली "डील्स".

नाव शुभविवाह असले, तरी सध्या यात याची रेलचेल दिसते.

मला यातील कथानकाची पार्श्वभूमी माहीत नाही. एकदम साधारण ४७५व्या एपिसोडपासून बघत आहे. यातले सीन्स येताजाता आधी दिसले होते पण नक्की काय चालले आहे ते लक्ष देऊन पाहिले नाही. आणि तेव्हा बहुतांश घरगुती ड्रामाच वाटत होता.

३-४ एपिसोड्स मधे मला माहीत झालेले लोक
भूमी - ही सेण्ट्रल कॅरेक्टर दिसते. आशा काळे ते नीलकांती पाटेकर ("आत्मविश्वास" चित्रपटातील) याचे मिश्रण असणार्‍या व दोन तीन ऑलटाइम कारस्थानी स्त्रिया सोडून बाकी सर्वांना ज्यांचे सतत कौतुक असते अशा लीड्स बहुतांश सिरीज मधे असतात. ही तशीच वाटते.
आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.
रागिणी (आत्या) - ही सध्यातरी व्हिलन दिसते. हीच ती डेडली आत्या. सगळे घर हिच्या ताब्यात असताना, आणि त्यांच्या बिझिनेस मधेही तिला बराच रोल ऑलरेडी असताना काहीतरी कारणामुळे तिला व्हिलनगिरी करायची आहे. क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. हिचा नवरा सध्या पोलिस लॉक अप मधे आहे. तिला त्याची काही फिकीर दिसत नाही.
आई - घरातील सर्वात सिनीयर स्त्री. ही नॉर्मल आहे असे वाटते. कारस्थानी वगैरे नाही.
सून क्र १ - ही चेहर्‍यावरून कारस्थानी वाटत नाही. भूमीची बहिण असावी. तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.
सून क्र २ - ही जरा ग्रे एरियामधली आहे. रागिणीची मुलगी असावी नक्की काय करते कळत नाही. पण ४-५ एपिसोड्स मधे फक्त स्वगत म्हणताना दाखवली आहे.
एक तरूण मुलगी - वेधू का काहीतरी नाव आहे. ही कितपत रिकरिंग कॅरेक्टर आहे माहीत नाही. बहुधा आकाशच्या मागे होती/आहे. तिच्या वयानुसार मोबाईल, बाहेर मित्रमंडळींबरोबर हँग आउट करणे वगैरे सोडून असल्या नाट्यात तिला भलताच इंटरेस्ट दिसतो.

काही निर्जिव गोष्टी. यांचा उल्लेख अशासाठी की नाट्यपूर्ण प्रसंगात यांचा रोल असतो.
कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्‍यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्‍यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.
किल्ल्या - प्राचीन काळच्या पिक्चर्स मधे असत तसा १०-१२ दणकट किल्ल्यांचा एक जुडगा आहे. तो रागिणीच्या कमरेला असतो. घराचा ताबा तिच्याकडे असतो म्हणून. सध्याच्या जमान्यात कोणाला अशा किल्ल्या लागतात कल्पना नाही.

पाहायला सुरूवात केल्यावर लौकरच "नवर्‍याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही" असा संवाद ऐकल्यावर सिरीज खूप आधुनिक आहे याची खात्री झाली. तेच मोठे घर (आणि तरीही दारासमोर जेवायला बसणारे लोक), तेच भारदस्त आडनाव व त्याचा वारसा वगैरे - इथे "महाजन". कामाला जाणारे नवरे, सतत किचन मधे वावरणार्‍या व किचन पॉलिटिक्स करणार्‍या बायका, व्हॉट्सअ‍ॅप अंकल्स व काकूंना आवडेल असे कौटुंबिक चित्र उभे करणारे आणि दोन तीन पिढ्या आधीच्या परिस्थितीचे ग्लोरिफिकेशन करणारे सीन्स. लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्‍याचा मोठा फोटो. एकूण सरंजामी मामला.

सर्व चेकमार्क्स चेक्ड.

कोणी पाहात असाल तर लिहा. मी लिहीन जमेल तसे. अमेरिकेत हुलू वर आहे. भारतातले माहीत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं दुसर्‍या जन्मात लग्न करून बदला घेईल म्हटलं तर तिने काही न करताच तो मरतो ( आत्महत्या करुन) . >>> Lol ते शेवटचे सूडनाट्याचे भाग महाविनोदी होते. आधी सिरीजच विनोदी. मराठी सिरीज मधल्या व्हिलन्सना एकूणच जे ऑलरेडी उपलब्ध आहे ते द्रविडी प्राणायामासारखे खून बिन पाडून साध्य करण्याची सवय दिसते. इथे आत्याही तेच करत आहे.

खून बिन पाडून साध्य करण्याची >>> टोटली. कलर्स वर एका 'श्रीमंत' बाईला मोलकरीण कामाला ठेवण्याइतकं सहज मारेकर्‍याला हायर करताना पाहिलंय. का? तर जावयाला मारायला Uhoh

खून बिन पाडून साध्य
>>> पुलंच्या काळात फक्त तबलजी नरभक्षक असायचे, आता समस्त मानवजमातच तशी झाली आहे. Proud

त्याने वाटीभर का होईना खाल्ले या समाधानाने आजी एकदम तोडेच देते भूमीला
>>>>> आम्ही येवढे जन्मोजन्मी शिरे करत आलो सत्यनारायणाचा, पायनॅपलचा, मॅंगो, माखंडी, आम्हांला कुणी साधे पैंजण पण दिले नाहीत. यांना एकदम तोडे….भ्याऽऽ

आम्ही शिंग येतील म्हणून दुसऱ्यांदा कपाळ आपटवायचो. यांचं कायतरी भलतच. बहुतेक दिग्दर्शक व पटकथालेखक एकाच वेळी डोक्यावर आपटलेले असावेत.

हॉर्नी मोमेंट >>>> Lol Lol

ही भूमी सुद्धा कोठीच्या खोलीत दिसेल ते कपाट उघडून साखर शोधत आहे>>>>>
मुळात कोठीच्या खोलीत कपाटं का आहेत? ओपन शेल्फ किंवा भिंतीत मारलेल्या फळ्या/कडाप्पा वगैरे का नाही? अलिबाबा चाळीस चोर किंवा पीएसमध्ये खजिनासुद्धा डेझिग्नेटेड गुहेत/खोलीत कसाही पसरून ठेवलेला असतो. मग हे लोक साखर बंद कपाटात का ठेवतात? आणि साखर कपाटात ठेवत असतील, तर केशर-वेलची वगैरे नामी ऐवज कुठे ठेवतात? बॅंकेत?

कसला भारी आहे हा धागा!
स्ट्रेसबस्टर अगदी!
Rofl
तू पा रे सुद्धा इकडे वाचून तिकडे पाहायला घेतली होती.
ही आत्या कुठे भेटेल?
तू नळी वर आहे का?
माझ्याकडे settop box नही आणि ott subscrption सुद्धा नही

आणि साखर कपाटात ठेवत असतील, तर केशर-वेलची वगैरे नामी ऐवज कुठे ठेवतात? बॅंकेत? >>> Lol

किल्ली - भारतात स्टार प्रवाह वर असेल. नक्की माहीत नाही.

काय दरिद्री मराठी भाषा असते या सिरीयल्स मधे? ते माझ्या"सोबत" असे का वागतात, "त्यांचा" अपघात झाला वगैरे तर फार कॉमन आहे. पण परवा एका कीर्तनाबद्दलच्या एपिसोड मधे ती आजी म्हंटली की कीर्तन "संपन्न" झाले. किमान ती आजीतरी नीट मराठी बोलेल?

ते कीर्तनही अफाट होते. आधी अभिषेक वगैरे होतो. तेथे बरेच नाट्य होते. कीर्तनकारांचा आवाज आयत्या वेळी बसावा म्हणून आत्या एक औषध एका ग्लासातील पाण्यात घालून तिच्या सुनेला तोच ग्लास त्यांना दे म्हणून सांगते. आयत्या वेळेस लागणारी साधने टॉम अ‍ॅण्ड जेरी कडे नसतील इतकी आत्याकडे असतात. पण तो रघू नावाचा नोकर दाराआडून ते ऐकतो व आयत्या वेळेस त्या सुनेच्या साडीवर पंचामृत सांडून तिला तेथून जायला लावतो, व ग्लासची अदलाबदल करतो. वास्तविक तेथेच किचन सिंक असते पण तेथेच तो ग्लास रिकामा करण्याऐवजी त्यातील औषधमिश्रित पाण्यासकट स्वतःच्या शर्टात लपवून सहज संशयास्पद वाटेल असा तेथून बाहेर पडतो. सोपे उपाय वापरायला यात बंदी आहे.

आणि तरीही बुवांचा आवाज बसतो. आपल्याला सस्पेन्स वाटावा म्हणून. पण फक्त काही काळ. लगेच परत येतो. उगाच ड्रामा.

मात्र त्यानंतर जे कीर्तन सुरू होते त्याला तोड नाही. एरव्ही पूर्ण धार्मिक असलेल्या या कार्यक्रमात कीर्तन कशाबद्दल केले जाते, तर दोन प्रेमात पडलेल्या लोकांच्यात इतर वाईट लोक विघ्ने आणतात व पुढे काय काय होते व ते कसे जिंकतात - याबद्दल. कारण त्यांना नेहमीच्या कीर्तनाऐवजी आकाशने त्याची व भूमीची ष्टोरी कीर्तनातून सांगा असे पटवलेले असते. त्यातून तिला आधीचे काहीतरी आठवावे म्हणून (आणि ते तिला आठवू नये म्हणून आत्या ते औषध पाण्यात मिक्स करते). त्यामुळे तेथे एक "एक हसीना थी, एक दीवाना था" टाइप कीर्तन/गाणे सादर होते आत्यासमोर. किंवा "ओम शांती ओम" मधले तसेच गाणे.

हे कीर्तन "यमक व अर्थ यात यमकाला प्र्राधान्य द्यावे" या स्कूल ऑफ थॉट मधून बनवलेले आहे. त्यामुळे हौशी लोकांनी लिहीलेली मंगलाष्टके, साठीच्या कार्यक्रमात एखाद्या नातेवाईकाने केलेली कविता वगैरे मधे जसे काव्य व त्यातील व्यक्तींबद्दलचा मजकूर/माहिती जागा मिळेल तसे दाटीवाटीने बसवतात तसेच यातही चालते. इतकेच नव्हे, तर इथे त्याला चालही लावायचा खटाटोप केलेला आहे. यात आपल्याला फ्लॅशबॅक मधे सीन्स दिसतात. पण ते उपस्थितांना कसे दिसतात माहीत नाही.

मग भूमीला आठवते की ही आपलीच कथा. पण इतका वेळ कोणालाही प्रश्न पडत नाही की कीर्तनात हे हीर-रांझा प्रकरण काय चालले आहे.

Hotstar वर पाहून आले शिऱ्याचा एपिसोड. बाकी एपिसोड पाहण्यापेक्षा खालचे description वाचून आले. आता इथल्या पोस्टी समजतील नीट with visuals.
.
भूमिचे कानातले एकच एक दाखवले आहेत.
त्यांच्या production house ला तुळशीबागेत पाठवा.
.
भूमी मला एका बाजूने जान्हवी सारखे expressions देतेय असं वाटलं. अचानक म्हणेल काहीही हा आकाश...

फा : आख्खी पोस्ट Rofl

दरिद्री मराठी भाषा >>> हो! मी मागेही एकदा लिहीले होते याबद्दल. 'मी तुमचे हात जोडते' किंवा 'माझी मदत करा' वगैरे वाक्यं असतात.

आवाज बसण्या/बसवण्या बद्दल तर हल्ली साथ आल्यासारखी वाटतेय. काही नाही तर लोकं उठ्सूट एकमेकांना शेंदूर खायला घालतात ( याचं उपकथानक म्हणून मागे रमा-राघव मधे त्यांच्याकडे गणपती एका आगाऊ मुलाच्या रूपात येतो आणि 'याला दुर्वांचा रस प्यायला द्या' असं सांगतो. रस प्यायल्यावर माणसाचा आवाज एकदम जादू झाल्यासारखा बरा होतो. कट्यार काळजात वाल्यांना माहिती नव्हतं वाटतं हे? असो. )

"एक हसीना थी, एक दीवाना था" टाइप कीर्तन
काव्य व त्यातील व्यक्तींबद्दलचा मजकूर/माहिती जागा मिळेल तसे दाटीवाटीने
>>> Lol

ते फ्लॅशबॅक प्रकरण साय-फाय कॅटेगरीत येतं. सगळ्यांना एकदमच टेलिकास्ट होत असतं म्हणे ते Proud

फा Biggrin

धमाल लिहिलं आहे. हे असं काहीतरी बघण्याचा तुझा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. खालचे प्रतिसाद वाचायचे बाकी आहेत अजून. मी पुन्हा येईन.

Happy Happy अशा सिरीज मधे एक मिटिंग, एक प्रेझेण्टेशन पुरेसे असते मला एंगेज व्हायला Happy

बाय द वे त्या कीर्तनाबद्दल एक राहिले. ते चालू असताना पार्श्वसंगीत मोठे तुंबळ महायुद्ध सुरू असल्यासारखे आहे. प्रेमकहाणीत शंख फुंकल्याचे हे पहिलेच उदाहरण असेल. इतकेच नव्हे तर मराठ्यंच्या इतिहासावरील पिक्चर्स मधे जी तुतारी वाजते ती ही अनेकदा वाजवली आहे.

प्रेमकहाणीत शंख फुंकल्याचे हे पहिलेच उदाहरण असेल. >>>>>
आता कीर्तनात प्रेमकहाणी येऊ शकते तर शंख का नाही? नाहीतरी सिरीअलीत कुठल्याही गंभीर प्रसंगी एखादा तराणा किंवा अजिबात सुटेबल नसलेले श्लोक/मंत्र ढाणढाण आवाजात वाजवायची प्रथा आहे.

थँक्यू छल्ला
स्पेशली या देवी सर्व भुतेषु >>> हो. अर्थ लागो वा ना लागो...
या ट्रेंडची सुरुवात संलीभने 'झोंका हवा का' मध्ये केली. मात्र त्याने प्रसंग आणि मंत्रही त्यातल्या त्यात चांगला निवडला. पण तेव्हापासून इतर माकडांच्या हाती कोलीत मिळाले.

काल बर्‍याच दिवसांनी पाहिली. रातोरात यांच्या ऑफिसमधे एक गवंडी येऊन एक भिंत फोडून त्यात काळा पैसा भरून पुन्हा बेमालूम लिंपून जातो. इतकी बेमालूम की दुसर्‍या दिवशी कोणालाही ती दिसत नाही. ऑफिसमधल्या लोकांनाही नाही, आणि टॅक्स रेड वाल्यांनाही. तुम्ही जर रेड टाकणारे लोक असाल तर सगळ्या भिंती ठोकून चाचपून बघायच्या आधीच बाकी भिंतींच्या तुलनेत काल पुन्हा नव्याने केलेली भिंत व रंग तुम्हाला दिसायला पाहिजेत. पण यांना तेथे ठोकून बघून पोकळ आवाज आल्यावरच कळते. इतके जबरी काम करणार्‍या गवंड्याचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर तेथेच द्यायला हवा होता. खूप डिमाण्ड असेल त्याला.

यांची गार्मेण्ट्स विकणारी खाजगी कंपनी असते. तरीही "जनतेच्या पैशाची अफरातफर" केल्याच्या गुन्ह्याखाली त्या आकाशला अटक होते. यांच्या इतक्या मोठ्या व्यवसायात एकही वकील बिकील नसतो. आकाशने लॉक अपमधून इन्स्पेक्टरला त्याने हे काहीही केलेले नाही हे सांगणे हाच फक्त यांचा डिफेन्स असतो.

तेथे तो इन्स्पेक्टर हे त्याला काहीतरी "बळजबरीने" केले जात नाहीये असे असलेल्या फॉर्मवर "मुकाट्याने सही करा" सांगतो. लिटरली असा संवाद आहे.

मग साहजिकच भूमीला आशाकाळेमोड सोडून याचा शोध घ्यावा लागतो. तिला एकटीलाच भेटायला तो भानुशाली वेगळा आवाज काढून बोलावतो तेव्हा ती तेथे जाते. तर तेथे तो फक्त नाक तोंड झाकेल असा मास्क लावून तिच्याशी बोलतो. आपण त्याला चार एपिसोडमधे पाहूनही ओळखतो. ती रोज पाहूनही ओळखत नाही. पण तो तेथे शक्तीकपूरगिरी करायचा प्रयत्न करतो. मग भूमी एक लोखंडी पाइप घेउन त्याला झोडपते. त्याचा तेथील प्रयत्न पैशाच्या गुन्ह्यापेक्षा सिरीयस गुन्हा असायला हवा. पण नंतर पोलिसात गेल्यावर तेथे चर्चा मूळ अफरातफरीचीच जास्त चालते. अर्थात तेथे एपिसोड संपला, त्यामुळे पुढे काय बोलणे झाले अजून कळाले नाही.

रेड सुरू असताना सध्या व्हिझिटर्सना आत सोडू नका वगैरे प्रकार नसतात. त्यामुळे एक क्लायंट त्याच वेळेस तेथे येऊन यांचे कंत्राट रद्द करतो.

Lol त्यातला थोडासाही माल न ढापता सर्वच्या सर्व काळा पैसा भिंतीत चिणल्याच्या प्रामाणिकपणाबद्दल गवंड्याला विशेष बक्षीस जाहीर करायला हवं.

जनतेच्या पैशाची अफरातफर >>> गारमेंट्स भंगार असतील. लोकांचे पैसे वाया घालवल्याबद्दल अटक केलं असेल त्याला.

आकाशने लॉक अपमधून इन्स्पेक्टरला त्याने हे काहीही केलेले नाही हे सांगणे >>> Lol याचा लेखक चिमा असता तर आकाशचे संवाद असे काहीसे असते -
'अहो पण...'
'माझं ऐकून तरी घ्या...'
'हो, हे खरंय पण...'

इतके जबरी काम करणार्‍या गवंड्याचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर तेथेच द्यायला हवा होता.
पण तो तेथे शक्तीकपूरगिरी करायचा प्रयत्न करतो.
एक क्लायंट त्याच वेळेस तेथे येऊन यांचे कंत्राट रद्द करतो. >>> Lol Lol

ह्यांचं सगळं तडका फडकी असतय, कंत्राट रद्द, प्रोजेक्ट/टेंडर जराश्या मेलोड्रामा स्पीच नंतर लग्गेच मिळणे, एखादा विदुषी डायलॉग टाकल्यास, त्या व्यक्तीलाच प्रो. मॅनेजर करण्याची क्लायंट ची गळ भले ती व्यक्ती प्रत्यक्षात अ‍ॅडमिन असो.. वगैरे Wink

यापेक्षा आकाचे पिक्चर परवडले. कारण जे काही प्रॉब्लेम असायचे उदा. सासूरवास निदान रिलेवंट असायचे. हे सिरीअलवाले कॉर्पोरेट/बिझनेसच्या उकडीत परत तेच दुष्ट सासराचं सारण भरतात नी मोमो करून टाकतात विषयाचा.

बाकी त्यांच्या बिझनेसमध्ये वकिल नसतात तसे सीए पण नसणारच.
नाहीतर बिझनेसमध्ये अकाउंटसमध्ये घोळ घालणे, बुडीत कर्ज, लॉस दाखवणे, देणग्या दिल्याचं दाखवणे वगैरे पैसा काळा करायचे राजमान्य मार्ग न वापरता ७० च्या दशकातली माला सिन्हा स्टाईल ट्रिक कथालेखक/दिग्दर्शकांनी वापरली नसती. काय ते वैचारिक दारिद्र्य!!

स्पेशली या देवी सर्व भुतेषु विथ ढ्याण्याण ढ्याण्याण ढीन म्युझिक फुल ऑन<<<<<
ती सोनीवर मागे एक 'अनामिका' सिरीयल होती, त्यात हिरोईन देवी मां समोर उभी असली किंवा देवी माँ तिला मदत करत असली की मागे म्युझिकसकट नुसतंच 'या देवी सर्व भूतेषु.... भूतेषु.... भूतेषु..' म्हणायचे. त्यांचे कुणीतरी प्रबोधन करायला हवे होते की बाबांनो त्या श्लोकाचा भुताशी काही संबंध नाही.

त्यांचे कुणीतरी प्रबोधन करायला हवे होते की बाबांनो त्या श्लोकाचा भुताशी काही संबंध नाही. >>> Lol

आत्याचा सेमी-डेडली मुलगा अभिजितः "भूमीला जर हे कळाले तर आपल्या सर्वांचा उलटा काउंटडाऊन सुरू होईल"
अरे विद्वानांनो, त्याला नुसताच काउंटडाउन म्हणतात. "उलटा" काउंटडाऊन म्हणजे शोलेतील गाण्यासारखा "एक दो तीन हो जाती है" होणार का?

भूमीला एका कॅमकॉर्डरमधे आकाशचे काही जुने रेकॉर्डिंग दिसते. त्यात एक सीन दोन वेगळ्या कोनातून चित्रित केला आहे. अशा कॅमकॉर्डरचा शोध अजून सिरीज बाहेरील जगात लागलेला नाही.

उलटा काउंटडाऊन >>>> Lol

त्यात एक सीन दोन वेगळ्या कोनातून चित्रित केला आहे. अशा कॅमकॉर्डरचा शोध अजून सिरीज बाहेरील जगात लागलेला नाही. >>>> मराठी माणसं मागे पडतात ती अशी….जर्रा म्हणून काही नवीन खपत नाही Wink

फा Lol

Pages