वन डिश मील - थेंगाई पाल सदम (Thengai Paal Sadam)- {कविन}

Submitted by कविन on 9 September, 2024 - 14:31

नाव वाचून काहींना वाटेल काहीतरी हटके बघायला मिळणार इथे. तर तस काही नाहीये. हे तमिळ नाव आहे. Thengai refers to Coconut, Paal means Milk and Sadam denotes rice. म्हणजे कोकोनट मिल्क राईस आणि आपल्या नारळीभाताचा सख्खा चुलत भाऊ. तुम्ही याला मखमली पुलाव पण म्हणू शकता टेक्ष्चरमुळे.
पदार्थ कॉमन आहे म्हणून जरा नाव वेगळं शोधावं म्हंटलं. संयोजकांच्या 'जुनी कढई नवी उपमा' या घोषणेचा परिणाम असावा बहुदा Proud

InCollage_20240909_224042843.jpg

कृती तशी सोपी आहे:

आवडत्या मिक्स भाज्या घ्या.
१) गाजर, मटार, फ्लॉवर, फरसबी, बटाटा, कांदा, टोमॅटो या मी घेतल्या आहेत आज आणि पनीर स्विट कॉर्न असे काही असेल घरात तर अजून उत्तम. आज माझ्याकडे होते हे पण दोन्ही म्हणून मी आज या भाताला अजून उत्तम करु म्हंटले आणि घातले त्यात.
मी चिरलेल्या भाज्या (कांदा टोमॅटो पनीर आणि बटाटा सोडून बाकीच्या) मायक्रोव्हेव्ह मधे अर्धवट शिजवून घेते थोडे पाणी घालून. हे पाणी नंतर भात शिजवताना वापरते.
२) तांदूळ मी बासमती घेतलाय, तुम्ही इतर कोणताही घेतलात तरी चालेल फक्त त्याप्रमाणात पाण्याचे प्रमाण बदलेल. (बासमती छान लागतो यात असे आपले मला वाटते. पण मागे एकदा मी वाडा कोलम पण वापरला होता. तांदूळ पुरेसा जुना असल्याने त्याचाही छान मऊ मोकळा झाला होता)
कोलाजमधे मुद्दाम मी तांदूळ किती घेतलेत ते दाखवणारा फोटो ॲड केलाय. त्या फोटोत जे मापटे दिसतेय त्या मापाने ३ मापटी तांदूळ मी घेतलाय.
मी तांदूळ धुवून त्यात पाणी घालून ठेवते आणि भाज्या परतून तांदूळ घालायची वेळ जवळ आली की भातातले पाणी काढून टाकते

३) आलं लसूण मिरची आणि यातच हवे असल्यास दोन तीन पाने पुदिना आणि अगदी पाच बोटात मावेल इतकी कोथिंबीर घेऊन मिक्सरवर वाटून घ्या
४) पनीर आणि बटाट्यावर थोडे मीठ आणि तिखट भुरभुरवून मी ते कढईत अगदी हलके शॅलो फ्राय करुन बाजूला काढून ठेवले
५) त्याच कढईत उरलेल्या तेलातच फोडणी केली. फोडणीत जीरं,बडीशेप, हिंग, हळद, कढीपत्ता, एक मिरची मधे स्लिट देऊन घातली. त्यात कांदा घालून परतला. कांदा मऊ झाल्यावर आलं लसूण मिरची इत्यादी वाटण १ चमचा घालून कच्चट वास जाईपर्यंत परतलं आणि मग टॉमॅटो घालून ते ही जरा मऊ होऊ दिले.
त्यात भाज्या घातल्या. पनीरही घातले. मीठ लाल तिखट घातले आणि एखाद मिनिट परतून त्यात धुवून ठेवलेले तांदूळ घालून त्यात धणेपुड, गरम मसाला, बिर्याणी मसाला घालून एखाद मिनिट परत परतले. (मी कधीकधी मॅगी मसाला क्युब पण घालते किंवा किचन किंग मसाला पण घालते बिर्याणी मसाल्या ऐवजी. तेव्हढीच जरा व्हरायटी केल्याचे समाधान)

आता यात पाणी घालायचे आहेच पण आपल्या शिर्षकात नारळ आणि दूध पण लिहीले आहे त्यामुळे आपण भात शिजताना त्यात नारळाचे दूध घालणार आहोत. नारळ दुध आणि पाणी याचा रेशो १:१ पण चालेल किंवा थोडे कमीजास्तही चालेल.
मी रेडीमेड नारळ दुध वापरलय डाबर कंपनीचं.
नारळ दुधातच भाज्या भात सगळे शिजल्याने याची चव विशेष खुलते.

कढईवर झाकण ठेवून मंद ते मध्यम आचेवर आता हा भात शिजू द्यावा. अधूनमधून लक्ष द्यावे नाहीतर कोकोनट मिल्क राईस ऐवजी बर्न्ट राईस मिळायचा खायला.

भातात पाणी किती घातलं वगैरे प्रश्न विचारुन कोंडीत पकडू नका कारण मी नजरेच्या अंदाजानेच करत असते प्रयोग. बासमती असेल तर तांदूळ आणि पाण्याचा रेशो १:२ किंवा १: १.५ त्यानंतर लागलं तर आधणाचे पाणी घालायचे वाटी दोन वाटी. या पाण्याच प्रमाण जे दिलय ते नारळ दुध + पाणी मिळून आहे.

नारळ दुधामुळे टेक्ष्चर खुप मस्त मलमली मखमली येते. मसाले उग्र लागत नाहीत ते दुधामुळे माईल्ड होतात. याच्याबरोबर काही लागत नाही पण बाजूला जर काही घ्यायचे असेल तर दह्यातली कोशिंबीर छान लागते.

असा नारळ दुधातला भात मी पहिल्यांदा मायबोलीकर मामीच्या घरी खाल्ला होता. तेव्हापासून माझ्या हे ढकल ते ढकल भाताला नारळ दुधाचा मखमली झगा मिळाला आणि सोप्पं तेव्हढच आपलं या माझ्या किचन टॅगलाईनला तो झगा सुटही झाला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे. मी नक्कीच करुन पाहणार.

माझे बालपण सावंतवाडीत एका मुस्लिम घरात गेले. त्यांच्याकडे सणासुदीला पिवळ्या रंगाचा, मिरी घातलेला भात करत. त्याची अप्रतिम चव अजुन डोक्यात आहे. आई म्हणालेली की तो नारळाच्या दुधात बनवलेला असायचा.

ही पाकृ वाचुन एकदम तीच आठवण आली. ही पाकृ करुन पाहते ती चव येते का पाहायला. Happy

किती छान छान कृती येत आहेत कविन कडून & इतरांकडून ही. मस्तं, नारळ दुध वाल्या भाज्या, पदार्थ खूप आवडतात.
नक्की करून बघेल.
पदार्थाच्या नावात पाल नसतं तर बरं झालं असतं.. हाहा.

धन्यवाद नक्की करुन बघा आणि आवडतो का सांगा

पदार्थाच्या नावात पाल नसतं तर बरं झालं असतं.. हाहा.>> Lol मराठीवालं पाल नसतं की ओ ते. तुम्ही मखमली पुलाव म्हणा आणि करा Proud

तयार भाताचा फोटो छान आहे..
शाकाहारी भाज्यांचा भात जरा अवघड जाते घशाखाली उतरायला.. अश्या प्रयोगात चाखायला हवा कधीतरी.

व्वा कविन
मस्तच आहे रेसिपी.
हा थाई करी आणि भात सारखा लागत असेल का?
करून पाहीन.

कविन ,करून बघण्याच्या लिस्ट मध्ये ही रेसिपी वाढली. छान दिसतेय. लिहीली पण झकास.
ऋतूराज, मला पण तेच वाटलं,नादु मुळे थाय करी सारखं लागेल.तशा भाज्या घालायच्या ब्रोकोली, रंगीत भोमि, बेबी कॉर्न.

अभिनंदन..
नावात काय आहे?? बक्षीस तर आले Wink