✪ “मै कोई बेचारा नही हूँ, हमें बेचारगी नही, बराबरी चाहिए"
✪ २% लोकांकडे दृष्टी नाही, पण ९८% लोकांकडे व्हिजन नाही
✪ जन्मल्यावर अंध बाळ म्हणून वडिलांनी जमिनीत पुरायचं ठरवलं
✪ वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दूल कलामांसोबत भेट आणि त्यांची मदत
✪ क्षमतेला साकार करण्याची वाट दाखवणारी शिक्षिका
✪ सिस्टीमसोबत संघर्ष करून बारावीनंतर विज्ञान घेतलेला पहिला भारतीय दृष्टीहिन विद्यार्थी
✪ अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आणि भारतामध्ये ८०% दिव्यांगांना रोजगार देणारा उद्योगपती
✪ प्रतिष्ठेचा पुरस्कार "स्पेशल कॅटेगरीतून नको" म्हणून नाकारण्याची हिंमत
✪ Know us not for our disability, but for our abilities!
नमस्कार. काल "श्रीकांत" हा नुकताच आलेला राजकुमार रावचा चित्रपट बघितला. कृष्णम्मचारी श्रीकांतचे चाहते असलेल्या वडिलांनी त्या बाळाचं नाव श्रीकांत ठेवलं. पण जेव्हा कळालं की ते बाळ अंध आहे तेव्हा त्याचं भविष्य अंध:कारमय आहे असं वाटून तेच वडील त्याला जमिनीमध्ये गाडायला निघाले! पण त्या बाळाची नियती काही वेगळीच होती. १९९१ मध्ये आंध्र प्रदेशात एका आदिवासी भागात जन्मलेलं व जन्मजात दृष्टीहिन असलेलं ते बाळ! आई- वडील निरक्षर. श्रीकांत गावातल्या मुलांसोबत वाढला. गावातल्या शाळेतही थोडे दिवस गेला. पण दृष्टीहिन व्यक्तीसोबत केला जाणारा भेदभाव आणि छोट्या गावामध्ये गुणांना नसलेली किंमत अनुभवणं त्याच्या वाट्याला आलं. केवळ पाच मिनिट आपण आपले डोळे न वापरता रोजच्या गोष्टी करायची थोडी हिंमत करायला गेलो तरी घाम फुटेल. आपल्याला डोळे आहेत हे माहित असूनही पाच मिनिटांचा अंधार आपल्याला सहन होत नाही. हा संघर्ष त्याहूनही प्रचंड मोठा. अशा संघर्षामध्ये श्रीकांत होरपळला. पण नियतीची इच्छा खूप वेगळी होती.
काही जणांनी त्याला हैद्राबादच्या एका दृष्टीहिन शाळेमध्ये प्रवेश घेण्याबद्दल माहिती दिली. शिक्षण- राहणं मोफत असल्यामुळे वडील तयार झाले. ब्रेल लिपी, दृष्टीहिन व्यक्तींसाठी असलेली काठी, इतर दृष्टीहिन विद्यार्थ्यांची सोबत हे सगळं त्याला मिळालंच. पण त्याबरोबर पुढची वाट दाखवणार्या शिक्षिका मिळाल्या. ब्रेल लिपीमध्ये शिक्षण सुरू झालं. एका कार्यक्रमामध्ये २००६ मध्ये नववीत असलेला श्रीकांत तत्कालीन राष्ट्रपती व वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलामांना भेटला. "मला भारताचा पहिला visually impaired राष्ट्रपती बनायचं आहे," इतकं स्पष्ट उद्दिष्ट त्याने त्यांना सांगितलं. पुढे अब्दुल कलाम त्याला भेटत राहिले. दहावीमध्ये त्याला ८६% गुण मिळाले. पण त्याच्या भाषणामध्ये शाळेमधल्या भ्रष्टाचाराची त्याने वाच्यता केल्यामुळे शाळेतून त्याला अक्षरश: हाकलून दिलं जातं. त्याची मदतनीस काठीही त्याच्यापासून हिरावून घेतली जाते. काठीच्या मदतीशिवाय रस्त्यावर आलेला श्रीकांत! वडील मातीमध्ये पुरणार असतात तो क्षण आणि रस्त्यावर असूनही रस्ता शोधणारा श्रीकांत- हे दोन प्रसंग अंगावर येणारे आहेत.
(माझ्या ब्लॉगवर असे इतर लेख वाचता येतील- https://niranjan-vichar.blogspot.com/2024/09/srikanth-bolla-eye-opener-j...
आणि हा लेख इथे ऐकता येईल- https://open.spotify.com/episode/4deabOv8856BRo1A5trGWF )
त्याची शिक्षिका देविका त्याच्या मदतीला येते. ती त्याला घरी घेऊन जाते आणि त्याचा संभाळ करते. शाळेतून काढल्यानंतर ती त्याला सामान्य शाळेमध्ये प्रवेश घेऊन देते आणि पुस्तकाच्या व्हॉईस नोटस काढून त्याच्या अभ्यासासाठी मदत करते. पुढे बारावीला श्रीकांतला ९८% गुण मिळतात. त्याला विज्ञान शाखेकडे जायचं असतं, पण भारतात कुठल्याही महाविद्यालयामध्ये दृष्टीहिन व्यक्तींसाठी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश शक्य नसतो. शिक्षिका देविका त्याला हव्या असलेल्या महाविद्यालयाविरुद्ध कोर्टात जाते. सहा महिन्यांनी कोर्टसुद्धा त्याचं म्हणणं ऐकतं आणि त्याला विज्ञान शाखेमध्ये प्रवेश मिळतो. शिक्षणाची, स्वावलंबनाची आणि दूरदृष्टीची एक एक पावलं तो पुढे चालत जातो. भारतीय दृष्टीहिन क्रिकेट संघासाठीही त्याची निवड होते.
पण तेव्हा पुढच्या शिक्षणाचा प्रश्न येतो. त्याला उत्तम गुण मिळूनही भारतामध्ये विज्ञान शाखेत पुढचं शिक्षण मिळत नाही. कारण उच्च शिक्षण संस्थांचे नियम म्हणजे नियम. पण त्यावेळी देविकांच्या लक्षात येतं की, अमेरिकेमधल्या विद्यापीठांमध्ये त्याला प्रवेश मिळू शकेल आणि ब्रेल लिपीमध्ये अद्ययावत इंजिनिअरिंग- मॅनेजमेंट असा अभ्यासक्रमही शिकता येईल. ती तसा प्रयत्न करते. त्याचे काही ऑनलाईन इंटरव्ह्यूज होतात आणि त्याला मॅसॅच्युसेटस ऑफ टेक्नोलॉजी- एम.आय.टी प्रवेश द्यायला तयार होतं. त्याची प्रतिभा, जिद्द व तयारी बघून त्याला स्कॉलरशिप मिळते. आणि त्याच्या प्रवासाचा खर्चही एक भारतीय कंपनी करते. तिथला तो पहिला विदेशी दृष्टीहिन विद्यार्थी ठरतो. उच्च शिक्षणामुळे श्रीकांत ह्याच नावाच्या एका तडाखेबंद खेळाडूला भारत मात्र मुकतो!
ही सत्य जीवनकहाणी कमालीची अंगावर येणारी आणि प्रेरणादायी आहे. आणि डोळे उघडणारी आहे. एम.आय.टी. मध्ये पुढचं शिक्षण घेताना अमेरिकेमध्ये तो कोणत्याही भेदभावाशिवाय एक नॉर्मल व्यक्ती म्हणून पोहणं, फिरणं, धावणं, मनाला हवं तसं शिकणं करू शकतो. अगदी बेसबॉलमधलाही चँपियन होतो. JAWS सारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीने सहजपणे संगणकावर काम करायला शिकतो. शिक्षिका देविका त्याला भारतात यायला सांगतात. पण तो तयार नसतो. कारण भारतामध्ये त्याच्या क्षमतेची, गुणांची कदर न होता केवळ त्याच्या कमतरताच बघितल्या जातील, (अंधा है, इसे भीख दो) ह्याची कल्पना असते. पण त्याची प्रेयसी स्वाती त्याला सांगते की, "तुझ्यामध्ये जे आहे ते इतरांमध्येही आहे. तू पुढे आलास पण ते कसे पुढे येतील? त्यांना तू संधी देऊ शकतोस, त्यांच्यासाठी महामार्ग निर्माण करू शकतोस." त्यामुळे अमेरिकेमध्ये शिक्षण घेऊन व तिथलं सन्मानाचं जीवन अनुभवूनही तो भारतामध्ये परत येतो!
चित्रपटाचा पुढचा भाग म्हणजे "मी कोणी बिचारा नाहीय, मला तुमची अनुकंपा नकोय, बरोबरी हवीय," ह्याचं प्रत्यंतर आहे. शिक्षिका देविकाच्या मदतीने सुरूवातीला तिच्याच टेरेसवर तो एक कंप्यूटर इन्स्टिट्युट सुरू करतो. तिथे दृष्टीहिन मुलांना तो कंप्यूटर शिकवतोसुद्धा. ते शिकतात. पण कोणीच त्यांना नोकरी देत नाही. फक्त सहानुभूती देतात. तेव्हा मात्र तो स्वत: उद्योजक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी संधी निर्माण करण्याचा निर्धार करतो. त्यासाठी त्याला अब्दुल कलाम २५ लाखांची मदत करतात. दया दाखवणारे खूप जण त्याला भेटतात. पण त्याची क्षमता ओळखून सहानुभूती नव्हे तर बरोबरीच्या नात्याने त्याच्यासोबत भागीदारी करायला कोणीच पुढे येत नाही. कालांतराने रवी हा गुंतवणूकदार त्याच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायला तयार होतो, पुढे त्याचा मार्गदर्शक होतो आणि मोठा भाऊही होतो. स्वातीही त्याला साथ देते. सगळीकडे लोक कौतुक करायला लागतात आणि इतर दृष्टीहिन त्याला "देव" मानायला लागतात तेव्हा काही काळ त्यालाही अहंकार होतो. काही राजकीय लोक त्याच्या कमतरेला त्यांच्या पक्षाची शक्ती बनवू पाहातात, त्याच्या दृष्टीहिन असण्याचा मतांसाठी फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावेळी गुरू बनून शिक्षिका देविका त्याला परखड सुनावते. त्याला मार्गापासून भटकू देत नाही. श्रीकांतही अशी लाचारी पत्करण्यास नकार देतो. कालांतराने एक उद्योजक म्हणून तो सफल होतो. अडथळ्यांवर जिद्दीने मात करतो. मदतीला अनेक लोकही येत जातात.
हा चित्रपट आणि ही सत्यकथा त्यामुळे गुरू- शिष्याची कहाणीसुद्धा आहे. शिकण्याची तीव्र ऊर्मी, धडपड, अंधारातूनही पुढे जाण्याची जिद्द आणि त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारे गुरू आणि इतरांकडून केलं जाणारं मार्गदर्शन. खरा गुरू कसा वाटाड्या होतो आणि आडवाटेवर सोबत करतो, अडखळणार्या शिष्याला चालण्याचं बळ कसं देतो हे बघण्यासारखं आहे. इतका सुंदर चित्रपट भारतामध्ये निघतो, हासुद्धा सुखद धक्काच म्हणावा लागेल!
चित्रपटाच्या शेवटी श्रीकांतला उद्योगपती म्हणून मानाचा पुरस्कार मिळतो. तिथेही ह्या श्रीकांतची बॅटींग उत्तम होते. एका विकलांगतेकडेही इतक्या निकोपपणे बघता येऊ शकतं! "हमने क्या गुनाह किया है कि आप लोग बोलते हो प्यार में अंधा हुआ है क्या? हम तो सिर्फ सपने देख सकते हैं, आप तो देख सकते हो| हमें भीख नही, अवसर चाहिए|" पुढे तो म्हणतो की, मी हा पुरस्कार स्वीकारू शकत नाही, कारण तो स्पेशल कॅटेगरीमध्ये दिलेला आहे. मी आणखी मेहनत करेन, पुढे जाईन आणि मग नॉर्मल म्हणूनच पुरस्कार घेईन हे तो सांगतो. आमच्यासाठी दया किंवा भीक नको, तर आमच्यासाठी बरोबरीच्या नात्याने सहकारी व्हा, आम्हांला तुमच्या कामात सहभागी करा असं तो सांगतो. एका बाजूला सतत लाचारीचा पाढा आणि अनाठायी सेवाभावाचं स्तोम असताना हा स्वावलंबी आणि उद्योगशील दृष्टीकोन मनाला भिडतो! उद्योगाद्वारे मोठ्या प्रमाणात दिव्यांना रोजगार देणार्या श्रीकांत बोल्लांबद्दलचा हा चित्रपट आणि त्यांचं कार्य म्हणजे ह्या अर्थाचा जाहिरनामाच आहे-
"Know us not for our disabilities, but know us for our abilities!"
आजच्या शिक्षक दिनानिमित्त अशा सर्व गुरूंना वंदन. अशा शिष्य व गुरूंकडून प्रेरणा घेऊन आपणही अशा सक्षम व्यक्तींना बरोबरीची सोबत देण्यासाठी पुढे येऊया.
- निरंजन वेलणकर दि. ५ सप्टेंबर २०२४.
(वाचल्याबद्दल धन्यवाद! हा लेख इंग्रजीमध्येही मी लिहीला आहे. जवळच्यांसोबत शेअर करू शकता. 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)
छान परिचय
छान परिचय
छान परिचय>> +१
छान परिचय>> +१
छान परिचय.
छान परिचय.
मला हा पिक्चर थिएटर बघायचा
मला हा पिक्चर थिएटर बघायचा होता. पण जमले नाही. तरी ओटीटी वर आल्या आल्या पाहिला. प्रेरणादायी कथा आहे याबाबत दुमत नसावे. पिक्चर म्हणून फर्स्ट हाफ छान वाटला. सेकंड हाफ भरकटला असे वाटले. किंबहूना चित्रपटाच्या आधीच्या फ्लोशी विसंगत वाटला. त्यामुळे क्लायमॅक्सचा सुद्धा इम्पॅक्ट गेला असे वाटले. पण तरीही एकदा जरूर बघावा असा आहे.
बाकी राजकुमार राव तर कमाल आहे. त्याचे पिक्चर जरूर बघावेत. थिएटरला जाऊन बघावे. तरच ॲक्टिंग स्टारचा जमाना येईल.
छान परिचय >>> +१
छान परिचय >>> +१ नेट्फ्लिक्सवर आला आहे त्यामुळे नक्कीच पाहणार.
छान परिचय
छान परिचय
भारीच...
भारीच...
वाचनाबद्दल व
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!
@ ऋन्मेऽऽष जी, हो. मलाही काही वेळ पिक्चर भरकटल्यासारखा वाटला होता. पण परत ट्रॅकवर आणला. // ऍक्टिंग स्टारचा जमाना- खरं आहे!
छान परीचय.
छान परीचय.
मी नेटफ्लिक्सवर आल्या आल्या पाहिला.
उत्तरार्धाबाबत ऋन्मेषशी बऱ्या पैकी सहमत, त्याने कुणी निरुत्साहित होऊन टाळु नये असे माझे मत.