कला उपक्रम: नैसर्गिक संसाधनांमधून गणेश

Submitted by संयोजक on 5 September, 2024 - 04:32

अगदी पुरातन काळापासून विविध कला ह्या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. कलेला कोणत्याही बंधनांची मर्यादा नसते. कला ही आपल्या भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे. आपल्या सर्वांमधे निसर्गाने कोणत्या ना कोणत्या रुपात कलेचा अंकुर रुजवलेला आहे. त्याचे स्वरुप वेगवेगळे असू शकेल, पण तो ओळखणे व त्याला मूर्त स्वरुपात आणणे, यातील आनंद अवर्णनीय आहे.

गणपती ६४ कलांचा अधिपती आहे, यावर्षी बुद्धीच्या व कलेच्या देवरायाला वंदन म्हणून आपण एक छान उपक्रम घेऊन येत आहोत.
कोणत्याही नैसर्गिक संसाधनापासून, तुम्हाला जी कोणतीही कला अवगत आहे त्यातून श्रीगणेशाचे मूर्त स्वरुप साकारायचे आहे. मग ती मूर्ती असो, शिल्प असो, चित्र असो, हस्तकला असो, वा फक्त नैसर्गिक वस्तूंची केलेली मांडणी. अट फक्त एकच आहे की कोणत्याही रेडीमेड वा रासायनिक वस्तू न वापरता ही कलाकृती करायची आहे. चला तर मग तुमच्यात लपलेल्या कलाकाराला व सृजनशीलतेला मुक्तपणे व्यक्त होऊ द्या.

कलाकृतीसाठी नियमः-
१. कोणत्याही नैसर्गिक संसाधनांचा वापर करता येईल. दगड, माती, लाकूड, पाने, फळे, फुले, बिया, धान्य, वाळू वगैरे काहीही चालेल.
२. एकाच कलाकृतीमधे अनेक संसाधनाचा वापर करता येईल.
३. फळे, फुले, पाने यांची फक्त मांडणी/ आरास करून केलेली कलाकृती चालेल.
४. कलाकृती तयार करताना जे माध्यम वापरणार आहात त्याला आकार देण्यासाठी अथवा वापर करण्यायोग्य बनवण्यासाठी अवजारे, उपकरणे वापरण्यास हरकत नाही.
उदाहरणार्थ, जर कोणाला नैसर्गिक रंगांचा वापर करुन चित्र काढायचे असेल व त्यासाठी एखाद्या फळाचा रस काढायचा असेल तर तो रस काढायला मशिन्स, उपकरणे वापरता येतील. कोणास जर मुर्ती बनवायची असेल तर चाळून घ्यायला चाळणी, कोरीव कामासाठी लागणारी अवजारे वापरायला परवानगी आहे.

उपक्रमाचे नियम :
१) एक आयडी एका विषयाची कितीही प्रवेशिका देऊ शकेल.
२) प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता ७ सप्टेंबर ला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
३) 'मायबोली गणेशोत्सव २०२४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
४) याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२४ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
५) प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - " नैसर्गिक संसाधनांमधून गणेश - {तुमचा आयडी}"
६) प्रवेशिकेबरोबर किमान एक प्रकाशचित्र देणे अनिवार्य आहे.
७) प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
८) कलाकृती स्व:त तयार केलेली असावी. आणि पूर्वप्रकाशित नसावी.
९) 'उपक्रमासाठीसाठी नसलेली' पण ह्या नियमांवर आधारित कलाकृती गणेशोत्सव झाल्यावर प्रकाशित करावी ही प्रेमळ विनंती.
१०) प्रवेशिका ०७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या वेळेत पाठवता येतील. (अमेरिकेची पश्चिम किनाऱ्यावरची प्रमाणवेळ)

!!! गणपती बाप्पा मोरया!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान उपक्रम

चिकटवाचिकटवी करायला फेविकॉल वगैरे चालेल का? क्राफ्टवाले क्विलींगचा गणेश साकारु शकतील का नियमानुसार? (मी आपली लोकांना दाद देणार या उपक्रमात. तरी आपली शंका आली म्हणून विचारली Proud )