मी, पक्या आणि प्रिन्सेस
ती अॅिक्सिडेंटची केस होती.
गाडी कुणी बाई चालवत होती, एकटीच होती. आणली तेव्हा बेशुद्ध होती. इमर्जेन्सीमध्ये पोलीस घेऊन आले होते. आधी सिविल हॉस्पिटल मध्ये दाखल केली होती. पण जेव्हा ओळख लागली तशी चक्रे फिरली आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केली गेली. कोणी हाय प्रोफाईल असणार. पण मला काय त्याचे? आपल्या समोर सगळे पेशंट. पेशंट नंबर सो अॅंमड सो.
वेळ रात्रीची होती. मी घरी झोपलो होतो. अभिजितचा फोन होता.
“सर, अर्जंट केस आहे. बाईचा अॅचक्सिडेंट. आधी वाटले होते पेशंट बेशुद्ध आहे. मला डाउट आला म्हणून चेक केलं. पेशंट कोमात आहे. कोमाटोज. मी पेट स्कॅन साठी रिफर केला आहे. बाकी टेस्ट पण करून घेत आहे.”
“ओके, आता रात्रीचे साडेतीन वाजताहेत. सगळे होईस्तोवर सकाळ होईल. सकाळी मी आलो कि बघू. बाकी व्हायटल्स स्टेबल आहेत ना?”
“होय पण ... जरा इकडे बोला, सर.”
मला न विचारता अभिजितने फोन...
“येस. मी केके बोलतोय. बोला कोण बोलताय?”
“मी साठे,” साठे थकेल्या आवाजात बोलत होता. “केके, माझ्या बायकोचा कारचा अॅाक्सिडेंट झाला आहे. इथले डॉक्टर मला सांगताहेत की ती कोमात आहे. मेंदूला इजा झाली आहे. ब्लंट टीबीआय अस काहीतरी म्हणाले आहेत. मला हे काही समजत नाहीये. पण ती जगायला पाहिजे एव्हढेच मला समजतं...”
तो असच काही बाही बडबडत बसला असता. म्हणून मी त्याला थांबवले.
“साठे, आमचा स्टाफ तुमच्या पत्नीची काळजी घेत आहे. तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका. उद्या मी सकाळी येईन आणि मग आपण बघू. फोन जरा अभिजितला द्या. अभिजित मी नंतर बोलेन तुझ्याशी.”
पंधरा मिनिटांनी मी अभिजितला फोन केला.
“अभिजित तो साठे दूर आहेना? कोण आहे हा माणूस.”
“सर, हे पुण्याचे कलेक्टर साठे सिनिअर आयएएस ऑफिसर आहेत. इथे मला मिनिस्टरपासून सगळ्यांचे फोन येत आहेत. नुसता वैताग आला आहे.”
“तभी तो. उद्या सकाळी. एक कर, माझा नंबर कुणाला देऊ नकोस.”
बायको कुरकुरत होती. म्हणाली झोप आता.
मग कलेक्टरीण साठीण बाईला फाट्यावर मारून झोपी गेलो.
सकाळी ऑफिसात गेलो तर बाहेर पाच सहा जण घोळका करून उभे होते. एक स्मार्ट पण आता ढेपाळलेला माणूस खुर्चीवर बसला होता. हाच तो साठे असणार. बाकीचे त्याच्या ऑफिसमधले त्याचे चमचे असणार. त्यांच्या लीन आणि लाचार चेहऱ्यावरून अजिजी ओसांडत होती.
“डॉक्टर आले.”
त्या सरशी साठे पुढे सरसावला. पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून ऑफिसात शिरलो. अभिजित आधीच तिथे बसला होता.
“अभिजित, तुझी नाईट होती ना. जा घरी जा.”
अभिजितने वार्ड मधल्या पेशंटची हाल हवाल सांगितली. सगळं काही जैसे थे होतं. फक्त ही मिसेस साठेची नवी अॅीडमिशन होती.
“MRI स्कॅनला पाठवायची आहे. अजून एक सांगायचं. पेशंटच्या रक्तात अल्कोहोल आहे. ड्रंक ड्रायविंगची केस आहे. पोलिसांना हे माहित असणार. पण सगळे चूप आहेत.” एव्हढे सांगून अभिजित निघून गेला.
ड्रंक ड्रायविंग!
मी साठेला आत बोलावले.
“डॉक्टर, मी साठे. माझ्या मिसेसचा काल रात्री अपघात झाला. आधी सिविल हॉस्पिटलमध्ये होती. पण तिथल्या डॉक्टरांनी तुम्हाला कन्सल्ट करायला सांगितलं आहे. ही त्यांनी दिलेली चिठ्ठी.” मी नोट बाजूला ठेवली. नंतर सावकाश वाचेन.
साठे बोलायचे थांबत नव्हता.
“डॉक्टर, ती जगली नाही तर मी पण जगणार नाही.”
How so sweet! मिसेस साठे खरच लकी असणार. असा पती मिळाला.
पण तो थांबला. त्याच्याचाने पुढे बोलवेना. आवाजाने दगा दिला असणार.
त्याचा आवेग ओसरेपर्यंत मी पण चूप बसलो. अखेरीस मी जे सगळ्या पेशंटच्या नातेवाईकाना सांगतो तेच त्याला सांगितले.
“साठे, तुमचा देवावर विश्वास आहे ना मग त्याची प्रार्थना करा. प्रार्थनेत खूप बळ असते.”
“डॉक्टर, मी आयुष्यात कधीही देवा पुढे भीक मागितली नव्हती, छोट् मोठ्या चुकाही कळत न कळत केल्या. झाल्या. ही त्याची शिक्षा आहे का?”
मी त्याला देवावरती एक लेक्चर देणार होतो पण मला दुसरीही काम होती. फक्त एकच सांगितलं, “नाही हो. देव क्षमाशील असतो...”
बहुतेक त्याचं समाधान झालं असावं. तो गेला आणि मी माझ्या कामाला लागलो.
आधी ओपीडी केलं. जास्त पेशंट नव्हते. मग वार्डची राउंड घेतली. शेवटी स्पेशल रूम्सकडे वळलो.
मिसेस साठेना मी प्रथमच बघत होतो.
आणि मला धक्काच बसला. अरे ही तर प्रिन्सेस. कोमात होती पण भास असा होता होता कि एखादी देवी शांत झोपली आहे.
तिला पाहून मी कमालीचा अस्वस्थ झालो.
नर्स बाईंनी सांगितले कि मिसेस साठे बाईंना एमआरआय साठी न्यायचे आहे.
मी ऑफिसमध्ये परतलो.
“अरे, कुणाला तरी खाली पाठवून चारमिनारचे एक पाकीट मागवून घ्या.”
कडकी लागलेल्या लोकांसाठी चारमीनार. ते नसेल तर मग आहेच लालधागा.
“सर, पांडू म्हणतोय कि अश्या नावाची सिगारेट नाहीये.”
मलाच जायला पाहिजे. हे लोक काही कामाचे नाहीत.
मी केबिनमधून बाहेर पडलो तेव्हा माझ्या भेटीसाठी थांबलेले पेशंटचे नातेवाईक आदबीने उभे राहिले. माझे कुणाकडेही लक्ष नव्हते. झपाझप लांब लांब ढांगा टाकत कॉरीडर मधून लिफ्टकडे वळलो.
“गुड मॉर्निंग डॉक्टर.”
लिफ्ट आली. पुन्हा सगळे बाजूला झाले मला वाट द्यायला. मी खाली आलो तेव्हा टळटलीत दुपार झाली होती.
कॉलेजच्या बाहेरची पान सिगारेटची गादी.
“पंडत, एक चारमिनाराचे पाकीट.”
“साहब, चारमिनार खतम.”
“ये ले, तू भी क्या याद करेगा.”
“आयला पक्या तू? आज कॉलेजची आठवण झाली?”
आम्ही सिगारेट पेटवून मस्त झुरके घेत होतो.
“केके सिगारेट फेकून दे.”
“’कारे बाबा? अजून चार झुरके पण झाले नसतील.”
“फेकून दे म्हणजे फेकून दे. प्रिन्सेस येतीय.”
आम्ही दोघांनी सिगारेटी फेकून दिल्या, दोनी हात खिशात घालून आपण त्या गावचे नाहीत असा आविर्भाव करून उभे राहिलो.
प्रिन्सेस तिच्या वेस्पावरून डौलदार पाने येऊन आमच्या जवळ येऊन थांबली. (स्कूटर घेऊन येणारी कोलेजमधील एकुलती एक तरुणी.)
“हाय पक्या! सिगारेट का फेकून दिलीस रे. पी रे पी. पंडत ह्याला एक पाकीट दे. फूक. धुराड्या. सिगारेट पिण्याचे चार फायदे. पहिला म्हणजे...”
“का अजून जळवतेस? बस भी करो ना.”
“आणि हा कोण आहे तुझ्या शेजारी उभा? आपल्या कॉलेजचा वाटत नाही. ह्याला ऐकू येत नाही कि बोलता येत नाही? एक्झाक्टली काय डिफेक्ट आहे?”
“मी केके.”
“प्रिन्सेस, स्कॉलर आहे केके.”
“व्वा, आता, पक्या, तू स्कॉलर होणार कि ह्याचे धुरांडे होणार?”
वेस्पाला नाजूक टाच मारून ती निघून गेली. (तिचे सगळेच नाजूक. फक्त बोलणे सोडून. बोलणे म्हणजे फड्या निवडुंग!)
“हायला.” मी एव्हढेच बोलू शकलो.
त्या दिवसापासून मी प्रिन्सेसवर मनोमन प्रेम करायला लागलो. निश्चय केला करीन लग्न तर हिच्याशीच. माझ्या पक्याच्या कॉलेजमध्ये चकरा सुरु झाल्या. पक्या समजायचे ते समजला. म्हणाला केके हा नाद सोड. ती कुठे नि आपण कुठे. (त्याला खरतर म्हणायचे होते तू कुठे)
मग जे अटळ असते ते झालं. पक्या ए ग्रुप घेऊन सिओइपीत दाखल झाला आणि मी बी ग्रुप घेऊन बीजे मध्ये.
त्या दिवशी गणपतीच्या देवळापासच्या घोडके पेढेवाल्यांच्या दुकानातून पाव किलो पेढे घेतले. एक गणपतीला ठेवला आणि उरलेला पुडा घेऊन पक्याच्या कॉलेजकडे प्रस्थान केले. बीजे मध्ये अॅडडमिशन ही माझी आयुष्यातील ग्रेटेस्ट अचीवमेंट होती. पंडतच्या ठेल्यापाशी वाट बघत उभा राहिलो. अखेर प्रिन्सेस आली. मी पुढे जाऊन तिची वेस्पा थांबवली.
“कोण रे तू? मी अनोळखी मुलांना लिफ्ट देत नाही.”
“मिस मी केके. पक्याचा दोस्त. मिस, हे घ्या पेढे.”
“पेढे कसले?”
“मला एमबीबीएसला बीजे मध्ये मिळाली.” मी उत्साहाने सांगितले.
“अरे वा. मस्तच कि. मग काय तुम्ही डॉक्टर होणार. आम्ही पेशंट. मज्जाच आहे.” ती लहान मुलांशी बोलायचं तसं बोलत होती. माझी डॉक्टरकी तिच्या दृष्टीने किस झाड की पत्ती.
एक पेढा घेऊन तिने पुडकं परत केलं. तिच्या मनगटावर दोन पानं आणि एक फूल गोंदलेलं होतं.
निवडुंगालाही फुलं येतात.
आता हे आठवलं कि वाटतं कि तेव्हा आपण किती च्यु होतो.
तिसऱ्या वर्षाला असताना पक्याने न्यूज आणली. प्रिन्सेसचे लग्न ठरले आहे.
मेरी दुनिया लुट गयी और मै खामोश था. एक वर्ष थांबली असती तर.
आता हे सगळं आठवलं कि स्वतःला लाथा माराव्याश्या वाटतात.
नंतर अनेक गोष्टी घडल्या.
मी पोस्टग्रॅड केले,मग वेल्लोरला जाऊन न्यूरोसर्जरीची सुपर स्पेशिअलिटी केली. आता ह्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतोय. जे जे पाहिजे होते ते सगळे मिळाले. पैसे, गाडी, फ्लॅट, मान मरातब. नाही मिळाली ती प्रिन्सेस. पण आता मानवी जीवनाची क्षणभंगुरता रोज रोज पाहून सगळ्या भावना मेल्यात जमा.
पक्याचे काय? तो अमेरिका नामक कृष्ण विवरात नाहीसा झाला आहे, अगदी म्हणजे अगदी नाहीसा नाही झाला. अधून मधून आवाज काढतो. पण आम्ही कॉलेजच्या आठवणींबद्दल बोलायचं कटाक्षाने टाळतो.
पेशंट एमआरआय करून परत आला.
माझ्या मोबाईलवर रिपोर्ट पण आला.
टेक्निकल डिटेल सांगून ज्ञान पाजळत नाही. महत्वाचे म्हणजे ऑपरेशन करावे लागणार होते. खर तर रक्तात अल्कोहोल असताना ऑपरेशन करायला नाही पाहिजे. पण इलाज नव्हता. Time was of the essence.
अभिजितला घरून बोलावून घेतले.
ऑपरेशन साडे पाच तास चालले होते. मी प्रचंड मानसिक ताणाखाली होतो. असं कधी होत नाही. डॉक्टरने आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या केसमध्ये गुंतू नये. असे म्हणतात का ते आज कळले. एकदा वाटलं दुसऱ्या सहकाऱ्याकडे केस द्यावी. पण विश्वास वाटत नव्हता. ऑपरेशन मीच केले.
ऑपरेशन संपले नि मी सुटकेचा निश्वास टाकला.
जणू एक देणे द्यायचे राहिले होते ते देऊन झाले. मोकळा झालो.
प्रिन्सेसला आयसीयू मध्ये नेण्यात आले.
पाच सहा तासांनी तिला बघायला गेलो. ऑन ड्युटी डॉक्टर बरोबर आला.
“सर तुमचा पेशंट तसा स्टेबल आहे पण मधून मधून बरळतोय.”
मी थोडा वेळ प्रिन्सेस जवळ बसलो. सगळ्या आठवणी दाटून आल्या.
तिची बडबड सुरु झाली.
प्रिन्सेस झोपेत बरळत होती.
“पक्या...”
मला शॉक. हिला पक्या कसा आणि का आठवला?
“पक्या, आला नाहीस अजून? माझ्यावर रागावला आहे. अरे झालं गेलं विसरून जा. प्रिन्सेस इज रेडी नाऊ.”
त्या ड्रंक ड्रायव्हिंगचे रहस्य आता उलगडले.
नर्सने माझ्याकडे बघून खांदे उडवले.
“नर्स बाई तुमचे काम पेशंटची देखभाल करणे आणि माझे काम सर्जरी. तेव्हा ऐकले ते विसरून जा. थोडं झोपेचं औषध द्या बाईन्ना.”
केस ऑफ अल्टर्ड कॉन्शसनेस, जणू काय मेंदूचा चोरकप्पा उघडून प्रिन्सेस त्यात निरखून बघत होती. होतं असं कधी कधी.
राउंड संपवून मी माझ्या ऑफिसात परतलो तर मोबाईल वाजला. बघतो तर काय पक्याचा कॉल! आज म्हणजे पक्याचा दिवस होता. आत्ता पक्याच्या तिथे रात्र असणार.
“बोल पक्या. किती दिवसांनी आज बरी आठवण झाली रे. एव्हढ्या रात्री अपरात्री काय करतोयस?”
“केके, झोपलोच होतो पण अर्ध्या तासापूर्वी कुणीतरी धक्का मारून जागं केलं. तेव्हापासून झोप येत नाही. गेल्या चार दिवसांपासून...”
क़्वांटम एंटॅंगलमेंट! दोन जिवांची गुंतागुंत.
Uuniverse is not locally real.
“पक्या एक पेग मार आणि झोप. तुला चारमिनारचे आख्खं कार्टन पाठवलं असतं. पण माझा वार्डबॉय म्हणाला चारमिनार मिळत नाही आजकल. कळलं का तुला. का पुन्हा सांगायला पाहिजे? चारमिनार मिळत नाही आजकल! जागं राहून काही उपयोग नाही. दोन दिवसांनी सगळं काही ठीक होईल. तेव्हा स्लीप बेबी स्लीप.”
“केके, कळलं. झोपतो. पण तू फार क्रूर आहेस! फुलपाखरांचे पंख तोडणारा आहेस तू.”
मी ऐकून घेतले. पण त्याला पत्ता लागू दिला नाही.
साधारण चोवीस तासानंतर मिसेस साठे बऱ्यार्पैकी शुद्धीवर आल्या होत्या. (अभिजितने असे रिपोर्टिंग केले होते.) पेशंट स्पेशल रूममध्ये होता. पण मला तिकडे जायची इच्छा नव्हती. समजा तिने मला ओळखले तर? तर काय? ओळखले तर ओळखले. पण इथे ती पेशंट आणि तू डॉक्टर आहेस. एव्हढे एकच नाते आता उरले आहे. डॉक्टर म्हणून तुझे काही कर्तव्य आहे कि नाही.
शेवटी गेलो बघायला. अभिजित बरोबर होताच. खोलीत साठे आणि ती होती. साठेने तिचा हात हातात घेतला होता. तो तिला हळुवारपणे थोपटत होता.
तिच्या डोळ्यात अश्रू होते.
“साठे, तू किती माझी काळजी करतो आहेस. मी तुला सोडून जाईन असे तुला वाटले तरी कसे? असे कधी होईल काय?”
मी खाकरलो. माझ्या उपस्थितीची त्यांना जाणीव झाली असावी. मला पाहून साठे खुर्चीतून उठून उभा राहिला.
“पुष्पा, हे डॉक्टर केके. ह्यांनीच तुझे ऑपरेशन केले.”
“हलो मिसेस साठे, कसं वाटतंय.”
तिने कसेबसे हात उचलून मला नमस्कार करण्याचा प्रयत्न केला.
मी क्षणभर तिच्या नजरेला नजर भिडवली.
नजरेत “त्या” ओळखीचे भाव नव्हते. मला त्यावेळी काय वाटले असावे? राग, मत्सर, निराशा, कडवटपणा कि सुटका झाली म्हणून माफक आनंद?
ह्या स्त्रिया. काय काय रहस्ये उरात दडवून जगतात.
हुश्श. ड्युटी संपली. चार
हुश्श. ड्युटी संपली. चार मिनार बनवून पाठवू का?
Srd आभार! आता पाठवून काही
Srd आभार! आता पाठवून काही उपयोग नाही. गेले ते दिवस.
मस्त लिहिलंय
मस्त लिहिलंय
छान आहे कथा. पण पटकन संपली.
छान आहे कथा. पण पटकन संपली.
छान कथा!
छान कथा!
मस्त लिहिले आहे....
मस्त लिहिले आहे....
अमेरिकेच्या कृष्णविवरात नाहीशी झालेली कोणीतरी आठवली मलाही. फरक इतकाच की ती बदनाम होऊ नये म्हणून ग्लानीत देखील आता तिचे नाव घेतले जाणार नाही
छान, कथा आवडली.
छान, कथा आवडली.
कथा पुढे नक्कीच काहीतरी होणार
कथा पुढे नक्कीच काहीतरी होणार आहे म्हणून तपशीलासह शेवटपर्यंत ओघवती जाते ... पण शेवट काहीसा निराश करतो
काहीतरी ठोस शेवट हवा होता !
अर्थात हे माझं वॆयक्तीक मत आहे.