साथ.

Submitted by केशवकूल on 30 August, 2024 - 06:44

साथ.
त्याला सकाळी लवकर उठायची सवय होती. पण आज सकाळी त्याला नेहमीसारखे प्रसन्न वाटत नव्हते. काय कारण असावे?
त्याचे नाव होते राजे. अनंत राजे. जिम मध्ये जाऊन कमावलेले शरीर. धडधाकट प्रकृती. कधी दवाखान्याची पायरी चढलेला नाही. सकाळची भरभक्कम न्याहारी. न्याहारी न खावीशी वाटावी असं काही नव्हतं. जगण्यासाठी खाणे का खाण्यासाठी जगणे असले तात्विक विचार यायचं वय नव्हते.
बाजूच्या टेबलावर दोन तरुणी बसल्या होत्या. पैकी एक ती किंचित काळ्या रंगावर गेली होती. पण तिचा आवाज म्हणजे स्वरांची तान. सिंग-सॉंग. तो तिला नेहमी पहात असे. तिच्या मैत्रिणीसह ती ब्रेकफास्ट करायला येत असे.
ओके. ऑर्डर द्यायची वेळ झाली. वेटर प्रश्नार्थक चेहरा करून उभा होता. ज्यूस मध्ये काय घावे? द्राक्षाचा, सफरचंदाचा, संत्र्याचा, कलिंगडाचा का मुसंबीचा? असे नर्णय घ्यायचे म्हणजे डोक्याला शॉट. त्यापेक्क्षा हा शॉर्ट कट घ्यावा.
“हे बघ, हे ज्यूस आहेत ना? एकेक ग्लास ये घेऊन. फुल हा.”
“वेरी गुड सर.”
फालतू कस्टमरला सर म्हणायचा पगार मिळतो ना.
पण लोक त्याच्याकडे संशयी नजरांनी का बघताहेत? ब्रेक फासत मध्ये चार पाच ग्लास भरून ज्यूस?
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
“चंचू, काय सांगू तुला. शहरातले सारे लोक हादरले होते. सरकारला, डॉक्टरांना, हेल्थ वर्कर्सना काय करावे, कोठे जावे, कुठले औषध घ्यावे? कोणाला काही कळत नव्हते. हॉस्पिटलच्या बाहेर अन्ब्युलंस गाड्यांची ये जा चालू होती. लोक उंदारांसारखे मरत होते. हॉस्पिटलमध्ये रोग्यांची अंथरूणे जमिनीवर टाकली होती. चंचू, अग ती सारी दृश्ये टीवीवर दाखवत होते. लोक प्राणवायूसाठी तडफडत होते. मी टीवी बघायचेच बंद केले. रात्री पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन म्हणजे काय माहित आहे?...”
तिला हुंदका आवरला नाही.
चंचलने तिच्या मैत्रिणीला थांबवले, “अनुरा, पुरे झालं. किती त्रास करून घेशील. अग सरते शेवटी स्वप्नच होते ना.”
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
आता त्याच्या प्लेटमध्ये दहा इडल्या आणि मेदू वडे होते. इतर लोक आता त्याच्याकडे एकटक बघत होते. दहा इडल्या आणि मेदू वडे खाताना वीस नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या. त्याला जणू चोरी करताना पकडल्या गेल्यासारखे वाटत होते. अरे माझे पैसे आहेत. मी खातो, कुणाला घाबरतो कि काय?
आता पाच कप कॉफी ऑर्डर करतो.
Xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
“चंचू, लॉकडाऊन लागला म्हणजे कोणी घराबाहेर पडायचे नाही. भिजलेल्या उंदराप्रमाणे घरात बसून रहायचे. तरी बाबांनी चपळाई करून वाण्याकडून त्याची मिनतवारी करून महिन्याचे सामान आणून टाकले. भाज्या नाहीत, फळे नाहीत, दूध... नाही. बाबांनी अमूल फ्रेशचे कार्टन आणलेले. तेच पुरवून पुरवून पुरवून वापरायचे... ती स्मशान घाटाची भयानक दृश्यं. आजचा दिवस कसा काढणार मी?”
“अनुरा, एका स्वप्नाने तू का एव्हढी अपसेट झाली आहेस? विसर ते सगळे. आपण असं करूयात का? एखादा भन्नाट पिक्चर बघूया. मन थोडं हलकं होईल.”
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
त्याने वेटरला बोलावले.
“कायरे सरकारने कायदा केला आहे का लोकांनी किती खावे, काय खावे ह्याबद्दल काही कायदा केला आहेका? नाही ना म मला पाच मसाला डोसा आण.” त्याने ऑर्डर दिली नि तो इंग्रजी पेपर घेण्यासाठी हात पुढे करणार... त्याने ताडकन उडी मारली, “हे आत्ता कोण बोललं? हा कोण बोललं?
तो जवळ जवळ ओरडलाच असावा कारण आजूबाजूचे लोकही दचकले होते. एक लहान मूल घाबरून रडायला लागले.
“ती तिथे बसलेली तरुणी ती आपल्या मैत्रिणीला सांगत होती... जी सांगत होती तिचे नाव आहे अनुराधा. जी ऐकत होती ती चंचल. किंवा असेही असेल कि तिचे नाव हे असेल आणि हिचे नाव ते असेल...”
वेटरची ती भंकस ऐकायला तो तिथे थांबला नाही. झपा झप पावलं टाकीत तो बाहेर रस्त्यावर आला.
“ओ मिस, लाल ब्लाउज आणि जीन्स वाली मिस, प्लीज एक मिनिट थांबा.”
त्या दोघी थबकून मागे वळून बघायला लागल्या.
“मिस्टर, तुम्ही पाचव्यांदा हा प्रश्न विचारत आहात. हा काय चावटपणा आहे?”
“आता लॉकडाऊन, मास्क, सहा फूट अंतर... हे कोण बोलत होतं? मिस प्लीज मला जरा डिटेलमध्ये सांगाल का?”
“मी. माझं नाव अनुराधा. मला काल रात्री पडलेलं स्वप्न मी माझ्या मैत्रीणीला सांगत होते. त्याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे? तुम्ही माझ्या काकांच्या ओळखीतले आहात म्हणून नाहीतर...”
“माझा काय संबंध? ते मी नंतर सांगेन. आधी मला ते स्वप्न सांगा.”
“आता मात्र कमाल झाली. दुसऱ्यांच्या खाजगी गोष्टीत नाक का खुपसताय? का बोलवू पोलिसाला?”
एकूण त्या तरुणीला पडलेलं स्वप्न त्याच्या स्वप्नासारखेच असावे असं दिसतंय.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
जगात ६५० कोटी लोक आहेत. त्यांना रोज रात्री स्वप्नं पडत असणार? पण आईसलंड मधल्या एका एस्कीमोला आणि न्यूझीलंड कुणा आदिवासी माओरीला सेम टू सेम स्वप्न पडेल ह्याची काय शक्यता? शक्य आहे पडेलही! पण सेम टू सेम स्वप्न पडलेले दोघे एकाच शहरात दुसऱ्या दिवशी भेटावेत हे आश्चर्य नाही का? स्वप्ने म्हणजे काय? त्या स्वप्नाना अर्थ असतो का? लोकांना रात्री पडलेली स्वप्न सकाळी आठवत नाहीत. तोही विसरला होता. त्याला सकाळी उदासवाणे वाटत होते. पण त्याचा ह्या स्वप्नाशी काही संबंध असावा का.
पण ही गोष्ट अनुराधा आणि तो ह्यापुर्तीच मर्यादित राहिली नव्हती.
त्या संध्याकाळी सायकॉलॉजीस्ट/सायकीअॅस्ट्रिस्ट डॉक्टरांकडे बरेच लोक आले आणि त्यांनी ह्या स्वप्नाबद्दल विचारणा केली. सगळ्याना एकच स्वप्न पडले होते. लॉकडाऊन, मास्क, सहा फूट अंतर. प्राणवायू न मिळाल्याने तडफडून मेलेल्या लोकांची रांगेत रचलेली प्रेतं. नखशिखांत शुभ्र वस्त्रधारी एलिअन सारखे दिसणारे मॉन्सटर!
दुसऱ्या दिवशी सकाळच्या वर्तमानपत्रात एक त्रोटक बातमी आली.
ह्या मल्टीप्लेक्स स्वप्नाचं रहस्य उलगडले नाही.
हळू हळू लोक पुढे येऊन आपआपले अनुभव सांगायला लागले. आता जवळ जवळ सगळ्या जगाला दर रात्री एकच स्वप्न पडत होते. साथीची.
आता हळू हळू स्वप्न पर्सनलाइझ्ड व्हायला लागली. म्हणजे आपल्या सोसायटीतल्या भिडे काकूंना ह्या रोगाची लागण झाली. हे स्वप्न त्या सोसायटीतील सर्व मेंबरना पडले. फक्त त्याच सोसायटीतल्या लोकांना हो. भिडे काकूंना पण पडले. त्या किंचाळत जाग्या झाल्या आणि रडायला लागल्या. त्यांच्या मिस्टरांनी त्याना समजावून सांगितले कि अगं हे स्वप्न होतं. तेव्हा त्या जरा शांत झाल्या. पण रात्रभर त्यांचा डोळ्यास डोळा लागला नाही.
काही लोकांना तर ह्याही पेक्षा भयानक स्वप्नं पडली. काहींनी स्वतःला आयसीयू मध्ये व्हेंटीलेटवर निपचित पडलेले बघितले. पुढील वाक्य लिहिताना मला अतीव मानसिक कष्ट होत आहेत.
काही जणांनी स्वताला मेलेले पाहिले हो. पुढील वर्णन करायला माझी लेखणी धजावत नाही.
ह्या सर्व प्रकारांनी जगात सगळीकडे हाहाःकार माजला. स्वप्नांनी सत्य जगावर आक्रमण करायला सुरवात केली होती. स्वप्न आणि सत्य यातील सीमारेषा पुसट होत चालली होती.
लोक दिवसा झोपायला लागले होते. रात्री झोपायची लोकांना भीती वाटायला लागली.
पण स्वप्ने पिच्छा सोडायला तयार नव्हती. त्यांनी पब्लिकचा डाव ओळखला आणि दिवसा पडायला सुरवात केली. स्वप्नांपासून सुटका नव्हती. दिवसाच्या जगात आणि रात्रीच्या जगातला आता काही फारसा फरक राहिला नव्हता.
लोक आपल्या छायेलाही भिऊ लागले. मी खरा आहे का माझी छाया खरी आहे? असे प्रश्न पडायला लागले. जागृतावस्र्थेतही लोक तोंडाला मास्क लावून लावून फिरायला लागले. उगाच कशाला रिस्क घ्या. सहा फुट दुरीवरून एक दुसऱ्याशी बोलू लागले. कुणीतरी आवई उठवली कि रोग इमेल वरून पसरू शकतो. टेलिफोन वरील संभाषणातून पसरू शकतो. म्हणून लोकांनी वायरलेस माउस वापरायला सुरवात केली.
पुणे विश्व विद्यालयातील प्राध्यापकांनी एक पत्रक जारी केले. त्यांच्या मते
“साथ जनतेच्या मनात आहे. सत्य विश्वात साथ नाहीये. लोक राईचा पर्वत करत आहेत. साधे पडसे खोकला जरी झाला असेल तरी लोक त्याला साथीचा ताप समजायला लागले. ही अत्यंत भयावह परिस्थिती आहे. हा मास हिप्नॉटीझम लोक आपणहून ओढवून घेत आहेत.”
शेवटी त्यांनी एक इशारा दिला.
“लोक मनातून साथ आली आहे असे गृहीत धरत आहेत. आम्हाला तर असे वाटतंय कि लोकाच्या मनात साथ यावी अशी सुप्त इच्छा आहे. ७०० कोटी लोकांच्या सामुहिक सायकि(Psyche) मुळे साथ खरोखर येऊ शकते हा धोका कक्षात घ्या.”
अगदी तसेच झाले.
On the evening of 24 March 2020, the Government of India ordered a nationwide lockdown for 21 days.
आशेचा एकच किरण दिसत होता. स्वप्नाच्या जगात केम्ब्रिजच्या एक संस्थेने रोगावर लस शोधून काढली होती. पुण्याच्या लशी बनवणाऱ्या कंपनीने भारतात ती लस बनविण्याचा मक्ता मिळवला. मग ती टोचून घेण्यासाठी लोकांची ही झुंबड उडाली. लोकांनी स्वप्नात स्वतःला ही लस टोचून घेतली.
एनीवे दोनी साथी अखेर आटोक्यात आल्या. पण आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे कि “साथी” कधीच नष्ट होत नाहीत. “साथीचे जंतू” कुठेतरी मनात वा बाहेर दबा धरून बसलेले असतात. संधीची वाट बघत असतात. परिस्थिती अनुकूल झाली कि उफाळून बाहेर येतात. तेव्हा सावधान!
(संकल्पना आर ए लफार्ते यांच्या Dream World ह्या कथे वरून घेतली आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ! मला butterfly effect ची आठवण झाली.. पण याचा काही संबंध नाही खरं इथे..

The physician Robert Malone claimed that getting vaccinated, or taking other COVID precautions, can be explained by "mass formation psychosis." Why isn't that correct?
What is Mass Formation Psychosis? Is it like Mass Hysteria or Mass Delusion?
https://www.nepsy.com/articles/leading-stories/what-is-mass-formation-ps...
ह्या बद्दल इंटरनेटवर बरीच चर्चा झाली आहे.
ओरिजिनल कथा बरीच निराळी आहे . मी तिला COVID-19 मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आहे.
Mass formation psychosis हा क्वचित घडणारा प्रकार आहे. असा प्रकार हिटलरच्या जर्मनीत घडला. एव्हढे हुशार ज्ञानी लोक तेही याला बळी पडले. सगळ्यांना माहित असलेल्या चलनाची घसरण किंवा बँकांचे दिवाळे वाजणे. इस्लामोफोबिआ ह्यांच्या पाठीमागेही हीच करणे असावीत. जास्त लिहिण्यात अर्थ नाही.
रॉबर्ट आर्थर ह्या गुणी लेखकाने लिहिलेली Believers नावाची कथा आहे. तीही ह्याच विषयावर आहे.