A tale of two Indians (कल्पनाकथा) - भाग ३

Submitted by रायगड on 13 June, 2024 - 01:06

भाग २

यथावकाश मजल-दरमजल करत जहाज सुमारे २.५ महिन्यांनी अमेरिका भुप्रदेशाच्या पूर्व किनाऱ्याला, पटुकसेट इथे इथे लागले. मूळ पटुकसेट नाव असलेल्या असलेल्या या या प्रदेशाला वसाहतवाद्यांनी नविन नाव दिलेले – प्लिमथ! पलिचोबरोबर राजे आणि त्यांच्या लवाजम्याने या नव्या भूमीवर पाय ठेवले. पलिचो अनोको वर्षांनंतर आपल्या लोकांना, जमातीला भेटला.
वाम्पानोऑग (Wampanoag) हे त्याच्या जमातीचे नाव. मॅसॅच्युसेट्स भागाच्या परिसरात त्याकाळी अनेक मूळ रहिवाशीयांच्या जमाती होत्या. वाम्पानोऑग, मॅसॅच्युसेट्स (या जमातीवरूनच वसाहतवाद्यांनी या भागाचं नाव मॅसॅच्युसेट्स ठेवलं ) नॅरँग्नॅंसेट (Narraganset), निपमक (Nipmuc), मोहेगान (Mohegan) - या त्यातील ४-५ प्रमुख जमाती!

बऱ्याच काळाने मायदेशी परतलेला पलिचो स्वतः आपल्या जमातीला, लोकांना भेटण्यात मग्न झाला असला तरी या दूरदेशीच्या पाहुण्यांना काही कमी पडू नये याची तजवीज तो करत होता. पलिचोने या भारत देशातून आलेल्या पाहुण्यांची चांगलीच देखभाल /बडदास्त ठेवली. राजांच्या लवाजम्याने आपले डेरे टाकले. पलिचो आणि त्याच्या साथीदारांच्या मदतीने राजांच्या जमावाकरिता तंबू ठोकले गेले. राजे काही दिवसांकरिता पाहुणे म्हणून आले असले तरी अर्थातच आजूबाजूची परिस्थिती, हा नवा देश, तिथले हे वेगळेच लोक - ते सारं सारं पाहात होते, निरीक्षण करत होते. शंका-कुशंका पालिचोला विचारात होते.

आजूबाजूला तर बरंच काही चालू होतं. हा १६७५- १६७६ चा काळ (शके १५९७). वसाहतीसाठी या नव्या भूमीत पाहिलं जहाज - मेफ्लॉवर आल्याला एव्हाना ५०-५५ वर्षे होऊन गेली होती. वसाहतवाद्यांनी आपले हात-पाय एव्हाना चांगलेच पसरले होते. पण मूळ रहिवासी देखील तितकेच खमके, लढवय्ये होते. पिढ्यानपिढ्या राहिलेली आपली भूमी ते इतक्या सहजासहजी या उपटसुंभांना देऊन टाकणार नव्हते. मोठा धामधूमीचा काळ होता हा. मॅसॅच्युसेट्स भागात असलेल्या या सर्व जमाती फिरंग्याशी लढत होत्या. त्यांच्यात सतत धुमश्चक्री चालू होती.

कुण्या लांबच्या देशीचा असला तरी हा राजा आहे आणि त्यांची भेट आपल्या जमातीतल्या त्यांच्या तोलामोलाच्या प्रमुखाशी करून देणं योग्य - हे जाणून पालिचोने वाम्पानोऑग (Wampanoag) या त्याच्या जमातीच्या प्रमुखाशी (chief) मेटाकॉम याच्याशी करून दिली.
चीफ मेटाकॉम आणि राजे शिवाजी! दोन किती विभिन्न संस्कृती, एकमेकांपासून हजारो योजने दूर असलेल्या दोन प्रदेशातील दोन व्यक्ती! इतक्या दूर असलेल्या एका प्रदेशाचा, तिथल्या लोकांचा एक राजा, दुसऱ्या प्रदेशातल्या एका टोळीच्या म्होरक्याला भेटला. बघायला गेलं तर काहीच सार्धम्य नाही पण तरी किती तरी समांतर पार्श्वभूमी! दोघांच्या भूमीवर परकीयांचे आक्रमण. आपल्या प्रदेशाला जपण्याची, तो कोणा परदेशीयांच्या हाती जाऊ नये याची प्रचंड तळमळ - आपल्या माणसांना गोळा करून या परकीयांच्या आक्रमणाला थोपवण्याची प्रबळ इच्छा आणि निडर छाती. आणि यांना साथ देणारे लोकही तसेच. राजांचे मावळे तसे हे इथले मूळ रहिवासी. रानावनात, दऱ्याखोऱ्यात राहून शत्रूला भिडणारे!! अंतरांचे, भाषेचे, विभिन्न संस्कृतीचे सर्व दुरावे गळून पडले. उरला तो एकच समांतर धागा - मातृभूमीचे रक्षण, तिचे प्राणपणाने जतन.

चीफ मेटाकॉम हे वाम्पानोऑग जमातीचे प्रमुख. वाम्पानोऑग आणि नॅरँगँसेट या दोन जमातींच नेतृत्व ते करत होते. त्यांचे वडील, मासासॉईट हे देखील वाम्पानोऑग जमातीचे प्रमुख होते. मासासॉईटने वसाहतवादी ब्रिटिशांशी मेटाकॉमने सलोख्याचे संबंध राखले होते. वडीलांच्या निधनांनंतर मेटाकॉम वाम्पानोऑग जमातीचा प्रमुख झाले. इंग्रजांशी असलेल्या नजिकच्या संपर्कातून त्यांनी किंग फिलिप हे नावदेखील स्वतःला घेतले होते. मेटाकॉमनेही वसाहतवाद्यांशी बहुतांशी सलोख्याचे संबन्ध ठेवले असले तरी वसाहतवाड्यांच्य एकूण उद्देश आणि मूळ रहिवाश्यांवर ते लादत असलेले जाचक नियम यामुळे ते आणि त्यांची जमात वसाहतवाद्यांवर नाराज देखील होते. यातून त्यांच्या टोळ्या आणि वसाहतवादी यांच्यात गेली अनेको वर्षे धुमश्चक्री चालू होती.

गेली अनेक वर्षे या टोळ्यांनी त्यांच्या विविध कारनाम्यांनी वसाहतवाद्यांना घाबरवून सोडले होते. शत्रूवर अचानक ध्यानी मनी नसताना हल्ला करणे, शत्रू सावध होऊन हल्ला परतवेपर्यंत डोंगर- दर्‍यांतून पार लांब पळून जाणे आणि आता परत हल्ला होणार नाही, असे वसाहतवाद्यांना वाटेपर्यंत उलटून परत हल्ले करणे - हा मार्ग अवलंबून स्थानिक टोळ्यांनी वसाहतवाद्यांना हतबल करून सोडले होते. कधीही हल्ला होऊ शकतो या दहशतीच्या छायेखाली गेले काही काळ या भागातले वसाहतवादी रहात होते. त्यातूनच मेटाकॉमचे त्यांनी केलेले नामकरण होते - Terror of New England. दुभाष्यांकरवी याचा अर्थ जाणून घेतल्यावर राजांच्या चेहेर्‍यावर मिश्कील हसू चमकल्यावाचून राहिले नाही. 'पहाडों का चूहा' हे त्यांना मुघलांनी दिलेले नाव ते जाणून होते आणि हे नावांमधील सार्धम्य बरेच काही सांगून जात होते.
मेटाकॉम शी भेट झाल्यावर राजे आणि मेटाकॉम यांच्यात, शेणवी आणि पलिचो या दुषाष्यांच्या मार्फत, अनेक चर्च्यांच्या फैरी घडू लागल्या. यातून राजांना नवनविन माहिती मिळू लागली. मेटाकॉम - त्यांची टोळी, आजूबाजूच्या जमाती - या सार्‍यांचा स्वतःच्या हक्काची जमीन, हक्क परत मिळावे, परकीयांना हाकलून लावण्या करीता चाललेली युद्ध - सारी माहिती राजे ऐकत होते. त्यांची राहणी, पोशाख, संस्कृती, खाणे-पिणे सारं बघत होते.
राजे इथे पोहोचले त्याच्याआधी सुमारे ६-८ महिने मेटाकॉम,मटांप्व आणि त्यांच्या टोळ्यांनी परत एकदा नव्याने वसाहतवाद्यांशी युद्ध पुकारले होते. या युद्धाचे तात्कालीक कारण होते - वसाहतवाद्यांना फितूर झालेल्या जॉन सासामान या स्थानिक रहिवाश्याच्या खुनाच्या आरोपाखाली ब्रिटिशांनी तीन वाम्पानोऑग जमातीच्या लोकांना फाशी दिले. यामुळे वाम्पानोऑग जमातीत आधीच धुमसत असलेला वसाहतवाद्यांविरुद्धचा असंतोष उफाळून आला आणि त्याचा विस्फोट होऊन मेटाकॉमने वसाहतवाद्यांवर आक्रमणांना सुरुवात केली.
मेटाकॉमच्या नेतृत्वाखाली वाम्पानोऑग जमात, मटांप्वच्या नेतृत्वाखाली निपमंक जमात आणि कॅनॉनचेटच्या नेतृत्वाखाली नॅरॅगॅन्सेट या जमाती वसाहतवादी, त्यांच्या वसाहतींवर, घरांवर हल्ले करून त्यांना हुसकावून लावायचे प्रयत्न करत होते. अनेक चकमकी, लढाया यातून दोन्ही बाजूंची अपरिमित मनुष्यहानी होत होती.मेटाकॉमच्या नेतृत्वाखाली वाम्पानोऑग जमात, मटांप्वच्या नेतृत्वाखाली निपमंक जमात आणि कॅनॉनचेटच्या नेतृत्वाखाली नॅरॅगॅन्सेट या जमाती वसाहतवादी, त्यांच्या वसाहतींवर, घरांवर हल्ले करून त्यांना हुसकावून लावायचे प्रयत्न करत होते. अनेक चकमकी, लढाया यातून दोन्ही बाजूंची अपरिमित मनुष्यहानी झालेली.
पलिचो आणि शेणवीच्या मार्फत जमातीच्या इतर लोकांशीही राजे बोलत, चर्चा करत. राजांच्या लवकरच लक्षात आले - मुघलांशी-परकीयांशी लढताना त्यांनी, त्यांच्या मावळ्यांनी वापरलेल्या कित्येक क्ल्युप्त्या इथल्या जमातींनी वसाहतवाद्यांच्या विरुद्धचा वापरल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी ब्रूक येथे झालेल्या लढाईची* माहिती राजे घेत होते. वसाहतवादी घोडागाड्यांवर सामान, धनधान्य वाहून नेत असताना निपमंक जमातीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवून त्यांना गाफील अवस्थेत गाठून त्यांचे सुमारे शे लोकं मारले होते. राजे ऐकत होते आणि त्यांच्य मनात येत होते - ही तर आपण कित्येक वर्षांपूर्वी कल्याणच्या सुभेदाराला लुटलं त्याचीच आवृत्ती!
कल्याण सुभेदाराला लुटलं ती घटना राजांच्या डोळ्यासमोर तरळून गेली. लुटलेला माल रानातून जाणारे शत्रूचे काबिले, शत्रू गाफील असताना - त्यांच्या वर हल्ला करणे. शत्रूला कल्पनाही येणार नाही अश्या मोक्याच्या जागी त्यांना गाठून चीत करणे आणि ती सगळी लूट काबीज करणे - राजे थरारून गेले! जगाच्या पाठीवर कोठेही असाल तरी मूळ रहिवासी, त्यां त्यांच्या मातृभूमीची जमीन, तिचे (शब्दाश:) खाचखळगे सगळं जाणून असतात आणि परकियांविरुद्ध ही माहिती वापरून गनिमी काव्यानेच अश्या लढाया जिंकता येतात - हे परत एकदा सिद्ध झालं.

kalyan.jpg
प्रताधिकार मुक्त चित्र

काही वेळा प्रमुख मेटाकॉम यानी राजांजवळ मनातली खंत देखील व्यक्त करत... मेटाकॉम सांगत हो ते - घरभेद्यांची कहाणी, वसाहतवाद्यांना सामिल झालेल्या मोहॉक जमातीबद्दल. इंग्रजांच्या बाजूने लढायला येणारे आपलेच भाईबंद! आपलीच लोकं आपल्याच विरूद्ध लढतायंत याचा सल मेटाकॉमच्या मनात होता. अगदी दोनेक महिन्यांपूर्वीच वाम्पानोऑग टोळीच्या छावणीवर, ते बेसावध असताना मोहॉक जमातीच्या टोळीने हल्ला करून २५०-३०० लोकांना ठार मारलं होतं. आपल्याच केसांनी आपला गळा कापल्याचं अनावर दु:ख मेटाकॉमला होतं. स्वकीयच मूळावर उठले तर या परकीयांना कसं परतवावं...मेटाकॉम राजांना विचारता झाला. खेदाने मान हलवत राजे म्हणाले," हा तर आपल्यासारख्यांना लाभलेला शाप आहे, राजे मेटाकॉम!". राजांच्या हृदयातून वेदना पिळवटत गेली, डोळ्यासमोरून नेताजी पालकर यासारखे घरभेदी तरळून गेले, अलिकडेच उठलेल्या आजारपणात फुटलेल्या विषप्रयोगाच्या वावड्यांमध्ये तथ्य असेल का, असा विचार परत एकदा राजांच्या मनात तरळून गेला. राजे वदले, “मेटाकॉमराजे, आम्ही जाणतो तुमचं दु:ख! या दु:खातून वाट काढून मार्गक्रमण करत रहाणे याखेरीज आपल्या सारख्यांकडे पर्याय नसतो! आमच्या आई भवानीचे आशिर्वाद तुमच्याही पाठीशी आहेत!"
आजूबाजूच्या इतर जमातीतल्या टोळ्यांनीही वसाहतवाद्यांवर अनेक हल्ले करून त्यांना वेळोवेळी नेस्तनाबूत केल्याच्या कथा राजांनी ऐकल्या. असे हल्ले झाले की वसाहतवादी - त्यांच्या खास बनवलेल्या मोठ्या घरांमध्ये** पळ काढतात - मेटाकॉम राजांना सांगत होते. - "ही घरं मजबूत, दगडांची बनवलेली असतात..त्या घरांमध्ये स्वतः सुरक्षित राहून हे इंग्रज आपल्यावर बंदूका चालवतात."
"जगदंब! जगदंब! म्हणजे आमचे किल्लेच की! आम्ही शत्रूशी लढण्याकरीता आमचे मजबूत किल्ले म्हणूनच तर बांधले! इथे वसाहतवादी या मजबूत घरांचा वापर किल्ल्यांसारखा करतायंत", राजे स्वतःशीच वदले. इथे चाल उलटी खेळावी लागेल, हे राजांनी मनाशी ताडले. शत्रूला त्यांच्या त्या सुरक्षित कवचातून बाहेर काढणं अशी खेळी इथे खेळावी लागेल. राजे सांगते झाले "मेटाकॉमराजे, या सुरक्षित घरावर आणि त्याच्या भोवती प्रचंड गोंधळ निर्माण करा, शत्रूला पार घाबरवून, गोंधळून सोडा...अश्या चाली करा की बाहेरून कुमक त्यांना वाचवण्याकरीता आलीच पाहिजे...आणि ही कुमक मग नेमकी आपल्या जाळ्यात सापडली पाहिजे, त्यांचा पार बिमोड केला की आपोआप आतल्या लोकांचं मनोबल खच्ची होईल. बाहेरून काही मदत येत नाहीये म्हटल्यावर लवकरच त्यांचा धीर चेपेल.”
मेटाकॉमकडून राजांनी आजूबाजूच्या प्रदेशाची माहिती घेण्यास सुरुवात केली. चित्ररूपाने मेटाकॉम राजांना माहिती देत होते. डोंगर-टेकड्या, दलदलींचे प्रदेश, जंगलं - चीफना सारं-सारं चांगल्याच पद्दतीने माहिती होतं. या माहितीचा उपयोग करून ते आणि राजे - डावपेच आखत होते. एक नविन मोहिम आकारास येऊ लागली. या डावपेचां मध्ये माहिर असलेले हे दोन खेळिये - एकत्र येण्याची सुतराम शक्यता कोणी वर्तवली नसती - ते अजब सॅडबरी या भागात घडत होतं आणि त्याला साक्षीदार होते - राजांची मोजकी लोकं आणि या प्रदेशातील लढवय्ये! स्थळ-संस्कृती-भाषा-जात-धर्म कोणताही अडसर यामध्ये येत नव्हता. होती ती फक्त - शत्रूला सामोरी जाणारी निधडी छाती आणि स्वराज्याची प्रचंड तळमळ!
महाराज बोलत होते “गावाची मुख्य बाजारपेठ, घरं - यावर हल्ला करून - तिथे हाहाकार माजवा... असा अभूतपूर्व गोंधळ घाला, मोठ्या संख्येने हल्ला बोला की परत एकदा शत्रूला बाहेरून कुमक पाठवणे भाग पडेल. आणि लक्षात घ्या..ह्या गोंधळाचा उद्देश फक्त शत्रूला तिथे बोलावून घेणं आहे. आणि एकदा का शत्रूसैन्य बाहेरून आपल्या दिशेने चालून येऊ लागलं की तिथे यायच्या वाटेवर गाफिल शत्रूला गाठून त्यांच्यावर हल्ला करायचा! वाटेतच त्यांच्यावर हल्ला होईल हे त्यांच्या लक्षात येणार नाही...हीच वेळ आपण साधायची." मेटाकॉमही या खेळात माहिर होतेच... त्यांनी वसाहतवाद्यांना सळो की पळो करून सोडले होतेच, 'न्यू इंग्लंड परिसरातला दहशतवादी' अशी त्यांची ख्याती उगीच पसरली नव्हती. त्यांनीही हे डावपेच उचलून धरले.
महाराज, निपमंक जमातीचे प्रमुख – मटांप्व, आणि मेटाकॉमचे स्वतःचे विश्वासू लोकं यांच्याशी तपशीलवार बोलून योजना पक्की झाली. एक निकराचं युद्ध आकारास येत होतं... राजांच्या डोळ्यादेखत, त्यांच्या संगनमताने!
ठरल्या योजने नुसार मटांप्व (निपमंक जमातीचे प्रमुख) आणि मेटाकॉम्प या दोघांच्या नेतृत्वाखाली टोळीतल्या ५०० मूळ रहिवाश्यांनी सॅडबरीवर हल्ला चढवला. मेटाकॉम,मटांप्व आणि त्यांच्या टोळ्यांच्या आक्रमणाची कुणकुण वसाहतवाद्यांना लागलीच आणि मेटाकॉमच्या अंदाजानुसार रातोरात बहुतांश वसाहतवाद्यांनी पळ काढून सॅडबरी मधील सुरक्षित चौकींवर आसरा घेतला. टोळ्यांची टोळधाड चौकींवर पडली. मेटाकॉमच्या सूचनेनुसार जोरदार आक्रमणाला सुरुवात झाली. "शत्रूची दिशाभूल करा, त्यांना हूल द्या, त्यांच्या छावणीत गोंधळ माजवा!" - आपल्या प्रमुखांनी आखलेल्या योजनेनुसार फौजेनी एका घोडागाडीला - घोडे न जोडता - गाडीत गवत, पालापाचोळा लावून पेटवून चौकीसमोरच्या उतारावरून ढकलून दिली.

war3.jpg
By Unknown/Contributed to Alamy by North Wind Picture Archives - Public Domain

जास्तीत जास्त गोंधळ माजवून शत्रूला हैराण करणे - हा उद्देश! अश्या अनेक गोंधळातून हाहाकार माजवून देण्याचं काम फौजा पार पाडत होत्या, दहशत निर्माण करत होत्या. आणि याचा परिणार व्हायचा तोच झाला. या खडाजंगीला उत्तर म्हणून जवळच्या गावांमधून वसाहतवादी इंग्रज नागरीक बाहेर पडून फौजांवर हल्ले करण्याकरीता येऊ लागले. याची कल्पना असलेल्याने, त्यांचा समाचार घेण्याकरीता टोळ्या मोक्याच्या जागा साधून बसलेलेच होते...योग्य जागा, योग्य वेळ बघून या हल्लेकर्‍यांवर मारे करून त्यांना मारण्याचं, घायाळ करण्याचं काम मेटाकॉम आणि मटांप्वचे लोक करत होते.
योजनेनुसार मूळ रहिवाश्यांच्या रोजच्या पायाखालच्या प्रदेशातल्या टेकड्यांवर लपून, गोर्‍यांना हूल देऊन खालच्या भूभागावर यायला भाग पाडून त्यांना बाणांनी, शस्त्रात्रांनी टिपणं - हा गनिमी कावा यशस्वी होत होता. 'पहाडों का चूहा' आणि 'टेरर ऑफ न्यू इंग्लंड' यांनी मिळून आखलेले डावपेच - वसाहतवादी इंग्रजांना भारी जात होते.
war2.jpgचित्रस्त्रोत

एकंदरीत चढाईचा रागरंग पाहून वसाहतवाद्यांनी कॅप्टन सॅम्युएल वॉर्ड्वर्थ या अधिकार्‍याला मूळ रहिवाश्यांचा बीमोड करण्यास पाठवलं. आपल्या बरोबर सैन्य घेऊन कॅप्टन सॅम्युएल वॉर्ड्वर्थ सॅडबरीच्या दिशेने निघाला. न थांबता, उसंत न घेता तो आणि त्याचे सैन्य सॅडबरीकडे कूच करू लागले. जंगलातून मार्गक्रमण करत असता अचानक त्यांना टोळीचे काही लोक जंगलातून पळ काढताना दिसले. आपल्याला बघून पळ काढणार्‍या या टोळीचा पाठलाग करत कॅप्टन सॅम्युएल वॉर्ड्वर्थचे लोक त्यांच्यामागे दाट जंगलात घुसले. जंगलातून मार्ग काढत डोंगराळ भागात ते पोहोचले. आणि एकाएकी सारे चित्र पालटले. पाठ दाखवून पळणार्‍या टोळीने एकदम पलटी घेऊन लढण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर थोड्या संख्येने असलेल्या त्या टोळीला बघता बघता वरच्या टेकड्यांवरील जंगलातून शेकडो लढवय्ये सामिल झाले. प्रचंड हाताघाईला सुरुवात झाली. टेकड्यांवरून बाण आणि गोळ्या येऊन वॉर्ड्वर्थ च्या सैन्याचा वेध घेऊन लागले. निबीड अरण्यात पळणं पण मुश्किल आणि उलटा गोळीबार करावा तर वरच्या दिशेला टेकड्यांवर असलेल्या टोळ्यांवर गोळ्यांच्या निशाणी पण धड लागेना अश्या पेचात वसाहतवादी सैनिक पडले. इंग्रजांचे घोडदळ देखील मागून आले पण त्यांचाही पाडाव करण्यात आला. पण आता मेटाकॉम आणि मटांप्व यांना महाराजांचा सल्ला आठवत होता. "छोट्या विजयांचा उन्माद बाळगू नका. शत्रूदेखील परतून मोठी चाल करू शकतो हे ध्यानात राखा. वेळीच स्वतःला आवर घालता येणे आणि नुकसान टाळणे हे देखील युद्धात तितकेच महत्वाचे आहे. गाफिल न रहाता शत्रूची पुढची चाल काय होईल याचा विचार करणे, अंदाज घेणे - हे फार महत्वाचे आहे."

war.jpg
प्रताधिकार मुक्त चित्र

मेटाकॉम आणि मटांप्व यांनी सल्लामसलत करून, इंग्रजांची अजून कुमक येण्याची शक्यता नाकारता येत नाही - असा विचार करून त्यांनी अजून एक वेगळीच चाल आखली. अरण्यातला पालापाचोळा पेटवून देऊन त्यांनी इंग्रजांची आणखीन नाकेबंदी केली. कॅप्टन वॉर्ड्वर्थ चे बरेचसे सैन्य या हल्ल्यात दगावले. प्रत्यक्ष कॅप्टन वॉर्ड्वर्थ हा देखील यातून वाचू शकला नाही. टोळीचेही बरेच लोक यात कामी आले. पण एकंदरीत टोळीचा विजय झाला होता. ठरलेलया योजनेनुसार सारे काही पार पडले होते आणि वसाहतवाद्यांनी माघार घेतली होती, नव्हे त्यांचा पूर्ण पराभव झाला होता.
दोन्ही विजयी प्रमुख - मेटाकॉम आणि मटांप्व - आपल्या उरलेल्या लोकांसहित रात्री आपल्या तळावर पोहोचले. रात्री मेटाकॉम आणि मटांप्व यांच्याबरोबर राजेदेखील छावणीत फेरफटका मारण्यास गेले - जखमींची हालहवाल बघण्यास गेले. धारातिर्थी पडलेल्या सैनिकांबद्दल मेटाकॉम,मटांप्व आणि राजे दु:खी झाले. स्वराज्याकरीता धारातिर्थी पडलेले ते शूरवीर...त्यांना बघतानी राजांना त्यांच्यात परत एकदा - प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे अशी त्यांची अनेक गमावलेली रत्ने आठवून गेली. "मेटाकॉम राजे, आहुती घेतल्याखेरीज रणभूमी प्रसन्नच होत नाही!" राजे स्वतःशीच पुटपुटत होते.
राजांना आता अमेरिकेत येऊन २ महिने उलटले होते तर मायदेश सोडून ९-१० महिने होऊन गेलेले. आपल्या मुलुखात, घरी परतण्याकरीता राजे आणि सारा लवाजमा आतूर झाला होता. परतीचा प्रवास जवळपास ६ महिन्यांचा असेल याचीही कल्पना होती. पालिचो याने राजांना आणण्याची जशी योग्य सोय केली होती, तसाच परतीचा देखील बंदोबस्त केला होता. पोर्तुगीज वसाहतवाद्यांचे एक जहाज चीन प्रदेशी जाण्यास लवकरच निघणार होते. राजे आणि त्यांच्या लवाजम्याची त्यात सोय करण्याची बोलणी पालिचोने केली होती. राजांची योग्य बडदास्त ठेऊन, त्यांना मुंबई बंदरात सुरक्षितपणे पोहोचवण्याची हमी पोर्तुगीजांनी घेतली.
जवळपास दोन महिन्यांच्या वास्तव्यानंतर मेटाकॉमचा, त्याच्या लोकांचा निरोप घेऊन राजे निघाले. आई भवानी तुमच्या-आमच्या कार्यात आपल्याला यश देत राहो - राजे निरोप घेताना म्हणाले. या वेगळ्या जगाचा, या निराळ्या लोकांचा निरोप घेऊन राजे जहाजावर चढले. जहाजाने बंदर सोडलं...जहाजाच्या भोंग्याच्या आवाजा हर हर महादेव या गर्जना देखील मिसळल्या!
आणि इतिहासाच्या पानावर नोंदली गेली A tale of two Indians!

Shivaji.jpgKp.jpg
समाप्त

तळटीपा:
१ . ही कथा १६७५-७६ या कालखंडात न्यू इंग्लंड परिसरात चीफ मेटाकॉमच्या नेतॄत्वाखाली native Indians नी दिलेला इंग्रज वसाहतवाद्यांना लढा जो King Philip’s War म्हणून ओळखला जातो - त्यातील "सॅडबरी फाईट" या घटनेवर आधारित आहे.
२. कथेतील पलिचो ही काल्पनिक व्यक्ती १५७६ मध्ये मार्टीन फ्रॉबिशर या इंग्लिश एक्स्प्लोरर ने कॅनडातून पकडून आणलेल्या कलिचो या इन्यूईट ट्राईबच्या माणसावरून बेतलेली आहे. Native Americans in England या लेखात म्हटल्यानुसार १५०० ते १७७५ या काळात सुमारे १७५ नेटिव्हज इंग्लंडला गेले होते - काही स्वखुशीने तर बरेचसे - बळजबरीने - गुलाम वा इतर कारणाने. १६२० साली मेफ्लॉवर हे वसाहतवाद्यांचं जहाज अमेरिकेच्या किनार्‍याला लागलं तेव्हा त्यांच स्वागत Wampanoag जमातीच्या लोकांनी केलं. त्या Wampanoag लोकांमध्ये स्क्वांटो नावाचा इंडियन होता - जो इंग्लिश बोलू शकत होता. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार - १६१४ मध्ये English ship captain on a fishing and trade expedition kidnapped Squanto and about 20 other Wampanoag men and took them to Spain to sell as slaves. With the help of Catholic friars, Squanto escaped to England. Several years later, he made his way home to the new colony of Massachusetts, where he played an important role mediating between the colonists and the local Wampanoag Nation.
३. *ब्रूक येथील लढाई (Battle of Bloody Brook)
४. ** कथेमध्ये उल्लेखलेली : "हल्ले झाले की वसाहतवादी - त्यांच्या खास बनवलेल्या मोठ्या घरांमध्ये** पळ काढतात" - ही खास मोठी घरं म्हणजे - garrison houses. https://en.wikipedia.org/wiki/Garrison_(architecture)
५. राजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या हेन्री ऑक्झेंडेनची माहिती इथे मिळेल.
६. कथेत उल्लेखलेले इंग्लिश बोलू शकणारे दुभाषे - शेणवी लोकं हे त्याकाळी इंग्रजांनी त्यांना स्थानिक लोकांशी बोलता यावं म्हणून इंग्लिश शिकवून, कंपनीच्या कामी नेमलेली लोकं होती. नारायण शेणवी हे एक प्रमुख नाव आहे.

Group content visibility: 
Use group defaults

खूप मस्त आहे ही लेखमाला. अभ्यास जाणवतो.प्रताधिकार मुक्त चित्र वापरण्यात जाणीव जाणवते(मला आता znmd मधल्या सिनोरिता गाण्यानंतर सारखं कोणीतरी 'अरे यार, अब तू प्लिज ये जाणवतं जाणवतं कहना बंद कर दे!' ओरडणार आहे Happy )

चांगला प्रयत्न केलाय. वाचायला आवडली.

वैयक्तिक रित्या मला राजांनी इंग्लंड ला जाण्याचीकेलेली तयारी नि इंग्लंड मधून केलेली सुटका ह्यावर विस्तार वाचायला आवडला असता.

खूप दिवसांनी काही तजेलदार सकस कल्पना विलास वाचायला मिळाला . याच प्रकारात आणखीन फॅन फिक्शन्स वाचायला आवडतील