इल्जाम - मैं आया तेरे लिए! (संपूर्ण)

Submitted by rmd on 6 August, 2024 - 23:40

काही दिवसांपूर्वी माझ्या गंडलेल्या यूट्यूब अल्गोरिदमने मला 'मैं आया तेरे लिए' गाणं दाखवायचा कट रचला. त्यातली गोविंदाची जीवतोड सुराफेक पाहून हा पिक्चर पहायची मला सुपर हुक्की आली. त्यामुळे मैं (रिव्ह्यू) लाया तेरे लिए! Proud

८०ज मधल्या पिक्चर्सची काही व्यवच्छेदक लक्षणं आहेत - उदा: बहेन की शादी के लिए दहेज, गुंडांच्या अड्ड्यावर बांधून घातलेल्या हिरोचा छळ, आणि अनिता राज! इल्जाम या पिक्चरमधे ती अगदी ठासून भरलेली आहेत.

सुरूवातीलाच सप्रू आणि गँग ठरवते की आज आपण शिवाजी रोडवरच्या घरांमधे चोर्‍या करायच्या. त्यासाठी त्यांनी एक मनोरंजक मार्ग शोधला आहे. गोविंदा उर्फ अजय रस्त्यावर नाच करणार म्हणजे लोकं तो नाच बघायला जातील आणि हे घराघरांत चोर्‍या करणार. यानंतर एकदम एक झिकझॅक दिवे असलेला मोठ्ठा परेड फ्लोट दिसतो. त्यावर काही मुलंमुली नाचत असतात. ही कुठून आली माहिती नाही. सुरूवातीला दाखवलेल्या गँगमधे नव्हती. अजय रस्त्यावर नाचत असतो, कारण तो 'स्ट्रीट डॅन्सर' आहे. अजय रस्ता, बाग, बार आणि सरतेशेवटी फ्लोटवर असं सगळीकडे नाचतो. त्याचे साथीदार घरातल्या तिजोर्‍यांबरोबरच लोकांच्या गळ्यातल्या, हातातल्या चेन्स, घड्याळं अश्या भुरट्या चोर्‍यापण करत राहतात. फ्लोटवर एवढे झिकझॅक दिवे लावायला किती जनरेटर लागले असतील? मग एका घरात सप्रूगँग चोरी करायला घुसते तर तिथला म्हातारा म्हणतो हे पैसे न्यायचे असतील तर मला आणि माझ्या मुलीला पण मारून टाका कारण हे पैसे तिच्या दहेजसाठी आहेत ( इथेही दहेज प्रॉब्लेम! ). तर अजय गँगला अडवतो. म्हणतो मी अनाथ असलो तरी मी दहेज किलिंग केसेस पाहिल्या आहेत तस्मात हे पैसे नाही घ्यायचे. अरे, हा बाहेर नाचायचं काम करत असतो ना? आत कसा आणि कशाला आला? मग मारामारी. पोलिस. पळापळ. अजय ज्या खिडकीतून पळायला पाहतो त्या गल्लीत तडफदार पोलिस रमेश देव असतो. मग पाठलाग. एका पॉईंटला अजय एका कारजवळून जातो. त्यात असते नीलम. ती त्याला पाहून हर्षभरित होते. पण तो तोंड चुकवून निघून जातो. आता पिक्चरचं नाव इल्जाम आहे म्हटल्यावर अजयवरच कसलातरी इल्जाम असणार आणि पुढे कुठेतरी तो 'महेश से मुन्ना' कसा बनला याचा फ्लॅशबॅक पण असणार हे आपल्या लक्षात येतं.

नीलम उर्फ आरती डॅडी प्रेम चोप्राकडे जाते आणि म्हणते मला मिठाई वाटायची आहे कारण मला 'अजे' सापडला आहे. प्रेमडॅडी म्हणतो "त्याला विसर, तो धोकेबाज आहे. मी तुमची धुमधामसे सगाई करून देणार होतो ( हो? प्रेम चोप्रा?? प्रेमळ??? ) तर अजय आलाच नाही आणि त्यामुळे तुझ्या नावाला कलंक लागला. आता मी इथून मुंबईला बिझनेस शिफ्ट करणार ( कसलं सोप्पं आहे ना हे?)". अर्थातच इकडे रमेश देव वरिष्ठांना रिपोर्ट करत असतो की अजय मुंबईच्या ट्रेनमधे चढला. वरिष्ठ म्हणतो ओक्के, तू मुंबईला जा, तिथले आयजी तुला मदत करतील. डायरेक्ट आयजी च? अधेमधे काही हुद्देच नाहीत की काय मुंबई पोलिसांकडे? आयजीच्या जीवावर बायजी उदार यालाच म्हणत असावेत.

इकडे मुंबईत आयजी शशी कपूर धावतपळत घरी येतो. त्याचा सतीश बेटा १ वर्ष लंडन मधे शिकून आजच परत आलेला असतो. राजकिरण उर्फ सतीश निवांत दारूची बाटली तोंडाला लावत असतो. वडिलांचा आवाज ऐकून तो चाचपतो, बाटली बॅगेत टाकतो आणि त्याच बॅगेतून पर्फ्यूमची बाटली काढून ते अंगावर उडवतो. मला या सिक्वेन्सचा अर्थच लागला नाही. पर्फ्यूम निदान तोंडात तरी मारायचं, अंगावर मारून काय होणार? त्यांच्या गप्पांमधून हे समजतं की आयजी खानदानी श्रीमंत आहे आणि त्या खानदानात सगळे पोलिस आहेत. तर सतीशने पण पोलिस होणं गरजेचं आहे. पण सतीशला थोडे दिवस आजाद जिंदगी हवीये कारण तो शिकून दमलाय. आयजीबाबा त्याला नवीन गाडी गिफ्ट करतात.

सतीशच्या आजादीची व्याख्या आपल्याला लगेच समजते कारण तो एका सुनसान रस्त्यावर एका मुलीला लिफ्ट देतो. तो तिला सांगतो मी शरीफ आहे. गाडीत बदतमीजी. पोरगी गाडीतून उडी मारून पळायला लागते. सतीश तिला धरतो. नेमका त्याच जागी एका बाकावर अजय झोपलेला असतो. त्यामुळे आता मुलीला वाचवणं आणि मारामारी आलीच. मग अजय तिला उपदेश करतो की असा कोणावर विश्वास ठेवत जाऊ नकोस आणि तिला घरी सोडायला जातो. मुलगी लगेच त्याला भय्या वगैरे बनवते. तो अनाथ आहे हे कळल्यावर मुलीची आई त्याला मुलगा मानते आणि घरीच ठेवून घेते. ते विश्वास ठेवायचा नसतो वगैरे विसरले वाटतं सगळे. अजय त्यांना स्वतःचं नाव विजय आहे असं सांगतो. रात्री अजयला रमेश देव स्वप्नात दिसतो आणि त्याचं अंतर्मन त्याला सांगतं तू चोर, खुनी इ.इ. आहेस म्हणून तू इथून गुपचूप पळून जा. तो जाणार तर दारातच त्याला मुलीचा मोठा भाऊ शत्रुघ्न उर्फ इन्स्पेक्टर सूरज भेटतो. सूरज त्याला चोर समजून बडवतो पण मग बहिणीचा किस्सा समजल्यावर सूरजपण त्याला छोटा भाई बनवून मोकळा होतो आणि सांगतो यापुढे असं घर सोडून नाही हं जायचं. यांना बाकीचे नातेवाईक नाहीत का? अजय म्हणतो तू धक्के मारून बाहेर काढल्याशिवाय नाही जाणार. ( हा क्लू की काय? )

सूरज इमानदार आहे. इतका की तो सिग्नलला उभा असताना एक बाईकवाला वेगात सिग्नल तोडून जातो म्हणून हा पण लगेच सिग्नल तोडून पाठलाग करतो. तर ती निघते अनिता राज. ती म्हणते मला वडीलांना हे इंजेक्शन १० मिनिटांच्या आत पोहोचवायचं आहे नाहीतर ते वर पोहोचतील. मग तोच तिला घेऊन तिच्या घरी जातो तर हे सगळं खरं निघतं. सूरज वितळतो आणि तिला माफ करतो.

सूरज आयजीला रिपोर्ट करतो. जो उठतो तो आयजीकडेच येतो फक्त. आयजी त्याला डॉकवरून विदेशी केमिकल्स चोरली जाताहेत त्याच्या तपासावर जायला सांगतो. भरीसभर म्हणून पुण्याहून आलेल्या एका इन्स्पेक्टर यादवला मदत करण्याचं काम पण त्याच्या गळ्यात घालतो. म्हणजे कोण? तर रमेश देव ( म्हणजे सुरूवातीचा तो फ्लोट पुण्याच्या शिवाजी रोडवर चालत होता??? ). यादव सूरजचा मित्र निघतो आणि सूरज त्याला घरी घेऊन जातो. अजयची पंचाईत. तो लगेच साबणाच्या फेसात तोंड लपवतो.

अजय एका डान्सिंग स्कूल मधे जॉबसाठी विचारायला जातो तर तिथे त्याला भेटते आरती. ती म्हणे हा कधीतरी नाचताना सापडेल या आशेवर असल्या डान्सिंग स्कूल्सना डोनेशन्स देत फिरत असते. अजय आरतीला म्हणतो मी विजय आहे आणि मी तुला ओळखत नाही. अजयसोबत त्याची नवनिर्वाचित बहिण लक्ष्मी असते. ती हिला घरचा पत्ता देऊन घरी बोलावते की माझा इन्स्पेक्टर भाऊ तुला मदत करेल. भेटेल त्याला घरी घेऊन जाते की काय पोरगी? आरती दु:खी झाल्यामुळे फ्लॅशबॅकमधे जाते. फ्लॅशबॅकमधे अजय तिला डान्स शिकवत असतो. ती त्याच्याकडे मादक वगैरे कटाक्ष टाकत असते. मग अजय तिला म्हणतो की आता मी तुला अश्या स्टेप्स शिकवणारे ज्या खूप कमी लोकं करू शकतात. ती म्हणते मग आत्तापर्यंत का नाही शिकवल्या. तर म्हणे आता तुझ्यात तो कॉन्फिडन्स आलाय. अजय असतो चावट. तो एकटाच नाचायला लागतो आणि त्याच्या स्टेप्स भलतीकडेच जायला लागतात. या स्टेप्स फालतू आहेत हे लक्षात आल्याने ती त्याच्याबरोबर गाणं म्हणते. गाणं संपल्यावर ती त्याला सांगते माझ्या बाबांनी उद्या तुला घरी भेटायला बोलावलं आहे. तो भेटायला जातो तर प्रेमडॅडी नेहमीप्रमाणे अजयला खरीदना चाहता है. साहजिकच अजय म्हणतो कागज के चेकोंसे दिलोंके बँक कॅश नही हुआ करते. आरती येते आणि म्हणते मी तुझ्यासोबत निघून येते. तर तो डॅडीला सांगतो की हिला माझी अमानत समजा आणि मी आता भरपूर पैसा कमवूनच हिला न्यायला येईन. डॅडी म्हणतो, पोरांनो जिंकलात! मीच तुमची सगाई करून देतो उद्या. दुसर्‍या दिवशी सगाईचा हॉल छान क्रेप पेपरच्या झिरमिळ्यांनी सजवलेला असतो, झुंबराला फुगे टांगलेले असतात. जमलेली लोकं बहुधा 'हॅप्पी बड्डे' म्हणायच्या तयारीत असतात. पण अजय सगाई करायला येत नाही. फ्लॅशबॅक संपतो. आरती तीन लाख डोनेशन कबूल करून त्याच डान्सिंग स्कूलला एक कॉम्पिटिशन आयोजित करायला सांगते. त्यासाठी प्रेमडॅडी कडे कॅश मागते तर तो म्हणतो मी एक इज्जतदार इमानदार शरीफ बिझनेसमन आहे, ( सिरिअसली? प्रेम चोप्रा? पण ते असो. ) माझ्याकडे इतकी कॅश नाही. तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि कॅशका इंतजाम झाला असं तो तिला सांगतो.

आपला प्रेम चोप्रा बद्दलचा संशय खरा ठरतो. सुधीर आणि मॅकमोहन प्रेमडॅडी उर्फ सेठ धनराजला बॅगभरून दागिने देतात. वाणसामानाची यादी सांगावी तसं सांगतात की ही क्लबकी इन्कम, हे जोहरीच्या दुकानातून लुटलेले दागिने आणि तो बँक रॉबरीवाला पैसा संध्याकाळपर्यंत येईल. धनराज म्हणतो चला आता डॉकवरून ती केमिकल्स उचला. काय रेंज आहे चोरीची!

डॉकवरची चोरी काही सफल होत नाही कारण सूरज येऊन सगळ्याचा सत्यानाश करतो आणि केमिकल्स भरलेला ट्रक पोलिस चौकीवर घेऊन जातो. धनराज हवालदिल. त्याचा क्लबमधला मित्र असतो आयजी. तो आयजीला घोळात घेऊन आपला ट्रक सोडवू पाहतो पण आयजी पडला इमानदार आणि सख्त! तर बाहेरच धनराजला गाठतो सतीश. म्हणतो मी तुझा अडकलेला माल सोडवून देतो मला तुझा पार्टनर बनव. तो लंडनमधून आल्यापासून या असल्याच माहित्या काढत फिरत असतो म्हणे. तिकडे काय शिकायला गेलेला असतो कोण जाणे! तर धनराज त्याला त्याच्या साथीदारांना भेटवतो. त्यात सुधीर, मॅकमोहन आणि अनिता राज उर्फ कमल पण असते. कमल त्यांच्या क्लबात नाचगाणी पण करत असते. आजादीचा भोक्ता सतीश लगेच कमलवर लट्टू होतो. धनराज विचारतो बिझनेस कसा वाटला तर सतीश म्हणतो अतिसामान्य! तुम्ही लोक अगदीच फालतू चोर्‍या करताय. यात मजा नाय! आपण काहीतरी मोठं काम करू. धनराज त्याला कमलचा शो दाखवायला नेतो आणि एका टेबलापाशी मोठ्या चवीने कमलचा शो पहात बसलेल्या एका कन्येच्या हवाली करतो. कन्या त्याला स्वतःजवळच्या बाटलीतून रंगीत पाणी ग्लासात ओतून देते. पण सतीशला बाहेरची दारू पचत नसल्याने तो स्वतःकडच्या चपट्या बाटलीतूनच पिणं प्रेफर करतो. शो मधे एकाच वेळी स्टेजवर फॅन्सी ग्रामकन्यांच्या वेषातल्या बायका, पानांचे झगे घातलेले आदिवासी वगैरे वाटणारे पुरूष आणि बॉडी बिल्डर्स असे सगळे असतात. कमल एक चाल, यमक नसलेलं गाणं म्हणत असते ज्याचे बोल आहेत 'द द दै द दै द दै प्यार हो गया'. शो मधे कमलला आशाळभूत नजरेने न्याहाळून झाल्यावर सतीश शो झाल्यावर तिच्या रूममधे जातो आणि झोंबाझोंबी करायला लागतो. याला बहुतेक या एकाच 'कामा'साठी घेतलं आहे पिक्चरात. पण तेवढ्यात येतो सूरज. ती वाचतेच पण सूरज त्यालाही पकडत नाही कारण तो आयजीपुत्र आहे आणि आयजी देवतासमान वगैरे असतो म्हणे त्याला. सूरज आणि कमल गेल्यावर धनराज येऊन म्हणतो की ही कमल काम की लडकी आहे उगाच तिच्यावर जबरदस्ती करू नकोस, तू या सूरजच्या मागे लाग कसा. हे सूरज नाव बाकी स्ट्रॅटेजिक ठेवलं आहे. सूरज को ग्रहण, सूरज उन अंधेरोंको दूर नही कर सकता जिनमें ..इ.इ. असल्या यूज केसेस आहेत यात. तीच गोष्ट कमलची. कमल किचडमें रहता है मगर अमुकतमुक असल्या डायलॉग्जची पण पिंक आहे.

सूरज आयजीपुत्र असल्याचा फायदा घेऊन शिताफीने पोलिस चौकीतून धनराजचा ट्रक पळवतो. अर्थातच आयजी सूरजला झाड झाड झाडतो. त्याच्यावर अगदी लाचखोरीचा आरोपसुद्धा करतो. सूरज म्हणतो अरे येड्या, ट्रक तुझ्या मुलानेच पळवलाय. पण आयजीला मुलगा गुणाचा वाटत असल्याने तो ते मान्य करत नाही. सूरज म्हणतो आत्तापर्यंत मी फक्त सूरजके हैसियतसे बोलत होतो, आता पोलिस ऑफीसरके हैसियतसे तुझ्या मुलाची एक फाईल करूनच तुझ्या समोर आणतो. मग आत्तापर्यंत कसली वाट पहात होता?

सतीश धनराजच्या घरी जातो. तिथे त्याला आरती दिसते. तो न्याहाळकुमार असल्याने तिच्याकडेही हावर्‍या नजरेने पाहून घेतो. ती म्हणते 'हॅलो, मै आरती' तर त्यावर तो म्हणतो 'उतारे जाने की काबिल है'. असले डायलॉग्ज ऐकून क्षणभर धनराज पण भंजाळतो. सतीश डायरेक्ट आरतीचा हात मागून मोकळा होतो. इकडे आरती अजयच्या घरी जाते आणि त्याला त्या कॉम्पिटिशनबद्दल सांगते. म्हणते तू ते तीन लाख जिंक म्हणजे आपल्याला लग्न करता येईल. अगं बाई, त्याला विचार तरी की तो आधी निघून का गेला होता? त्याला लग्न करायचंय का अजूनही? तो म्हणतो मी विजय आहे आणि मला बायकापोरं आहेत. बरं आता खोटं बोलताना आजूबाजूला बघावं की नाही? हे सगळं त्याची बहिण ऐकते आणि आरती गेल्यावर त्याला कसमबिसम देते. त्यावर तो म्हणतो हे सगळं आरतीच्याच भल्यासाठी आहे. किती तो सस्पेन्स! तेवढ्यात येते आई आणि म्हणते लक्ष्मीचा लहानपणीच रिश्ता तय झाला होता तर आता बार उडवून टाकू. तिचा होणारा सासरा म्हणतो मला १०० तोळे सोनं, १०-१२ किलो चांदी, मारूती व्हॅन, २७ इंची कलर टिव्ही, नॅशनलचा व्हिसीआर द्या आणि ते जमत नसेल तर २ लाख रुपये द्या ( पिक्चर १९८६ चा. तेव्हा या सगळ्या गोष्टींना किती रुपये लागत होते? आणि ते जमलं नाही तर २ लाख द्यायचे हा आकडा सासरे बुवांनी कुठून काढला? अजूनही माझं कॅल्क्युलेशन पूर्ण झालं नाहीये. ). बोलणी करायला गेलेले दोन्ही भाऊ हात हलवत परत येतात. बहिण रडते. आता कॉम्पिटिशनला पर्यायच नाय!

-----------------------------------------------------------------

कॉम्पिटिशनचं स्वरूप नेमकं समजलं नाही. कारण एकच गाणं होतं ज्यात आरतीच नाचते. ते गाणं तिचं आणि अजयचं थीम साँग असतं. अजय दु:खी. न्याहाळकुमार इन हावरा मोड. शेवटी खूप वेळ नाचू न दिल्याने असह्य होऊन अजय स्टेजवर जातो आणि तिच्यासोबत नाचतो. न्याहाळकुमार मधून धूर निघायला लागतो. गाणं संपल्यावर आजचा विजेता म्हणून डायरेक्ट विजयचं नाव घोषित होतं आणि त्याला नकद तीन लाख बॅगेत भरून देतात. आरतीला वाटतं आता हे पैसे तो आपल्या वडिलांना देईल आणि आपल्याशी लग्न करेल. त्याला खुद्दार वगैरे ठरवायचा हा प्लॅन भारी आहे बाकी. तिनेच वडिलांकडून पैसे घेऊन आयोजित केलेली स्पर्धा आणि बक्षीस, आणि ते पैसे पुन्हा तिच्याच वडिलांना मिळणार. अगदी घरका पैसा घरमें रहे वाली सिच्युएशन. पण तसं होत नाही. तो बहेनका दहेज वगैरे सांगून तिला टाटा करतो. शो संपल्यावर सगळी माणसं अदृश्य झाली असावीत कारण तो इमारतीतून बाहेर पडताना सगळं सुनसान झालेलं असतं. तेवढ्यात समोरून सप्रूगँग येऊन त्याचे खूप फोटो काढते. मुद्दा असा की त्याने ती पैशांची बॅग त्यांना द्यावी नाहीतर ते फोटो पेपरात छापून आणतील म्हणजे पोलिस त्याला ट्रॅक करतील. पण प्रश्न दहेजचा असल्याने अजय सगळ्यांना भरपूर बदडतो आणि बाहेर पडतो.

इथे मधेच एक सतीश-आरतीचा सीन आहे. तो तिला म्हणतो मला लग्नासाठी होकार दे. मेरा नाम सतीश है, जो चीज मुझे पसंद आती है उसे हासिल करके रहता हूं. त्यावर ती म्हणते मेरा नामभी आरती है, जिनके हाथ पवित्र होते है उन्हीके हाथ लगती हूं. हे असे डायलॉग ऐकून माझे कान धन्य धन्य झाले. असो. आता सतीशला अजयचा काटा काढणं गरजेचं होतं. इकडे अजय बहेनका दहेज तिच्या त्या लोभी सासर्‍याला एकदाचा नेऊन देतो.

सतीशने पोलिस चौकीतून ज्या ड्रायव्हरच्या मदतीने ट्रक पळवलेला असतो तो धनराजच्या कंपनीत कामाला असतो. त्याला शोधत सूरज कंपनीत येतो तर त्याला धनराज भेटतो. आपल्याकडची सगळी डिटेल्स व्हिलनला सांगणं कंपल्सरी असल्यामुळे सूरज त्याला सांगून टाकतो की तो रहीम खान नामक एका ड्रायव्हरला शोधतो आहे आणि तो सापडला की आपसूकच या ट्रक पळवल्याचा सबूत मिळेल.

सूरजला कमल आवाज बदलून फोन करते आणि सांगते की तुला हवा असलेल्या ड्रायव्हरला पळवून नेलंय आणि मारून टाकणार आहेत. लोकेशन पण सांगते. मग काय! सूरजला मारामारीचा चान्सही मिळतो आणि ड्रायव्हरसुद्धा. ड्रायव्हरला तुरूंगात टाकतात. त्याला कोणीही भेटू नये असं सांगून ठेवलेलं असतं. तर त्याला भेटायला एक बुरखेवाली येते आणि म्हणते मी त्याची बायको आहे आणि मी त्याला सांगते पोलिसांना सगळं खरं खरं सांग. त्याला कोणीही भेटता कामा नये असं बजावलेलं असल्यामुळे लगेच ड्यूटीचा पोलिस तिला आत सोडतो. ड्रायव्हर आत डिटेलवारी बयान लिहीत असतो आणि ते आपल्याला कळावं म्हणून मोठ्याने वाचतही असतो. बाई त्याला गोळी मारून निघून जाते. ड्रायव्हरला अचानक इमान वगैरेची जाणीव होते आणि लिहील्या बयानवर तो सही ठोकतो. हे ही बहुधा एक ८०ज च्या पिक्चरांचं लक्षण होतं. एखादा मुसलमान माणूस असणार आणि तो हिरोसाठी / सच के लिए / इमान के लिए वगैरे त्याग करत मरणार. तसा हा पण मरतो. पण आता सतीश विरोधातला पुरावा हातात आला. त्यामुळे फाईल मधल्या पुराव्यांना (हे कसले असतात कोण जाणे) चार चांद लागणार!

सतीश कमलकडे जाऊन 'ती' फाईल पळवून आणायला सांगतो. कमलचं घर वगैरे सग्गळं धनराज कडे गिरवी असतं म्हणे त्यामुळे ती सूरजकडे जाते. सूरजची आई, बहिण 'आम्हाला कळलं बर्का तुमचं गुपित' टाइप गोड हसतात, बोलतात. कमल फाईलचा विषय काढते. त्यावर तो तिला सविस्तर समजावतो की फाईल कुठे ठेवली आहे. काही गरज? पण आता कपाटापर्यंत पोचणार कसं? तर कमल अंगावर चहा सांडून घेते. बहेन लगेच स्वतःची साडी द्यायला धावते. सगळ्या घरात एकच गोदरेजचं कपाट असल्याने बहिणीच्या साड्या, सूरजचे शर्ट आणि सतीशची फाईल त्यातच असते. इतकंच नाही तर दोन साड्यांमधेच फाईल ठेवलेली असते. अर्थात फाईलही बाहेर येते आणि कमलला दिसते. कमलची सोय व्हावी म्हणून बहिण लक्ष्मी तिला खास नवीकोरी, खोक्यात ठेवलेली साडी देते. कमल खोक्यात फाईल घालून बाहेर पडणार इतक्यात तिला अजय दिसतो. ती लगेच चेहरा लपवते. ये क्या भानगड है? पण ते आपल्याला इतक्यात दाखवलेलं नाही. कमल फाईल सतीशला देते.

सूरज कपाटात फाईल शोधतो. त्या उपक्रमात तो कपाटातून अनेक रंगांचे, तर्‍हेचे कपडे बाहेर काढून टाकतो. घरातल्या चारही मेंब्रांचे कपडे इथेच ठेवल्येत की काय? तसं म्हणावं तर तो कपड्यांचा गठ्ठा फारच छोटा असतो. असो. फाईल सापडत नाही. पडक्या चेहर्‍याने सूरज आयजीला सांगतो की फाईल चोरीला गेली. आयजी म्हणतो तू लाचखोर आहेस आणि बदमाशोंसे मिला हुआ आहेस. सूरज ऐवजी आयजीच त्याच्या समोर सबूत म्हणून एक फाईल टाकतो. त्यावर अजयचा फोटो असतो. या बदमाशाला तू घरी लपवलं आहेस वगैरे आरोप आयजी सूरजवर करतो. आयजीला हे अजय प्रकरण कसं कळलं हे काही आपल्याला कळत नाही.

मग घरी जाऊन सूरज फाईल चोरल्याचा आरोप अजयवर ठेवतो आणि त्याला मारतमारत घराबाहेर काढतो ( पण धक्के मारायचं ठरलं होतं ना? ). रमेश देवबाप्पा अजयला लॉकपमधे टाकतो. च्यामारी, दोन तास झाले, आतातरी सांगा ना कसला इल्जाम ते! अजयचा फोटो पेप्रात येतो. प्रेमडॅडी 'आनंदी आनंद गडे' मोड मधे आरतीला पेपर नेऊन देतो. आरती नही मानती. ती सूरजच्या घरी जाते. सगळे या सूरजच्या घरी कशाला जात असतात? ती ते कॉम्पिटिशन - दहेज वगैरे प्रकरण आणि अजयचा तिला माहित असलेला भूतकाळ सूरज आणि कं. ला सांगते. झालं. आता 'आणि कं.' चा विश्वास आरतीवर बसतो आणि अजय निर्दोष असल्याचं सूरजला तात्काळ पटतं. सूरज अजयच्या सेल मधे - म्हणतो मार के माफ करेगा या गले लग के? असं म्हणून हळूच पुढे केलेली काठी परत मागे करून घाईघाईने स्वतःच अजयला मिठी मारतो. हो! अजय मार के माफी म्हणाला तर काय घ्या? आरती तिथे उभी असतेच. सूरज विचारतो 'सांग चांडाळा हिच्याशी लग्न का नाही केलंस?' आणि फायनली दोन तासांनी वो घडी आ गयी आ गयी! अजय त्याचा फ्लॅशबॅक सांगायला सुरूवात करतो.

अजय आरतीची सगाई ठरलेली असते तेव्हा म्हणे अजय तयार होऊन निघत असतानाच त्याच्याकडे सप्रू येतो. तो म्हणतो मी शिवाजी हॉलचा मॅनेजर आहे, आमच्याकडे एक डान्स कॉम्पिटिशन होणार होती त्याचा लीड डान्सर आजारी झाला आहे त्याच्याजागी तू नाच. आता एका ग्रूपचा लीड आजारी पडला तर त्याचा मॅनेजरला काय प्रॉब्लेम? पण तो होणार असतो म्हणे. त्या काळात डान्स कॉम्पिटिशन्सचे एकदम पेव फुटलं असावं असा माझा समज झाला आहे. अजय सांगतो की त्याची आत्ता सगाई आहे. तर सप्रू म्हणे अरे तू एका तासात मोकळा होशील ( काय प्रॅक्टिस वगैरे? पण ते असो. ) वर मी तुला २५००० रूपये पण देईन म्हणजे त्या पैशांनी तू तुझ्या होणार्‍या बायकोला गिफ्ट घेऊ शकशील. अजय तयार होतो. अर्थातच! त्यात काय इतकं? सगाईला जाता जाता थोडा वेळ हॉलवर थांबून नाचून पुढे जायचंय, इतकंच! हो ना? तर मग ज्या गाण्याने मला हा पिक्चर पहायला उचकवलं ते गाणं सुरू होतं. या गाण्यात भयानक मेकप केलेले भाले घेतलेले डान्सर आहेत. ते नेमके भारतीय आदिवासी आहेत की आफ्रिकन हे काही समजत नाही. ते खूप वेळ 'हाऽ हाऽ हूऽऽऽ हाऽ' करतात. अजय समोरच्या चाकाला चिकटवलेल्या, काळ्या कपड्यात झाकलेल्या व्यक्तिवर सुरे फेकत असतो. पण सुरे त्या व्यक्तिला लागत नसतात. अजय बहुधा पार्टटाइम सर्कशीत पण काम करत असावा. मग बाकीचे डान्सर 'अप्पा लो अप्पा लो' असं गायला लागतात. अप्पा कोण? सुरेफेक चालूच. किती सुरे मारायचेत नेमके? तिला लागेपर्यंत मे बी? एका सुर्‍याने त्या व्यक्तिवरचं काळं कापड निघतं. ती असते अनिता राज! तिने खूप सार्‍या सोनेरी कलाबुत झिरमिळ्यांचा ड्रेस घातलेला असतो (मला वाटतं अश्या टाइपचा टोप मी कधीतरी हुमा खानच्या डोक्यावर पाहिला होता?). आता ती नाचायला लागते. मागचे डान्सर गातात 'ओ मामा ओ मामा'. कदाचित ते तिला मामा म्हणत असावेत किंवा अजयचा मामा बनवायचा प्लॅन आहे याचा क्लू देत असावेत. मग कधीतरी गाणं सुरू होतं - मैं आया तेरे लिए. गाण्याच्या शेवटी ती पुन्हा त्या चाकाशी जाऊन उभी राहते. सुरूवातीला नेम चुकल्यामुळे आता अजय पाठमोरा होऊन सुरे मारतो. पडदा पडेपर्यंत त्यातला एकही सुरा तिला लागत नाही. पडदा पडल्यावर, अंधार झाल्यावर ती किंचाळते आणि खाली पडते. शेवटचा सुरा डिलेड अ‍ॅक्शनने तिला लागला असावा. हिंदी सिनेमातल्या नियमाप्रमाणे अजय तिच्या पोटात खुपसलेला सुरा काढतो. सप्रू म्हणतो छान! सुरेपर तुम्हारे उंगलीयोंके निशान आले. आता या खुनाबद्दल फाशी जा नाहीतर आम्ही सांगतो तसं कर. सो दॅट एक्स्प्लेन्स चोर्‍या. आणि याच खुनाचा तो इल्जाम! ( एकदा बघायचं तरी की ती खरंच मेलीये का? दया, इसके लाशको फॉरेन्सिक लॅब भेज दो! )

--------------------------------------------------------------------

अजय निर्दोष आहे हे आरती आणि सूरजला पटतं. सूरज त्याची जमानत करतो. आरती म्हणते त्या वेळी पण माझ्या वाढदिवशीच आपली सगाई होती, उद्या पुन्हा माझा वाढदिवस आहे ( म्हणून ते क्रेप आणि फुगे होय? ). उद्या मात्र आपण नक्की सगाई करायची. पण अजयला त्याआधी सूरजवर लागलेलं लाचखोरीचं ग्रहण दूर करायचं असतं. म्हणून तो थेट आयजीच्या घरी जाऊन सतीशच्या खोलीत घुसतो. तेवढ्यात सतीश येतो. दारआड लपून अजय बघतो की सतीशने पाव ब्रीफकेस भरून काडतूसं आणली आहेत. ती काडतूसं तो ज्या कपाटात भरतो, त्या कपाटात एका कप्प्यात मागे ३-४ पिस्तुलं दिसतात. खालच्या कप्प्यात नोटांची बंडलं असतात. इतकं डोळे भरून पाहून झाल्यावर तो पाठलागाच्या हेतूने सतीशच्या गाडीच्या डिकीत बसून जातो. तिथे त्याला दिसते कमल - कारण हे हॉटेल असतं धनराजचं. सतीशचा नाद सोडून अजय कमलमागे धावतो, तर नेमकी आरती पण तिथेच असते ( 'त्यांचा फोटो काढला तेव्हा नेहरूही तिथे होते म्हणे' अशातली गत झालीये ही! ). अजय कमलला गाठून जाब विचारतो. कमल बोलेना. मग आरती एकदम माया, ममता इ.इ. नारी जाती के श्रिंगार कसे असतात आणि नारी ही देवी कशी असते असलं काहीतरी सांगून घेरी आणते. मग स्वतःच्या, तिच्या प्रेमाचे वास्ते देऊन होतात. फायनली कमल पुरेशी कंटाळते आणि सांगते की अजय-आरती सगाई होऊ नये म्हणून धनराजनेच हे नाटक घडवून आणलं होतं ( म्हणजे सप्रू पण धनराजचा माणूस? धनराज त्या सुरूवातीच्या घरफोड्या, चेनचोरी वगैरे भुरट्या चोर्‍या पण करत असतो का काय? ). आरती म्हणते आता मी बगावत करणार आणि 'दुनिया की ऐसी की तैसी' गाणं माझ्या बड्डे पार्टीत गाणार.

मग बड्डे पार्टी. यावेळी फुगे आणि चमचमत्या झिरमिळ्या. हॉलही तोच असावा पण यात झुंबरांची संख्या वाढीव दिसते. प्रेमडॅडी चिडून आणि न्याहाळकुमार दुखावलेला वगैरे चेहरा करून अजय-आरतीचा नाच पाहतात. नाच झाल्यावर प्रेमडॅडी चले जावच्या घोषणा करतात. अजय-आरती तरीही इन बगावत मोड. त्यांना कमलच्या कुचक्या टोमण्यांची साथ असते. आता न्याहाळकुमार जेलची धमकी देतो. तर अजय सर्वांसमक्ष त्याला त्याच्या कपाटातल्या नोटा आणि बगैर लायसन्सके असलेल्या हत्यारांची आठवण करून देतो ( मग पार्टीत एक फालतू कुजबूज होते पण कोणी पोलिसांना ही माहिती देत नाही ). अजय आरती बाहेर पडतात पण त्यांना आपली व्हिलन पार्टी हॉटेलच्या कॉरिडॉर मधेच गाठते. प्रेमडॅडी आरतीच्या गळ्याला पिस्तुल लावतात. ती म्हणते एक बाप अपने बेटी को नही मार सकता. तर कहानीमें ट्विस्ट! प्रेमडॅडी म्हणतो 'अ आ आई, म म मका, मी तुझा काका, आता तुला मारू का?'. तर म्हणे जायदादके लिये याने आरतीच्या आईबाबांना अ‍ॅक्सीडेंट घडवून मारलेलं असतं. पण वसीयतमें असते पाचर - तमाम जायदाद तिच्या लग्नानंतर तिच्या नवर्‍याला मिळणार असते (असल्या फालतू वसीयती कोण करतं? मुलीला काही किंमतच नाही!). म्हणून तो तिचा सांभाळ करतो. बावळटच आहे! राजकिरण त्याला ती जायदाद मिळू देणार असतो होय? ते असो. कमल पालीसारखी पडद्याआडून हे सगळं नीट ऐकते.

कमल हे सगळं सूरजला सांगायला जात असते तर रस्त्यातच सूरज भेटतो. आता क्लायमॅक्समधे जास्त लांबण नको म्हणून तो सगळी एन्क्वायरी करूनच आलेला असतो. कमलची मजबूरी असलेल्या तिच्या वडिलांना घेऊन तो पोलिस हॉस्पिटलात चाललेला असतो. म्हणजे थोडक्यात क्लायमॅक्सला तिच्या बाबांचं अपहरण नक्की होणार नाहीये. ती सांगते की धनराज अजय-आरतीला जंजिराके अड्डेपे ले गया है. तसंच ती त्याला सतीशच्या कपाटातल्या हत्यारांबद्दल सांगते. तो म्हणतो मी जंजिर्‍याला जातो, तू आयजीला हे सांग. आता अजयने पार्टीत हत्यारांबद्दल सांगितलं होतं त्याला बराच वेळ होऊन गेलेला आहे. तरीही बावळट सतीश त्याबद्दल इतका वेळ काहीही करत नाही. कमल सतीशबद्दलचं सगळं सच आयजीला सांगते. तो कपाट उघडतो. कपाटात बसल्या बसल्या गन्सना पोरंबाळं झाली असावीत. २-३ गन्स जास्त वाटल्या यावेळी. आयजीची ममताभरी झापडं उडतात आणि तो दिसताक्षणी सतीशला पकडायचे आदेश देतो. तेव्हा कुठे सतीश येतो. म्हणतो तूच आता मला नाकाबंदीच्या पार अड्ड्यावर घेऊन जा नाहीतर कमलला मारतो. पण अड्ड्याच्या आधीच आयजीला जखमी करून जंगलात टाकून तो कमलला घेऊन जातो.

अड्ड्यावर एक पैलवान भक्तीभावाने उघड्या अजयच्या अंगावर चाबकाचे फटके मारत असतो. शेजारीच मंडप, पंडित, होम, वकिल वगैरे जामानिमा असतो. प्रेमडॅडी म्हणतो सतीशसोबत लग्नाला तयार हो नाहीतर जळत्या सळया टेकतो अजयला. त्यातल्या एका सळीवर तो मस्त सिगरेट शिलगावतो आणि म्हणतो 'ऐसी की तैसी, आं?' ( योद्धाच्या डॅनीने प्रेम चोप्राच्या या सीनवरून इन्स्पिरेशन घेतलं असेल का? ). मग रितसर चटके देण्याचा कार्यक्रम. त्याचा काही उपयोग होत नाही म्हटल्यावर प्रेमडॅडी सुराच काढतो आणि म्हणतो मी आता याचे डोळे बाहेर काढतो ( कशाला? तो काय क्राइममास्टर गोगो आहे? ). पण तसं तो सूरज येईपर्यंत करत नाही. मग सूरज आल्यावर फायनल मारामारी सुरू. धनराजच्या गँगमधे इतकी माणसं असूनही ती फार फास्टात गारद आणि गायब होतात. मॅकी, सुधीर आणि सप्रू आयत्यावेळी रजेचा अर्ज देऊन गेलेले असावेत. आरती स्वयंघोषित अबला नारी असल्याने कमलला डॅशिंग बनावं लागतं. दोन्ही हिर्वीणी नाजूक बाहुल्या असून कसं चालेल? कमल आरतीला घेऊन पळून जाऊ पाहते तर प्रेमडॅडी जवळच पडलेली कुर्‍हाड ( होमासाठी ताजी लाकडं फोडून आणलेली असतात यू सी! ) लांबून कमलच्या पाठीत फेकून मारतो. काय नेम आहे! सूरज ट्रॅपिझ आर्टिस्ट असल्याने तो धनराजच्या गोळ्या चुकवतो आणि लांबून धनराजला मोठा चाकू फेकून मारतो. या सिनेमात चाकू फेकण्याला काहीतरी विशेष महत्त्व दिसतंय. मरता मरता धनराजची गोळी 'डेंजर' लिहीलेल्या खोक्याला लागते आणि एक धुळीचा स्फोट होतो. मग नाइलाजाने तिथल्या सगळ्याच खोक्यांना आणि पोत्यांना फुटावं लागतं - अगदी लांबवर ठेवलेल्यांना सुद्धा.

इकडे सतीश आरतीचे हात जीपच्या कुठल्याश्या अवयवाला बांधतो आणि तिला पळवून न्यायला लागतो. अजय त्याला खाली खेचतो. जीप पुढे निघून जाते. आता इथे पुढे कडा असणं मँडेटरी असतं. सूरज ऑल्मोस्ट बेशुद्ध पडलेल्या कमलला घेऊन येतो. तिला खाली ठेवून सतीशला मारायला घेतो. अजयला बहुधा तो स्वतः दारासिंग असल्याचा भास होतो आणि तो धावत जीपखाली आडवा पडून मागचं चाक धरून ठेवतो. जीप आनंदाने त्याला पण घेऊन पुढे जायला लागते. आणि अचानक आपल्याला लागलंय हे विसरून कमल धावत येते, आरतीचे हात सोडवते आणि तिला घेऊन पळते. अजय पण जीपचा नाद सोडतो. त्यामुळे जीपला एकटीलाच दरीत पडावं लागतं ( अजयच्या अंगावरच्या जखमा आता पार पुसट झालेल्या असतात. काही तर नाहीश्याच झाल्यात ). आता राहिला सतीश! तो सूरजला गोळ्या मारणार इतक्यात आयजी मधे पडतो ( नेमके बरे येतात! ). आणि मग स्वतःच सतीशला गोळ्या घालतो. सूरज, अजय आणि आरती दु:खाने बघत राहतात. फायनल सीनमधे आपण मिस नको व्हायला म्हणून कमल खडखडीत बरी होऊन सूरजपाशी उभी राहते. या सगळ्यात अजयवरचा इल्जाम दूर होतो की नाही माहिती नाही पण पिक्चर संपतो.

या सिनेमावर माझा इल्जाम आहे तो मेमरी लॉसचा. म्हणजे मॅकमोहन, सुधीर आणि सप्रूला शेवटच्या मारामारीत लोकं विसरली आहेत. कमल पाठीत आख्खी कुर्‍हाड लागलेली आहे हे विसरलेली आहे. सूरजच्या आई-बहिणीला किडनॅप करता आलं असतं हा मुद्दा कोणी लक्षातच घेतला नाहीये. इतकंच काय तर दिग्दर्शक शिबू मित्रा बहुधा स्वतःचं नाव टायटल्समधे घालायला विसरला असावा कारण त्याचं नाव आपल्याला जवळपास निम्मा पिक्चर संपल्यावर दिसतं Proud

(समाप्त)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोविंदा उर्फ अजय रस्त्यावर नाच करणार म्हणजे लोकं तो नाच बघायला जातील आणि हे घराघरांत चोर्‍या करणार >>> Lol लोकांना उद्योग नाहीत असे दिसते. उद्या तुमच्या गल्ली रस्त्यावर एकजण नाचू लागला तर तुम्ही कामधंदे सोडून ते बघायला जाणार का.

धमाल लिहीले आहे. पोलिसांसंबंधी कोणतेही काम थेट आयजीकडे जाते हे विनोदी आहेच - तेव्हा अनेक पिक्चर्स मधे भारदस्त वाटावे म्हणून चरित्र अभिनेत्यांना आयडी/डीआयजी टायटल्स देत पण कामे ते बहुतांश किरकोळच करत Happy

पुभाप्र.

भारी लिहिले आहे Proud
इलजाम आवडीचा पिक्चर.. इलजाम पासून गोविंदा आवडायला लागला. फक्त मी तेव्हा गोविंदाला मिथुनच समजायचो. आणि मिथुन आवडायचा म्हणून गोविंद आवडू लागला.

मैं आया तेरे लिये गाणे आजही फेवरेट.. बरेचादा गुणगुणले जाते.

पुढच्या भागाची वाट बघतोय...

धमाल आहे इथे.

आयजीच्या जिवावर बायजी सारख्या पंचेस ने मजा आणली.
काही ठिकाणी निरीक्षणं अचूक आहेत. फारएण्ड ची आठवण झाली.
पूर्वी मायबोलीवर पिसं काढायचे उद्योग चालायचे त्याची आठवण झाली. एकदम खास जमली आहे रेसिपी.
हभप बुवांप्करमाणे कथा सांगत सांगत खुमासदार शैलीत चिमटे काढत रहायचे, खिळवून ठेवायचे, ओठांवर स्मित मावळू द्यायचे नाही ही जुनी मायबोली शैली अनुभवायला मिळाली.

कित्येक पंचेस कोट करायचे होते, पण मायबोलीने पुन्हा करामती करायला सुरुवात केली आहे. तीन वेळा प्रतिसाद हायलाईट होऊन उडालल. त्यात मोबाइलवरून टंकित असल्याने हवालदिल झालो.

हा लेख सुपरहीट आहे.

धन्यवाद! पुढचा भाग आज टाकेन मोस्टली Happy

लोकांना उद्योग नाहीत असे दिसते >>> टोटली. सगळे बाल्कनी मध्ये वगैरे गर्दी करून पाहतात Lol

ऋ, चक्क तुझी इथे हजेरी? छान वाटलं Happy

आचार्य : थँक्यू. Happy

महेश से मुन्ना'
त्याचा सतीश बेटा १ वर्ष लंडन मधे शिकून आजच परत आलेला>>>
आजाद जिंदगी हवीये कारण तो शिकून दमलाय. >>> एकच वर्ष कसे ? बालवाडी की काय ? किमान दोन तरी नकोत का विश्वासपात्रतेसाठी Lol
ते विश्वास ठेवायचा नसतो वगैरे विसरले वाटतं सगळे.
अजय त्यांना स्वतःचं नाव विजय आहे असं सांगतो. >>> काय कल्पकता आहे, व्वाह Lol
बाहेरची दारू पचत नसल्याने
या एकाच 'कामा'साठी
उतारे जाने की काबिल है
>>>>> Lol मस्त लिहिले आहे.

थँक्यू अस्मिता आणि स्वाती२ Happy

बालवाडी की काय ? किमान दोन तरी नकोत का विश्वासपात्रतेसाठी >>> अगदी अगदी Lol त्या एका वर्षात शशी कपूर त्याला रोज फोन करत असतो म्हणे. बहुतेक त्याला कंटाळूनच सतीश परत आला असावा. लंडन नको, फोन आवर Proud

Lol

इल्जाम पाहिला नाही, पण त्यातली गाणी आवडली होती, आणि गोविंदा म्हणजे क्रश होता तेव्हा !

८०ज मधल्या पिक्चर्सची काही व्यवच्छेदक लक्षणं, आयजीच्या जीवावर बायजी उधार, 'महेश से मुन्ना', हो? प्रेम चोप्रा?? प्रेमळ???
लोकं बहुधा 'हॅप्पी बड्डे' म्हणायच्या तयारीत असतात, काय रेंज आहे चोरीची
मेरा नामभी आरती है, जिनके हाथ पवित्र होते है उन्हीके हाथ लगती हूं
>>>>> Lol Lol

'मैं आया' या गाण्याच्या गीतकाराकडे बहुधा पहिलीच्या मुलांना गाण्यातून नाती शिकव आणि या पिक्चरची गाणी लिही अश्या असाइनमेंट एकाच वेळी आल्या आणि देताना कागद मिक्स झाले. अनिता राजच्या डान्स स्टेप्स बघता गीतकार साईड हसल म्हणून शिशू वर्गाचे डान्स क्लासही घ्यायचा अशी खात्री पटते. रिक्षाच्या साईड मिररला असलेल्या झिरमिळ्यांचे गुच्छ काढून तिचा ड्रेस बनवलाय बहुतेक. गोविंदाचा टॉपही बहुतेक फूल किंवा ऑक्टोपस झालेल्या एखाद्या शिशूचा अंगरखा असावा. रियूज आणि रिपर्पज यू सी.

त्या स्ट्रीट डान्सर गाण्यातले लॉजिक काही कळले नाही बुवा. 'झुमका गिरा रे' बघायला गावकरी दार उघडे टाकून यायचे कारण दुसरी एंटरटेनमेंट नसायची आणि साधना आशा भोसलेंच्या आवाजात गात नाचत असायची. इमारतीतील शहरी लोक 'काय शिंची कटकट आहे' म्हणून खिडकीत/बाल्कनीत येतील. लाल रेक्झिनचा ड्रेस घालून नाचणारा गोविंदा हे काय घराचा मुख्य दरवाजा उघडे टाकून बघण्याएवढे रम्य दृश्य आहे का?

कॉम्पिटिशनचे गाणे बघितले.

कॉश्च्यूम डिझायनरने नीलमचा ड्रेस डिझाईन करताना कलिंगडापासून इन्स्पिरेशन घेतली की मोहर्रमच्या ताबूतांपासून हे मला ठरवता येत नाहीये. पण अदरवाईज गोड दिसणारी नीलम आउट ऑफ शेप आहे हे दाखवायला खास मेहनत घेतलीय हे नक्की.

अजय दु:खी नाही झालाय. पाठच्या स्टेजवर 'रॉक' लिहिलंय, सपोर्टींग डान्सर्स 'चा चा चा'च्या स्टेप्स करताहेत, त्यातल्या बायांचा ड्रेस लेकीने नर्सरीच्या ऍन्यूअल डेला घातला होता तस्साच आहे, नीलम 'या या य्या' करत जमेल तेवढे पाय उडवत नाचत आहे हे बघून 'हेचि काय फळ मम तपाला?' असे वाटून वैषम्य आलेय त्याला. म्हणून जातो तो स्टेजवर नाचायला 'बाई प्राईझ नको पण डान्स आवर' करत.

ध मा ल!
व्यवच्छेदक लक्षणं अचूक टिपली आहेत. त्यातून तिसरं - अनिता राज Lol
किलो किलो सोन्या चांदीच्या आणि गाडी वगैरेच्या बदल्यात दोन लाख रुपये हा ऑप्शन फार भारी आहे Lol
'मैं आया ' हे गाणं खूप गाजलं होतं, पण ह्या गाण्यामागे केवढा इतिहास दडला आहे, हे आत्ता समजलं. सिनेमात कलाकारांची केवढी ती फौज! त्यातल्या त्यात एक उणीव जाणवली, ती म्हणजे शशी कपूरला नाचवलं नाही.

या पिक्चरचा दिग्दर्शक काळाच्या पुढे आहे हे मात्र नक्की. पूर्वीची क्लबमधली गाणी कशी एकांगी असत. म्हणजे जे काय नेत्रसुख आहे ते बाप्यांसाठीच. सोबत आलेल्या बायांनी काय करायचे? त्यांनी काय बाप्यांच्या तोंडाकडे बघत बसायचे? दिग्दर्शकाने द द दै द दै गाण्यात मात्र सगळ्यांची सोय केलीय. ते पोझ करणारे बॉडीबिल्डर्स असतात किनई तत्सम काही जण तेवढ्याच कपड्यात आणून उभे केलेत. अधूनमधून ते पोझही बदलतात. बघा काय बघायचे ते. तिकिटाचे पैसे मात्र परत मिळणार नाहीत.

बाय द वे ती लक्ष्मी ज्या घरात राहतेय ते घर, फर्निचर, तिचे एकंदरीत राहणीमान बघता दहेजके लिये दो लाख रुपये त्यांच्यासाठी कठीण ठरू नये. फक्त अजेने डॅन्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती अचानक घसरते का काय?

माझेमन : मस्त निरीक्षणं आणि ऍडीशन्स! Lol प्रचंड हसतेय वाचून.
लक्ष्मी ज्या घरात राहतेय ते घर, फर्निचर >>> हाच प्रश्न मला पण पडला. आणि ते एकमेव गोदरेजचं कपाट पाहून जास्तच! ते दहेज प्रकरण बळंच घुसवल्यासारखं वाटतं. कॉम्पिटिशन साठी केवळ.

ल-प्री आणि बेफि : धन्यवाद! Happy

अनघा_पुणे : Lol अनिता राजचं नाव न घेऊन कसं चालेल!
तो दहेज ऑप्शन पाहून मी टोटल हरले होते. नॅशनलचा व्हिसीआर वगैरे डिटेल्स देतो तो!! बाकी १०० तोळे सोनं घ्यायलाच बरेच रूपये लागतील. त्या सगळ्याऐवजी २ लाख म्हणजे अगदीच मांडवली Proud
त्या तसल्या शशी कपूरला नाचवलं असतं तर भीती वाटली असती Lol पण बरंय असल्या आयडिया नाही आल्या कोणाला. बाप नाही तर मुलगा म्हणून राजकिरणला नाचवलं असतं नाहीतर!

Lol खतरा निरीक्षणे आहेत सगळीच.
माझेमनच्या पोस्ट्सही भारी!

८०जचे व्यवच्छेदक लक्षण अनिता राज >> Rofl या शिवाय ८०ज/अर्ली ९०ज च्या गोविंदापटांचे व्यवच्छेदक लक्षण - डॅन्स कॉम्पिटिशनही यात आहे.

सतीशचे कॅरेक्टर केवळ याच शब्दांत वर्णिले जाऊ शकते >> https://youtu.be/nhsZWYHurNg&t=560
त्या सर्व आरती यूजकेसेस कहर आहेत!

शिबु मित्राने बहुतेक नामू परीटमधल्या "त्याला कमलनं फशिवलं" ओळी फारच सीरियसली घेतलेल्या दिसतात कारण सिनेमाभर कमल फशिवतेच आहे.

अजय सांगतो की त्याची आत्ता सगाई आहे. तर सप्रू म्हणे अरे तू एका तासात मोकळा होशील >> कैच्या कै. सप्रू काय अजयला वेताळे गुरुजी समजला की काय? कि देवक बसायला तासभर आहे तर तेवढ्यात पटकन एक श्राद्ध घालून येईल तो.

दया, इसके लाशको फॉरेन्सिक लॅब भेज दो! >> Happy साळुंखे साब आता लवकर पोस्टमॉर्टेम पूर्ण करा आणि शेवटचा भाग टाका!

त्याला कमलनं फशिवलं
वेताळे गुरुजी
>>> Lol

सतीशचे कॅरेक्टर >>> टोटली Proud

पायस , जबराट अ‍ॅडीशन्स! Rofl

थोड्याच वेळात शेवटचा भाग टाकतेय.

८०जचे व्यवच्छेदक लक्षण अनिता राज >>> Lol हे सर्वात भारी पण इतरही निरीक्षणे जबरी आहेत Happy

खास नोट करण्यासारखी Happy
आपल्याकडची सगळी डिटेल्स व्हिलनला सांगणं कंपल्सरी असल्यामुळे >>>
ड्रायव्हर आत डिटेलवारी बयान लिहीत असतो आणि ते आपल्याला कळावं म्हणून मोठ्याने वाचतही असतो >>>
आम्हाला कळलं बर्का तुमचं गुपित >>>
त्या उपक्रमात >>>
सगळे या सूरजच्या घरी कशाला जात असतात? >>>
शेवटचा सुरा डिलेड अ‍ॅक्शनने तिला लागला असावा >> Lol

घरातल्या चारही मेंब्रांचे कपडे >>> इथे वरती ब्राउजरने चुकीच्या ठिकाणी शब्द फोडला आहे Wink Happy

आता या खुनाबद्दल फाशी जा नाहीतर आम्ही सांगतो तसं कर >>> हे वरचे वर्णन वाचून सप्रूला हे सगळे करण्याची काहीच गरज नव्हती. गोविंदा नाच म्हंटले की नाचतो असे दिसते यात एनीवे.

सतीशची फाईल त्यातच असते >>> तात्या म्हणेल बघा, तिकडे पोलिस लोकही फाईली घरी ठेवतात.

त्या काळात डान्स कॉम्पिटिशन्सचे एकदम पेव फुटलं असावं असा माझा समज झाला आहे >>> Lol हो मलाही प्रश्न पडतो हा. नवीन हीरोज चे लाँच मूव्हीज असतात त्यात कॉलेजेसे मधे डान्स कॉम्पिटिशन्स असतात. बाकी ठिकाणी अशा रॅण्डम कॉम्पिटिशन्स कोठे असत? त्या ही त्या काळात तीन लाख रूपये देणार्‍या?

मला वाटतं अश्या टाइपचा टोप मी कधीतरी हुमा खानच्या डोक्यावर पाहिला होता >>> हे वाचून त्या कपडेपट वाल्याचा तुला मेसेज येईल "धन्यवाद. किती दिवसांपासून शोधत होतो. त्या दिवशी 'राजकमल' मधे नेला होता, तिथेच राहिला" ई Happy Happy

मेरा नाम सतीश है, जो चीज मुझे पसंद आती है उसे हासिल करके रहता हूं. त्यावर ती म्हणते मेरा नामभी आरती है, जिनके हाथ पवित्र होते है उन्हीके हाथ लगती हूं >>> Happy Happy मग तो त्यानंतर बापाकडे जाऊन माझे नाव जरा माझ्या काड्यांशी संदर्भ लावता येईल असे का नाही ठेवले विचारतो का? ( "सतीश हे काय व्हिलनचे नाव आहे? कोण घाबरेल या नावाला? तिकडे लोक रखता हूँ खुल्ला वगैरे यमके जुळतील अशी नावे ठेवतात. किंवा प्रयलनाथ गेंडास्वामी. आम्हाला कोण विचारणार" ई)

यातून बॉलीवूडचा एक नियम ठळकपणे लक्षात आला: नायकांना/सहनायकांना गरज असलेले पैसे व त्याच वेळेस त्यांना एखाद्या गैरकामातून मिळणारे पैसे साधारण त्याच बॉलपार्क मधे असतात.

आता तिसरा भाग वाचतो Happy

ब्राउजरने चुकीच्या ठिकाणी शब्द फोडला आहे >>> Proud

हो, तात्यांना दाखवू नका हा पिक्चर. नसत्या आयडिया यायच्या त्यांना! Wink

हे वाचून त्या कपडेपट वाल्याचा तुला मेसेज येईल "धन्यवाद >>> Rofl अरे मी अजून आठवते आहे कुठे पाहिला होता हा टोप. कोणाला आठवला तर प्लीज सांगा.

माझे नाव जरा माझ्या काड्यांशी संदर्भ लावता येईल असे का नाही ठेवले >>> अगदी अगदी. गेलाबाजार धूप, कोळसा किंवा कापूर असं काही तरी ठेवायचं. म्हणजे आरतीसोबत यूजकेस पण मिळाली असती. Wink सतीश हे नाव प्रचंड पपलू आहे व्हिलनसाठी हे बाकी खरं.

बॉलपार्क पैशांचा नियम असायला हरकत नाही. या पिक्चरमधे तर २ लाखाची गरज असताना ३ लाख मिळाले आहेत. बहुतेक ते मागणी तसा पुरवठा सदरात वाटू नये म्हणून लाखभर जास्त ठेवले असतील Proud

शिबु मित्राने बहुतेक नामू परीटमधल्या "त्याला कमलनं फशिवलं" ओळी फारच सीरियसली घेतलेल्या दिसतात कारण सिनेमाभर कमल फशिवतेच आहे. >>> Rofl

सतीश हे नाव प्रचंड पपलू आहे व्हिलनसाठी हे बाकी खरं. >>> तीच तर मज्जाय... प्रेक्षक आर कॉट ऑफ-गार्ड !

अ आ आई, म म मका, मी तुझा काका,
मग पार्टीत एक फालतू कुजबूज होते पण कोणी पोलिसांना ही माहिती देत नाही
कपाटात बसल्या बसल्या गन्सना पोरंबाळं झाली असावीत.
होमासाठी ताजी लाकडं
जीप आनंदाने त्याला पण घेऊन पुढे जायला लागते.
>>> Lol Lol

आरती एकदम माया, ममता इ.इ. नारी जाती के श्रिंगार
>>>>> तोपर्यंत एकदम मॉडर्न राहणीमान असलेली आणि नॉर्मल मुलीसारखी वागणारी नीलम अचानक डोक्यावर पडल्यासारखे का वागतेय मला कळेना. पोरगी मात्र वेव्हारी हो. पुढे मागे गोविंदाचे डान्सिंग स्टार करिअर चालेल ना चालेल. आपण राजश्रीच्या पिक्चरसाठीची ऑडिशन यातच देऊन टाकू असा विचार तिने केला असणार. तुपकट गोड दिसायचं आणि असलं काहीतरी बोलायचं. हा का ना का?

भारीच पिसे काढलेत Lol
हे असे चित्रपट बघून देखील आपली पिढी तशी नीटच राहिली म्हणायची Lol

कुमार सर, ल-प्री, माझेमन, झकासराव : धन्यवाद! Happy

आपण राजश्रीच्या पिक्चरसाठीची ऑडिशन यातच देऊन टाकू >>> Lol म्हणून मग हे असले डायलॉग्ज मारायला राजश्रीने तिला घेतलं असावं Proud

हे असे चित्रपट बघून देखील आपली पिढी तशी नीटच राहिली म्हणायची >>> खरंय Lol अजून बरेच नमुने सापडलेत या निमित्ताने. बघूया माझा पेशन्स किती टिकतोय.

जिनके हाथ पवित्र होते है उन्हीके हाथ लगती हूं. >>> 'हाथ लगती हूं' बापरे हे काय ? स्वतःचाच अवमान केलाय Lol
आपल्याकडची सगळी डिटेल्स व्हिलनला सांगणं कंपल्सरी असल्यामुळे सूरज त्याला सांगून टाकतो
रमेश देवबाप्पा
च्यामारी, दोन तास झाले, आतातरी सांगा ना कसला इल्जाम ते!
मग नाइलाजाने तिथल्या सगळ्याच खोक्यांना आणि पोत्यांना फुटावं लागतं - अगदी लांबवर ठेवलेल्यांना सुद्धा.
आणि शेवटचा परिच्छेद
>>>>> Lol धमाल लिहिलेय.

माझेमन Lol

काल यूट्यूबवर अर्धा सिनेमा बघितला. त्या-त्या जागी त्या-त्या कमेंट्स आठवून हसायला येत होतं.
सिनेमात शत्रुघ्न सिन्हाने जास्त भाव खाल्लाय (बॉलिवूड स्टाइल)
पण त्याचं पठ्ठे के उल्लू, उल्लू के पठ्ठे फार बोअर होतं. (रमड, त्याला का सूट दिलीस? Lol )

टायटल्समध्ये पहलाज निहलानी नाव दिसलं.
एखाद्या जोडीचा सिनेमा गाजला की हा मनुष्य त्याच जोडीला घेऊन लगोलग स्वत: एक सिनेमा काढायचा (आणि बहुतेकदा तो आपटायचा.) इल्जाम सुद्धा तसलाच होता.

Pages