पूर

Submitted by बिपिनसांगळे on 5 August, 2024 - 00:22

पूर

सकाळची वेळ . संततधार पाऊस . पावसाला कंटाळलेलं धुरकट आकाश. उदास !
पण खाली नदीला पूर आला होता . धरणांमधून पाण्याचा विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात होता . मुठेला उधाण आलं होतं .
पूर बघायला हे गर्दी !
शनिवारवाड्याच्या समोर कट्टयावर ओळीने बसलेली माणसं. अनेक प्रकारची अनेक ठिकाणची . भुकेलेली . काही कामाच्या शोधातली . काही थेट भिकारी . जगाने नाकारलेली सगळी फौजच जणू . त्यांचा तो रोजचाच अड्डा . कोरोना काळापासूनचा . पावसाने हवेत गारवा आणला असला तरी त्याने पोटातली आग काही विझत नाही . तीच आग विझवण्याच्या विवंचनेत असलेली ती गरीब बिचारी माणसं .
पाऊस चालूच होता . नशीब त्याने थोडा जोर कमी केला होता . त्यातले काही जण मोडक्या काड्यांच्या छत्र्या घेऊन होते . काही फाटके रेनकोट ; तर काही तसेच भिजत . मळकट कपड्यांमध्ये. हरवलेल्या नजरेने इकडे तिकडे पहात .
त्यांच्यामध्ये एक भिवा होता . तिशीतला असला तरी चाळिशीतला वाटणारा . तो खुरटी पांढरी दाढी खाजवत पाण्याकडे पहात होता . पुराच्या गढूळ पाण्याकडे पहात त्याच्या डोक्यात काहीतरी घोळत होतं .... शेजारी त्याचा मित्र होता . म्हातारा नाना .
' नाना , काय करायचं रे ? हे पोट कसं भरायचं ? ' भिवा त्याला म्हणाला .
त्याचा हा रोजचाच सवाल . नाना तरी काय करणार ? तो गप्प बघत बसला .
' चल - जरा पलीकडे जाऊ , ' नाना म्हणाला .
दोघे उठले आणि त्या दगडी, जुन्या पुलाच्या मध्यभागी पोचले .
भिवा म्हणाला , ' नाना , जीवच द्यावा रे . नाहीतरी नदीला पाणी आलंय . '
नानाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. तो म्हणाला, ' हं ! खरंय . खायला आज हाय तर उद्या नाय. '
भिवा पण त्याच्याच नादात .‘ नाही रे नाना , आज मी खरंच उडी टाकणारे ! नदीत - पुराच्या पाण्यात . '
आता मात्र नाना चमकला .
'काहीतरी बोलू नगं भिवा ! '
त्याला एकदम कसंसंच झालं . भिकारी असला तरी त्यालाही मन होतंच की. त्यात त्याची ह्या भिव्याशी नुकतीच गट्टी जमलेली. .
त्यांचं तोंड ओंकारेश्वराच्या पुलाच्या दिशेने होतं . भिवाने एकदम हातातली प्लॅस्टिकची पिशवी खाली टाकली आणि तो पुलाच्या कठडयावर चढला .
कठडयावरून तो चालत पलीकडे जाऊ लागला . बस स्टँडच्या दिशेने . नाना ओरडला , ' ए , साल्या ! खाली उतर भोxxx !’
लोकांचं लक्ष एकदम तिकडे गेलं आणि -
भिवाने पाण्यात उडी टाकली की !
नाना ओरडला - ' भिवा ! .... अरे उडी टाकली उडी टाकली ! '
आणि तिथे गर्दी जमा झाली . त्या सगळ्या भिकाऱ्यांची . पुलावरून बस धरायला चाललेल्या माणसांची . आणि रस्त्यावरून बेभान चाललेल्या वाहतुकीचीही .
कोणीतरी पाण्यात उडी टाकली होती आणि - आणि अर्थातच जीवाला कंटाळून .
त्यात पुराचं पाणी . भिडे पूल पाण्यात गेला तरी लोकांसाठी बातमी होते ; तो जातोच . पण महापालिकेसमोरचा छोटा पूल तेव्हा पाण्यात जातो जेव्हा नदीला खूप पाणी सोडलेलं असतं . ज्याचा इशारा दिला जातो . नाहीतर नदीकाठाला बोंब ठरलेली .
अशा त्या खतरनाक , गढूळ ,स्वतःशी वेटोळं घेत , स्वतःच्या नादात चाललेल्या पाण्यात उडी टाकायची म्हणजे ...
भिवा जो पाण्याखाली गेला तो वर आलाच नाही . नाना पळत पुलाच्या दुसऱ्या बाजूला गेला . अन लोकही . सगळेजण खाली नजर ताणून पहात होते . एखादा माणूस आपल्यासमोर जातो म्हणजे ? ...
तो वर आलाच नाही ! गेला ? ...
लोक पाण्याकडे पहात होते . काळजीने , बेफिकिरीने . नानाच्या डोळ्यांत मात्र पाणी आलं - काय केलं या पोराने !
काही जण मात्र त्याही परिस्थितीत व्हिडिओ काढत होते .
अन थोडा पुढे - भिवा वर आला . नानाला आशा वाटली - आला , आला वर . तो ओरडला ' अरे , त्याला कोणी घ्या रे वर ! काढा - वाचवा !'
आणि गंमत ! ...
भिवा छान वर आला आणि आत्मविश्वासाने हातपाय मारू लागला .
तो पट्टीचा पोहणारा होता . पुरात पोहणं त्याला काही नवीन नव्हतं . गावाकडे तर तो यासाठी हिरोच होता . त्याने जरा गंमत केली होती . थोडंसं वेडंसं धाडस !
तो पोहत पुढे गेला आणि पाण्यात बुडालेल्या घोरपडे घाटापाशी जाऊन एका झाडाला धरून थांबला . आनंदाने . एखाद्या विजयी वीराच्या आवेशात . लोकांनी टाळ्या वाजवल्या . लोक जोमाने व्हिडिओ घेऊ लागले . तोही खूष लोकही खूष अन नानाही .
मग एक दोर टाकण्यात आला आणि त्याला धरून तो पुढे बाहेर आला . अन मंगलाजवळच्या जुन्या दगडी पायऱ्या चढून वर परत पुलावर .
लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं . एका माणसाने त्याला पाचशेची नोट दिली . ते बघून तो आणि नाना डबल खूष .
आज खायची चंगळ होती !
त्यांनी त्या दिवशी ऐश केली . खाऊन पिऊन मजा .
नाना म्हणाला , ' भिव्या , लय भारी केलंस गड्या ! ... मंग आता उद्यापण ? '
भिवाने छाती थोपटली , ' आपुन है ना यार ! '

दुसऱ्या दिवशी ती बेकारांची फौज रोजच्यासारखी जमलेली होती .
पण आज पाऊस थांबला होता .
पूर ओसरला होता आणि गर्दीही ! ...
--------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान, वेगळीच कथा! सकारात्मक!

=====

अवांतर -

आमचा एक मित्र आहे, वयाने बराच लहान! निराश होता व म्हणाला मी आज आत्महत्या करणार. आम्ही हसण्यावारी नेले. दुसऱ्या दिवशी परत भेटला. आम्ही विचारले, काय रे, जिवंत कसा तू? तो म्हणाला मी खडकवासला धरणापाशी गेलो होतो पाण्यात बुडून मरायला! पण ऐनवेळी लक्षात आले की आपल्याला तर पोहता येत नाही. मग घाबरून परत आलो.

तो काय म्हणतोय ते कळायलाच आम्हाला दोन मिनिटे लागली.

वाचक मंडळी खूप आभारी आहे
आणि जे आवर्जून वाचतात त्यांच्यासाठीही अर्थात !

आणि

विशेष आभार

प्रीती
बेफिकीर
वावे

मस्त.
मला एकदम स्मशानातील सोनं मधला भीमा आठवला.

मस्त.
मला एकदम स्मशानातील सोनं मधला भीमा आठवला.

मस्त.
मला एकदम स्मशानातील सोनं मधला भीमा आठवला.

मस्त .

सुंदर कथा, प्रत्येकाला आपआपल्यापरीने पाऊस महत्वाचा. शेतकऱ्याला दिलासा, कवीला कल्पना, कोणाला रोजगार.....देणारा पाऊस

नुकतंच मुठेला आलेलं पाणी ओसरत होतं. एका पुलावरून चालताना नदीच्या पाण्यात अगदी गळ्यापर्यंत उभं राहून काही तरी शोधाशोध करणारी दोनचार मंडळी दिसली. काही कळलं नाही. काठावर त्यांचेच सवंगडी काही फुटकळ वस्तू घेऊन उभे असावेत असं दिसलं. पूल ओलांडेपर्यंत लक्षात आलं‌ की ते वाहून आलेल्या गोष्टी गोळा करताहेत!
त्यावरून आठवलं. एका नातेवाईकांच्या रक्षा विसर्जनासाठी विदर्भात एका त्रिवेणी संगमावर गेलो होतो. तिथे उथळ पाण्यात असे किती तरी इसम ती वाळू चाळत बसले होते.
हे सगळं विचित्र वाटतं. उदरभरणासाठी हा मार्ग?

असो. बिपिन सांगळे यांची कथा झकासच!