इंटिरिअर आणि आम्ही-भाग ३(फायनली समाप्त बरं का पकवणे!!)

Submitted by mi_anu on 14 November, 2023 - 09:06

भाग 1 आणि 2 इथे वाचा:
भाग १
भाग २

अतिशय भिन्न विचार असलेली दोन किंवा माणसं वर्षानुवर्षे घरात नांदत असली की कोणतंही काम अगदी सुधेपणाने होत नाही.(आता मी यापुढे 'आणि यातच तर खरी आयुष्य जगण्याची लज्जत असते.आयुष्य रुपी जेवणाला चव आणणारं हे माईनमूळ लोणचं.संसाराच्या खमंग पोळीला लावलेलं चमचमीत वऱ्हाडी तिखट.असंच हाय हुय करत हे तिखट खात नंतर जिभेवर आलेली गोड आफ्टरटेस्ट न्यारीच.असंच हे तिखट लोणचं,प्रेमाचे गुलाबजाम,समजूतदारपणा चा वरणभात,गॉसिपिंग ची चटणी खात जे जेवण खाऊन एक दिवस यथावकाश मृत्यूरुपी तृप्त ढेकर द्यावा.' असं लिहून तुमच्या साठी वात्रट व्हॉट्सअप फॉरवर्ड अजिबात तयार करणार नाहीये. घाबरू नका.) इंटिरिअर वाल्याना विरोध करण्या वरून झालेले हे काही संवाद वानगीदाखल:

'अरे तू त्यांच्या सगळ्या सूचनांना हो म्हणून मान काय हलवतोस?त्यांचं काय जातंय सगळीकडे काचा लावायला?उद्या काचेच्या भिंती वाला संडास सुचवतील.'
'मग तू कर ना विरोध.तुला मी कधी अडवतो का?'
'मी करते आहेच.पण तू जर नेहमी साने गुरुजी बनून राहिलास तर मला नेहमी विरोध भूमिकेत जावं लागेल आणि ते पाठीमागे 'साहेब बिचारा भला माणूस पण त्याची बायको हडळ आहे' म्हणतील.'
'जसं काय आपण विरोध करत नाही तोपर्यंत आपल्या मागे ते आरत्याच ओवाळतात की नाही.विरोध तुझा आहे.व्यक्त तूच करायचा.'
'म्हणजे मी केला नाही तर तुला घरातल्या सगळ्या कपाटाना काचेची शटर आणि त्यातून दिसणारा पसारा चालेल का?'
'किती निराशावादी सिनिक आहेस गं तू!! पसारा होणाऱच असं सुरुवातीपासून धरून चाललं तर कठीण आहे.माझ्या कपाटात तरी अजिबात असं होणार नाही.'
'हे बघ,आतापासूनच शब्द देऊ नकोस.तुझे शब्द काय आहेत मला माहिती आहे.तू 3 वेळा सिडलिंग ट्रे आणून त्यात मायक्रोग्रीन वाढवून सॅलड खाणार होतास.3 वेळा ते गॅलरीत पडून सडलेले,तुटलेले ट्रे मी फेकलेत.'
'हे बघ,प्रत्येक भांडणात सिडलिंग ट्रे आणायची गरज नाही.दम है तो इंटिरिअर वाल्याना विरोध कर वरना ग्लास शटर बरदास्त कर.'
'सिडलिंग ट्रे' हे आमच्या सर्व भांडणांमधलं ब्रह्मास्त्र आहे.जसा ड्रॅकुला ला परतवायला क्रॉस तसा भांडणातल्या नवऱ्याला गारद करायला सिडलिंग ट्रे.

'ओ' ला अतिशय आवडणाऱ्या 2 गोष्टी: प्रोफाईल शटर्स उर्फ काचेची कपाट दारं आणि 'हायड्रॉलीक शटर्स' उर्फ वर उघडणारी दारं.दोन्हीला मी कडाडून विरोध केला.एकतर 15 वर्षांपूर्वी केलेल्या इंटिरिअर मध्ये आम्ही लांब राहत असल्याने पाहणी करायला सारखं येणं न जमल्याने आणि मुख्य सुतार 6 फूट 2 इंच असल्याने त्याने आपल्या उंचीनुसार लावलेली स्वयंपाकघरातली कपाटं.कोणतंही कपाट आतली वस्तू बरगडीत उसण भरल्याशिवाय किंवा कुठून तरी धडपडत शिडी घेऊन आल्याशिवाय दाद न देणारं.हायड्रॉलीक शटर्स वर उघडणारी सर्वात छतालगतच्या शेल्फ ला लावणं हा दिसायला एकदम सुंदर गुळगुळीत एकसंध, हँडल न दिसणारा प्रकार असला तरी बुटबैंगण माणसाला ऍक्सेस ला अतिशय मूर्खपणाचा आणि वेदनादायी होता.त्यामुळे शेवटी शेवटी माझा 'जब वी मेट' मधला अंशुमन, 'क्यो देखू मैं गनने के खेत, नही देखणे मुझे गनने के खेत!!!' झाला.आता यातल्या बऱ्याच शेल्फ ना हाताला येईल असा एक दांडा असतो, तो धरून झाकणं खाली ओढता येतात.

'कटकटी चिडकी बाई शक्यतो सगळ्याला नाही म्हणणार' हे 'ओ' ला माहीत असल्याने ओ चे साईट सुपरवायझर आधी सरांना फोन करून पटवून घेऊ लागले.मग आम्ही सर्व निर्णयात व्हिडिओ कॉल करून चर्चा करून एकमेकांना आणि 'ओ' ला सेम पेजवर आणलं.सुदैवाने हे प्रकार 10-20 मिनिटात आवरत असल्याने ऑफिस कामाला याचा फटका बसला नाही.

'ओ' ची काम करण्याची प्रोसेस शिस्तबद्ध होती.ठराविक टप्प्यात 2डी डिझाईन शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर बिल ऑफ मटेरियल शेअर करणे, ठराविक रक्कम मिळाल्यावर 3डी चे फोटो शेअर करणे(प्रत्यक्ष डिझाईन पाठवले जात नाही.),ठराविक रक्कम दिल्यावर मापं आणि फॅक्टरी फर्निचर ची कट लिस्ट बनवायला येणे, ठराविक रक्कम दिल्यावर सर्व मटेरियल साईट वर टाकणे असे.यात सर्वात जास्त नियमित गोष्ट अकौंन्ट कडून हफ्ता मागणी होती.मग असा कामाचा काही काळ सुरळीत गेल्यावर 'ओ' चा आणि आमचा नाच गं घुमा चा खेळ चालू झाला.

आम्ही: 'नाच गं घुमा!!'
'ओ': 'या गावचा, त्या गावचा, इलेक्टरीशीयन गावी गेला, पैसे नाही मला, सामान नाही मला, कामगार नाही मला,कशी मी नाचू!!'
आम्ही: 'नाच गं घुमा!पैसे घे तुला,कामगार दे मला, सामान घे मला, नाच गं घुमा!!'

'ओ' ची गंमत ही की हफ्ता मागणी करून हफ्ता घेण्याच्या 2 दिवस आधी ते साईटवर पूर्ण 4 सुतार,1 इलेक्टरीशीयन ची टीम लावत.मग खुश होऊन आम्ही हफ्ता दिला की दुसऱ्या दिवशी पासून फक्त एक पाप्याचं पितर प्लास्टर वाला, इन्व्हेंटरी नाही, साईट सुपरवायझर दुसऱ्या साईट वर असे प्रकार चालू होत.'ओ' ने आमचं काम घेतलं तेव्हा त्यांच्याकडे बिझनेस कमी होता.आमचं काम घेतल्यावर सृष्टीत पॉझिटिव्ह गुडलक लहरी निर्माण होऊन त्यांच्याकडे 5 मोठी प्रोजेक्ट आली आणि त्यांच्यावर छाप पाडणे महत्वाचे ठरू लागले.

त्यात 'ओ' च्या एकंदर रिसॉर्स मॅनेजमेंट मुळे एक इलेक्टरीशीयन येऊन आधीची पाहणी करणार, दुसरा येऊन भिंतींना खड्डे पाडून वायरीची खाच बनवणार,तिसराच येऊन स्विचबोर्ड लावणार असा सगळा खो खो होता.या खो खो मध्ये मूळ कॉन्स्टंट आम्हीच असल्याने आम्हाला डोकं ठिकाणावर आणि थंड ठेवून सर्वाना एका पानावर ठेवणं गरजेचं होतं.सुतार टीम बदलत राहिल्याने त्यांनी टीव्ही चं पॅनल 3 वेळा काढून परत बसवलं. आमच्या दोघांपैकी जे कोणी ऑफीस ला जाईल त्याचा व्हॉटसअप वर पहिला प्रश्न 'आज टीव्ही पॅनल परत तोडलं का लॅमीनेट बसवलं' हा असायचा.प्रत्येक ऑफिस ला जाणाऱ्या निरागस जीवाला 'आपण घरी येऊ तेव्हा काहीतरी एक आयटम जोडला गेला असेल,छान वस्तू लावता येतील' असं वाटायचं.घरी येऊन बघावं तर एखाद्या बिझी सलून मध्ये 5 माणसांच्या अर्ध्या अर्ध्या दाढ्या करून फोन घ्यायला बाहेर जाणाऱ्या माणसा सारखं एक कपाटाचे फक्त 2 कप्पे, दुसऱ्याचं दार,तिसऱ्याचं मॅग्नेट राहिलेलं असं सगळंच फर्निचर अर्धंमुर्ध दिनवाणं उभं असायचं.(सुतार काही चूक करत नव्हते. जितकी फायनल प्रोडक्ट लॅमिनेट लावलेली जास्त, तितकें ओरखडे, गोंद न सांडणे,वेल्डिंग कटिंग च्या ठीणग्या जाऊ न देणे याबद्दल जास्त जपावं लागतं.)आता आता जरा सगळ्या पृष्ठभागावर लॅमिनेट लागायला लागले.

ओ च्या चांगल्या गोष्टी या की मटेरियल आणि कामाची प्रत चांगली आहे.शिवाय त्यांनी आमच्या डोक्यातल्या अनेक अबस्ट्रॅक्ट कल्पना नीट पूर्ण केल्या.यातली महत्वाची माझ्यासाठी म्हणजे परदेशात असते तशी शूज, कोट्स आणि हेल्मेट काढून ठेवण्याची लिव्हिंग रूम च्या एका कोपऱ्यात करण्याची चिमुकली(आत नुसती उघडी शेल्फ असलेली) लाकडी खोली.(याला आम्ही 'पसारा करण्याची खोली' म्हणतो.आम्ही आता लिव्हिंग रूम च्या सर्व पृष्ठभागावर टाकतो त्या गोष्टी एकाच खोलीत टाकायच्या.)दुसरी गोष्ट म्हणजे पार्सल्स आत टाकता येतील अशी चौकोनी झडप खिडकी असलेलं दार.हे रेडिमेड दारांमध्ये पण मिळतं.

अश्या प्रकारे गणपती नंतर नवरात्रात 'पूर्ण होणार' अशी वदंता असलेलं काम दिवाळीत पूर्ण होणार होतं.पण 'तुमच्याकडे साईटवर बनवायच्या गोष्टी खूप जास्त आहेत' म्हणून ते अजून बाकी आहे.बहुतेक दिवाळी नंतर 15 दिवसात होईल.आम्हीही मख्खपणे सामानाच्या ढिगात स्वयंपाकघर आणि एक खोली मोकळी स्वच्छ आणि टापटीप ठेवून तिथे मजेत राहतो आहोत.जेव्हा होईल तेव्हा होईल.

सध्या सोसायटी वाले सोसायटीत चकरा मारता मारता भेटले की 'क्या बात है,अभीभी पुरा नही हुवा, महल बना रहे हो क्या' विचारतात.आम्ही पण शांतपणे 'ह्या ह्या ह्या, होने के बाद आ जाओ देखणे' म्हणून महाल बनवत असल्याच्या ऐटीत म्हणून पुढे निघून जातो!! कितीही छोटे बदल असले तरी आमच्यासारख्या कष्टाच्या व्हाईट मनी ने आयुष्यात कधीतरी मोठं काम काढणाऱ्या लोकांसाठी आमचा महालच तो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages