असंख्येच्या अपारी- A trip to infinity

Submitted by अस्मिता. on 29 July, 2024 - 18:06

A trip to infinity- Netflix - trailer
चित्र साभार #नेटफ्लिक्स.
https://youtu.be/CNFm_DzHDaE?si=9PYh_K9w64QyC-6s
इंग्रजी शब्दांचा सढळ वापर माझ्या आणि वाचकांच्या सोयीसाठी केला आहे, जाणीव आहे.

असंख्या किंवा इन्फिनिटी म्हणजे काहीतरी अगणित, अमर्याद, अमोज. ही गणित आणि विज्ञान दोन्ही विषयांतील अमूर्त संकल्पना आहे. अमर्याद गोष्टींची पहिली ओळख लहान वयात तारे मोजताना होते. पहिली जाणीव की काहीतरी आपल्या कुवतीबाहेरचं आपल्याला सताड डोळ्यांनी दिसतंय पण ते कधीही संपणारं नसावं. ते एकाचवेळी भयप्रद किंवा गूढ असल्याने कुतूहल जागवणारं असं दोन्ही असतं. माझ्यासाठी ही संकल्पना नेहमीच आकर्षक राहिली आहे. काळ कधीच संपत नाही, काळ्याकुट्ट विहीरीच्या डोहाचा तळ कधीच दिसत नाही. काळ अस्तित्वात नाहीच मुळात, फक्त घड्याळं आहेत. काळ अमर्याद आहे पण आपल्याला मर्यादेतच जगता येतं. हे कदाचित मानवाला मोजता यायला लागल्यावर लक्षात यायला लागले असावे. कारण तोपर्यंत 'मोज' आणि 'अमोज' कल्पना दोन्ही समानच. माणूस तेव्हाच खूप मोठा होतो जेव्हा त्याला कळतं की तो विश्वाच्या पसाऱ्यात किती इवलासा आहे. याकारणाने इन्फिनिटीचा विचार करायला हवा.

असंख्येचे तीन प्रकार आहेत- भौतिक, गणितीय आणि आधिभौतिक.
(Physical, mathematical and metaphysical)

गणितीय-
गणितातल्या कुठल्याही अमूर्त संकल्पनेच्या वापराआधी नियम घालून तिला अस्तित्वात आणावे लागते. हे सगळं आपल्या अनुभूतीबाहेरचं असल्याने अनपेक्षित किंवा counterintuitive आहे. काही तज्ज्ञांच्या मते आपल्या कल्पनेबाहेरची ही संकल्पना अस्तित्वातच नाही.

ही जरी संकल्पना असली तरी आपल्या सोयीसाठी गणितात हे ∞ चिन्ह तयार करून त्याला manipulate करून मोठमोठ्या गणना करता येतात.

∞ +1 = ∞
येथे दोन्ही ∞ वजा केल्यास 1=0 हे गणितीय संकल्पनांना छेद देणारे उत्तर मिळते.
∞ + ∞ = ∞
∞ + ∞ - ∞ =0

मग असे अनेक विरोधाभास दर्शविणारे paradoxes तयार होतात आणि गोंधळ वाढायला लागतो. ∞ ला एका न संपणाऱ्या वर्तुळासारखे मानले तर कोपरा किंवा corners वाढवत नेलेला कुठलाही आकार वर्तुळ धारण करतो आणि हळुहळू कोपऱ्यांची संख्या इतकी वाढत जाते की शून्यवत होते.
पुन्हा ∞ =0 ....

दोन ∞ मधे असलेली बिंदूंची समान संख्या/ असंख्या.
एक सेमी. त्रिज्येचे वर्तुळ मधोमध धरून त्याभोवती एक एक अब्ज त्रिज्येचे वर्तुळ आखले, आणि लहान वर्तुळातल्या केंद्रस्थानापासून मोठ्याला नवीन त्रिज्या काढत गेले तर दोन्ही वर्तुळाच्या परिघावरील बिंदूंची संख्या समान येते.

∞ च्या 'अलिकडले-पलिकडले' खरोखरच काही आहे ?

सूक्ष्मतम असंख्या- 1 ÷ ∞
संख्यारेषेवरील शुन्याखालील अपूर्णांक संख्या आणि घातांक हेही असंख्येपर्यंत नेता येतात. Pi, e, decimals.........
Infinite hierarchy of infinity ?

भौतिक- run universe.exe
जेव्हा ब्रह्मांड अस्तित्वात आले तेव्हा ते एका अपरिमेय संख्येच्या स्फोटाप्रमाणे (continuum) वाढत गेले, आणि ते असेच अमोज पसरत जाणार आहे. जर एक अमर्याद लांबीचा दोरखंड घेऊन त्याचे तुकडेतुकडे करत अक्षरशः चूर्ण केले. तर त्या चूर्णात सगळे अणुरेणू-पुंजकण सामावलेले असावेत. जे एकाच अमर्याद गोष्टीचा अंश असल्याने एकाचवेळी खंडीत आणि अखंडीत आहेत.

कृष्णविवराच्या गर्भात नेमकं काय घडतं कुणालाच माहिती नाही. पण आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्ताप्रमाणे (General theory of relativity) कृष्णविवराच्या क्षितीजावर रिक्त आणि पर्यायाने भाररहीत अवकाश (neutral region of space?) असते. पण तेथून तुम्ही पडतपडत कृष्णविवराच्या केंद्रस्थानी गेलात तर वस्तुमान व घनता यांच्या अमर्याद तीव्रतेने-दबावाने (space-time) अस्तित्वाच्या बाहेर पडता, त्या अस्तित्वहीन स्थितीला 'singularity' म्हणतात. इन्फिनिटीची (अनंताची) थेअरी अचानक singularity (एकल) होते. तेथे ज्ञात विश्वापेक्षा वेगळे 'पुंजभौतिक' असण्याची शक्यता आहे. कधीही न संपणारे 'वर्महोल' हे त्याचेच उदाहरण आहे.

समजा एक सफरचंद एका काचेच्या बंद डब्यात ठेवले. महिनाभराने बघितले तर त्याची धूळ झालेली असेल. असेच त्या धुलीकणांचे शतकभराने विघटन होतहोत अब्जावधी वर्षांनी त्यातील न्यूट्रॉन प्रोटोनमधे रूपांतरीत होतील. ही सगळी ऊर्जा एकवटून आण्विक होईल, आणि तिचे वेगवेगळ्या कणांत परिवर्तन होईल. Iron nucei and photons......! 10 to the 10 to the 24 इतक्या वेळा परिवर्तन होऊन पण तरीही इन्फिनिटीच्या तुलनेत कुठेतरी मर्यादितच असल्याने कुठल्यातरी क्षणी हे सगळे मुळच्या सफरचंदात बदलेल. कदाचित आपण सध्या अशाच डब्यात बंद असू. अमर्याद ब्रह्मांडाचे यावर नियंत्रण असल्याने हे परिवर्तनाचे 'पॅटर्न' कधीतरी पुनःपरिवर्तित होण्यास सुरवात होईल. ही थेअरी अगणित ब्रह्मांडे आणि वारंवारता (frequencies) यांचा आधार आहे. वेगवेगळ्या विश्वातल्या आपल्या आवृत्त्या, अगणित पृथ्वी- अगाध शक्यता, अमर्याद...!

आधिभौतिक-
हे असंच कधीही न संपणारं असेल तर आपण इतके क्षूद्र की आपण नाहीतच , नव्हतोच. आपले पडसाद सुद्धा नसतील. काळाच्या पाठीवरचे ठिपके. ठिपका तर ठिपका , उमटवावा लागेलच. आपण या अमूर्ताला मर्यादित करण्याची कल्पना करू. सगळं विश्व प्रसरण पावत आतल्या दीर्घीका एकमेकांपासून दूर जात आहेत. ही सगळी ऊर्जा एकेदिवशी शीतल होईल. जीवसृष्टीचा विनाश होईल, शंभर अब्ज वर्षांनी. सगळे पुंजकण अखंड काळोखात अविरत फिरत राहतील. विश्व अमर्याद आणि आपण मर्यादित असलो तरी कुठेतरी शेवटची जाणीव श्वास घेईलच, शेवटचा विचार पाझरेलच. तरीही या सगळ्या अद्भुताचा भाग असणं, याबद्दल जाणून घेणं, नेणिवेत ह्याची नोंद असणं- अगदी कमी काळासाठी येथे येणाऱ्यांना सुद्धा आनंद, उत्तेजना आणि प्रेरणा देईलच. कदाचित माहिती नसणं या उत्सुकतेचा स्रोत असेल आणि यातून नव्या आस्था जन्म घेत असतील. जणू मनिमाऊच्या पिल्लाला पुंजभौतिकीचे कुतूहल. आपापल्या मर्यांदांचे भान ठेवू व अधूनमधून त्याला धडका देत राहू. At least not bound our imagination and our creativity because we are limited..! Happy

हिंमत केली आहे... झालं Happy !
©अस्मिता.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख मस्त आहे. काहीतरी भन्नाट मांडलयस. मला तर प्रतिसादांतून कोण कसे व्यक्त होतील ते पहायची फार उत्सुकता लागली आहे.
विद्याविहारच्या कृष्ण मंदिरात, २ आरसे एकमेकांकडे तोंड करुन व मधे देव. ते कृष्णाचं रुप असच इन्फायनाईट दिसतं आपल्याला. चक्रावायला होतं.
-----------
ईश्वर अनादि आहे असे म्हणतात तेव्हाही चक्रावायलाच होतं. सुरुवात नाही म्हणजे काय! जे काही आहे त्याला सुरुवात ही असणारच. एकवेळ अनंत हां असेल ब्वॉ आता तो चालूच रहाणार, चालूच रहाणार- असे वाटते पण अनादि ही संकल्पना झेपत नाही.
अनंत म्हणजे अंत नाही हे जरा तरी कवेत येते किंचित तरी कंट्रोलेबल वाटते. पण निगेटिव्ह इन्फिनिटी म्हणजे संख्यारेषेवरती अनादि ये कुछ पल्ले नही पडता.
--------------
समांतर रेषा म्हणे इनफिनिटीला जाउन छेदतात. ही कल्पना कोणी आणि का लढवली?
--------
अजुन एक मस्त कल्पना जर इनफायनाईट माकडे जर टाइपरायटरवरती काही रँडम कळा (किज) टायपत बसली तर एका विविक्षित क्षणी शेक्स्पीअरचे समग्र साहित्य टाइप होइल.
https://en.wikipedia.org/wiki/Infinite_monkey_theorem#:~:text=The%20infi....
------------
अनंतावरची एक डॉक्युमेन्टरी पाहीलेली आहे. ती हीच असावी बहुतेक.

माझ्या मते इन्फिनिटी म्हणजे फक्त एक संकल्पना (concept) आहे, ज्याचा वापर करून वैज्ञानिक या निसर्गाचे (Nature) कोडे उलगडण्याचा प्रयत्न करतात. निसर्गात अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या अचूक मोजणे मनुष्याच्या कुवतीबाहेर आहे, उदा. पृथ्वीवर वाळूचे कण किती आहेत? अश्या वेळी अनंत (infinity) ही संकल्पना उपयोगी पडते. तसेच अध्यात्मात अनंत ही संकल्पना वापरून देवाचे अस्तित्व सगळीकडे आहे, असे सांगून लोकांना मूर्खपण बनवता येते. त्यामुळे इन्फिनिटी फार उपयोगी आहे.

Two things are infinite: the universe and human stupidity; and I’m not sure about the universe!
- often attributed to Albert Einstein

Happy आवड असल्यास हा माहितीपट बघा लोकहो. हा लेख त्याचा परिचय आहे. माझी अशी कसलीही भर घातलेली नाही, उलट जेवढे मांडलेय ते समजून घेताना सुद्धा 'फेफे' उडाली होती. काही तरी नाविन्यपूर्ण आणि intriguing वाटले म्हणून लिहिले. I am not selling anything..!

लेख आवडला..
सहमती / असहमती आपल्या ठिकाणी. पण अफाट अनंताकडे आणि सूक्ष्मतम अस्तित्वाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण पाहणे विलक्षणच.

नेफ्लि सध्या नाहीये. सुरू झाले कि नक्की पाहणार.
धन्यवाद शिफारशींबाबत..

अजुन एक मस्त कल्पना जर इनफायनाईट माकडे जर टाइपरायटरवरती काही रँडम कळा (किज) टायपत बसली तर एका विविक्षित क्षणी शेक्स्पीअरचे समग्र साहित्य टाइप होइल. >>> अशीच एक कल्पना म्हणजे बोईंग विमानाचे सुटे भाग एका भल्या मोठ्या पोत्यात घालून अनंत वेळा हलवले, तर कधीतरी वर्किंग आणि functioning विमान तयार होईल. पण हे थेरॉटिकल आहे. प्रॅक्टिकली असे होणार नाही.

असंख्येच्या अपारी- A trip to infinity
Happy

हा माहितीपट बघितलाय मी. म्हणजे नवऱ्याने लावला होता आणि मी अधूनमधून बघितला. गणितात लागणारी एक सोय यापलीकडे मला इन्फिनिटी या संकल्पनेत फार रस वाटत नाही. Happy

अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी येते
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतीस्तव बसते
उठून गड बेलाग लांघण्या पुन्हा कंबर कसते
अनुमानाची निष्कर्षाची कास पकडुनी चढते

जिथे संपते वाट त्या तिथे असे काही लखलखते
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडते

>>>>>>>>बोईंग विमानाचे सुटे भाग एका भल्या मोठ्या पोत्यात घालून अनंत वेळा हलवले, तर कधीतरी वर्किंग आणि functioning विमान तयार होईल.
हाहाहा

कालपासून आत्ता तिसर्‍यांदा वाचला लेख. माझंही थोडं फा सारखं झालंय. अजून पूर्ण समजला नाही लेख असं वाटतंय. पण डॉक्युमेंटरी नक्कीच बघेन. इंटरेस्टिंग कन्सेप्ट. इन्फिनिटीचं एक गूढ आकर्षण आहे मला.

बरं, बघते! Proud

जोक्स अपार्ट, अनंताची कल्पना गूढरम्य खरीच.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते!

मला कॅल्क्युलसमध्ये 'लिमिट्स' शिकलो तेव्हा असं एकदम वाटलेलं की परफेक्शनचा (किंवा अध्यात्माकडे कल असणार्‍यांचा सायुज्यतेचा) ध्यास हा 'limit x tending to ∞' असाच नसतो का?
इन्फिनिटी कोणी अचीव्ह करू शकत नाही, कारण ती एक अशी जागा नाही, पण प्रवास करायचा तो मात्र त्या दिशेने!

कुसुमाग्रज म्हणाले होते ना,
अससि कुठे तू, अखंड मानवयात्रा तुज शोधिते
किंवा अससी मृगजळ, परि जे प्रगतिपथी ओढिते

काळाचीही अशीच गंमत. आपण 'काळ' म्हणतो तेव्हा खरंतर काल'गणने'बद्दल बोलतो - एक बदलाचं एकक या अर्थी. घड्याळातल्या काट्याचं स्थान बदललं म्हणून कालगणना. वय वाढलं म्हणून कालगणना. पण जे अपरिवर्तनीय आहे, तिथे काळाला काय अर्थ उरेल?!

तस्मात, डॉक्युमेन्टरी बघते. हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. Happy

हळुहळू कोपऱ्यांची संख्या इतकी वाढत जाते की शून्यवत होते. >> कशी? टेंड्स टू इन्फिनिटी होईल ना?

दोन ∞ मधे असलेली बिंदूंची समान संख्या>> हे आधी दोन इन्फिनिटी का म्हटलं आहे समजलं नाही. पण वर्तुळावरील बिंदू अगणित म्हणायचं असणार. आणि एका अगणित सेट मधला प्रत्येक बिंदू दुसऱ्या अगणित सेट मध्ये एकास एक प्रमाणात आहे हे सांगायची ही क्लृप्ती फार आवडली. पण त्यात काही तरी गफलत आहे का विचार करतोय. पण कुठलाही आकार उलगडून वर्तुळ करता येतो. त्यामुळे गणितात तरी काही गफलत नाही. तो नकाशा वरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा आणखी आणखी सूक्ष्म करत गेलं तर ती अगणित होते हा प्याराडोक्स आठवला.
डॉक्युमेंटरी बघतो.

अस्मिता लेख वाचलाय. गहन कन्सेप्ट असल्याने विचार केला की सिरीज बघावी मग काही (सुचले तर) प्रतिसाद द्यावा. रुमाल टाकून ठेवतेय.

लेख आवडला. माहितीपट बघेन आता.

अमोज म्हणजे ज्याला मोजदाद नाही, ज्याला कशातही बांधता येत नाही, कोणत्याही आकार उकारात चिमटीत पकडून दाखवता येत नाही ज्याला अंत्य मध्य सुरवात अशी काही एक कंसेप्ट शिवत नाही किंवा जे स्वतःच हे सगळे आहे किंवा हे त्या पल्याडचे आहे. मला वाटते वर्तमान हा ही खरेतर timeless concept आहे ना? वर्तमान खरेतर मोजता येत नाही पकडीत येत नाही. जे पकडीत येते ते time clock वर सेकंद मिली मिली मिली किंवा अजून भाग देत कुठल्यातरी काळाच्या पॉईंटवर घडलेलेच असते. म्हणजे मी आत्ता इथे हे लिहीतेय हा मायक्रो सेकंदचा भूतकाळच का? कुठेतरी वाचले होते याबद्दल पण आता रेफरन्स बूक आठवत नाहीये - infinity is timeless and so is present.
पण तरी आपण ज्याला being in present, mindfulness etc म्हणतो ते या वरच्या timeless present या व्याख्येशी न जुळणारे (किंवा मला तसे वाटले/समजले असावे) असले तरी आत्ता जिथे आहोत, आत्ता जे करत आहोत, आत्ता जो श्वास घेतोय त्या क्षणाशी प्रामाणिक रहायचा प्रयत्न करत रहायला हवा. mindfulness समजून घेताना जे हाताच्या मुठीत आले ते हेच.

(अजून एक स्वगत मोड ऑनः ब्रह्मा विष्णू शंकर यांना (ढोबळमानाने) निर्मिती, संरक्षण आणि विनाश या कार्याशी जोडले जाते. हे तिघे मिळून जे तयार होते त्या लूपलाच infinity म्हणता येईल का?) (डोक्याचं दही होईल इतके अजून काही बाही उकळ्या फुटल्यासारखे फुटत असते आत. पण सगळ्याला नेमक्या शब्दात एकाचवेळी बांधताही येत नाहीत मला) )

हा ब्लॉग म्हणजे abstract पेंटिंग सारखा झाला आहे. प्रत्येकाला नवीन नवीन अर्थ लागत आहे. वेरी इंटरेस्टिंग!

काल वाचताना शेवटचा मुद्दा 'अधिभौतिक' वाचुनही आधी 'गणित' आणि 'भौतिक' येऊन गेल्याने शेवटी अध्यात्मिक असणार असं डोक्यात बसलं होतं.
विश्वाच्या पसार्‍यात आपण क्षुद्र आहोत, पण त्याचं काय? विश्व निर्माण झाल्यापासून अनेक बदल होत आज मानव असा उत्क्रांत झाला. मानवाचं ही जाऊदे आपण समजा १०० वर्षे जगणार. उत्क्रांती समजुन घेणे हे फार उत्कंठावर्धक आहेच. पण तितकंच. आपल्या नंतर विश्वाचं काय होईल आणि विश्व शेवटचा श्वास घेईल.. हो घेईलच. या बाबत लाईफ, लिबर्टी आणि पर्स्युट ऑव हॅपिनेस हेच मला भावतं. आपल्याला जे करता येईल ते करावं आणि मरुन जावं. 'चिंता करितो विश्वाची' म्हणून नक्की काय होणार आहे?

बाकी विश्व सिंग्युलॅरिटीतुन जन्माला आले यावर बरीच सहमती आहे. त्याचा अंतही कदाचित सिंग्युलॅरिटीतच होईल असं काही शास्त्रज्ञांचं मत आहे. आता याला ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला एक सेकंद कुणाला म्हणायचा असेल तर म्हणू शकतो. असंही आपल्याला सगळं सगळं आधीच माहित होतंच! Happy

प्रतिसाद नीट वाचायचे आहेत. धन्यवाद सर्वांना. Happy

अतिशय कष्टाच्या दिनचर्येत असं क्लिष्ट काही वाचायला/बघायला नको वाटतं याची पूर्ण कल्पना आहे. मला सुद्धा बरेचदा कंटाळा येतो. पण कंफर्ट लेव्हलच्या बाहेरचं काही तरी बघणं/वाचणं/ लिहिणं या शिवाय आत्मविकासाला पर्याय नाही. नाही कळलं तर नाही कळलं पण प्रयत्न करत रहाणं हीच आपापल्या परिघातील उत्क्रांती असावी

आपल्याला काहीच माहिती नाही एवढं कळतं हे बघून.‌ उत्क्रांतीत आपण दूरवर आलो आहोत तरीही या अजस्र पसाऱ्यापुढे ती चिमुकली पावलं ठरतात. या माहितीपटात तज्ज्ञ मंडळी एकत्र येऊन या थेअरी विषयी जी माहिती, अंदाज आणि भाकिते यांवर चर्चा करतात ती अधुनमधून टेक्निकल झाली तरी बहुतांश वेळा रोचक वाटली. मी चार वेळा बघितला हा माहितीपट. अजूनही बऱ्याच गोष्टी कळल्या नाहीत. अधुनमधून विनोदही पेरले आहेत, काही गोष्टी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनावर सोडून दिल्या आहेत. वेगवेगळे पर्स्पेक्टिव्हज बघूनही निष्कर्षाप्रत येता येत नाही हीही आगळीवेगळी गंमत आहे.‌ Happy

फिल्म बघितली. लोकहो, ती फिल्म प्रत्यक्ष बघा जी समजायला बरीच सोपी आहे या लेखापेक्षा, आणि या लेखात अध्यात्म्याशी बळंबळं लावलेला संबंध नाहीये त्यात. गणित/भौतिकशास्त्र याच्या संदर्भाने माहिती देणारी ही डॉक्युमेंटरी आहे. माझ्या मते ७/१० गुण, युट्यूबवर याच्यापेक्षा चांगल्या डॉक्युमेंटरी उपलब्ध आहेत.
(विज्ञान, गणित, मेडिसिन, इंजिनियरिंग हे विषय शक्यतो इंग्रजीतून शिकावेत, असे माझे वैयक्तिक मत आहे.)

अजून टीन एज मधे असल्याने नक्की कल्पना नाही.
पण पस्तिशीनंतर गूढाचे आकर्षण वाढते ( गेल्या जन्मातल्या अनुभवावरून). गूढ, अनंत, विशाल ते सूक्ष्मातिसूक्ष्माचे आकलन याकडे कल वाढतो.... असे बड स्पेन्सर या मानसशास्त्राज्ञाने म्हटलेले आहे.

महान विचारवंत रॉबर्ट डी नीरो म्हणतो कि, आपल्या परीने उत्तरं शोधण्याचा खेळ आपण स्वतःशी खेळू लागतो. क्वचित काहींना हा खेळ इतरांशी शेअर करावासा वाटतो. किती जणांसोबत असे घडत असेल ?

दोन वर्षांनी आर टी ओ मधे जाऊन शिकाऊ परवाना काढायचा आहे, त्यानंतर कदाचित या चर्चेत भाग घेऊ शकेन.
तोपर्यंत दादा कोंडकेचे सिनेमे बघून घेतो. प्रौढांसाठी आहेत (चटकन प्रौढ होण्यासाठी).

आणि या लेखात अध्यात्म्याशी बळंबळं लावलेला संबंध नाहीये त्यात.
>>>>
पण मी नाही लावलेला. उलट मी तसं होऊ नये असेच प्रयास केले होते.
तुम्हाला माझं लेखन आवडत नाही, वावर आवडत नाही. त्यामुळे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून तुम्ही टॉक्सिक प्रतिसाद देत असता. हल्ली तर संधीची वाट बघत असता. हे प्रामाणिक मत-बित नसून मानसिक खच्चीकरण आहे. त्यामुळे निःशब्द.

हे प्रामाणिक मत आहे. याउप्पर तुमची मर्जी.
मी तुमच्या लेखांवर किती प्रतिसाद दिले आहेत ते बघा एकदा. खूप कमी दिसतील. (आजपर्यंत तुमचे ७१ लेख आहेत, ४४८२ एकूण प्रतिक्रिया आहेत, त्यापैकी माझ्या १% पण नाहीत).

अध्यात्म, ज्योतिष्य वगैरे तुमच्या आवडीच्या विषयांविरुद्ध बोललेले कदाचित तुम्हाला आवडत नसेल आणि त्यामुळे पूर्वग्रह कदाचित तुमचाही असू शकेल. माझे तुमच्याशी किंवा इतर कुणाही मायबोलीकराशी काहीही वाकडे नाही. (आणि हे मत या धाग्यापुरतेच असते, पूर्वी कधीतरी कुठल्यातरी धाग्यावर काय मत दिले, याचे बॅगेज मी बाळगत बसत नाही.)

हे क्लिष्ट लिखाण आहे/विषय क्लिष्ट आहे, असे इतरांनी म्हटले आहे. तरी स्वतःच्या लेखनाचे तुम्हीपण जरा आत्मपरीक्षण केले तर असा त्रागा करावा लागणार नाही.

मला काहीही समजलं नाही आणि ह्या आयुष्यात हे असल भौतिक (हे भौतिक ना रसायन नाही ना??) विज्ञान, गणितीय समजेल अशी अजिबात शक्यता नाही .. विज्ञाना , गणिता असं का बरे रुसलास माझ्यावर लहानपणापासून ??? Proud

लेख क्लिष्ट वगैरे अजिबातच वाटला नाही. रादर चीप (ऑन ब्रेन) करमणुकीपेक्षा वरचढ वाटला. काम करताना चीप करमणूक हवी असतेच पण काही नवा विचार पटणारा/ न पटणारा डोक्यात आला की वेळ जरा बरा जातो.
बाकी अस्मिताने भविष्याबद्दल कुठे लेखन केलं आहे? काही तरी आयडीत गल्लत होत असणार. मला तरी तिचे प्रतिसाद दैववाद/ भविष्य इ. च्या ठार विरोधी वाटतात.

Pages