पॅरिस ऑलिंपिक्स २०२४

Submitted by Adm on 10 June, 2024 - 13:28

दर चार वर्षांनी होणार जगातला सर्वात मोठा क्रिडा सोहळा अर्थात उन्हाळी ऑलिंपिक गेम्स यंदा तीन वर्षांनीच होणार आहे. कोव्हिडमुळे २०२०च्या स्पर्धा २०२१ साली झाल्या होत्या. नसलेले प्रेक्षक आणि बरीच बंधनं ह्यामुळे गेली स्पर्धा "गाजली" होती. पण यंदा पँडेमिक संपलेलं असल्याने ह्या वर्षी पॅरिसमध्ये भरणार्‍या स्पर्धांमध्ये नेहमीचा उत्साह दिसेल. स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहेत म्हणजे स्पर्धेला आता पन्नासपेक्षाही कमी दिवस उरले आहेत.

रिओने अपेक्षेपेक्षा खूपच चांगलं आयोजन केलं, नंतर टोक्योने कोव्हिडच्या काळातही स्पर्धा यशस्वी करून दाखवल्या. त्यामुळे आता पॅरिसकडूनही नेत्रदिपक उद्घाटन सोहळा तसेच चोख व्यवस्थापनाची अपेक्षा आहे.

हा धागा वातावरण तापवण्यासाठी. स्पर्धा अजून जवळ आली/सुरू झाली की उत्साहं असेल त्याप्रमाणे अ‍ॅडमिनांना वेगवेगळा ग्रुप काढण्याची विनंती करता येईल.

ह्याही वर्षी भारताला चांगली पदके मिळतील अशी अपेक्षा करूया आणि त्याकरता खेळाडूंना शुभेच्छा. ह्यावर्षी बहुदा नीरज चोप्रा ध्वजधारक असेल.

ही वेबसाईटः https://olympics.com/en/paris-2024

अजून लिंक सापडतील तश्या मी अपडेट करेन.

Group content visibility: 
Use group defaults

अरे वा ऑलिंपिक येत आहेत.. न्यूज बघत नसल्याने काही समजात नाही. धागा आधीच काढला छान केलेत. भारताला शुभेच्छा.. जिथे जिथे भारत आहे ते ते बघितले आणि फॉलो केले जाईल

पराग, बर झाल ऑलिंपिक्स वर धागा काढलास!

इंडियानापोलिसला होत असणार्‍या यु एस स्विम टिम च्या व युजिन, ओरेगॉनला होत असणार्‍या यु एस अ‍ॅथलेटिक्सच्या ऑलिम्पिक्स ट्रायल्स कोण बघत आहे का? त्या बघत असाल तर यु स्विम टिम व युस अ‍ॅथलेटिक टिम्स मधे कोण कोण असेल व अमेरिकेचे संभाव्य सुवर्णपदक विजेते कोण असतील त्याची तुम्हाला कल्पना येइल. यु एस मेन्स स्विम टिम व यु एस वुमेन्स स्विम टिमला यंदा पॅरीसमधे ऑस्ट्रेलिअन मेन्स व वुमेन्स स्विम टिम्सकडुन कडवी लढत असेल. माझ्या मते पॅरीस ऑलिंपिक्समधे यु एस मेन्स स्विमचे पारडे भारी असेल तर ऑस्ट्रेलियन वुमेन्स टिम पॅरीसमधे बाजी मारुन जाइल.

पुढच्या पोस्टमधे या दोन देशांच्या कोणकोणत्या स्विमर्सकडे आपण लक्ष ठेवायचे याचा आपण आढावा घेउ. पण त्या आधी यंदाच्या या अमेरिकन- ऑस्ट्रेलियन स्विमर्सच्या रायव्हलरी कढे बघायच्या आधी पॅरीस ऑलिंपिक्सच्या निमित्ताने जवळ जवळ ५० वर्षांपुर्वीच्या अश्याच एका धगधगत्या व कंपेलींग स्विम रायव्हलरीज बद्दलचे माझे एक जुने पोस्ट इथे परत एकदा टाकतो! होपफुली. वाचकात पॅरीस ऑलिंपिक्स व त्यात भाग घेणार्‍या निरज चोप्रा व इतर आपल्या भारतिय खेळाडुं व्यतिरिक्तही खुप कुतुहल व इंटरेस्ट जागृत होइल!

मी आजपर्यंत ऑलिंपिक्समधील बर्‍याच स्पर्धांमधल्या स्फुर्तीदायक व मनोरंजक गोष्टी इथे लिहिल्या पण जलतरण स्पर्धा... ज्या मला स्वत्:ला खुप प्रिय आहेत.. त्याबद्दल एकही कथा मी अजुन लिहीली नाही. आज मात्र मी तुम्हाला ऑलिंपिक्स जलतरण स्पर्धेत घडुन गेलेल्या एका अजरामर शर्यतीबद्दल सांगणार आहे. ही शर्यत ऑलिंपिक प्रेमींच्या मनात एक कायमची स्मृती करुन गेली आहे. त्या अजरामर जलतरण शर्यतीच्या स्मृतीला उजाळा देण्याचा माझा हा एक प्रामाणीक प्रयत्न...

चला मंडळी.... या 'रेस ऑफ़ द सेंचुरी' साठी जाउयात १९७६ च्या मॉन्ट्रियाल ऑलिंपिक्सच्या जलतरण तलावात. पण या शर्यतीबद्दल सांगण्या आधी शर्यतीची थोडी पुर्वपिठीका....

ऑलिंपिक्स जलतरण स्पर्धांचा उल्लेख करताना अमेरिकन जलतरणपटुंचा उल्लेखही त्याच श्वासात करण्याइतके प्रभुत्व आजतागयत अमेरिकेच्या पुरुष व महीला जलतरण पटुंनी या स्पर्धांमधे गाजवले आहे. १९२४ व १९२८ मधील जॉनी व्हॅसमुल्लर पासुन ते सध्याच्या मायकेल फेल्प्स नावाच्या "फ़्रीक!" पर्यंतच्या सर्व ऑलिंपिक्स जलतरण स्पर्धा अमेरिकेच्या जलतरणपटुंनी मिळवलेल्या विजयांनी ओतप्रोत भरल्या आहेत. तसे वर्चस्व गाजवण्यात पुरुषांमधे मार्क स्पिट्ज़,ब्रायन गुडेल, जॉन नेबर, मॅट बिऑंडी,टॉम जॅगर, गॅरी हॉल ज्युनिअर,लॅनी केझेलबर्ग एरन पिअरसॉल या अतिरथी महारथींनी मोट्ठा हातभार लावला आहे.महिलांमधे तो भार उचलला आहे डेबी मायरपासुन ते मेरि मेहेर, एमी व्हॅन डायकन,जेनी थॉमसन व जॅनेट एव्हान्स सारख्यांनी.

त्यांच्या या अश्या सार्वभौम ऑलिंपिक वर्चस्वाला अधुनमधुन जरुर आव्हान दिले गेले.. त्यात पुरुषांमधे प्रामुख्याने रशियाच्या ऍलेक्झॅंडर पॉपॉव्ह व डेनिस पेत्रेंकोव्ह, ऑस्ट्रेलियाच्या इयान थॉर्प(जो टोर्पिडो नावाने प्रसिद्ध होता!)व ग्रॅंट हॅकेट, वेस्ट जर्मनिच्या मायकेल ग्रॉस(ज्याच्या दोन्ही हातांची व्याप्ती ७ फ़ुटापेक्षा जास्त होती म्हणुन त्याला 'अल्बट्रॉस म्हणायचे!),हॉलंडच्या पिटर व्हान डन हॉगनबांड व हंगेरीच्या टॉमस डार्नी सारख्यांचा मोठा हात होता. त्यांनी बरेच वैयक्तीक विजय मिळवुन जगाची वाहवा मिळवली.पण एक संघ म्हणुन अमेरिकेच्या पुरुषांनी ऑलिंपिक्समधे नेहमीच अव्वल नंबर पटकावला आहे.

अमेरिकन महिलांच्या बाबतीत मात्र तेच म्हणता येणार नाही. जरी १९२४ पासुन ते १९७२ पर्यंत व १९९२ पासुन आतापर्यंत अमेरिकन महिलाच ऑलिंपिक्समधे सर्वात जास्त पदके मिळवली असली तरी.... १९७४ ते १९८८ या १४ वर्षांमधे अमेरिकन महिला जलतरणपटुंना एक संघ म्हणुन ऑलिंपिक्समधे कधीच पहिले स्थान मिळु शकले नाही!त्यांच्या वर्चस्वाला ती १४ वर्षे काटशह देणार्‍या होत्या... इस्ट जर्मनीच्या महिला! त्या दरम्यान कॉर्नेलिया एंडरपासुन(मॉंट्रियाल ऑलिंपिक्समधे चार सुवर्णपदके!) ते क्रिस्टीन ऑटोपर्यंत(सेउल ऑलिंपिक्समधे सहा सुवर्णपदके!)... इस्ट जर्मनीच्या महिलांनी ऑलिंपिक्समधे पदकांची नुसती लयलुट केली.... अलबत! ऍट द एक्स्पेन्स ऑफ़ अमेरिकन गर्ल्स!

अमेरिकन महिलांच्या पराभवाचे सत्र सुरु झाले १९७३ च्या विश्वस्पर्धांपासुन. त्यामुळे जोपर्यंत १९७६ साल उजाडले व अमेरिकन महिला जलतरणपटुंचा संघ जेव्हा मॉंट्रियालला येउन डेरेदाखल झाला तेव्हा त्यांचा प्रशिक्षक जॅक नेल्सन याच्या डोक्यात विचारांचे काहुर माजले होते... या इस्ट जर्मनीच्या महिलांना या ऑलिंपिक्समधे कसे थोपवायचे? गेल्या ३ वर्षांच्या हेड टु हेड कामगीरीवरुन अमेरिकन महिलांना चिअर अप करण्यासारखे त्याच्याजवळ काहीच नव्हते.. सर्व शर्यतीत इस्ट जर्मनीच्या महिला अमेरिकेच्या मुलींपेक्षा कमीत कमी एका सेकंदाने तरी वेगवान होत्या... एक सेकंद!....जो जलतरण स्पर्धेत युगासारखा असतो! कोच नेल्सन खुप संभ्रमात पडला होता... काय असेल या इस्ट जर्मन महिलांच्या प्रशिक्षणाचे रहस्य? तो काळ कोल्ड वॉरचा असल्यामुळे कम्युनिस्ट इस्ट जर्मनीच्या पोलादी पडद्यामागे त्या देशात काय चालले असते याचा बाहेरच्या जगाला सुगावा लागणे ही केवळ अशक्य बाब होती... पण एक गोष्ट कोच नेल्सनलाच काय.. पण सगळ्या जगाला दिसुन येत होती... या इस्ट जर्मनीच्या महीला एकसाथ सगळ्या अतिशय पुरुषी दिसत होत्या!.. इतक्या पुरुषी..म्हणजे हातापायावरचे भरमसाट केस... शरीराची ठेवण.. जास्तीचे... जे स्त्री शरीरावर क्रुत्रिम वाटतील असे पिळदार स्नायु..त्यांचा तो लो पिच मधला पुरुषी आवाज... की हे सगळे बघुन कोणाच्याही मनात संशय यायला जागा मिळावी की या महिला टेस्टास्टेरॉन सारखे पुरुषी हार्मोन्स तर घेत नाहीत ना? पण कोच नेल्सनकडे ते सिद्ध करायला काहीच पुरावा नव्हता. तो काळ ड्रग टेस्टींगच्या आधीचा असल्यामुळे ती गोष्ट कोणीच सिद्ध करु शकले नसते. म्हणुन ऑलिंपिक्सच्या स्पिरीटला धक्का लागु नये यासाठी कोच नेल्सनने आपल्या संघातल्या मुलींना अशा उघड उघड संशय येणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगीतले.

कोचला असे सांगणे खुप सोप्पे होते पण अमेरिकन मुली व जर्मन मुली सरावाच्या वेळी व ऑलिंपिक व्हिलेजमधुन व्हेन्युपर्यंत जाण्यासाठी बर्‍याच वेळेला एकत्र असायच्या. त्यांचा तो पुरुषी आवाज ऐकुन एक दिवस महिलांच्या लॉकर रुममधुन अमेरिकेची १५ वर्षाची जिल स्टर्केल पळुन बाहेर आली... तिची ठाम समजुत झाली होती की काही पुरुष मंडळी मुलींच्या लॉकररुममधे धुमाकुळ घालायला पलीकडच्या बाथरुममधे आली आहेत!

झाले... स्पर्धांना सुरुवात झाली... आणी कोच नेल्सनला ज्याची भिती होती तेच घडायला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अमेरिकेची सर्वोत्तम जलतरणपटु शर्ली बाबाशॅफ़.. जिच्याकडुन अमेरिकेची ७ सुवर्णपदकांची आशा होती.. ती १०० मिटर्स फ़्रिस्टाइलमधे...तिच्या सगळ्यात स्ट्रॉंग इव्हेंटमधे... पदक न मिळताच रिकाम्या हाताने परत आली!

१९ वर्षांची शर्ली बाबाशॅफ़... जी १९७२ च्या म्युनिक ऑलिंपिक्समधे अवघी १५ वर्षांची असताना २ रजतपदक व १ सुवर्णपदक जिंकुन आली होती व आता तिच्या प्राइम फ़ॉर्म मधे या ऑलंपिक्समधे एकुण ७ शर्यतीत उतरुन एकुण २१ वेळा जलतरण तलावात उतरणार होती.... जी शर्ली बाबाशॅफ़... जी महिलांमधे मार्क स्पिट्झसारखा ७ सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम करण्याची स्वप्न बघत होती.. ती शर्ली बाबाशॅफ़ तिच्या पहिल्याच प्रयत्नात सपशेल तोंडावर आपटली होती. १०० मिटर्सची विजेती होती.. अर्थातच.. इस्ट जर्मनीची.. कॉर्नेलिया एंडर..

आणी पुढच्या ५ दिवसात त्याचीच पुनरावृत्ती मॉंट्रियालच्या ऑलिंपिक जलतरण तलावात सगळ्या जगाला दिसुन आली... २०० मिटर फ़्रिस्टाइल.. सुवर्णपदक...कॉर्नेलिया एंडर.. रजतपदक... शर्ली बाबाशॅफ़!... ४०० मिटर फ़्रिस्टाइल... सुवर्णपदक.. इस्ट जर्मनीची पेट्रा थुमर.... रजतपदक... शर्ली बाबाशॅफ़! ८०० मिटर्स फ़्रिस्टाइल.... सुवर्णपदक.... इस्ट जर्मनीची पेट्रा थुमर... रजतपदक... शर्ली बाबाशॅफ़!

असे रोज होत असताना शर्लीला ती परत परत दुसर्‍या स्थानावर येणाचे शल्य खुप जाचत होते. तिलाही कोच नेल्सनप्रमाणे इस्ट जर्मनीच्या महिलांनी ड्रग्स घेउन तसे शरीर कमावले आहे असे ठामपणे वाटत होते व तिने शेवटी न राहवुन त्या संशयाबद्दल उघड उघड बोलुन तोफ़ डागली! सर्व ऑलिंपिकभर शर्ली बाबाशॅफ़च्या त्या आरोपाने खळबळ माजवली. बर्‍याच लोकांनी तिला पराजय न पचवता आलेली एक "सोअर" लुजर असेही म्हटले..... इस्ट जर्मनीच्या महिलांनी तर तिला "सर्ली" बाबाशॅफ़ असे म्हणायला सुरु केले. तिने जेव्हा इस्ट जर्मनीच्या महिलांच्या पुरुषी आवाजाचा उल्लेख केला तेव्हा इस्ट जर्मनीच्या महिलांनी तिला टोमणा मारला की त्या इथे फक्त स्विमींग करायला आल्या आहेत.... गायला नाही....

तर अश्या या अमेरिकन व इस्ट जर्मन महिलांमधल्या अतिशय कडव्या लढतीला जलतरण स्पर्धेच्या शेवटच्या दिवसांपर्यंत प्रचंड उकळी फुटली होती... दोन्ही बाजुच्या एमोशन्स एकदम हाय होत्या... तवा दोन्ही बाजुने प्रचंड तापला होता... व अशा परिस्थीतीमधे मला ज्या शर्यतीबद्दल सांगायचे आहे त्या शर्यतीचा दिवस उजाडला....

जलतरण स्पर्धेचा शेवटचा दिवस... संध्याकाळची शेवटची एकच शर्यत बाकी होती... महिलांची ४ बाय १०० मिटर्स फ़्रिस्टाइल रिले... ५० मिटर्सच्या तलावाच्या लांबीला प्रत्येक खेळाडु जाउन येउन असे १०० मिटर पोहोणार... इस्ट जर्मनीच्या संघाने पहिल्या नंबरवर अंतिम फेरी गाठली होती... त्यांच्यामागे जवळ जवळ २ सेकंद हळु दुसर्‍या नंबरवर अमेरिकेच्या महिला अंतिम फेरीत आल्या होत्या. या शर्यतीतला जागतीक विक्रम इस्ट जर्मनीच्या नावावर होता--- ३ मिनीट्स ४८.८ सेकंद्स.. तर अमेरिकन महिलांचे या शर्यतीतले ऑलिंपिक्सला यायच्या आधीचे बेस्ट टाइमींग होते ३ मिनीट्स ५५.५ सेकंद... तब्बल ७ सेकंदांनी हळु....

शर्यतीच्या दिवसाची सकाळ उजाडली.... त्या आधी रात्रभर अमेरिकन महिला संघाच्या टीम मिटींगमधे खलबते चालली होती... सगळ्यांच्या मनात या शेवटच्या शर्यतीत तरी या गताड्या इस्ट जर्मन महिलांना धुळ चारायची असे वाटत होते... पण वाटणे आणी प्रत्यक्षात ते उतरवणे यात कोच नेल्सनला सात सेकंदांची प्रचंड मोठी दरी दिसत होती... पण तरीही त्याने त्या रात्री आपल्या शिष्यांना एकच गोष्ट सांगीतली... तुमच्या मनातल्या रागाला...तुमच्यावर जो अन्याय झाला आहे असे तुम्हाला वाटत आहे.... त्या अन्यायाला तुम्ही तुमच्या प्रचंड इच्छाशक्तीमधे परीवर्तीत करा...व सगळ्या जगाला दाखवुन द्या की माइंड ओव्हर बॉडी हा नुसता क्लिशे नसुन जर मनुष्याने मनात आणले तर आयुष्यात कुठल्याही अडथळ्याची त्याला भिती वाटायला नको.... बळकट मन हे बळकट शरिरापेक्षाही आधिक प्रभावी असते... जा आणी उद्याच्या शर्यतीत सगळ्या जगाला माइंड ओव्हर बॉडी या क्लिशेला प्रत्य्क्षात उतरवुन दाखवा.... माझ्या मनात किंचीतही संदेह नाही की तुमच्या एकत्रीत इच्छाशक्तीच्या बळावर तुम्ही उद्या एक चमत्कार घडवुन आणणार आहात.... जा आणी स्वत्:ला व आपल्या देशाला गर्व होइल असा परफ़ॉर्मंस उद्या द्या!

कोच नेल्सनच्या या स्पीचने अमेरिकेच्या महिला संघातल्या प्रत्येक खेळाडुंच्या रोमारोमात जिद्दीने पेट घेतला... सगळ्यांनी एकत्र येउन सभा बरखास्त होण्याच्या आधी...एकमेकांच्या गळ्यात हात टाकुन एक मोट्ठा एल्गार केला..... GO.....USSSSAAAAAAAAAAAA!

कोच नेल्सनने फ़ायनल्स साठी किम पेटन,वेंडी बोग्लीओली,जिल स्टर्केल व ऍंकर लेगसाठी अर्थातच शर्ली बाबाशॅफ़ अशी चौघांची निवड केली.

इस्ट जर्मनीतर्फ़े कॉर्नेलिया एंडर लिड ऑफ़ करणार होती मग पेट्रा प्रायमर मग ऍंड्रिया पॉलक व ऍंकर लेग क्लॉडिया हेम्पेल स्विम करणार होती. त्यावरुन त्यांची स्ट्रॅटीजी सरळ दिसत होती... कॉर्नेलिया एंडरला सगळ्यात प्रथम पाठवुन अनसरमाउंटेबल लिड घ्यायचा व उर्वरीत शर्यतीत एंडरने मिळवुन दिलेला लिड बाकीच्यांनी वाढवत न्यायचा.. सोप्पा प्लान! पण इस्ट जर्मनीच्या महिलांना याचा लवकरच साक्षात्कार होणार होता की कधी कधी आयुष्यात सगळ्यात सोप्प्या वाटणार्‍या गोष्टीच मन गाफ़ील राहीले तर सगळ्यात कठीण होउन बसतात!

शर्यत सुरु व्हायला अगदी थोडा अवधी बाकी होता. मॉंट्रियाल ऑलिंपिक जलतरण तलाव अधिर प्रेक्षकांनी खच्च भरला होता. जजेस नी आपापली जागा घेतली.... आठ टाइमकिपर्स हातात स्टॉप वॉचेस घेउन शर्यत सुरु होते त्या काठावर आठी लेनच्या ठोकळ्यांच्या बाजुला येउन उभे राहीले. फ़ायनलला आलेल्या आठी रिले टीम्सच्या पहिल्या स्पर्धकांनी आपापल्या स्टार्टींग ठोकळ्यांवर पुढे ओणवे उभे राहुन स्टार्टर गनची वाट पाहात हात लुज हलवुन स्ट्रेचींग करायला सुरुवात केली.

कोच नेल्सनने शर्यतीची स्ट्रॅटीजी सगळ्यांना व्यवस्थीत समजवुन सांगीतली होती... किम पेटनचे लिड ऑफ़ लेगमधे काम असणार होत की सहा फ़ुटी जायंट कॉर्नेलियाला पहिल्या १०० मिटरपर्यंत एका बॉडी लेन्ग्थ पेक्षा जास्त दुर जाउ द्यायचे नाही... म्हणजे जगातल्या सगळ्यात वेगवान स्विमरला १ सेकंदापेक्षा जास्त पुढे जाउ द्यायचे नाही... तसे झाल्यावर पुढच्या २ स्विमरनी आपल्या आतापर्यंत त्यांनी पोहोलेल्या वेगापेक्षा कमीतकमी १ सेकंद जास्त वेगाने पोहायचा प्रयत्न करायचा व शेवटच्या लेगमधे बाकीचे काम शर्ली बाबाशॅफ़च्या खांद्यावर सोपवुन निर्धास्त व्हायचे...

प्रेक्षकातही एक चांगली जलतरण शर्यत बघायला मिळणार म्हणुन एक इलेक्ट्रीफ़ायींग वातावरण निर्माण झाले होते.. सगळे आपापल्या सिटच्या एजवर... पुढे सरकुन... अधिरतेने शर्यत सुरु व्हायची वाट पाहात होते. तिकडे शर्ली बाबाशॅफ़ मात्र खुर्चीवर शांतपणे डोळे मिटुन ध्यान करत गंभिरतेने बसली होती.. मनातल्या मनात तिच्या पुढे उलगडत असलेल्या शर्यतीची ती उजळणी करत होती. तिला ठाम विश्वास होता की जर इस्ट जर्मनच्या मुलींनी ड्रग्सचा वापर नसता केला तर तीच जगातली सगळ्यात वेगवान जलतरणपटु होती... पण आज तिला त्या जर तरच्या पलीकडे जाउन जगाला दाखवुन द्यायचे होते की ती 'सोअर' लुजर नव्हती... तिला तिच्यातला चॅंपीअन जगाला दाखवुन द्यायचा होता... तिला आजुबाजुचा गोंधळ, प्रेक्षक या सगळ्यांचा विसर पडला होता.. तिच्या बंद डोळ्याच्या पटलावर तिला तिच्या गळ्यात लटकत असलेले सुवर्णपदकाचे चित्र दिसत होते...

फाट्ट! अश्या स्टार्टर बंदुकीच्या आवाजाने शर्लीचे ध्यान भंग पावले व किम पेटन कशी स्विम करत आहे ते बघायला व तिला प्रोत्साहन द्यायला ती खुर्चीवरुन उठुन पुढे सरसावली व किम पेटनला गो किम गो! असे ओरडुन प्रोत्साहन देउ लागली. तिकडे किम झप झप हात मारत मासोळीसारखी पाण्यात सर सर अशी अंतर काटु लागली... स्ट्रोक फ़ॉर स्ट्रोक किम पेटन पहिल्या ५० मिटर्सपर्यंत इस्ट जर्मनीच्या कॉर्नेलिया एंडरबरोबर वेग ठेउन राहीली. पहिल्या ५० मिटर्सच्या वळणावर किम फक्त एक स्ट्रोकच मागे होती... दुसर्‍या ५० मिटर्समधे पण किम पेटनने कॉर्नेलियाबरोबर स्ट्रोक फ़ॉर स्ट्रोक बरोबर राहुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला...पहिले १०० मिटर संपत आले... कॉर्नेलियाने प्रथम भिंतीला हात टेकवले व किम फक्त अर्ध्या बॉडी लेंग्थने कॉर्नेलियाच्या पाठोपाठ १०० मिटर्स पुर्ण करुन आली.... कोच नेल्सनने त्याच्या हातातल्या स्टॉप वॉचकडे पाहीले.... त्याच्या घड्याळानुसार किम पेटनने तिच्या पर्सनल बेस्ट टाइमपेक्षा चक्क दिड सेकंद कमी वेळ १०० मिटर्स स्प्लिटसाठी घेतला होता....

आता वेंडी बोग्लीओलीने पाण्यात सुर मारला होता व पहिल्या श्वासासाठी तिने जेव्हा डोके बाहेर काढले तेव्हा इस्ट जर्मनिच्या पेट्रा प्रायमरला तिने जवळजवळ गाठले होते! वेंडी २१ वर्षाची.... म्हणजे या चारी अमेरिकन मुलींमधे वयाने सगळ्यात मोठी.... व अनुभवानेही सगळ्यात वरिष्ठ होती. त्याची तिला जाण होती व ही शर्यत वेंडी वयाने बाकींपेक्षा जास्त असल्यामुळे अमेरिका हरली असे तिला कोणी म्हटलेले नको होते... त्यामुळे तिही अतिशय तडफ़ेने फ़्रीस्टाइलचे स्ट्रोक झपाझप मारत अंतर काटत होती. ती आणी इस्ट जर्मनीची पेट्रा प्रायमर जवळजवळ एकाच वेळेला दुसरी लेग संपवुन आत आले व तिसर्‍या लेगसाठी एकाच वेळेला अमेरिकेच्या जिल स्टर्केलने व इस्ट जर्मनीच्या ऍंड्रिया पोलकने पाण्यात सुर मारला...

१५ वर्षाची जिल स्टर्केल.... अमेरिकेची सगळ्यात कमी वयाची व कमी अनुभवाची जलतरणपटु! पण आज ती एवढ्या मोठ्या स्टेजवर अमेरिकेची शान आपल्या स्विमिंगच्या स्ट्रोकवर पेलवत जलतरण तलावात उतरली होती. कोच नेल्सनने मुद्दामच तिची निवड केली होती... जास्त अनुभव नसल्यामुळे आंतराष्ट्रीय शर्यतीमधे मानसीक दबाव काय असतो याची तिला जास्त प्रचिती नव्हती.... त्यामुळे तशा दबावाला बळी पडण्याचा प्रश्नच तिला पडणार नाही असा साधा विचार कोच नेल्सनने केला होता... १५ वर्षाच्या.... व भिती अजुन माहीत नसलेल्या या बेडर मुलीने कोच नेल्सनचा होका बरोबर ठरवला... या मुलीने काय करावे? तिचे सवंगडी त्यांच्या पर्सनल बेस्ट वेळेपेक्षा एक एक सेकंदांनी जास्त वेगात शर्यत पोहोत असताना या पट्ठीने तिच्या लेगमधे चक्क तिच्या पर्सनल बेस्ट वेळेपेक्षा तब्बल सव्वा दोन सेकंद कमी वेळात तिचे १०० मिटर्स पोहुन काढले व शर्ली बाबाशॅफ़ला अर्ध्या बॉडी लेंग्थचा लिड तिने मिळवुन दिला!

आता शर्ली पाण्यात झेपावती झाली... आज तिला इस्ट जर्मनीची चौथ्या लेगमधील क्लॉडिया हेम्पलच काय... साक्षात वारासुद्धा लगाम घालु शकला नसता.. इतक्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर ती झपाझप पाणी कापत चालली होती.. ती ही शर्यत.... काल रात्रीपासुन हजार वेळातरी.. मनातल्या मनात पोहोली होती... ५० मिटर्स संपले.. आता फक्त ५० मिटर्स बाकी राहीले होते... शर्ली सर्रकन उलटी वळली... ती पहिल्या स्थानावर होती... तिने आजुबाजुला पाहण्यात अजिबात वेळ घालवला नाही.. सप.. सप.. सप.. करत ती पाणी कापत फ़िनिश लाइअनला टच करण्यास पुढे पुढे येउ लागली.. तिच्यात व इस्ट जर्मनीच्या क्लॉडिया हेम्पलमधे एका बॉडी लेंग्थचे अंतर पडले होते... शर्यत बघणार्‍या सगळ्यांनी तो जलतरण तलाव त्यांच्या ओरडण्याने अक्षरश्: डोक्यावर घेतला होता..कोणीही बसलेले नव्हते... सगळे आपापल्या सिटच्या एजवर येउन उभे राहीले होते...१५ मिटर्स...शर्ली अजुनही पुढेच होती... १० मिटर्स... शर्ली अजुन पहीलीच.... पण आता ती फक्त पाउण बॉडी लेंग्थनेच आता पुढे होती..५ मिटर्स... क्लॉडिआ हेंपलने आपला वेग पुढच्या गीअरमधे टाकलेला सगळ्यांना स्पष्ट दिसत होता व ती आता फक्त अर्ध्या बॉडी लेंग्थने शर्लीपेक्षा मागे होती! १० फ़ुट... ५ फ़ुट... आता शर्लीनेही आपला गिअर बदलला होता व फक्त ३ फ़ुट बाकी असताना ती परत पाउण बॉडी लेंग्थने पुढे गेली होती व.....शेवटचा स्ट्रोक मारताना शर्लीने आपला हात तलावाच्या भिंतीला टेकवला....

इकडे वर काठावर बाकीच्या ३ अमेरिकन मुली.. किम, वेंडी व जिल.. ओरडत ओरडत व नाचत नाचत... शर्ली ई...... शर्ली ई..... गो शर्ली असे एकमेकांचे हात घट्ट पकडुन आनंदाने बेभान होउन उड्या मारत होत्या.... शर्लीने हात भिंतीला टेकवताच डोके बाहेर काढत इस्ट जर्मन टिमच्या लेनकडे पाहीले व तिला तिच्या टिममेट्स किम,वेंडी व जिलच्या हिस्टेरिकल आरड्याओरड्याने लगेच कळले की त्यांनी असंभवाला संभव केले होते.... त्या मायटी इस्ट जर्मन टिमचा स्पर्धेतल्या शेवटच्या शर्यतीत त्यांनी पाडाव केला होता!... शर्लीने डोक्यावरची वॉटरकॅप काढली व तलावातुन बाहेर येत तिच्या तिन टीममेट्सबरोबर.... एकमेकांच्या गळ्यात हात घालुन... रिंगण करत.. तिने नाचायला सुरुवात केली....व एकमुखाने चौघी... USA.....USSSAAAAA....USSSSSAAAAAAAAA...असे म्हणत जल्लोश करु लागल्या...

आणी कोच नेल्सन? तो जलतरण तलावाच्या एका बाजुला पाय गुढग्यात दुमडुन जमीनीवर थर थर करत... दोन्ही हात हातात घेउन..ते एकत्र केलेले हात हनुवटीवर ठेवुन व कोपरे गुढग्यांवर ठेवुन.... मान शेक करत.... डोळ्यातुन आनंदाश्रु काढत.... त्या चार मुलींच्या वेड्या सेलीब्रेशनकडे क्रुतार्थ नजरेने बघत बसला होता....:-)

फ़ायनल टायमींग.... यु. एस. ए........ ३ मिनीट्स ४४.८ सेकंड्स.... नवीन ऑलिंपिक व वर्ल्ड रेकॉर्ड!

इस्ट जर्मनी... ३ मिनीट्स ४५.५ सेकंड्स...

अमेझिंग!!
माझा नवरा आणि मुली (१७,१४ दोघी स्विमर्स) ल्युकस ॲाईल स्टेडिअम ला सोमवारच्या प्रिलीम आणि फायनल्स बघायला गेले होते. केटी लेडेकी, रेगन स्मिथचे अमेरिकन रेकॅार्ड १०० बॅक, रायन मर्फी, ॲलेक्स वॅाल्श, लिली किंग, लिडीया जॅकोबी यांचे इव्हेंटस् पाहिले. मिशिगन मधले काही स्विमर्स ट्रायल्स ला आहेत. ज्यांच्याबरोबर मुली मीटस्, स्टेटस् पोहल्या आहेत. पूर्ण भारावून टाकणारा अनुभव होता त्यांच्यासाठी.आता रोज लाईव स्ट्रीमिंग पण बघत आहोत.

किती सुरेख लिहिलंय मुकुंद!
श्वास रोधून वाचले.
चक दे मधल्या शेवटच्या मॅच ची आठवण झाली.
फार सुंदर लिखाण!

मुकुंद , छान पोस्ट .श्वास रोखुन वाचले. आणि डोळ्यासमोर ते वातावरण उभे राहिले. कमाल लिहिल आहेत तुम्हि.

आजपर्यंत ऑलिंपिक्समधील बर्‍याच स्पर्धांमधल्या स्फुर्तीदायक व मनोरंजक गोष्टी इथे लिहिल्या पण जलतरण स्पर्धा... ज्या मला स्वत्:ला खुप प्रिय आहेत.. त्याबद्दल एकही कथा मी अजुन लिहीली नाही. >>>>> ऑ ! अरे तू लिहिलेल्या जलतरणाच्या कथा वाचूनच तर मी ऑलिंपिकमधल्या जलतरण स्पर्धा फॉलो करायला लागलो.

https://www.maayboli.com/node/2072 हे बघ "Submitted by मुकुंद on 13 July, 2008 - 16:50" ही पोस्ट. शिवाय जुन्या मायबोलीत पण आहेत बहुतेक. शोधायला हव्या.

पराग, नविन गोष्टी लिहायच्या आहेत. वेळ मिळेल तसा लिहायचा प्रयत्न जरुर करीन.

पण तुर्तास माझी अजुन एक जुनी गोष्ट परत इथे टाकतो. ज्यांनी आधी वाचली नसेल व ज्यांना अश्या गोष्टी ,असे अ‍ॅथलिट्स, त्यांनी घेतलेली मेहनत व त्यांची पार्श्वभुमी माहीत नसेल/ नसतील त्यांच्यासाठी. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, अश्या गोष्टी नक्कीच आपल्याला खुप स्फुर्ती देउन जातात असे माझे मत आहे.

क्रिकेट म्हटले की डॉन ब्रॅडमन,हॉकी म्हटले की ध्यानचंद, बास्केटबॉल म्हटले की मायकेल जॉर्डन, गॉल्फ़ म्हटले की टायगर वुड व टेनीस म्हटले की रॉजर फ़ेडरर ही समिकरणे आपल्या डोक्यात पक्की बसली आहेत... पण धावण्याच्या बाबतीत आतापर्यंत सर्वश्रेष्ठ म्हणुन कोणाचे नाव तुमच्या डोळ्यासमोर येते? झेकोस्लोव्हाकियाचा एमिल झाटोपेक? की इथियोपियाचा अबेबे बिकीला? की फ़िनलंडचा लास्से विरेन अथवा पावलो नुर्मी? की अमेरिकेचे कार्ल लुइस,जेसी ओवेन्स व मायकेल जॉन्सन?...... सर्वोत्कृष्ट धावपटु म्हणुन या सगळ्यांची नावे जरुर विचारात घेतली पाहीजेत... पण यापैकी कोणीच जगातला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट धावपटु नाही हे तुम्हाला सांगीतले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? पण आज मी तुम्हाला अश्या माणसाबद्दल सांगणार आहे की जो आज जगातला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलु धावपटु म्हणुन ओळखला जातो...

या माणसाची कहाणी ऐकुन तुम्हाला कळेल की आपण कुठे व कुठल्या परिस्थीतीत जन्म घेतो हे आपल्या हातात नसते पण नशिबाला दोष न देत बसता..... प्रचंड इच्छाशक्ति व अविरत मेहनतीच्या बळावर माणुस यशाचे सर्वोच्च शिखर गाठु शकतो...

या माणसाचा जन्म इथियोपियातील असेला या अतिशय लहान खेडेगावात झाला. याचे आईवडिल अत्यंत गरीब असे कुळाची शेती करणारे शेतकरी होते. शेणाने सारवलेली जमीन व मातीच्या भिंती असलेल्या एका खोलीच्या घरात याची अजुन ९ भावंडे याच्याबरोबर लहानाची मोठी होत होती. ही सगळी मुले लहानपणापासुनच आईवडिलांना शेताची कामे करायला मदत करत असत. त्यासाठी हा सकाळी ५ वाजता उठुन त्याच्या प्रेमळ आईभोवती सावलीसारखा तिला मदत करायला फिरत असायचा... मग अशी ५ तास... कुठे गवताच्या गंज्या करुन उचल तर कधी घरातल्या गाढवे,बकर्‍या,गाई यांना चरायला ने तर कधी गावापासुन चार मैलावर असलेल्या ओढ्यावर पाणी भरायला बाभळीच्या काट्याकुट्यातुन व दगड धोंड्यातुन अनवाणी चालत जा.... अशी मेहनतीची कामे करुन हा मुलगा मग १० वाजता... सहा मैल दुर असलेल्या शाळेत अनवाणीच... परत बाभळीच्या काट्याकुट्यातुन... दप्तर नसल्यामुळे हातातच वह्या पुस्तकांचा गट्ठा घेत... शाळेत पळायचा. शाळेत उशिरा पोचला तर शिक्षकांच्या पट्टीचा मार हातावर घेत.. त्या हाताच्या वेदना व पायाला टोचलेल्या बाभळीच्या काट्यांच्या वेदना... सहन करत तो दिवसभर शाळेत मन लावुन अभ्यास करायचा.परत संध्याकाळी पाच वाजता वडिलांचा मार चुकवायला तो पळत पळत घरी यायचा व अंधार पडेपर्यंत परत वडिलांना शेतावर तो मदत करायचा. असा दिवसभर दमुन मग संध्याकाळचे.... एक वेळच घरात मिळणारे.... अंजेराचे(डोस्यासारखा तांदळापासुन बनवलेला इथियोपियन पदार्थ!) जेवण जेवुन हा मुलगा दमुन भागुन झोपी जायचा. आईच्या कुशीत रोज झोपताना तो विचार करायचा... उद्या मला शाळेत लवकर पोचायलाच हवे... मास्तरांची पट्टी खुप लागते हाताला.. घरुन लवकर तर वडिल सोडणार नाहीत... पण जरा जास्त जोरात धावलो तर मी शाळेत वेळेवर पोचु शकतो....... देवा.. मला जोरात पळण्याची शक्ती दे... म्हणजे माझा शाळेतला मार वाचेल... अशी प्रार्थना करुन त्याचा दमलेला जीव कधी गाढ झोपी जायचा... ते त्याला समजायचे सुद्धा नाही...

पाणी भरायला रोज जाउन येउन आठ मैल व शाळेत जायला जाउन येउन १२ मैल... असे अगदी लहान वयापासुन याला पळण्याची सवय झाली. सुरुवातीला गरज म्हणुन धावणार्‍या याला... थोड्या वर्षांनी खरोखरच धावणे आवडु लागले... तशात याचा जन्म इथियोपियासारख्या देशात... (ज्या देशात अबेबे बिकिला,मामो वाल्डे व मिरुट्स यिफ़्टर सारखे जगप्रसिद्ध धावपटु निर्माण झाले होते व ज्यांनी इथियोपियाचे नाव जगामधे प्रसिद्ध केले होते)...... झाला होता. त्यामुळे असेला हे त्याचे गाव अतिशय लहान असुनसुद्धा.... गावाच्या पारावर गावातली लोक... या महान धावपटुंच्या गोष्टींची पारायणे करायची. यानेही गावकर्‍यांनी रंगवुन रंगवुन सांगीतलेली ती पारायणे.... लहानपणापासुन बर्‍याच वेळेला ऐकली होती.व रोज शाळेत जाताना धावत असताना त्याच्या डोक्यात विचार यायचे.. आपण सुद्धा अबेबे बिकीला किंवा मामो वाल्डे सारखे अपल्या देशाचे नाव मोठे का नाही करु शकणार? माझी आई तर मला रोज सांगत असते की खुप मेहनत व देवावरची श्रद्धा... या दोन्ही गोष्टी एकसाथ केल्या.... तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही... मी नक्कीच रोज शाळेत जाताना जोरात पळायचा मनापसुन प्रयत्न करतो... एक दिवस... माझ्या देवावर असलेल्या श्रद्धेला व माझ्या या धावण्याच्या मेहनतीला.... आई सांगते त्याप्रमाणे जरुर यश येईल व मी कोणीतरी मोठा बनीन.... अशी स्वप्न बघत हा मुलगा त्या पारावरच्या गोष्टी ऐकत त्या गोष्टीत हरवुन जायचा... कधी कधी विरंगुळा म्हणुन.. वडिलांची नजर चुकवुन... शनिवार्-रविवारी होणार्‍या.. ४ मैल लांब असलेल्या गावातल्या धावण्याच्या शर्यती बघायला... हा मुलगा शेतावरुन पोबारा करायचा. त्या शर्यती बघत असताना.. आपणही अश्या शर्यतीत एक दिवस भाग घ्यायचा असा तो मनोमनी निश्चय करायचा..

असे वर्षामागुन वर्षे जात होती व अचानक तो १४ वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावर असलेल्या त्याच्या प्रेमळ आईचे छत्र त्याच्या डोक्यावरुन अचानक नाहीसे झाले... त्याची आई.... अती काम केल्यामुळे व १० मुलांना जन्म देउन व त्यांचे व शेताचे काम करुन करुन थकल्यामुळे... स्वर्गवासी झाली. या मुलाचे आईच्या स्वर्गवासानंतर शेतावरच्या कामात अजिबात लक्ष लागेनासे झाले... वडिलांच्या तो मुळीच जवळ नव्हता. आई गेल्याचे दु:ख विसरायला त्याने आता मैलोन मैल... गावाच्या आसपासच्या रेताड व बाभळीच्या काट्याकुट्याने भरलेल्या टेकाडावरुन एकटेच धावण्याचा सराव करण्यास सुरुवात केली... वडिलांनी धाकट दपाशा दाखवला... पण त्याचा याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यांनी मग समजावुन सुद्धा सांगीतले... की बाबा... धावुन कोणाचे भले झाले आहे? बिकेला व मामो वाल्डे सारखे दहा लाखात एक निपजतात.. तु आपल मुकाट्याने मला शेतीला मदत कर... त्यातच तुझे भले आहे... पण याला काही ते पटत नव्हते... याने आता स्वत्:ला धावण्यामधे पुर्णपणे झोकुन दिले होते... धावण्यात त्याला आता आईच्या मृत्युचे दु:ख विसरायचे होते... लहानपणापासुन पाहीलेली व मनात रंगवलेली स्वप्ने... त्याला आता आपल्या धावण्याच्या मेहनतीने पुर्ण करायची होती... व असेच एकदा.... एकटाच अनवाणी धावत असताना.... जवळच्या एका मोठ्या गावातल्या एका प्रशिक्षकाचे लक्ष याच्यावर पडले.... याची धावण्याची ढब बघुन त्या प्रशिक्षकाला लगेच कळले की या मुलामधे नैसर्गीक देणगी आहे. त्याने याला हाक मारुन जवळ बोलवुन घेतले व विचारले की त्याला धावण्याचे प्रशिक्षण कोण देत आहे? त्यावर याने म्हटले कोणी नाही... त्याने विचारले की तु तुझा डावा हात असा वाकडा ठेवुन का धावतोस? त्यावर हा म्हणाला.... मी लहानपणापासुन शाळेत जाउन येउन १२ मैल धावायचो.. त्यावेळेला माझ्या डाव्या हातात वह्या पुस्तकांचा गट्ठा असायचा.. तो गट्ठा पकडुन पकडुन माझा हात आता असा कायमचा वाकडा झाला आहे.. त्या प्रशिक्षकाने सांगीतले की जर त्याला धावण्याचे यथोचीत प्रशिक्षण हवे असेल तर त्या गावात दर गुरुवारी सरावाला ये.याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने नेमाने त्या गावात दर गुरुवारी जायला सुरुवात केली.. अर्थातच ते गाव व याच्या गावा दरम्यानचे अंतर हा धावुनच काटायचा... व लवकरच याची निवड त्या प्रशिक्षकाने त्या गावातील अजुन २ धावपटुंबरोबर.... इथियोपियाची राजधानी... अदिस अबाबा इथे.... मोठ्या क्लबमधे प्रशिक्षण घ्यायला जाण्यासाठी केली.वडिलांच्या विरोधाला न जुमानता मग याने आपले चंबुगबाळे एका कापडी पिशवीत भरुन अदिस अबाबाला कुच केले...

उपजतच धावण्याचे कसब व त्यात इतक्या वर्षांची स्वत्: केलेली मेहनत... या दोन गोष्टींच्या बळावर हा मुलगा अदिस अबाबाच्या प्रशिक्षण केंद्रात झपाट्याने प्रगती करु लागला. पण त्याला जागतीक दर्जाचा धावपटु व्हायला अजुन बराच पल्ला गाठायचा होता. अदिस अबाबाच्या क्लबतर्फ़े त्याला निरानिराळ्या शर्यतीत भाग घ्यायला मिळणार होता. पण याने भाग घेतलेल्या मॅरेथॉनच्या पहिल्याच शर्यतीत हा ९९ वा आला... व त्याला त्याच्या प्रशिक्षकांनी १०००० मिटर्स शर्यतीवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगीतले. त्या सल्ल्याचे पालन करुन मग याने पुढची २ वर्षे मॅरेथॉन ऐवजी ५००० व १०,००० मिटर्सच्या शर्यतीवर सगळी मेहनत घेण्यास सुरुवात केली. आता १९९३ साल उजाडले व याच्या प्रशिक्षकांच्या मते हा आता जागतीक स्पर्धांना तयार झाला होता... त्याची ५००० व १०,००० मिटर्समधली वेळ जागतीक विक्रमाच्या वेळेशी शिवाशिवीचा खेळ खेळु लागली होती... पण ही तर तो पुढे जाउन गाजवणार्‍या त्याच्या विक्रमी कारकिर्द्रीची नुसती नांदीच होती.... व अदिस अबाबाला... या गरीब शेतकर्‍याच्या घरात जन्म घेतलेल्या एका साध्या मुलाचे..... एखाद्या सुरवंटाचे जसे सुंदर फुलपाखरात रुपांतर होते तसे... आपल्या धावण्याने पुढे जग गाजवुन टाकणार्‍या एका कुशल,जागतीक दर्जाच्या व जिद्दी धावपटुमधे रुपांतर झाले.... या जिद्दी मुलाचे नाव.............. हेली गेब्रसलास्सी!

क्रमंश:

तर असा हा हेली १९९३ च्या स्टटगार्ट,जर्मनी इथे होत असलेल्या जागतीक ऍथलेटिक्स स्पर्धांना... ज्या दर दोन वर्षांनी होतात.... येउन पोहोचला. त्याची ही जगाच्या रंगमंचावर शर्यत धावण्याची पहीलीच वेळ होती... जगातल्या इतर धावपटुंचे कौशल्य त्याला प्रथमच दिसुन येत होते व १०,००० मिटर्स फ़ायनल्सला..... त्याच्यात व केनियाच्या मोझेस तनुई मधे अटितटीची लढत झाली... शेवटच्या ४०० मिटर्समधे हेलीचा मोझेसबरोबर धक्का लागुन मोझेस तनुईचा एक शु बाहेर आला व त्या वादग्रस्त शर्यतीत.... हेली गेब्रसेलास्सीने आपले १०,००० मिटर्समधले पहिले जागतीक विजेतेपद मिळवले व जागतीक रंगमंचावर आपल्या आगमनाची यशस्वी तोफ़ डागली. हेलीच्या विक्रमी कारकिर्द्रीची सुरुवात अशी वादग्रस्त शर्यतीने झाली असली तरी त्याने यानंतरची १५ वर्षे.... दिर्घ पल्ल्याच्या शर्यतींमधले गाजवलेले निर्विवाद वर्चस्व.... वॉज एनिथींग बट कॉन्ट्रोव्हर्शियल!

असे स्टटगार्ट मधे आपले १०,००० मिटर्सचे पहिले जागतीक विजेतेपद मिळवल्यावर हेलीची कामगीरी दिवसागणीक तोंडात बोटे घालण्यालायक होत गेली. १९९४ मधे हॉलंडमधील हेंजेलो येथे गेब्रसेलास्सीने ५००० मिटर्समधे आपला पहिला जागतीक विक्रम नोंदवला.... जगात एक तरी जागतीक विक्रम करणे म्हणजे केवढे कौतुकास्पद व महा कर्मकठिण काम असते..... पण हेली गेब्रसेलास्सीने मात्र पुढची १४ वर्षे..... धावण्याच्या शर्यतीत..... १५०० मिटर्सपासुन ते मॅरेथॉन शर्यतीपर्यंत.... सर्व पल्ल्याच्या शर्यतीमधे तब्बल २५ जागतीक विक्रम नोंदवुन...... जगातला आतापर्यंतचा सर्वोत्तम धावपटु म्हणुन सर्व जगात... मानमान्यता मिळवली... याच्या अष्टपैलुत्वाची जाण यायला कुठल्या कुठल्या पल्ल्याच्या शर्यतीत याचे जागतीक विक्रम आहेत हे पहा... १५०० मिटर्स,२००० मिटर्स,३००० मिटर्स,५००० मिटर्स,१०,००० मिटर्स,२०,००० मिटर्स,२ मैल,५ मैल,१० मैल,हाफ़ मॅरेथॉन व मॅरेथोन!अश्या या गेब्रसेलास्सीच्या प्रत्येक शर्यतीवर एक अक्खे पुस्तकच लिहीता येईल.... पण आज मी तुम्हाला फक्त त्याच्या पहिल्या ऑलिंपिक अनुभवाबद्दल सांगणार आहे.त्यासाठी आपल्याला आज जावे लागेल..... १९९६ च्या ऍटलंटा ऑलिंपिक्सला....

तर असा हा गेब्रसेलास्सी १९९६ ला जेव्हा ऍटलांटा ऑलिंपिक्समधे येउन पोहोचला... तोपर्यंत सगळ्या जगाला माहीत झाला होता. १९९३ मधली याची केनियाच्या मोझेस तनुइ बरोबरची शर्यत ही त्याची केनियाच्या महान धावपटुंबरोबर पुढे होणार असलेल्या चकमकींची नुसती सुरुवात होती.... गेब्रसेलास्सीच्या निर्विवाद वर्चस्वाला कोणी जर यशस्वीरित्या आव्हान दिले असेल तर केनियाच्याच धावपटुंनी.... १९६८ मधे किपचॉंग किनो पासुन केनियाने सुद्धा सतत जागतीक दर्जाचे.. दिर्घ पल्ल्याचे धावपटु जगाला दिले आहेत. ऍटलांटा ऑलिंपिक्समधे गेब्रसेलास्सीला १०,००० मिटर्समधे आव्हान होते... केनियाच्या पॉल टेर्गट याचे....

जागतीक रंगमंचावर धावण्याची गेब्रसेलास्सीची ही पहीलीच वेळ नसली तरी... इथियोपियामधे त्याच्या शर्यतीचे थेट प्रक्षेपण होण्याची ही पहीलीच वेळ होती.... हेलीच्या काळजात त्यामुळे खुपच कालवाकालव होत होती... शर्यत सुरु करायला तो जेव्हा तयार होउन ऑलिंपिक्स स्टेडिअममधे... ८०,००० दर्शकांसमोर उभा राहीला.... तेव्हा त्याच्या डोक्यात अनेक विचारांचे काहुर माजले होते.... आपल्या लहान गावातील लोक ही शर्यत.... आपण जसे लहानपणी मिरुट्स यिफ़्टरचा मॉस्को ऑलिंपिक्समधला पराक्रम ऐकायला.... छोट्या ट्रांझिस्टरभोवती... गावाच्या पारावर.... गावातल्या इतर लोकांच्या बरोबर... कोंडाळ करुन बसायचो... तसे आपल्या छोट्या गावात असलेल्या एकमेव टीव्हीसमोर... आज आपले वडील, भाउ बहीणी, गावातील सर्व बाळगोपाळ मंडळी व वृद्ध लोक...... ही आपली आजची शर्यत बघत बसली असतील का? या व अश्या विचारांनी हेलीला खुप गहीवरुन आले.... आज त्याला अबेबे बिकिला व मामो वाल्डे यांच्या त्याच्या गावातल्या पारावर सांगण्यात येणार्‍या कहाण्यांमधे..... स्वत्:च्या ऑलिंपिक्स पराक्रमाच्या कहाणीची भर टाकायची सुवर्णसंधी मिळत होती.... ही सुवर्णसंधी त्याला वाया घालवायची नव्हती...

पण त्याच्या या विचारांनी पाणावलेले डोळे..... गेब्रसेलास्सीने चटकन पुसुन टाकले व आपल्यासमोरच्या शर्यतीवर लक्ष केंद्रित केले... त्याला माहीत होते की केनियाचे ३ स्पर्धक या फ़ायनल्समधे आहेत व ते तिघे मिळुन.... कळप करुन....... त्याला दमवुन टाकायच्या प्रयत्नाची पराकाष्ठा करणार... त्याला कशी टक्कर द्यायची याचा विचार त्याने शर्यती आधीपासुनच केला होता.... पण आता तो त्या स्ट्रॅटीजीची त्याच्या मनात उजळणी करु लागला...

शर्यत सुरु झाली....... तिस स्पर्धकांचा घोळक्याने.. ऑलिंपिक्स स्टेडिअमला २५ फेर्‍या मारायला सुरु केले. अपेक्षेप्रमाणे गेब्रसेलास्सी,केनियाचा टेर्गट,केनियाचे इतर दोन स्पर्धक व मोरोक्कोचा एक स्पर्धक... असे हे पाच जण त्या कळपात पुढे होते... गेब्रसेलासी टेर्गटला आपल्या पुढे ठेउन धावत होता... १,२,३..... १०,११,१२..... २०,२१,२२.... अश्या फेर्‍या संपत गेल्या. अजुन कोणीही लिड घेत नव्हते... सगळा घोळका जवळजवळ बरोबरीनेच चालला होता. पण २३ फेर्‍यानंतर मात्र पहिल्या पाच स्पर्धकांनी... आपला वेग पुढच्या गिअरमधे टाकुन.... बाकीच्या घोळक्यापासुन आपल्याला वेगळे करायला सुरु केले. ८०० मिटर्स बाकी होते... या ५ जणांनी ब्लिस्टरींग वेगात धावण्यास सुरुवात केली.. टेर्गट व केनियाचे स्पर्धक गेब्रसेलासीला दमवायचा प्रयत्न करु लागले... आलटुन पालटुन असे ते वेग वाढवुन स्पर्धेचा वेग वाढवत राहीले... गेब्रसेलास्सीला हे आधीपासुनच माहीत होते... त्यानेही त्यांच्याशी... पुढे न जाता.... बरोबरी ठेवली...

शेवटच्या २५ व्या फेरीची घंटा वाजली.... त्या घंटेने गेब्रसेलास्सीच्या छातीतली धडधड वाढली.... या शर्यतीची भिती वाटत होती म्हणुन नाही... तर त्याला त्या घंटीने.... त्याच्या लहानपणी जात असलेल्या शाळेच्या घंटेची एकदम आठवण आली... शाळेत त्याच्या हातावर...उशिर झाला म्हणुन... पट्टी मारणार्‍या कडक शिक्षकांची त्याला आठवण झाली..... ते शाळेत धावत जात असताना लागलेल्या बाभळीच्या काट्यांच्या वेदनांनी त्याला झालेल्या कळवळीची त्याला एकदम आठवण झाली.... त्याच्या प्रेमळ आइबरोबर.. गावाबाहेर ४ मैल लांब मैलावरच्या ओढ्यावर जाउन पाणी आणण्याची त्याला आठवण झाली... या सगळ्या आठवणींनी त्याला एक वेगळेच बळ आले... त्याला या शर्यतीत तो का धावत आहे... याची जाणीव झाली... व दुसरे इंजीन लावुन जसे आगगाडीचा वेग एकदम वाढतो... तसा त्याचा वेग एकदम वाढला... त्याने १०० मिटर्स बाकी असताना बाकीच्या स्पर्धकांना मागे टाकले...... त्याला अंतिम रेष दिसत होती... त्या अंतिम रेषेवर त्याला त्याची प्रेमळ आइ व त्याच्या गावातील बाकीचे लोक... पारावर बसुन.. त्याची वाट पाहात बसलेले दिसु लागले... जणु काही त्यांना भेटायला आतुर झाला आहे असाच त्याने... जिव तोडुन आपला वेग अजुनच वाढवला... प्रत्येक सेकंदाला आपल्या दोन्ही बाजुला आलटुन पालटुन बघत... तो खात्री करुन घेत होता... की आयत्या वेळेला...त्याच्यावर कोणी कुरघोडी तर करत नाही ना... ७५ मिटर्स.. अजुनही तोच पुढे... ५०मिटर्स... टेर्गटनेही आता एक शेवटचा प्रयत्न करुन आपला वेग वाढवायचा प्रयत्न केला... पण गेब्रसेलास्सीच्या इच्छाशक्तीच्या पुढे आज साक्षात ब्रम्हदेवाला पण त्याला गाठणे अशक्य होते!

इकडे गेब्रसेलास्सीच्या छोट्या गावात सगळे गावकरी... त्याच्या वडिलांबरोबर व इतर भावंडांबरोबर.. गावातल्या एकमेव टिव्हीवर... या शर्यतीचे थेट प्रक्षेपण...जीव मुठीत घेउन पाहात होते.... सगळे जण जमीनीवर एका ठिकाणी स्वस्थ बसुन... या शर्यतीचा शेवट बघुच शकत नव्हते!..... चुळबुळ चुळबुळ करत... आपले बुड कधी डावीकडे तर कधी उजवीकडे हलवत... हाताच्या मुठी करुन... त्या चावत... अतिशय उत्कंठतेने... त्यांच्याच गावातल्या एका मुलाची... शर्यत बघत ते सगळे बसले होते... शेवटचे १० मिटर्स... त्यांचा हेली अजुनही शर्यतीत सगळ्यांच्या पुढेच होता... अंगातली सगळी शक्ती एकवटुन... त्यांचा हेली शेवट्ची ३-४ पावले जिवाच्या आकांताने टाकत होता... गावातील सगळे जल्लोश करायला टिव्हीपुढे उभे राहीले होते... तेही त्यांच्या अंगातली सगळी शक्ती हेली गेब्रसेलास्सीला देत होते.... म्हणुनच त्यांच्या सगळ्यांच्या पायातील त्राण जणु काही गेले आहे.... असेच त्या उत्कंठावर्धक शर्यतीच्या शेवटी.... त्या लोकांना वाटत होते... पण त्यांना त्यांच्या पायातील त्राणाची त्यावेळेला अजिबात पर्वा नव्हती... आणी हेलीने तिकडे अंतिम रेषेवरची दोरी... पहिल्या स्थानावर येउन एकदाची तोडली..... व इकडे सगळे गावकरी... उत्स्फुर्तपणे उभे राहुन... जल्लोश करु लागले.... गेब्रसेलास्सीचे वडिल.... क्रुतार्थ होउन... डोळ्यातले अश्रु आवरत... आपल्या गावकर्‍यांना प्रेमाने अलिंगन देत होते.... आज त्यांचा मुलगासुद्धा...... अबेबे बिकिला व मामो वाल्डेसारखा... दहा लाखातला एक असा ठरला होता... असे आपला मुलगा करु शकेल याची गेब्रसेलास्सीच्या वडिलांना स्वप्नात सुद्धा कल्पना नव्हती... पण...... इथियोपियातल्या त्या गरीब लोकांच्या छोट्याश्या गावातील इतर गरीब लोकांबरोबर... गेब्रसेलास्सीचे वडिल... आज ते स्वप्न प्रत्यक्ष जगत होते.........

प्राजा, तु का नाही गेलीस इंडियानापुलीसला? एक अद्भुत अनुभव असतो या यु एस स्विम ऑलिंपिक्स स्विम ट्रायल्स! मी २०२१ मधे माझ्या मुलाला घेउन गेलो होतो ओमाहा, नेब्रास्काला. माझा मुलगा सुद्धा त्याच्या हाय स्कुल टीम मधुन कंपॅटिटीव्ह स्विमींग करतो. ही इज अ रायझींग सिनिअर इन हायस्कुल धिस यिअर. ५०यार्ड फ्रीस्टाइल( शॉर्ट कोर्समधे ) त्याचे या वर्षीचे टायमींग आहे २२.७३सेकंड्स. ही क्वालीफाइड फॉर द स्टेट्स इन बोथ ५० अँड १०० फ्री अँड १०० बटरफ्लाय. पण पहिल्या आठात नाही आला. अमेरिकेतल्या हाय स्कुल मधल्या मुला मुलींचे स्विम कॅलिबर काहीच्या काहीच असते!

पुढच्या पोस्टमधे आपण स्विमिंग मधले संभाव्य विजेते कोण असतील याचा उहापोह करु. केटी लडेकी, लिली किंग, रेगन स्मिथ, वॉल्श भगीनी,( ग्रेचन अँड अ‍ॅलेक्स), केट डग्लस, सिमोन मॅन्युअल्स व टोरी हस्की या हेवीली फेवरेट ऑस्ट्रेलियन मुलींना टफ फाइट देतील अशी आशा आहे .मुलांमधे रायन मर्फी, बॉबी फिंक, ख्रिस् ज्युलिआनो अँड केलब ड्रेसल विल लिड द अमेरिकन स्विमर्स. पुढच्या पोस्टमधे खोलात जाउन चर्चा करु.

अरे कोणीच बघत नाहीये का ?
भारताला एक सोडून दोन पदकं मिळाली तरी इथे काहीच नाही ??

मनू भाकर आणि सरब्ज्योत सिंगचे अभिनंदन!

माझा उद्घाटन सोहळा बुडला ह्यावेळी. काल स्विमिंगच्या मॅचेस पाहिल्या. McIntosh एकदम भारी! काय अशक्य फास्त पोहोली. १७ वर्षांची आहे आणि दुसरं ऑलिंपिक. पहिलं गोल्ड !

समर मॅकिंन्टॉश ++ मस्त पोहली. ४०० मिटर फ्री स्टाईलला सिल्वर आणि काल ४०० मेडली मध्ये गोल्ड!
सिल्वर मिळाल्यावर दोन वाक्यच बोलली पण मस्त वाटलेलं तेव्हा ही. हो, फक्त १७ ची आहे. २०२० ऑलिंपिकला पण होती ती. सर्वात लहान खेळाडू आणि मला वाटतं दोन का तीन स्पर्धांत चौथी आलेली. Happy
बाकी अ‍ॅडम पीटीचे एकदोन इव्हेंट बघितले.

अ‍ॅथलेटिक्स चे काही इव्हेंट, टेनिस, सिंक डायव्हिंग, सॉकर बघितलं. सर्फिंगला सुरुवातीला बोर होतंय का काय वाटलेलं, कारण काही घडतच न्हवतं. पण एकदा ते आत पोचले आणि लाटांवर स्वार झाले की कसले भारी करतात एक एक! टोटल ग्लूड!
उद्घाटन सोहळा युट्युब वर बघितला. पण तो फारच धावता ... लिटरली ही.. होता. शांतपणे बघायचा आहे.

टेबल टेनिस - महिला विभागात बात्रा अंतिम 16 त तर अकुला 32 त पोचल्या आहेत. बात्रा खूप मेहनत घेवून ऑलीम्पिक पदक मिळवण्याच्या ईर्षेने खेळते आहे. अकुलाने पोलंडच्या मुलीला सरळ 4-० हरवताना जो खेळ केला, तो पाहून तर तीच्याबद्दल्ही अपेक्षा वाढल्या आहेत ( आज दू. 2.30ला तिचाही अंतिम 16त येण्यासाठी जरूर पाहावा असा सामना आहे. ) . दोघानाही खूप शुभेच्छा.
हॉकी - भारताला कठीण ड्रा मिळालं आहे तरी पण सुंदर खेळ करत न्युझीलंड विरुद्ध विजय व अर्जेंटिना विरुद्ध बरोबरी साधून त्या संघाने अशा वाढवला आहेत. श्रीजेश हा अनुभवी व अफलातून गोली भारताचा आधारस्तंभ आहे. पण गतिमान खेळ करणाऱ्या संघांविरुद्ध तितक्याच वेगाने व समन्वयाने खेळून भारताने वचक निर्माण केला आहे. ( अर्थात, भारताची खास अशी शॉर्ट पासिंग वर भर असलेली नजकातपूर्ण शैली आता पहायला मिळत नाही, हे दुख आहेच ! )
बॅडमिंटन - भारत या खेळात महासत्ता होण्याच्या वाटेवर आहे, हे निश्चित ! काल पुरुष दुहेरी सामना यालाच पुष्टी देणारा ! आगे बढते रहो !!!

टेबल टेनिस - श्रिजा अकुला आक्रमक खेळत 4-२ गेम जिंकून अंतिम 16त !! शाब्बास. !!!
बॅडमिंटन - सेन इंडोनेशियाच्या जागतिक क्र 3 ला हरवून अंतिम 16 त. अप्रतिम रॅलीज पहायला मिळाल्या या सामन्यात ! कीप अप !

टेनिस मेन्स डबल्स क्वार्टर फायनल भारी झाली. नडाल-अल्कराझ जोडीला अमेरिकन राम आणि क्रॅजिचेकने दोन सेट्स मध्ये हरवलं आणि सेमीजला पोहोचले. राजीव राम आणि ऑस्टिन क्रॅजिचेक एकदम कूल खेळत होते. मजा आली.

१५०० मी डिस्टंट स्वीम मध्ये लडेकी स ह ज ऑलिंपिक विक्रम करुन जिंकली.
२०० मी बटरफ्लाय मध्ये मॉन्टिअलच्या इल्या हरुनला ब्रॉन्झ मिळालं. गोल्ड आणि सिल्वर मध्ये मार्शॉन आणि मिलॅक मध्ये फारच अटीतटीची लढत झाली. वुमन्स मध्ये समर मॅकिन्टॉश फायनलला पोहोचली आहे. उद्या आहे.

टेबल टेनिस - मनिका बात्राचा कालचा पराभव खूपच निराशाजनक होता. ती स्वतः सुद्धा स्वतःच्या कालच्या खेळाबद्दल नाराजच असेल. प्रतिभा, अनुभव व प्रचंड सराव या पाठबळावर ती या स्पर्धेत पदक मिळवण्याच्या ईर्षेने उतरली होती पण ती जिद्द मला तरी काल तिच्या देहबोलीतून जाणवली नाही ( केवळ हरली म्हणून मी हे म्हणत नाहीं) . माझा एक टे टे. खेळाडू नातलग म्हणतो की स्पिन करण्यासाठी व स्पिन निष्प्रभ करण्यासाठी चीनचे खेळाडू बॅटवर वेगवेगळ्या स्पोंजचा उपयोग करतात व त्याचा सामना करणं प्रतिस्पर्ध्याला जमलं नाहीं तर बात्रासारखी स्थिती होते. तसं असेलही, माहीत नाही. खरंच बात्राचं वाईट वाटलं. बॅड लक !

IMG-20240801-WA0004.jpg

Yusuf Dikec was compared to other athletes who participated in the air pistol mixed team competition decked out in specialised gear, including special goggles, lenses to avoid blur, and ear protectors for noise. By contrast, the Turkish shooter redefined casual confidence when he appeared at the Paris Olympics 2024 stage in prescription glasses and normal earplugs, and went on to win the silver with one hand in his pocket.

Pages