महाकाय महानगर...

Submitted by पल्ली on 20 July, 2024 - 13:33

पुणे दर्शन करण्यासाठी घरातल्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडले. एक अति महाकाय विशाल असं जग समोर आलं, जीव दडपून गेला अगदी! धावणारे रस्ते, त्यावरची असंख्य माणसं, माणसांच्या चेहऱ्यावरची विवंचना काळज्या... आणि वरून धावणाऱ्या मेट्रो!! माणसांनी प्रचंड भरलेल्या बसेस, सामानांनी भरलेले ट्रक, वाजत गाजत आवाजाचा नुसतं धुमशान करणारे टेम्पो, वेडेवाकडे जाणारा मध्येच एखादा छपरी.. पोटावर धरून मेट्रोमध्ये चढणारे आयटी वाले, त्यांच्या त्या वॉटर बॉटल्स.. प्रचंड मोठ्या इमारती, स्कायस्क्रॅपर्स, मोठ मोठाले मॉल, आयटी हब्स, कंपन्या ऑफिसेस...
सगळं नजरेत सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. एडवेंचरचा अनुभव घेण्यासाठी कधी रिक्षा कधी बस कधी टू व्हीलर कधी मेट्रो असे सर्व प्रवासाचे पर्याय वापरून बघितले. रिक्षात बसले होते तेव्हा रिक्षावाल्यांशी पण खूप गप्पा झाल्या. सिग्नलला बघितलं टू व्हीलर वरती असलेल्या एका माणसाच्या सॅकने किती स्थित्यंतरे बघितली असतील ते बघून मन भरून आलं. त्याची सॅक किती वेळेला दुरुस्त केली गेली होती हे तिच्यावरच्या स्टिचेस मधून दिसत होतं. जीव सोडून गेलेली सॅक परत परत पुन्हा जिवंत केलेली असावी असं दिसत होतं. डिलीव्हरी बॉईज चे विदाऊट एक्सप्रेशन चेहरे आणि फाटलेले बूट..
काय झालंय या शहराला? सगळ्या भावना कुठे गेल्या आहेत? असं वाटत होतं प्रत्येकाच्या डोक्यावर कसलं ना कसलं ओझ आणि ताण आहे. लोक श्वास घेतायत की नाही हे कळत नव्हतं. माझा तर एवढासा जीव दडपून गेला. हे विशाल काय महानगर बघून एकेकाळाचे पूणं जिथे चालत जाणं हे नॉर्मल होतं. मग सायकल आली. सायकलचे शहर पुणे. ती ओळख जाऊन हळूहळू स्कूटर लॅम्बरेटा m50, m80, लुना अशा गाड्यांनी भरून गेलेले शहर, मग रिक्षा आल्या बसेस आल्या, ओला उबर बाईक रायडर्स स्वीगी डंझो.. मग अचानक ई व्हेहिकल्स आल्या, आवाज न करता जाणाऱ्या सुसाट धावणाऱ्या ई व्हेईकल्स!
या नव्या पिढी पुढे किती मोठाले चॅलेंजेस आहेत हे बघितलं आणि त्यांची दया आली. भावनेच्या पलीकडे जाऊन यंत्रवत मशीन सारखी ही धावणारी माणसं! कानाला हेडफोन लावतात मोबाईल मध्ये बघत असतात आजूबाजूला काय घडतय काय नाही यांच्याशी कसलं सोयर सुतक नाही आपल्या आपल्यातच रमणारे एकेकटे जीव! रोबोट्स आणि यांच्यात काय फरक? ही जनरेशन जितकी हुशार आहे तितकीच त्यांना चॅलेंजेस पण मोठी आहेत!
पुण्याच्या ह्या टोकापासून त्या टोकाला प्रवास करून मी परत त्या टोकापासून ह्या टोकाला आले. घरी आले शांत बसले आणि हरवलेली शांतता शोधायचा प्रयत्न करू लागले. देवा पुढे दिवा लावला उदबत्ती लावली, तिचा सुगंध घरभर दरवळत होता, बावरून गेलेलं मन परत माझ्याजवळ येऊ पाहत होतं. माझ्या घाबरलेल्या मनाला मी प्रेमानं कवटाळलं, आश्वासक रित्या..
-पल्ली

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सगळ्या वेगाने बदलणाऱ्या (वाढणाऱ्या) शहरांना काही काळाने भेट दिली की असेच काहीसे वाटते.

डोंबिवलीतून मुंबईत क्वार्टर्समधे शिफ्ट होऊन खरेतर ४-५ वर्षच होतील म्हणजे डोंबिवलीत घालवलेला काळ त्याच्यापुढे कितीतरी पट मोठा आहे तरी दरवेळी डोंबिवलीत गेले की काही ना काही नवीन गोष्टी दिसत रहातात. बदल दिसत रहातात. डोंबिवलीची वेस आता किती पुढे गेलेय, त्या वाढीव भागाला डोंबिवलीत गणणं कठीण जाते पण आहे शेवटी ती पोस्टल ॲड्रेसमधे डोंबिवलीच. म्हणजे छोट्या शहराची अशी कथा तर त्यापुढे पुणे तर ...
अचंबित होणे, वेगवान रफ्तार बघून धाप लागणे हे न टाळता येण्यासारखे आहे

शेवटचे पुणे चौदा पंधरा वर्षांपुर्वी पाहिले असावे. ते देखील एक दिवसासाठी आणि कुठेच न फिरता.. मुक्काम तर त्या आधी कित्येक वर्षांपुर्वी केला असावा हे आठवतही नाही. बहुधा शाळेत असताना चुलत भावाच्या मामाकडे मे महिन्याच्या सुट्टीत गेलो असताना.. त्यामुळे तेव्हाचे पुणे नक्कीच कायच्या काय बदलले असावे.. पण हे प्रत्येक शहरालाच कमी अधिक प्रमाणात लागू..

मला पर्सनली शांत शहरे बिलकुल आवडत नाहीत. मला मुंबईच आवडते. त्यामुळे तेव्हा पुणे मला बोअरच वाटलेले. कदाचित आता आवडेल असे झाले असावे Happy

पटला लेख.
पुण्यात जीव घुसमटतो. भीती वाटते.
अपघातात गेलेल्यांची नावे अनोळखी ते ओळखीचे ते शेजारी पाजारी ते नात्यातले इथपर्यंत येऊन ठेपली आहेत.
इतर अपघातांची संख्या निराळीच.

मेट्रो येऊनही वाहन वापरण्याला पर्याय नाही हे सत्य आहे.
इतर ठिकाणी रोजगार उपलब्ध होत असेल तर लवकरात लवकर सोडावे असे वाटते. भले दोन पैसे कमी का मिळेनात.
मुंबई कितीही अफाट असली तरी लोकल, मेट्रो, मोनो हे वाहतुकीचे पर्याय पूर्वीपासून आहेत. शिवाय मुंबईची रचना अशी आहे कि पाच लांबच्या लांब लाईन्स असल्याने अप आणि डाऊन पब्लीक ट्रान्स्पोर्ट सुरू करण्याला जास्त डोकं लावावं लागत नाही.

बेंगळुरू किंवा पुण्यासारख्या चहूबाजूंनी वाढणार्‍या शहरात पब्लीक ट्रान्स्पोर्ट्सचे रूट्स सोयीचे नसले कि स्वत:चे वाहन वापरावे लागते. फिरून जाण्यापेक्षा सरळ अंतर जाणे केव्हांही सोयीचे.

छान लिहिलं आहे.
Relatable अगदी
तुमचं नाव खूप छान आहे. मला खूप आवडलं.
Wink

गमन मधली गजल आठवली...

सीने मे जलन... आंखोमे तुफान सा क्यु है ! इस शहर मे हर शख्स परेशान सा क्यों है

पूर्वी ते
इस शहर के हर शख्स से परेशान क्यूँ हो..
असं होतं. म्हणून त्यांनाच परेशान केलं

लेख पटला.

पुण्याचा विस्तार, प्रगती वगैरे झाली आहे असं मला मुळीच वाटत नाही. कॅन्सरची वाढ असल्यागत वाढलंय पुणं. सुजलंय. दर वेळी पुण्याला जाते तेव्हा माझ्या मनात जपलेलं वीसेक वर्षांपूर्वीचं पुणं शोधत राहते. जुन्या पुण्याचं कलेवर सोडा, अवयव सुद्धा सापडत नाहीत. इतकं सगळं होऊनही पुणं मनातून सोडावंसं मात्र वाटत नाही. माझं शहर आहे ते. आपल्यांना कधी असं सोडून द्यायचं असतं का? थोड्या दिवसांसाठी का होईना, पुण्यासाठी पुण्यासोबतच घुसमटून घेते. सध्यातरी माझ्याकडून इतकंच करू शकते त्याच्यासाठी.

रमड अगदी खरे.

तरी मुकुंद नगरचा आतला भाग सुरेख आहे. पक्षी कोकिळ, भारद्वाज अजुनही खंड्या दिसतो. बाकी बिबवेवाडी फाटा लागला की पुणं हरवलेलच जाणवतं. पूर्वीचंच पुणं आवडतं. पर्वती मात्र जशीच्या तशी आहे. सारसबागही.

मुकुंदनगरची कल्पना नाही. कर्वेनगर, कोथरूड मात्र प्रमाणाबाहेर बदलत चाललंय. अजूनही काही काही अगदी सानुल्या गल्ल्या आणि दुतर्फा असलेले जुने बंगले दिसतात. पण फार कमी.
सारसबाग आहे बरीच आधीसारखी, पण पर्वती मात्र बदलल्यासारखी वाटते. त्याहीपेक्षा भयाण वाटतं पर्वतीवरून चौफेर पुणं पाहणं. नजर जाईतो पसरलेला धुराचा पट्टा आणि बिल्डिंग्ज! काहीही ओळखू येत नाही.
बाकी पक्ष्यांचं म्हणशील तर वर्षागणिक एकेक जमात दिसेनाशी होते आहे कर्वेनगर परिसरातून.

दर वेळी पुण्याला जाते तेव्हा माझ्या मनात जपलेलं वीसेक वर्षांपूर्वीचं पुणं शोधत राहते. जुन्या पुण्याचं कलेवर सोडा, अवयव सुद्धा सापडत नाहीत. >>>>> रमड, जो पर्यंत पुण्यात वैशाली, बादशाही, जोशी वडेवाले, कयानी आहेत, तो पर्यंत मला तरी पुणे बदललय असं वाटत नाही. ... Lol

मेट्रो आली असली तरी रिक्षावाल्यांचा मुजोरपणा, पीएम्टी ची अनिश्चितता आणि अरुंद रस्त्यातून जाणार्‍या दुचाकी, हे सर्व आहे तसंच आहे. फक्त कालागणिक शहराचा विस्तार वाढतो आहे. पिंपरी चिंचवड तर सोडाच पण ताथवडे किंवा खराडी ला राहणारा सुद्धा पुणेकर म्हणू लागला आहे.

बर्म्युडा ट्रँगल (सदाशिव, नारायण आणि शनिवार) मधले वाडे पाडून उंच इमारती उभ्या राहिल्या असल्या तरी तिथली माणसं तीच आहेत. अजूनही नुमवि, भावेस्कुल, अहिल्यादेवी आणि हुजुरपागा आहे तिथेच आहेत. एस पी, अभिनव पण तिथेच आहे. एफ सी रोड आणि क्याम्पातला मेन स्ट्रीट अजून सुद्धा तरुणाई ला भुरळ घालतो आहे, आणि टेकडीवर फिरायला जाणार्‍यांची संख्या पण तशीच आहे. अगदी हाँगकाँग लेन सुद्धा त्यातल्या बिर्यानी हाऊस सकट आहे तशीच आहे. नाही म्हणायला जिमखान्यावरचं आप्पाचं कँटीन मात्र बंद झालं. पण जिमखान्याची ऐट अजून आहे तशीच आहे. त्याला स्पर्धा म्हणून पीवायसी उभं राहिलं आहे.

अजूनही बालगंधर्व, टिळक स्मारक आणि यशवंतराव मध्ये मराठी नाटकांचे प्रयोग होत आहेत आणि तुळशीबाग तशीच तुडुंब गर्दीत भरून वाहते आहे. मॅजेस्टिक बुक दालनात नविन पुस्तकांचा ओघ कदाचित कमी झाला असेल, पण तिथे नेमाने जाणारे स्थानिक, आणि आपल्यासारखे परदेशस्थ अजून तसेच आहेत.
चितळ्यांची बाकरवडी, चक्का, दुध आणि काका हलवाई कडची मिठाई पण तशीच आहे आणि कयानीच्या बिस्कीटांची चव पण तीच आहे.

अर्थात पु लं नी सागून ठेवल्या प्रमाणे "आमच्यावेळी हे असं नव्हतं, हे वाक्य आपण कुठेही ऐकू शकतो " हे आहेच ....... Happy

वाह! कयानीची नानकटाई, दोराबजी, कॅम्प एरिया.
जमलं तर मला नेताजी नगरला जायचे आहे.
फर्ग्युसनच्या जवळपासही गेलं की मला पॅनिक अ‍ॅटॅक येतो. तेव्हाची सगळी अँग्झायटी अंगावरती धावुन येते. सम प्लेसेस आर बेटर लेफ्ट अनव्हिझिटेड.
-------
मुकुंदनगरमधील रामाचे मंदीर तसेच आहे हां जरा झकपक झालय. पण माझ्या प्रेग्नन्सी तल्या, नंतर बाळाला तिथे घेउन गेल्याच्या फार गोड स्मृती मनात आहेत.
अजुनही तिथली प्राजक्त, उंबराची झाडे तश्शीच आहेत. गारवा, पक्ष्यांचा चिवचिवाट तस्साच.

हो हो अरूण, या वास्तू आहेत. काही ठिकाणच्या पदार्थांची चवही तशीच आहे मान्य. हुजुरपागा मात्र आतून सपशेल बदलली आहे Happy . एसपीचं रमाबाई पाडतायत, बाकी पण बदल चालू झाले आहेत. हाँगकाँग लेनमधल्या मजेमजेच्या गोष्टींची आणि पुस्तकांची दुकानं गेली आहेत. क्याम्पात मेन स्ट्रीटवर प्रचंड बुजबुजाट, हिजडे आणि भिकारी झाले आहेत. वंडरलँडची रया जाऊन युगं लोटली. हां, थँकफुली मार्जोरिन चवीसकट तसंच आहे हे दु:खात सुख. पण बुधानीच्या तिखट वेफर्सची चव बदलली हे जामच जिव्हारी लागलं आहे Happy बालगंधर्वच्या इथे मॉल होणार अशी कुणकुण ऐकली होती, तसं झालं नाही तर फार्फार बरं होईल.

काय काय शिल्लक राहिलं आहे हे मोजणं पॉझिटिव्ह अप्रोच खराच, पण त्याआधी निगेटिव्ह गोष्टी इतक्या अंगावर येतात की माणूस मोजणी विसरून जाईल. या ट्रिपमधे प्रभात रोडवरच्या रिडेव्हलपमेंट्सनी मला असाच दणका दिलेला आहे. सेनापती बापट रोड ओळखू येण्याच्या पलिकडे गेला आहे आणि युनिव्हर्सिटीमधे जायचं तर धाडसच होत नाही.

युनिव्हर्सिटीमधे जायचं तर धाडसच होत नाही. >>>> म्हणून मी तो एरिया वगळला. पुर्वी त्या चौकात कारंजं होत. संध्याकाळी तिथे जाऊन बसणे म्हणजे .... जौद्या ...... Lol

कंवठे महाकाळ वरून वर्षा दोन वर्षातून एकदा येऊन नॉस्टेल्जिक व्हायची मजा अनुभवायची तर आधी तिकडे सेटल झाले पाहिजे..

शहरे ही सजीव संस्था (living system) असतात असे मी मानतो. त्यामुळे बदल हे सुरूच असतात. फक्त पूर्वी हे बदल घडायला २० - ४० वर्षे जायची त्याऐवजी आता हे बदल १-२ वर्षांमध्ये होत आहेत. आणि त्यामुळे ते अंगावर येत आहेत.

त्याचबरोबरीने हे बदल मूळ पुण्याला - त्याच्या आत्म्याला धक्का न लागू देता झाले असते तर बरे झाले असते. आता मात्र पुण्याचा आत्मा जाऊन फक्त झोंबी पुणे राहिले आहे असं वाटते.

मी पूर्ण सहमत आहे लेखाशी. नोकरीसाठी जाताना प्रचंड लांबचा प्रवास करावा लागत असल्याने वेळोवेळी रहदारीत झालेले बदल मी पहिले आहेत. २००८ साली आमची बस सिंहगड रोड वरून दत्तवाडी, लाल बहादूर शास्त्री रस्ता वगैरे फिरून कोथरूड डेपो वरून जायची तरी आम्ही ऑफिसात वेळेत पोहोचायचो. आता सकाळी ७ वाजता सुद्धा हिंजवडीला जॅम लागतो, इंडस्ट्रियल एरियात सुद्धा.
पूर्वी पार्किंग ला जागा मिळणे इतके दुरापास्त नव्हते.
संध्याकाळी तर आता तळवडे ते घर जेमतेम सुस्साट गेलं तर ४५-५० मिनिटांचा रास्ता पार करायला २ तास सहज लागू शकतात.

का कोण जाणे पण करोना नंतर मला उगीचच खूप कुठून कुठून लोक येऊन इथे फार गर्दी झाली आहे असं वाटतं आहे.
म्हातारी माणसे कधी कधी बाथरूममध्ये पडतात आणि तो एक असा पॉईंट ठरतो त्यांच्यासाठी जिथून त्यांची तब्येत डिटेरिओरेट होत जाते. तसं पुण्याचं होत चाललं आहे. चांदणी चौक बदलला, रस्ते वाढवले पण ट्राफिक जसे च्या तसे, मेट्रो चे काम कधी फ्लाय ओव्हर चे काम... मूळ अडचण काही दूर होत नाही.

लोकल ट्रान्सपोर्ट ची योग्य ती सोय नसल्याने लोक आपल्या आपल्या गाड्या घेऊन बाहेर पडतात... काही महाभाग तर एकटे असले तरी मोठे मोठे रणगाडे वाटतील अशा गाड्या घेऊन बाहेर पडतात.

शिस्त नसल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याची रहदारी.

सगळीच शहरे नियोजनाच्या अभावाने अशी झाली आहेत. बदल आवश्यक असला तरी त्यासाठी नियोजन केले जात नाही आणि मग एका टप्प्यानंतर सगळेच हाताबाहेर जाते.

पल्ली, अतिशय समर्पक शब्दामध्ये शहरातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उत्तम चित्र उभे केले आहे तुम्ही.

भ्रमर , मलाही अगदी गमन चित्रपट आणि या अप्रतिम गझलचे आठवण झाली !

सर्वांचे खूप खूप आभार.
हरवल्यागत झालंय ह्या माझ्याच शहरात. आताशा घरातच बरं वाटू लागलंय

Back to top