आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@देवकी, कुणाच्याही आहाराची किळस वाटणे चूक आहे, असे मला वाटाते. मग तो आहार कोण्या प्राण्याचे मलमूत्र का असेना!

कुणाच्या आहारावरून जज करू नये. हे सगळं वर्चस्ववादातून आलेलं असू शकतं. खास करुन शाकाहार-मांसाहार ह्या भेदाचा आधार चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे. जो पर्यंत मनात असे पूर्वग्रह आहेत, आपण त्या व्यवस्थेचे उदात्तीकरणच करत आहोत. शिवाय अनेक वेळा आहाराच्या सवयी- पद्धती जे मिळेल ते खाऊन रहाण्याच्या बिकट परिस्थितीतून आलेल्या असू शकतात. आदिवासी लोक उंदीर खातात, छत्तीसगड मधील एक जमात मुंग्यांची चटणी खाते. हे ऐकून मला फक्त वाईट वाटलं होतं.

मांसाहारी लोकांमुळे त्यांची शुचिता विटाळली नाही, ती पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे 'शेण खायला' गेली आहे. व्हिडिओ असह्य झाल्याने पूर्ण बघितला नाही. यापाठी अहंकार आहे, विवेक नाही.

>>>>>>>खास करुन शाकाहार-मांसाहार ह्या भेदाचा आधार चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे.
करेक्ट. आम्ही मांसाहार करत नाही हे बोलताना लोकांच्या तोंडावरुन काय सात्विक व 'होलिअर दॅन यु' तेज उतु जात असतं. गाईच्या सात्विक शुद्ध तूपाने थबथबलेला असतो चेहरा.

<< आदिवासी लोक उंदीर खातात, छत्तीसगड मधील एक जमात मुंग्यांची चटणी खाते. हे ऐकून मला फक्त वाईट वाटलं होतं. >>

------ महाराष्ट्रात, गडचिरोली ( माडिया, गोंड) मधे आदिवासी लोक लाल मुंग्यांची चटणी खातात. छान प्रोटिनयुक्त आहार आहे.

https://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/a-hunter-competes-in-arc...

मांसाहारी लोकांमुळे त्यांची शुचिता विटाळली नाही
>>>>>
पूर्वापार शाकाहारी लोकांना मांसाहाराचा वास आवडत नाही. त्यांना मळमळु शकतं. बोन्स किंवा माश्याचे काटे पाहायला त्रासदायक वाटू शकतं हे मी समजू शकते. चुकूनही असे दृश्य दिसले तर काही दिवस मानसिक त्रास होऊ शकतो हे ही समजते. त्यासाठी पंचामृत घेतले असते तरी समजलं असतं. पण पंचगव्य? हे पटत नाही. आणि जे काय प्रायश्चित्त घेतले ते पब्लिकली जाहीर करणे हा त्याहून जास्त मूर्खपणा. अर्थात आजकाल कुठे आणि किती व्यक्त व्हावे याला काही धरबंद नाही. या काकू त्यातील एक.
खरं तर शाकाहारी व मांसाहारी दोन्ही लोकांनी आपल्या आहारपद्धतीपायी दुसऱ्याला कमी लेखणे हा अहंकार आहे.

मध्यंतरी कर्नाटक सरकार मुलांना शाळेत खिचडीसोबत अंडे देतात म्हणून ट्विटरवर वादंग झाला. कारण आमच्या मुलांना भ्रष्ट करत आहेत म्हणून. (ज्यांची मुले अंडी खात होती त्यांचे मत कुणी विचारात घेतले का नाही माहित नाही.) त्यातल्या काही लोकांना समजावण्याचा प्रयत्नही केला की पुढाकार घेऊन काही संस्थांना/मठांना भेटा व व्हेज प्रोटीनसाठी लागणारा जास्तीचा खर्च त्यांच्याकडून मिळतो आहे का पहा, इतर काही मार्ग सुचवा. पण गाडी सरकारनेच सगळे केले पाहिजे यावर अडली होती.

(Here is to you BlackCat. You were vocal about including eggs in mid-day meal for protein. Your wish is fulfilled. आता महाराष्ट्रातही बुधवार, शुक्रवारी देतात. पण ही बातमी बहुतेक वाद घालणाऱ्यांपर्यंत पोहोचली नसावी. असो.)

कांदा-लसूण न खाल्ल्याने, जैन लोकांत हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण जास्त असून, अल्पवयात येतो असे वाचनात आलेले मधे.

Pages