आठवणीतले क्रिकेट विश्वचषक - १९९६
मी दहावी १९९६ बॅचचा. जे क्रिकेटप्रेमी माझ्याच बॅचचे असतील त्यांना आठवत असेल की आपण दहावी बोर्डाची परीक्षा क्रिकेट वर्ल्डकप सोबत दिली होती. आणि तो वर्ल्डकप क्रिकेटची पंढरी असलेल्या भारतातच असल्याने आपल्या दहावीची देखील काशी झाली होती. प्रीलीम नंतर अभ्यासाला जी सुट्टी मिळते ती वाया गेलीच होती. पण फायनल १७ मार्च १९९६, ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, आपला सामना नसूनही दहावीच्या पेपरचा अभ्यास सोडून, आपण बॉल टू बॉल पाहिली होती. कारण ऑस्ट्रेलिया हरावी आणि श्रीलंका जिंकावी असे मनोमन वाटत होते, आणि तसेच होत होते.
दहावीचा अभ्यास करायला मी डोंगरावर जायचो. तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता. घरी मी टीव्हीवर मॅच बघू नये म्हणून मला सकाळीच जेवणाचा डब्बा देऊन डोंगरावर अभ्यासाला पाठवायचे. पण मी सुद्धा हुशार. सोबत ट्रान्झिस्टर घेऊन जायचो. त्यावर कॉमेंट्री ऐकत बसायचो. बाकीची पोरं देखील अध्येमध्ये स्कोअर विचारायला यायची. जेव्हा सामना रंगतदार व्हायचा तेव्हा डोंगरावरच राहणार्या मित्राच्या घरी जाऊन बघायचो. तो नसल्यास तिथल्याच कोणाच्या तरी दाराखिडकीत उभे राहून बघायचो. अपवाद वगळता कोणी पडदा सरकवायचे नाही. क्रिकेटप्रेमींकडून एवढी माणूसकी तेव्हा जपली जायची.
ऑस्ट्रेलिया विंडीजविरुद्ध सेमी फायनलला हरायची लक्षणे दिसू लागली तेव्हा मोठ्या उत्सुकतेने एका डोंगरावरच्या मित्राच्या घरी मॅच बघायला गेलो होतो. पहिल्या इनिंगला विंडीजने ऑस्ट्रेलियाचे टेलर, पाँटींग, आणि वॉ बंधू यांना झटपट बाद करून त्यांची स्थिती १५-४ अशी केली होती. तिथून त्यांचा नेहमीचा तारणहार मायकेल बेवनने त्यांना २०७ चा आकडा दाखवला होता. हे माफक लक्ष्य पार करताना लारा आणि चंदरपॉल यांनी अशी काही भक्कम सुरुवात दिली की विंडीजची स्थिती ४१ ओवर अखेरीस १६५-२ अशी होती.
शिल्लक ९ ओवर ४३ धावा आणि ८ विकेट हातात. पण तिथून पुढे जे काही बघायला मिळाले ते अदभुत होते. जे फक्त आणि फक्त ऑस्ट्रेलियाच करू जाणे. जे फक्त आणि फक्त विंडीजसोबतच व्हावे. त्या स्थितीतून तो सामना २०२ ला सर्वबाद होत विंडीजने ५ धावांनी गमावला. किथ आर्थरटन म्हणून विंडीजचा एक फलंदाज होता. जो पुर्ण वर्ल्डकप अपयशी होता. त्या आधीच्या ५ सामन्यात मिळून त्याने २ धावा केल्या होत्या. आणि त्या सेमी फायनलला देखील तो शून्यावरच बाद झाला. ऑस्ट्रेलियन विजयाला हातभार लावला म्हणून त्या दिवशी त्याने आमच्या फार शिव्या खाल्या होत्या. यामुळेच तो विशेष लक्षात राहिला.
त्या दिवसापासून भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या ज्या आजतागायत कायम आहेत. एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा सामना कोणाशीही का असेना तेच हरावे असे वाटते. दुसरे म्हणजे जेव्हा ते एखाद्या महत्वाच्या सामन्यात आपला खेळ ऊंचावून आणि अटीतटीच्या क्षणी लढाऊ वृत्ती अन जिगर दाखवून विजय मिळवतात तेव्हा त्यांच्याबद्दलचा आदर अजून वाढतो.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध विंडीज सामन्याच्या हायलाईटस ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=lZmacAy-gj0
आणि ईथे त्या सामन्याचा स्कोअरकार्ड
पण तो वर्ल्डकप गाजवला आणि लक्षात राहिला तो श्रीलंका आणि जयसुर्या-कालुविथरना जोडीमुळे..
मोजून नऊ देश क्रिकेट खेळायचे तेव्हा, ज्यात झिम्बाब्वे नवव्या क्रमांकाचा आणि श्रीलंका आठव्या क्रमांकाचा संघ समजला जायचा. पण जयसुर्या-कालुची पॉवरप्लेच्या पंधरा ओवरमधील आतिषबाजी, मागाहून अरविंद डिसिल्व्हाचा क्लास, आणि शांत संयमी कर्णधार अर्जुन रणतुंगाचा चिवटपणा यांच्या जीवावर हा संघ कात टाकत होता. या बदलाची कल्पना होती पण आपल्याला हा फटका बसायचा बाकी होता.
आजही आठवतेय की सचिनच्या तडाखेबाज शतकाच्या जीवावर भारताने २७० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य दिल्यावर आता हा सामना आपलाच आहे असे समजून लंच ब्रेकमध्ये वडिलांबरोबर काही कामानिमित्त बाहेर गेलो होतो. यायला किंचित उशीर झाला. परत येऊन टीव्ही लावला तेव्हा तीन चार ओवर झाल्या होत्या. समोर जो काही स्कोअर दिसला त्यावर विश्वास ठेवणे जड जात होते.
वेगात धावा जमवायच्या असल्यास पिंच हिटर म्हणून श्रीनाथसारख्या एखाद्या गोलंदाजाला वरच्या क्रमांकावर पाठवायचा काळ होता तो.. तिथे ओपनिंगच्या फलंदाजांनी ३ ओवर ४२-० अशी सुरुवात देणे हे तेव्हा कल्पनेच्याही पलीकडले होते. त्याहून अविश्वसनीय हे होते की हे सारे ऑस्ट्रेलिया-आफ्रिका नाही तर श्रीलंका घडवत होते.
भारत-लंका साखळी सामन्याचा विडिओ ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=DpmcW8JqD5k
सेमी फायनल सामन्यात जेव्हा जयसुर्या आणि कालुविथरना पहिल्या ओवरलाच बाद झाले तेव्हा जणू काही वर्ल्डकप जिंकल्याचा आनंद झाला ते यासाठीच. तेव्हा आम्ही चाळीत राहायचो. चाळीत सगळ्यांकडे टीव्ही नसायचा. ज्यांच्याकडे होता ते देखील दार बंद करून एकट्याने सामना बघतील हे आमच्या चाळसंस्कृतीत बसायचे नाही. त्यात आमचे संपुर्ण घर ठार क्रिकेटवेडे. त्यामुळे भारताचा सामना असला की आमचे घर स्टेडियम सारखे हाऊसफुल व्हायचे. पहिल्या ओवरलाच जेव्हा जयसुर्या आणि कालुविथरना बाद झाले तेव्हा अक्षरशा आमच्या घराचे ईडन गार्डन झाले होते. पुढे अरविंद डिसिल्व्हाने हे वातावरण फार काळ टिकू दिले नाही ते वेगळे. पण दुसर्या डावात सचिन बाद झाल्यानंतर जो आपला डाव कोसळला त्याची भयाण स्वप्ने पुढील कित्येक वर्षे पडायची. त्या सामन्यात विनोद कांबळी रडला आणि अजरामर झाला..
भारत-लंका सेमीफायनल सामन्याची क्षणचित्रे ईथे बघू शकता - https://www.youtube.com/watch?v=AjCg3so4DHA
बघा कांबळी रडताना दिसतो का ते.. मी पाहिला नाही विडिओ. आजही पुन्हा बघायची हिंमत नाही.
वर्ल्डकप हरलो तरी चालेल पण पाकिस्तानशी जिंकायला हवे ही भावना सुद्धा याच वर्ल्डकपपासून बळाला आली. कारण सेमीमधील त्या चटका देणार्या पराभवानंतर सुद्धा हा वर्ल्डकप आठवणीतून पुसून टाकावासा वाटत नाही याचे कारण म्हणजे भारत पाक सामना.
त्या सामन्यात भारतीय क्रिकेटप्रेमींना आयुष्यभर आठवणीत साठवून ठेवावा असा एक क्षण मिळाला.
पाकिस्तान आपल्यापेक्षा काही पटींनी बलाढ्य असायचा तो काळ. त्यात प्रेशर गेम म्हटले की ते जास्त जिद्दीने खेळतात असा अनुभव. अश्यात वर्ल्डकप क्वार्टर फायनल पेक्षा मोठा प्रेशर गेम तो काय..
आपल्या संथ सावध रटाळ सुरुवातीनंतर अजय जडेजाने त्यांच्या वकार युनूसची जी काही पिसे काढली त्याने आपली धावसंख्या आणि जडेजाची लोकप्रियता एका दणक्यात वाढवली. अचानक आपण त्या सामन्यात फेव्हरेट वाटू लागलो आणि जिंकायच्या आशा पल्लवित झाल्या.
२८८ टारगेट !
प्रेशर गेम आणि मोठा स्कोअर लागला होता. पण काही वेळातच तो छोटा वाटावा अशी फटकेबाजी त्यांच्या अन्वर-सोहेल जोडीने सुरू केली. १० ओवर ८४-० हे आकडे गूगल करायची मला गरज पडली नाही. कारण आजही ते लक्षात आहेत. त्या वेळेस आमच्या घरचे अर्धे स्टेडियम रिकामे झाले होते. जसे "८३" चित्रपटात विव्ह रिचर्ड्स मारू लागताच कपिलची बायको ते बघवेनासे झाल्याने स्टेडीयम सोडून निघून जाते अगदी तसेच झाले होते. आपले गोलंदाज सामान्य, नव्हे अतिसामान्य भासावेत या प्रकारे मार खाताना बघवत नव्हते.
पण अकराव्या षटकात अन्वर बाद झाला आणि पुढच्या काही षटकातच आमीर सोहेलची ती ऐतिहासिक विकेट आली. एक चौकार मारून सोहेलने प्रसादला त्याची जागा दाखवायचे हावभाव केले आणि पुढच्याच चेंडूवर प्रसादने त्याला त्याची जागा दाखवून दिली. इन्स्टंट कर्मा म्हणतात ते हेच असावे.
आमीर सोहेल - वेंकटेश प्रसादचा "तो" सीन - काय बोलावे मी त्याबद्दल. स्वतःच बघा पुन्हा एकदा आणि त्या दोघांच्याच तोंडून त्याबद्दल ईथे ऐका
https://www.youtube.com/watch?v=dkMt06FI6CI
------------------
धागा सर्वांसाठी खुला आहे.
प्रतिसादात याच वर्ल्डकपच्या आठवणी जागवूयात.
ईतर वर्ल्डकपसाठी हवे तर लवकरच ग्रूपिंग करून वेगळे धागे काढूया..
अन्यथा क्रिकेट हा विषय असा आहे की किती लिहावे अन किती नाही या गोंधळात काहीच लिहिले जात नाही
खूप आठवणी आहेत
खूप आठवणी आहेत
आपली पहिली मॅच,सचिन चं शतक अन् केनियाला धोबीपछाड
मग विंडीज विरुध्द सचिन चे सत्तर, कांबळी - अझर ची बरी पार्टनरशिप असं बरं चाललं असताना आधी ऑस्ट्रेलयाविरुद्ध मुंबईत सचिन चं हुकलेलं शतक (९०) अन् २ रन नी हार आणि मग कोटला वर शतक होऊनही लांकेनी दिलेला हाग्या मार
झिम्बाब्वे विरुध्द ऐन वेळी कांबळीनी मारलेलं शतक अन् जाडेजा ची फटकेबाजी आपल्याला बाद फेरीत घेऊन गेली.
तिथे अक्रम नसताना सिद्धूच्या ९३ अन् जडेजाच्या लेट फ्लरिश वर पाक laa दिलेलं टार्गेट अन् प्रसाद चा कमाल बोल्ड आयकॉनिक होतं. सेमी ला जयासूर्या ला मारलेला ट्रॅप, डिसिल्वा च्या बॅटिंग मुळे मिळालेलं २५१ चं अचीव्हेबल भासणारे टार्गेट अन् पुढचा एपिक कॉलाप्स
शाळेत पोरांनी दप्तरात लपवून आणलेल्या रेडिओ वर ऐकलेले स्कोअर, विकेट्स गेल्यावर वर्गात केलेला कल्ला, शाळेजवळची विना कटकट पोरांना टीव्ही बघू देणारी कंप्लीट अनोळखी घरं अन् दुकानं
कोकाकोला ऑफिशियल ड्रिंक तर पेप्सी च्या Nothing official about it वाल्या जाहिराती
कर्स्टन चे १८८, क्वार्टर मधे न्यूझीलंड ऑस्सी सामन्यात ख्रिस हॅरिस नी लढवलेला किल्ला, केनियानी पुण्यात विंडीज वर केलेली मात, क्रोनिए ला दोनदा काप्तानी साठी मिळालेला सामनावीर पुरस्कार
आणि ती विल्स वर्ल्डकप ट्रॉफी...
क्रोनिए ला दोनदा कप्तानी साठी
क्रोनिए ला दोनदा कप्तानी साठी मिळालेला सामनावीर पुरस्कार >>>
अच्छा.. हे नव्हते माहीत
सचिनच्या सभोवताली असलेल्या प्रभाकर मांजरेकर वगैरे फलंदाजांची संथ फलंदाजी पाहता दादाचे पदार्पण एक वर्ष आधी झाले असते तर बरे झाले असते असे नंतर वाटायचे. एकहाती किती सातत्य दाखवणार होता तो बिचारा..
८३ चा अंधुक अंधुक आठवतो आहे.
८३ चा अंधुक अंधुक आठवतो आहे. तेंव्हा दूरदर्शनवर काही काही सामने येत असत. फायनल आठवते. आपला स्कोअर एव्हढा कमी झालेला बघून सामना सोडून दिला होता. कपिलने घेतलेल्या त्या कॅच नंतर बोटांच्या फटीमधून अधे मधे बघितलेला आठवतो . मी बघितलेला पहिला कलर सामना होता
९१ चा आठवतो तो निव्वळ आपल्याला बहुतेकांनी दिलेल्या हग्या मारामूळे. ऑलमोस्ट रडकुंडीला आलेला प्रभाकर, दयनिय अवस्थेतला कपिल, भांबावलेला श्रश्री, शेवटच्या घटका भरायला आलेला शास्त्री आठवतात. ऑस्ट्रेलिताविरुद्ध संजय मांअज्रेकरने जवळ्जवळ जिंकलेली मॅच आठवतेय. सचिन तेंव्हा पुरेसा सचिन व्हायचा होता. नाही म्हणता आपण पाकिस्तानला हरवलेले ही सुखद आठवण आहे. बाकी ठळक आठवण म्हणाजे मार्क ग्रेट्बॅच ला मार्टीन क्रो ने ओपन करायला लावून घातलेला धुमाकूळ.
मस्त लिहिलंयस ऋन्मेष! मला
मस्त लिहिलंयस ऋन्मेष! मला इतके डिटेल्स आठवत नाहीत (माझी दहावी ९९ ची. तेव्हा इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप होता. ) पण श्रीलंकेचा अचाट खेळ आठवतो आणि विनोद कांबळी रडला होता ते आठवतं. तो सामना लोकांनी हुल्लडबाजी करून मैदानावर बाटल्या वगैरे फेकल्यामुळे बंद पडला होता आणि श्रीलंकेला विजयी घोषित केलं होतं.
जावेद मियाँदाद बाद झाल्यावर रडला होता ते याच वर्ल्डकपमधे का?
92 वर्ल्ड कप वेळी मी लहान
92 वर्ल्ड कप वेळी मी लहान होतो आणि आठवत नाही ते बरेच आहे.. उगाच वाईट आठवणी जमा झाले असत्या )
काही गोष्टी मात्र आठवत आहेत. आपण पाकिस्तान वर मिळवलेला विजय, मग पाकिस्तान ने न्युझीलँड वर मिळवलेला विजय, स्पिन गोलंदाज दीपक पटेल ने केलेली सुरुवात, झिम्बाब्वे सामन्यात फलंदाजीला पुढे आलेला कपिल, काही चटका लावणारे निसटते पराभव, आणि अर्थात मार्टिन क्रो चा धूमाकूळ (हे नाव मला त्या वर्ल्ड कपलाच समजले, आणि त्यानंतर विसरून सुद्धा गेलो, म्हणजे लक्षात राहिले, पण त्याला कधी फॉलो करायला गेलो नाही की हा खरेच इतका ग्रेट फलंदाज आहे का हे बघायला गेलो नाही..
माझी दहावी ९९ ची. तेव्हा
माझी दहावी ९९ ची. तेव्हा इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप होता..
>>>>
आणि माझी तेव्हा बारावी होती
सलग तीन वर्ल्ड कपनी माझी वाट लावली.. तेव्हा क्रिकेट जास्त कळू लागलेले, तसेच आवडीचे प्लेयर तयार झालेले. त्याबद्दल पुढच्या भागात लिहितो..
>> माझी दहावी ९९ ची. तेव्हा
>> माझी दहावी ९९ ची. तेव्हा इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप होता..
>> आणि माझी तेव्हा बारावी होती
तेव्हा मी अमेरिकेत न्युजर्सी मधे होतो, क्लाएंटला भेटायला हॅरिसबर्ग पेनसिल्वेनिया मधे ऑफिसमधल्या एका कलिगबरोबर गेलो होतो. तेव्हा माझा क्रिकेटशी काहीच संबंध राहीला नव्हता. वर्ल्डकप मॅचेस चालू आहेत इतकं ऐकून माहिती होतं पण आपण कुठे आहोत फायनल कधी आहे याची काहीच कल्पना नव्हती. तो कलिग आणि मी सकाळी हॉटेल मधे नाश्ता करीत होतो. तो पेपर वाचत असताना मधेच म्हणाला की भारताची कुठली महत्वाची मॅच होती का? मी म्हंटलं मला काही माहिती नाही पण असेल वर्ल्डकप मॅचेस चालू आहेत. तर त्यानं मला पेपर वाचायला दिला त्यात आपण श्रिलंकेशी हारल्याची बातमी होती. बातमी छोटीच होती व त्यात प्रेक्षकांनी दंगल केल्यामुळे तो सामना श्रिलंका जिंकल्याचा उल्लेख होता.
माझ्या हे इतक्या ठळकपणे लक्षात रहाण्याची कारणं - त्या अमेरिकन कलिगला क्रिकेट म्हणजे काय ते माहीत नाही पण केवळ मी भारतीय आहे आणि भारताच्या सामन्याबद्दल मला कुतुहल असेल म्हणून केवळ ते त्यानं सांगितलं. दुसरं म्हणजे तो अमेरिकन पेपर होता, त्यातली खेळ पुरवणीच तो वाचत होता. त्यात भारताच्या सामन्याचा त्यातही क्रिकेटच्या हे अगदीच कल्पेनेच्या पलिकडचं होतं. मी त्याला तसं म्हंटलंही.. पण तो म्हणाला त्या विशिष्ट (मी त्या पेपरचं नाव विसरलो आहे आता) पेपरचं कव्हरेज चांगलं असतं.
तुम्ही सगळे जामच मोठे आहात
तुम्ही सगळे जामच मोठे आहात माझ्यापेक्षा.
चिमण, तुम्ही 99 कोट केले पण
चिमण, तुम्ही 99 कोट केले पण किस्सा 96 वर्ल्डकपचा सांगितला.. पण योग्य केलेत, धागा 96 चाच आहे.
बाकी अमेरिकन वृत्तपत्राने बातमी कदाचित यासाठी दिली असावी की लोकांनी स्टेडियम मध्ये दंगा घातला, जाळपोळ केली.
मस्त लिहीले आहे!
मस्त लिहीले आहे!
असामी - त्या "९१" च्या कपच्या पॅरा मधे एक दोन उल्लेख ९६ चे वाटतात. प्रभाकर व कपिलचे. ९१-९२ च्या कप च्या वेळेस दोघेही फॉर्मात होते. बाकी उल्लेख बरोबर आहेत. ९१-९२ चे.
१९९६ च्या पाक मॅचची अजून एक आठवण म्हणजे तोपर्यंत "ऑल्मोस्ट" निवृत्त (पाकडे क्लिअर निवृत्त कधी होत नाहीत) झालेल्या मियाँदादला खास आपल्यावर प्रेशर टाकण्यासाठी या मॅच मधे आणले गेले. पण त्याचा पार पोपट करून टाकला होता. एकतर तो भयंकर स्लो खेळला होता आणि मॅचवर काही इम्पॅक्ट करण्या आधीच आउट झाला.
सचिनला वर्ल्ड्स बेस्ट बॅट्समन वगैरे म्हणणे साधारण या सुमारास सुरू झाले. तेव्हा त्याचे प्रतिस्पर्धी सईद अन्वर, मार्क वॉ आणि अरविंद डिसिल्वा आणि लारा होते. भारत वि ऑस्ट्रेलिया लीग गेमला "preview of the final" म्हंटले गेले होते.
या स्पर्धेत दोन मोक्याच्या वेळेस सचिन मुख्य बोलर्सवर वर्चस्व गाजवल्यावर पार्ट टाइम गोलंदाजांविरूद्ध स्टम्प झाला आणि आपण मॅच हरलो होतो. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मार्क वॉ आणि लंकेविरूद्ध जयसूर्या.
कलकत्त्याला टॉस जिंकल्यावर पहिली बॅटिंग न घेणे यात फिक्सिंगचा भाग होता असे तेव्हा म्हंटले गेले होते. कारण मॅचच्या दिवशी सगळ्या एक्स्पर्ट्सचे मत पहिली बॅटिंग घ्यावी, नंतर पिच खराब होईल असे होते. पण सचिनच्या पुस्तकात त्याने खुलासा केला आहे तो निर्णय फक्त अझरचा नव्हता. पूर्ण टीमचाच अंदाज चुकला.
असामी - त्या "९१" च्या कपच्या
असामी - त्या "९१" च्या कपच्या पॅरा मधे एक दोन उल्लेख ९६ चे वाटतात. प्रभाकर व कपिलचे. ९१-९२ च्या कप च्या वेळेस दोघेही फॉर्मात होते. बाकी उल्लेख बरोबर आहेत. ९१-९२ चे. >> हो बरोबर आहे तुझे फा. मनोज ला ९६ मधे तडी मिळाली होती.
पार्ट टाइम गोलंदाजांविरूद्ध स्टम्प झाला आणि आपण मॅच हरलो होतो. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मार्क वॉ आणि लंकेविरूद्ध जयसूर्या. >> जयसूर्या तेंव्हा इतका रेग्युलर बॉलिंग करत असे कि पार्ट टआईम म्हणणे जास्त वाटतेय रे. तो बॉलही त्याने मस्त ऑफ च्या बाहेर - जवळजवळ वाईड ठेवून सचिनला पुढे खेचले होते नि स्टंप झाला होता
एकतर तो भयंकर स्लो खेळला होता आणि मॅचवर काही इम्पॅक्ट करण्या आधीच आउट झाला. >> मियांदादबद्दल हे आठवतेय. ९५ चा कप मधे वेस्ट इंडिज विरुद्ध कांबळी खतरनाक खेळला होता हे आठवतेय. अॅम्ब्रोज ला त्याने २-३ सिक्सेस मारले होते. अँब्रोज ला तस्से आधी कोणी मारलेले आठवत नाही. अगदी सचिन सुद्धा आदराने खेळायचा. जयसूर्याचा तर नंतर कधी तरी हात तोडला होता त्याने. वेस्ट इंडीज च्या गटबाजीने त्यानी सेमी गायनल घालवली होती तेंव्हा रिचर्डसन रडवेला झाला होता ते आठवतेय. लंका वि विंडीज बघायला मजा आली असती.
यात फिक्सिंगचा भाग होता असे तेव्हा म्हंटले गेले होते >> हे तेंव्हा प्रत्येक बाबतीमधे म्हणायला लागले होते. दूधाने तोंड भाजले कि ताक पण फुंकून पितात तसा प्रकार होता. काही जण तर अजूनही जिथे तिथे फिक्सिंग सुरू आहे म्हणत असतात
त्यावेळी माझी अकरावी होती आणि
त्यावेळी माझी अकरावी होती आणि अगदी ऐन परिक्षेचे दिवस होते त्यामुळे फक्त स्लॉग ओव्हर्स बघायची परवानगी होती घरातुन अर्थात पाकविरुद्धची मॅच हा अपवाद
जडेजाने वकार ला फोडलेले चांगले आठवतेय..... प्रसाद आणि सोहेलची टशन पण भारी होती
श्रीलंकेविरुध्दच्या मॅचनंतर प्रचंड चिडचिड झाली होती!!
पण एकंदर आपली ९६ची टीम बोअरच होती.... अजय जडेजा आवडायचा तेंव्हा पण आपली निम्मी टीम बोअर होती!!
अझर, प्रभाकर, मोंगिया, कांबळी, राजू अज्जिबातच आवडायचे नाहीत.... त्यातल्या त्यात सिद्धू आणि सचिन चांगले खेळायचे!!
श्रीनाथ आणि कुंबळेचे पण सुरुवातीचेच दिवस होते ते आणि ते दोघेही आवडायला लागलेले.
आपला ड्रेस फारच बंडल होता आणि उगाचच सगळे ढगळे कपडे घालायचे.
पहील्या ओव्हरपासून सातत्याने फिअरलेस खेळण्याचा ट्रेंड आणला होता रोमेश कालुवितरणा आणि जयसुर्याने त्या वर्ल्डकपमध्ये.
यजमान देश वर्ल्डकप जिंकत नाहीत ती परंपरा श्रीलंकेने मोडीत काढलेली त्यावर्षी
पहील्या ओव्हरपासून सातत्याने
पहील्या ओव्हरपासून सातत्याने फिअरलेस खेळण्याचा ट्रेंड आणला होता रोमेश कालुवितरणा आणि जयसुर्याने त्या वर्ल्डकपमध्ये. >> अरे ९१ ला मार्क ग्रेट्बॅच ने सुरू केला तो ट्रेंड. मार्टीन क्रो चा मास्टर स्ट्रोक होता तो. अगदी दीपक पटेल ला पण तसे वापरले होते. लंकेने तोच कित्ता गिरवला पण अधिक फीअरलेसपणे नि कायम स्वरुपी केला.
तशी क्षमता सुद्धा लागते.
तशी क्षमता सुद्धा लागते. मनगटात तसेच बळ सुद्धा लागते. आमच्याइथे गल्ली क्रिकेटमध्ये जयासूर्याच्या मनगटाचे फॅन होते तेव्हा सारे. खूप रावडी होते. सारी मुले तशीच ठक ठक बॅट आपटून खेळायची कॉपी करायचे.
मी तेव्हा खूपच लहान होतो.
मी तेव्हा खूपच लहान होतो.
नयन मोंगिया हा त्याकाळचा
नयन मोंगिया हा त्याकाळचा सगळ्यात भारी क्रिकेटर विकेटकीपर होता असं मला वाटायचं. त्याला मी लाडाने डोळा मोंगिया बोलायचो. आणि संजय मांजरेकर मांजर पकडायचा म्हणून त्याला मांजरेकर बोलायचे असा माझा समज होता.
जयसूर्या तेंव्हा इतका
जयसूर्या तेंव्हा इतका रेग्युलर बॉलिंग करत असे कि पार्ट टआईम म्हणणे जास्त वाटतेय रे >>> खरे आहे. पण सुरूवातीचे बोलर्स धुवून काढल्यावर या फर्स्ट किंवा सेकंड चेंज बोलर्सना विकेट गेल्यामुळे तसे लिहीले. यातली दोन्हीपैकी एक विकेट तर अक्षरशः फ्रॅक्शन ऑफ सेकण्ड फरकाने गेली होती. त्यातली कोणती आता लक्षात नाही.
बाय द वे, ९१-९२ च्या वर्ल्ड कप पासून तो ट्रेण्ड आला कारण पहिल्या १५ ओव्हर्समधे बाहेर दोनच फिल्डर्स लावता येतील हा नियम वर्ल्ड कप मधे तेव्हाच पहिल्यांदा आला. त्या आधी तो जनरल कॉमन रूल नव्हता. तेव्हापासून झाला. ८०ज मधे श्रीकांतही मारत असे पण तेव्हा फिल्डर्सचा रूल नसल्याने मर्यादा होत्या. इव्हन गावसकर ने १९८६ मधे ऑस्ट्र्रेलियात व १९८७ च्या वर्ल्ड कप मधे भारतात फिल्डर्सच्या डोक्यावरून मारणे सुरू केले होते. पण आधी ग्रेटबॅच-क्रो ने व नंतर जयसूर्या-कालू ने ते फार वरच्या लेव्हलला नेले.
सलग तीन वर्ल्ड कपनी माझी वाट लावली >>> १९९९ चा कप मिड मे ते मिड जून होता. कोणत्या स्कूलिंग सिस्टीम मधे तेव्हा परीक्षा होत्या? बाकीचे दोन निदान थोडे आधी होते पण या कपने तुझी कशी वाट लावली? तसा १९९२ च्या कपही मार्च मधे संपला होता . फक्त १९९६ चा परीक्षांच्या काळात होता.
यातली दोन्हीपैकी एक विकेट तर
यातली दोन्हीपैकी एक विकेट तर अक्षरशः फ्रॅक्शन ऑफ सेकण्ड फरकाने गेली होती. >> म्हणजे काय रे ? क्रीजमधे परत जाण्याबद्दल म्हणतो आहेस का ? तसे असेल तर वॉ वाली असेल असे वाटते.
हो बरोबर फा,
हो बरोबर फा,
96 साली दहावी होती वर्ल्डकप तारखा मॅच करून..
पुढे 98 साली माझी बारावी असायला हवी होती पण मी गॅप घेतलेली त्यामुळे 99 या वर्ल्डकप वर्षाला आली. तरी वर्ल्डकप ने वाट लावली नाही. माझी मीच वाट लावलेली. पण योग असा जुळून आला की 96 नंतर वर्ल्डकप चार वर्षानी न येता 3 वर्षानी आला होता आणि मी सुद्धा गॅप घेतल्याने माझी बारावी सुद्धा दहावी नंतर दोन वर्षानी न येता तीन वर्षानी आली होती. त्यामुळे बोर्डाचे वर्ष मॅच झाले होते.
त्यांनतर मात्र मी दहावीच्या बेसिस वर डिप्लोमा केला. तो नेमका विजेटीआयला केला. जिथे तो तीन ऐवजी चार वर्षाचा असतो. त्यामुळे पुन्हा 2003 वर्ल्डकप माझ्या फायनल सेमीस्टर सोबत आला. इथे मात्र तारखा सेम होत्या. कारण फायनलला सेहवाग बाद होताच मी डोक्यात राख घालून कॉलेजला परीक्षेच्या अभ्यासाला निघालो होतो. तिथे रात्रभर मग तोच माहोल होता..
डिग्री मात्र तीन वर्षात 2006 साली उरकली आणि 2007 वर्ल्डकप जॉब करत एन्जॉय करूया म्हटले तर तो काहीतरीच गचाळ झाला...
मी सुद्धा गॅप घेतल्याने माझी
मी सुद्धा गॅप घेतल्याने माझी बारावी सुद्धा दहावी नंतर दोन वर्षानी न येता तीन वर्षानी आली होती. त्यामुळे बोर्डाचे वर्ष मॅच झाले होते. >>> हे समजले. मला प्रश्न पडला होता की ९९ मधे काय कारण होते.
म्हणजे काय रे ? >> दोन्ही क्लिप्स बघायला पाहिजेत परत. एका केस मधे क्लासिकल स्टंपिंग होते. वेळेवर बॅट न टेकवल्याने. दुसर्या केस मधे पाय किंचिंत उचलला गेला होता बरोब्बर ज्या वेळेस बेल्स उडवल्या तेव्हा. मी त्याबद्दल म्हणत होतो.
"कोणत्या स्कूलिंग सिस्टीम मधे
"कोणत्या स्कूलिंग सिस्टीम मधे तेव्हा परीक्षा होत्या?" - असले प्रश्न विचारणं कधीच बंद केलंय. आता त्या डोंगर जाळण्याच्या लेखात ११-११:३० ची सामसूम वेळ निवडलीय. पण ह्या लेखात ट्रान्झिस्टर घेऊन डोंगरावर अभ्यासाला जाण्याविषयी उल्लेख आहे. दुपारी २ वाजता सुरू झालेल्या मॅचेस रात्री ९-९:३० पर्यंत संपायच्या. त्यामुळे काळ, वेळ, स्थळ ह्यांना भेदून सगळीकडे उपस्थित असलेल्या 'हरितात्यां'च्या पोस्ट्स नुसत्या वाचायच्या. प्रश्न नाही विचारायचे.
बाय द वे, तू लिहिलेल्या मार्क वॉ (१९९६ वर्ल्डकप, इंडिया वि. ऑस्ट्रेलिया, मुंबई) आणि जयसूर्या (१९९६ वर्ल्डकप सेमी-फायनल, इंडिया वि. श्रीलंका, कलकत्ता) ह्या दोन्ही स्टंपिंग विकेट्स आठवतात. मला वाततं तू जयसूर्याला पडलेल्या विकेट विषयी बोलतोयस. कारण वॉ च्या वाईड ला हूकल्यावर सचिन बर्यापैकी क्रीझच्या बाहेर होता. एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून तो मागे वळला. पण इट वॉज टू लेट. जयसूर्याच्या बॉलला पण तो बाहेर होता, पण त्याने परत यायचा प्रयत्न केला होता.
जयसूर्याच्या बॉलला पण तो
जयसूर्याच्या बॉलला पण तो बाहेर होता, पण त्याने परत यायचा प्रयत्न केला होता. >> त्याने बॉल ग्लान्स करायचा प्रयत्न केला होता. बॉल स्लो कीपरकडे गेला होता. नि सचिन बॉल कीपरकडे जायच्या आधी क्रीजच्या बाहेर निघाला होता बहुधा बाय घेण्यासाठी पण बॉल कीपरकडे गेला नि ते लक्षात आल्यावर सचिन ने परत वळण्याचा पर्यत्न केला होता पण त्याच्या मोमेंटममूळे गंडला होता. राहता तर मॅच काढली असती त्याने नक्की.
"राहता तर मॅच काढली असती
"राहता तर मॅच काढली असती त्याने नक्की." - २५० च्या आसपासचा स्कोअर चेस करत होतो रे.. त्यावेळचा त्याचा फॉर्म बघता नक्की काढू शकला असता. (आणि बाकिचांचा फॉर्म बघता, तो आऊट झाल्यावर ते काढणार नाहीत हा सुद्धा कॉन्फिडन्स होताच )
ता. क. पूर्वी ब्रिटिश न्यूजपेपर्स ब्रॅडमनविषयी लिहिताना जसं 'He is out', 'He is still playing' अश्या हेडलाईन्स छापायचे, तसं आपण गेल्या काही पोस्ट्स नुसतं 'तो' 'त्याने' असं लिहितोय.
तसं आपण गेल्या काही पोस्ट्स
तसं आपण गेल्या काही पोस्ट्स नुसतं 'तो' 'त्याने' असं लिहितोय. >> तो आहेच तसा रे ! तो बाद झाला कि मी घरून ऑफिसला / खाली टीपी करायला/जायला निघायचो, रस्त्यात असताना टीव्ही च्या दुकानासमोर रेंगाळणे थांबायचे , ऑफीसमधेच असेन तर व्हर्चुअल रीअॅलिटीच्या लॅबमधला मुक्काम संपवून काम करायला क्यूबमधे जायचो . माझ्यासारखे वेडे बरेच होते
भाऊंनी भाग १ म्हणून केवळ ९६
भाऊंनी भाग १ म्हणून केवळ ९६ च्या वर्ल्डकपसाठी धागा काढलाय. त्यामुळे पुढच्या वर्ल्डकपच्या आठवणी लिहाव्या की कसं कळत नाहीये. कारण ९६ ला क्रिकेट कळायला लागलं. मॅचेस पाहिल्या, आणि श्रीलंका कसली डेंजर टीम आहे एवढं मनावर ठसलं. मोस्ट नंबर ऑफ लेफ्टीज होते हे आठवतं. बाकी फारसा त्रास नाही आठवत.
९९ चा ब्रिटानियाची पाकिटं दुकानदाराला देऊन स्क्रॅच करून लंडन पाहणं नाही निदान बॅट मिळण्याच्या अपेक्षाभंगात गेला. अर्थात, सचिनचे बाबा जाणं, त्याने परत येऊन केनियाविरुद्ध शतक करणं आठवतं. पाकला हरवणं आणी बाहेर पडणं…
२००३ ला दहावीचा अभ्यास सोडून मॅचेस पाहिल्या आणी बोर्डात येण्याची अपेक्षा असणार्याने ८०% ही नाही मिळवले म्हणून रडलो होतो, अर्थात त्याहीपेक्षा मेजर दु:ख ऑस्ट्रेलियासोबत फायनल हरल्याचं होतं म्हणा
पण ९६च्या वर्ल्ड्कप पासून क्रिकेट आणी सचिनशी मन जोडलं गेलंय, त्या सार्वजनिक रंगीत टीव्हीवर पाहिलेल्या मॅचेस, नंतर शारजाच्या डेझर्ट स्टॉर्म, टेनिस एल्बो, सचिन स्वार्थी वाल्यांना आजतागायत उत्तरे देत न थकणं, ते साहेब रिटायर होतांना डोळ्यातलं पाणी आणी आता क्रिकेट पाहणं नाही वगैरे गोष्टी… असो, बरंच अवांतर झालंय
फेरफटका,
फेरफटका,
दहावीला परीक्षेच्या आधीच्या सुट्टी मध्ये दिवसा जायचो.
डोंगर किस्सा बारावीचा. तेव्हा गॅप घेतली असल्याने दिवसरात्र डोंगरावर पडीक असायचो. इतरांसाठी डोंगराची वेळा सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेत होती. अभ्यास करणारे कधीही..
@ हर्षल, तुम्हाला ज्या वर्ल्डकपचे जे आठवेल ते लिहा. मी हेडर पोस्ट लिहीत असल्याने विस्तारभयास्तव सगळे एकात घुसवने टाळले इतकेच. अजून दोनेक भागात पुढचे वर्ल्डकप घेतो. 2011 नंतरचे लिहायची गरज नाही वाटत..