विद्यार्थी की परीक्षार्थी !
शीर्षक अगदी पाचवीच्या निबंधासारखे वाटतेय की नाही...
पण विषय त्याच वयाच्या मुलांचा आहे.
झाले असे,
चार दिवसांपुर्वी शाळेतून फोन आला. तुमची मुलगी आजारी आहे. तिला घेऊन जा. सकाळी ठणठणीत होती. पण शाळेत अचानक उलट्या ताप अशी लक्षणे सुरू झाली. मुलीला घेऊन घरी आलो, घरचे औषधपाणी करून पाहिले. पण ताप उतरेना म्हणून संध्याकाळी डॉक्टरकडे नेले. त्यांनी सांगितले गॅस्ट्रो झाला आहे. म्हणे साथच आली आहे. आता गोळ्या घ्या आणि चार पाच दिवस पूर्ण आराम करा.
हे सर्व होत असताना मी ऑफिसला होतो. जेव्हा घरी आलो तेव्हा अजून एक सरप्राईज मिळाले. म्हणे दुसर्या दिवशीपासून मुलीच्या परीक्षा सुरू होणार आहेत आणि आज हा आजार. म्हणजे मी अगदी निष्काळजी बाप आहे, ज्याला मुलांची परीक्षा कधी सुरू होते हे सुद्धा माहीत नाही,, अश्यातला भाग नाही. मी परीक्षांना तितके महत्व देत नाही ईतकेच. मुलांच्या शाळेच्या व्हॉटसप ग्रूपवर अचानक वाढलेली मेसेजेसची संख्या आणि घरी देखील कधी नव्हे ते अभ्यासाचे पुस्तक घेऊन बसलेली मुले पाहून परीक्षा जवळ आली आहे याची कल्पना होतीच. फक्त ती नेमकी उद्यापासूनच आहे याची कल्पना नव्हती. गणिताचा अभ्यास मी घेतो म्हणून तो पेपर कधी आहे त्याची तारीख तेवढी मला सांगितली जाते.
तर म्हटले बरे, आता काय ठरवले आहे. माझी अपेक्षा अशी होती की आता साथीचा आजार, उलट्या ताप जुलाब अशी लक्षणे, चार दिवस आराम, म्हणजे किमान दोन पेपर तरी नक्की बुडणार..
पण मायलेकींचे काही वेगळेच ठरले होते. दुसर्या दिवशी मराठीचा पेपर होता. ईंग्लिश मिडीयमचे मराठी म्हणजे आपल्या मराठी पोरांना फार सोपे जाते. त्यात लेकीची आई स्वत: हिंदी मराठीचे ट्यूशन घेणारी, त्यामुळे पेपरला जाऊन बसले तरी चांगले मार्क्स मिळणार याची खात्री. एकंदरीत उद्याचा पेपर द्यायचा असे ठरले होते. पण अभ्यास कधीकाळी केला असल्याने रीविजनची गरज होती. आई वाचून दाखवत होती आणि मुलगी बेडवर पडल्यापडल्या ऐकत होती.
मी याला विरोध दर्शवला. खरेच याची गरज आहे का? परीक्षा ईतकीच महत्वाची आहे का? या क्षणाला तब्येत जपणे त्याहून जास्त महत्वाचे नाही का? अभ्यास जरी झोपून आणि ऐकून केला तरी तो डोक्यात साठवायला मेंटल स्ट्रेस पडत नाही का? परीक्षेत नंबर मिळवणे महत्वाचे की ज्ञान मिळवणे महत्वाचे? बुडाली परीक्षा तर काय आभाळ कोसळणार आहे? आपल्याला तरी आपले पाचवीचे मराठीचे मार्क्स आज आठवत आहेत का....?
असे प्रत्येकाला कळणारे पण स्वत:वर वेळ येता सगळ्यांनाच न वळणारे ठेवणीतले मुद्दे मी मांडू लागलो.
मी स्वतः ईंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षाच्या पहिल्या सेमीस्टरला दोन पेपर आजारपणापुढे हार मानून सोडले होते. तिथे मुलीला पाचवीच्या परीक्षेचे ईतके टेंशन देणे बिलकुल रुचत नव्हते.
पण बहुधा हेच माझ्या विरोधात जात होते. तुझ्यासारखे मुलीला बनवू नकोस असे समोरून म्हटले की आपला विषय संपला.
माझा मुद्दा होता की परीक्षेला अवाजवी महत्व देऊ नये. तर तिच्या आईचा मुद्दा होता की शक्य असेल तर जरूर प्रयत्न करावा. दोघे आपल्या जागी काही अंशी योग्य होतो, त्यामुळे एकमेकांना समजावणे अवघड होते. त्यावेळी वाद न वाढवणे हाच मी सुवर्णमध्य समजला.
थोड्याच वेळात त्यांचा अभ्यास आटोपला. मुलीला चटचट उत्तरे देताना पाहून तिला सगळेच येत होते हे मला समजले. अभ्यास झाला आहे तर जाऊन परीक्षा द्यावी आणि चांगले मार्क्स मिळवावे हा मोह तिलाही झाला होताच. पण आता अभ्यास करून तब्येत पुन्हा नाजूक झाली होती. गोळ्यांच्या डोसचा प्रभाव उतरला होता. उसने अवसान गळून पडले होते. त्यामुळे झोपताना हलकेच तिला विचारले, कसे वाटत आहे? जमेल का उद्या पेपर द्यायला? नसेल जमणार तर नको देऊस... आणि तिला स्वतालाही आता पुन्हा बरे वाटू लागले नसल्याने तिचेही मतपरीवर्तन होत तिला परीक्षा द्यायची नव्हती.
थ्री ईडियट्स मध्ये माधवन जसे म्हणतो, पर अब्बा नही मानेंगे.. त्याच टोन मध्ये ती म्हणाली, पण मम्मा नाही ऐकणार..
या केस मध्ये तिची आई सुद्धा आता व्हिलन बनणार नाही याची मला कल्पना होती. आणि झालीच तरी आता मी तिचे ऐकणार नव्हतो. कारण तिच्या ईच्छेनुसार प्रयत्न करून झाले होते. त्यामुळे उद्या आपण पेपरला जात नाहीये हे दोघांतर्फे डिक्लेअर करून मी लेकीच्या अंगावर पांघरूण सरकावले. अश्या कारणांमुळेच मी पोरांचा किंचित जास्त फेवरेट आहे
ओके, तर प्रसंग दुसरा..
आता अजून दहा-पंधरा दिवस फ्लॅशबॅक मध्ये जाऊयात
घरी हिंदी मराठी ट्युशन चालते. सोसायटी आणि जवळपासची मुले शिकवणीला येतात. एक मुलगी साधारण माझ्या मुलीच्याच वयाची. मुलीच्याच शाळेत. वरच्या ईयत्तेत. अभ्यासात हुशार. म्हणजे नेहमीच पहिल्या तिनात नंबर यावे ईतकी हुशार. माझ्या बायकोच्या मते थोडीफार घोकंपट्टी करणारी आहे. पण अभ्यासाव्यतिरीक्त ईतर अॅक्टीव्हिटीमध्ये सुद्धा ती पुढे असते. ईतरही बरेच क्लासेसना जाते. यावेळी मात्र काही घरगुती अडचणींमुळे तिचा नेहमीसारखा अभ्यास झाला नव्हता. ते टेंशन तिच्या चेहर्यावर रोज जाणवायचे.
एकदा बायकोने तिला विचारले. "ईतना टेंन्शन क्यू लेती हो एक्झाम का?"
त्यावर ती म्हणाली, "लगता है ईस बार कम मार्क्स मिलेंगे.."
"ईट्स ओके, एक बार कम मार्क्स मिले तो..", असे बायकोने म्हणताच त्यावर तिने जे उत्तर दिले ते ऐकून मी हडबडून गेलो..
ती म्हणाली, "मेरा रेप्युटेशन खराब हो जायेगा.."
एका सहावीच्या हुशार मुलीला परीक्षेत कमी मार्क्स मिळणे हे रेप्युटेशनला धक्का बसणे वाटत होते. आणि याचे तिला टेंशन होते. त्यानंतर घरी आईवडिलांना कसे सामोरे जायचे याचे टेंशन होते. म्हणजे नक्कीच काहीतरी चुकत होते.
एकदा अभ्यास न झाल्याने कमी मार्क्स मिळाले म्हणून तिची हुशारी काही कमी होत नाही हे समजायची अक्कल कदाचित तिच्यात नसावी. पण तिच्या आईवडीलांमध्ये नक्की असायला हवी. म्हणून मी बायकोला तिच्या आईशी याबाबत बोलायला सांगितले. ते बोलणे माझ्यासमोरच झाले. पण फारसे आशावादी वाटले नाही. मुलीला एकदा सवलत दिली तर तिला परीक्षेचे गांभीर्यच राहणार नाही अशी भिती तिच्या आईला होती.
काहीतरी चुकतेय हे मला जाणवत होते. पण आता हे आपण दुसर्यांच्या मुलांना सांगू शकत नाही. कारण परीक्षा गरजेच्या सुद्धा असतात. त्याशिवाय अभ्यास होत नाही. आपल्याला किती येते हे कळत नाही. त्यामुळे मुलांना परीक्षेचे पुरेसे गांभीर्य राहावे पण त्याचवेळी तिचे टेन्शन येऊ नये हे ज्याला त्याला आपल्या परीने साधता यायला हवे.
आज शिक्षण पद्धती हळूहळू बदलत आहे. पण पालकांनी सुद्धा आपले विचार बदलणे गरजेचे आहे. अभ्यासाव्यतिरीक्त ईतर कलागुणांबाबत हल्ली बरेच पालक जागरूक दिसतात. पण त्यात सुद्धा हल्ली स्पर्धा लागते असे वाटते. आपल्या मुलांनी सगळेच शिकावे असे काहींना वाटते आणि भारंभार क्लास लावले जातात. पण परीक्षेचा महिना आला की सारेच क्लास बंद होतात. मला वैयक्तिकरीत्या हे चुकीचे वाटते. जर अभ्यासाव्यतीरीक्त काही करायला आपण मुलांना प्रोत्साहन देत असू तर ते परीक्षा चालू असताना देखील कायम राहायला हवे. परीक्षेच्या काळात घरातले वातावरण कमीत कमी बदलेल तितके चांगले असे मला वाटते.
जे रेप्युटेशन जपायचे टेंशन मुलीच्या मैत्रीणीच्या चेहर्यावर दिसले ते पुढेमागे आपल्या मुलीला येऊ नये यासाठी मी चटकन सुचलेल्या दोन गोष्टी केल्या.
पहिले म्हणजे तिला माझ्या शैक्षणिक कारकिर्दीतील चढउतारांची कथा सांगितली. ज्याची रेंज ४० पैकी शून्य गुण मिळवणे ते शाळा-कॉलेज-मुंबईत पहिले येणे ईतकी अफाट होती. यावरून दोन गोष्टी तिच्या मनावर बिंबवल्या.
एक म्हणजे तुम्ही कितीही हुशार असाल, पण अभ्यास केला नाही तर त्या हुशारीचा फायदा शून्य होतो.
दुसरे म्हणजे शून्यातून देखील नव्याने प्रवास सुरू करता येतो. एखाद्या किंवा कुठल्याही परीक्षेत अपयश आल्याने काही संपत नाही. आयुष्य नेहमीच आपल्याला दुसरा चान्स देते, दुसराच नाही तर तिसरा चौथा पाचवा, आयुष्य आपल्याला आयुष्यभर अगणित चान्स देते.
दुसरी गोष्ट ही केली की मागे तिने 12th Fail चित्रपट पाहिला होता. तो तिला आवडला होता. त्यानंतर तिची छिछोरे चित्रपट बघायची ईच्छा होती. कारण तिने कुठेतरी त्याची एक ईंटरेस्टींग क्लिप पाहिली होती. पण तिच्या वयाला साजेसा नाही म्हणून तिला तो आम्ही दाखवला नव्हता. पण यावेळी रिमोट हातात घेऊन तिच्यासोबत बसून तिला तो दाखवला. यश अपयश, विनर लूजर, हे निकालावर नाही तर आपल्या प्रयत्नांवर ठरते हे तिच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न केला. कारण चित्रपट मुलांच्या मनावर जास्त प्रभाव टाकतात.
प्रसंग तिसरा - हा देखील याच आठवड्यातील.
मुलगा यावेळी पहिलीत गेला आहे. त्याला परीक्षांचे गांभीर्य समजावे म्हणून मी म्हणालो की परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले की आम्ही ताईला पार्टी देतो. तुलाही हवी असेल तर तुलाही तिच्यासारखा अभ्यास करावा लागेल.
हे ऐकून त्याच्या चेहर्यावर उत्साह कमी आणि चिंता जास्त दिसली. ते पाहून लक्षात आले की आपण सुद्धा तीच चूक करत आहोत.
मग त्याला म्हणालो जर रोज अभ्यास केलास तर परीक्षा संपल्यावर तुला पार्टी देऊ.
आता त्याचा चेहरा खुलला. कारण चांगले मार्क्स मिळवणे आणि मुळात चांगले म्हणजे किती हे ठरवणे त्याच्या हातात नव्हते. पण ते मिळवण्यासाठी अभ्यास करणे हे त्याच्या हातात होते.
आता त्याला निकालाचे टेंशन नाहीये. पण पार्टीचे आमिष असल्याने अभ्यास चालू आहे. पार्टी ऑन आहे. फरक ईतकाच की, जी पार्टी चांगल्यावाईट निकालानंतर होणार होती ती आता चांगला अभ्यास करून परीक्षा संपताच होणार आहे
पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या हिताचाच विचार करतो. पण तसे करताना आपला मार्ग चुकीचा वा बरोबर असू शकतो.
जर प्रत्येक मूल वेगळे असेल तर त्यासोबतचे आपले वागणे देखील त्यानुसारच वेगळे असायला हवे.
पण यात दोनतीन गोष्टी जमवता आल्या पाहिजे असे मला वाटते.
एक म्हणजे मुलांच्या क्षमतेला जोखून त्यानुसार त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे.
दुसरे म्हणजे प्रयत्न करूनही किंवा काही कारणांनी ते त्या अपेक्षांची पुर्तता करू न शकल्यास त्यांना सांभाळून घेणे.
आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुले आईवडीलांची स्वप्ने पुर्ण करायला जन्माला आलेली नसतात. एका वयात त्यांची स्वत:ची स्वप्ने आकार घेऊ लागतात. त्यांना त्यामागे धावू द्यावे.. आणि ती या परीक्षांच्या पलीकडे असतात.
-------
या परीक्षाकाळातील लागोपाठच्या काही घटनांनी मनातले हे उतरवून काढावेसे वाटले.
प्रतिसादांतून माहितीत आणि ज्ञानात भरच पडेल...
धन्यवाद..
सहमत. परीक्षांना अवाजवी महत्व
सहमत. परीक्षांना अवाजवी महत्व देऊ नये हेच खरे. परीक्षा या नेमके कशासाठी घेतल्या जातात याचा पुनर्विचार व्हावा, व त्या उद्देशाला प्रामाणिक अश्या पद्धतीने परीक्षा घेतो का हे हि पाहिले पाहिजे.
तसेच, मुले व्यवस्थित अभ्यास करत नसतील, त्यांना अपेक्षित ज्ञान प्राप्त होत नसेल, त्यांना चांगले मार्क मिळत नसतील तर त्यात मुलांचा दोष नाही, असलाच तर, पालक-शिक्षकांचा आहे असे माझे मत आहे.
जवळपास दीड -दोन दशकानंतर वापरात येऊ शकणारे ज्ञान, तेही अभ्यासाची रुक्ष पद्धत वापरून, मुले स्वयंप्रेरणेने शिकतील हि अपेक्षा रास्त नाही.
आता परीक्षार्थीच आहेत. आपली
आता परीक्षार्थीच आहेत. आपली जनरेशन शाळेत असताना कधी आता इतकं लिखाण केल्याचं मला आठवत नाही. तेव्हा पाठांतर आणि वाचनावर जास्त भर होता. आताची मुलं सकाळपासून रात्रीपर्यंत अक्षरशः गाड्याला जुंपलेली असतात. सतत लिखाण, असाइनमेंटस्, प्रोजेक्ट. एवढं करूनही डोक्यात फारसा प्रकाश पडत नाही कारण बरचसं काम (हो कामच) बळजबरीने केलेलं असतं. पेपर पॅटर्न हा प्रकार अजूनच बेकार. शाळेशी संलग्न ट्युशन्स जवळजवळ ८०-९०% पेपर प्रॅक्टिसच्या नावाखाली पुरवतात हे मी स्वतः बघितलं आहे. मग कशाला हवी परीक्षा? १०वीच्या मुलांना तर ९वी पासून कैद्यासारखी वागणूक मिळते.
नवीन शिक्षण प्रणाली वेगळी असल्याचं ऐकलं आहे बर्याच वेळा पण ती खरोखरच कुठल्या शाळेत राबवलेली बघितली नाहीये.
<< कारण चांगले मार्क्स मिळवणे
<< कारण चांगले मार्क्स मिळवणे आणि मुळात चांगले म्हणजे किती हे ठरवणे त्याच्या हातात नव्हते. पण ते मिळवण्यासाठी अभ्यास करणे हे त्याच्या हातात होते.>>
व्वा, आता तुम्ही श्रीमद्भगवगीतेचे सारच सांगितले की!!
मला स्वतःला आता मी कधी शाळा कॉलेजात गेलो होतो हे सुद्धा आठवत नाही, तर मार्क कुठले आठवायल!!
बाकी या देशातली मुले मात्र परिक्षेला एव्हढी घाबरत नाहीत असे मी पाहिले आहे.
अनेक वर्षांपूर्वी जेंव्हा माझी मुलगी दहावीत होती, तेंव्हा तिला मी चार तासा ऐवजी तीन तास फोनवर बोल नि एक तास अभ्यास कर, चांगले मार्क मिळतील, असा उपदेश केला होता, त्यावर तिचे लगेच उत्तर आले - शाळेत अभ्यास करण्याचा नि मार्क मिळण्याचा काही संबध नसतो!!
मी मनात म्हंटले हे मला आधीच कळले असते तर किती बरे झाले असते!
पालक म्हणून आपण आपल्या
पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या हिताचाच विचार करतो. पण तसे करताना आपला मार्ग चुकीचा वा बरोबर असू शकतो.>>>>
थोडे करेक्शन करायची हिंमत करतो. क्षमा असावी.
पालक म्हणून आपण आपल्या विचार करायच्या कुवती प्रमाणे, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या अल्पमाहिती प्रमाणे, तत्कालीन शिक्षण पद्धती व सामाजिक ( गैर)समजांप्रमाणे, आपल्याला उपलब्ध असलेल्या संसाधनांमधे आपल्या विचारसरणीचे चष्मे लावून आपल्या पाल्यांना मार्गदर्शन करतो, आणि आपली अशी (गैर) समजूत असते की आपण त्यांना त्यांच्या हिताचाच सल्ला देत आहोत.
तो सल्ला त्याने ऐकावा की न ऐकावा, त्याने न ऐकल्यास आपण जसे वागतो, तो सल्ला त्याने ऐकावाच यासाठी जो आटापिटा करतो त्या पद्धती हा अजून पुढचा विषय….
लेख एकदम पटला.कधी संधी
लेख आणि प्रतिसाद एकदम पटले.कधी संधी मिळाल्यास मुलांना हे नक्की सांगालच की अभ्यासात यश हा एक मुद्दा झाला, पण नंतर नोकरीत, आयुष्यात यश हे किती स्ट्रीट स्मार्ट निर्णय घेतले,किती प्रसंगावधान ठेवलं यावर असते.यश मिळालं, उत्तम.पण प्रयत्न जास्त महत्वाचे.यश आता हवं ते नाही मिळालं तरी योग्य स्मार्ट निर्णयांनी बस नंतर पकडता येते.
कोटा फॅक्टरी पण दाखवा तिला.एकदोन एपिसोड सोडल्यास ऍडल्ट कंटेंट नाहीये.
तशाही युनिट टेस्ट ला आजारी पडल्यास बाकी 2 टेस्ट चा एव्हरेज घेण्याची शाळांमध्ये पद्धत आहे.
सतत लिखाण, असाइनमेंटस्,
सतत लिखाण, असाइनमेंटस्, प्रोजेक्ट. एवढं करूनही डोक्यात फारसा प्रकाश पडत नाही...
>>>>>
बरेचदा पालकच करून देतात प्रोजेक्ट. म्हणजे प्रोजेक्ट सुद्धा काही तसे असतात ज्यात पालकांची मदत लागावी. अश्यावेळी पालकांची भूमिका महत्त्वाची ठरते की ते प्रोजेक्ट मध्ये मदत करताना मुले त्यातून शिकतील कसे हे बघत आहेत की फक्त एक टास्क आहे जो पूर्ण करायचा इतके उद्दीष्ट ठेवत आहेत. पण जर दोन्ही पालक जॉब करणारे असतील तर जास्त वेळ देणे अवघड जात असावे.
@अतरंगी
@अतरंगी
थोडे करेक्शन.... आपली अशी (गैर) समजूत असते की आपण त्यांना त्यांच्या हिताचाच सल्ला देत आहोत....
>>>>>>>>>>>>>>>
अहो करेक्शन कसले. तुम्ही तेच लिहिले आहे. मी म्हटले की पालक विचार हिताचा करतात. म्हणजे त्यांची नियत तशी असते की मुलाचे हित बघावे.. पण प्रत्यक्षात ते होतेच याची खात्री नसते.
मी अनु,
मी अनु,
कधी संधी मिळाल्यास मुलांना हे नक्की सांगालच की आयुष्यात यश हे किती स्ट्रीट स्मार्ट निर्णय घेतले.....
>>>>>>>>>>>
हो ते सांगतोच.. सांगतो म्हणण्यापेक्षा त्या दिशेने प्रोत्साहन देतो. कारण माझे स्वतःचेच उदाहरण आहे. म्हणजे तिला हे सांगत नाही, पण माझे मला प्रामाणिकपणे माहीत आहे की मी नाहीये तसा स्मार्ट.. त्यामुळे माझ्या पेक्षा कमी हुशार पण जास्त स्मार्ट मुलांना पुढे जाताना पाहिले आहे नेहमी..
पण पोरगी मात्र खूप आहे. त्यामुळे अभ्यासाचे प्रेशर न देता तिच्यातल्या या क्वालिटी कश्या डेव्हलप होतील हेच बघतो.
मस्त फ्लो आहे लिखाणाला. पटले.
मस्त फ्लो आहे लिखाणाला. पटले.
सामो धन्यवाद.
सामो धन्यवाद.
@ अनु
कोटा फॅक्टरी.. येस.. तिसरा सीजन मी सुद्धा आल्याआल्या बघितला आणि आवडला. दहा वर्षाच्या मुलांना त्यांच्याशी किती रीलेट होईल, आणि आवडेल का याची जरा शंका आहे. कारण आवडल्याशिवाय त्यात मांडलेले पोहोचणार सुद्धा नाही. पण पुढे मागे दाखवेन जरूर. मला ती पंचायत सुद्धा दाखवायची आहे. त्यातूनही समाज कळेल मूल्यशिक्षण मिळेल असे वाटते. लापता लेडीज आवडीने दोनदा पाहिला होता. मग हे सुद्धा आवडायला हरकत नाही.
त्याला म्हणालो जर रोज अभ्यास
त्याला म्हणालो जर रोज अभ्यास केलास तर परीक्षा संपल्यावर तुला पार्टी देऊ.
आता त्याचा चेहरा खुलला. कारण चांगले मार्क्स मिळवणे आणि मुळात चांगले म्हणजे किती हे ठरवणे त्याच्या हातात नव्हते. पण ते मिळवण्यासाठी अभ्यास करणे हे त्याच्या हातात होते. >> बेश्ट! छान मुद्दा पटवून दिलास. लेख आवडला आणि अनु यांचा प्रतिसाद पण.
खालील मुद्दा कृपया पर्सनली घेऊ नये.
परीक्षार्थी >> हा शब्द अनेक जण वापरतात, पण तो खटकतो. -अर्थी म्हणजे -ची इच्छा करणारा. परीक्षेची इच्छा कुणाला सहसा नसते. त्या ऐवजी मार्कार्थी, ग्रेडार्थी, रँकार्थी असे शब्द हवेत.
कोटा फॅक्टरी चा सिझन 2 मधला
कोटा फॅक्टरी चा सिझन 2(का 1) मधला मीना चा एपिसोड सोडल्यास सिरीयल 10 वर्षाच्या मुलाने पालकांबरोबर बघण्यासारखी आहे.अगदी गंभीर संदेश म्हणून नाही, पण अभ्यास, त्यातून येणारं प्रेशर आणि त्यातून हसत खेळत मार्ग काढणारे विद्यार्थी आणि टीचर यासाठी आवडते.
@ हपा
@ हपा
अर्थी म्हणजे -ची इच्छा करणारा
>>>>>
ओके.. इच्छा करणारा.. लालसा असलेला..
मला अर्थीचा अर्थ मिळवणारा, प्राप्त करणारा असे वाटायचे.
विद्यार्थी विद्या प्राप्त करनारा, लाभार्थी म्हणजे लाभ मिळवणारा.. पण परीक्षार्थी हा परीक्षा मिळवणारा सुद्धा होऊ शकत नाही.. ती तर आपण देतो
बाकी अर्थी चा अजून एक अर्थ आहे. अब तो मेरी इस घर से अर्थी ही उठेगी.. पण त्याने इथे अनर्थ होईल. परीक्षार्थी - परीक्षेची तिरडी बांधणारा
परीक्षांना इतकं महत्व देऊ नये
परीक्षांना इतकं महत्व देऊ नये हे फार आयडियल स्टेटमेंट झालं. ज्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. पण सध्या सतत सगळे एकमेकांशी स्पर्धा करत असल्याने, आपण कुठे उभे आहोत हे कळण्यासाठी शाळा सतत परीक्षा घेतात आणि आमच्या शाळेचा अमुक ढमुक टक्के निकाल, आम्ही वर्षातून इतक्या वेळेला परीक्षा (घेऊन विद्यार्थ्यांना टॉर्चर करतो) शाळेच्या मार्केटिंगला हे उपयोगी पडते.
शाळा तर शाळा पालक कमी नाहीत. त्यांना पण सतत पिअर ग्रुप मध्ये आपल्या मुलाला किती मार्क मिळाले हे सांगायला आवडत असावं किंवा इतरांच्या मुलांचे मार्क्स बघून सगळेच आईवडील आपल्या मुलांना धोशा लावतात सतत अभ्यासाचा.
फायनल लक्ष्य काय तर चांगले मार्क आणि चांगली नोकरी मग त्या मागे त्या मुलाचं बालपण हरवलं आणि तो पुढे जाऊन चांगली व्यक्ती झाला नाही तरी चालेल पण नोकरी आणि पगार मात्र बढिया पाहिजे. हिप्पोक्रेसी आहे.
ह्यावरून आठवलं ओम ची परीक्षा
ह्यावरून आठवलं ओम ची परीक्षा आहे ३०तारखेला.
Standing line काढायची आहे. ओम सर उजव्या हातात, डाव्या हातात आणि पायात सारख्याच कौशल्याने पेन्सिल धरतात आणि crayons ने भिंतीवर रेघा ओढतात.
मजा येणारे
ओम सर उजव्या हातात, डाव्या
ओम सर उजव्या हातात, डाव्या हातात आणि पायात सारख्याच कौशल्याने पेन्सिल धरतात
>>>
अरे वा! ओम अँबिडेक्सट्रस होणार आहे असे दिसतंय. चुकूनही त्याला एकच(उजवा) हात वापरायची सवय लावू देऊ नकोस. जनरली ज्ये ना करतात असं.
मोजून ३सेकंद स्थिर बसतो
मोजून ३सेकंद स्थिर बसतो त्याहून जास्त नाही. अभ्यास झाला म्हणून school चा डबा घेऊन खेळत बसतो
ओम सर उजव्या हातात, डाव्या
ओम सर उजव्या हातात, डाव्या हातात आणि पायात सारख्याच कौशल्याने पेन्सिल धरतात
>>>>
मग आता त्याला तोंडाने पेन्सिल धरायला प्रोत्साहन देऊन पालक म्हणून आपले कर्तव्य पूर्ण कर
बाई दवे, यावरून एक खेळ आठवला. परी आणि तिच्या मैत्रीणी खेळायच्या. दोन प्रकारच्या चिठ्ठ्या उडवायच्या.
एका सेट मधील चिठ्ठी मध्ये लिहिलेले असायचे की कुठले चित्र काढायचे, जसे की घर, झाडं, हत्ती, मासा वगैरे..
आणि दुसऱ्या चिठ्यामध्ये लिहिलेले असायचे ते कसे काढायचे, जसे की उजव्या/डाव्या हाताने, पायाने. तोंडाने वगैरे..
आणि मग कोणी कश्या प्रकारे काढले आहे हे न बघता कोणीतरी जज त्यांना नंबर आणि त्यानुसार गुण द्यायचा. माझे जजचे काम करून झाले आहे.
चावतो, खातो पेन्सिल म्हणून
चावतो, खातो पेन्सिल म्हणून नाही करू देत.
You know how boys are. रमा नै करत अशा खोड्या तिचं वेगळंच असतं काहीतरी
परीक्षार्थी - परीक्षेची तिरडी
परीक्षार्थी - परीक्षेची तिरडी बांधणारा >>
>>>>>>Standing line काढायची
>>>>>>Standing line काढायची आहे. ओम सर उजव्या हातात, डाव्या हातात आणि पायात सारख्याच कौशल्याने पेन्सिल धरतात आणि crayons ने भिंतीवर रेघा ओढतात.
आज ट्युशन ला आलेल्या मुलाकडून
आज ट्युशन ला आलेल्या मुलाकडून एक नवीन किस्सा समजला.
तो मुलगा शाळेच्या फुटबॉल टीम मध्ये आहे. पेपरच्या दिवशीच त्यांची मॅच होती. त्यांना पेपर बुडवून मॅचला नेले. इथवर ठिक आहे. मुले खुषच झाली असतील.
पण मार्क्स देताना त्यांना क्लास एवरेज नुसार ठराविक गुणच दिले. तो मुलगा अभ्यासात सुद्धा above एवरेज होता. त्यामुळे त्यामुळे त्याचा ओवर ऑल एवरेज कमी झाला.
आता नाराज पालक भांडत आहेत शाळेशी...
तो मुलगा माझ्याच मुलीच्या शाळेत आहे. जिने आजारपणामुळे दोन पेपर दिले नाहीत. तिला मात्र वेगळा नियम आहे. या वर्षी त्या विषयांच्या पुढच्या दोन परीक्षांत तिला जे गुण मिळतील त्याचा एवरेज काढला जाईल. म्हणजे स्वताच्या चुकीने आजारी पडलेल्या माझ्या मुलीचे गुण तिच्या स्वताच्या हातात आहेत. पण शाळेने आपल्या मॅचसाठी पेपर बुडालेल्या त्या मुलाचे गुण मात्र शाळेनेच फिक्स करून टाकले.
मला एक समजले नाही की एकच नियम इथेही ठेवायला काय हरकत होती. किंबहुना त्याहूनही काही गुण जास्त दिले असते तरी काय गेले असते. कुठे ते पैसे होते जे स्वताच्या खिशातून द्यायचे होते.
असे करण्याने अजून मुले खेळाकडे आकर्षित झाली असती. पण आता मात्र नेमके उलट होण्याची शक्यता आहे.
कुठल्या इयत्तेत चालू आहे हे
कुठल्या इयत्तेत चालू आहे हे सगळं? लहानच असावी मुलं. काय करायचे आहेत चार गुण जास्त कमी मिळून... अर्थात हे पालकांना कळलं पाहिजे. मुलांना मजा आली की त्या पालकांना छान वाटतं का नाही हा पहिला प्रश्न आहे!
कुठल्या इयत्तेत चालू आहे हे
कुठल्या इयत्तेत चालू आहे हे सगळं?
>>>>>
पाचवी सहावी...
पण हे सगळ्याच इयत्तेत होते.
आमच्याकडे ट्युशन घेतले जातात त्यामुळे कल्पना आहे.
असेही पालक भेटतात ज्याना मुलाचे मार्क्स वाढतील आणि किती वाढतील याची ग्यारंटी हवी असते.
घरी मी बायकोला आधीच सावध केले आहे की अश्यांना बिलकुल एंटरटेन करू नकोस..तू. मुलांचे कन्सेप्ट क्लिअर करायला एफर्ट्स घेऊन शिकवणार (जे ती खरेच फार घेते). आणि असे लोकं मार्क्स किती मिळाले यावर त्याचे मूल्य मापन करणार..
मुलं काही नवी शिकली, त्यांना
छान!
मुलं काही नवी शिकली, त्यांना काही नवं जमलं की पालकांना सांगायला येतात तेव्हा काय चमक असते त्यांच्या डोळ्यात! यातच सगळं मिळून जातं.
फुटबॉल मध्ये साईड टॅकल केलं, गोल केला, असिस्ट केला की काय आनंदी असतो मुलगा. काल तो आणि मी फुटबॉल खेळत होतो, तर त्याने मला दोन तीन वेळा मेग केलं. म्हणजे बॉल माझ्या दोन पायांतून गेला. तर आत्ता योगायोगाने वरची तुमची पोस्ट वाचताना ''मेग' कसं करायचं ते तुला शिकवतो' करुन मला सांगायला आलेला पोट्टा!
हाच आनंद गणितात आपण करुन दिला की गणितही करतील की!
हो. गणित तेव्हाच आवडते
हो. गणित तेव्हाच आवडते जेव्हा ते सुटू लागते. त्यामुळे. प्रयत्न करावा गोडी लावायचा पण एखाद्याला नाहीच जमले गणित तरी त्याने आयुष्याचे गणित काही बिघडत नाही. आपल्याकडे गणित या विषयाला ओवरहाईप केले आहे असे मला बरेचदा वाटते.
आपल्याकडे गणित या विषयाला
आपल्याकडे गणित या विषयाला ओवरहाईप केले आहे असे मला बरेचदा वाटते.>+१
सिंगापूर ला हिंदीचे हाईप केलेय.. मुलांना वात येतो अभ्यास करून, इतकं हिंदी प्रचुर शिकून मेजॉरिटी मुलं कुठे हिंदित दिवे लावायला जाणार आहेत?
पेपर बुडवून मॅचला नेले> हे वाचून आश्चर्य वाटले.. शाळा असं सहसा करत नाहीत, केले तर पालकांना काय उत्तर द्यायचे ते ठरलेले असते.
पेपर बुडवून मॅचला नेले> हे
पेपर बुडवून मॅचला नेले> हे वाचून आश्चर्य वाटले.. शाळा असं सहसा करत नाहीत, केले तर पालकांना काय उत्तर द्यायचे ते ठरलेले असते.>> टूर्नामेंट असतील तर होते असं बर्याचदा. झोनल, जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या काही स्पर्धा परिक्षांच्या काळात येतात कधीकधी. आमच्या भागात असं असेल तर पेपर परत घेतला जातो.
पालक आणि बर्याचदा शाळा सुद्धा मुलांच्या मागे लागलेल्या असतात मार्कांसाठी. लहान वर्गांमध्ये जरा कमी असतं, सातवी आठवीपासून मात्र त्रास देतात मुलांना. कितीतरी जेईई आणि नीट वाले विद्यार्थी सातवी आठवीपासून क्लासेसच्या मागे लागलेले असतात. यावर्षी माझ्या मुलाच्या ११ वीच्या वर्गातली ८-१० जणं तरी आत्तापासून युपिएससी ची तयारी करताना दिसली आहेत. दहावीच्या आणि बारावीच्या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त फारसे काही करूच देत नाहीत शाळेत. पहिले दोन तिन महिने सोडले, तर खेळांचे तास बंद करतात. स्टुडंट काउंसिल मध्ये पण नववी आणि अकरावीचे विद्यार्थी असतात. दहावी -बारावी वाल्यांना परवानगी नाही. गेल्यावर्षी तरी वेगवेगळ्या खेळांमध्ये दहावीची मुलं शाळेबाहेर राज्यपातळीपर्यंत खेळून आली होती, पण यावर्षी बहूतेक कोणत्याच टीम मध्ये दहावी आणि बारावीचे विद्यार्थी नाहीत. आता हे पालक करतात कि शाळा माहित नाही.
थोडक्यात वर्षानुवर्षे हे
थोडक्यात वर्षानुवर्षे हे दहावी बारावीला आलेले अती महत्त्व खोडायला हवे..
म्हणजे विचार करा, तुम्ही लहानपणापासून अगदी ज्युनिअर केजीपासून बारावीपर्यंत चौदा पंधरा वर्षे जे ज्ञान मिळवत असतात ज्याने तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली असते. पण या सर्वाचे मूल्यमापन मात्र दहावी बारावी या वर्षात काय दिवे लावत आहात त्यावर ठरणार. ते तसे असेल तर सर्वसामान्य पालक आटापीटा करणारच..
आणि परीक्षा तरी कुठल्या आधारावर घेतली जाते तर जे तुमच्या सिलॅबसमध्ये आहे तेच.. ते येत असेल तर तुम्ही हुशार, त्या पलीकडच्या ज्ञानाला काही व्हॅल्यू नाही. किंवा त्याची कुठे मोजदाद नाही. फार तर स्पोर्ट्सचे काही मार्क दिले. विषय संपला.
सिंगापूर ला हिंदीचे हाईप
सिंगापूर ला हिंदीचे हाईप केलेय.. मुलांना वात येतो अभ्यास करून, इतकं हिंदी प्रचुर शिकून......
>>>
अच्छा, असे का ते?
तिथली गरज आहे का काही?
Pages