शुभविवाह - उर्फ डेडली आत्या

Submitted by फारएण्ड on 18 July, 2024 - 11:26

सापडली, सापडली! बर्‍याच दिवसांत ऑफिसचे कामकाज दाखवणारी एखादी मराठी सिरीयल सापडली नव्हती. घरगुती नाट्यातील बिनडोकपणा जो काय चालतो तो सगळेच करतात. पण जेव्हा कथानके ऑफिसमधे शिरतात तेव्हा खरी मजा येते. कारण तेथे जे दाखवायचे आहे त्याबद्दल अगदी बेसिक माहिती सुद्धा न घेता आपण मोठा थ्रिलर दाखवत आहोत अशा आविर्भावात सादर केलेले सीन्स. वरकरणी ऑफिसबद्दल वाटणार्‍या पण आगापीछा नसलेल्या बिझिनेस टर्म्स. "चांगल्या होणार्‍या" मिटिंग्ज. मोघम रीतीने उल्लेख केलेली "डील्स".

नाव शुभविवाह असले, तरी सध्या यात याची रेलचेल दिसते.

मला यातील कथानकाची पार्श्वभूमी माहीत नाही. एकदम साधारण ४७५व्या एपिसोडपासून बघत आहे. यातले सीन्स येताजाता आधी दिसले होते पण नक्की काय चालले आहे ते लक्ष देऊन पाहिले नाही. आणि तेव्हा बहुतांश घरगुती ड्रामाच वाटत होता.

३-४ एपिसोड्स मधे मला माहीत झालेले लोक
भूमी - ही सेण्ट्रल कॅरेक्टर दिसते. आशा काळे ते नीलकांती पाटेकर ("आत्मविश्वास" चित्रपटातील) याचे मिश्रण असणार्‍या व दोन तीन ऑलटाइम कारस्थानी स्त्रिया सोडून बाकी सर्वांना ज्यांचे सतत कौतुक असते अशा लीड्स बहुतांश सिरीज मधे असतात. ही तशीच वाटते.
आकाश - तिचा नवरा. हे सांगायची गरज नाही. नावावरूनच कळते.
रागिणी (आत्या) - ही सध्यातरी व्हिलन दिसते. हीच ती डेडली आत्या. सगळे घर हिच्या ताब्यात असताना, आणि त्यांच्या बिझिनेस मधेही तिला बराच रोल ऑलरेडी असताना काहीतरी कारणामुळे तिला व्हिलनगिरी करायची आहे. क्षणात ही किचन पॉलिटिक्स करते, तर क्षणात लोकांचे खूनबिन पाडते. हिचा नवरा सध्या पोलिस लॉक अप मधे आहे. तिला त्याची काही फिकीर दिसत नाही.
आई - घरातील सर्वात सिनीयर स्त्री. ही नॉर्मल आहे असे वाटते. कारस्थानी वगैरे नाही.
सून क्र १ - ही चेहर्‍यावरून कारस्थानी वाटत नाही. भूमीची बहिण असावी. तिला सपोर्ट करते. म्हणजे लिटरली तिच्या संवादांवर माना डोलावते.
सून क्र २ - ही जरा ग्रे एरियामधली आहे. रागिणीची मुलगी असावी नक्की काय करते कळत नाही. पण ४-५ एपिसोड्स मधे फक्त स्वगत म्हणताना दाखवली आहे.
एक तरूण मुलगी - वेधू का काहीतरी नाव आहे. ही कितपत रिकरिंग कॅरेक्टर आहे माहीत नाही. बहुधा आकाशच्या मागे होती/आहे. तिच्या वयानुसार मोबाईल, बाहेर मित्रमंडळींबरोबर हँग आउट करणे वगैरे सोडून असल्या नाट्यात तिला भलताच इंटरेस्ट दिसतो.

काही निर्जिव गोष्टी. यांचा उल्लेख अशासाठी की नाट्यपूर्ण प्रसंगात यांचा रोल असतो.
कारंजे - यांच्या घराच्या समोर दोन्ही बाजूच्या पायर्‍यांच्या मधे आहे. पण ते चालू केले की पायर्‍यांवरचा माणूस पूर्ण भिजतो.
किल्ल्या - प्राचीन काळच्या पिक्चर्स मधे असत तसा १०-१२ दणकट किल्ल्यांचा एक जुडगा आहे. तो रागिणीच्या कमरेला असतो. घराचा ताबा तिच्याकडे असतो म्हणून. सध्याच्या जमान्यात कोणाला अशा किल्ल्या लागतात कल्पना नाही.

पाहायला सुरूवात केल्यावर लौकरच "नवर्‍याला जेवायला घालण्यात जे सुख आहे ते इतर कशात नाही" असा संवाद ऐकल्यावर सिरीज खूप आधुनिक आहे याची खात्री झाली. तेच मोठे घर (आणि तरीही दारासमोर जेवायला बसणारे लोक), तेच भारदस्त आडनाव व त्याचा वारसा वगैरे - इथे "महाजन". कामाला जाणारे नवरे, सतत किचन मधे वावरणार्‍या व किचन पॉलिटिक्स करणार्‍या बायका, व्हॉट्सअ‍ॅप अंकल्स व काकूंना आवडेल असे कौटुंबिक चित्र उभे करणारे आणि दोन तीन पिढ्या आधीच्या परिस्थितीचे ग्लोरिफिकेशन करणारे सीन्स. लग्न झाले तरी बेडरूम मधे फक्त नवर्‍याचा मोठा फोटो. एकूण सरंजामी मामला.

सर्व चेकमार्क्स चेक्ड.

कोणी पाहात असाल तर लिहा. मी लिहीन जमेल तसे. अमेरिकेत हुलू वर आहे. भारतातले माहीत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्टार प्रवाहवरची असेल, तर त्या चॅनेलवर दुसरी एक मालिका पाहायचो, तेव्हा या मालिकेचे प्रोमोज दिसायचे.

आकाशच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, आणि त्याचं तात्कालिक कारण त्याच्या हातून झालेला कार अ‍ॅक्सिडंट ज्यात तो भूमीच्या वडिलांना गाडी ठोकतो.
मग ती आत्या आणि तिचा मुलगा (ही नाती इथे वाचून कळली) आकाशला तसंच अर्धवट ठेवू पाहतात.

हिंदीत वरुण बडोला, संध्या मृदुल, सविता प्रभुणे यांची कोशिश - एक आशा होती, तशीच वाटली होती.

मराठी असणार.
मालिका पाहून कैक वर्षे झाली, पण काहीच बदलले नाही हे समजल्यावर आनंद झाला.
वर्णनं धमाल आहेत. कुठल्याही मालिकेला फिट्ट आहेत.
शेवटची मालिका अधून मधून जुन्या घरी गेल्यावर पहायचो त्यात ते दोघे ट्रॅव्हल्स कंपनीत असतात.
त्यात प्रोजेक्ट, क्लायंट, मीटिंग, डील, बिझनेस, टार्गेट असे शब्द होते.
प्रोजेक्ट म्हणजे काय ते समजले नव्हते... इतर गोष्टीही!

जे प्रेक्षक तन मन धन हरपून मालिकेचा आस्वाद घेऊ शकतात ते कुठलाही सिनेमा एंजॉय करू शकत असतील. अशांना जो सिनेमा आवडत नाही,तो कुणालाच आवडणे शक्य नाही..

सून क्र 2- ही भूमीची सावत्र बहीण आहे
तीन बहिणी,महाजनांच्या तीन मुलांबरोबर लग्न करून आलेल्या आहेत
सावत्र आईच्या दबावामुळे भूमी वेडसर आकाशशी लग्न करते
आकाशची आत्या दोघांनाही मारण्यासाठी(प्रॉपर्टी साठी) भर समुद्रात बोट उडवायचे कारस्थान करते
त्यात डोक्याला मार लागून आकाश एकदम शहाणा आणि सगळं आठवणारा होतो आणि भूमी ची याददाष्त स्वतः च्या लग्नाच्या आधीच्या दिवसापर्यंत मर्यादित होते
आणि जर तिला हे आठवून द्यायचा प्रयत्न केला तर उसके जान को खतरा असतो
मग आकाश दोन्ही भावांची पुन्हा लग्न करण्याचा घाट घालतो,त्या सोहळ्या दरम्यान फ्लर्ट करतो, भूमी च्या मनात नव्याने प्रेम जागे होते पण ते कबूल करायला आकाश आपली मैत्रीण वेदांगी(वेदू) ची मदत घेतो. शेवटी एकदाचे लग्न होते.
आता त्या किल्ल्यांचा खरा दावेदार भूमी कशी आहे ह्यावर शह-काटशह सुरु आहे

मला वाटलं विवाह भाग 2 की काय.
आता लक्षात आलं की त्या चित्रपटाचं नाव एक विवाह ऐसा भी
सोनू सूद आणि इशा कोप्पीकर आहेत त्या चित्रपटाचा रसास्वाद आहे की काय.

सिरीयल माहित नाहीत हल्लीच्या.
सेटतोप बॉक्स बंद केला म्हणून बरंय

मराठी सिरिअल्स मधे जर फक्त ऑफिस या एकमेव विषयाला वाहिलेली सिरीअल बनली तर काय दाखवतील या विचारानेच धडकी भरतेय. Lol
बाकीचा हा मसाला फिलर आहे (स्टफ्ड वांग्यांसारखा)

मराठी सिरिअल्स मधे जर फक्त ऑफिस या एकमेव विषयाला वाहिलेली सिरीअल बनली तर काय दाखवतील >> मालिकावाले कचरणार नाहीत,
कारण हपिसात माणसंच काम करतात. आणि त्यांना कुटुंब असतं, त्यात महिला असतात.

कंपनीला प्रतिस्पर्धी कंपनी असते, दोन्ही कंपन्या चालवणार्‍यांच्यात खानदानी दुश्मनी असू शकते, ते चुलत चुलत असू शकतात.
त्यामुळे काळजी नाही.

उद्या कंपनीच्या ऐवजी सीक्रेट सर्विसेस दाखवल्या तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. केस , क्रॅक्ड वगैरे शब्द अधून मधून टाकले कि झाले.

भरत, तेजो - माहितीबद्दल धन्यवाद.

उद्या कंपनीच्या ऐवजी सीक्रेट सर्विसेस दाखवल्या तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. केस , क्रॅक्ड वगैरे शब्द अधून मधून टाकले कि झाले. >>> हो. घरगुती ड्रामाच दाखवायचा. फक्त या टर्म्स रॅण्डमली पेरायच्या. झाला ऑफिस ड्रामा.

एक एपिसोड फक्त किल्ल्यांबद्दल होता. आता भूमी जबाबदारी घेणार म्हणून आई त्या रागिणी कडून किल्ल्या ताब्यात घेउन भूमीकडे देणार असते. तेव्हा बराच वेळ रिअ‍ॅक्शन शॉट्स, झूम वगैरे झाल्यावर रागिणी सांगते की या किल्ल्या म्हणजे महाजन घराण्याचा वारसा आहे आणि तो असा आयता मिळत नाही. कमवावा लागतो.

Huh?

अरे विद्वानांनो, वारसा हा परंपरेने मिळतो. कमवावा बिमवावा लागत नाही. That's literally what वारसा means

लोल... मराठी सिरियल मधल्या बोर्ड मीटिंग वै बघून वाटते की मी जे कंपनी सचिव म्हणून जे काही conduct करत होतो अनेक वर्षांपूर्वी ते काहीतरी भलतेच होते. Proud

रागिणी: या किल्ल्या म्हणजे महाजन घराण्याचा वारसा आहे आणि तो असा आयता मिळत नाही.
भूमी: अय्या, वारसा हा परंपरेने मिळतो. कमवावा बिमवावा लागत नाही.
रागिणी : तुझ आपल काहीतरीच हा, एकदा बोललीस ते बोललीस परत अशी हिम्मत करू नकोस, समजलीस (झूम आणि कर्णकर्कश background स्कोअर).. Proud

पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी!

कंपनीचा मालक आकाश दिसतो. रागिणीला डील्स साइन करता यावी म्हणून तिला म्हणे पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी दिलेली असते. हा प्रकार मजेदार आहे. कंपन्यांमधे अंतर्गत कामकाजाला हे कधीपासून लागायची गरज पडली? पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ही सहसा व्यक्तिगतरीत्या एखाद्या व्यक्तीला काही अ‍ॅग्रीमेण्ट वगैरे साइन करायला देतात. एखाद्या कंपनी मधे एखाद्या व्यक्तीला डील डिस्कशन करायला किंवा इव्हन साइन करायला त्याची गरज नसते. तो कंपनीचा अंतर्गत मामला आहे. कंपनीचे व्यवहार कंपनी हीच एक एण्टिटी धरून केले जातात. कोणाला ऑथोरिटी द्यायची वगैरे ते कंपनीचा मालक कधीही ठरवू शकतो.

पुढचा भाग त्याहून विनोदी आहे. नंतर आत्याला आराम करू द्यायचा आहे. त्याच्या आड ती पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी म्हणे येत असते. त्यामुळे ती आराम करू शकत नसते. म्हणून आकाश ती पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी परत घेणार असे म्हणतो. मला वाटले इथे आता त्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीवरच सर्र्र्र्प सर्र्र्प झूम करून लाइट्स मारून तिची प्रतिक्रिया दाखवतात की काय.

तर ते करताना ती आत्या त्यावर सही करताना दाखवली आहे. असले काही करायला लागत नाही. मुळात पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीची गरज नाही. पण तरीही ती दिली म्हणजे त्यातले अधिकार वापरायची सक्ती नसते. गाडी चालवायची नसेल तर लायसन्स रद्द करण्यासारखे बिनडोक लॉजिक आहे हे. आणि ती परत घेताना/रद्द करताना वेगळे काही करावे लागत नाही. कागद नुसता परत घेतला किंवा फाडून टाकला तरी बास असते. इथे त्या आत्याच्या सहीचा काय संबंध कोणास ठाउक.

मराठी सिरियल मधल्या बोर्ड मीटिंग वै बघून वाटते की मी जे कंपनी सचिव म्हणून जे काही conduct करत होतो अनेक वर्षांपूर्वी ते काहीतरी भलतेच होते >>> Lol

र आ पटलं अगदी. मध्यंतरी माधवराव पेशवे ( नाव नाही लक्षात ). ह्यांच्यावर होती एक सिरीयल त्यात अर्धा वेळ राज घराणातल्या बायका स्वयंपाक घरात काम करतायत, किचन पॉलिटिक्स करतायत हेच दाखवत अस्त.

घरात दररोज गळत असलेल्या सिरीअलींमध्ये हे नाव नाही. मी दगडाखाली राहतेय का? चांगलेय मग.

कारण हपिसात माणसंच काम करतात. आणि त्यांना कुटुंब असतं, त्यात महिला असतात.
उद्या कंपनीच्या ऐवजी सीक्रेट सर्विसेस दाखवल्या तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. केस , क्रॅक्ड वगैरे शब्द अधून मधून टाकले कि झाले.
अरे विद्वानांनो, वारसा हा परंपरेने मिळतो. कमवावा बिमवावा लागत नाही.
>>> Lol Lol

बाकी मराठी सीरिअलवाल्यांकडे बोट आणि ती भर समुद्रात उडवण्याइतपत ऐपत आली. अजून काय अच्छे दिन हवेत तुम्हाला आं?

माधवराव पेशवे ( नाव नाही लक्षात ). ह्यांच्यावर होती एक सिरीयल त्यात अर्धा वेळ राज घराणातल्या बायका स्वयंपाक घरात काम करतायत, किचन पॉलिटिक्स करतायत हेच दाखवत अस्त >>>> स्वामिनी का?

फारेंड मी बघितली नाहीये मालिका पण जे काही poa बद्दल दाखवले आहे ते बरेच योग्य वाटत आहे. डील (म्हणजे हे तिसऱ्या पार्टी बरोबर असेल ना) सही करण्यासाठी कंपनी देऊ शकते poa कोणाला तरी. आणि revoke करताना पण नोटीस देऊन, revocation deed करून ती रद्द होते. कदाचित आत्याबाई रद्द झाल्याची पोच म्हणून सही करत असतील. एवढे डोके नाही लावणार हे लोक ते अलाहिदा..

Lol
आणि पॉवर ऑफ अटर्नी ने ज्याला पॉवर मिळाल्या आहेत त्याचीच सही ती पॉवर काढून घ्यायला म्हणजे लेखिकेला पीओए म्हणजे परत किल्ल्यांचा जुडगा टाईप काही वाटत असणार. किल्ल्या दिलेल्य व्यक्तीने फिजिकली किल्ल्या परत दिल्या पाहिजेत ना! तसंच डाकुमेंटचं!

हे म्हणजे मृत्युपत्र एक्झिक्युट व्हायच्या आधी, जिवंत असताना मृत्युपत्रात बदल करायचे तरी सध्याच्या जायजादच्या वारिसची सही पाहिजे.

एक एपिसोड फक्त किल्ल्यांबद्दल होता. >>> इथे गडकोट किल्ल्यांबद्दल असा समज झाला. अर्थात त्याने काहीही फरक पडत नाही.
घरातल्या महिलांपैकी जी लोकप्रिय आहे तिच्यावर गडकोट किल्ल्यांच्या मोहीमेची जबाबदारी येऊन पडते असे दाखवले कि मग ती टीव्हीवर येणार, नाक्या नाक्यावर जहागिरदार / सरपोतदार / सरदेशमुख / सरनौबत घराण्याच्या सूनेची चर्चा चालू असल्याने मग त्या खानदानातली प्रसिद्धीकांक्षिणी कैकेयी जळू लागते आणि या किल्ल्यांच्या मोहीमेला सुरूंग कसा लागेल यासाठी राजघराण्यातल्या राजकुमाराचे कान भरते, त्यामुळे तो गडावर स्वारी करतो ज्यामुळे महाराष्ट्र पेटतो....
मग कैकेयी हातात मुडपलेली वेणी धरून फिरवत गूढ हसते !
किल्ल्यांचा एपिसोड एव्हढा शब्द लेखकाला पुरेसा असेल.

@माझे मन,
स्वामी कादंबरीवरची जुनी मालिका असेल (मृणाल कुलकर्णी ज्यामुळे प्रसिद्धीस पावली) ती खरंच सुंदर मालिका होती. पेशवाईच्या त्या काळात घरातली कारस्थाने ही वस्तुस्थितीच आहे. आनंदीबाई या सक्षम महिला होत्या. आजच्या सारखं निव्वळ किचन पॉलिटिक्स दाखवायचं म्हणून नव्हतं. नवीन कुठली मालिका असेल तर काहीच सांगता येत नाही.

स्वामी कादंबरीवरची जुनी मालिका असेल
@र आ >>> नाही नाही. जुनी स्वामी मला आठवते थोडी थोडी अन आवडली होती हे ही आठवतेय. चारुशीला गोखले आनंदीबाई होत्या आणि मस्त नाक उडवत (का मुरडत?) त्यांनी आनंदीबाई साकारली होती. दया डोंगरे गोपिकाबाई होत्या. श्रीकांत मोघे राघोभरारी. टेचात भूमिका साकारली होती त्यांनी. पार्वतीबाई झालेल्या ऍक्ट्रेसनेही खूप छान काम केले होते. रविंद्र मंकणी आणि मृणाल देवही मस्तच. पॉलिटिक्स तर होतेच पण ते राघोबादादांनी पेशवेपद देण्यासाठी होते हे व्यवस्थित एस्टॅब्लिश्ड होते त्यात. मुर्खासारखे किचन पॉलिटिक्स नव्हते नक्कीच. आजकालच्या सीरिअल्सशी तुलनाच नाही होऊ शकत तिची.

स्वामिनी ही नवी मालिका आली होती .बहुतेक बाजीराव मस्तानी चित्रपट आल्यावर तो पिरिअड एनकॅश करण्यासाठी जे काही पीक आले त्यात ही ही एक. प्रोमोजमधली छोटी मुलगी गोड होती एवढे आठवतेय.

मग ती आत्या आणि तिचा मुलगा (ही नाती इथे वाचून कळली) आकाशला तसंच अर्धवट ठेवू पाहतात. >>> हे वाचून क्षणभर 'खरा वारसदार' नावाचा पिक्चर आठवला. पण ही स्टोरी भलत्याच दिशेने चालली आहे असं दिसतंय Lol

किल्ल्या म्हणजे महाजन घराण्याचा वारसा आहे आणि तो असा आयता मिळत नाही. कमवावा लागतो
पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीवरच सर्र्र्र्प सर्र्र्प झूम करून लाइट्स मारून तिची प्रतिक्रिया दाखवतात की काय
>>> Rofl भरपूर मनोरंजक मालिका दिसतेय. भूमी-आकाश नावांना फिसकन हसू आलं.

डील्स पहायची नसतील तर कलर्स वरच्या मालिका पहा Proud तिथे उगाचच दुसर्‍यांच्या नवर्‍यांच्या पळवणार्‍या बायका (नपबा) आहेत. ते नवरे इन क्वेश्चन इतके भंगार आहेत की त्यांच्या रिस्पेक्टिव बायका त्यांच्याबरोबर का आहेत असा प्रश्न पडावा. पण प्रत्येक सिरिअल मधे तेच. अगदी स्वामी समर्थांची कुठलीशी सिरीअल आहे त्यातही तेच. अधूनमधून नपबा ऐवजी बापपु पण आहेत काही सिरिअल्स मधे Proud

नपबा कथानक एकदा ठरवलं की ठरवलं. मग स्वामी समर्थ त्यावर उपाय सांगणार, शेरलॉक होम्स( नॉट इंटेंडेड) पन चा केस बायकोच्या पदरावराच्या मोराच्या नाकात बघून केस सोडविणार, नवरा न्यायाधीश असेल तर त्याच्यावर केलेली केस त्याच्याच कोर्टात येणार आणि तोच निवाडा करणार आणि आपल्यालाच दोषी ठरवण्यात... हिट्टच की!

तिथे उगाचच दुसर्‍यांच्या नवर्‍यांच्या पळवणार्‍या बायका (नपबा) आहेत. ते नवरे इन क्वेश्चन इतके भंगार आहेत की त्यांच्या रिस्पेक्टिव बायका त्यांच्याबरोबर का आहेत असा प्रश्न पडावा. >>>> Lol Lol
साबा सध्या स्वतःच्याच चांगल्या नवऱ्यापासून पळून दुसऱ्या खौट माणसाबरोबर लग्न करून स्वतःचा छळ करून घेऊन नंतर ओरिजिनल नवऱ्याकडे वेगळ्या नावाने परत आलेल्या बाईची सीरिअल बघतात. मी साडेतीन महिन्याच्या गॅपने तो एपिसॊड बघताना हिचे नाव का बदलले विचार करत होते. पण ती आपली बायको आहे हे पहिला नवरा ओळखत नाही. कारण तिच्या वरच्या ओठाला कोपऱ्यात साडेतीन मिलीमीटर जखम करून त्याची संरचना बदललेली आहे.

मी साडेतीन महिन्याच्या गॅपने तो एपिसॊड बघताना हिचे नाव का बदलले विचार करत होते. पण ती आपली बायको आहे हे पहिला नवरा ओळखत नाही. >>> साडेतीन महिन्याच्या गॅपनंतर कुठल्या नवर्‍याला बायकोचा चेहरा नीट आठवेल ?
( बाहेर साडेतीन महीने झाले तरी मालिकेत साडेतीन तास होत असतील तर मग थोडा बदल करावा लागेल)

नवरा आंधळा झाला, त्याची याद्दाश गेली, त्याला वेड लागलं, तो बाहेरख्याली झाला इ. सोपे आणि टेस्टेड ऑप्शन असताना ओठाच्या मेकपमनची का गरज पडावी? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
बाहेरख्याली झाला आणि वेश्या म्हणून बायकोलाच घेऊन आला हा ही टेस्टेड ऑप्शन आहे ना?

दुसऱ्या खौट माणसाबरोबर लग्न करून स्वतःचा छळ करून घेऊन नंतर ओरिजिनल नवऱ्याकडे वेगळ्या नावाने >>> हे एपिक आहे Lol
पण ती आपली बायको आहे हे पहिला नवरा ओळखत नाही. कारण तिच्या वरच्या ओठाला कोपऱ्यात साडेतीन मिलीमीटर जखम करून >>> हल्ली नुसता गालावर मस लावून वगैरे भागत नसावं Wink

अमितव Proud

नपबा - बापपु थ्रेडला एक सबथ्रेड पण आहे कलर्सवर - स्वतःच्या आतेभावाच्या मागे लागलेली मामाची मुलगी. या मुलींना काहीही झालं तरी आतेभावाचं लग्न मोडून त्याच्याशी स्वतः लग्न करायचं असतं.

अर्रे देवा.. या कलर्स मालिकेच्या क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष@@@@%%$

साबांमुळे स्वामी समर्थ आणि अजून एक टुकारेस्ट इंद्रायणी नावाची सिरिल कानावर पडते. किती हॉरिबल असावी.
ती अनिता दाते कपट कारस्थानी बाई आहे बहुतेक. त्यात नपबा - बापपु आहेत का माहित नाही. पण ते नसले तरी सिरीअल धन्यवादच आहे.

अमितव >>> या सिरीअलमधले हे गुडी गुडी कपल आहे. व्हिलन कपल वेगळे. त्यामुळे नवऱ्याला बाहेरख्यालीपणाचा ऑप्शन नाहीये. आणि घरातल्या इतरांनी घातलेले राडे त्याला निस्तरायचेत त्यामुळे दिव्यांग होणे हा ऑप्शन पण नाही बिचाऱ्याला.

या मुलींना काहीही झालं तरी आतेभावाचं लग्न मोडून त्याच्याशी स्वतः लग्न करायचं असतं
>>>> हो आई एक मराठी सिरीअल बघते. त्यात आहे खरी अशी मामाची मुलगी. अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसतो तसा त्यांना आत्तेभाऊ दिसत असतो.

फारेंड मी बघितली नाहीये मालिका पण जे काही poa बद्दल दाखवले आहे ते बरेच योग्य वाटत आहे >> लंपन, धन्यवाद.

तू यातल्या काही गोष्टी (यातल्या म्हणजे जनरल कंपनी मॅटर्स. या सिरीयलमधल्या नव्हे Happy ) स्वतः केल्या असशील किंवा थेट पाहिल्या असशील. त्यामुळे तुला नक्कीच जास्त माहिती आहे. मी जनरली पाहिले आहे ते कंपनीमधे सायनिंग ऑथोरिटी असतात. ते कंपनीच्या वतीने डील करू शकतात. एका कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीत मालक कोणालाही अशी ऑथॉरिटी म्हणून अ‍ॅड करू शकतो. मग व्यक्तिगतरीत्या पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी द्यायची गरज लागत नाही. हे बरोबर वाटते का?

अर्थात अशा सिरीज मधे एखादी गोष्ट प्रत्यक्षात बरोबर निघाली तर तो केवळ एक योगायोग असतो Happy यांची या बाबतीतील समज त्या रागिणीला प्रेशर येउ नये म्हणून पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी रद्द करावी लागेल असे वाटण्याइतकी आहे. या लॉजिकने उद्या रागिणीला गाडी चालवायची नसेल तर तिचे लायसन्स रद्द करायला जातील हे लोक.

ते डील डिस्कशन तर काय भारी होते! रागिणी मालकाच्या खुर्चीवर बसली आहे. आख्ख्या ऑफिसमधे एकच टेबल असावे. तेथे ती दुसरी पार्टी बसली आहे. तेथे आकाश (खरा मालक) येतो. तर ते दोघे लगेच आदराने उठून त्याच्याकडे जातात. पण ते ही ठीक आहे. असेल कोणीतरी जेआरडी टाटा टाइप व्यक्तिमत्त्व. पण मग हेच त्याला सांगतात की अहो तुम्ही मालकाच्या खुर्चीवर बसा आणि इतकेच नव्हे, तर तेच- म्हणजे डील वाली दुसरी पार्टी- रागिणीला सांगतात तेथून उठा आणि दुसरी खुर्ची आणा. तो आकाशही डीलमधली दुसरी पार्टी त्यांच्या कंपनीत कोणी कोणत्या खुर्चीवर बसावे सांगत आहे ते आपल्याला ऐकावेच लागेल अशा थाटात रागिणीला उठायला सांगतो. मग त्यातले नाट्य.

कार्यालयात लग्न लागले की वाजंत्री, बॅण्ड वगैरेंना एकदम फ्री हॅण्ड मिळतो तसे अशा सिरीज मधे अशा डॉयलॉग्ज नंतर झूम कॅमेरामन, लाइटिंग वाले व पार्श्वसंगीत वाले यांचे होते.

किल्ल्या दिलेल्य व्यक्तीने फिजिकली किल्ल्या परत दिल्या पाहिजेत ना! तसंच डाकुमेंटचं! >>>
बाकी मराठी सीरिअलवाल्यांकडे बोट आणि ती भर समुद्रात उडवण्याइतपत ऐपत आली. अजून काय अच्छे दिन हवेत तुम्हाला आं? >>>
पण ती आपली बायको आहे हे पहिला नवरा ओळखत नाही. कारण तिच्या वरच्या ओठाला कोपऱ्यात साडेतीन मिलीमीटर जखम करून त्याची संरचना बदललेली आहे. >>>
नपबा - बापपु >>>
स्वतःच्याच चांगल्या नवऱ्यापासून पळून दुसऱ्या खौट माणसाबरोबर लग्न करून स्वतःचा छळ करून घेऊन नंतर ओरिजिनल नवऱ्याकडे वेगळ्या नावाने परत आलेल्या बाईची सीरिअल >>>
अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसतो तसा त्यांना आत्तेभाऊ दिसत असतो. >>>

Lol भन्नाट निरीक्षणे आहेत Happy

मराठी सिरियल मधल्या बोर्ड मीटिंग वै बघून वाटते की मी जे कंपनी सचिव म्हणून जे काही conduct करत होतो अनेक वर्षांपूर्वी ते काहीतरी भलतेच होते >>>

>>>> Biggrin

लंपन, या सिरियलमध्ये कंपन्यांचे जे काही बिझनेस डिसिझन होतात ते पाहून आपल्याला कॉम्प्लेक्स येतो . किती सहजतेने कंपनी टेकोव्हर , मर्जर चालू असते

Pages