विलक्षणाच्या उभ्या पिकावर

Submitted by अनन्त्_यात्री on 14 July, 2024 - 00:50

विलक्षणाच्या उभ्या पिकावर
देण्या खडा पहारा
पाहिजेत जे - भेदू शकतील
स्थळकाळाची कारा

पाहिजेत ते - नेणीव ज्यांची
जाणिवेतुनी झरते
अर्थगर्भ मौनातही ज्यांचे
रोमरोम रुणझुणते

पाहिजेत जे - उत्स्फूर्तीच्या
पुष्करणीचे पाणी
पिऊनी खोदतिल अमूर्तावरी
अकल्पिताची लेणी

पाहिजेत जे - अज्ञेयावर
कलम करुनी ज्ञाताचे
विलक्षणाचे वाण बनवुनी
घेतील पीक उद्याचे

Group content visibility: 
Use group defaults

आहाहा!!
>>>>>खोदतिल अमूर्तावरी
अकल्पिताची लेणी
ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास स्वामी, टेंबेस्वामी , श्रीपाद वल्लभ, स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती, गुरु नानक, अर्जनसिंग - या सार्‍यांची आठवण झाली.

तिसरे व चौथे कडवे अद्भुत व अप्रतिम!

उत्कृष्ट व उत्कट रचना!

(अनेक ओळींत हृस्व दीर्घ सुटी आल्या आहेत - र्हस्व, हृस्व हा शब्द नीट टाईप होत नाही आहे - हे फक्त २८ मात्रापूर्तीसाठी नोंदवले)

अत्यंत वाचनीय रचना!

कारा तुरुंग कारागृह >> हो आठवले. धन्यवाद.

तिसरे व चौथे कडवे अद्भुत व अप्रतिम! >>> पूर्ण सहमत.

अवजड शब्दांमुळे गांगरून गेलो.
उभ्या पिकावर म्हटले कि बहिणाबाईंना हात जोडले जातात.

जाणिव आणि नेणीव यातला फरक नीट माहिती नाही.
अमूर्त, अकल्पित, उस्फूर्त, विलक्षण - कवितेचं गौडबंगाल सामावलंय.

पहिल्या कडव्यात कारागृह आणि पहारा हा विरोधाभास लक्षात आला नाही.

सुंदर कविता..
कारा म्हणजे उंबरठा ना..?
कुसुमाग्रजांच्या ओळी आहेत नां :
मार्ग न आमुचा रोधू शकती
ना धन ना दारा
घराची वा वितभर कारा
(कोलंबसाचे गर्वगीत)
कारावास म्हणजे उंबरठ्याच्या आतला रहिवास, जिथला उंबरठा तुम्ही ओलांडू शकत नाही तो म्हणजे तुरुंग असा अर्थ असावा.

अ'निरु'द्ध , कारा म्हणजे उंबरठा नाही.
कारा: {स्त्रीलिंग} (१. तुरुंग; कारागृह; कारागार; बंदिशाला. २. त्रासदायक धंदा, काम, संसार. [सं.])
--दाते शब्दकोश

सुरेख

मार्ग न आमुचा रोधू शकती
ना धन ना दारा
घराची वा वितभर कारा. >>>> यात 'घराची' हा शब्द 'दारा' साठी आहे. आमचा मार्ग धन, घराची दारा (इथे पत्नी हा अर्थ असावा) किंवा तुरुंगही रोधू शकत नाहीत.

मार्ग आमुचा रोधू शकतील
ना धन ना दारा घराची
वा वितभर कारा

सुरेख रचना! आवडली!

माझी छोटी भर --

पाहिजेत ते - शब्द जयांचे
ज्योतींना सावरती
अन् क्रांतीच्या वणव्यासाठी
होती झंझावाती