Conflict Resolution अर्थात संघर्ष निराकरण कसे करावे?

Submitted by माबो वाचक on 11 July, 2024 - 05:52

Conflict Resolution अर्थात संघर्ष निराकरण या विषयावरचा एक छान व्हिडिओ पाहण्यात आला. त्याचा गोषवारा पुढे देत आहे.
https://youtu.be/DSGy5yvC0hM?si=CO_e_Fvrbl7tIGGI

दैनंदिन जीवनात आपला अनेक लोकांशी संबंध येतो. आपले कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी, मित्र, कार्यालयातील कर्मचारी, इत्यादी. जेव्हा इतरांच्या कार्यपद्धतीमुळे आपल्याला त्रास होतो तेव्हा संघर्ष उद्भवतो. जिथे स्वतः व्यतिरिक्त इतर लोकांशी संबंध येतो तिथे संघर्ष हा जवळपास अटळ असतो. बरेच लोक हा संघर्ष दोन प्रकारे हाताळतात.
(१) टाळणे - संघर्षाशी निगडित असलेली व्यक्ती किंवा परिस्थिती यांच्यापासून पळ काढणे. यातून संघर्षाचे निराकरण होत नाही.
(२) आक्रमक संभाषण - यात संघर्ष निराकरणाची थोडीशी शक्यता असली तरी हा योग्य मार्ग नव्हे. याने मने दुखावली जातात, संबंध बिघडतात, नाती तुटतात आणि भविष्यात सहकार्य मिळण्याची शक्यता कमी होते. भांडणाने आपल्यालाही वाईट वाटते आणि मानसिक थकवा येतो. बऱ्याचदा मूड जाऊन अख्खा दिवस वाईट जातो. काही वेळेस अबोला निर्माण होतो.

वरील दोन्ही मार्ग अपयशी आहेत. संघर्ष निराकारणाचा तिसरा मार्ग म्हणजे सामोपचाराने संघर्ष हाताळणे. ते करण्याच्या सात पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या लक्षात रहाव्यात म्हणून पायऱ्यांच्या पहिल्या अक्षरापासून एक छोटे वाक्य तयार केले आहे, ते म्हणजे - सवे जा, चाव, (आणि) भाग
या पायर्या एका उदाहरणावरून समजावून घेऊ. समजा एकाच कार्यालयात काम करणारे दोन पुरुष कर्मचारी (माबो आणि वाचक) एक फ्लॅट भाड्याने शेअर करून राहतात. वाचक हा मोज्यांची एकच जोडी आठवडाभर वापरतो आणि आठवड्यातून एकदाच धुतो. त्या मोजांच्या दुर्गंधीचा माबोला त्रास होतो. त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर माबो ही परिस्थिती पुढील पायऱ्या वापरून कशी हाताळतो ते पाहू.

(१) मस्येचा स्त्रोत - ही समस्या ज्यीच्यामुळे निर्माण झाली आहे ती व्यक्ती. (वाचक)
(२) वेळ - संभाषण करण्याची योग्य वेळ. या वेळी दोनही बाजू निवांत असाव्यात. दोघांनाही संभाषण करण्यासाठी पुरेसा वेळ असावा. दोघेही चांगल्या मूड मध्ये असावेत व संभाषण करण्यास पात्र असावेत. म्हणजे गाडी चालवत असताना, दारू पिल्यावर किंवा झोप आलेली असणे ह्या चुकीच्या वेळा आहेत. TV, मोबाईल असे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी बंद असाव्यात. (वरील उदाहरणामध्ये वीकएंड ला दोघांनाही सोयीची असेल अशी वेळ निवडता येईल.)
माझे वैयक्तिक मत - बरेचदा लोक जेंव्हा समस्येची कृती घडते, लगेच तेंव्हा त्यावर संभाषण चालू करतात. त्यामुळे त्या व्यक्तीला “रेड-हँडेड” पकडले गेल्याची भावना निर्माण होते व ती व्यक्ती संभाषणास अनुकूल राहत नाही. मग ती व्यक्ती बचावात्मक पवित्रा घेते. (वाचक कार्यालयातून घरी आल्यावर मोजे काढत असतानाची वेळ चुकीची आहे.) संभाषणाची वेळ व विषय त्या व्यक्तीला अगोदर सांगता आला, तर ती व्यक्ती सुद्धा विचार करून संभाषणाच्या तयारीत राहू शकते.
(३) जागा - संभाषणाची जागा. संभाषण गुप्त राहील व दोघांनाही मनमोकळेपणे बोलता येईल अशी जागा निवडावी. (वरील उदाहरणामध्ये, घर हीच जागा कार्यालयापेक्षा जास्त चांगली राहील.)
(४) चांगली गोष्ट - संभाषणाच्या सुरवातीला त्या व्यक्तीची एखादी विशिष्ट चांगली गोष्ट किंवा कृती जी तुम्हाला खूप भावली, ती त्याला सांगा. हि स्तुती संदिग्ध नसावी. (तू खूप चांगला आहेस, असे म्हणण्यापेक्षा गेल्या आठवड्यात तू माझ्यासाठी बाहेरून जेवण घेऊन आलास, ते मला खूप भावले. असे म्हणावे.) हि स्तुती खरी आणि मनापासून आलेली असावी. या स्तुती मुळे ती व्यक्ती येणाऱ्या संभाषणासाठी अधीक सकारात्मक होईल.
(५) र्तन - त्या व्यक्तीच्या कोणत्या विशिष्ट वर्तनाचा किंवा गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो ते स्पष्ट पण सौम्य शब्दात सांगा. (तुझ्या मोज्यांच्या दुर्गंधीचा त्रास होतो.)
(६) भावना - या समस्येमुळे तुम्ही कोणत्या भावनांना सामोरे जाता ते सांगा. (मोज्यांच्या दुर्गंधीमुळे चिडचिड होते, अस्वस्थता येते, मूड ऑफ होतो. कोणी पाहुणे आले तर त्यांनाही त्रास होतो.)
(७) रज - तुमची काय गरज आहे, तुम्हाला त्या व्यक्तीकडून काय हवे आहे ते सांगा. (मोज्यांच्या दुर्गंधीची समस्या मिटायला हवी.) या पायरीमध्ये समस्या सोडविण्याच्या विविध पर्यायांचा सुद्धा विचार करता येईल. (जसे कि अजून मोजे विकत आणणे, जास्त वेळा धुणे, वापरलेले मोजे धुवेपर्यंत दुर्गंधी येणार नाही अश्या जागी ठेवणे, रूम फ्रेशनर चा वापर करणे, इत्यादी.)

माझ्या मते, या संभाषणामध्ये बोलण्याची पद्धत सौम्य असावी, आवाजाची पातळी कमी असावी. जर संभाषण चुकीचे वळण घेत आहे असे वाटले तर ते सौम्यपणे तिथेच थांबवावे व नंतर योग्य वेळ पाहून पुन्हा चालू करावे. बोलताना राग येऊ देऊ नये. जर आपल्याला राग आला तर, समोरच्याला सुद्धा राग येतो आणि मग समस्येवर उपाय सापडण्याची आशा कमी होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख.
इंग्रजीत असे बेसिक लेख खूप वाचलेत.
हल्ली WhatsApp च्या Meta ला पण काही विचारले की ती अश्या प्रॅक्टिकल टिप्स देते.
मराठीत या विषयावर बहुतेक पहिल्यांदाच वाचतेय.

सॉरी !! पण लेख कोणत्यातरी इंग्रजी आर्टिकल वर बेतलेला वाटतो. तसे असेल तरी भावानुवाद मात्र एकदम व्यवस्थित आणि योग्य उदाहरणे घेऊन झाला आहे.

धन्यवाद पियू
सॉरी !! पण लेख कोणत्यातरी इंग्रजी आर्टिकल वर बेतलेला वाटतो. >>>> आर्टिकल वर नाही, पण ज्या विडिओ वर बेतलेला आहे त्याची लिंक लेखाच्या सुरुवातीला दिली आहे.

आता संपादनाची वेळ गेली. त्यामुळे सॉरी.
तुम्ही व्यवस्थित त्या व्हिडिओला श्रेय दिलेले आहे.
आपल्याकडे सेल्फ हेल्प किंवा या अश्या विषयावर एवढं लिखाण का / कसं नाहीये याबाबत नेहमीच आश्चर्य वाटते.

अवांतर: नाही म्हणायला मी एकदाच ' जगात वागावे कसे ' या पुस्तकाचा भाग ४ का काहीतरी वाचला होता. अगदीच प्रॅक्टिकल टिप्स होत्या. ते पुस्तक कोणीतरी माझ्याकडून ढापले (सदर व्यक्तीला त्या पुस्तकाची जास्त गरज होती असे आता म्हणता येईल).

तेव्हा खूप लहान असल्याने त्या पुस्तकाचे सगळे भाग मला विकत घ्यायचे होते ते काही जमले नाही. नंतर विस्मरणात गेले. ते पुस्तक सुद्धा कोणत्यातरी जपानी पुस्तकाचा भारतीय भावानुवाद होता. पण मस्त जमून गेला होता. कोणाहीकडे ऑफीसमध्ये भेटायला जाताना एखादे छोटे पुस्तक वाचायला न्यावे म्हणजे तुमची वाट पाहण्याची वेळ काही कारणाने लांबली तर तुमचा वेळ वाया जाणार नाही; वॉशरूम मध्ये लघुशंकेला गेल्यावर वॉशरूम चे पॉट (इंडियन पद्धतीचे वॉशरूम किंवा सरळ सपाट फरशीची मोरी) आधी पाणी टाकून ओले करावे कारण कोरडी फरशी किंवा पॉट शू चा वास पट्कन पकडतो आणि तिथे तो दीर्घकाळ राहतो एवढ्या बेसिक टिप्स त्यात होत्या.

भारतात / मराठीत खूप कमी लोकांना हे पुस्तक माहित आहे याचेही कधीकधी खूप आश्चर्य वाटते.

छान लेख आहे.
बरेच गोष्टी आपल्याला माहीत असल्या तरी आचरणात आणने अवघड पडते. ती वेगळी गोष्ट झाली. पण मुळात निदान माहीत असणे तरी गरजेचे असतेच.

पियू तुझ्या पोस्ट सुद्धा छान.. जगात वागावे कसे ' पुस्तक सुद्धा इंटरेस्टिंग वाटत आहे.. सू ची टीप लक्षात राहील Happy

धन्यवाद ऋन्मेष, पियू

@पियू ,
https://vishwakosh.marathi.gov.in/33009/
बहुदा हे लेखक होते त्या पुस्तकाचे. आंतरजालावर शोधताना सापडले. त्या लेखात त्यांच्या पुस्तकाचे आणि जपान प्रवासाचा उल्लेख आहे. खूप जुने पुस्तक वाटते आहे. ते पुस्तक काही सापडले नाही पण शोधताना हे नवीन पुस्तक सापडले.
https://amzn.in/d/0ieGURzY

कॉन्फ्लिक्ट रीजोल्युशन पुस्तक माहिती बद्दल धन्यवाद.
१ अजून अनुभव म्हणजे काही लोक कॉन्फ्लिक्ट आला तर मौन धारण करतात, असं दाखवतात की विचार करत आहेत. त्या वेळेत एखादी उताविळ व्यक्ती काहितरी बोलते किंवा कृती करते त्याने समिकरण बदलते मग मौन वाल्याला बरेच होते. त्याला कोणी दोष देत नाही.

पियू,
तुम्ही उल्लेख केलेलं पुस्तक माझ्या वडिलांनी वाचले होते, ते वेळोवेळी अशा सूचना देत असतात, तुम्ही लिहिलेली टीप ही त्यांनी आम्हाला लहानपणी सांगितली होती त्यामुळे ( आणि असली कसली पुस्तक वाचतो हा माणूस अशा विचारानं) मला पुस्तकाचं नाव अजूनही लक्षात आहे. मी पुस्तक मात्र वाचले नाहीय, मिळाले तर बरं होईल

चांगला लेख,
आशू२९ +
तुम्ही लिहिलेलं मी नेहेमी आचरणात आणते, त्याचा अधिकचा फायदा असा होतो की अशावेळेस मौन साधल्याने मनःशांती ही मिळते ( कचाकचा भांडण किंवा जीत ओतून वादविवाद करता येत नसल्याने मौन सोयीचे पडत असे त्यानंतर असाच कधीतरी तुम्ही लिहिलेला शोध लागला व त्याचा फायदा लग्नानंतर जाणवला)

कॉन्फ्लिक्ट डायल्यूट करण्याची माझी पद्धत म्हणजे सहन करत रहाणे. त्याने फार म्हणजे प्रचंड तोटा होतो. पण कन्फ्रंटेशन नाही जमत.

निराकरण करण्याची ही पद्धत फार पुस्तकी व बाळबोध वाटली.

(व्हिडीओ पाहिला नाही.)

(बाळबोध या शब्दाला अधिक चांगला पर्याय सुचला नाही, विधान आक्रमक आहे असे कृपया समजले जाऊ नये)

सर्वांचे आभार.
कॉन्फ्लिक्ट डायल्यूट करण्याची माझी पद्धत म्हणजे सहन करत रहाणे. त्याने फार म्हणजे प्रचंड तोटा होतो. पण कन्फ्रंटेशन नाही जमत. >>> सामो, मला सुद्धा कन्फ्रंटेशन जमत नाही. यावर आता मी वरील पद्धत वापरता येते का ते पाहतो. अगदी प्रत्येक पायरी अचूकपणे नाही जमली तरी - योग्य वेळी मने शांत असताना, सौम्यपणे व शांतपणे संभाषण करणे, आपले म्हणणे अचूक मांडणे - हे या पद्धतीचे सार आहे असे मला वाटते.

aashu29 आणि MeghaSK , वादविवादाच्या वेळी आवाज वाढले असताना, वातावरण गरम असताना मौन बाळगणे हे चांगलेच. पण तो विषय तसाच सोडून न देता नंतर योग्य वेळी वरील पद्धतीचा वापर केला तर यश मिळण्याची शक्यता वाढते.

संघर्ष निराकारणाच्या संभाषणासाठी, अजून एक पद्धत काम करेल असे मला वाटते. ती म्हणजे बोलण्याऐवजी लिहून संवाद सादने. लिहिताना आपल्याला आपले म्हणणे मांडण्यासाठी विचार करायला तुलनेने भरपूर वेळ मिळतो. आपण लिहिलेले वाचून, पुनर्विचार करून त्यात दुरुस्ती करू शकतो. लिहिलेला मजकूर एक-दोन दिवस तसाच ठेवून, गरज असेल तर दुरुस्ती करून मग पाठवू शकतो. लिखाणामध्ये विखारी शब्द, भावना टाळता येतात. आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडता येते. बऱ्याच जणांना बोलताना भावना अनावर होतात. राग येतो, रडू येते, काय बोलावे समजत नाही, तोंडातून शब्द फुटत नाहीत, सरळ विचार करता येत नाही. हे सर्व संवादासाठी घातक आहे जे लिखाणात टाळता येते.
बोलताना आपण बऱ्याच वेळा नको ते बोलून जातो, आवाज वाढतो, राग येतो, जे सर्व मग दुसऱ्या व्यक्तीकडून परावर्तित केले जाते. याला पुढील उपमा देता येईल - दोन व्यक्ती एकमेकांचा हात धरून निसरडा चढ चढत असताना दुसऱ्या हाताने एकमेकांशी मारामारी करत आहेत. याची परिणीती दोघेहि धडपडत खाली जाण्यात होईल, दोघांनाहि खरचटेल.
तर हे लिहिणे ई-मेल, किंवा कागदावर असावे. इन्स्टंट मेसेजिंग (एसेमेस किंवा ओट्सऍप) नसावे. त्यात विचाराला पुरेसा वेळ मिळत नाही. प्रतिसाद देणार्याने सुद्धा १-२ दिवस विचार करून लिखित प्रतिसाद दिला तर खूप चांगले.
मी या लिखित पद्धतीचा कार्यालयातील समस्या सोडविण्यासाठी वापर केला होता. तो यशस्वी झाला.
मी मायबोलीवर माझा प्रतिसाद वाचून त्यात पुन्हा पुन्हा बदल करतो आणि मग पब्लिश करतो. त्यामुळे जास्त अचूक व मुद्देसूद लिहिता येते.

>>>>.बोलताना भावना अनावर होतात. राग येतो, रडू येते, काय बोलावे समजत नाही, तोंडातून शब्द फुटत नाहीत
औषधे घेण्यापूर्वी हे सतत होइ.
पण आता एकदम चिल!!! नो लोड - स्वभाव बनलाय.

कॉन्फ्लिक्ट डायल्यूट करण्याची माझी पद्धत म्हणजे सहन करत रहाणे. त्याने फार म्हणजे प्रचंड तोटा होतो. >>> अगदी खरं. सामो ही पद्धत घातक आहे सहन करणार्‍यासाठी. एक तर चुकीचा पायंडा पडतो की ह्या व्यक्तीला ढोपरून (वापरून) घेऊ, ती सहन च करेल. दुसरं म्हणजे बुली करणार्याला तो बुली करत आहे असं वाटतच नाही, तीच करेक्ट प्रोसेस असते त्याच्यासाठी आणि बुली होणारा आत्मविश्वास खच्ची होऊन मनोमन जळत राहतो.

मेघा, मौन धारण करून कदाचित काही काँफ्लिक्ट तात्पुरते सुटत असतील पण लाँग टर्म मधे हे योग्य नाही, ऑफिसात अनरिलायेबल शिक्का बसू शकतो. पर्सनल लाईफ मधे तर कित्येक गोष्टी बोलून, निराकरण करून सुटतात. मौन फक्त त्यावेळचा प्रश्न सोडवतो, पण त्या विषयावर मळभ क्लियर होण्यासाठी बोलणे गरजेचे असते.

आधी मी पॉलिटिकल ऑफिस कॉन्फिक्ट ना आततायीपणे उत्तर द्यायचे. आता माबोवाचक म्हणतात त्या प्रमाणे प्रोफेशनल आणि शांत रीप्लाय देणे शिकले आहे.

त्या विषयावर मळभ क्लियर होण्यासाठी बोलणे गरजेचे असते. >>>> अनुमोदन. एकूणातलं मळभ-बिळभ माहित नाही पण कोणाची एखादी खटकलेली गोष्ट थेट त्या व्यक्तीशी बोलायची राहिली तर मला ती ठुसठुसत रहाते! मग ती फार मोठी / महत्त्वाची नसली तरी आणि मग ते बोलून टाकेपर्यंत चैन पडत नाही. :| त्यांनी केलेली एखादी गोष्ट आपल्याला आवडली/पटली नाहीये हे त्यांना कळायला हवं नाहीतर मग आपण करतो ते बरोबर आहे असा त्यांच्या गैरसमज होतो आणि ते ती गोष्ट पुन्हा करत रहातात हे त्यामागचं तत्वज्ञान! मुळ लेखात लिहीलं आहे तसं हे सांगताना भांडायची गरज पडत नाही, शांतपणेही सांगता येतं पण सांगावं लागतच.
इथे माबोवरच्या काही ओळखीच्या लोकांनी (ज्यांचा माबोबाहेरही संपर्क असतो) व्यक्तिगत पातळीवर बोललेल्या काही गोष्टी कानावर आल्या होत्या (वैयक्तिक गोष्टी नाही.. पण माझ्याबद्दल). ज्या मला अजिबात पटल्या नव्हत्या आणि त्यांनी त्या बोललेल्या आवडलंही नव्हतं. बद्दल त्यांना थेट विचारून टाकेपर्यंत चैन पडलं नव्हतं. त्यातल्या एकाशी तर घडलेल्या घटनेबद्दल १०-१२ वर्षांनी बोललो होतो. ती व्यक्ती ते विसरलं असल्याचं म्हणाली आणि तस खरच बोललं गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त केल होती. मला तशी अपेक्षा नव्हती पण त्यांना सांगेपर्यंत चैन पडलं नव्हतं. Happy

बोलताना भावना अनावर होतात. राग येतो, रडू येते, काय बोलावे समजत नाही, तोंडातून शब्द फुटत नाहीत.>>>
मलाही अगदी असंच होतं. ह्यावर उपाय म्हणून मग मी काहीच बोलत नाही. अर्थात त्याचा त्रास होतोच. शिवाय लोकं आपल्याला कायम गृहीत धरतात ते वेगळंच.
एक दोनदा केला प्रयत्न बोलण्याचा. पण नाही जमलं.

पराग माझेच संवाद बोलत आहात असं वाटलं.

शर्मिला, तुम्ही टेक्स्ट मधून बोलण्याचा प्रयत्न केलाय का? आता मेल्/पत्र कोणी वाचत नाही. ज्यांच्याशी बोलताना रडू/राग येतो त्यांच्याशी शांतपणे टेक्स्ट थ्रू बोलायचा सराव करा पण मनात साचू देऊ नका. कधीकधी समोरचा बोलू देत नाही/त्यांच्या साठी पण हा उपाय करू शकतो.

शर्मिला, तुम्ही टेक्स्ट मधून बोलण्याचा प्रयत्न केलाय का?>> अजून तरी नाही केला.
कधी नात्यातले कंगोरे असे असतात की नाही काही करता येत.... आणि कधी लोकं दूरचे असतात म्हणून सोडून देते.

पूर्वी काही लोकं म्हणायची, 'वरचा सर्व बघतोय '. पण आता तर 'वर ' असा कुणी नसतो हे कळलंय. त्यामुळे तीही सोय नाही राहिली.
योग्य, मुद्देसूद बोलून आपलं म्हणणं मांडता येणं ही एक कला आहे. ती शिकायची राहिलीय.

योग्य, मुद्देसूद बोलून आपलं म्हणणं मांडता येणं ही एक कला आहे. ती शिकायची राहिलीय.>> इट्स नेव्हर टू लेट. सिंगापोर चे जुने पं. प्रधान ८०+ वय असताना ही चायनीज शिकत होते, त्यांना भाषेतली मास्टरी हवी होती. Happy

शर्मिला, मेटा एआय शी थोडक्यात आपली सिचुएशन लिहून पॉइंट वाईज बोलण्याचा सराव करा. परफेक्ट नाही पण मदत होईल..

सामो, तू मेटा एआय शी मुलाखत संदर्भात मदत घेतल्याचे कुठे तरी मेंशन केले होतेस. हे मला खूप हेल्पफूल वाटले, थँक्स.

शर्मिला, मेटा एआय शी थोडक्यात आपली सिचुएशन लिहून पॉइंट वाईज बोलण्याचा सराव करा. परफेक्ट नाही पण मदत होईल..>> नक्की प्रयत्न करेन.

>>>>>>>>>>>सामो, तू मेटा एआय शी मुलाखत संदर्भात मदत घेतल्याचे कुठे तरी मेंशन केले होतेस. हे मला खूप हेल्पफूल वाटले, थँक्स.
थँक्स आशू.